Published in the Saturday Lokasatta on 19 October 2024
...‘अरे यार आठ दहा दिवस जरा कुठे थोडे शांती संवर्धनाचे गेले असते तर मॅडमजी इथेच. लगे रहो अभी‘ अशा वातावरणाची शक्यता नाकारता येत नाही...
‘आम्हीही चाललोय तुम्हीही चला‘ सीरिज्मध्ये गेल्या दोन महिन्यात ग्रीनलँड आइसलँड आणि ट्युनिसिया माल्टा सिसिली झालं. अर्थात, काही कामांमुळे आम्हाला माल्टा करता आलं नाही पण आमच्या पर्यटकांसमवेत माल्टाआधीचे सात दिवस मस्त मजेत घालवायला मिळाले. ह्या महिन्यात आमचा दौरा ठरल्याप्रमाणे चिआंगराई चिआंगमाई फुकेत क्राबी असा. कुठे थंडीचं वातावरण तर कुठे एकदम उष्ण ट्रॉपिकल हवामान. त्यामुळे प्रत्येक वेळी बॅगेत कोणते कपडे भरायचे, वस्तु काय घ्यायच्या, हे सगळं मनात घोळायला सुरुवात होते. ‘अगं ह्या वेळी थंडीचे कपडे नको बरं का‘, हे मी आमच्या श्रृती वर्षाला सांगायलाही सुरुवात केली. आणि कुणकुण लागली, ‘चिआंगराई आणि चिआंगमाईला पूर आलाय. किमान महिना लागेल. हॉटेल्स साईटसीईंग प्लेसेस सर्वच बाढ़बाधित झालंय तेव्हा ह्या वेळी टूर बहुतेक पुढे ढकलावी लागणार‘. आणि टूर पुढे ढकलली गेली. मागच्या टूरला विमानप्रवासात बॅगा डीले झाल्या, ह्या वेळी टूरच डीले करावी लागली. म्हणजे पर्यटक टूर्सवर ॲक्च्युअली कोणकोणत्या दिव्यातून जातात ते आम्हाला अनुभवायला मिळतंय. ‘शॉपफ्लोअर रीॲलिटी‘ म्हणतात ती हीच. आनंदात टूरची तयारी करायला सुरुवात करायची आणि अशा अनपेक्षित गोष्टींना सामोरं जायला लागल्यावर मनाची काय अवस्था होते त्याचा अंदाज असला तरी आम्ही त्या मानसिकतेमधून जात होतो. थीअरी आणि प्रॅक्टिकल मधला फरक अनुभवत होतो. आयुष्य जे काही आपल्यासमोर आणून ठेवील ते, ‘स्वीकार लो‘ तत्वाप्रमाणे स्वीकारलं, आधी ‘अरे यार ये क्या हो गया!‘ असं झालं पण कधी कधी गोष्टी आपल्या हातात नसतात नं. आता वाट बघतोय वीणा वर्ल्डच्या फोनची आणि ह्या टूर पोस्टपोनमेंटच्या नव्या तारखेची. ह्यानंतर नोव्हेंबरमधल्या दिवाळी नंतरच्या कोरीया तैवान आणि डिसेंबरमधल्या टांझानिया झांझिबारकडेही डोळे लागलेयत. न झालेले देश बघण्याचा सपाटा जो लावलाय आम्ही आमच्या पर्यटकांसोबत.
आमची टूर पुढे ढकलली गेल्याची खबर मिळताच काही डीपार्टमेंट्समध्ये आनंद दिसला कारण आता त्यांना व्हर्च्युअली नाही तर फेस टू फेस समोरासमोर बसून त्यांच्या डीसीजन्सवर शिक्कामोर्तब करून घेता येणार होतं तर काही डीपार्टमेंट्समध्ये कदाचित, ‘अरे यार आठ दहा दिवस जरा कुठे थोडे शांती संवर्धनाचे गेले असते तर मॅडमजी इथेच. लगे रहो अभी‘ अशा वातावरणाची शक्यता नाकारता येत नाही. जोकिंग अपार्ट, पण टूर पुढे ढकलली गेली हे वास्तव होतं. आम्ही तेरा ऑक्टोबरपासून तेवीस ऑक्टोबरपर्यंत जे टूरवर असणार होतो ते आता इथेच आहोत म्हटल्यावर धडाधड पुढच्या आठवड्याचं कॅलेंडर भरायला सुरुवात झाली. आमच्या प्राची प्रधानला म्हटलं, ‘एक्सक्युज मी मॅडम, टूर पोस्टपोन झालीय पण ह्याचा अर्थ आम्ही ऑफिसला असू असा नाही. ही आमची कमावलेली सुट्टी होती. तिथे जाऊ शकत नसलो तरी दुसरीकडे कुठे जाणार नाही असं नाही नं. आम्हाला किमान मनातल्या मनात तरी सुट्टीचा आनंद मिळू दे. हा आमचा ‘ग्रेस टाइम‘ आहे आणि आमचा ग्रेस आनंद. ह्यावर तुझा अधिकार नाही. किमान आमचा वीकेंडतरी आमच्या मनासारखा होऊ दे‘. अर्थात गोष्टी तिच्याही हातात नाहीत त्यामुळे शेवटी संपूर्ण आठवड्याचं कॅलेंडर अगदी खचाखच भरलंच. प्राची आणि आम्ही सगळेच एका माळेचे मणी. आदत से मजबूर. ऑर्गनायझेशनच्या अगदी रोजच्या कामात ढवळाढवळ आम्ही करीत नसलो तरी इतर अनेक कामांमध्ये व्यस्तता आहेच त्यामुळे रखडलेली वा खोळंबलेली कामं होतील आणि त्याचं समाधान वेगळंच आहे किंवा असेल. सो चलो काम पे लग जाओ.
मनाचं काही खरं नाही हे मात्र खरं. आता टूर पोस्टपोन झाली ह्याचं वाईट वाटायला पाहिजे ते तसं वाटलं. चार नवीन जागा आपण बघणार होतो ते ह्या वेळी राहिलंच, पुढच्या दोन तीन महिन्यात होईल कधीतरी. पण टूर पोस्टपोन होण्यापेक्षा चला आता आपल्याला ग्रेस टाइम मिळाला ह्याचा आनंद मला जास्त झाला असं वाटतंय. ॲक्च्युअली ते बरोबर नाही पण मनाशी खोटं कसं बोलणार? ‘एथिकली-लीगली-मॉरली‘, ह्या टाटा ग्रुपने शिकविलेल्या व्हॅल्युज अखंड सोबत आहेतच नं. त्यामुळे मॉरली मला हे मान्यच करावं लागेल की, प्रथम वाईट वाटलेल्या ह्या गोष्टीचा नंतर आनंदच झालाय. त्याचं मी स्वत:च जेव्हा परिक्षण केलं तेव्हा जाणवलं की चिआंगराई चिआंगमाईला पूर येणं ही आपल्या हाताबाहेरची गोष्ट आहे. आपण घडवून आणलेली नाही त्यामुळे आपण आपल्याला त्यासाठी अपराधी धरणं आणि त्यावर काथ्याकूट करणं म्हणजे वेळेचा अपव्यय. तो टाळला पाहिजे. प्रत्येक गोष्ट घडण्यामध्ये वा घडण्यामागे नीयती वा तो जगन्नियंता ह्याचं काहीतरी कारण असणारच नं, मग त्यावर आपण डोकेफोड करून काय मिळवणार. काही गोष्टी त्याच्यावरच सोडून द्याव्या. म्हणतात नं, ‘इफ यू कॅन सॉल्व्ह द प्रॉब्लेम देन व्हाय वरी? ॲन्ड इफ यू कांट सॉल्व्ह द प्रॉब्लेम देन व्हॉट इज द यूज ऑफ वरिंग?‘ त्यामुळे आता ह्या मिळालेल्या वेळाचं सोनं करायचं एवढच हातात होतं आणि ते केलं, म्हणजे तसा प्रयत्न तरी केला.
कधी एखादा कार्यक्रम रद्द होतो, कधी ट्रेन वा विमान लेट होतं पण मनातल्या मनात आदळ आपट होत नाही. एकतर ह्या गोष्टी आधीच कल्पिलेल्या वा अपेक्षिलेल्या असतात. ‘इफ नॉट, व्हॉट?‘ ची सवय जी लागलेली असते बिझनेसमध्ये. आणि ती पर्सनल आयुष्यातही भरपूर उपयोगी पडते. विमान लेट झालं की मला आनंद होतो. आता ही गोष्ट चांगली नाही हे माहितीय पण होतो आनंद त्याला आता काय करणार. मग नेहमीचा एअरपोर्ट असेल तर सरळ पर्समधून पुस्तक बाहेर काढायचं आणि वाचायला सुरुवात करायची (प्रवासात आपल्या बॅगेत एक छोटं, खूप दिवसांपासून वाचायचं राहिलेलं, वजनाला हलकं असं पुस्तक असलंच पाहिजे). हा मोबाईलचा वेळ नसतो कारण तुम्ही जर विमानात असता तर तुम्हाला मोबाईल वापरता आलाच नसता आणि मोबाईलपासून डीटॉक्स तर आता गरजेचाच झालाय नं. सो ही सिच्युएशन अशी आहे की आपण त्या मोबाईलपासून, त्याला स्पर्श करण्यापासून स्वत:ला परावृत्त करू शकतो. हा आपल्याला मिळालेला ग्रेस टाइम आहे, त्यावेळी मोबाईल सोडून जे काही करता येणं शक्य असेल ते करायचं. मोबाईलचं गुलाम होणं टाळायचंच. इथे खूप ‘टू बी ऑर नॉट टू बी‘ होईल आणि तिथेच आपल्याला स्वत:ला पारखता येईल. माझ्यावर कंट्रोल माझा आहे की मोबाईलचा तेही जाणता येईल. मतितार्थ, हा वेळ मोबाईलचा नाही, आपल्या सभोवतालच्या बहुतेकांना माहिती असतं की आपण फ्लाइटमध्ये असणार आहोत तेव्हा तेही तुमचा विचार करणार नसणारेत. सो लेट्स रीलॅक्स, जस्ट रीड किंवा डोळे मिटून शांतपणे बसून राहूया. छोटं विपशना टाइम समजूया. मोबाईलमुळे जराही उसंत न मिळालेल्या मनाला थोडी विश्रांती देऊन, आपल्या आयुष्यात नक्की काय चाललंय ते जाणण्याचा प्रयत्न करूया. शांत होऊया खऱ्या अर्थाने. हे शक्य नसेल तर दुसरा उपाय असतो माझ्याकडे तो म्हणजे आजुबाजूच्या माणसांचं निरिक्षण करायचं त्यांच्या नकळत, नाहीतर एखाद्याला किंवा एखादीला का बरं बघत बसलोय ह्यामुळे भलताच प्रसंग ओढवायचा. माणसांचं निरिक्षण किंवा ‘पीपल वॉचिंग‘, ‘क्राऊड वॉचिंग‘ आणि त्यातून शिक्षण ही मोठ्ठी अपॉर्च्युनिटी असते. प्रवासात माणसं कोणत्या प्रकारचे कपडे घालतात, त्यांची बॅग कशी असते, ते एखाद्या स्मार्ट ट्रॅव्हलरसारखे कसे दिसतात, कुणी प्रवासाला साजेसा ड्रेस घातलाय, एअरपोर्ट वा एअरलाईन टीम कशी वागते, बोलते एक ना अनेक गोष्टी असतात. हा टाईमपास खूप शिकवून जातो, एक कवडीही खर्च न करता. जर विमान लेट झालंय आणि एखाद्या नवीन एअरपोर्टला मी असेन तर मग ह्या टोकापासून त्या टोकापर्यंत एअरपोर्ट पालथा घालायचा. विंडो शॉपिंग करायचं. काय नवनवीन गोष्टी आल्यायत ते बघायचं. खुर्चीत बसून रहायचं नाही. वॉक तर वॉक होतो आणि एअरपोर्ट स्टोअर्समध्ये जगात जे काही लेटेस्ट आहे त्याचं आकलनही होतं. ज्ञान ग्रहण करीत राहणं, शरीराची हालचाल करीत राहणं, मनाला काहीतरी नवनवीन पुरवणं... हे आपल्याला करता आलं पाहिजे कोणत्याही परिस्थितीत. बऱ्याचदा आपल्याला परिस्थिती बदलता येत नाही आणि म्हणूनच मन:स्थिती बदलता आली पाहिजे. तसं आपण स्वत:ला शिकवलं पाहिजे. वेळ लागतो हे आत्मसात करायला. मला साठ वर्ष लागली पण जेवढं लवकर हे समजेल उमजेल तेवढं चांगलं. आता काळ बदललाय, परिस्थिती सारखी किंवा अचानक बदलतेय आणि आत्ताच गरज आहे आपली मन:स्थिती आपल्या ताब्यात ठेवण्याची, त्या मन:स्थितीला वेळेनुरूप सकारात्मकरित्या फ्लेक्झिबल ठेवण्याची. असा अचानक मिळालेला ‘ग्रेस टाइम‘ एखाद्या वाऱ्याच्या झुळकीसारखा आनंद देऊन जातो. तो मिळवता आला पाहिजे, ते शंभर टक्के आपल्या हातात आहे, शक्यही आहे. लाइफ इज ब्युटिफुल, लाइफ इज प्रेशियस, लेट्स मेक द मोस्ट ऑफ इट!
Post your Comment
Please let us know your thoughts on this story by leaving a comment.