सात दिवसांच्या लेह लडाखच्या सहलीत आम्ही मोबाईलशिवाय रहायला शिकलो, असलेल्या आणि नसलेल्या खडबडीत रस्त्यांवरुन प्रवास केल्याने आमचा पेशन्स प्रचंड वाढला, खरा भारत ह्या अशा दुर्गम भागात बघायला मिळाल्याने आपण शहरात किती सुखी आहोत ह्याची जाणीव झाली. निश्चितपणे आमच्यातल्या प्रत्येकीने एकदातरी, थँक्यू गॉड फॉर एव्हरीथिंग म्हणत आपल्या सद्य परिस्थितीला धन्यवाद दिले असतील.
लेहची सहल मला कायम जमिनीवर आणते. मस्तीभरी मुशाफिरी करणार्या आणि अनेक महिलांना ती करायला लावणार्या माझ्या मनाला रिअॅलिटीची जाणीव करुन देते ही लेह लडाखची सहल. गेल्यावर्षी लेह वुमन्स स्पेशल सहलीला निघण्याआधी मी थायलंडला होते. अडीचशे महिलांना थायलंडच्या आलिशान सहलीची-तिथल्या झगमगाटाची, विलासी लाईफस्टाईलची वर्ल्डक्लास गोष्टींची ओळख करुन दिली. त्या सहलीवरुन मी आले डायरेक्ट लेहला. आलिशान हॉटेल्स-गुळगुळीत रस्ते दिमाखदार लक्झरी कोचेस ह्या सगळ्याच्या संपूर्ण विरुद्ध असं लेह आकाशात विहार करणार्या मला एकदम वास्तवात घेऊन आलं. आल्या आल्या कळलं की गेले आठ दिवस लेहमध्ये इंटरनेटच नाहीये. त्यामुळे व्हॉट्सअॅप बंद, इमेल बंद. मेल डाऊनलोड व्हायला काही सेकंदाचा वेळ लागला तरी पॅनिक होणार्या आमच्या सरावलेल्या मनाला असा संपर्क तुटणं म्हणजे आकाश कोसळल्यासारखी अवस्था. आधी बेचैन व्हायला झालं पण मग परिस्थितीची जाणीव होण्याइतपत माझी बुद्धी स्थिरावली. ज्या इथल्या लोकांना इंटरनेट चालू झालं तर शिमगा, नाहीतर जे आहे त्यात आनंद असे मानायची, त्यातच आपलं आयुष्य सुखावह करायची सवय आहे तिथे आपण आपल्या गरजा आणि त्यामुळे आपली अस्वस्थता किती वाढवून ठेवलीय? इथे लेहला इंटरनेटच नाही तर आयुष्यच सहा महिने बंद होतं. ही माणसं सहा महिने त्यांचं लडाखी आयुष्य जगतात आणि थंडीचे सहा महीने अक्षरश: स्वत:ला घरात बंदिस्त करुन घेतात किंवा चक्क दुसरीकडे बस्तान हलवितात. जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठाही मध्येमध्ये बंद होऊन जातो, मग जमिनीखाली साठवलेल्या वा सुकवलेल्या भाजीपाल्यावर निभवावं लागतं. रस्तेही कधी दरड कोसळली तर बंद. आकांडतांडव नाही की नाराजी नाही, कोणत्याही परिस्थितीत भागवायचं, जमवून घ्यायचं.
देशाच्या कानाकोपर्यातून आलेल्या आपल्या जवानांना कोणती प्रेरणा देशाच्या सीमांचं आणि देशवासियांचं रक्षण करण्यासाठी प्रवृत्त करते कोण जाणे पण लेह लडाखमध्ये सियाचिनच्या रस्त्यावर, खार्दुंगलाच्या छावण्यांमध्ये सजग असणार्या जवानांना बघून, त्यांच्या त्या खडतर आयुष्याची कल्पना करुन थिजून जायला होतं आणि त्याचबरोबर आपण किती खुजे आहोत ह्याचीही जाणीव होते.
लेह लडाखचे अजस्त्र पहाड, अव्वाच्या सव्वा पसरलेला पँगाँग लेक, मैलोनमैल पसरलेलं वाळवंट, क्षितिजापर्यंत दिसणारा रखरखीत रुक्ष प्रदेश, कधी बोचरी थंडी, अचानक गडगडणारा पाऊस तर कधी थोड्याशा तडाख्याने तुम्हाला गोर्याचं काळं करणारं रणरणतं ऊन... निसर्गाची वेगवेगळी म्हणजे अप्रतिमपासून अक्राळविक्राळ रौद्र रुपं बघून आपण स्तिमित होतोच पण निसर्गाच्या पुढे आपलं काहीही चालणार नाही हे प्रकर्षाने जाणवतं.
जुलेऽऽऽ! अरे हो विसरलेच की, हे जुलेेऽऽऽ प्रकरण म्हणजे लडाखी लोकांचा नम्र नमस्कार जेव्हा कुणीही एक दुसर्यांना भेटतात तेव्हा एकमेकांना जुलेेऽऽऽ म्हणून ग्रीट करतात. प्रथेप्रमाणे जो वयाने लहान असतो त्याने आधी जुलेेऽऽऽ म्हणायचं. लडाखी माणूस तसा नम्र, जपानी माणसासारखा सतत नम्रपणे थोडासा झुकून बोलणारा, शांत आणि सोबर, पेशन्स जणू त्यांच्या रक्तारक्तात मुरलेला. कदाचित त्यांच्या अतिखडतर अशा आयुष्याशी झगडताना तो आपोआप त्यांच्यात भिनला असावा. आपल्यालाही पेशन्स अंगात बाणवायचा असेल तर अशा खडतर आयुष्याशी-निसर्गाच्या लहरींशी चार हात करणार्या लोकांच्यात जाऊन रहावं काही दिवस, कोणत्याही स्पिरिच्युअल क्लासला जायची गरज भासणार नाही.
आज हे सगळं पुन्हा आठवायचं कारण म्हणजे मे महिना सुरू होतोय, लडाखच्या फॅमिली टूर्सही ह्या आठवड्यापासून सुरू होताहेत. मला ही वेध लागले आहेत ते वुमन्स स्पेशल लडाख सहलीचे. पाच वर्षांपूर्वी अशक्य वाटणारी ही सहल आता जणू आमच्या रुटिनचा भाग बनली आहे. वुमन्स स्पेशलसाठी लेह लडाख एक आधुनिक तीर्थक्षेत्र बनलंय. लेह लडाख हे तसं नेहमीचं प्लेझर टूरचं डेस्टिनेशन नाही बरं, पण तरीही मी जेव्हा पहिल्यांदा लडाखला गेले आणि माझी अवस्था आय वेंट, आय सॉ अॅन्ड आय फेल्ल इन लव्ह अशी झाली. तेव्हाच ठरवलं की अशा अप्रतिम ठिकाणी आमची वुमन्स स्पेशलची गँग यायलाच पाहिजे. पहिल्यांदा वुमन्स स्पेशल लेह लडाख जाहीर केल्यावर अपेक्षेप्रमाणे काही भूवया उंचावल्या आणि काहींच्या चेहर्यावर आश्चर्याची स्माईली उगवली. पण पहिल्याच वर्षी दोनशे महिलांनी लेह लडाखवर स्वारी केली आणि खात्री पटली की या टूरची गरज होती. थ्री इडियट्सपासून ते जब तक है जानपर्यंतच्या बॉलीवूडपटांतून पाहिलेल्या पँगाँग लेकच्या किनार्यावर वुमन्स स्पेशलच्या मुली (हो! वुमन्स स्पेशलवर सगळ्या मुलीच असतात) जास्त खूश झाल्या की नुब्रा व्हॅलीत डबल हम्प कॅमल राईड करताना त्यांचा उत्साह उतू जात होता हे सांगणं खरोखरच कठीण आहे. पण इतर कोणत्याही डेस्टिनेशनपेक्षा लेह लडाखची हवा आमच्या वुमन्स स्पेशलच्या गँगला अधिक आवडते हे खरं आहे.
वुमन्स स्पेशल लेह-लडाख ही आहे सात दिवस सहा रात्रींची मस्त सहल. या सहलीत आपण लेहमध्ये एकूण पाच रात्री तर नुब्रा व्हॅलीत एक रात्र निवास करतो. लेह हे पुरातन शहर 11,562 फूटांवर वसलेलं आहे. या शहरात अनेक प्राचीन इमारती पाहायला मिळतात. भारतीय संस्कृतीचा उगमस्रोत मानल्या जाणार्या सिंधू नदीच्या काठावर हे शहर वसलेलं आहे. या शहरालगतच 555 वर्षांपूर्वी बांधलेला श्येय पॅलेस आहे. या प्राचीन ऐतिहासिक वास्तूप्रमाणेच पर्यटकांचे लक्ष वेधून घेणारी लेह मधली आधुनिक वास्तू म्हणजे जपानमधील पीस पॅगोडा मिशनतर्फे उभारलेला शांती स्तूप. हा स्तूप उंचावर आहे, त्यामुळे तिथून लेह शहराचे विहंगम दर्शन होतं. 1991 मध्ये सध्याचे म्हणजे चौदावे दलाइ लामा यांच्या हस्ते या शांती स्तूपाचे उद्घाटन करण्यात आले. या स्तूपाच्या मध्यभागी बुध्दाची सुवर्ण प्रतिमा आहे. लिटील तिबेट इन इंडिया म्हणून जगभरात प्रसिध्द असलेल्या लडाखमध्ये बौध्द धर्म व्यवस्थित रुजला तो सातव्या-आठव्या शतकात. दलाइ लामा ज्या पंथाचे प्रमुख आहेत त्या गेलुग्पा म्हणजेच येलो हॅट पंथाची लडाखमधली प्रमुख मॉनेस्ट्री म्हणजे लेह शहराजवळची ठिकसे मॉनेस्ट्री. डोंगर उतारावरची ही अनेक स्तरीय मॉनेस्ट्री लांबून बघताना ल्हासा मधल्या पोटाला पॅलेसची आठवण होते. हेमिस गोम्पा हा लडाखमधील आकाराने सर्वात मोठा आणि सर्वात श्रीमंत गोम्पा मानला जातो. यामध्ये गुरू पद्मसंभव यांचा भव्य पुतळा आहे. लेह शहरात फिरताना एका उंच टेकडीवर एक बहुस्तरीय पुरातन वास्तू दिसत राहते. हा आहे राजा सेंगे नामग्याल याने सतराव्या शतकात बांधलेला नऊ मजली लेह पॅलेस.
लडाखच्या भेटीत सगळ्यांनाच वेध लागलेले असतात ते पँगाँग लेक पाहायचे. अवती-भवती बर्फाच्छादित डोंगरांच्या रांगा घेऊन पहुडलेला हा तलाव 14,270 फूटांवर आहे. पँगाँग त्सो या तिबेटी भाषेतल्या नावाचा अर्थ लांब, चिंचोळा, जादुई तलाव असा आहे. या तलावाची जादू त्याच्या काठावर उभं राहिल्यावर प्रत्येकाच्या मनावर अंमल करते. निलमण्यांचा रस असावा तसा निळ्या पाण्याचा हा तलाव आणि सूर्यकिरणांमुळे घडीघडी बदलणार्या त्याच्या रंगछटा आपल्या सगळ्यांनाच मोहून टाकतात.
लडाखच्या सहलीत या भूप्रदेशाचे आणखी एक पूर्ण वेगळं रुप पाहायला मिळते ते नुब्रा व्हॅलीमध्ये. या परिसरात चक्क वाळूच्या टेकड्या आहेत. लडाखमधल्या या सँड ड्युन्समध्ये सवारी करायला साहसी मंडळींसाठी डबल हम्पड कॅमल्स असतातच. नुब्राच्या वाळवंटात रात्रीच्या वेळी चमचमणार्या अगणित चांदण्यांनी भरलेलं आकाश न्याहाळणं हा खरोखरच स्वर्गीय अनुभव असतो. आपण लकी असलो तर हिमालयातल्या कोल्ड डेझर्टचा कायम लक्षात राहणारा असा हा अनुभव मिळतो.
लेह शहरातील हॉल ऑफ फेम तर प्रत्येक पर्यटकासाठी मस्ट आहे. भारतीय जवानांच्या शौर्याचे चित्रमय प्रदर्शन घडवणारे हे सभागृह आणि तिथे दाखवला जाणारा कारगिल युध्दावरचा माहितीपट बघितल्यावर आपले हात आपोआप जोडले जातात, उर अभिमानाने भरून येतो आणि डोळ्यात शहीद जवानांच्या स्मरणानं पाणी जमा होतं.
ह्यावर्षी दोन मे पासून जवळजवळ दररोज आम्ही वीणा वर्ल्डमार्फत लेहला पर्यटक घेऊन जातोय. लेहबद्दल पर्यटकांच्या मनात असलेली भिती सपशेल काढून टाकण्यात वीणा वर्ल्डची गेल्या पाच वर्षांची मेहनत सार्थकी लागली असं मी अभिमानाने म्हणेन. मे पासून ऑक्टोबरपर्यंत लेह लडाखच्या वेगवेगळ्या सहली सुरू आहेत. त्यामध्ये आहे सात दिवसांची लेह लडाखची मोस्ट पॉप्युलर अशी सहल. ज्यांच्याकडे जास्त दिवस आहेत त्यांच्यासाठी नऊ दिवसांची पँगॉग- नुब्रा-कारगिल ला भेट देणारी सहलही पर्यटकांना खूप आवडायला लागलीय. मे च्या सुट्टीतली वुमन्स स्पेशल लेह लडाख तर आत्ता येत्या काही दिवसातच फुल्ल होईल. सिंगल्स स्पेशल सहलींच्या यशस्वीतेनंतर आम्ही सगळ्या सिंगल ट्रॅव्हलर्सनाही घेऊन जातोय दहा ऑगस्टला लेह लडाखला. यावर्षी ऑगस्टमध्ये एक सीनियर्स स्पेशलची लेह लडाख सहलही आम्ही आयोजित केलीय.
हे सगळं लिहिता-लिहिता मलाही लेह लडाखला पोहोचल्यासारखं वाटतंय. अर्थात मी जाणारच आहे मे, जुलै आणि ऑगस्टमध्ये, तीन वेळा वुमन्स स्पेशलच्या सार्या क्वीन्सना भेटायला. यावेळी तुम्हीही तिथे असलात तर जरुर भेटू.
Post your Comment
Please let us know your thoughts on this story by leaving a comment.