Published in the Saturday Lokasatta on 02 March, 2024
...त्यांनी सांगितलं नसतं तर कदाचित माझ्या लक्षातही आलं नसतं, आणि माझा मूडही चांगला राहिला असता. तिथे चेकइनला सांगण्यापेक्षा विमानात सांगायचं नं...
मागच्या आठवड्यात सॅनफ्रान्सिस्कोला आले. दहा दिवसांसाठी आमच्या धाकट्या मुलाला राज ला भेटायला. कुठे जायचं असलं की एक बरं असतं, कामं अगदी धडाधड उरकली जातात. वेळ कमी असतो तेव्हा आपण जास्त ऑर्गनाइज्ड बनतो. त्या कारणासाठीही मला अधूनमधून प्रवासाला जायला आवडतं. ज्या कामांना अदरवाईज जास्त वेळ लागला असता ती कामं झाल्यामुळे मी खुश होते. आता पुढच्या दहा दिवसांमध्ये थोडंफार ऑफिसचं काम करावं लागलं तरी बर्यापैकी वेळ राजसोबत घालवायला मिळणार होता. सोळा तासांचा विमानप्रवास. पुढच्या आठवड्याची दोन्ही न्यूजपेपर आर्टिकल्स लिहूया. एक दोन चांगले चित्रपट बघूया आणि सात आठ तासांची मस्त झोपही घेऊया असा विचार करून मी निघाले एअरपोर्टला. एअर रीझर्वेशन्स टीममधल्या सुपर्णा जाधवने पहिल्याच रो मधली सीट बूक केली होती त्यामुळे आता सीट कुठची मिळेल हाही प्रश्न नव्हता कारण इंडिव्हिज्युअल तिकीट होतं. एअरपोर्टवर काऊंटरला पोहोचले. बॅग दिली आणि समोरची मुलगी बोर्डिंग पास देण्याची वाट बघत मी उभी होते. काऊंटर पाठच्या मुलींमध्ये काहीतरी खूसपूस सुरू झाली. एकदा माझ्याकडे बघत होत्या आणि नंतर त्यांच्या समोरच्या स्क्रीनकडे बघत होत्या. एकीने जाऊन तिच्या सिनियरला आणलं आणि त्याने अॅपॉलॉजीच्या स्वरूपात बोलायला सुरुवात केली. ’तुम्ही ज्या सीटचं बुकिंग केलंय त्या सीटच्या केबीनचं दार लागत नाहीये.’ एवढंच नं! मग सीट बदलून द्या माझी. ’तोच प्रॉब्लेम आहे, फ्लाइट फुल्ल आहे. एक सीट आहे थर्ड रो मध्ये पण अनफॉर्च्युनेटली त्याचं ट्रे टेबल चालत नाहीये.’ आता मात्र थोडं इरिटेशन डेव्हलप व्हायला लागलं. म्हणजे अॅक्च्युअली मला चॉईस नाहीये. खराब दार पाहिजे की खराब ट्रे टेबल ह्यात मला ठरवायचं आहे. अरे यार प्रवासाच्या सुरुवातीलाच तुम्ही माझा मूड घालवलात. एवढे दिवस आधी बुकिंग केल्याचं हे फळ आहे का?’ माझा आवाज थोडासा चिरका झालेला मला जणावला. मी कुणी व्हिआयपी नाही पण CIP म्हणजे कमर्शियली इम्पॉरटंट पर्सन असल्याने आणखी दोन सिनियर्सनी येऊन पुन्हा तेच सागितलं. इलाज काहीच नव्हता हे लक्षात आलं होतं. लिखाण करायचं होतं त्यामुळे थर्ड रो मधली सीट मी नाकारली आणि मुकाट माझी ओरिजनल सीट द्यायला त्यांना सांगितलं. कितीही नाही म्हटलं तरी थोडासा मूड ऑफ झाला होता. चलो देखो आगे आगे होता है क्या, म्हणत मी मजल दरमजल म्हणजे सेक्युरिटी इमिग्रेशन बोर्डिंग करीत माझ्या सीटवर जाऊन स्थानापन्न झाले. लक्ष सारखं त्या न चालणार्या आणि टेपने बंद केलेल्या माझ्या केबिनच्या दाराकडे जात होतं. आता त्यांनी सांगितलं म्हणून की काय पण उठता बसता लक्ष तिथेच जात होतं आणि मन खट्टू होत होतं की आपल्या केबीनचं दार लागत नाहीये. विमानातले पहिले आठ तास मी लिखाणात घालवले. नंतर दोन जपानी सिनेमे बघितले. तेवढ्या वेळात मला एकदाही दार लावावसं वाटलं नाही. आधीच विमान कॉम्पॅक्ट त्यात एकही सीट खाली नाही म्हणजे त्या एवढ्याशा विमानात माणसं अगदी काठोकाठ भरलेली. तिथे कुठे मी आणखी कॅबीनचं दार लावून क्लॉस्ट्रोफोबिया ओढवून घेऊ? फ्लाइट अटेंडेंट टीम एकदम मस्त होती. मनापासून सर्व्हिस देत होती. ‘विमानप्रवासात भरपूर पाणी पीत रहा, कीप युवर बॉडी हायड्रेटेड’ प्रमाणे मी नेहमीच विमानप्रवासात भरपूर पाणी पीते. त्यात जर गरम पाणी मिळालं तर नथिंग लाइक इट. दर अर्ध्या तासाने एअरहोस्टेस मस्त गरम पाणी आणून देत होती. शक्यतोवर विमानात खायचं नाही किंवा खाल्लं तरी सॅलड फ्रुट्स असं हलकं काहीतरी. एकदातर न्यूयॉर्क-सिंगापूर ह्या जगातल्या लाँगेस्ट फ्लाइटमध्ये एकोणीस तासात मी काहीही खाल्लं नव्हतं. आपला स्वत:वर आणि भूकेवर किती कंट्रोल आहे ते आजमवण्याचा हा प्रकार. आणि काहीही न खाता कोणतंही क्रेव्हिंग न होता तो लाँगेस्ट जर्नी मी हलक्याफुलक्या तर्हेने पार पाडला. असो, तर ह्यावेळीही फ्लाइट अटेंडंटने फ्रुट्स व सॅलड आणून दिलं. लिखाण, सिनेमे आणि झोप असा माझा सोळा तासांचा प्रवास मजेत संपन्न झाला आणि मी सॅनफ्रान्सिस्कोला लँड झाले. फ्लाइट क्रू मध्ये बरेच टीम मेंबर्स मराठी होते. त्यांचा टीम लीडर ना मी म्हटलं ‘अरे, माझा प्रवास इतका मस्त झाला, सर्व काही छान होतं, सोळा तास कसे गेले ते कळलंही नाही. फक्त एकच कर तुझ्या मुंबई एअरपार्ट टीमला कळव की कशाला आधी मला हे दाराचं प्रकरण सांगितलं, मूड घालवून टाकला अगदी एन्ट्रीलाच. त्यांनी सांगितलं नसतं तर कदाचित माझ्या लक्षातही आलं नसतं, आणि माझा मूडही चांगला राहिला असता. तिथे चेकइनला सांगण्यापेक्षा विमानात सांगायचं नं. अर्थात आता माझा प्रवास मस्तच झाला तेव्हा ऑल इज वेल!’ त्याचं म्हणणं असं की,’जेव्हा हे दार खराब झालं आहे हे आमच्या लक्षात आलं तेव्हा ते पॅसेंजरला सांगणं भाग आहे. कधीकधी अदरवाईज विमानात हंगामा होतो आणि ते चांगलं नाही’. एकंदरीत त्यांचं ‘कधी सांगायचं पॅसेंजरला‘ आणि माझं ‘कधी‘ हे वेगवेगळं होतं. त्यांच्यापरीने त्यांचं ‘कधी‘ बरोबर होतं आणि माझ्या म्हणजे एका पॅसेंजरच्या परीने माझं ‘कधी‘ बरोबर होतं. दोघांच्या दृष्टीकोनातून हा फरक निर्माण झाला होता.
अॅक्च्युअली ह्या प्रवासात मी पॅसेंजर होते त्यामुळे माझा दृष्टीकोन पॅसेंजरचा होता. जेव्हा आम्ही वीणा वर्ल्डवाले असतो तेव्हा आम्ही सुद्धा एअरलाइनवाला दृष्टीकोन घेऊनच गोष्टींकडे बघतो. आमचा व्यवसाय संपूर्णपणे डीपेंन्डंट. कधी एअरलाइन्स बदलतात, कधी कुठे नैसर्गिक आपत्ती ओढवते, कधी एखाद्या मोठ्या इव्हेंटमुळे सहलीचा कार्यक्रम बदलावा लागतो तर कधी गव्हर्न्मेट मुव्हमेंटमुळे सगळी हॉटेल्स गव्हर्न्मेटने घेतल्यावर टूर आयटिनरीमध्ये हॉटेल स्टे शफल करावे लागतात. अशा वेळी आम्ही पर्यटकांना पूर्वसुचना वा कल्पना देतो जेणेकरून पर्यटकांना कोणतंही सरप्राइज नको. अर्थात अशा अपरिहार्य वेळी चांगले सब्स्टिट्यूट्स देण्याचा पायंडा असल्यामुळे पर्यटकांचा मूड जाणार नाही ह्याची आम्ही काळजी घेतो. ’पर्यटकांना कधी सांगायचं?’ जनरली लागलीच सांगायचं आणि त्याचं सोल्यूशनही द्यायचं ही पद्धत आम्ही वीणा वर्ल्डमध्ये अवलंबतो.
’कधी?’ ही गोष्ट आयुष्यात फार महत्वाची आहे. आपल्याला आपल्या आईबाबांनी कधीतरी एखादं कांड केल्यावर सुनावलेलं असतंच, ’तुला नं कधी कुठे काय बोलायचं ह्याचं भान म्हणून नाही.’ आठवा तर कधीतरी ही वेळ आलीच असणार. मला तर खूपदा हे ऐकायला मिळालंय. कधी कधी छडीच्या प्रसादासह, तेव्हा कुठे थोडं शहाणपण आलं. नंतर मात्र व्यवसायच असा मिळाला की ’कधी?’ ह्या गोष्टीचं भान सतत ठेवावच लागलं. म्हणजे पुर्वी मी टूर मॅनेजर असताना किंवा आता आमच्या टूर मॅनेजर्सना ’कधी?’ ह्याचं भान नसलं तरी आली की पंचाइत. टूरचेच बारा वाजतील. म्हणजे बघानं टूरवर एखादी आनंदाची बातमी आमचा टूर मॅनेजर रडक्या चेहर्याने देतोय किंवा एखादी मोठी अडचण आणि त्यामुळे होणारा त्रास हसर्या चेहर्याने सांगतोय तर काय होईल? म्हणजेच हसायचं कधी आणि रडायचं कधी हे जर टूर मॅनेजरला किंवा आपल्यापैकी कुणालाही कळलं नाही तर होणार्या परीणामांची कल्पनाच केलेली बरी. पण जगभरातील म्हणजे अगदी अंटार्क्टिकापासून अंदमानपर्यंत सप्तखंडातील सहली याक्षणीही सुरू आहेत आणि अगदी आनंदात सुरू आहेत त्यामुळे आमच्या ह्या तीनशेहून अधिक टूर मॅनेजर्सना ’कधी?’चं महत्व कळलं आहे असं म्हणायला हरकत नाही.
पुर्वी मी टूर मॅनेजर म्हणून असताना पर्यटकांना एक सल्ला देत असे माझ्या अनुभवांतून तो असा की, एखादी गोष्ट कधी करावी असा प्रश्न तुम्हाला पडेल शॉपिंग, भोजन आणि बाथरूम हॉल्ट या गोष्टींच्या बाबतीत, तर एक साधा मंत्र लक्षात ठेवा. ’खाऊ की नको?’ असं वाटलं की अजिबात खाऊ नका. पोट थोडं रिकामं राहिलं तर बरंच आहे. बाथरूम हॉल्टसाठी आपण बस थांबवतो तेव्हा अर्धी बस खाली उतरते आणि अर्धेजण ’जाऊ की नको?’ असा विचार करतात, त्याचक्षणी तो विचार सोडून द्यायचा आणि जाऊन यायचं बाथरूमला. आणि तिसरं म्हणजे शॉपिंंग करताना एखादी वस्तू आपल्याला आवडते पण आपण ’इथे घेऊ की पुढे घेऊ?’ हा विचार करतो आणि ती वस्तु तिथेच सोडून देतो. पुढे प्रवासात ती वस्तु कुठेही मिळत नाही आणि संपूर्ण टूरवर डोक्यात ती वस्तु घोळत राहते. आपण स्वत:ला कोसत राहतो आणि मूड घालवतो. त्यामुळे ’घेऊ की नको?’ हा प्रश्न आला की घेऊन टाकायची वस्तु आणि मुक्त व्हायचं त्यातून.
आता एवढं सगळं ज्ञान इथे कथन केल्यावर तुम्हाला वाटेल किती आखीव रेखीव असेल नाही माझं आयुष्य... पण कसलं काय. मी पण एक माणूसच नं. नोव्हेंबरमध्ये पोर्तुगालला गेले होते. प्रत्येक ठिकाणाहून एक काहीतरी चांगली मोठी सोविनियर वस्तु आणायची आणि घरी किंवा ऑफिसमध्ये ठेवायची ही सवय, जेणेकरून त्या आनंदी आठवणी डोळ्यासमोर सदैव राहतात. मला पार्तुगालची ओळख असलेला रंगीबेरंगी रूस्टर घ्यायचा होता. फातेमा श्राईनच्या समोरच्या दुकानात तो मला मिळालाही पण पुढे जास्त चांगला मिळेल हा विचार करीत मी तो घेतला नाही. म्हणजे फातेमानंतर मी आणि माझी मैत्रिण शिल्पा गोरे आम्ही सिंत्रा, लिस्बन, अलगार्व्ह... पार्तुगालच्या प्रत्येक शहरात तो रुस्टर शोधत होतो. शेवटी एका ठिकाणी पांढरा रुस्टर मिळाला तो घेऊन दुधाची तहान ताकावर भागवली. पण संपूर्ण टूरवर कलरफूल रूस्टर माझ्या डोळ्यासमोर रुंजी घालीत राहिला, तो अगदी आजतागायत. आता पुन्हा पोर्तुगालला जाऊन तो कलरफूल रुस्टर आणेपर्यंत काही खरं नाही. एका छोट्या ’कधी?’ ची महती न जाणल्यामुळे किती हा आर्थिक फटका!
Post your Comment
Please let us know your thoughts on this story by leaving a comment.