अत्याधुनिकतेने आपलं चालणं कमी झालं, खर्या सौंदर्याचा आस्वाद घेणं विसरून आपण हातातल्या व्हर्च्युअल जगात रममाण व्हायला लागलो आणि आपल्या विचारांवर, आचारांवर पर्यायाने शरीरावर त्याचे परिणाम दिसू लागले. पर्यटनाला गेल्यावर तरी आपण तीन साध्या गोष्टी अमलात आणूया का? ‘पायाने चालूया, डोळ्याने पाहूया, कानाने ऐकूया!’
गेली तीस पस्तीस वर्ष देशविदेशात पर्यटन करायला मिळालं हे माझं भाग्य. पर्यटनाचा आणि पर्यटकांचा अभ्यास करणं हे आयुष्य बनलं. जेव्हा व्हिडीओ कॅमेरा सहजगत्या वापरता येऊ लागला तेव्हा ज्या काही उण्यापुर्या पर्यटकांकडे तो असायचा त्यांची कॉलर टाईट असायची. सहलभर संपूर्णवेळ ही हौशी पर्यटकमंडळी त्या बर्यापैकी जड असलेल्या कॅमेर्याचं ओझं आपल्या खांद्यावर बाळगायची. कॅमेरा खांद्यावर आणि डोळा त्या लेन्सला चिकटलेला अशा अवस्थेतच संपूर्ण सहल पार पडायची. आज व्हिडीओ कॅमेर्याची जागा मोबाईल फोनने घेतलीय आणि ज्याच्याकडे उत्तमोत्तम फोन नव्हे कॅमेरा फोन आहे त्याची सरशी, या अल्ट्रामॉडर्न युगात फोटोज घेणं आणि फोटोग्राफी करणं खूपच सोप्पं झालंय. फोटो काढण्यापेक्षा तो किती फास्ट सोशल मिडीयावर जातो ह्याकडे प्रत्येकाचं संपूर्ण लक्ष केंद्रित असतं. त्यात काही पर्यटक खूपच छान फोटोज काढतात जे सोशल मिडियावर बघायलाही खूप छान वाटतं. पण तरीही निरीक्षणातून सांगावसं वाटतं, म्हणजे मी काही हाडाची फोटोग्राफर आहे किंवा मला छान फोटो काढता येतात असं जराही नाही. उलट फोटोग्राफीमध्ये मी संपूर्णपणे ‘ढ’असं म्हटलं तरी चालेल, पण मी ऑब्झर्व्हर नक्की आहे. साध्या साध्या गोष्टी असतात, फोटो काढताना चेहरा हसरा, कपडे व्यवस्थित करूनच पोज द्यावी. ‘पासपोर्ट किंवा पैसे असलेली बॅग आपल्या खांद्यावर क्रॉस लटकवलेलीच कायम असली पाहिजे ती जराही कुठे इथे तिथे ठेवायची नाही’ हा आमच्या टूर मॅनेजरचा सततचा घोषा पर्यटकांप्रती सुरू असतोच. पण तरीही फोटो काढताना ती बॅग आपल्या सहप्रवाशाकडे द्यावी, त्यांनाही फोटो काढताना तुमची गरज लागणारच आहे. त्यामुळे ‘एकमेका साह्य करू’... ह्या न्यायाने फोटोसाठी संपूर्ण सहलभर गळ्यात लटकलेल्या बॅगेपासून आपली सुटका करून घ्यायची. मात्र बॅग कधीही आजूबाजूला ठेवायची नाही हे तेवढंच महत्वाचं. बाजूबाजूला दोघांमध्ये अंतर ठेवून, ‘मोडेन पण हसणार नाही’ हा करारी बाणा ठेवून फोटो काढण्याचं युग कधीच संपलं. आता वेगवेगळ्या पोझेसमध्ये, छान छान हसर्या चेहर्याने मिस्टर अॅन्ड मिसेस असतील, मित्र-मैत्रिणी असतील, भाऊ-बहिणी असतील त्यांनी बिलगून फोटो काढण्याचं युग आलंय तेव्हा बिनधास्त द्या पोझ आणि करा त्या क्षणाचं सोनं. जेव्हा कधी अधूनमधून सारखं सारखं किंवा क्वचित क्वचित ते फोटो मोबाइलमध्ये, कॅमेर्यात, लॅपटॉपवर वा सोशल साईटवर तुम्ही बघणार आहात तेव्हा व्हा मस्तपैकी खूश. तो फोटो बघितल्यावर आठवणी जाग्या झाल्या पाहिजेत, चेहर्यावर छानसं हसू उमटलं पाहिजे. कसेही काढलेले नॉट सो गूड फोटोज सोशल साइटवर अपलोड करू नयेत. फोटोज संदर्भातच आणखी एक सांगायचय ते म्हणजे घरातल्या तरूण वर्गाने आई-बाबांना आणि आजी-आजोबांना हे मोबाईल फोनचं फोटो प्रकरण संपूर्णपणे समजून द्यायचंय, सोप्पं करून द्यायचंय. बर्याचदा असं दिसतं की कुणा आजी-आजोबांना फोटो काढायचा असेल तर त्यांच्या फोनमध्ये जे फोटो आयकॉन्स किंवा त्यांना सहलभर लागणारी जी अॅप्स वा आयकॉन्स आहेत ते पटकन अॅक्सेस करता येतील असे त्यांना ऑर्गनाईझ करुन द्यायचे. एक वा दोन स्टेप्समध्ये त्यांना फोटो काढता आला पाहिजे. थोडक्यात त्यांना काय काय गोष्टी महत्वाच्या आहेत त्या मोबाईलच्या पहिल्या स्क्रीनवरच असल्या पाहिजेत. पाच सहा स्टेप्स पार पाडल्यावर जेव्हा कॅमेरा मिळतो तेव्हा त्यांची दमछाक बघून थोडसं वाईट वाटतं. तरूणाईने हे अल्ट्रामॉडर्न फोनचं जे काही वरदान आपल्याला मिळालं आहे ते नीट ऑर्गनाइझ करून देऊन त्यांचा आनंद द्विगुणित करण्याची जबाबदारी आनंदाने पार पाडली पाहिजे. आणखी एक महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे पूर्वीच्या जमान्यात व्हिडीओ कॅमेर्याच्या ग्लॅमरमुळे अनेक पर्यटकांनी सहलींवर त्या स्थळाचा आनंद हा कॅमेर्याच्या लेन्समधूनच घेतला. स्वत:च्या डोळ्यांनी भरभरून अशी त्या सुंदर डेस्टिनेशनची मजा घ्यायची राहूनच गेली. आता व्हिडीओ कॅमेर्याचं धूड जाऊन स्लीक कॅमेरा फोन आलाय, आणि फोटोज, सेल्फी हा हव्यासही वाढलाय. इट्स गूड. परफेक्टली ऑल राइट. पण एकच विनंती आहे की ‘डोळ्यांनी बघा!’ काही काही ठिकाणं इतकी अप्रतिम असतात की फोन कॅमेरा हे सगळं काही वेळासाठी पर्सच्या अगदी आतल्या कप्प्यात ठेवून द्यायचं, फोटोचा हव्यास बाजूला सारायचा, तनानं आणि मनानं पूर्णपणे त्या ठिकाणी एकचित्त व्हायचं आणि उघड्या डोळ्यांनी त्या स्थळाचा आनंद लुटायचा. आज मोबाईल आपल्याला कंट्रोल करतोय, पर्यटनात आपण त्याला कंट्रोल करायचं. हजारो लाखो रुपये भरून आपण जेव्हा एखाद्या ठिकाणी पर्यटनाला जातो ते फक्त फोटो काढायला नव्हे. स्वत: त्याचा पुरेपूर आनंद घेतलाच पाहिजे. फोटोजमध्येच जर ते स्थळ बघायचं असेल तर जायचंच कशाला? इंटरनेटवर मग त्या स्थळांचे सुंदर सुंदर व्हिडीओज, फोटोज आहेतच की. त्या स्थळांचं आपल्या फोटोंपेक्षा कितीतरी सुंदर चित्रीकरण बॉलीवूड आणि हॉलीवूडच्या सिनेमांमध्ये आहेच नाही का? आपण जातोय ते त्या स्थळांचा पूर्ण आनंद घ्यायला आणि तो घेता आला पाहिजे. सो आता जेव्हा तुम्ही पर्यटनाला बाहेर पडणार आहात तेव्हा हे जरूर लक्षात असू द्या, ‘डोळ्यांनी बघा!’
आवाज-कोलाहल हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग. पण आपण खरंच ऐकतो का तो. जस्ट आठवून बघा, आपण आपल्या विचारांमध्ये एवढे मग्न असतो की आपल्याला आपल्याशिवाय दुसरं काही ऐकूच येत नाही इतकं
बहिरेपण आलंय. टॅक्सी स्टँडवर, रेल्वे स्टेशनवर, बस स्टॉपवर, एअरपोर्टवर, रस्त्यावर, गार्डनमध्ये, पार्कात, समुद्रकिनार्यावर, नदीकाठी, बर्फात, लेकच्या बाजूला, किती वेगवेगळ्या प्रकारचे आवाज आहेत ते ऐकायचा प्रामाणिक प्रयत्न आपण कधी केलाय ते आठवून बघा बरं. आपली सर्वांचीच अवस्था अशी झालीय की एकतर आपण मोबाईलवर असतो किंवा विचारात, त्यातून बाहेर यायची सवडच मिळत नाही. पण पर्यटनाला गेल्यावर मात्र ही मॉडर्न समाधी अवस्था भंग करायची. सगळं विसरायचं, ज्या ठिकाणी गेलोय तिथे मनाला आणि विचारांना खेचून आणायचं आणि जस्ट एकरूप व्हायचं त्या ठिकाणाशी. (पुन्हा मोबाईल बंद बरं का!) डोळ्याने बघायचं, तिथल्या हवेचा स्पर्श करून घ्यायचा तनामनाला, तिथले आवाज ऐकायचे, जाणायचे आणि खराखूरा आनंद मिळवायचा त्या पर्यटनाचा.
‘डोळ्यांनी बघा’,‘कानाने ऐका’ नंतरचा पर्यटनवारीतला मं त्र आहे ‘पायाने चाला’. कोणतंही ठिकाण तिथल्या स्थानिक लोकांप्रमाणे पायी चालून फिरल्याशिवाय कळत नाही. तिथल्या मातीचा सुगंध घेता आला पाहिजे. लोकल मार्केटमध्ये फिरता आलं पाहिजे, अगदी मच्छी मार्केटमध्ये जाऊन तो माहोल अनुभवता आला पाहिजे. अर्थात तुम्ही म्हणाल एवढा वेळ तुम्ही सहलीत देताच कुठे? मान्य आहे. ठरलेल्या दिवसांमध्ये खूप काही दाखवायचं असल्याने असा सडाफटिंग वेळ सहलीत नाही देता येत. त्यासाठी आम्ही सहलीनंतर पोस्ट टूर हॉलिडे प्रकार आणलाय. सहलीनंतर शेवटच्या शहरात स्वत:च्या मनाप्रमाणे फिरा मनसोक्त. पण सहलीवरही जेव्हा जेव्हा आपल्याला मोकळा वेळ मिळतो तो तिथल्या मॉलमध्ये मारेमारे भटकण्यात वाया घालविण्याऐवजी आजूबाजूच्या परिसरात फेरफटका मारावा. एखाद्या कॉफी शॉपमध्ये जाऊन कॉफीचा आस्वाद घेत आजूबाजूच्या स्थानिकांना बघावं, त्यांच्या जीवनशैलीचा अंदाज घ्यावा. ह्या सगळ्यामध्ये आपण आपल्या सहलीचा आनंद आणि पैशाचा मोबदला द्विगुणित करू शकतो हे शंभर टक्के खरं आहे.
सो पर्यटकहो, आपण जिथे कुठे सहलीला जाणार आहात तिथे त्या ठिकाणांचा अगदी मनसोक्त आनंद लुटा आणि रीज्युविनेट होऊन घरी परत या. लेट्स मेक द मोस्ट ऑफ अवर हॉलिडे धिस टाइम! लेट्स डबल द जॉय!
Post your Comment
Please let us know your thoughts on this story by leaving a comment.