येणारा प्रत्येक दिवस अनेक आव्हानं घेऊन आपल्यासमोर उभा असतो. वर्तमानपत्र उघडावं तर कुणीतरी कुणालातरी गंडा घातल्याच्या, कुणी नुकसानीत गेल्याच्या तर कुणी चक्क दिवाळखोरीत निघाल्याच्या बातम्या धसकावतात. हीरो टू झिरो च्या बातम्या ठळकपणे समोर येतात तर झिरो टू हिरो कुठच्यातरी कोपर्यात शोधाव्या लागतात. आमच्या इंडस्ट्रीनेही खूप आशादायी चित्र उभं न करता चक्क पंधरा वीस वर्ष मागे नेऊन ठेवलंय.
एक व्यक्ती म्हणून आपली स्वत:प्रती, कुटुंबाप्रती, समाजाप्रती आणि देशाप्रती एक जबाबदारी असते. आपल्या बोलण्याने-वागण्याने-कामाने ती व्यवस्थित निभवायची असते. आपल्याकडून असं कोणतंही काम होऊ नये ज्याने स्वत:ची आणि पर्यायाने संलग्न सर्वांचीच प्रतिमा मलिन होईल. हे आपल्याला मिळालेलं बाळकडू आणि ज्याबरहुकूम वागण्याचा आपला सर्वांचाच आटोकाट प्रयत्न असतो. जी गोष्ट एका व्यक्तीची तीच गोष्ट कोणत्याही संस्थेची. संस्था चालविताना-वाढविताना-विस्तार करताना अनेक गोष्टींचं भान आणि अवधान आपल्याला ठेवायला हवं. ज्या-ज्या वेळी हे भान सुटलंय त्या-त्या वेळी ती संस्था ढेपाळल्याची अनेक उदाहरणं रोज आपल्यासमोर येताहेत. अर्थात त्यांच्या ढेपाळण्याने आपण घाबरून न जाता, उगाचच त्याविषयीच्या निरर्थक चर्चांमध्ये वेळ व्यथित न करता त्या संस्थेची अशी अवस्था का झाली ह्याचा परामर्श घेणं, त्यापासून धडा घेणं, काय करू नये ह्याची खुणगाठ बांधणं, ती संस्था कशी वर आली? तिचा कारभार कसा चालत होता जेणेकरून तिने इतकी वर्ष राज्य केलं आणि नेमकं असं काय घडलं ज्याने हळूहळू ती संस्था पोखरत गेली आणि एक दिवशी चक्क होत्याचं नव्हतं झालं? ह्याचा अभ्यास करणं हे आपलं म्हणजे प्रत्येक संस्थाचालकाचं काम आहे.
कुणाच्यातरी अशा पडण्याने मग अगदी ती आपल्याशी स्पर्धा करणारी संस्था असो, आपल्याला जर आनंद होत असेल तर ते अशक्त मनाचं लक्षण आहे असं माझं अगदी ठाम मत आहे. आपण नेहमी आपली स्वपरिक्षा करीत राहिलं पाहिजे. आपलं मन सकारात्मक आहे की नकारात्मक हे आपल्यालाच जोखून पाहता आलं पाहिजे. त्याची एक छोटीशी चाचणी म्हणजे, दुसर्यांच्या यशाने आपल्याला दु:ख होत असेल आणि त्याच्या अपयशाने आपल्याला आनंद होत असेल तर हमखास समजावं की आपण एक नकारात्मक-निराशावादी माणूस बनत चाललोय ही चाचणी स्वत:च स्वत:ची करायची असते, आपण स्वत:शी तर खोटं बोलू शकत नाही. त्यामुळे लागलीच नकारात्मकतेकडे झुकणार्या मनाला आपण वेसण घालून राइट ट्रॅकवर सकारात्मकतेकडे खेचून आणलं पाहिजे.
पर्यटनाकडून आज माझी गाडी इथे वळण्याचं कारण म्हणजे आमच्या टूरिझम आणि त्याच्याशी जोडलेल्या इंडस्ट्रीमध्ये आत्ता आत्ता घडलेल्या काही ताज्या घडामोडी. मार्चमध्ये भारतातली सर्वात मोठी, जेट एअरवेज कोसळली आणि फक्त आमच्यासारख्या टूरिझम कंपन्यांचेच नव्हे तर वैयक्तिकरित्या जाणार्या पर्यटकांचे लाखो-करोडो रुपये पाण्यात गेले. हे पैसे परत मिळतील का? ह्यासाठी आशेचा किरण कुठेही दिसत नाही. जाब विचारायचा कोणाला? हा प्रश्न आहे, म्हणजेच अडकलेल्या पैशांचं भवितव्य गडद अंधारात आहे. ह्या धक्क्यातून सावरतोय न सावरतोय तोच भारतीय पर्यटन क्षेत्रात अनेक वर्ष मानाने राज्य करणारी-आम्हीसुद्धा ज्यांच्याकडे बघत ह्या क्षेत्रात प्रवेशकर्ते झालो अशी संस्था दिवाळखोरीत निघण्याची बातमी आली आणि अक्षरश: धसकायला झालं. ही बातमी पचवतोय तोच लंडनची आणि जर्मनीची एक प्रचंड मोठी ट्रॅव्हल कंपनी वन फाइन मॉर्निंग बँक्रप्टसी डिक्लेअर करती झाली, लाखो लोकांना म्हणजे प्रवाशांना जगात ठीकठिकाणी अक्षरश: रस्त्यावर सोडून. त्यांना कुणी वालीच उरला नाही.
आता तसं बघायला गेलं तर आमची स्पर्धा असलेली एक संस्था भारतीय पर्यटनक्षेत्रातून नाहीशी झाल्यावर आम्हाला आनंद व्हायला पाहिजे. टू किल द कॉम्पीटिशनसाठी मल्टिनॅशनल्स कोट्यावधी रुपयांचा चुराडा करतात. इथे तर एक एक कंपनी आपल्या करणीने आपसूकच बाहेरची वाट पकडतेय. वरवर पाहता ह्याचं उत्तर हो असंच येईल. जो सर्वकश आणि सर्वदूर विचार करू शकत नाही त्याला आनंदही हमखास होईल आणि खरं सांगायचं तर मलाही एका क्षणी तसं वाटलं कारण आम्हाला वर येऊ न देण्यासाठी टूरिझम इंडस्ट्रीतल्या एक दोन कंपन्यांनी कंबर कसली होती. स्वत:च्या उत्कर्षासाठी पराकाष्ठेचे प्रयत्न न करता दुसर्याला संपविण्याच्या योजनांमध्ये वेळ व्यथित करणं हे ही एक कारण असू शकेल अशा भल्या भल्या संस्था दिवाळखोरीत निघण्याचं. आपल्याकडून हे होणार नाही ह्याची काळजी आपण घ्यायला पाहिजे.
स्वत:ला जिंकण्यासाठी, स्वत:ची ताकद आजमावण्यासाठी, कोणतीतरी एक सामाजिक गरज भागविण्यासाठी आपण प्रामाणिकपणे लढूया. आपली लढाई दुसर्याला संपविण्यासाठी जर सुरू केली तर ती कधी आपल्यालाच संपवेल हे कळणारही नाही. आणि ह्याची धडधडीत उदाहरणं समोर येताहेत. जेव्हा ह्या अशा आपल्या क्षेत्रातल्या पडझडीच्या बातम्या येतात तेव्हा चर्चा होतेच. आमच्याकडेही तशी झाली कारण येणार्या देशविदेशातल्या प्रत्येक असोसिएट किंवा सप्लायरच्या गप्पांमध्ये विषय निघायचाच. एक दिवस नील म्हणाला, हा विषय जरी समोरच्याने काढला तरी आपण त्याला बगल देऊन संभाषण दुसरीकडे वळवूया का?आणि खरंच आम्ही त्या दिवसापासून तो विषय कधीच चघळला नाही. तसा वेळच कुठे आहे म्हणा. असो.
एक एअरलाईन आणि तीन मोठ्या ट्रॅव्हल कंपन्या जेव्हा कोसळल्या तेव्हा जगभर सर्वत्रच ह्या इंडस्ट्रीच्या भविष्याविषयी प्रश्नचिन्ह उभं राहिलं, आणि हेच आहे पर्यटनाशी संलग्न असलेल्या आम्हा लहान-मोठ्या संस्थांचं सर्वात मोठं नुकसान. कुणीतरी काहीतरी करतं आणि त्याचे भोग सर्वांनाच भोगायला लागतात तसंच काहीसं हे. त्याची काही उदाहरणं तर लागलीच समोर आली. नील आणि वीणा वर्ल्ड एच-आर टीम मुंबईतल्या काही कॉलेजेसमधील टूरिझम स्ट्रीम संदर्भातील अभ्यासक्रमात योगदान देत आहेत, तसेच तेथे अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना वीणा वर्ल्डमध्ये एम्प्लॉयमेंट जनरेट करीत आहेत. दोन महिन्यांपूर्वी जेव्हा नील आणि एच-आर मॅनेजर रजिथा त्या कॉलेजमध्ये लेक्चर आणि बक्षिस समारंभासाठी गेले तेव्हा तिथल्या एका प्रोफेसरने काळजीने रजिथाला विचारलं, हम टूरिझम इंडस्ट्री में थोडे डरावने सीन्स देख रहे है, आपका सबकुछ ठिक चल रहा है नं? लोकं ह्या इंडस्ट्रीकडे कसे संशयाने बघायला लागलेत त्याचंच हे उदाहरण. आमच्याकडे एक पायंडा आम्ही पाडलाय तो म्हणजे कॅश ट्रान्झॅक्शन्स अजिबात नाहीत तसंच क्रेडिट द्यायचं नाही आणि क्रेडिट घ्यायचं नाही वीणा वर्ल्ड टीमची सॅलरी, आमच्या देशविदेशातील सप्लायरचं पेमेंट आणि असलेच तर बँकेचे हप्ते ह्या पेमेंट्समध्ये एक दिवसाचाही विलंब होता कामा नये. नो एक्स्क्यूज अॅट ऑल. आणि हे सगळं व्यवस्थित सुरू आहे. आमचं पेमेंट डीले झालंय असा एकही फोन मला कधी आला नाही हे आमच्या अकाउंट्स व एच-आर टीमचं यश तसेच कुठेही डीफॉल्ट होऊ नये म्हणून सतत दक्ष राहण्याची त्यांची सवय.
ह्यावर्षीच्या टूरिझम इंडस्ट्रीतील पडझडीत अनेकांचे पैसे गेल्यामुळे आणि त्याची कर्णोपकर्णी वाच्यता झाल्यामुळे भारतातील सर्वच टूरिझम कंपन्यांकडे ओव्हरसीज सप्लायर्सची आधी पैसे द्या नंतरच सर्व्हिस मिळेल अशी स्पष्ट मागणी जोर धरायला लागलीय. संपूर्ण इंडस्ट्रीच्या विश्वासार्हतेला धक्का लागला तो असा. परदेशातल्या सप्लायर्सचं ठीक आहे ते दूर आहेत, एवढं सगळं झाल्यावर त्यांना कशाचाही विश्वास न वाटणं साहजिक आहे. दुधाने तोंड पोळल्यावर आपण ताकही फुंकून पितो. पण मागच्या आठवड्यात जयपूरच्या एका नवीन हॉटेलचा फोन, आम्ही पॉलिसी बदललीय, ग्रुप चेक-इनच्या आधी पैसे पाहिजेत नाहीतर ग्रुप घेणार नाही. ह्या हॉटेलने क्रेडिटमध्ये बरेच पैसे गमावले म्हणून सर्वांसाठी हा निर्णय घेतला. आपल्यावर अविश्वास? तळपायाची आग मस्तकात जाण्याचाच प्रकार, पण शांतपणे जेव्हा विचार केला तेव्हा पॉलिसीज त्यांनी का बदलल्या असतील ते लक्षात आलं आणि आम्ही लागलीच पैसे पाठवून दिले. नंतर हॉटेल ओनरचा सुधीरला सॉरी-सॉरी म्हणत फोन आला, त्याने जनरल पॉलिसी का बनवल्याचं सांगितलं आणि चुकून तुम्हालाही फोन गेला अशी सारवासारव केली ही गोष्ट वेगळी पण आमच्या इंडस्ट्रीच्या विश्वासार्हतेला धक्का पोहोचलाय हे प्रकर्षाने जाणवतंय आणि त्यामुळेच कुणाचंही दिवाळखोरीत निघणं हे त्या क्षेत्राला आणि देशाला परवडण्यासारखं नाही.
कुणी टिकू शकत नाही हा पर्यटनक्षेत्राचा दोष नाही. टूरिझम इंडस्ट्री ही जगातली दोन नंबरची मोठी इंडस्ट्री आहे आणि सतत वेगाने वाढतेय. आय टी इंडस्ट्री टूरिझम इंडस्ट्रीच्या मागे आहे ह्यावरून आपल्याला त्याच्या व्याप्तीची कल्पना येते. भारतात तर आता कुठे टूरिझम कात टाकतंय, ह्या क्षेत्रात येणार्या सर्व तरुणांना मला सांगावसं वाटेल की, बिनधास्त घुसा ह्या क्षेत्रात, ह्याचं भवितव्य विशाल आणि उज्वल आहे. आत्ता तर आपल्या भारतातल्या सव्वाशे कोटी लोकांपैकी फक्त एक टक्का लोकांकडेच पासपोर्टस् आहेत. हे प्रमाण दहा टक्के, पंचवीस टक्के, पन्नास टक्के झालं तर काय होईल सांगा बरं. सो, हे क्षेत्र उज्वल भवितव्याकडे घेऊन जाणारं आहे ह्यात वाद नाही आणि माझा स्वत:चा त्यावर पूर्ण विश्वास आहे. एकच आणि महत्त्वाची जबाबदीर आपल्यावर आहे ती म्हणजे आपल्या कर्तृत्वाने ह्या क्षेत्राची विश्वासार्हता वाढवायची. आपल्याला त्यासाठी ठोस पावलं उचललीच पाहिजेत. सस्टेनिबिलिटी-टीकून रहायचं असेल ह्या क्षेत्रात तर तो मार्ग थोडा दूरचा-पेशन्सची परीक्षा बघणारा असतो पण तिथे दटे रहायला पाहिजे. लो प्राईस वरून लक्ष हटवलं पाहिजे. टूरिझम-टेलिकॉम-एव्हिएशन ह्या तिन्हींच्या त्रासाला व र्हासाला कारण ठरलंय ती लोएस्ट/ चीपेस्ट प्राईसची लढाई. टिकायचं असेल तर ह्यातून बाहेर आलं पाहिजे नाहीतर फ्लाय बाय नाईटच्या बातम्या रोज आपण वाचतोच आहोत वुई ऑल शूड थिंक अॅन्ड अॅक्ट टू बी अ लाँग टर्म प्लेअर, अर्फोडेबल आणि रीलायबल ह्या दोन्हीची मोट बंाधण्याच आव्हान सतत पेलाव लागणार आहे. विषय मोठा आहे पण जागा संपतेय म्हणून शेवटचं, बिझनेस वाढलाच पाहिजे, आपण अॅग्रेसिव्ह राहिलंच पाहिजे. मात्र आपली वाटचाल चालू असताना एक लक्षात ठेवायला पाहिजे ते म्हणजे अंथरूण पाहून पाय पसरावे. ही जरी कितीही जुनी, ओल्ड स्कूलवाली, अनेकांना कदाचित न आवडणारी अशी म्हण असली तरी मला ती आवडते कारण प्रत्येक वेळी ती आपल्याला आठवण करून देत असते, प्लीज चेक युवरसेल्फ, गाडीचा स्पीड एवढाच ठेवा, जो कंट्रोल करता येईल.
Post your Comment
Please let us know your thoughts on this story by leaving a comment.