हवेतला गारवा कुठच्या कुठे पळालाय आणि उष्म्याचा पारा चढू लागलाय. बाहेरचं तापमान आणि घरातली चीड-चीड दोन्हींमध्ये कमालीची वाढ व्हायला लागलीय. त्यात जर शेजार्यांच्या घराला कुलूप लागलं असेल, तर आपल्या स्वयंपाक घरातली भांड्यांची आदळआपट पेपर वाचीत बसलेल्या घरातल्या कर्त्याला जोरात ऐकू जाईल एवढी मोठ्याने व्हायला लागलीय. पूर्वी प्रेमाने समोर येणारा चहाचा कप सध्या त्या कॉफी टेबलवर रागात ठेवला जातोय ह्याचीही जाणीव व्हायला लागलीय.
यावर्षी कधी नव्हे एवढा छान थंडीचा मौसम आपण अनुभवला. मुंबईत स्वेटर्स बाहेर काढावे लागले म्हणजे विचार करा नं. आता म्हणताहेत जेवढी छान थंडी अनुभवली तेवढाच छान उन्हाळाही आपल्याला झेलायचाय. ऊन मी म्हणणार आहे आणि अंगाची लाही लाही करून सोडणार आहे. एका अर्थाने आमच्या दृष्टीने ते बरं आहे, कारण पर्यटनाच्या व्यवसायात असलो तरी आम्ही हवेचे व्यापारी आहोत असं मला वाटतं. टपोरी भाषेत सांगायचं झालं तर हवा विकणं हा आमचा धंदा आहे. हवेप्रमाणे आम्ही आमच्या नौकेची शिडं अॅडजस्ट करतो आणि वार्याच्या दिशेने जातो. हल्ली निवडणूकांचा मौसम आहे. या पक्षातून त्या पक्षात, त्या पक्षातून आणखी कोणत्या तरी दुसर्या पक्षात, थोडक्यात ज्या पक्षाची चलती तिथे उमेदवारांचा ओढा. काही-काही वेळा हास्यास्पद गोष्टीही वाचायला मिळताहेत. नंतर विचार केला, त्यांना हसताना जरा आपण आपल्याकडेही बघूया, आपणही तसेच आहोत की. आपला पक्ष किंवा पंतप्रधान किंवा अध्यक्ष कोण आहे तर तो निसर्ग. त्या निसर्गाचा वरदहस्त त्या-त्या वेळी ज्या कोणावर असेल तिथे त्या बाजूने आम्ही. लागलीच त्या जागेचे गोडवे गाणार, त्याच्याशी गळाभेट करणार, त्याचे फोटो छापणार, जाहिरातीत त्याविषयी बोलणार, पर्यटकांच्या पाठी लागणार. आणि जरा का निसर्गाने त्यावर खफामर्जी केली की आम्हीही त्यावरून लक्ष हरवणार आणि निसर्ग आता कुणावर कृपादृष्टी टाकतोय त्याप्रमाणे तिथे आमचा मोर्चा हलवणार. मग त्याची वाहवा, त्या जाहिराती. सतत पक्षांतरं करणार्यांना हसण्याचा आम्हाला अधिकार नाही, आम्हीही तसेच आहोत, ऋतुप्रमाणे रंग बदलणारे.
हो! आम्ही आहोत हवेचे व्यापारी, कोणत्या देशात कोणत्या वेळी काय प्रकारची हवा असते ह्यावर आमचं बारीक लक्ष. आम्ही तसं म्हटलं तर हवेचं ट्रेडिंग करतो. आम्ही ट्रॅव्हल एजंटपेक्षा एअर एजंट आहोत, सीरियसली. कोणत्या शहरात, कोणत्या देशात हवामान कधी असह्य होतं किंवा कधी सुसह्य ह्यावर आमची कडी नजर असते. या ठिकाणची हवा असह्य झाली की त्यांना सुसह्य ठिकाणी घेऊन जायचं आणि तिथली हवा असह्य व्हायला लागली की त्यांना इथे घेऊन यायचं...हे आमचं चक्र असंच सुरू रहावं म्हणून आमच्या बिझनेसमधला आमचा मोठा सपोर्टर कोण असेल तर तो आहे निसर्ग. आमच्या बिझनेसला कधीही बाधा होऊ नये, कोणतंही डाऊनटाईम येऊ नये म्हणून त्याने आपल्या देशाची चार सिझनध्ये विभागणी करुन दिलीय. त्यामुळे इथे उन्हाळा सुरू होतो तेव्हा तो आमच्यासाठी उत्तरेकडे थंड हवेची तजवीज करुन ठेवतो. तिथे अतिथंड हवा होते तेव्हा दक्षिणेकडची हवा तो सुसह्य करुन टाकतो आणि मग आमचं ट्रेडिंग जोरात सुरू. इधर का उधर, उधर का इधर आणि आमच्या मोठ्या सपोर्टरने फक्त आपल्या देशाचच असं हवेचं चक्र बनवलंय असं नाही तर आमच्यासाठी त्याने असे काही देश निर्माण केलेयत की तिथे वर्षभर हवा मस्त मस्त, मग काय आमचं तारु उधळलंच की, आमचा ट्रेडिंग बिझनेस काय तेजीत. म्हणतात न पार्टनर्स-सपोर्टस् नेहमी निवडून घ्यावेत. आम्ही निसर्गाला आणि हवेलाच आमचं पार्टनर बनवून टाकलं, त्याच्या देण्याला कुठे सरहद्दच नाही. त्यामुळे आमचं साम्राज्य पसरवायला आम्हाला स्काय नव्हे, हवा इज द लिमिट. जिथे जिथे हवा आहे तिथे तिथे आम्ही बिझनेस वाढवू शकतो. माझ्यावर हिंदी- बॉलीवूड इंडस्ट्रीचा इतका जबरदस्त पगडा आहे की इथे हा डायलॉग मारल्याशिवाय मला चैन पडत नाहीये, है कोई माईका लाल इतना खुशनसीब?
बरं आम्ही एवढंच करुन थांबत नाही तर गरम हवेला आम्ही उन्हाळा विकतो आणि थंड हवेला हिवाळा. हो कारण गरम हवेला थंडी विकणं किंवा थंड हवेला उन्हाळा ही झाली ट्रेडिशन, हा झाला प्रवाह आणि प्रवाहाबरोबर जाणं आपण करीतच असतो पण प्रवाहाविरुद्ध चॅलेंजिंग असं काही करण्यात आम्हाला नेहमीच उत्साह वाटतो आणि आमचा मोठा सपोर्टर-पार्टनर तो निसर्ग आहे नं तोही आम्हाला काय खुणावत असतो कारण त्याला बॅलन्स साधायचा असतो नं, जगात सगळेजण एकाच दिशेकडे किंवा एकाच दिशेच्या हवेकडे धावले तर तोल नाही का जाणार? मग तो आमच्याामगे त्याची वैशिष्टय घेऊन भुणभुण लावतो तो आम्हाला म्हणतो, डिसेंबर-जानेवारीतलं बर्फातलं स्वित्झर्लंड तुम्ही कधी दाखवलंय, जानेवारी-फेब्रुवारीतला काश्मिर, हिमाचलमधला हिमालय आणि त्याच्या पायथ्याशी असलेली बर्फाच्छादित गावं, कधी तुम्ही त्याचा आस्वाद घ्यायला शिकवलंय. उठा! विका थंडीत थंडी आणि उन्हाळ्यात उन्हाळा. आम्ही कामाला लागलो, मोठ्या सपोर्टरचं म्हणणं कसं हो अव्हेरणार? त्याने सपोर्ट काढून घेतला तर? नको रे बाबा, याचं म्हणणं टाळणं परवडणारं नाही.
शहरातली हवा, राज्यातली हवा, देशातली हवा विकणं किंवा त्याच्या चढण्या-उतरण्यावर लक्ष ठेवून त्याप्रमाणे आपली यादी हलवणं हे झालं आमचं रुटीन पण त्यासोबत आमचं लक्ष असतं तुमच्या घराकडे. तुमच्या घरातली हवा खेळती असणं-मोकळी असणं, त्याचं तापमान कंट्रोलध्ये राहणं ही आमची मनोमन इच्छा पण आयुष्य थोडंच एवढं सरळ सुरळीत असतं. तुमच्या घरातलं तापमान कधी वाढणार ह्याचा अंदाज आम्हाला असतो आणि ह्या वाढत्या तापमानाला घरातला तो कृत्रिम एअरकंडिशनर नाही कामी येत, तिथे हवा असतो शुद्ध मोकळया हवेचा एक ब्रेक आणि हा विचार तुमच्या मनात यायचा अवकाश, आम्ही लागलीच तुमच्यासमोर प्रकट होतो, म्हणजे तसे आम्ही तुमच्या आजूबाजूला कायम फिरत असतोच पण कारणाशिवाय तुम्हाला डिस्टर्ब करीत नाही. हो तुमच्या घरातलं तापमान वाढण्यासाठी आम्ही कारणीभूत ठरू नये. आपल्याला कळलं पाहिजे कुणासमोर कधी कोणत्यावेळी जायचं ते. वर्ष संपत आलं पण मेलं चार दिवसांची कधी उसंत मिळाली नाही. मीच एकटीने मक्ता घेतलाय का मुलांचा अभ्यास घेण्याचा. एकतीस मार्च आली जवळ, आता बॉस कंपनी विचारणार टार्गेटचं काय झालं म्हणून, अरे! बाहेरची परिस्थिती बघा आणि मग विचारा...पण नाही...दम काढणार! होतं की नाही असं संभाषण, ह्यावेळी तुमच्या घरातलं तापमान वाढतं हे आम्ही जाणतो आणि मग त्या तापलेल्या वातावरणावर थंड हवेचा शिडकावा करण्याचं काम आम्ही करतो.
पूर्वी मार्च महिना म्हटला की परीक्षांचा महिना म्हणून आम्ही स्वस्थ बसायचो. पण हल्ली तसं नाही राहिलंय. आम्ही मार्च महिनाही पीक सीझन बनवलाय. प्रवाहासोबत आम्ही जातोच. निसर्गाची मर्जी जिथे, तिथे आम्ही असतोच पण प्रवाहाविरुद्ध गोष्टी करण्यातही आम्ही पटाईत. त्यामुळे परीक्षांच्या मोसमात फेब्रुवारी-मार्च महिन्यात कोण जाणार सहलीला? ह्या सर्वसाधारण मतावर आम्ही चॅलेंज घ्यायचं ठरवलं. इथे मला मॅनेजमेंटमधली गोष्ट आठवते ती म्हणजे, एकदा एका प्रख्यात शूज बनविणार्या कंपनीने आपले दोन स्ट्रॅटेजिस्ट आफ्रिकेत पाठवले. पोटेंशियल काय आहे ते बघा आणि रीपोर्ट द्या. एकजण म्हणाला, अजिबात पोटेंशियल नाहीये, इथे कुणीही चप्पल घालत नाही, उगाच आपण आपली एनर्जी वेस्ट करूया नको. दुसरा म्हणाला, इथे एक नव्हे दोन फॅक्टरीज टाकूया कारण एकदा का इथल्या लोकांना चप्पल आणि शूज किती महत्त्वाचे आहेत ते कळलं, त्याचे फायदे कळले तर आपण पुरे पडणार नाही इतकी डीमांड येईल आणि त्यासाठी रेडी राहूया. दोन व्यक्तींचा दृष्टीकोन किती वेगवेगळा किंवा दोन टोकांचा असू शकतो बघा नं. आम्हीही ह्या परीक्षांच्या मोसमाचं चॅलेंज घेतलं आणि साउथ अमेरिकेपासून स्वित्झर्लंडपर्यंत, साउथ कोरियापासून स्पेनपर्यंत, अमेरिकेपासून ऑस्टे्रलियापर्यंत तसंच भारतात कश्मिरपासून कन्याकुमारीपर्यंत, काझिरंगापासून कॉर्बेट पार्क पर्यंत, तवांगच्या बुम-ला-पासपासून मनालीच्या रोहतांगपर्यंत अक्षरक्ष: हजारो पर्यटकांना पर्यटन घडवलं. जपानमध्ये तर आम्ही मार्चमध्ये हंगामा केला. भारतातून पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या संख्यने पर्यटक जपानमध्ये नेण्याचा विक्रम वीणा वर्ल्डने केला. आणि सगळ्या टूर्स साग्रसंगीत पार पाडल्या आणि अजून सुरू आहेत, त्याचं श्रेय आमच्या संपूर्ण टीमला आणि टूर मॅनेजर्सना जातं. फेब्रुवारी मार्चमध्ये शंभर टक्के यशस्वी सहलींचे काही प्रातिनिधिक फोटो इथे एवढ्याचसाठी देतेय की आपला हेतू चांगला असेल तर गोष्टी घडू शकतात. प्रवाहाविरुद्ध पोहूनही आपण विनर म्हणून पहिल्या नंबरने पास होऊ शकतो. यशस्वी होऊ शकतो. जो अदरवाईज प्रॉब्लेम दिसतो तो चॅलेंज घेऊन त्यातून अपॉर्च्युनिटी घेता आली पाहिजे. लेट्स डू अवर बेस्ट, देन ओन्ली एव्हरीथिंग विल फॉल इन प्लेस! हॅव अ हॅप्पी संडे!
Post your Comment
Please let us know your thoughts on this story by leaving a comment.