जनरली ‘चाललंय ते चांगलं आहे नं. आपण हे केलं म्हणून तर आजचा रीझल्ट दिसतोय मग उगाचच बदल कशाला?’ ही सर्वसाधारण धारणा असते. ‘काहीही सेट झालं की ह्यांना अनसेट करायची सवय किंवा त्यात बदल करायचा आजार आहे ह्यांना’ अशीही कुजबूज मला ऐकून घ्यावी लागते.
ववर्ष कसं पटकन संपून जातं ते कळतंच नाही. हा हा म्हणता वीणा वर्ल्ड पुढच्या वर्षी पाच वर्षाची होईल. पूर्वी शाळेत प्रवेश घ्यायचं वय पाच वर्ष होतं, आता पाच काय तीन वर्षांची आपली भारतीय मुलं गुगल बॉय आणि गुगल गर्ल बनून जगाला आश्चर्यात टाकतायत. जगाच्या वेगाशी आपल्या जहाजाची शीडं अॅडजस्ट करणं हीच मोठी जबाबदारी आहे, त्यासाठी आपण आणि आपल्यासोबतची सर्वजणं तनाने-मनाने-विचाराने सशक्त बनणं गरजेचं आहे. गेल्या चार वर्षात काय केलं त्यापेक्षा आता येणार्या काळात आपल्याला काय करायचं आहे हे महत्वाचं आहे. ‘मी काय करतेय?’ आणि ‘मला काय करायला पाहिजे’ हे सतत तपासून आपल्यात अपेक्षित बदल करीत राहणं ही काळाची गरज आहे, आणि आम्हाला ती जरा जास्तच आहे कारण आमच्या अंगावर मुठभर मांस सतत चढत राहणारी परिस्थिती आहे. चार वर्षात एक दमदार कंपनी उभी राहू शकते, हे नो डाऊट वीणा वर्ल्डच्या सर्व टीमने दाखवून दिलं. त्याचं कौतुक आणि सार्थ अभिमान जरुर आहे पण जे काही यश मिळालंय ते डोक्यात हवा जाऊ देऊ शकतं, ही धोक्याची घंटा सतत आपल्या कानात वाजत राहिली पाहिजे आणि मुख्य म्हणजे ती आपल्याला ऐकू आली पाहिजे. ह्या वर्षी उन्हाळ्याच्या सुट्टीत भारतात आणि परदेशात अनेक ठिकाणी वीणा वर्ल्डचे पर्यटक खूप मोठ्या संख्येने दिसणार ह्याची कल्पना आली आणि आम्ही सर्व टूर मॅनेजर्सची मीटिंग घेतली. मीटिंगचा अजेंडा एकच, ‘पाय सतत जमिनीवर राहू दे आणि डोकं धडावर’. ‘यावर्षी आपले पर्यटक सर्व ठिकाणी मोठ्या संख्येने दिसतील. त्याचा अभिमान जरुर बाळगूया कारण आपण सर्वांनी एकत्रितपणे केलेल्या चांगल्या कामाची पावती आपल्याला पर्यटकांनी दिलीय. पण ज्यावेळी हा अभिमान लिमिटच्या बाहेर जातो तेव्हा आपल्या बोलण्यात, वागण्यात, चालण्यात आणि विचारात नकळत नको तो बदल घडायला लागेल, आणि तोच धोका आहे. तिथे आपण प्रत्येकाने स्वत:ला सावरलं पाहिजे. आपल्यात घडणारे, आपल्या भविष्याला मारक ठरणारे हे अभिमानी बदल जाणवण्याची आपली विवेकबुद्धी जागृत राहिली पाहिजेे. आपण भारताच्या किंवा जगाच्या तुलनेत अतिसुक्ष्म तर आहोतच पण पर्यटनाच्या कक्षेचा विचार केला तरीही खूप खूप छोटे आहोत हे लक्षात घेऊया. थोड्याशा यशाने हुरळून जाऊया नको. अल्पावधित मिळालेलं यश जर आपल्याला पचवता आलं नाही तर ते डोक्यात जाईल आणि तेच आत्मघातकी ठरेल. ह्याबाबतीत आपण सतत जागरूक राहूया. डोळ्यात तेल घालून आपण पहारा देत बसलं पाहिजे की यशाच्या नशेचा हा राक्षस आपल्या मनात अजिबात शिरकाव करू शकणार नाही. आपल्याला कष्ट आणि मेहनतीच्या जोरावर एक एक पायरी ओलांडत लक्ष्य गाठायचंच आहे आणि आपल्या इच्छित लक्ष्याचं क्षितीज सतत पुढे सरकत राहणार आहे. ‘देअर इज नो फिनिशिंग लाइन अॅज सच. लेट्स कीप मुव्हिंग!’ आणि मला त्याचाही सार्थ अभिमान आहे की आमच्या टूर मॅनेजर्सनी डोक्यात हवा जाऊ न देता अफलातून कामगिरी बजावली आणि बजावताहेत. एकच बंधन आम्ही पाळतो ते म्हणजे दर सहा महिन्यांनी एकत्र भेटतो, आपल्या कामगिरीचा आलेख बघतो. ‘काय चांगलं केलं? कुठे कमी पडलो? अजून काय करायला पाहिजे ह्यावर विचारविमर्श करतो’. पाय पूर्णपणे जमिनीला टेकवून, डोकं धडावर ठेवून ‘आपलं लक्ष्य’ काय आहे ते स्वत:ला बजावतो आणि खुल्या दिलाने कामाला लागतो.
आता पाच वर्ष होतील. ‘नवीन कंपनी आहे, समजून घेऊया’ हे दिवस संपले. आता आपण इतर अनेक संस्थांसारखीच एक संस्था आहोत आणि दरदिवशी दरक्षणी आपल्याला सेंट पर्सेंट परफॉर्म करायचं आहे. प्रत्येकाकडून तसे मनापासूनचे प्रयत्न झाले पाहिजेत. डिसेंबरमध्ये म्हणूनच आम्ही सर्व मॅनेजर्स आणि इनचार्जची एक मीटिंग बोलावली. ‘नो अजेंडा’ मीटिंग. सर्वांकडून एक विचारणा होत होती, ‘‘काय घेऊन यायचं, वर्षभराचा परफॉर्मन्स? प्लस मायनस?’’. मागच्याच आठवड्यात एक फॉरवर्ड वाचला, ‘जनवरी सपने दिखाता है और दिसंबर आईना’ एकदम परफेक्ट. त्यामुळे सर्वांनी परफॉर्मन्स रीलेटेड मीटिंग असणार हे गृहीत धरलं होतं. ठरल्याप्रमाणे आम्ही भेटलो. वर्ष तसं बघायला गेलं तर चांगलं गेल्यामुळे प्रत्येकाच्या चेहर्यावर खुशी दिसत होती. पण परफॉर्मन्स, टार्गेट हा मुद्दाच नव्हता. कारण, ‘माझ्यापासून सर्वांना परफॉर्मन्स इज अ मस्ट’, त्यातून कुणाचीच सुटका नाही, तो दैनंदिनीचा भाग झाला, इट्स टेक्निकल’. दे दणादण परफॉर्मन्स देत असताना स्वत: आणि स्वत:भोवती डायरेक्टली इनडायरेक्टली वावरणारी टीम ही आनंदी असली पाहिजे. परफॉर्मन्स देत असताना त्याचं कोणतंही प्रेशर मनावर आणि शरीरावर आलं नाही पाहिजेे. स्वत:चं आयुष्य चांगल्या तर्हेने जगता आलं पाहिजेे, हल्लीच्या भाषेत ‘सॉर्टेड’ हा मीटिंगचा महत्वाचा मुद्दा होता आणि अर्थातच आम्ही काय करतोय आणि आम्हाला काय करायला पाहिजे हा सुद्धा. आता चार वर्ष झाल्यानंतर येणार्या भविष्याला सामोरं जाण्यासाठी वीणा वर्ल्डमध्ये रीस्पॉन्सिबिलिटीज्, प्रोफाइल्स, जॉब डिस्क्रिप्शन्स ह्यामध्ये बदल करावे लागणार होते. आम्हाला ते दिसत होते. जनरली ‘चाललंय ते चांगलं आहे नं. आपण हे केलं म्हणून तर आजचा रीझल्ट दिसतोय मग उगाचच बदल कशाला?’ ही सर्वसाधारण धारणा असते. ‘काहीही सेट झालं की ह्यांना अनसेट करायची सवय किंवा त्यात बदल करायचा आजार आहे ह्यांना’ अशीही कुजबूज मला ऐकून घ्यावी लागते. पण पहिल्या वर्षी आपण वीस हजार प्रवासी केले. आज आपण एक लाख करतोय. पुढच्या दोन वर्षात ते दोन लाख होतील आणि तेव्हाही तीच पर्सनलाइज्ड सर्व्हिस आपल्याला द्यायची असेल तर आपल्याला काही बदल करणं अपरिहार्य आहे. आणि असे बदल जेव्हा जेव्हा केले तेव्हा कुजबूज वजा विरोध किंवा नाराजी मी झेललीय पण काही कालावधीनंतर जे केलं ते रीझल्ट द्यायला लागतं तेव्हा सर्वांचा विश्वास बसायला लागतो. त्यामुळे आपल्याला पेशन्स ठेवावा लागतो. डेफिनेटली, कोणत्याही बदलाला विरोध ठरलेला असतो तेव्हा लीडरला सबुरीनेच घ्यावं लागतं. आज वीणा वर्ल्ड पर्यटकांच्या सेवेशी तैनात असताना ऑफिस टीम, टूर मॅनेजर्स आणि प्रीफर्ड सेल्स पार्टनर्स मिळून पंधराशे जणांचं कुटूंब झालंय. त्यातील छोट्या छोट्या गटांचं प्रतिनिधित्व करणारे जे सगळे इनचार्ज आणिं मॅनेजर्स आहेत त्यांची संख्या पासष्ट ते सत्तर आहे. त्यातील
काही अनुभवी तर काही त्या रीस्पॉन्सिबिलिटीला पेलायला नवखे त्यामुळे त्यांना मानसिकदृष्ठ्या सुदृढ करणं आणि त्यांच्यासोबत आपणही तेवढंच बलवान होणं खूप महत्वाचं. मागे संदीप वासलेवरांच्या एका लेखात वाचलं होतं, ‘मी काय करतो हे प्रत्येकाला माहीत असतं पण मी ते का करतो हे जर प्रत्येकाला कळलं तर बहार येईल’. हेही सुत्र होतं मीटिंगचं. ‘‘आपण हे का करतो. ऑर्गनायझेशनमध्ये होणारे बदल का होताहेत हेच तर समजावून सांगायचं होतं’’. एकमेकात अडकवलेले प्रोफाईल्स होते. कुठे एक माणूस दोघांना रीपोर्टिंग करीत होता तर कुठे दोन वेगवेगळी डिपार्टमेंट्स एकाच्याच हाताखाली होती. कुठे प्रोफाईलला क्लॅरिटी नव्हती तर कुठे एकमेकांवरची डीपेंडन्सी ब्युरॉक्रसीमध्ये परावर्तीत झाली होती. संस्था उभी करताना, त्या वेगात प्रत्येक गोष्टीत सर्वांचा हातभार लागला होता, आता मला सांगायचं होतं की,‘तू आता हे बघू नकोस आणि फक्त ह्याच्यावर लक्ष केंद्रित कर’. तसं कठीण असतं हे काम पण आमची टीम त्याचे भविष्यातले फायदे लक्षात घेणारी असल्याने ती मीटिंग बर्यापैकी यशस्वी झाली असं म्हणायला हरकत नाही. कोणताही टेक्निकल अजेंडा नसलेली ही मीटिंग भविष्यातल्या आव्हानांना सामोरं जाताना ज्या खंबीर मनांची आवश्यकता लागणार आहे त्याची सुरुवातकर्ती झाली हे महत्वाचं. वीणा वर्ल्ड शेवटी ह्या प्रत्येक टीमला एकात एक अडकवत बनलेल्या छानशा साखळीने पुढे जाणार आहे त्यात प्रत्येक टीमने सशक्तपणे इंडिपेंडन्टली डीपेन्डंट होणं गरजेचं आहे. घडणं आणि घडत राहाणं, घडवणं आणि घडवत राहाणं हा उपक्रम चालू राहिला पाहिजेे. लिहिताना आठवलं, ‘इफ यू वाँट टू बी अ लीडर, फर्स्ट बीकम अ ह्यूमन बिइंग’.
उद्या सोमवार, एक जानेवारी, चांगल्या गोष्टी सुरु करण्यासाठी एक सुवर्णयोग. ‘लेट्स विश इच अदर, ऑल द व्हेरी बेस्ट! हॅप्पी न्यू इयर!’
Post your Comment
Please let us know your thoughts on this story by leaving a comment.