वीणा वर्ल्डची एक पद्धत आहे, जे काही आपण करतोय किंवा करायचं ठरवलंय ते संस्थेतल्या सर्वार्ंंना माहीत असलं पाहिजे. त्यात आता आम्ही वीणा वर्ल्ड टीमच्या घरच्यांनाही सामील करून घेतलंय फॅमिली डे द्वारे. आम्ही खुलेआम घरच्यांना वचन देतो. आम्ही काय करतोय? कसं करतोय? काय करणार आहोत? हे सांगतो आणि जेव्हा असं वचन दिलं जातं तेव्हा त्याची पुर्तता करणं हे बंधन आमच्यावर घालून घेतो.
आज पॅरेंट्स डे ला गेले होते, आई-बाबा रोज कुठे जातात? काय करतात? कुठे बसतात ते बघितलं, आमच्या ओपन डे ला आई बाबा शाळेत येतात, आमचं रीपोर्ट कार्ड बघतात, आमच्या टीचरना विचारतात तसं आज आम्ही आईबाबांच्या ओपन डे ला गेलो होतो. हे संभाषण आहे आठ वर्षाच्या वाङ्मयी चुरीचं, तिच्या बिल्डिंगमधल्या सगळ्या मैत्रिणी आणि त्यांच्या आईबरोबरचं. निमित्त होतं वीणा वर्ल्ड फॅमिली डे चं. वीणा वर्ल्डला सहाच वर्ष झालीयेत आणि त्यातला हा आमचा दुसरा फॅमिली डे. दर तीन वर्षांनी फॅमिली डे करायचा असं आम्ही वीणा वर्ल्ड तीन वर्षांची झाल्यावर ठरवलं होतं. आणि ठरल्याप्रमाणे दुसरा फॅमिली डे मागच्या आठवड्यात एक डिसेंबरला साजरा झाला ही महत्त्वाची गोष्ट. पहिल्यांदा सगळं काही साग्रसंगित पार पडतं पण त्यात सातत्य राखणं बर्याचदा कठीण होऊन जातं. चांगल्या गोष्टींमध्ये सातत्य असणं किंवा ठेवणं एकदा जमलं की व्यक्तीचा, त्याच्या कारकिर्दीचा, संस्थेचा, पर्यायाने समाजाचा आणि देशाचा उद्धार व्हायला- विकास घडायला आपल्याकडून अंशत: का होईना पण योगदान केलं जातं.
फॅमिली डे चा विचार आला तो वीणा वर्ल्ड संस्था नवी असल्यामुळे. बर्याचदा एक प्रश्न विचारला जातो की, माझा मुलगा किंवा मुलगी टूरिझममध्ये यायचं म्हणताहेत पण पुढे जायला ह्यात वाव आहे का? त्यांचं भविष्य ते घडवू शकतील का? आधीच ह्या क्षेत्राविषयी मनात साशंकता, त्यात वीणा वर्ल्ड ही नवीन संस्था, पालकांच्या मनात प्रश्नचिन्ह उभं राहणं साहजिक होतं. आमच्या टीम मेंबरपेक्षाही त्याच्या वा तिच्या आईवडिलांच्या- घरच्यांच्या मनात ह्या क्षेत्राविषयी आणि वीणा वर्ल्डविषयी एक प्रकारचा विश्वास निर्माण करणं, त्यांना तशी हमी मिळणं आवश्यक होतं. एकदा का घरून सगळ्यांचा मानसिक पाठिंबा मिळाला की प्रत्येक टीम मेंबरची शक्ती वाढते. त्याच्या कामात उत्साह येतो. मी जे काही करतोय किंवा करतेय त्याचा माझ्या घरच्यांना अभिमान आहे ही गोष्ट कोणत्याही व्यक्तीला खूप मोठा आधार देऊन जाते. हा आधार आम्हा प्रत्येकाला मिळाला तर आम्ही पर्यटनाचं जग जिंकू हे निश्चित. ह्या सर्व विचारांवर शिक्कामोर्तब झाल्यावर आम्ही दोन हजार सोळामध्ये पहिला फॅमिली डे साजरा केला. सर्वांच्या घरची मंडळी आली आणि वीणा वर्ल्डने आजपर्यंत काय केलं आणि पुढे काय करणार आहे, कोणती तत्त्व, कोणते विचार, कोणती संस्कृती रुजवायचा आम्ही प्रयत्न करतोय ते सर्वांना सांगितलं. पहिला फॅमिली डे यशस्वी झाला.
आम्ही ठरवलं की दर तीन वर्षांनी हा दिवस आपण साजरा करायचा. तीन वर्षात अनेक नवीन टीम मेंबर्स जॉइन होतात. कुटुंब मोठं होतं. नव्याने जोडली गेलेली घरची मंडळी वीणा वर्ल्ड परिवाराविषयी जाणती होणं आवश्यक असतं. तसंच मागच्या फॅमिली डे ला आलेल्या घरच्या मंडळींना जे चित्र आम्ही दाखवलं होतं त्या चित्रावरूनच पुढे वीणा वर्ल्डचा प्रवास सुरू आहे नं? संस्था प्रगतीपथावर आहे, आचार-विचार-नितीमत्ता- संस्कृती ह्याविषयी जी काही मुल्य ठरवली होती त्यावरूनच मार्गक्रमणा सुरू आहे ह्याची खात्री करून देणं म्हणजेच आपण जे वचन आपल्या सर्वांच्या ह्या घरच्या मंडळींना दिलं होतं त्याचा पाठपुरावा आम्ही करतोय हे त्यांच्या निदर्शनास आणणं, त्यांचा विश्वास आणखी मजबूत करणं हे काम ह्या दुसर्या फॅमिली डे चं होतं.
वीणा वर्ल्डची एक पद्धत आहे, जे काही आपण करतोय किंवा करायचं ठरवलंय ते संस्थेतल्या सर्वार्ंंना माहीत असलं पाहिजे. जसं सहलखर्चात कुठे छुपे खर्च नसतात तसंच संस्थेतही सर्वच बाबतीत पारदर्शकता पाळली जाते. सर्वांना सर्वकाही माहीत असतं. त्याचा फायदाच झालाय आजवर. त्यात आता आम्ही वीणा वर्ल्ड टीमच्या घरच्यांनाही सामील करून घेतलंय ह्या दोन फॅमिली डे द्वारे. ह्यात आमचा स्वार्थ आहे असं मी म्हणेन. फॅमिली डे द्वारे आम्ही खुलेआम घरच्यांना वचन देतो. आम्ही काय करतोय? कसं करतोय? काय करणार आहोत? हे सांगतो आणि जेव्हा असं वचन दिलं जातं तेव्हा त्याची पुर्तता करणं हे बंधन आमच्यावर घालून घेतो. कारण तीन वर्षांनी पुढचा फॅमिली डे येणार असतो त्यावेळी सगळ्या घरच्यांच्या समोर ताठ मानेनं उभं राहून, यस वुई डिड इट अँड मार्चिंग टूवर्डस नेक्स्ट माइलस्टोन हे सांगायचं असतं. ते सांगता आलं पाहिजे असं आमचं प्रत्येकाचं काम असलं पाहिजे. आपण जे बोलतो तसं वागलं पाहिजे, जे निर्णय घेतो ते पूर्णत्वाला नेता आले पाहिजेत. हे सर्व करीत असताना विचार-संस्कृती- नितीमुल्य ह्याच्याशी कुठेही तडजोड होणार नाही ह्याचंही भान असलं पाहिजे. कुणालातरी उत्तर द्यायला आपण बांधिल आहोत ही गोष्टच आपल्याकडून मोठी कामं करवून घेत असते. आमच्या सर्वांच्या घरच्यांना आमच्याविषयी अभिमान वाटला पाहिजे असं काम आमच्याकडून व्हायला पाहिजे हा असतो ह्या फॅमिली डे चा हेतू आणि तो चांगल्या तर्हेने साध्य होतोय.
गेल्यावेळी फॅमिली डे साजरा केला तेव्हा वीणा वर्ल्ड टीम मेंबर्सची संख्या होती सहाशे, आता ती झालीय अकराशे. प्रत्येक घरून दोन-तीन मंडळी धरली तरी किमान चोवीसशे-पंचवीसशे मंडळी येणार. हाऊ टू मॅनेज? हा प्रश्न होता. आमच्या कॉर्पोरेट टूर्स डिव्हिजनमध्ये असे मोठे ग्रुप इव्हेंट्स मॅनेज केले जातात. हा तर इनहाऊस इव्हेंट होता. गेल्यावेळी आमच्या निळकंठ कॉर्पोरेट पार्कने अनेक जागा आमच्या इव्हेंटसाठी दिल्या होत्या पण आता तीन वर्षांनी कॉर्पोरेट पार्कही फुल्ल झालंय. तरीही त्यांनी जेवढी मदत करता येईल तेवढी केली. स्नॅक्स व जेवणाचा प्रश्न सोडवायची जबाबदारी ज्योत कॅटरर्स आणि जितूभाई शहांच्या खिचडी रेस्टॉरंटने घेतली आणि आम्हाला दिलासा मिळाला. वीणा वर्ल्ड टूर मॅनेजर्स, इव्हेंट टीम, एच आर अॅडमिनिस्ट्रेशन, मार्केटिंग, प्रोजेक्ट टीम ने कॉर्पोरेट ऑफिसमधल्या सर्वांना सामावून घेतलं आणि आम्ही प्लॅनिंग मजबूत केलं, पण सर्वांना बर्यापैकी धाकधूक होती कारण चोवीसशे जणांची आरएसव्हिपी होती. म्हणजे किमान दोन हजार जणं येणार ह्याची निश्चिती झाली. सगळं काही पार पडेल नं! ह्या काळजीयुक्त मन:स्थितीत आम्ही वीणा वर्ल्ड फॅमिलीच्या स्वागताला उभे राहिलो. सकाळी साडे दहा ते सायंकाळी साडे सहापर्यंत आम्ही एकही ब्रेक न घेता, एकदाही न बसता सर्वांशी बोलत होतो, गप्पा मारीत होतो. तहानभूख विसरणं म्हणजे काय हे आम्ही ह्या दिवशी पूर्ण अनुभवलं. आनंदच इतका होता सगळ्यांना भेटण्याचा की त्यापुढे दुसरं काही दिसतच नव्हतं. रात्री आठ वाजता आम्ही मोकळे झालो. एवढाच वेळ आमची संपूर्ण कॉर्पोरेट टीम आणि टूर मॅनेजर्स टीमही उभी होती. येणार्या प्रत्येक कुटुंबाला हे डीपार्टमेंट काय करतं, कसं काम चालतं इथे, ऑफिसमध्ये भिंतीवर लटकलेल्या वेगवेगळ्या प्रिन्सिपल्सचा रोजच्या कामात आम्ही कसा उपयोग करतो हे समजावून देत होते. काही-काही डीपार्टमेंट्समध्ये गेम्सची सोय केली होती. बच्चे कंपनी खूश होतीच पण मोठ्यांनीही वीणा वर्ल्डविषयी माहिती घेता घेता लहान होऊन त्या खेळांचाही आस्वाद घेतला. प्रत्येक कुटुंब अंदाजे चार ते पाच तास वीणा वर्ल्डच्या कार्यालयात होतं. त्यांच्या येण्याने आमचं कार्यालय पुनित तर झालंच पण एवढे शुभाशीर्वाद मिळाले की पुढची वाटचाल सुकर होईल ह्याबद्दल मनात कोणताही संदेह राहिला नाही. दोन हजारहून अधिक मंडळी आली आणि वीणा वर्ल्ड टीमच्या बारीक सारीक गोष्टींची दखल घेऊन केलेल्या आयोजनाने दुसरा फॅमिली डे आनंदात- समाधानात पार पडला. बर्याच कुटुंबियांनी जाताना भेटूयाच पुढच्या फॅमिली डे च्या वेळी असा निरोप घेतला आणि आम्ही सर्वजण लुकिंग फॉरवर्ड टू अवर थर्ड फॅमिली डे इन ट्वेन्टी ट्वेन्टी टू! म्हणत समाधानाने घरी निघालो.
आपलं अर्ध आयुष्य हे आपल्या कार्यालयात जातं. जसं आपण घर एक मंदीर म्हणतो तसंच कार्यालयही एखाद्या मंदिरासमान असायला हवं, ते हेवे-दावे-मत्सर-डावपेच ह्यापासून दूर असावं, स्वच्छ, नीटनेटके, उत्साहवर्धक असावं, स्वत:ची प्रगती करताना दुसर्यालाही आपण कसे आपल्यासोबत घेऊ ही भावना सर्वांमध्ये दृढ असली पाहिजे ह्या दृष्टीने आमचे प्रयत्न सुरू आहेत. सकाळी कार्यालयात येताना उत्साह आणि संध्याकाळी कार्यालयातून बाहेर पडताना समाधान असेल तर कौटुंबिक आयुष्यही तितकंच छान व्यथित होतं. घरात खूश तर कार्यालयात खूश आणि कार्यालयात खूश तर घरात खूश. हे खुशीचं चक्र सुरू राहिलं पाहिजे. तसं व त्यासाठीचं काम आमच्याकडूनही सतत होत राहिलं पाहिजे.
फॅमिली फर्स्ट हे नुसतं म्हणण्यासाठी नाही तर आपल्या प्रत्येकाकडून त्यादृष्टीने मन:पूर्वक प्रयत्न झाले पाहिजेत. प्रत्येक कुटुंबात एकमेकांप्रती विश्वास असेल एकमेकांविषयी सार्थ अभिमान असेल तर प्रत्येक कुटुंब, पर्यायाने समाज व देश सशक्त होईल. मदर तेरेसांनी म्हटलंय, जगात शांतता नांदण्यासाठी किंवा तुम्हाला जर जग बदलावं असं वाटत असेल तर सर्वात आधी कोणती गोष्ट तुम्ही करायला पाहिजे तर ती म्हणजे, जा आणि स्वत:च्या कुटुंबावर प्रेम करा. लेट्स डू इट होल हार्टेडली.
काही प्रातिनिधिक प्रतिक्रिया इथे देत आहोत, आमचा टूर मॅनेजर शार्दूल पेंढारकरच्या आईने हया फॅमिली डे ला चैतन्यविश्व आणि मी अनुभवलेले चैतन्य असं म्हटलं. आमच्याकडे सातार्यातील कडवे बुद्रुकच्या पन्हाळे कुटुंबीयांचे बरेच टीम मेंबर्स आहेत. त्यांचं सर्वांचं भलंमोठ कुटुंब आलं होतं, त्यांनी आमच्या घरातले सर्वात जास्त मेंबर्स इंडियन आर्मीत आहेत आणि दुसरे वीणा वर्ल्ड मध्ये असं म्हटल्यावर झालेला आनंद शब्दातीत. मनस्विनी विश्वासराव च्या वडिलांनी, कुटुंबदिन केवळ अविस्मरणीय असं म्हटलं, तर हजार माणसं एकत्र नांदणार्या एका सुखी कुटुंबाची संस्मरणीय भेट असं कविता पाटील यांनी म्हटलं. रुपाली जिगर वोरा ने लिहिलं, व्हॉट अॅन इन्क्रीडीबल डे इट वॉज!, कुणी म्हणालं, परफेक्टली स्पेन्ट संडे, तर कुणी प्रेम विश्वास आणि अभिमानाचं ठिकाण... ह्या सारख्या शेकडो प्रतिक्रियांनी आमचा मन की बात वाला व्हाईट बोर्ड भरून गेला. आता पुढील फॅमिली डे पर्यंत आम्हाला या सर्व प्रतिक्रिया जबाबदार्या पेलण्याचं, चॅलेंजेस स्विकारण्याचं आणि आत्मविश्वास वाढविण्याचं बळ देतील.
Post your Comment
Please let us know your thoughts on this story by leaving a comment.