कोणत्याही वडिलोपार्जित संपत्तीशिवाय, कोणत्याही गॉडफादरशिवाय किंवा कोणत्याही चमत्काराशिवाय एखाद्या संकल्पनेच्या जोरावर, त्या संकल्पनेवर पूर्ण विश्वास ठेवून, त्यावर अहोरात्र कष्ट घेऊन वीस-पंचविशीतल्या तरुण- तरुणींनी अक्षरश: शून्यातून सुरुवात करून गगनाला गवसणी घातल्याची अनेक उदाहरणं गेल्या तीन-चार दशकांत आपल्यासमोर निर्माण केली. मायक्रोसॉफ्ट, अॅपल, गूगल, फेसबूक, अलिबाबा, फ्लिपकार्ट, ओयोसारख्या असंख्य संस्थापक माणसांनी आपल्यासमोर ‘सभोवताल कसंही असो,परिस्थिती काहीही असो पण आपण जर स्वयंप्रेरित असू तर भविष्य निर्माण करू शकतो’ ही उमेद जागवली.
आमचा व्यवसाय माणसांचा. माणसंच माणसं चहुकडे. ‘माणसांनी माणसांची माणसांसाठी’ केलेली सोय असं काहीसं त्याला म्हणता येईल. अर्थात व्यावसायिक भाषेत याला सेवा क्षेत्र किंवा सर्व्हिस इंडस्ट्री म्हटलं जातं. ह्या क्षेत्राचा आवाका प्रचंड मोठा आहे. जगाला, प्रत्येक देशाला, समाजाला आणि माणसांना त्याची गरज आहे त्यामुळे सॅच्युरेशनची भीती नाही. मात्र गरज आहे ती माणसांच्या जोरावर व्यवसाय मोठा करण्याची. थोडंसं आयटी इंडस्ट्रीसारखं आहे. प्रत्येक छोट्या-मोठ्या व्यवसायाची ऑटोमेशनची गरज वाढतेय, त्यामुळे त्यातील कुशल माणसांची मागणी वाढतेय. अशी माणसं उपलब्ध असल्याने व्यवसाय वाढताहेत. आयटी इंडस्ट्री आणि सर्व्हिस इंडस्ट्री ह्या दोन्हीमध्ये माणसं अग्रभागी असली तरी फरक हा आहे की आयटीमध्ये पे-स्केलला अनन्य साधारण महत्त्व आहे. पैसा माणसांना इथून तिथे हलवत असतो, संस्थांच्या शहरांच्या देशाच्या सीमा पार करायला लावतो. पर्यटनक्षेत्रातही माणसं शहरांच्या देशांच्या सीमा पार करतात, ह्यामध्ये पैसा महत्त्वाचा असला तरी त्यामागे पैशाच्या पलिकडे आवड आणि सेवाभाव असतो.
साडेपाच वर्षांपूर्वी वीणा वर्ल्ड टीम बनायला सुरुवात झाली. पहिल्या तीन वर्षातच ह्या टीमने मिळून एक मजबूत ब्रँड तयार केला. आता संस्था स्टार्टअपमधून बाहेर येऊन खंबीरपणे वाटचाल करतेय. इनमिन तीस-पस्तीसजणांनी सुरू झालेला वीणा वर्ल्ड परिवार आता कॉर्पोरेट ऑफिस, सेल्स ऑफिसेस, प्रीफर्ड सेल्स पार्टनर्स मिळून दोन ते अडीच हजार माणसांचा झाला आहे. आम्ही सर्वजण मिळून एका वर्षात एक लाखांहून अधिक पर्यटकांना देशविदेशात सहली घडवून आणत असतो. ह्या सहलींद्वारे भारतात आणि परदेशात हजारहून अधिक स्थानिक संस्थांशी आणि असोसिएट्सशी आम्ही जोडले जातो. सगळ्या ठिकाणी माणसंच माणसं. त्यामुळे माणसांची कडी व्यवस्थित जोडलेली असणं हे कधी नव्हे इतकं महत्त्वाचं आहे. ऑर्गनायझेशन हेड म्हणून मी त्यासाठी जबाबदार आहे. व्यवसाय वाढतोय म्हणून माणसं वाढताहेत आणि माणसं वाढताहेत म्हणून व्यवसाय वाढवणं शक्य होतंय.
संस्थेसोबतच संस्थेशी जोडल्या गेेलेल्या प्रत्येक व्यक्तीचं उज्ज्वल भविष्य ही जबाबदारीही आपलीच असते. वीणा वर्ल्ड शून्यातून उभं केलं माणसांनी, त्यामुळे कधीही ‘वीणा वर्ल्डमध्ये येऊन मी चूक केली’ असं कुणालाही वाटू नये ही माझी आंतरिक तळमळ असते. फ्लॅट ऑर्गनायझेशन स्ट्रक्चर ठेवण्यात आम्ही बर्यापैकी यशस्वी झालोय असं म्हणायला हरकत नाही. कामांच्या जबाबदारीसाठी एक मॅनेजरियल लेव्हल, अदरवाईज कुणालाही कुठेही मज्जाव नाही. ‘वागण्या बोलण्यात पारदर्शकता, नो हिडन अजेंडाज्’ची संस्कृती रुजवायला आणि आत्मसात करायला टीम यशस्वी झाली. म्हणजे कॉर्पोरेट ऑफिसमध्ये किंवा सेल्स ऑफिसेसमध्ये आमच्याकडे कुठेही बंद केबीन्स नाहीत. कोण काय करतोय हे सर्वांसमोर. सर्वांसोबत रहा, सर्वांशी मिळून-मिसळून रहा, आणि हे करीत असताना एकाग्रतेने स्वत:चं काम करा, त्यात हयगय नाही हेही बिंबलंय आपसूक. खेळीमेळीचा माहोल निर्माण करताना कॅज्युअल अॅटिट्युड किंवा ‘चलता है’ची मानसिकता निर्माण होऊ शकते त्याचं भान प्रत्येक हेडला असलंच पाहिजे. कामात हयगय नाही. साधीसरळ-सोपी गोष्ट आहे, पर्यटक त्यांच्या कष्टाचे पैसे भरून सहलीला येत असतात, त्यांना त्यांच्या पैशाचा पूर्ण मोबदल्यासह अपेक्षित आनंद आपल्याला देता आला पाहिजे. ते कर्तव्य म्हणण्यापेक्षा पर्यटकांची ती अट आहे जी आम्हाला लागू आहे. अवलंबित व्यवसाय असल्याने कधीतरी कुठेतरी काही अडचण येऊ शकते पण ती किती तातडीने आणि आत्मियतेने आपण सोडवतो हे महत्त्वाचं. आधी अडचणी येणारच नाहीत म्हणून जेवढा जास्तीत-जास्त बंदोबस्त प्रीकॉशनरी लाईनवर करता येईल तो करणं आणि अडचण आलीच तर सर्व संबंधितांनी आरोप-प्रत्यारोप-दोषारोप न करता आधी अडचण सोडवणं, नंतर अडचण का आली त्याचा अभ्यास करणं आणि भविष्यात अशी अडचण पुन्हा येऊ नये म्हणून पायबंद घालणं ही सवय लागलीय. ‘क्लासिक प्रॉब्लेम’ हा आमच्याकडचा एक स्वखुशीने स्विकारला जाणारा प्रकार. सर्वकाही व्यवस्थित असतं, सगळ्या तर्हेने व्यवस्था चोख ठेवलेली असते आणि ‘न भूतो:’ अशी एखादी अडचण अचानक समोर येते. ती अडचण तातडीने सोडवून आम्ही त्याचं वर्गीकरण ‘क्लासिक केस स्टडीज्’मध्ये करून टाकतो. हे क्षेत्रच इतकं मस्त आहे नं की गेल्या पस्तीस वर्षात कधीही निराश नाऊमेद व्हायला झालं नाही, मग जागतिक स्पर्धेचा सामना करणं असो किंवा शून्य होऊन नव्याने संस्था काढणं असो. आणि हे फक्त आमच्या प्रवर्तकांच्या बाबतीतच नाही तर संस्थेतली महत्त्वाची सगळी माणसंही अशीच जिद्दीने-उमेदीने-ध्येयाने प्रेरित झालेली. आता आम्हा सर्वांचं काम आहे की संस्था वाढतेय, नवीन टीमची दरवर्षी भर पडतेय, जे वीणा वर्ल्ड संस्कृतीमध्ये नवीन आहेत त्यांच्यात ह्या सगळ्याची रुजवात करायची. खरं तर संस्कृती बनायला वर्ष नव्हे तर दशकं लागतात आणि नवीन येणार्याला त्यात घोळायला वेळ लागू शकतो. जागतिक स्पर्धेचा सामना करताना हा वेळ खूपच कमी आहे आपल्या सर्वांकडे. चॅलेंजिंग टाईम्स. पण त्यातच मजा आहे, दॅट कीप्स अस ग्रोइंग! रोज इतक्या गोष्टी घडत असतात, इतके प्रॉब्लेम्स सॉल्व्ह केले जातात की दिवस संपताना एक प्रकारचं समाधान असतं. संपूर्ण टीमची सकारात्मक मानसिकता हा एक महत्त्वाचा भाग आहे ह्यामध्ये. नकारघंटा वाजवणारी, निराशाजनक माणसांची फळी कुठेही निर्माण होणार नाही ह्याबाबत आमचं एच.आर. दक्ष आहे. मला एक सुभाषित आठवलं ह्या बाबतीत, ‘नकारात्मक मानसिकतेच्या माणसांमध्ये राहू नका, त्यांच्याजवळ प्रत्येक सोल्युशनला प्रॉब्लेम असतो’. पहिल्यांदा वाचलं तेव्हा पटकन कळलं नाही, दोन तीन वेळा वाचावं लागलं तेव्हा कुठे त्याचा अर्थ कळला.
जनरली ऑर्गनायझेशनमध्ये नव्याने सहभागी होणार्या माणसांमध्ये कुणी हे क्षेत्र आवडतं म्हणून येतं, कुणी अनुभव घ्यायला येतं, कुणी आईवडिलांनी ढकललंय म्हणून येतं, कुणी करियरच्या वाटेवरचं पहिलं पाऊल म्हणून येतं, कुणाला अगदी ठरवून इथेच यायचं असतं, भविष्य घडवायचं असतं. कारणं वेगवेगळी असतात, आणि ती बरोबरही आहेत. मी ह्याला ‘शॉर्ट टर्म, लाँग टर्म, लाईफ लाँग’ अशा वर्गवारीत गणते. एकच महत्त्वाचं सांगणं ह्या सर्वांना असतं ते म्हणजे तुम्ही शॉर्ट टर्म असा की लाँग टर्म, तुम्ही इथे एक वर्ष असा की दहा वर्ष की लाईफटाईम, तुमच्या आयुष्याला आकार देणं आणि दिशा देण्याचं काम इथे करवून घ्या. आयुष्य इतकं सोप्पं राहणार नाहीये भविष्यात. आपल्या स्वत:ला त्यासाठी तयार करण्याचं, मानसिकरित्या खंबीर बनण्याचं काम जरी इथे वीणा वर्ल्डमध्ये होऊ शकलं, आयुष्याला एक चांगली शिस्त जर लावता आली तर भरून पावलो. आपलं सभोवताल, जागतिक परिस्थिती, राजकारण इत्यादी गोष्टी अनुकूल असल्या तर सोन्याहून पिवळं पण जर नसल्या तर आपली प्रेरणा आपणच स्वत: बनलं पाहिजे. कोणत्याही वडिलोपार्जित संपत्तीशिवाय, कोणत्याही गॉडफादरशिवाय किंवा कोणत्याही चमत्काराशिवाय एखाद्या संकल्पनेच्या जोरावर, त्या संकल्पनेवर पूर्ण विश्वास ठेवून, त्यावर अहोरात्र कष्ट घेऊन वीस-पंचविशीतल्या तरुण-तरुणींनी अक्षरश: शून्यातून सुरुवात करून गगनाला गवसणी घातल्याची अनेक उदाहरणं गेल्या तीन-चार दशकांत आपल्यासमोर निर्माण केली. मायक्रोसॉफ्ट, अॅपल, गूगल, फेसबूक, अलिबाबा, फ्लिपकार्ट, ओयोसारख्या असंख्य संस्थापक माणसांनी आपल्यासमोर ‘सभोवताल कसंही असो, परिस्थिती काहीही असो पण आपण जर स्वयंप्रेरित असू तर भविष्य निर्माण करू शकतो’ ही उमेद जागवली. आम्हीसुद्धा वीणा वर्ल्डच्या छोट्याशा राज्यात स्वयंप्रेरितांची फौज उभी करतोय. एकदा का हे काम झालं की पुढची कामं आपोआप घडत जातात. वीणा वर्ल्डशी शॉर्ट टर्म-लाँग टर्म जोडली गेलेली प्रत्येक व्यक्ती आयुष्यात यशस्वी झाली पाहिजे. आणि त्यांच्याकडून-आम्हा सर्वांकडून आमचे अन्नदाते पर्यटकांना मन:पूर्वक सेवा दिली गेली पाहिजे.
स्वत:च स्वत:ची प्रेरणा बनणं ही तशी सोपी गोष्ट नाहीये. त्यासाठी झपाटलेपण महत्वाचं आहे. वर दिलेली आणि त्यांच्यासारखी हजारो प्रेरणास्थानं आज आपल्याला देश-विदेशात पहायला मिळतात. त्यांच्या सर्वांच्या स्टोरीज आपल्या मोबाईलवर बंदिस्त आहेत. ते कोणत्यातरी एका ध्येय्याने पछाडलेले होते. त्यांना त्याशिवाय काही दिसतच नव्हतं. अनेकदा त्यांना त्यांच्या त्या वाटेवर अपयशाचा सामना करावा लागला. थोड्या काळापुरतं का होईना काहींना निराशेनेही ग्रासलं पण पुन्हा त्यांच्यातलं झपाटलेपण आणि संकल्पनेवरचा त्यांचा विश्वास उचंबळून येत होता. पुन्हा कंबर कसून ते कामाला लागत होते. ह्या मार्गात कधी कुचेष्टेचा, निंदेचा सामना करावा लागला तर कधी वेडेपणाचा शिक्काही त्यांच्यावर बसला. पण ते डगमगले नाहीत आणि म्हणूनच अभूतपूर्व यश संपादित करू शकले.
Post your Comment
Please let us know your thoughts on this story by leaving a comment.