“ इथेही आपणच लिडरशीप घेतली ? ” , सुन्न होऊन अक्षरशः डोक्याला हात लावून बसलेलो असताना विभूती चुरीच्या या वाक्याने त्या वातावरणातही हास्याची लकेर उमटली.नऊ मार्चला आमचा टूर मॅनेजर मेघराज राऊत ह्याला पुण्याच्या नायडू हॉस्पिटलमधून फोन आला, ‘ तुम्ही ज्या सहलीला जाऊन आलात,त्यातील तीनजण कोरोना पॉझिटिव्ह निघाले आहेत,या सहलीतील पर्यटकांची यादी आम्हाला हवी आहे’.मेघराजने विवेक कोचरेकरला फोन करुन उठवलं, मग आम्ही आठ दहा जणं कॉन्फरन्स कॉलवर आलो. आमची गेस्ट रिलेशन मॅनेजर इशिता शहाने डॉक्टरांना फोन लावला. एक मार्चला परत आलेली चाळीस जणांची टूर वीणा वर्ल्डचीच होती,त्यामुळे हा फोन खराच असणार हे नव्व्याण्णव टक्के जाणवत होतं,पण एक टक्का आशा असते आपल्याला की हा फोन खरा नसेल तर पुढचा प्रसंग टळेल.कारण एव्हाना आमच्या डोळ्यासमोर सर्व टि व्ही चॅनल्स,वर्तमानपत्रं,सोशल मिडिया ह्यावर उद्या वीणा वर्ल्ड नको त्या कारणासाठी अग्रभागी असल्याच्या बातम्या दिसायला लागल्या होत्या.डॉक्टरांशी फोन झाला,बातमी खरी होती,पुणे म्युन्सिपल कॉर्पोरेशनचे डॉ. वावरे यांच्याकडे सर्व पर्यटकांची यादी आणि सहलीचा कार्यक्रम इशिताने पाठवून दिला. आम्हाला रात्री दिसलेल्या बातम्या सकाळी प्रत्यक्षात अवतरल्या.महाराष्ट्रातला पहिला कोरोनाबाधीत रुग्ण दुबईहून ट्रान्सपोर्ट झाला होता, तो वीणा वर्ल्डच्या टूरमधून आला होता.हा चाळीस जणांचा ग्रुप होता.ही बातमी टि व्ही चॅनल्सवर दोन दिवस प्रामुख्याने दिसत राहिली. वृत्तपत्रांनी मात्र बऱ्यापैकी आमचा नामोल्लेख टाळला होता.पण बातमीच एव्हढी सनसनाटी होती की महाराष्ट्राशी निगडीत असलेल्या संपूर्ण जगताला एव्हाना हे माहीत झालं होतं.
त्यानंतरचे दोन आठवडे आमच्या संपूर्ण टीमसाठी अतिशय कठीण गेले. कोणता टि व्ही चॅनल वीणा वर्ल्डचं नाव सारखं सारखं प्रसारित करतोय, सोशल मिडियावर कोण काय बोलतोय ह्याच्या बातम्या एकमेकांना सांगण्यात टीम व्यस्त झाली. त्यांना या काळजीयुक्त हताश मानसिकतेतून बाहेर काढणं महत्वाचं होतं. त्याचंही बरोबर होतं,गेली सात वर्षं प्रत्येकाने मेहनत करुन भारतीय पर्यटकांसाठी वीणा वर्ल्ड नावाचा एक भक्कम ब्रँड उभा केला होता.त्यावर या सतत प्रसारीत होणाऱ्या बातम्यांमुळे शिंतोडे उडत होते.
‘ बातम्या बघू नका,सोशल मिडियावर जाऊ नका, जे काही डॅमेज व्हायचंय ते झालंय आता मनाने खचू नका... ’ हे मी त्यांना सांगत होते पण ते अरण्यरुदन होतं हे मलाही कळत होतं.हे सगळं सुरू असतानाच कुणीतरी नतद्रष्टाने खोडसाळपणा केला आणि जी पर्यटकांची कॉन्फिडेन्शियल यादी आम्ही हॉस्पिटलला दिली होती,ती डॉक्टर्स आणि अधिकारीवर्गाच्या नकळत व्हायरल केली.आपण किती मोठं पाप करतोय हे त्याच्या लक्षात आलं नसेल ? ही लीस्ट व्हायरल झाल्यावर ह्या सहलीतील चाळीस पर्यटकांपैकी अनेकांना इतकी मानहानी सहन करावी लागली की त्याचं दुःख आणि मनस्ताप ह्याची तीव्रता कोरोना आजारापेक्षा भयानक होती. जणू सहलीला जाऊन त्यांनी एखादा अपराध केला होता.टिव्हीवर- वृत्तपत्रात त्यांना वाळीत टाकल्याच्या बातम्या यायला लागल्यावर आम्ही अपराधीपणाच्या भावनेनं दिवसागणिक खचत होतो.‘हे विश्वची माझे घर ’ म्हणणाऱ्या आणि जगणाऱ्या नव्या पिढीला हा प्रकारच माहीत नव्हता. जो आत्ता बातम्यांमधून त्यांना कळत होता.जेंव्हा हा प्रकार वाढत गेला तेंव्हा पुण्याचे डिव्हिजनल कमिशनर श्री.दीपक म्हैसेकरजींनी अतिशय चांगली गोष्ट केली ती म्हणजे एका पत्रकार परिषदेत ही लीस्ट व्हायरल करणाऱ्यांवर सक्त कारवाई करण्याची घोषणा केली, तसंच चुकीच्या बातम्या वा अफवा व्हायरल करणाऱ्यांवरही सक्त नजर ठेवून आहोत ’ हे ही खडसावले.
एव्हाना आमच्या या सहलीतून आलेल्या आठ जणांना कोरोना पॉझिटिव्ह म्हणून घोषित केलं होतं. आणि महाराष्ट्रही त्यामुळे देशात कोविड-19 मध्ये अव्वल नंबरवर आला होता.आता काळजी सर्वांनाच वाटत होती.दुबईला त्या महिन्यात भरपूर टूर्स जाऊन आल्या होत्या. शेकडो प्रवासी आमच्या त्या सहलींचा आनंद घेऊन परत आले होते.नेमके ह्या सहलीचे प्रवासीच का पॉझिटिव्ह निघत होते ह्याचा काहीही क्लू मिळत नव्हता.माननीय मुख्यमंत्री श्री.उध्दवजी ठाकरेंनीही अतिशय सहृदयतेनं चौकशी केली. किती सहली अजून सुरू आहेत? किती पर्यटक देशाबाहेर आहेत ? हे विचारून पर्यटकांना भारतात आल्यावर व्यवस्थित काळजी घ्यायला सांगण्याच्या सुचनाही दिल्या, तसेच महाराष्ट्राचे प्रिन्सिपल हेल्थ सेक्रेटरी श्री.प्रदीपजी व्यास ह्यांच्या संपर्कात राहायला सांगितले.
ह्यानंतर आणखी एक संकट उभं राहिलं, ते म्हणजे महाराष्ट्रातल्या आमच्या व इतर पर्यटन संस्थांच्या ऑफिसेसमध्ये स्थानिक अधिकारीवर्ग येऊन फेब्रुवारी आणि मार्चमध्ये परदेश सहलीला जाऊन आलेल्या पर्यटकांची यादी आणि त्यांचे कॉन्टॅक्ट डिटेल्स लागलीच द्या अन्यथा कायदेशीर कारवाईला सामोरं जावं लागेल ’ हे सांगू लागले.म्हणजे ते त्यांच कामच होतं, कोविड -19 ला रोखण्यासाठीची ती जबाबदारी होती.पण अशी दिलेली एक लीस्ट व्हायरल होऊन,आमच्या पर्यटकांना प्रचंड मानसिक ताप झाला होता.ह्या लीस्ट व्हायरल झाल्या तर? ही भिती होती. डोकं सुन्न झालं होतं.शेवटी श्री.प्रदीपजी व्यास यांना परिस्थिती कथन केली.त्यावेळी त्या सर्वांवर असलेल्या प्रचंड ताणाची कल्पना होती,तरिही त्यांनी म्हटलं ‘लिस्ट हव्या तर आहेत पण तुम्ही त्या माझ्याकडे पाठवा आणि तसं त्या अधिकाऱ्यांना सांगा,कुणाला लिस्ट हवी असेल तर आमच्या कार्यालयातून दिली जाईल.’त्याबरहुकूम आम्ही बऱ्याचशा सिटीवाइज लिस्टस तयार करुन त्यांच्याकडे पाठवल्या.
तणावपूर्ण परिस्थितीत वीणा वर्ल्डचं नाव सर्वत्र वेगळ्या कारणासाठी दुमदूमत असताना आणि आमच्या पायाखालची जमिन सरकत असताना माननीय मुख्यमंत्रीजींचा कॉल दिलासा देऊन गेला.प्रिन्सिपल हेल्थ सेक्रेटरींच कार्यालय आणि पुण्याचं डिव्हिजनल कमिशनरचं कार्यालय ह्यांच्याकडून मिळणारं सहकार्य मनाचं बळ वाढवित गेलं.
हे सगळं घडत असताना ‘वीणा वर्ल्डने कोरोना आणला महाराष्ट्रात यांना वाळीत टाका’ ‘ह्यांना बघून घेतलं पाहिजे’अशा अनेक बातम्यांनी सोशल मिडिया भरुन गेला. एका हेमराज नावाच्या व्यक्तिने तर ‘हरामखोर आहेत साले ... ’ अशी स्वतःच्या नावानिशी पोस्ट टाकली फेसबुकवर. आश्चर्याची गोष्ट म्हणजे ही व्यक्ती त्याच्या फेसबुक अकाउंटच्या महितीनुसार मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स - गव्हर्नमेंट ऑफ इंडियामध्ये काम करतेय.जेंव्हा सरकारी यंत्रणा आम्हाला समजून घेत होती तेंव्हा एक जबाबदार कार्यालयातील व्यक्ती असं कसं लिहू शकते ह्याचं वाईट वाटत होतं. एव्हढी टोकाची खदखद ह्या व्यक्तींच्या मनात का असते ? हा वीणावर्ल्डविषयीचा राग होता, दुसऱ्यांच्या यशाविषयीची असूया होती की परदेशी जाणाऱ्या व्यक्तिंच्या विषयीचा दुस्वास होता ?
ह्या सर्व घडामोडींत काही काळापुरती का होईना उमेद ढासळत होती तरिही काही चांगल्या गोष्टीही घडत होत्या.आमचे पर्यटक जे हॉस्पिटलमध्ये होते त्यांची प्रकृती स्थीर असल्याची खबर मिळत होती.आपल्या माननीय महापौर सौ.किशोरीताई पेडणेकर ह्यांच्याशी ओळख झाली. त्यांच्याकडे एव्हाना आमच्याविषयी अनेक तक्रारी गेल्या होत्या.प्रत्येक तक्रार निवारण करण्यासाठी ती तक्रार ज्यांच्याविषयी आहे त्यांच्यापर्यंत पोहोचून त्यात त्यांनी लक्ष घालून,ती सोडवण्याची त्यांची कार्यशैली आवडली.त्यांना वीणा वर्ल्डच नव्हे तर सर्वच पर्यटन संस्थांची,विमान कंपन्यांची,आत्ताच्या आणिबाणीच्या परिस्थितीत त्यांनी घेतलेल्या भूमिकेची,प्रत्येक छोटी-मोठी पर्यटन संस्था त्यांच्या परीने जनरेट करीत असलेल्या एम्प्लॉयमेंटची परिस्थिती विशद केली.आणि त्यांना आम्ही वीणा वर्ल्डद्वारे प्रसारित केलेली जाहीर नोटीसही पाठवली.आम्ही एक वर्षाचा म्हणजे एकतीस मार्च दोन हजार एकवीस पर्यंतचा कालावधी सहल पुढे ढकलण्यासाठी दिलाय व तीच ओरिजीनल सहलीची किंमतही कमिट केलीय. आत्ताचे ॲक्च्युअल खर्च व अडकलेले पैसे ह्या सोबत नॉमिनल टूर ट्रान्सफर चार्जेस लावून उरलेले पैसे पर्यटकांच्या क्रेडिट शेलमध्ये ठेवलेले आहेत.आता सर्वत्रच बंद केले आहे,त्यामुळे जेंव्हा सर्व सुरू होईल तेंव्हा ह्या चार्जेस मध्ये आणखी काही परतावा मिळाला तर तोही पर्यटकांच्या क्रेडिट शेलमध्ये जमा केला जाईल हे मी त्यांना सांगितल्यावर त्या म्हणाल्या,‘ माझंही म्हणणं तेच आहे,रिफंड नको पण पुढे तीच सहल करता आली पाहिजे जास्त आर्थिक तोशिस न लावता.’त्यांनी व्हॉट्स अप फॉरवर्ड केलेल्या व्यक्तीचा नंबर मला पाठवला,त्यांच्याशीही मी बोलले. श्री.लक्ष्मण सानप,पुणे हे तर आमचे हितचिंतक.माझा एखादा लेख आवडला तर आवर्जून कळवणार. त्यांच्याशी इमेल मैत्री होती.ते म्हणाले माझी मार्चमधली टूर होती,ती जाणार की नाही ही ॲन्झायटी होती. तुमच्या कार्यालयात विचारलं तर ‘टूर ऑन आहे म्हणतात आणि कॅन्सल केली तर एव्ह्ढे पैसे जातील असं म्हणतात.’ मी म्हटलं,‘ बरोबरच होतं,ॲन्झायटी संपूर्ण वातावरणातच होती आणि आहे. नॉन अफेक्टेड देश आमच्याकडे सर्व आलबेल आहे, तुम्ही या हे म्हणत होते.प्रत्येक एअरलाइन जो पर्यंत चालू आहोत तोपर्यंत कॅन्सलेशन फुल्ल लागणार म्हणत होत्या. अशा परिस्थितीत आम्हीही पर्यटकांना तेच सांगत होतो.गोंधळाची परिस्थिती सर्वत्रच आहे.जपान त्यांच्याकडे ऑलिम्पिक यावर्षीच व्हावं म्हणून कसं धडपडत होतं हे आपण पाहिलंय. अमेरिकेनं - महासत्तेनं आधी किती लाइटली घेतलंय हे ही अनुभवलंय.ब्राझिल ह्याला आत्तापर्यंत साधा एन्फ्लुएन्झा म्हणत होतं.ही ‘न भूतोः ’ परिस्थीती आहे.आताही एअरलाइन्स पैसे परत देत नाहीयेत तर ते फ्युचरसाठी क्रेडिट शेल मध्ये ठेवत आहेत. काहींनी ३१ जुलै २०२० तारीख दिलीय त्याच्या पुनर्वापरासाठी तर काहींनी सप्टेंबर वा डिसेंबर पर्यंतची.आणखीही त्यांनी त्यावेळचा फेअरडिफरन्स भरावा लागेल हे ही स्पष्ट केलंय, असं असतानाही आम्ही मात्र त्याच सहलखर्चाची आणि एक वर्षाची जबाबदारी घेतलीय. हे आम्ही १७ व १८ मार्च रोजी वृत्तपत्रांमध्ये प्रसिध्द केलेल्या जाहीर नोटिस नंबर -2 मध्ये लिहीले आहे.आम्ही आमच्या पर्यटकांसाठी योग्य तेच करणार याची खात्री असू द्या. आणि म्हणून तर पर्यटकपण एव्हढं प्रेम करतात.फेब्रुवारी-मार्चमध्ये भारतातून जास्तीत जास्त पर्यटक वीणा वर्ल्डतर्फे जाऊन आले हे त्याचंच फलित होतं.जे जाऊ शकले नाहीत त्यात तुमची एक फॅमिली होती. भविष्यात जेंव्हा परिस्थिती निवळेल तेंव्हा तुमची सहल तेव्हढ्याच आनंदात पार पडेल याची खात्री बाळगा.’ श्री.सानप ह्यांच्याशी बराच वेळ बोलले.हे सगळं संभाषण इथे द्यायचं कारण म्हणजे हीच भावना अनेकांची असणार आणि त्या सगळ्यांसाठी हे संभाषण प्रातिनिधिक ठरेल.
एप्रिल- मे म्हणजे आमच्यासाठी आणि सगळ्या पर्यटनक्षेत्रासाठी मोस्ट बिझिएस्ट असा सिझन. संपूर्ण वीणा वर्ल्ड टीम बाह्या सरसावून रात्रंदिवस काम करत असते.समरच्या सुट्ट्या लागल्या की दिवसाला वीणा वर्ल्डच्या शंभरपेक्षा जास्त सहली दररोज मुंबई एअरपोर्टवरुन देश-विदेशात प्रस्थान करत असतात.आमचे टूर मॅनेजर्स पर्यटकांना त्यांच्या ड्रीम डेस्टिनेशनला नेऊन त्यांना अपेक्षित आनंद देण्यासाठी प्रचंड उत्साहात असतात.त्यांच्यासाठी हे वर्षातले सर्वात महत्वाचे महिने असतात. दे दणादण अशी २०२० ची रेकॉर्डब्रेक सुरवात झाली असताना कोविड -19 ने टूरिझम इंडस्ट्री,हॉटेल्स इंडस्ट्री,एव्हिएशन इंडस्ट्रीला पार आडवं करुन टाकलं आणि आता तर प्रत्येक इंडस्ट्री ह्या संकटाची शिकार बनतेय. असो. ह्या वातावरणात समर व्हेकेशनला जाणाऱ्या सहली आपल्या सरकारची वा जिथं जायचं त्या देशाची ॲडव्हायझरी आल्याने पोस्टपोन म्हणजे पुढे ढलकाव्या लागल्या आहेत.आमच्या जाहीर नोटिसद्वारे आम्ही ह्याची माहिती सर्वांपर्यंत पोहोचवली आणि आमच्याकडे युध्दपातळीवर लॉकडाऊन झाल्या नंतरच्या सर्व सहलींच्या पर्यटकांशी कम्युनिकेशन करणं सुरू झालं.आजही आमची मोठी टीम लिमिटेड रिसोर्सेसमध्ये घरुन काम करतेय आणि पर्यटकांशी संवाद साधतेय.थोडक्यात हजारो पर्यटकांच्या आणि टूर मॅनेजर्सच्या समर व्हेकेशनमधील स्वप्नांचा चुराडा झाला.
मात्र आमचा मार्च मॅनिया संपला नव्हता.वीणा वर्ल्ड आणखी एका गोष्टीमुळे पुन्हा सोशल मिडियावर झळकलं. मार्चच्या सहलीला गेलेल्या एका निवृत्त जिल्हा न्यायाधीश आणि माजी अध्यक्ष जिल्हा ग्राहक मंच,पुणे असलेल्या व्यक्तीने ‘नाव मोठं,लक्षण खोटं’ ही पोस्ट केली होती.ती एव्हढी व्हायरल झाली की राजकीय नेते ,आमचे पर्यटक,हितचिंतक आणि नातेवाईकांनी ही पोस्ट आम्हाला पाठवली. कुणी विचारलं, ‘ हे खरं आहे का ?’, कुणी म्हटलं ‘सांभाळून राहा’, कुणी म्हणाले ‘आमचा वीणा वर्ल्डवर विश्वास आहे’.पण पोस्ट अशा तऱ्हेनं लिहिली होती की वीणा वर्ल्डवर विश्वास असणाऱ्यांच्या मनातही शंका येईल.ही पोस्ट सिंगापूर-थायलंड-मलेशिया ह्या वीणावर्ल्डच्या अतिशय लोकप्रिय अशा सहली विषयी होती.हजारो पर्यटकांनी ह्या सहलीचा आनंद उपभोगलाय,ही सहल फेल जाणं शक्यच नाही.टूर अतिशय व्यवस्थित सुरू होती,पर्यटकही आनंदात होते.सर्व स्थलदर्शन कार्यक्रमानुसार व्यवस्थित पार पडत होतं.मलेशिया करुन शेवटच्या तीन दिवसांसाठी ही सहल सिंगापूरकडे निघाली असताना बातमी आली की सिंगापूर बॉर्डर सिल करतंय.नो एंट्री.अशावेळी एअरलाइनच्या सहकार्याने ही सहल आम्ही सिंगापूरला न नेता मुंबईला परत आणली. राहिलेल्या सिंगापूरचं काय करायचं याविषयी आम्ही सिंगापूर पार्टनर्सना कळवायला सांगितलं.ह्याचवेळी आमची एक न्यूझिलंडची सहलही सुरू होती.त्यांनाही आम्ही बावीस मार्चला इंटरनॅशनल फ्लाइट्स बंद होण्याच्या आत जादा पैसे खर्च करुन महत्प्रयासाने व्हाया दिल्ली मुंबईला आणलं.त्यातील काही ज्येष्ठ पर्यटकांना सावधानी म्हणून दिल्लीत थांबावं लागलं. ह्या सहलीतील हनिमून कपल श्री.गंधार दिग्रजकरच्या शब्दांत सांगायचं तर ‘ जगात सर्वत्र कोरोनाविषयीच्या बातम्या होत्या पण आम्ही निर्धास्त होतो कारण वीणा वर्ल्डसोबत होतो’. आणि आम्ही आमचं कर्तव्य पार पाडलं होतं,लॉकडाऊनपूर्वी त्यांना भारतात आणण्याचं. असो. तर ह्या सिंगापूरच्या व्हायरल झालेल्या आणि वीणा वर्ल्डला बदनाम करायच्या उद्देशाने लिहिलेल्या ह्या पोस्टमध्ये ह्या व्यक्तिने म्हटलंय की ‘झी २४ तास ह्या वाहिनीवर जाहीर करण्यात आले की वीणा वर्ल्डमार्फत दुबईला पाठवण्यात आलेल्या प्रवाशाचा मृत्यु कोरोना व्हायरसमुळे झाला.’ज्या व्यक्तीने जिल्हा न्यायाधिश पदावर व पुणे जिल्हा ग्राहक मंचावर काम केलंय त्या व्यक्तीने कोणताही आरोप कुणावरही करताना त्याची शहानिशा नको करायला ? लोकांचा पटकन विश्वास बसावा म्हणून यांनी वीणा वर्ल्डच्या पर्यटकाला डायरेक्ट मारून टाकलं? अशा अफवा पसरवणाऱ्यांवर ॲक्च्युअली कारवाई व्हायला पाहिजे.कोरोनामुळे कुणाचाही मृत्यु होऊ नये ही देवाला प्रार्थना करतानाच मला इथे सांगावसं वाटतं की वीणा वर्ल्डच्या त्या दुबई टूरवरून आलेले सर्व चाळीस पर्यटक आणि इतर सर्व सहलींवरुन आलेले पर्यटक सुखरुप आहेत.आणि पहिल्या बऱ्या झालेल्या आमच्या पर्यटकावर झी टि व्हीने खूप चांगली डॉक्यूमेंटरी तयार केली होती, त्यांच्या हॉस्पिटलच्या डिस्चार्जच्या दिवशी.स्वतःला प्रसिध्दी मिळवण्यासाठी आणि वीणा वर्ल्डचं नाव बदनाम करण्यासाठी ह्या जबाबदार व्यक्तीने एव्हढ्या हीन पातळीवर जावं ? ज्यावेळी आम्ही त्यांना रितसर पत्र पाठवलं तेंव्हा ‘ आता लॉकडाऊन आहे,१९ मार्च ते १२ एप्रिलपर्यंत मी क्वारंटाइनमध्ये आहे,आपण १४ एप्रिल नंतर बघू’ म्हणून त्यांचं दोन ओळींच पत्र आलं. आम्ही दुसऱ्या पत्राद्वारे जाब विचारल्यानंतर पुन्हा होम क्वारंटाइनचं कारण देऊन --- I have no personal grudge against anybody previously I went to manali tour through Veena World along with my family … अशा अर्थाचं उत्तर ही व्यक्ती पाठवते. ह्या पोस्टने वीणा वर्ल्डचं कधीही न भरून येणारं नुकसान केलंय त्याचं काय ? आमच्या वीणा वर्ल्ड परिवारातील एक हजाराहून अधिक टीम मेंबर्सचं मनोधैर्य खच्ची केलंय त्याचं काय ? एक उद्योग उभारायला - अनेकांच्या उपजिविकेचं साधन निर्माण करायला अनेक वर्षांची मेहनत लागते. अपार कष्ट उपसावे लागतात आणि वीणा वर्ल्ड तसंच सर्वांच्या परिश्रमातून निर्माण झालंय. सोशल मिडिया हाती मिळालाय त्यावर काहीही लिहिण्याचं स्वातंत्र्य आहे म्हणून जबाबदारीच्या हुद्यावर काम केलेल्या व्यक्तीने असं बेजबाबदारपणे काहीही करायचं ? एखाद्या कंपनीला ऑलमोस्ट खुनी म्हणून घोषित करायचं ? एव्हढ्यावर ते थांबले नाहीत तर वाचकांची आणखी सहानुभूती मिळवण्यासाठी ‘वीणा वर्ल्डने आपल्या कर्मचारीवर्गाचीही फिकीर केली नाही ’ हे विधान केलं. आम्ही ‘लिडींग फ्रॉम द फ्रंट’ वाले लोक आहोत, मार्चच्या पहिल्या आठवड्यापर्यंत आम्हीही स्वतः प्रवास करत होतो.सिंगापूर एअरलाइन्सने आम्ही म्हणजे मी किंवा नील सोळा मार्चला सिंगापूरला जाणार होतो आणि ते आम्हाला तिथली परिस्थीती कशी व्यवस्थित आहे काय प्रिकॉशन्स घेतल्या जात आहेत हे दाखवणार होते.एअरलाइन्स काय किंवा टूरिझम बोर्डस काय किंवा आमच्यासारख्या छोट्या मोठ्या ट्रॅव्हल कंपन्या काय प्रत्येकजण येणाऱ्या संकटाला तोंड देण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करीत होते. जपान,अमेरिका,दुबई,सिंगापूर,स्वित्झर्लंडसारख्या मोठ मोठ्या देशांचाही तोच प्रयत्न होता.त्यांचच कशाला मे मध्ये युरोपला जाणारे आमचे एक पर्यटक म्हणताहेत ‘ सगळं सुरळीत असेल तर आपण जाऊया,आम्ही तयार आहोत.’अनेक पर्यटकांनी सप्टेंबरपासून सहली सुरू करा म्हणून आग्रह धरलाय.पर्यटकही धाडसी असतात. काश्मीरच्या बाबतीत अतिरेकी कारवायांची टांगती तलवार अनेक वर्षं होती तरिही पर्यटक आमच्या सहलींना गर्दी करत असत.ह्यावर्षीही साशंकता असूनही, आम्ही काश्मीरची कोणतीही जाहीरात न करता काश्मीरच्या सहली फुल्ल होत्या.पुण्याच्या पर्यटन संस्थांनी एकत्र येऊन ‘ सहली सुरू ठेवूया एव्हढ्यात कॅन्सलेशनचा निर्णय नका घेऊ’ असं निवेदन दिल्याच्या बातम्या वृत्तपत्रात आपण वाचल्या असतीलच. प्रत्येकजण आपापल्या परिने टूरिझम सुरू राहाण्यासाठी प्रयत्न करीत होते. असो. तर ही व्यक्ती जाब देण्यासाठी होम क्वारंटाइन कारण देऊन १४ एप्रिलपर्यंतचा वेळ मागत होती पण त्यांनीच त्यांच्या उत्तरादाखल लिहिलेल्या पत्रात नमूद केलेल्या १९ मार्च ते १२ एप्रिल ह्या होम क्वारंटाइनच्या काळात २३ मार्चला एव्हढी मोठी बदनामीकारक पोस्ट बनवून ती एका वेब पोर्टलला हाताशी धरून व्हायरल केलीय हे कसं ? लॉकडाऊनचा किंवा होम क्वारंटाइनचा असा तुम्हाला हवा तसा आधार तुम्ही कसा घेऊ शकता. आता ही गोष्ट आम्ही निश्चितच सिरिअसली घेतलीय आणि पुढे नेतोय.
एक प्रश्न मात्र मनात येतो ‘व्हाय वीणा वर्ल्ड ?’ लाखो प्रवासी परदेशातून भारतात ये -जा करीत होते पण महाराष्ट्राला पेशंट मिळायला वीणा वर्ल्डचीच टूर मिळावी ? आजही बालीला भारतीय हनिमून कपल्स अडकलीयत . त्यांनी ऑनलाइन पोर्टलवर बुकिंग केलं होतं,त्यांना कुणी वाली नाही,त्या कंपन्यांनाही जाब विचारणारं कुणी नाही.जगात सर्वच देशात वेगवेगळ्या देशांमधले पर्यटक अडकलेत. भारतात अडकलेल्या अमेरिकन पर्यटकांना नेण्यासाठी काल रात्री अमेरिकेनं त्यांचं विमान मुंबईत पाठवलं होतं.एअर इंडिया हे काम आपल्या अडकलेल्या भारतीय पर्यटकांसाठी करतेय.परवा ऑस्ट्रेलियात अडकलेल्या गांधी नावाच्या मुलाचा मला हृदयद्रावक मेल आलाय,‘ आम्हाला इथून सोडवा’ म्हणून.आम्ही ऑस्ट्रेलिया टूरिझम बोर्ड,तेथिल इंडियन एम्बसी व इतर संबंधितांना हे मेल फॉरवर्ड केलंय व त्यालाही शक्य ते मार्गदर्शन केलंय.एअरपोर्टवर अडकून पडलेल्या,क्रूझवर अडकलेल्या किंवा हॉटेलात अडकून पडलेल्यांच्या अनंत कहाण्या आहेत.आम्ही मात्र आमच्या सर्व पर्यटकांना व्यवस्थित भारतात आणलं.अर्थात ती आमची जबाबदारी आहे आणि आम्ही कधीच ती झटकणार नाही तरिही आमचं नाव मात्र आलं.हरकत नाही म्हणतात नं ‘देव अशांच्याच खांद्यावर ओझं देतो जे ते पेलू शकतात.’ह्यावेळी आपल्याला निवडलंय त्याने,लेट्स फेस इट ! आपले खांदे आणखी बळकट करुया.आमच्या टीममध्ये नेहमी एक गोष्ट एकमेकांना सांगत असतो ‘ आपली चूक असेल तर घाबरुया पण जेंव्हा असं कुणीतरी व्हायरल पोस्ट सारखं काहीतरी मुद्दामहून करतं त्यावेळी खचून जाऊ नका आणि घाबरुन तर मुळीच जाऊ नका. शांत राहून त्याचा सामना करुया’.
काही मंडळींनी असाही सल्ला दिला की ‘लक्ष देऊ नका सोशल मिडियाकडे,तुम्ही तुमचं काम करीत राहा.’ बरोबर आहे त्यांच काम तर आम्ही करितच राहाणार. हा साथीचा रोग पूर्वीच्या अनेक रोगांप्रमाणे काही दिवस ठाण मांडून जाणार आहे. नॉर्मल्सी आल्यावर,गव्हर्नमेंटने ग्रीन सिग्नल दिल्यावर पहिल्या सहली वीणा वर्ल्डच्याच असणार आहेत कारण आमचे पर्यटकही त्यासाठी उत्सुक आहेत. पण हा ‘वस्तुस्थिती प्रपंच ’ इथे करण्याचं कारण म्हणजे कधी कधी असं होतं की एखादी खोटी बातमी तुमच्यावर एवढ्यावेळा आदळली जाते की तेच खरं वाटायला लागतं. इथे तर अशी कथा गुंफली होती की एखादी मानसिकरित्या मजबूत नसलेली व्यक्ती किंवा संस्था आयुष्यातून उठू शकेल.
आपले माननीय पंतप्रधान संपूर्ण देशाला एकत्र करुन कोविड -19 या संकटाचा सामना करीत आहेत. महाराष्ट्र सरकारनेही झटपट सर्व गोष्टींवर कंट्रोल मिळवला. लॉकडाऊन करण्याचं पहिलं पाऊल उचलल्याने अजूनतरी कोविड-19 स्प्रेड आपल्याकडे कंट्रोलमध्ये आहे. अमेरिकेसारख्या महासत्ता असलेल्या देशाची काय स्थिती झालीयं बघानं.आपलं केंद्र शासन,राज्य शासन,महानगरपालिका,विविध हॉस्पिटल्समधील डॉक्टर्स,नर्सेस, हेल्थकेअर टीम्स,पोलिस फोर्स,सिक्युरिटी फोर्स,सफाई कर्मचारी,अत्यावश्यक सेवा देणारी मंडळी, बँक ऑफिशिअल्स आणि प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे त्यांच्या पाठीशी उभे राहाणाऱ्या सर्व सेवाभावी देवदूतांना वीणा वर्ल्डतर्फे मी मनःपूर्वक साष्टांग दंडवत घालते.आपले सर्वांचे मनापासून आभार.
आपण सर्वजण आपापल्या घरात थांबून सरकारच्या प्रयत्नांमध्ये सहभागी होऊया आणि कोविड -19 ला कंट्रोल करीत जगापुढे एक आदर्श उदाहरण ठेवूया.
स्टे होम ! स्टे काम !! स्टे सेफ !!!
Post your Comment
Please let us know your thoughts on this story by leaving a comment.