आधीच खूप उशीर झालेला आहे. कुणाला दोष देत बसण्यापेक्षा येेत्या दहा वर्षात आपण काही करू शकलो तर येणार्या अनेक पिढ्या भारताच्या पर्यटन समृद्धीचा अभिमान बाळगतील. ब्रिटिशांनी बांधलेली गेटवे ऑफ इंडियाची आणि इंडिया गेटची कमान, मोगलांनी बांधलेले गार्डन्स, ताजमहाल, रेड फोर्ट, कुतुबमिनार, ह्या गोष्टी पर्यटकांना दाखवून आम्हाला खरंतर कंटाळा आलाय.
गेली पस्तीस वर्ष पर्यटनक्षेत्रात आहे पण एकही दिवस कंटाळवाणा गेला नाही ह्याचं कारण काय असावं हा विचार करीत होते. तसं हे क्षेत्र थोडं जिकिरीचंच आणि सरकारकडूनही दुर्लक्षितच. एकहाती सत्त्ता एकवटलेल्या, दुसर्यांदा सत्तेवर आलेल्या आत्ताच्या भक्कम सरकारकडून टूरिझमच्या दृष्टीने दमदार पावलं उचलली जातील अशी आशा आम्ही सर्व देशप्रेमी आणि पर्यटनप्रेमी भारतीय मंडळी लावून बसलोय. सवासो करोड भारतीय हा शब्द आता आपल्या सर्वांच्या परिचयाचा झालाय. जगाच्या बाजारपेठेला तो आकर्षित करतोय, आपण मात्र त्याकडे दुर्लक्ष करतोय. टूरिझमच्या बाबतीत जर प्रत्येक राज्यात आपण पर्यटनाभिमुख गोष्टी निर्माण करू शकलो तर हीच सव्वाशे कोटी भारतीय मंडळी एका राज्यातून दुसर्या राज्यात मोठ्या संख्येने आणि अभिमानाने पर्यटन करायला लागतील आणि तेव्हा अनेक हातांना काम मिळेल. एक पर्यटक किमान आठ लोकांना काम देतो हे संख्याशास्त्र सांगतं. नुसता गुणाकार केला तरी डोळे विस्फारतात. नोकर्या निर्माण कशा करायच्या हा प्रश्नच उरणार नाही! आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशिन लर्निंगमुळे अनेक नव्हे असंख्य व्यवसायांतून माणसांची आणि नोकर्यांची गच्छंती होतेय, होणारेय. कामं कमी होण्याने समाजात आर्थिक अशांतता निर्माण होणारच आहे, पण त्याहीपेक्षा धोकादायक असणार आहे ते म्हणजे मानसिक असंतुलन. रिकामे हात आणि निराश मनं समाज, राज्य आणि देश पोखरायला पुरेशी ठरतील. ए.आय-एम.एल-आय.ओ. टी ह्या गोष्टी आपण रोखू शकत नाही. आपल्या जीवनात त्याचा शिरकाव आता अपरिहार्य आहे. त्याने हळूहळू आपला कब्जा घ्यायला सुरुवात केलीच आहे. नोकर्यांवर गदा आणणारं, हातातलं काम हिरावून घेणारं हे संकट आपल्याला थोपवता येणार नाहीये मग त्याचा मुकाबला करायलाच हवा, आणि त्यासाठीच मला टूरिझम वा पर्यटन ही खूप मोठी संधी वाटतेय. ही सर्व्हिस इंडस्ट्री आहे. इथे लाड-प्यार- भावनांचा मामला आहे, प्रत्येक पायरीवर माणसांची गरज लागणार आहे. इतर व्यवसायातनं कमी होणार्या नोकर्यांचं प्रमाण इथे तोल सावरायला मदत करेल, आणि तेही मोठ्या प्रमाणावर. सिंगापूर, दुबईसारख्या देशांकडून आपण प्रेरणा घ्यायला हवी. ह्या दोन्ही देशांकडे ना निसर्गाचा वरदहस्त ना इतिहासाचा, एवढंच नव्हे तर पिण्याच्या पाण्याचीही वानवा. देशाला तारायला टूरिझम हे क्षेत्र महत्त्वाची भूमिका बजावेल हे त्यांच्या दूरदृष्टीने जाणलं आणि पर्यटनासाठी आकर्षणांची तसेच त्याला लागणार्या संलग्न सोयी- सुविधांची अतिजलद वेगाने अशी काही निर्मिती केली की जगाने आश्चर्याने तोंडात बोटं घातली. पर्यटनविकासाच्या बाबतीत हे देश आता श्रेष्ठत्वाच्या स्पर्धेत उतरून भविष्यासाठी बरंच काही निर्माण करून ठेवताहेत. वर्तमानात त्यांनी टूरिझमच्या बळावर जगाला आपल्याकडे खेचलं आणि टूरिझम ही एक महत्वाची इंडस्ट्री बनवली. त्यांच्याकडे काही नव्हतं ह्या प्रतिकुलतेतूनच कदाचित नव्याने काही निर्माण करण्याची, तेही वेगाने करण्याची जिद्द त्यांच्यात निर्माण झाली असावी. आपलं घोडं तिथेच पेंड खातंय बहुतेक.
आपल्याकडे निसर्गाने, इतिहासाने, भुगोलाने इतकं काही अमाप दिलंय की आपण स्वस्थ बसलो आणि सुस्त झालो. हिरा पैलू पाडल्यावर आणि आकर्षक कोंदणात बसल्यावरंच त्याची किंमत वाढते तसं आपलं प्रत्येक पर्यटन आकर्षण आहे. निसर्गाने बहाल केलेल्या ह्या हिर्यांमध्ये भारताच्या माथ्यावर-मुकूटात विराजमान झालेल्या हिमालयाने काश्मिरपासून अरूणाचलपर्यंत त्याच्या पायाशी वसलेल्या प्रत्येक राज्याला बर्फाच्छादित पर्वतांनी, नद्या नाल्यांनी, हिरव्यागार वृक्षराजीने असं काही देखणं बनवलंय की जगाला हेवा वाटावा, गरज आहे ती मुलभूत-पायाभूत सोयी-सुविधांची. आज इथे कुठेही जाणार्या पर्यटकाला थोड्याफार प्रमाणात असुविधांचा सामना करावा लागतोच. त्याखाली दिल्ली आग्रा राजस्थान मध्यप्रदेशाचा विचार केला तर इथे इतिहासाने इतकी अमाप गौरवशाली परंपरा अगदी आयती आपल्या पदरात टाकलीय की जगातला पर्यटक त्याचा माग काढत आपल्या स्वदेशी पर्यटकांपेक्षा मोठ्या प्रमाणावर भारतात पर्यटन करतोय. कोलकाताही थोडाफार त्यांच्यासारखाच. गुजरातने मात्र गेल्या दहा- पंधरा वर्षात अनेक पर्यटनसदृश गोष्टी निर्माण करून आपल्या देशातल्या तसेच विदेशी पर्यटकांना आपल्याकडे वळवलं. आमच्याकडे मोठ्या प्रमाणावर गुजरातच्या सहली आहेत हे त्याचच प्रतिक. महाराष्ट्राला मुंबई ही आर्थिक राजधानी श्रीमंत करून गेली खरी पण त्यामुळे पर्यटनाकडे दुर्लक्ष झालं. कर्नाटकनेही टूरिझम चांगल्या तर्हेने विकसीत केला म्हणायला हरकत नाही. बंगलोर आयटी कॅपिटल झाली, पैशाचा ओघ सुरू झाला पण त्यांनी टूरिझमवर दुर्लक्ष केलं नाही ही जमेची बाजू. त्यामानाने दक्षिणेकडच्या केरळने पर्यटनाचं महत्त्व ओळखलं आणि गॉड्स ओन कंट्री म्हणत स्वत:ला जगाच्या पर्यटन नकाशावर अव्वल नंबरवर आणून ठेवलं. बाहेरच्या देशांचं कशाला आपण प्रत्येक राज्याने केरळच्या पावलावर पाऊल ठेवलं तरी पुरेसं आहे.
आधीच खूप उशीर झालेला आहे. इट्स रीअली हाय टाईम नाऊ! कुणाला दोष देत बसण्यापेक्षा येेत्या दहा वर्षात आपण काही करू शकलो तर येणार्या अनेक पिढ्या भारताच्या पर्यटन समृद्धीचा अभिमान बाळगतील. ब्रिटिशांनी बांधलेली गेटवे ऑफ इंडियाची आणि इंडिया गेटची कमान, मोगलांनी बांधलेले गार्डन्स, ताजमहाल, कुतुबमिनार, रेड फोर्ट, ब्रिटीशांनी वसवलेली हिलस्टेशन्स ह्या गोष्टी पर्यटकांना दाखवून आम्हाला खरंतर कंटाळा आलाय. सरदार वल्लभभाई पटेलांचा स्टॅच्यू ऑफ युनिटी, कोइम्बतोरचा आदियोगी शिवा स्टॅच्यू, केरळचा जटायू ह्यांनी बर्यापैकी आशा पल्लवित केल्या आहेत. आता आम्ही वाट बघतोय ती अरबी समुद्रात उभ्या राहणार्या आपल्या शिवाजी महाराजांच्या भव्य स्मारकाची. एक गोष्ट नेहमी खात राहते ती म्हणजे महाराष्ट्रातल्या पर्यटकांना भारतातल्या जवळ-जवळ प्रत्येक राज्याची आणि भारताबाहेरच्या प्रत्येक देशाची अगदी सप्तखंडांची सैर आम्ही घडवतो, पण ह्या राज्या-राज्यातल्या पर्यटकाला महाराष्ट्रात खेचायला पर्यटनातली बलस्थानं अपूरी पडतात. आता ह्या शीवस्मारकाचा आधार होईल, आणि अशी अजून दोन किंवा तीन मानवनिर्मित आश्चर्य पूर्व, दक्षिण वा उत्तर महाराष्ट्रात निर्माण करू शकलो तर महाराष्ट्र पर्यटनात पूढे येऊ शकेल. आम्हीही अभिमानाने इतर राज्यांतून मोठ्या संख्येने महाराष्ट्रात पर्यटक आणू शकू. आग्य्राचा ताजमहाल, दिल्लीचा कुतुबमिनार, राजस्थानचा हवामहल, कोलकाताचं व्हिक्टोरिया मेमोरियल, केरळचं बॅकवॉटर्स... अशी ओळख निर्माण करण्यात प्रत्येक राज्य किंवा शहर पुढे आलं पाहिजे म्हणजे आपल्या भारतीयांना आपल्याच देशातल्या ह्या अगणित पर्यटनस्थळांची आसक्ती वाटेल आणि पर्यायाने ओढही लागेल.
आजची वस्तुस्थिती अशी आहे, की आपले भारतीय भारतात पर्यटन करण्यापेक्षा परदेश पर्यटनाला प्रथम पसंती देतात. आमच्यासारख्या एका मध्यम आकाराच्या पर्यटनसंस्थेचा विचार केला तर आमच्याकडे वर्षाला पर्यटन करणार्या एक लाख पर्यटकांपैकी पन्नास हजार पर्यटक भारतात पर्यटन करतात तर पन्नास हजार विदेशात. फिफ्टी-फिफ्टी विभागणी. विदेशांमधली पर्यटनस्थळं, त्याभोवतीचं इन्फ्रास्ट्रक्चर, त्यासंबंधी वर्ड ऑफ माऊथद्वारे आपोआप होणारी पब्लिसिटी ह्याचा पगडा निश्चितपणे पर्यटकांवर आहे. अर्थात सर्वच बहुतेक देशांमध्ये टूरिझम वाढविण्यावर प्रचंड मेहनत घेतली जातेय. देशादेशांमध्ये त्यात स्पर्धा सुरू आहे. दुबईने शून्यातून पर्यटन विश्व निर्माण केलं आणि तेही फक्त गेल्या पंचवीस वर्षांत. सिंगापूर, त्यांनी निर्माण केलेल्या पूर्वीच्या आकर्षणांची जादू संपल्यावर युनिव्हर्सल स्टुडिओज्, मरीना बे सॅन्ड्ससारखी आकर्षणं नव्याने आणून पर्यटकांसाठी सिंगापूर हा दुसर्यांदा भेट द्यायला लावणारा देश बनविला. आता सिंगापूर दुबईमध्ये कोणाकडे जास्त विदेशी पर्यटक येतात ह्यात अहमहमिका सुरू आहे. निसर्ग सौंदर्याचा वरदहस्त मिळालेल्या युरोपने त्यांना मिळालेल्या ऐतिहासिक वारशाची-स्मारकांची- इमारतींची अशी काही दखल घेतली आणि त्यांना होत्या त्याहून इतकं सुंदर बनवलं की जगाची पावलं युरोपकडे वळली. आपल्या भारतीयांचं उदाहरण घ्यायचं म्हटलं तर पूर्वी आयुष्यात एकदाच युरोपला जायचं स्वप्न उराशी बाळगणारा पर्यटक आता युरोपला आठ ते दहा वेळा जातोय. आपल्या भारतीयांप्रमाणे चायनीज लोकही युरोपच्या प्रेमात. चायना आणि इंडियाच्या लोकसंख्येच्या एक टक्का पर्यटक जरी आले तरी युरोप पर्यटनानंदात न्हाऊन निघेल, आणि त्यांचं लक्ष्य आहे ह्या दोन्ही देशांच्या लोकसंख्येच्या तीन ते पाच टक्के लोकं युरोपात येत राहीलेे तर त्या देशांना टूरिझम इंडस्ट्री एकटी तारून नेऊ शकेल. एखाद्या गोष्टीवर लक्ष केंद्रित केलं, त्यावर विश्वास ठेवला तरच असे चमत्कार घडू शकतात.
आपल्या भारताने अमेरिकेचा (युएसए) किस्सा गिरवायला हरकत नाही. युएसए सर्वधर्म समभावाचा सर्वांना सामावून घेणारा खंडप्राय देश, जेमतेम अडीचशे वर्ष वय असलेला तसा तरूण देश, त्यामुळे ऐतिहासिक वारसा जवळ-जवळ नाहीच. सगळं काही स्वत: निर्माण करायचं. अन्न वस्त्र निवारा तांत्रिकीकरण आधुनिकीकरण ह्या सोबतच त्यांनी प्रत्येक राज्यात काही ना काही मानवनिर्मित आश्चर्यांची उभारणी केली आणि ईस्टकडून वेस्टकडे, नॉर्थकडून साऊथकडे माणसं फिरायला लागली. संलग्न उद्योगधंद्याना चालना मिळाली. युएसएने सर्वच बाबतीत स्वत:ला स्वयंपूर्ण बनवलं. पर्यटनाच्या बाबतीत ह्या लोकांना स्वत:च्याच देशात सर्व काही मिळाल्यामुळे अनेक वर्ष त्यांना अमेरिकेच्या बाहेर जग अस्तित्वात आहे. हे सुद्धा माहीत नव्हतं. मजेने म्हटलंही जायचं, अमेरिकन्स डू नॉट नो देअर इज वर्ल्ड आऊटसाईड युएसए जोक अपार्ट पण राज्या-राज्यात त्यांनी पर्यटनाची आकर्षणं निर्माण केली आणि स्वत:च्याच देशातल्या लोकांना ग्राहक बनवलं. आपल्या खंडप्राय, सुजलाम-सुफलाम, विविधतेने नटलेल्या, जगातलं प्रत्येक आकर्षण आपल्या एकाच देशात एकवटलेल्या आणि निसर्गाचा-इतिहासाचा- परंपरांचा वारसा लाभलेल्या देशाला गरज आहे ती आयत्या मिळालेल्या ह्या अनंत गोष्टींना कोंदणात बसविण्याची, त्याला पैलू पाडण्याची आणि आणखी सुंदर नीटनेटकं करण्याची. आपला भारत टूरिझममध्ये जगात नंबर वन येऊ शकतो एवढं पोटेंशियल त्यात आहे. आपल्या इच्छाशक्तीची आणि कतृत्वाची जोड हवीय बस! मेरा भारत महान!
Post your Comment
Please let us know your thoughts on this story by leaving a comment.