Published in the Sunday Sakal on 27 October, 2024
जगाच्या पश्चिम गोलार्धातील अनोखा खंड म्हणजे साउथ अमेरिका. जगातला सर्वात उंचावरून कोसळणारा धबधबा - ‘एजंल फॉल्स’, जगातलं सर्वात कोरडं वाळवंट ‘अटाकामा’, जगातील सर्वात मोठ्ठं रेन फॉरेस्ट - `ॲमेझॉन’ असलेल्या या खंडातील असंच एक अनोखं ठिकाण म्हणजे ‘उरोस आयलंड’. साउथ अमेरिका खंडातील पेरू आणि बोलिव्हिया या दोन देशांच्या सिमेवर 12,507 फूटांवर असलेल्या लेक टिटिकाका या तलावात हे बेट आहे. जगातला सर्वात उंचावरचा जलाशय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ॲन्डीज पर्वतरांगेतील या तलावाचा पश्चिमेकडचा भाग पेरू देशाच्या हद्दीत तर पूर्वेकडचा भाग बोलिव्हिया देशाच्या हद्दीत येतो. 8372 चौ.कि.मी. परिसरात पसरलेल्या या तलावाच्या काठावर वेगवेगळ्या जमातीचे लोक राहतात आणि त्यांच्या भाषेनुसार या तलावाची स्थानिक नावं बदलतात.
लेक टिटिकाका पर्यटकांमध्ये प्रसिध्द आहे ते इथल्या आगळ्या वेगळ्या ‘उरोस आयलंड्स’साठी. या तलावाच्या परिसरात इंका काळाच्याही आधीपासून ‘उरोस’ या जमातीचे लोक राहतात. संशोधकांच्या म्हणण्यानुसार हे लोक प्राचीन काळातील ‘पुकारा’ संस्कृतीचे वंशज आहेत. ही संस्कृती या परिसरात इसवी सन पुर्व 1500 या काळात नांदत होती. साधारण 500 वर्षांपुर्वी टिटिकाका सरोवरात हे स्थानिक अशी बेटं बनवून राहू लागले कारण तेव्हा त्यांच्या जमिनीवरच्या वसाहतींवर इंका जमातीचं आक्रमण वाढू लागलं होतं. या सरोवराच्या उथळ पाण्यात वाढणाऱ्या ‘टोटोरा’ गवताचे भारे करून त्याची तरंगती बेटं तयार करतात. गवताच्या जुड्यांपासून तयार केलेलं एक बेट सुमारे तीस वर्ष टिकतं. ज्या वनस्पतींचा वापर करून ही तरंगती बेटं तयार केली जातात तिचा उपयोग होड्या बनवणे, घराचे छप्पर बनवणे, झोपण्यासाठी सतरंज्या बनवणे यासाठी जसा केला जातो तसाच खाण्यासाठी, औषध म्हणूनही केला जातो. या वनस्पतींच्या फुलांचा चहा केला जातो. त्यामुळे या वनस्पतीला स्थानिक ‘लेक बनाना’ असं म्हणतात. आता या विशाल सरोवरात सुमारे 100 ते 120 अशी तरंगती बेटं आहेत आणि त्यावर तेराशे उरोस लोक राहतात.
तरंगत्या बेटांवर जीवन जगत असल्याने हे लोक उत्तम शिकारी आहेत. पाण्यातल्या माशांपासून ते आकाशात उडणाऱ्या पक्ष्यांपर्यंत अवती भवतीच्या निसर्गातून ते आपलं अन्न मिळवतात. जुन्या जमान्यात हे लोक बेटावरच दगडाची चूल मांडून जेवण शिजवत असत, मात्र त्यात आग लागायचा धोका होता. आता बदलत्या जमान्यात हे लोक सोलर पॅनल्स वापरतात. इथे राहणारे स्थानिक त्यांच्या पारंपरिक हस्तकलेचे नमुने पर्यटकांना विकून आपली गुजराण करतात.
उरोस आयलंड्स सारख्या दररोज एका पेक्षा एक अफलातून आश्चर्य दाखविणाऱ्या वीणा वर्ल्डच्या साऊथ अमेरिका टूरवर जायलाच हवं.
वीणा वर्ल्ड ट्रॅव्हल मिशन 100 Country Club - पर्यटनाचं टॉनिक
आम्हा दोघांसाठी पर्यटन म्हणजे जणू तनामनाला उर्जा देणारं टॉनिकच. म्हणून तर आम्ही जगाच्या पाठीवरचे वेगवेगळे देश बघत फिरत असतो. मी स्वतः क्रुझ लाइनवर काम केलं आहे. माझ्या कामाचा भाग म्हणून मी भरपूर प्रवास केला आहे तरीही मला माझ्या कुटुंबासोबत पर्यटन करायला आवडतं. माझ्या नोकरीमुळे माझे जगभरातले 55 देश पाहून झाले आहेत. तर माझ्या पत्नीने जगातले 30 देश पाहिले आहेत. आम्ही दोघांनी मिळून भारतातली 12 राज्ये पालथी घातली आहेत. माझ्या कामामुळे मी जे देश पाहिले होते ते पुन्हा मला माझ्या पत्नीबरोबर बघायला आवडतात, कारण आता मी एक पर्यटक म्हणून त्या ठिकाणांचा आनंद घेऊ शकतो.
मी माझ्या कुटुंबासमवेत पर्यटनाला आरंभ केला तेव्हा सुरुवात युरोपपासून करायची हे ठरवलं होतं. आम्ही नाशिकला राहतो आणि तिथल्या वीणा वर्ल्डच्या सेल्स पार्टनर्सकडूनच आमच्या सहलींचं बुकिंग करून घेतो. आम्ही एकावेळी एकाच खंडावर लक्ष केंद्रित करून पर्यटन करायचं ठरवलं होतं, त्याप्रमाणे आम्ही युरोप खंडापासून सुरुवात केली. आजपर्यंत वीणा वर्ल्डसोबत आम्ही वेस्टर्न युरोप, स्कँडिनेव्हिया आणि बाल्टिक युरोप पाहिला आहे. या भटकंतीमध्ये आम्हाला सर्वात जास्त आवडलेलं ठिकाण म्हणजे स्वित्झर्लंड. अतिशय मनमोहक निसर्ग, आल्हाददायक हवामान आणि हे सगळं काळजीपूर्वक जपणारे तिथले लोक, यामुळे स्वित्झर्लंड आमच्यासाठी जणू पृथ्वीवरचा स्वर्ग ठरला आहे. ह्यासोबत इतिहास आणि वर्तमानाची गुंफण, स्वच्छता, शिस्त यामुळे पॅरिसची भेट कधी विसरताच येणार नाही.
माझी पत्नी सीमा ही उत्तम कूक आहे, तिच्या या कौशल्याचे व्हिडिओज करुन ती युट्य़ूबवर अपलोड करते. तिच्या या छंदामुळेच आम्ही जगभरात फिरताना त्या त्या प्रदेशातील स्थानिक पदार्थ आवर्जून खातो. आमच्या भटकंतीमध्ये या खादाडीचा प्रभाव इतका आहे की आमच्या ग्रीस भेटीनंतर सीमाने खास ‘ग्रीक सलाड’आणि ‘मोझाइज केक’चे क्लासेस घेतले होते. मला स्वतःला ठिकठिकाणची सुव्हेनियर्स गोळा करण्यात रस आहे, त्याचबरोबर मिनिएचर मोन्यूमेंटस, प्लेटस, मॅग्नेट्स आणि वॉल पेंटिंग्ज गोळा करायचा छंद मी जोपासला आहे. आत्ता पर्यंतच्या पर्यटनात जर्मनीला जाऊनही ‘कुकू क्लॉक’ आणायचे राहून गेले, त्यासाठी नक्की आम्ही पुन्हा जर्मनीला जाणार आहोत.
काय बार्इ खाऊ कसं गं खाऊ!
बाल्टिक युरोपमधील प्रगतीशील देश म्हणजे इस्टोनिया. बाल्टिक समुद्राच्या पूर्व किनाऱ्यावरचा हा देश अनेक बेटांनी मिळून बनलेला आहे. या देशाच्या खाद्यसंस्कृतीवर जर्मनी, रशिया, फिनलँड या देशांच्या पाककलेचा प्रभाव पडलेला पहायला मिळतो. या देशातील लोकांच्या आहारात परंपरेनं बटाटे, मांस (पोर्क), राय ब्रेड, दुग्धजन्य पदार्थ आणि मासे यांचा मुख्य समावेश पहायला मिळतो. इस्टोनियामधील एक लोकप्रिय आणि सर्वत्र उपलब्ध होणारा पदार्थ म्हणजे ‘क्रिंगल. हा स्वीट ब्रेडचा एक प्रकार आहे. एकात एक गुंतलेले ब्रेड आणि त्याचेच तयार झालेले वर्तुळ असा हा ब्रेड दिसतो. इथल्या प्राचीन नॉर्स भाषेतील ‘क्रिंगला’ या शब्दावरून ‘क्रिंगल’ हे नाव पडलं आहे. या शब्दाचा अर्थ होतो रिंग किंवा वर्तुळ. याचा एक प्रकार आजही डॅनिश क्युझिन्समध्ये लोकप्रिय आहे आणि म्हणून याचं उगमस्थान स्कँडिनेव्हिया मानलं जातं. काही तज्ञांच्या मते जेव्हा इस्टोनियावर जर्मन राजवट होती तेव्हा हा ब्रेडचा प्रकार या देशात आला आणि इथल्या लोकांनी त्यावर प्राविण्य मिळवून आजचा क्रिंगल तयार केला.
क्रिंगल गोड चवीचा आहे का तिखटमिठाचा यावर तो मुख्य जेवणाचा भाग आहे का डीझर्ट हे ठरतं. पारंपरिक क्रिंगलमध्ये वेलची, मनुका आणि केशर वापरलं जातं. पण आता याच्या अनेक आवृत्या पहायला मिळतात. त्यात मनुका आणि अक्रोडाचे सारण भरून वर चॉकलेट टाकून केलेला प्रकार विशेष लोकप्रिय आहे. तिखटमिठाच्या प्रकारात चीज आणि हॅमचे सारण भरले जाते. दालचिनी वापरून केलेले क्रिंगलही पहायला मिळतात. इस्टोनियामध्ये वाढदिवस साजरा करताना, ख्रिसमससाठी किंवा अन्य एखाद्या आनंदाच्या प्रसंगी क्रिंगल खाण्याची पध्दत आहे.
देश-विदेशातील अशाच विविध खाद्यपरंपरा आणि ट्रॅव्हलचे भन्नाट अनुभव ऐकण्यासाठी वीणा वर्ल्डचा ‘ट्रॅव्हल एक्सप्लोअर सेलिब्रेट लाईफ’हा पॉडकास्ट नक्की ऐका.
विंटर वंडरलँड-स्वित्झर्लंड
वीणा वर्ल्ड कस्टमाईज्ड हॉलिडेज्सोबत
चविष्ट चीज-चॉकलेटपासून ते रुबाबदार घड्याळांपर्यंत विविध कारणांसाठी प्रसिध्द असलेला देश म्हणजे स्वित्झर्लंड. स्विस हॉलिडे म्हटल्यावर आधी आठवतो तो आल्प्स. या मोहक पर्वतरांगेचा आनंद घ्यायचा असेल तर विंटर सुध्दा एक मस्त सीझन आहे.
स्विस आल्पसमधल्या झरमॅट, सेंट मॉरित्झ, दावोस इथली रिसॉर्ट जगप्रसिध्द आहेत. इथे सगळ्या लेव्हलचे स्किइंग स्लोप्स आहेत. स्वित्झर्लंडच्या हॉलिडेमध्ये घ्यायलाच हवा असा अनुभव म्हणजे ‘ग्लेशियर एक्सप्रेस’. नावाप्रमाणेच ही एक्सप्रेस ग्लेशियर्स, गवताळ कुरणं, डोंगरातून खळाळत वाहणारे प्रवाह, भयचकित करणाऱ्या दऱ्या या सगळ्यांचे अविस्मरणीय दर्शन घडवते. 291 पुलांवरून प्रवास करत ही ट्रेन स्वित्झर्लंडमधील सेंट मॉरित्झ आणि झरमॅटला जोडते.
स्वित्झर्लंडचे नैसर्गिक आकर्षण म्हणजे इथले ‘थर्मल स्पा’. नैसर्गिक उष्णतेनं गरम झालेल्या आणि औषधी गुणधर्म असलेल्या पाण्यात डुंबायला कोणाला आवडणार नाही? पण ऐन हिवाळ्यात आजूबाजूची शिखरे बर्फात बुडालेली असताना एखाद्या आउट डोअर पूलमधल्या गरम पाण्यात डुंबायला खरी मजा येते. हा अनुभव तुम्ही स्वित्झर्लंडमधल्या लॉयकरबाद थर्मल स्पामध्ये नक्की घेऊ शकता. मिनरलबाद-रिगी काल्टबाद हा थर्मल स्पासाठी आणखी एक झकास पर्याय आहे. ‘काल्टबाद’ या जर्मन शब्दाचा अर्थ ‘कोल्ड बाथ’ असा होतो पण प्रत्यक्षात इथे 35 अंश सेल्सिअस तापमान असलेल्या ‘मिनरल रिच’ पाण्यात आंघोळ करता येते. स्वित्झर्लंडची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘झुरिक’ शहरात तुम्ही ‘थर्मलबाद ॲन्ड स्पा’ मध्ये वेलनेस हॉलिडेचा मस्त अनुभव घेऊ शकता.
स्वित्झर्लंडच्या हॉलिडेमध्ये घ्यायलाच हवा असा एक रोमँटिक अनुभव म्हणजे 8900 फूटांवरील ‘इग्लू व्हिलेज’ मधील निवास. उत्तुंग मॅटरहॉर्न शिखराचं दर्शन घेत बर्फाने वेढलेल्या परिसरात थर्मल मॅटस आणि एक्सिपिडशन स्लिपिंग बॅगमध्ये काढलेली रात्र तुम्ही कधी विसरूच शकणार नाही. असाच खास स्वित्झर्लंडमध्ये घ्यायचा अनुभव म्हणजे ‘हस्की डॉग स्लेजिंग’. एन्गेडिन, श्टाड किंवा झरमॅट इथे तुम्हाला हा डॉग स्लेज राइडचा रोमांचक अनुभव घेता येतो. ‘टॉप ऑफ युरोप’ म्हणून प्रसिध्द असलेलं ‘युंगफ्राऊ’ हे स्थान जितकं सुंदर आहे त्यापेक्षा तिथपर्यंत जाताना करण्याचा प्रवास सुंदर आहे. अकरा हजार फूटांपेक्षा अधिक उंच असलेल्या या ठिकाणी गेल्यावर तुम्ही तिथल्या आइस पॅलेसला भेट देऊ शकता, ग्लेशियरमध्ये खोदलेल्या बर्फाच्या बोगद्यांमधून फिरू शकता आणि तिथल्या ऑब्जर्व्हेशन डेकवरून सभोवतालच्या परिसराचा निसर्गरम्य देखावा पाहू शकता.
स्वित्झर्लंडच्या विंटर हॉलिडेमध्ये तिथल्या ‘ख्रिसमस मार्केट’ ची मजा तर अनुभवायलाच हवी. झुरिक, जिनिवा, बासेल, मॉन्थ्रो या ठिकाणी पारंपरिक पध्दतीने भरणाऱ्या ख्रिसमस मार्केटसमध्ये स्विस पदार्थांचा आस्वाद घेण्याबरोबरच हँडिक्राफ्टचं शॉपिंग करण्याचा आनंदही मिळतो.
स्वित्झर्लंडमधला विंटर हॉलिडे म्हणजे आइस स्केटिंग पासून ते आइस फिशिंग पर्यंत अनेक नवनवीन अनुभवांचा खजिनाच. मग या विंटरमध्ये ह्या वंडर लँडचं प्लॅनिग करा आणि निघा. मार्गदर्शनासाठी वीणा वर्ल्डची कस्टमाईज्ड हॉलिडे टीम तयार आहेच.
आगळी वेगळी माणसं
गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये वीस दिवसांत स्पेन आणि पोर्तुगाल धुंडाळून काढलं. म्हणजे खरंतर हे करायला दोन-तीन महिनेही अपुरे पडतील, पण आमचा मार्ग हा जनरली भारतीय पर्यटकांना कोणती शहरं आवडतात त्या अनुषगाने होता. ह्या वीस दिवसांच्या मिशनमध्ये आम्ही बऱ्यापैकी यशस्वी झालो म्हणायला हरकत नाही. ह्या प्रवासात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी माणसं भेटत गेली. माणसांनी गजबजलेल्या, कुटुंबसंस्था जागृत असलेल्या, वयाच्या शंभरीकडे पोहोचलेल्या तरीही प्रत्येक दिवस आनंदात प्रतित करणाऱ्या जेष्ठांच्या, इतिहासाचा अभिमान बाळगणाऱ्या, स्वधर्माचा आदर असणाऱ्या ह्या दोन्ही देशांच्या नव्याने प्रेमात पडलो. सहलींमध्येही स्वागतार्ह बदल केले.
ह्या प्रवासात आम्हाला खास लक्षात राहिली ती आंतोनेला. मार्बेय्या किंवा स्पेलिंगप्रमाणे मार्बेला ला आम्ही दोन दिवस होतो. जिब्राल्टर, मिहास, मालागा असं सगळं स्थलदर्शन करून आम्ही निवांतपणे मार्बेय्याच्या ओल्ड टाऊन मध्ये जेवणासाठी रेस्टॉरंट शोधत होतो. आज स्पॅनिश पाएय्या खायचा मूड होता. चिकन-मीट जवळजवळ वर्ज्य, मासेही खातो सिलेक्टेड किंवा जास्त करून व्हेजिटेरियन खाण्यावरच भर असतो. पण हे सगळं समजावणारा संवाद कसा करायचा? तामिळनाडूला जसं हिंदी वर्ज्य तसं इथे इंग्लिश नको वाटतं स्पॅनिश लोकांना. त्यांच्या भाषेवर त्यांचं अतोनात प्रेम. कधी कधी काहीही माहीत नसलेला टूरिस्ट बनायला मला आवडतं. त्यामुळे प्रत्येक गोष्ट छानसं सरप्राइज बनून जाते. आम्ही भटकत होतो. सुधीर संवाद साधायचा प्रयत्न करीत होता. बऱ्यापैकी अपयश स्विकारल्यावर आम्ही पोहोचलो `युरेका’ नावाच्या रेस्टॉरंटमध्ये जिथे आंतोनेलाने आमचं स्वागत केलं. हसरी गोड आंतोनेला एकदम जवळची वाटली. आम्हाला बघून तिने चक्कं इंग्लिशमध्ये वेलकम केलं आणि आमचा जीव भांड्यात पडला. आम्ही इंडियामधून आलोय म्हटल्यानंतर 'बिग अँड ब्युटीफुल कंट्री' म्हणत आम्हाला आपलंसं केलं. तुमची फेमस डीश `पाएय्या’ आम्हाला खायचीय म्हटल्यावर वंडरफूल म्हणत तिने मीट आणि फिश पाएय्याचे वेगवगळे प्रकार सांगितले. आम्ही पोर्क बीफ हॅम रेड मीट स्क्वीड मसल्स खात नाही म्हटल्यावर ती थोडी विचारात पडली.
मग म्हणाली 'नेव्हर माइंड, मी तुम्हाला प्रॉन पाएय्या करून देते. आवडेल तुम्हाला'. चला. आमची पाएय्या खायची इच्छा पूर्ण होणार होती आता. सुधीरने आंतोनेलाला मोबाईलमधला फोटो दाखवून विचारलं, 'कंरजीसारखा दिसणारा हा पदार्थ काय आहे? तर सरळ त्याचं नाव न सांगता ती म्हणाली, 'इट्स लाइक युवर इंडियन समोसा'. ही दुसरी वेळ होती तिने आम्हाला जिंकण्याची. भारतापासून दूर असलेल्या देशात जिथे इंग्लिशसुद्धा जेमतेम बोललं जातं तिथे हिला आमचा समोसा माहीत होता. क्या बात है! पुढे जाऊन ती म्हणाली, 'तुम्ही मीट खात नाही तेव्हा तुम्हाला मी ह्या एम्पानादासमध्ये व्हेजिटेबल फिलिंग भरून देत'. आता आमच्या ऑर्डरमधली दुसरी डिश फायनल झाली होती. सध्या अनेकांमध्ये हिरव्या भाज्या तसेच होलसम फूड खायची चांगली क्रेझ आलीय, त्यात आम्हीपण आहोत. कुणीतरी म्हटलंय दिवसाला शक्य असेल तर एक पौंड भाज्या खा. मोजमाप नाही पण आम्ही खरंच भाज्या खायचं प्रमाणं वाढवत नेलं त्यामुळे तिला विचारलं, व्हेजिटेरिन आयटम काय आहे तुझ्याकडे? आम्हाला आवडणाऱ्या वांग्याचा-एगप्लांटचा काही पदार्थ आहे का? तो नाहीये हे म्हणताना तिला वाइट वाटलं हे तिच्या चेहऱ्यावरून जाणवलं. आपल्याकडे आलेल्या पाहुण्याला, त्याला हवंय ते आपण देऊ शकत नाही ही वेदना होती. लागलीच ती म्हणाली, 'मी एक काम करते तुम्हाला ग्रिल्ड व्हेजिटेबल्स आणून देते, आमच्याकडचे ग्रील्ड आयटम्स खूप छान आहेत'. झालं. आमची तिसरी डिशही फायनल झाली. फ्रेशली स्क्वीझ्ड ज्युस आहेत का? तिने हो म्हटल्याबरोबर फ्रेश ऑरेंज ज्युसची ऑर्डर देऊन हुश्य करीत आम्ही स्थानापन्न झालो.
काही काही हॉटेल्समध्ये आपण एकदा ऑर्डर दिली की जसे पदार्थ तयार होतील तसे आणून देतात किंवा सर्व पदार्थ एकदम आणून देतात, 'दिले एकदाचे' करीत. पण इथे आंतोनेला होती, तिने ज्युस, स्टार्टर्स करीत एक एक पदार्थ आणून दिले. तिचा कटाक्ष होता आमची डिश संपण्यावर आणि त्यानंतरच ती दुसरी डीश आणून ठेवीत होती. ज्युस आणि करंजीसारखा एम्पानादास संपल्यावर तिने ग्रील्ड व्हेजिटेबल्स आणल्या आणि म्हणाली, ‘ह्या व्हेजिटेबल्स मध्ये तुम्हाला आवडणांर एगप्लांट मी टाकलंय'. आता मात्र आम्ही आंतोनेलाच्या प्रेमात पडलो. वांगं खायची आमची इच्छा तिने पूर्ण केली होती. आम्ही त्या एकेक पदार्थावर ताव मारीत होतो आणि सर्व्हिस अशी असायला हवी, एवढी कळकळ आपल्या गेस्टविषयी आपल्या वीणा वर्ल्डमधल्या प्रत्येकात असायला हवी ह्याविषयी चर्चा करीत बसलो. शेवटी आंतोनेला आमचा प्रॉन पाएय्या घेऊन आली. बघताक्षणी तो मस्त असणार ह्याची खात्री पटली. आता तिच्याशी बोलायचा मोह आम्हाला आवरला नाही. तिला म्हटलं, 'आम्ही आल्यापासून तुला बघतोय, आपल्या गेस्टच्या प्रती एवढा विचार तू कसा करतेस? आम्ही ह्या थोड्याशा वेळात तुझ्याकडून बरंच शिकलो. तू इथलीच आहेस की बाहेरून आलीयस? तुझं इंग्लिश एवढं चांगलं कसं?' तिनेही मोकळेपणाने बोलायला सुरुवात केली. हे युरेका रेस्टॉरंट तिच्या आई-वडिलांचं, त्यांनी चार महिन्यांपूर्वीच ते सुरू केलं होतं. ही पस्तीशीतली वाटत होती म्हणजे तिचे आई-वडील निश्चितच साठीला पोहोचलेले असतील. वयाच्या साठीला म्हणजे रीटायरमेंटला रेस्टॉरंट सुरू करणं हीच एक इन्स्पायरिंग गोष्ट होती. त्यांनी आंतोनेलाला विचारलं की 'तू मदतीला येशील का? आम्ही रेस्टॉरंट सुरू करतोय' तर तेव्हा हिने त्यानां 'आता ह्या वयात तुम्ही कशाला हे उद्योग करता?' असं न म्हणता 'आगे बढ़ो मैं तुम्हारे साथ हूँ' म्हणत ती स्वतःचा बोरिया-बिस्तर घेऊन मोर्बेयामध्ये दाखल झाली. बरं ती आली कुठून तर अर्जेंटिनाची राजधानी ब्युनोस आयर्स मधून. आपण मुंबईहून पुण्याला किंवा पुण्याहून मुंबईला रीलोकेट व्हायला घाबरतो किंवा नाकं मुरडतो. ही माणसं कोणत्याही देशात जाऊन काहीही करायला उत्सुक असतात. म्हणूनच स्पॅनिश लोकांनी अर्ध्या अधिक जगावर राज्य केलं. अर्जेंटिना आणि स्पेन तसे एक दुसऱ्यापासून दहा हजार किलोमीटर्सवर असणारे देश पण त्यांचं नातं जवळचं. पुर्वी साऊथ अमेरिका स्पेनच्याच अंमलाखाली होता नं. सो, ही आंतोनेला आई-वडिलांच्या मदतीला आली होती आणि मनापासून ते काम करीत होती. जीव ओतत होती त्यात. आईवडिलांचं हे व्हेंचर किंवा त्यांनी पाहिलेलं स्वप्न तिला पूर्णत्वाला न्यायचं होतं, जेवणाचं बिल युरोमध्ये भरताना रोज हुडहुडी भरते पण तसं आज आम्हाला 'अरे बापरे' झालं नाही. त्या बिलापेक्षा कितीतरी अधिक गोष्टी आंतोनेलाने आम्हाला शिकवल्या होत्या. नकळत.
ह्याच प्रवासात आमचा पुढचा टप्पा होता पोर्तुगाल. मधील पोर्तो शहर. तिथे आमचं वास्तव्य 'जीए पॅलेस' नावाच्या हॉटेलमध्ये होतं. छान छोटंसं बुटीक हॉटेल ज्याच्या रोमारोमात पाहुणचार ठासून भरलेला. मराठीत सांगायचं तर एकदम वॉर्म ॲटमॉस्फियर. आम्ही मजल दरमजल करीत दमलेल्या अवस्थेत हॉटेलला पोहोचलो त्यामुळे आपल्याला हॉटेल आवडेल का ह्या विचारात होतो. रीसेप्शनला जायच्या आधी आम्हाला भेटला ह्युगो. म्हणजे त्याचं नाव आम्हाला नंतर कळलं पण, 'वॉव, माय फ्रेंड्स फ्रॉम इंडिया' म्हटल्याबरोबर ह्या दूरदेशी कुणीतरी आपलं असं मस्त स्वागत करतंय हे बघितल्यावर बरं वाटलं. रूम्सच्या चाव्या मिळेपर्यंत जो वेळ होता त्यात ह्युगोने आमच्याविषयी जुजबी माहिती जाणून घेतली आणि पोर्तोविषयीची थोडी माहितीही पुरवली. आम्ही तीन रात्री पोर्तोला राहिलो म्हणजे किमान सहा वेळा आम्ही रीसेप्शनला येत जात होतो. प्रत्येक वेळी ह्युगो हसऱ्या चेहऱ्याने त्याच्या खड्या आवाजात मस्त विचारपूस करायचा, माहिती पुरवायचा, मार्गदर्शनालाही तत्पर असायचा. जेव्हा जेव्हा आम्ही रीसेप्शनला शांत निवांत बसायचो तेव्हा ह्युगो दिसायचाच. येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक माणसाचा तो जणू पाठीराखा होता, मॉरल सपोर्ट होता. एव्हाना आम्हाला कळलं होतं की ह्युगोची जॉब प्रोफाइलच होती गेस्टना कम्फर्टेबल करायचं. पण आम्हाला एकदाही जाणवलं नाही की तो त्याला दिलेलं काम करतोय. 'बियाँड द कॉल ऑफ ड्युटी' असं त्याचं वागणं बोलणं होतं. आम्हाला पाण्याच्या बाटल्या जास्त लागतात हे जेव्हा त्याला कळलं तेव्हापासून तो न विसरता त्या पाण्याच्या बाटल्या आमच्यापर्यंत पोहोचवायची खात्री करायचा. आम्ही कोणत्या रेस्टॉरंटला जाणार हे कळल्यावर तिथे अमूक एक डिश किती मस्त आहे हे सांगायचा. पोर्तो मधला तो आमचा 'बडी' होता. हॉटेलला येणाऱ्या प्रत्येकाशी त्याचं तेच नातं बनत होतं. हॉटेल गेस्टना हवी असणारी ही एक प्रकारची सेवा होती आणि ते काम ह्युगो उत्कृष्टरित्या आणि आवडीने करीत होता, म्हणूनच त्यात नाटकीपणा नव्हता. करायचं म्हणून करीत नव्हता. बोलाचयं म्हणून बोलत नव्हता. हसायचं म्हणून हसत नव्हता. सगळं काही मनापासून होतं म्हणून तो आपला वाटला. स्मरणात राहिला. बरंच काही शिकवून गेला.
पोस्ट कोविड जगभरात ढासळलेल्या सर्व्हिस लेवल्स बघता ह्युगो त्यात उठून दिसला. आपल्या कामात जर आनंद शोधला तर काम, काम वाटत नाही ह्याचं चालतं बोलतं उदाहरण होता ह्युगो. गॉड ब्लेस हिम! एकच रुखरुख लागून राहिली आम्ही ह्युगो सोबत फोटो काढला नाही.
वीणा पाटील, सुनीला पाटील, आणि नील पाटील ह्यांचे प्रत्येक आठवड्यात प्रकाशित होणारे लेख वीणा वर्ल्डच्या वेबसाईट www.veenaworld.com वर वाचनाकरिता उपलब्ध आहेत.
Post your Comment
Please let us know your thoughts on this story by leaving a comment.