घर टापटीप ठेवणे, सर्व गोष्टी जागच्या जागी ठेवणे, बंद दाराआड जरी काही दिसत नसलं तरी कपाटं आतून नीटनेटकी लावलेली असणे, फक्त पाहुणे आल्यावरच नाही तर आपल्यासाठीही घर छान छान ठेवणे ही झाली आपली भारतीय संस्कृती किंवा मानवजातीची संस्कृती असं म्हणायला हरकत नाही. प्रत्येक आई-वडील आपल्या मुलाबाळांवर ते संस्कार घडवीतच असतात. आम्ही लहान असताना मुंबई जवळच पालघर तालुक्यातील मथाणे ह्या गावी रहायचो. सातवीपर्यंतचं शिक्षण तिथेच झालं, पण गावी असलो तरी शुद्ध मराठी बोलणं, स्पष्ट बोलणं, घर टापटीप असणं, शिस्त पाळणं इत्यादी सर्व गोष्टी आई-वडिलांनी साम-दाम-दंड-भेद असे सर्व प्रकार वापरून आमच्या मनावर बिंबवल्या. दर आठवड्याला रविवारी गावच्या त्या घरी साफसफाईचा कार्यक्रम असायचा, ज्यात बाबांची मर्सिडिज म्हणजे दुचाकी- सायकलच्या मेंटेनन्सचा, टॉयलेट लखलखीतपणे स्वत: साफ करण्याचा, कपाटं नीट लावण्याचा आणि कुठे काय बंद पडलं असेल, खराब झालं असेल ते चालू करायचा कार्यक्रम ठरलेला असायचा. वा! हे लिहितानाही बालपणीची ती दृश्य जणू काही आत्ता आत्ताचीच आहेत अशातर्हेने डोळ्यासमोर रुंजी घालताहेत. आठवून तर बघा. खूप बरं वाटतं एखाद्या मेडिटेशनला बसल्यासारखं, ताजतवानं व्हायला होतं. त्यातलीच एक आठवण म्हणजे घरी जर कुणी पाहुणे यायचे असतील तर आईबाबा आम्हाला पूर्ण घर साफ करायला लावायचे. तसं ते अगदीच साधं घर होतं, आमच्या आजीची एक भलीमोठी पेशवेकालीन पेटी किंवा पेटारा, एक लाकडी आरसा असलेलं कपाट, एक खाट, एक पंखा आणि एक खूर्ची एवढ्याच गोष्टी त्या मुख्य खोलीत. आता त्याच्यात साफ काय करायचं, पण हे दोघं स्वत:पण साफसफाईला लागायचे आणि आम्हाला पर्याय नसायचा. पाहुणे यायच्या आधी घर लख्ख साफ असायचं आतून बाहेरून, कुठे जळमटं नाहीत की कुठे धूळ नाही. त्यातल्या त्यात नवीन चादरी, उशांची कव्हरं घातली जायची आणि आम्ही सगळे आंघोळ करून चांगले कपडे घालून पाहुण्यांच्या स्वागताला हजर असायचो. कसं बोलायचं पाहुण्यांशी, थँक्यू-सॉरी-एक्सक्यूज मी कधी म्हणायचं ह्याचीही प्रॅक्टीस चालायची पाहुणे यायच्या आधी. एकंदरीतच रविवारऐवजी कधी जर घरात साफसफाईचा बडगा उभारलेला दिसला की समजायचं आज उद्या कुणीतरी पाहुणे येणार आहेत. साफसफाई, नीटनेटकेपणा, पाहुणे, त्यांचं मन:पूर्वक स्वागत ह्या सगळ्या गोष्टींचं बाळकडूच जणू मिळालं. त्यातली साफसफाई- नीटनेटकेपणाची आवड मला जरा जास्तच लागली. आमचा धाकटा मुलगा राज म्हणत असतो मम, तुला ओसीडी आहे, कंट्रोल युवरसेल्फ. ओसीडी म्हणजे ऑब्सेसिव्ह कम्पलसिव्ह डीसॉर्डर. पूर्वी वडील ओरडायचे साफसफाई करा, म्हणून आता मुलं म्हणताहेत बस झाली तुझी साफसफाई. एकूण आपली ऐकण्याची भूमिका पुढे सुरू ठेवायची.
असो, पण पाहुणे येणार त्यासाठीची जय्यत तयारी करणे ही गोष्ट एवढी लहानपणापासून अंगात भिनण्याचं कारण कदाचित दैवी संचित असावं असं आता वाटतंय, कारण नशिबाने अशा व्यवसायात आले की जिथे दररोज किमान पाचशे आणि कमाल आठ हजार पर्यटकांना ज्यांना आम्ही गेस्ट म्हणतो त्यांना सर्व्हिस देण्याचं कामं आम्ही देशविदेशात करीत असतो. अर्थात इथे पर्यटक आमचे पाहुणे असले तरी ते त्यासाठी पैसे भरून आलेले असतात त्यांना उत्तम सर्व्हिस मिळणे हा त्यांचा हक्क असतो आणि आम्ही ती देणं हे आमचं कर्तव्य. पण हा फक्त लेनदेनचा मामला नाहीये. लेन देन झालीच पाहिजे ठरल्याप्रमाणे, पण हा कर्तव्याचा भाग आम्ही मनापासून, आवडीने आणि कळकळीने केला तर पर्यटकांना ठरल्यापेक्षा आणि अपेक्षेपेक्षा जास्त आनंद आपण देऊ शकतो. पर्यटकांना देशविदेशात सहलीचा आनंद मिळवून देणार्या आमच्या साडे चारशे टूर मॅनेजर्स टीमला त्यामुळेच आम्ही वरचेवर भेटत असतो. चांगल्या गोष्टी सर्व मिळून पुढे घेऊन जातो. कुठे कुणाकडून काहीही चूक झाली असेल तर त्याची शहानिशा केली जाते. चूक सुधारण्यासारखी असेल तर तसा मौकाही दिला जातो अदरवाईज मार्गच वेगळे करतो. कारण ज्या पर्यटकांनी विश्वासाने त्यांचा आनंद आपल्यावर सोपवलाय त्या डिलिव्हरीमध्ये आपल्याकडून चूक होऊ द्यायची नाही. बाकी निसर्गाने, राजकारणाने, परिस्थितीने ओढवलेल्या आव्हानांचा आपण सर्व मिळून मुकाबला करू पण एकदा पाहुणे म्हणजे गेस्ट म्हटलंय नं आपल्या पर्यटकांना मग त्यासोबत येणार्या आदर, सेवा, नम्रपणा, सचोटी इत्यादी सगळ्या गोष्टींचं बंधन आलंय आणि ते मनापासून केलं तर बंधन न वाटता त्याचं परीवर्तन आपल्या स्वत:च्या समाधानात आणि यशात होऊन जातं.
वीणा वर्ल्डच्या मॅनेजमेंटमध्ये दोन जणं अशी आहेत की ज्यांना आम्ही जगमित्र म्हणतो, ते आहेत सुनिला आणि सुधीर. जगात सर्व ठिकाणी ह्यांचा मित्रपरिवार. भारताच्या आणि वेगवेगळ्या अनेक देशांच्या टूरिझममध्ये ह्यांच्या मैत्रीपूर्ण ओळखी. बरं कोणताही वेस्टेड इंटरेस्ट कुठेही नसल्याने ह्यांच्या निखळ मैत्रीचा आनंद आम्हीही दुरून घेत असतो. नॅचरली आमच्याकडे सतत देशविदेशातल्या पाहुण्यांचं येणं-जाणं असतं. रोज ऑफिसमध्ये दुपारच्या जेवणाच्यावेळी पंगतीला कुणी ना कुणी असतंच. ह्या दोघांच्या वेगवेगळ्या मित्रपरिवारामुळेे आमचा फायदा असा होतो की बसल्या जागी आम्हालाही त्यांच्या देशात काय चाललंय? टूरिझम च्या जगात काय चाललंय? कुठे काय नवीन आलं? कुठे काय फेल गेलं ह्या सगळ्याची माहिती मिळते. रोज वेगवेगळ्या राज्यातल्या, देशातल्या पाहुण्यांना भेटायचं सद्भाग्य ह्या दोघांमुळे जास्त लाभलंय. मागच्या आठवड्यात तर युकेहून म्हणजे इंग्लंडहून पंच्चावन्न जणांचं डेलीगेशन वीणा वर्ल्ड विद्याविहार ऑफिसला आलंं होतं. त्यांच असं झालं, व्हिजिट ब्रिटन या ब्रिटन टूरिझम ऑर्गनायझेशनच्या काही मंडळींची मुंबईला एकूणच मार्केट अवेअरनेससाठीची भेट होती आणि त्याचं आमंत्रण सुनिलाला होतं. त्यांच्याशी बोलण्यात सुनिलाने त्यांना वीणा वर्ल्डमध्ये यायचं आमंत्रण दिलं आणि त्यांनीही ते आनंदाने स्विकारलं. ते येण्याचा दिवस होता संक्रांतीचा. ब्रिटिश असोसिएट्सचं वीणा वर्ल्डकडे होणारं संक्रमण आम्हा सर्वांसाठी एक प्रोजेक्ट होता. पंचावन्न विदेशी पाहुणे आपल्या सणाच्या दिवशी येणार म्हटल्यावर एनआरआय व फॉरिनर्सना उत्कृष्ट पद्धतीने भारत दाखविणारी आमची इनबाऊंड टीम आणि मार्केटिंग टीम एकदम चार्ज झाली. सुनिलाच्या मार्गदर्शनाखाली सगळ्याच डीपार्टमेंट्समधली हौशी मंडळी एकत्र आली आणि तीन तासांचा एक चालता-बोलता इव्हेंटच झाला तो. ज्यामध्ये तीळगूळ, चाफ्याची फुलं, रांगोळी आणि आरतीने भारतीय पारंपरिक पोशाख परिधान करून त्यांचं स्वागत केलं गेलं. भारतामध्ये आणि त्यात वीणा वर्ल्डकडे युकेचं पर्यटन कसं चालतं तसंच भारतीय ट्रॅव्हल कंपन्या कसं काम करतात ह्याचं एक मस्त पे्रझेंटेशन झालं आणि अॅक्चुअल वीणा वर्ल्ड कॉर्पोरेट ऑफिसची टूर त्यांना घडवली. नंतर भारतीय पक्वानांचं मस्त व्हेजिटेरियन भोजन. आणि हो संक्रांतीचा दिवस असल्याने पतंग उडविणं कसं विसरणार? आमच्या टूर मॅनेजर्स मंडळीनी तोही तडका ह्या ब्रिटीश पाहुण्यांना दिला आणि एकंदरीतच भारतीय पाहुणचाराने त्यांना भारावून टाकलं. आपल्या भारताची, भारतीय ट्रॅव्हल कंपन्यांची आणि आपल्या पाहुणचाराची एक चांगली इमेज त्यांनी आपल्यासोबत नेण्यात आमच्या टीमने कुठेही काही कमी पडू दिलं नाही. इव्हेंट मॅनेजमेंट उत्कृष्ट तर्हेने झालं आणि खर्या अर्थाने आम्ही म्हणू शकलो अतिथी देवो भव:
खरंतर एवढं सगळंकाही न करताही नेहमीच्या पाहुणचाराने ती मंडळी खूश होऊन गेलीच असती पण मग पर्यटनात असताना, अतिथी देवो भव: चा उद्घोष करताना आलेल्या पाहुण्यांचं आपल्याला जर काही अप्रुप नसेल, सोयरंसुतक नसेल तर मग आपण पर्यटनात असावं का? हा प्रश्न स्वत:लाच विचारायला हवा नाही का. छोट्या-छोट्या गोष्टींची काळजी घेत आलेल्या पाहुण्यांचा मन:पूर्वक आदर करीत त्यांचा सन्मान करणं ही मानसिकता आहे आणि ती वीणा वर्ल्डमधल्या आम्हा सर्वांमध्ये रुजली पाहिजे हा अशा कार्यक्रमांनी मिळालेल्या संधीचा फायदा, आम्हा स्वत:साठीही आणि आपल्या टीमसाठीही. आज सोशल मीडियाच्या युगात वाईट बातम्या जास्त वेगाने पसरतात. भारताची प्रतिमा काही प्रमाणात मलीन होण्यात ह्या तंत्रज्ञानाने भरच टाकलीय म्हणता येईल. अशावेळी येणार्या विदेशी पर्यटकाला मग तो कोणत्याही देशाचा असो, त्याला आपल्याकडून जे जे काही सुंदर संपन्न आहे ते दाखवण्यात-भारताची इमेज मजबूत करण्यात आपण आपला खारीचा वाटा उचललापाहिजे, फुल ना फुलाची पाकळी... कितीही छोटं का असेना योगदान दिलं पाहिजे. अतिथी देवो भव:
Post your Comment
Please let us know your thoughts on this story by leaving a comment.