ऑनलाईन शॉपिंगची क्रेझ आल्यावर मी पण एकदा त्या शॉपिंग साईटवर गेले. वाह! व्हॉट अ क्रिएटिव्हिटी! कसलं मस्त डिझाइन आहे? वॉव, ह्यांनी किती मस्त प्रॅक्टिकल सोल्युशन दिलंय असं म्हणत त्या डिस्पेल्जच्या मोहाला बळी पडत सहा ते सात तास खर्चून दहा वस्तू घेतल्या. काही दिवसांनी लक्षात आलं ह्यातली एकही वस्तू वापरली गेली नाहीये. तशाच्या तशा त्या वस्तू उचलून वीणा वर्ल्ड मार्केट प्लेसवर नाममात्र किमतीला विकून टाकल्या. पुन्हा ऑनलाइन शॉपिंग साईटवर जायचं धाडस झालं नाही.
काही दिवसांपूर्वी आम्ही पुर्वी रहात असलेल्या घरी गेले होते. गेल्या सहा वर्षांत आयुष्याला एक वेगळीच गती मिळाली होती. माहीमचं हे घर खूपच जूनं झालं होतं म्हणून ते सोडलं आणि दोन वर्ष दादरला भाड्याने राहिलो. नंतर बांद्य्राला आत्ताच्या राहत्या घरात. एका घरातून दुसर्या घरात, दुसर्या घरातून तिसर्या घरात असे चलो, बॅग भरो, निकल पडो सारखे दोन तीन दिवसांत, फारतर आठवड्याभरात आम्ही स्थलांतरित झालेलो. सहा वर्षांत तीन घरं म्हणजे सहलीवर जशी हॉटेल्स बदलतो तशीची काहीशी स्थिती. घाईधावपळीत ह्या घरातून त्या घरात जाताना काय काय गोष्टी सोबत घेतल्या, काय मागे सोडल्या त्याचीही मोजदाद राहिली नाही. पण एका अर्थाने ते बरं झालं कारण आत्ता जेव्हा मी जुन्या घराला भेट दिली तेव्हा तिथली प्रत्येक गोष्ट आमच्याशी गप्पा मारीत होती, जुन्या आठवणींना उजाळा देत होती. प्रत्येक पेंटिग किंवा फोटोफ्रेम कोणत्या देशाच्या कोणत्या शहरातून आणली ते आठवताना मजा येत होती. छोटी मोठी पेंटिग्ज किंवा प्रिंट्स आणायची आणि ती शिवाजी पार्कच्या ए ए फ्रेमिंग वर्क्सकडून हव्या त्या साईजमध्ये बनवून घ्यायची आणि घरात वा ऑफिसमध्ये लावायची हा छंदच जडला होता. घराच्या आणि ऑफिसच्या सगळ्या भिंती पेंटिग्ज आणि फ्रेम्सनी भरल्यावर मला स्वत:ला आवर घालावा लागला ही गोष्ट वेगळी. त्यावेळी आमची घरं आणि ऑफिसेस आर्किटेक्ट श्री रमेश एडवणकर करायचे. त्यांच्याबरोबरच्या भटकंतीतूनच माझी इंटिरियर डीझायनिंगची आवड वाढीस लागली. ड्रॉईंगपासून घर पूर्ण होईपर्यंत सहभाग असायचा, आणि त्यामुळे सोफे, खुर्च्या, डायनिंग टेबल, स्टडी टेबल, आर्टिफॅक्टस् असं सगळं काही कोणत्या कारणामुळे त्या त्या जागी विराजमान झालेलं हे मला माहीत होतं. वीसेक वर्षांच्या वाटचालीची साक्ष त्या घरातल्या प्रत्येक वस्तूने दिली. वेळेचं भान राहिलं नाही एवढे आम्ही गतकाळात रममाण झालो. पण आता करायचं काय? ही संपूर्ण बिल्डिंग रीडेव्हलपमेंटला निघालेली. ह्या वस्तूंना तिलांजली देता येत नव्हती पण ठेवायच्या कुठे? ज्या स्टडी टेबलवर मी वीस वर्ष रविवारच्या वर्तमानपत्रांतली लेखमाला लिहीली ते मला हवं होतं. ज्या डायनिंग टेबलवर आणि सोफ्यावर वीणा वर्ल्डच्या सुरुवातीच्या दिवसांत जेव्हा घरात ऑफिस होतं तेव्हा आम्ही पस्तीस- पन्नास जणांनी कधी जेवणासाठी, कधी मिटींग्जसाठी, कधी स्टॅट्रेजी म्हणून तर कधी गप्पागोष्टी टाईमपाससाठी वापर केला ते असंच कसं सोडून द्यायचं. सध्याच्या आमच्या कॉर्पोरेट ऑफिसवर नजर टाकली आणि ह्यातल्या काही वस्तू अँटिक लूकच्या नावाखाली तिथे आणल्या. वुई शूड नेव्हर फर्गेट अवर रूट्स प्रमाणे ह्या वस्तू छान छान आठवणींसोबत आमचे पाय जमिनीवर ठेवायला मदत करतात. पण अशा काही गोष्टीच आम्ही ह्या कार्यालयात ठेवू शकलो. बाकीच्या वस्तूंचं करायचं काय हा प्रश्न होताच.
वीणा वर्ल्ड झाल्यानंतर आम्ही एक गोष्ट ठरवली होती ती म्हणजे आपल्याकडे गोडाऊन हा प्रकार नसणार. साठवणूक करायची नाही. जेवढं हवं तेवढंच आणायचं, जेव्हा हवं तेव्हाच आणायचं, जस्ट इन टाइम स्टॅ्रटेजी. एखाद्या गोष्टीची आपली गरज संपली असेल तर ज्याला त्या गोष्टीची गरज आहे त्याला ती द्यायची, फुकट नव्हे, त्याला किमान एक रुपयाचं तरी मूल्य लावायचं. म्हणजे घेणार्याला उगाचच उपकाराचं ओझं नाही आणि देणार्याला दान दिलं ही भावना नाही. हो, ह्या दोन्ही गोष्टी त्रासदायकच. आणखी एक म्हणजे, अमूक एक गोष्ट कोणी घेतली बरं? ह्याचा मागही काढायला जायचं नाही. आपला त्या गोष्टीवरचा हक्क-प्रेम-आठवणी सगळं सोडून द्यायचं. अक्षरश: निर्विकार व्हायचं. सो, आता ह्या उरलेल्या गोष्टींना लवकरच तिथून हलवायचं होतं. वीणा वर्ल्डचं संपूर्ण अॅडमिनिस्ट्रेशन सांभाळणार्या दर्शना घोरपडे, दिपाली चंपानेरकर आणि शेखर सावंतला बोलावलं, आणि त्यांना म्हटलं, नीलने उपलब्ध करून दिलेल्या मार्केटप्लेसवर आपण अधूनमधून व्हर्च्युअल सेल लावत असतोच पण ह्यावेळी वर्षाच्या अखेरीस थोडं वेगळं काहीतरी करूया. ह्या जुन्या घरातल्या सगळ्या वस्तू छान आहेत. त्याचा कुणालातरी मस्त उपयोग होऊ शकतो. आपल्या टेरेसवर आपण ह्याचा सेल लावू शकतो का? त्यातून येणारे पैसे वेलफेअरला वापरा. मात्र एक सावधगिरीची सूचना द्या सर्वांना की ह्या गराज सेल मधून तुमच्या गरजेचीच वस्तू घ्या. वस्तू छान आहे म्हणून गरज नसताना घेऊ नका, नाहीतर त्यांच्या घराचं गोडाऊन व्हायचं, ते आपल्याला नकोय. आणखी एक करूया आता वर्ष संपत आलंय आपल्या वीणा वर्ल्ड टीम मेंबर्सकडेपण अशा अनेक गरज सरलेल्या वस्तू असतील, ज्या चांगल्या स्थितीत असतील, ज्याचा दुसर्याला उपयोग होऊ शकेल त्या त्यांना हवं असेल तर ते ह्या सेलमध्ये लावू शकतात. खराब वस्तूंना प्रवेश देऊ नका. ह्याने काय होईल तर आपला प्रत्येक टीम मेंबर आपल्या घराकडे- त्यातील वस्तूकडे नव्याने बघेल. प्रत्येक वस्तूला प्रश्न विचारेल. हवीय? की नकोय? रोजच्या धकाधकीत घराकडे असं बघायला वेळच कुठे मिळतो? घरातल्या नको असलेल्या गोष्टी बाहेर निघाल्या की त्याच घरात, त्याच कपाटात, त्याच स्टडी टेबलवर आपल्याला अधिक जागा मिळेल. दाटीवाटीत गुदमरलेल्या वस्तू मोकळ्या जागेत जरा श्वास घेतील. आपलं घर आपल्याला आणखी प्रसन्न वाटेल. मनाला कदाचित आलेली मरगळ दूर व्हायला अंशत: मदत होईल. घराच्या व्यवस्थापनाच्या बाबतीत असं म्हटलं जातं की, एखादी गोष्ट मागितल्यावर ती जर तीन मिनिटांच्या आत मिळाली तर ते घर सुव्यवस्थित- ऑर्गनाइज्ड. आपण आपल्या घराची स्वपरिक्षा ह्यावरून करू शकतो. नवीन वर्ष सुरू होतेय, त्याचं स्वागत अशा नीटनेटक्या घराने होणार असेल तर ते वर्षही उत्साहाने-आनंदाने त्या घरात वास्तव्य करेल.
भारतातच नव्हे तर जागत सर्वत्र मंदीसदृश परिस्थिती आहे. बाजारपेठेतली त्याची कारणं वेगवेगळी असतील. पण त्यासंबंधी व्हायरल झालेली एक मजेशीर पोस्ट भारी आवडली. बिस्किटांचा खप कमी झाला, रेस्टॉरंट इंडस्ट्री कधी नव्हे त्या कठीण अवस्थेतून जातेय, ऑटो इंटस्ट्री सतत निचांक दाखवतेय& ह्यांच कारण आहे डॉक्टर दिक्षित, डावरे, दिवेकर, यू ट्युबवरचे अनेक मोटीवेशनल गुरू जे सतत कमी खा, सकस खा, प्रोसेस्ड फूड खाऊ नका, एका जागी बसून राहू नका, गाडीचा वापर न करता चाला, धावा& असा उद्घोष करीत असतात. ज्यांच्यामुळे बर्यापैकी लोकं स्वत:च्या आरोग्याकडे बघायला लागलीयत. अरबट चरबट खाण्याकडचा कल कमी झालाय. आमचंच उदाहरण घ्यायचं तर आम्ही मिटिंगरूममध्ये शेंगदाणे, चणे, कुरमूरे, सुकामेवा ह्याचे डबे भरून ठेवायचो, संध्याकाळी सर्वांसाठी नाश्ता असायचा. हे सगळं बंद केलं. नाश्त्याचे पैसे प्रत्येक टीम मेंबरच्या अकाउंटला महिन्याच्या शेवटी सोडेक्सो कुपनद्वारे जमा केले. आणि खरंच कधीही- काहीही खाण्याला चाप बसला. टीमही चांगल्या प्रकारे हेल्थकाँशस व्हायला लागली. पहिल्यांदा आमच्या आयटी मॅनेजर वैभवी सोमणने पुढाकार घेऊन, स्वत:च वजन कमी करून, आणखी निरोगी बनून दाखवलं कोणत्याही औषधांशिवाय आणि ती बर्याच जणांचं इन्स्पिरेशन बनली. पुढची पिढी तर बर्यापैकी हेल्थकाँशस आहे. आमचे नील आणि राज रोज जीमला नित्यनेमाने जाताना बघून माझं आईचं मन त्यांच्याप्रतीच्या आदराने भरून येतं. जोक अपार्ट पण ह्या मिलेनीयल्सचं थिंकिंगच वेगळं आहे.
कोणत्याही गोष्टीचा हव्यास नको, हाव नको, खाली हाथ आये थे खाली हाथ जाना है। हे कानीकपाळी ऐकल्यावर आम्हाला सद्बुध्दी सुचली आणि आम्ही भौतिक गोष्टींचा हव्यास महत्प्रयासाने कमी कमी केला. पण ही, नवी पिढी म्हणतेय, व्हाय वुई नीड अ कार? उबर ओला आहेत नं? व्हाय स्पेंड ऑन एक्स्पेन्सिव्ह कार्स? कुणाला दाखवायच्यात? बिझनेस वाढवूया! घर विकत घेऊन मोठ्या कर्जाचा डोंगर कशाला उचलायचा? भाड्याने घ्यायचं घर, दर तीन वर्षांनी एका नवीन घरात जायचं, नवा परिसर-नवा शेजार, एन्जॉय लाइफ! हूsss घरही भाड्याचं हा विचार पचायला थोडा कठीण आहे, पण साधू-संतांनी आणि ऋषिमूनींनी हेच तर हजारो वर्षांपासून आपल्याला सांगितलंय, आम्ही विसरलो पण पुढची पिढी तोच विचार थोड्या वेगळ्या पद्धतीने आम्हाला सांगत होती. वाहन-उद्योग-बांधकाम क्षेत्राच्या मंदीचं तरूण पिढीची विचारधारा हे ही एक कारण आहे.
नवीन वर्ष काही दिवसांत सुरू होईल. स्लीक- स्लिम-फॅट फ्री-स्ट्रेस फ्री हा मंत्र अवलंबूया. पुर्वी घरांमध्ये अवजड एक्स्पेन्सिव्ह फर्निचर पीसेस असायचे. आता सर्वत्र नेकेड होम्सची क्रेझ आहे. आवश्यकता आहे, गरज आहे तेवढ्याच वस्तू, त्यांचं डिझायनही एकदम स्लीक. घर माणसांसाठी आहे, फर्निचरसाठी नाही तेव्हा जेवढं मोकळं ठेवता येईल तेवढं ठेवूया ह्यावर भर आला. थोडक्यात घरात साचलेलं फॅट कमी करूया हा विचार जोर धरू लागला. विमानातल्या खुर्च्यांवर नजर टाका,
त्याही एकदम स्लीक झाल्यात. सगळीकडे वजन कमी करण्याची शर्यत. माणसांमध्येही वजन कमी करण्याचा आटोकाट प्रयत्न सुरू आहे अर्थात शरीरातलं फॅट कमी झालंच पाहिजे, तीच आहे निरोगी आरोग्याची गुरुकिल्ली, हे एखाद्या चळवळीसारखं जनमानसात आत्मसात व्हायला लागलं. सर सलामत तो पगडी पचास हे अनेकांनी स्वत:च्या गळी उतरवलं आणि त्यांना फायदा झाला.घरातलं-शरीरातलं फॅट कमी केल्यावर मनावर चढलेलं फॅट कमी करणं गरजेचं होतं. मनावर आघात करणारे नकोसे विचार, गतकाळातील आठवणी, राग-मत्सर-द्वेष ह्या सगळ्याचं उच्चाटन करून नव्या कोर्या मनाने नव्या वर्षाचं स्वागत मला करायचंय. आय अॅम रेडी टू टेक ऑन द वर्ल्ड! लेट्स लिव्ह अ फॅट फ्री, स्ट्रेस फ्री लाईफ!
Post your Comment
Please let us know your thoughts on this story by leaving a comment.