गणपती, दसरा, दिवाळी, न्यू ईयर...मागचं वर्ष कसं संपलं ते कळलंच नाही. पर्यटकांना जग दाखविणारे आम्ही स्वत:च्या हॉलिडेला जायचं विसरूनच गेलो. पुन्हा आता सीझनची-समर हॉलिडेची लगबग सुरू होईल त्याआधी किमान तीन-चार दिवस कुठेतरी जाऊन येऊ ह्या विचाराला सगळ्यांचा पाठिंबा मिळाला, चार दिवस ऋषिकेशच्या आनंदा स्पा रीसॉर्ट ला जायचं नील आणि सुनिलाने ठरवलं आणि मागच्या आठवड्यात आम्ही रीज्युविनेट होऊन आलो. आता खरंतर तुमचा आमचा कुणाचाही असा हॉलिडे, त्यात सांगण्यासारखं काय मोठसं पण हा हॉलिडे माझ्यासाठी वेगळा ठरला.
गेली अनेक वर्ष, नेमकं साल आठवत नाही पण साधारणपणे वीस वर्षांपूर्वी मोबाईल फोन नावाची गोष्ट माझ्या हातात आली, आणि जिंदगीच बदलली. आधी ब्लॅकबेरी आणि त्यानंतर आलेल्या स्मार्ट फोनने तर मला जगातली एक महत्त्वाची व्यक्ती बनवून टाकलं. मी फोनकडे बघितलं नाही, तो चेक केला नाही, मला कुणाचा मेसेज आलाय का किंवा कुणी व्हॉटस्अॅप पाठवलंय का? हे जर पाहिलं नाही तर भयंकर उत्पात घडेल ह्या विचाराने गेली अनेक वर्ष माझ्यावर अंमल चढवला. उठता-बसता- झोपता-खाता-पिता माझा एक डोळा मोबाईलवर तर दुसरा हातातल्या कामावर वा गोष्टींवर. फोन हातात नसला किंवा फोनची बॅटरी डाऊन झाली की तडफडायला व्हायचं. एवढ्या वेळात कुणाचा फोन तर येऊन गेला नसेल? कुणाला एखाद्या गोष्टीवर काही निर्णय तर हवा नसेल? एखाद्या फेसबूक पोस्टला किती लाईक्स आले हे बघायला मिळालं नाही तर? कुणी काय इन्स्टा पोस्ट टाकलीय ते सर्वप्रथम मला दिसलं नाही तर? केवढा मोठा अपराध तो, ह्या विचाराने मी कासाविस व्हायचे.
रोज संध्याकाळी दारूचा डोस ढोसणार्या माणसाला एखाद्या दिवशी दारू मिळाली नाही तर त्याची जी तडफड होते किंवा सिनेमात दाखवतात तसं एखाद्या ड्रग अॅडिक्टला त्याचा डोस न मिळाल्यानंतर जी काही तगमग दाखवतात तसंच काहीसं हा फोन दृष्टीआड झाला की व्हायचं. ड्रिंक्स किंवा ड्रग्ज ची नशा करणारे नजरेत येतात, पण आमच्यासारखे फोन अॅडिक्ट मात्र वुई आर बिझिएस्ट पीपल ऑन अर्थ ह्या भ्रमात राहून उजळमाथ्याने वावरतात. आम्हाला कळतही नाही की ही फोनची नशा आमचं मानसिक- शारीरिक-कौटुंबिक-सामाजिक संतुलन बिघडवतेय.
ब्लॅकबेरीच्या छोट्या की-पॅडवरून मोठे प्रोजेक्टस्, स्ट्रॅटेजीज् ईमेल करण्याचं व्यसन त्यावेळी इतकं वाढलं की डॉक्टरांनी स्पाँडिलिसिस झालाय तुला म्हणत दम दिला तेव्हा ते थोडंसं कमी झालं, पण तोपर्यंत तंत्रज्ञानाने प्रगती केली आणि माझ्या हातात स्मार्टफोन दिला. मग तर माझं वारू आणखी उधळलं. मुंबईत इथे असताना आणि नसताना आमच्या मॅनेजर्सवर अक्षरश: भडिमार व्हायचा, मग कधी त्यात एखादी चूक दर्शविली जायची तर कधी एखादा छोटा मोठा प्रोजेक्ट पाठविला जायचा. कधी एखादा किस्सा तर कधी तत्वज्ञान. आपल्यालाच सगळं काही कळतं ह्याचा तो परिपाक असायचा. माझ्या ह्या बंबार्डिंगचा मारा इतका असायचा की कधी कुणाला जर मेसेज/व्हॉट्सअॅप ईमेल आला नाही तर तुम्हाला बरं आहे नं! अशी विचारणा ते करायचे. मला आपण जरा अतिच करतोय हे ध्यानी यायचं, कळायचं पण वळायचं नाही. बरं, मी कुठच्या दुसर्या देशात असेन तर इथे किती वाजले असतील? ऑफिस सुरू आहे का? रविवार वा सुट्टी तर नाही नं! कसलं कसलं भान रहायचं नाही. शेवटी ह्या गोष्टीला मी मोबाईल पिळवणूक म्हणू लागले.
वय वाढायला लागलं तसं थोडंफार शहाणपण यायला लागलं असं म्हणायला हरकत नाही. अगदी आणीबाणीची परिस्थिती नसेल तर रविवारी किंवा ऑफिसच्या वेळेनंतर मी शक्यतोवर मेसेजेस् वा व्हॉट्सअॅप वा ईमेल पाठवणं कमी केलं. विसरू नये म्हणून एखादी गोष्ट पाठवलीच तर उद्या ह्यावर काम करा म्हणून तळटीप द्यायला लागले. प्लॅनिंगवर भर देऊन कधीही कुठेही केव्हाही काहीही करायची स्वत:मधली अॅन्झायटी कमी केली आणि माझ्यासोबत बाकीच्यांनाही शांत केलं. माझ्या मनावर-हृदयावर-मेंदूवर-शरीरावर ताबा मिळविलेल्या त्या मोबाईल नामक यंत्राला थोडा थोडा वेळ पूर्णपणे बाजूला ठेवण्यात मला यश मिळायला लागलं. मीटिंगमध्ये बसलेले असताना एक डोळा सतत त्या मोबाईलच्या नोटिफिकेशन्सवर असायचा त्यावर मीटिंगमध्ये मोबाईल जर जवळ ठेवायचाच असेल तर तो उपडा ठेवायला सुरुवात केली आणि मीटिंगमध्ये तनाने-मनाने सहभागी व्हायला शिकले. हळूहळू तर मी मीटिंगरूममध्ये मोबाईल घेऊन जाणंच सोडलं. जे काम हातात आहे त्यावर जास्त लक्ष द्यायला लागले आणि मीटिंग्ज जास्त मीनिंगफुल व्हायला लागल्या. कुणालाही बळजबरी नाही पण हळूहळू मीटिंगमध्ये भाग घेणारेही मोबाईल उलटा ठेवायला लागले. मला स्वत:ला जेव्हा समजलं की मोबाईल माझ्या आयुष्यात गडबड गोंधळ निर्माण करतोय तेव्हा मी मला मोबाईलपासून दूर ठेवायला सुरुवात केली. तसंच बाकीच्यांचही आहे आणि त्यांना स्वत:ला ते उमगल्यावर त्यांच्यातही बदल घडेल, जो टिकणारा असेल. त्यामुळे हा नियम केला नाही. स्वत: समजायला वेळ लागतो पण तेवढा वेळ देणंही गरजेचं असतं लाँग लास्टिंग काही निर्माण करायचं असेल तर.
एक सेकंदही मोबाईल नजरेआड न करणारी मी आता सकाळी ऑफिसला जाताना मोबाईल हाती घ्यायला लागले, आणि संध्याकाळी आठनंतर रोज मोबाईलशी आनंदाने कट्टी करायला शिकले. अगदी सुखासुखी हे झालं नाही. टू बी ऑर नॉट टू बी चा खेळ सुरु असायचा मनातल्या मनात. मोबाईल हातात घेतला जायचा पण निग्रहाने पुन्हा मी तो न बघता नजरेआड करायचे. झोपण्यापूर्वी दोन तास आणि उठल्यावर किमान चार तास मोबाईलकडे ढुंकूनही बघायचं नाही हे करण्यात मी यशस्वी होत होते आणि मला जाणवायला लागलं की मोबाईल नाही बघितला तरी फारसं काही बिघडत नाही. अर्थात आमच्या वीणा वर्ल्डमधील टीम्स सुद्धा आता चांगल्यातर्हेने सेट झाल्या होत्या, त्यांनी डे टू डे चा चार्ज घेतला होता आणि आम्ही अंतरावरून त्यांना सपोर्ट करीत होतो.
आता माझी हाव वाढायला लागली होती. मी काही रविवारी मोबाईल कपाटात बंद करून ठेवला. आठवड्यात एक पूर्ण दिवस मोबाईलशिवाय काढायला लागले. वाचन वाढलं त्यामुळे, कितीतरी पुस्तकं अर्धवट राहिली होती ती एकापाठी एक पूर्ण करायला घेतली. खूप दिवसांत पुस्तक खरेदी केलं नव्हतं कारण वेळच नव्हता ह्या मोबाईलच्या अॅडिक्शनमुळे. आता पुस्तकांच्या दुकानात फिरायची आवड पूर्ण करायला लागले. थोडक्यात माणसात आले.
इतक्या वर्षांमध्ये एकदा विपशनाला गेले होते तेव्हा दहा दिवस मोबाईलशिवाय राहिले होते, त्यानंतर खूप वर्षांनी प्रयत्नपूर्वक हळूहळू मोबाईलपासून दूर झाले आणि आत्ता ह्या ऋषिकेशच्या सुट्टीत चार दिवस मोबाईल रुमच्या सेफमध्ये बंद करून ठेवला होता, अगदी यशस्वीपणे चार दिवसांचा विरह सहन केला, पण आनंदाची गोष्ट अशी होती की तो विरह वाटलाच नाही तर अचिव्हमेंटचा आगळा आनंद मला झाला होता.
मोबाईलचा माझ्यावरचा अंमल कमी झाला होता. आता मोबाईल मला कंट्रोल करीत नव्हता तर मी मोबाईलवर कंट्रोल करीत होते. हल्ली एअरप्लेन मोडचा जास्त वापर होत होता माझ्याकडून. आता फेसबूक, इन्स्टा, लिंक्डइनची नोटिफिकेशन मला डिस्टर्ब करीत नव्हती. दिवसाचा कंटाळवाणा वेळ म्हणजे खासकरून लंच टाईमनंतरचा, ऑफिसमधून घरी येतानाचा, कधी विमानातला किंवा प्रवासातला वेळ मी मोबाईल चेक करण्यासाठी काढला.
मोबाईल हा शाप नाही ते वरदान आहे. मोबाईलशिवाय राहणं, कामं होणं आता अशक्य आहे, नो डाऊट अबाऊट इट पण त्याच्या आहारी न जाता आपण त्याचा सकारात्मक उपयोग करून घेतला पाहिजे अन्यथा दारू वा ड्रग्ज इतकंच किंवा त्याहीपेक्षा भयानक असं हे व्यसन आहे ज्याची लागण आपल्याला होणार नाही ह्याची खबरदारी आपण घेतली पाहिजे. वेळ लागला पण मी यात यशस्वी झाले. माझ्यासारखे कुणी असाल तर वेळीच सावध व्हा. ऑल द व्हेरी बेस्ट!
मोबाईलसारखीच आणखी एक सवय मी सध्या बदलतेय ती म्हणजे एका पाठोपाठ एक करत रात्री नेट सीरीज बघण्याची. म्हणजे इथे हे मोबाईलसारखं वर्षानुवर्ष जडलेलं व्यसन नाहीये तर आत्ता त्याची सुरुवात आहे, सुरुवातीलाच मला त्यावर घाला घालायचाय. मोबाईलच्या आगीतून सुटलेय आता नेट सीरिजच्या फुफाट्यात अडकणार नाही ह्याची काळजी मला घ्यायचीय. शाळेतल्या मुलांना आई जसं फक्त एक तास टीव्हीसमोर बसायचं हे दरडावून सांगते तसंच काहीसं मी मला स्वत:ला सांगितलंय, आणि ते अमलात आणायचंय.
थोडक्यात मी माझं स्वत:चं एक रीहॅबीलिटेशन सेंटर सुरू केलं माझ्या स्वत:साठीच आणि मला लागलेल्या अदृश्य
अशा नकळत जडलेल्या ह्या मोबाईल आणि टेलीव्हिजन नेटसीरिजच्या विषारी विळख्यातून स्वत: ला वाचवलं. आणि पुन्हा त्यात अडकणार नाही ह्याची काळजी घेतेय. पण अजून एक... (क्रमश:)
Post your Comment
Please let us know your thoughts on this story by leaving a comment.