Published in the Saturday Lokasatta on 20 January, 2024
एखाद्या गोष्टीची ओढ वाटणं, ओढ लागणं ही परिस्थिती निर्माण करता येऊ शकते. सिच्युएशन्स कॅन बी टर्न्ड अराऊंड, हे आपल्याला वंदे भारत ट्रेनने दाखवून दिलं...
मागच्या आठवड्यात सेल्स पार्टनर्स मीट होती. म्हणजे हल्ली सर्व मिटिंग्ज झूम आणि टीम्स ह्या प्लॅटफॉर्मस्वरूनच होतात. थँक्यू ह्या निर्मात्यांना. गेल्यावर्षी सॅन होजे ला झूम’ हेडक्वार्टर्सच्या बिल्डिंगबाहेर गाडी थांबवून उतरले आणि मनापासून नमस्कार केला. कोविडच्या दोन वर्षात आपल्याला जिंवत ठेवण्यात, एकमेकांशी संपर्कात ठेवण्यात झूम’ देवासारखं धावून आलं. तसं म्हटंल तर आम्ही हा असा वेडेपणा करतो म्हणजे मी आणि सुनिला गाडी हायर करून अॅपल गुगल कॅम्पसना भेट देतो किंवा प्रदक्षिणा घालून परत येतो. कॅलिफोर्नियाच्या क्युपरटिनोमध्ये असलेल्या अॅपलच्या हेडक्वार्टर्सच्या शो रूममध्ये जाऊन त्या युएसए टूरची आठवण म्हणून नवीन काहीतरी अर्थातच गरजेचं विकत घेतो. भले ह्या कंपन्या पूर्णपणे कमर्शियल असतील, ’दे मीन बिझनेस!’ अशा असतील, पण त्यांनी आपल्या आयुष्याला इतकं सोप्पं करून टाकलंय की मला ही आधुनिक तीर्थक्षेत्र वाटतात आणि मग त्यांच्याप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आम्ही त्यांचं दर्शन घेतो. असो.
आमच्या ह्या सेल्स पार्टनर्स मीटमध्ये ज्यांना कुणाला यायचंय ती मंडळी येतात आणि व्हर्च्युअल मिटिंग्जचा डिटॉक्स घेतल्याप्रमाणे आम्ही तीन चार तास एकमेकांशी प्रत्यक्ष संवाद साधतो. त्यांचे प्रश्न आणि आमची उत्तरं असा सर्वसाधारण अजेंडा, किंवा ह्या ’नो अजेंडा’ मिटिंग्जच असतात. प्रत्यक्ष एकमेकांना भेटूया बोलूया आणि मग काही प्रश्न असतीलच तर ते सोडवूया‘ एवढीच अपेक्षा. हा संवाद सुरू असताना एका पार्टनरने म्हटलं की, ’आपण ट्रेन ने टूर्स का करीत नाही?’ आम्ही काही म्हणायच्या आत दुसर्याचं म्हणणं, ’नाही नाही हल्ली कुणीही ट्रेनने जायला बघत नाही. एवढा वेळ कुणाकडे आहे?’ बर्याच जणांनी ’हो खरंय ते’ म्हणत मान डोलावली. तेवढ्यात एक आवाज आला, ’अरे पण तुम्ही ’वंदे भारत’ ट्रेनने गेलाय का कधी? काय मस्त ट्रेन्स आहेत. नीटक्लीन, हायस्पीड, ऑटोमेटेड डोअर्स, फायर सेन्सर्स, सीसीटीव्ही कॅमेरा, वाय फाय फॅसिलिटी, बॅटरी बॅक अप, जिपीएस असा मस्त सरंजाम असलेल्या ह्या ट्रेन्स खरंच खूप छान आहेत.’ आणि मग सुरू झाला वंदे भारत ट्रेन्सवर संवाद.
सगळ्यात महत्वाची गोष्ट मला जाणवली ती म्हणजे ह्या वंदे भारत ट्रेनच्या प्रति सर्वांच्या मनात असलेला अभिमान. म्हणजे इथे कालचक्र उलटं फिरताना दिसलं. एक जमाना होता जेव्हा आम्ही आणि पर्यटक फक्त ट्रेनने प्रवास करायचो. नंतर ट्रेन किंवा विमान असा पर्याय उपलब्ध झाला. पण व्हायचं काय की ट्रेनने येणारा पर्यटक आणि विमानाने येणारा ह्यात भेदभाव दिसायचा पर्यटकांमध्येच. म्हणजे ट्रेनने येणार्या पर्यटकांमध्येही ते असायचं, जो सेकंड क्लासमध्ये असायचा तो खालचा आणि जो एसीत असायचा तो वरचा. तेच मग विमानाच्या बाबतीत झालं. जो ट्रेनमध्ये एसीत असायचा तो खालचा झाला आणि जो विमानाने यायचा तो वरचा. पुर्वी जेव्हा ट्रेन आणि विमानाने आलेले पर्यटक एकाच टूरमध्ये असायचे तेव्हा विमानाने आलेल्यांपैकी काही पर्यटक एअरलाइनचा टॅग पर्सला वा बॅगेला तसाच ठेवायचे कारण इतरांना कळावं की ते विमानाने आलेयत. हळूहळू वेळ महत्वाचा झाला आणि विमानप्रवास आयुष्याची एक महत्वाची गरज बनला. ट्रेनचा प्रवास आम्हीही विसरलो आणि पर्यटकही. ट्रेनने जाणं वेळखाऊ होतच पण स्वच्छता, भोजन ह्या बाबतीत मध्यम वर्गाने एअरपोर्ट्स आणि तिथल्या एकूणच फॅसिलिटीज्ना आपलंसं केलं. अर्थात राजधानी एक्सप्रेस, शताब्दी एक्सप्रेस, तेजस एक्सप्रेस, गतिमान, दुरांतो अशा छान छान ट्रेन्सनी लोकांच्या मनातला रेल्वेप्रतीचा आदर जिवंत ठेवला होता आणि आता वंदे भारतने तर कमालच करून दाखवली. लोकांचा रेल्वेवरचा विश्वास वाढला, नव्हे रेल्वेने जाणं त्यांना अभिमानाचं वाटायला लागलं. घराघरात, मित्रमैत्रिणींमध्ये वंदे भारतवर चर्चा होऊ लागली. वंदे भारतचा प्रवास एक अॅस्पिरेशन बनला आणि लोक रेल्वेकडे वळले. रेल्वेने फिरताना वाटणारा कमीपणा कमी झाला. परदेशी कसं, ट्रेन विमान ह्यात भेदभाव नसतो. एका जागेहून दुसर्या जागी जाताना ‘सुटेबल मोड ऑफ ट्रान्सपोर्ट‘ असंच त्याकडे पाहिलं जातं आणि हे कमीपणाचं ते मोठेपणाचं हा विचार नसतो. आणि तसंच असलं पाहिजे. ते ह्या वंदे भारत एक्सप्रेसच्या बाबतीत होताना दिसतंय. ’मी ट्रेनने चाललोय, मी वंदे भारत ने चाललोय, मी तेजस एक्सप्रेस बूक केलीय फॅमिलीसाठी’ हे घडतंय. मी आणि सुधीरने सुद्धा दोन प्रवास प्लॅन केले आहेत वंदे भारत ट्रेनने. थँक्यू टू श्री सुंधाशु मणी आणि त्यांची टिम ज्यांनी ’मेक इन इंडिया’ अंतर्गत ही ट्रेन प्रत्यक्षात उतरवली. आपल्या माननीय पंतप्रधानांनी सतत आत्मनिर्भर भारत‘ द्वारे ह्या प्रकल्पासाठी प्रोत्साहन दिलं आणि आज एक्केचाळीस वंदे भारत एक्सप्रेस भारतात आपल्याला एका ठिकाणाहून दुसर्या ठिकाणी घेऊन जाताहेत. आणि अशा पाचशे ट्रेन्स बनविण्याचा त्यांचा मानस आहेत. ह्यामध्ये आता स्लीपर ट्रेन्सही येताहेत. महत्वाचा मुद्दा हा आहे की वंदे भारतने प्रवाशांना पुन्हा रेल्वेकडे खेचलं. भारतीयांना रेल्वेची ओढ लावली. रेल्वेविषयी अभिमान जागृत केला.
एखाद्या गोष्टीची ओढ वाटणं, ओढ लागणं ही परिस्थिती निर्माण करता येऊ शकते. सिच्युएशन्स कॅन बी टर्न्ड अराऊंड, हे आपल्याला वंदे भारत ट्रेनने दाखवून दिलं. ’अरे यार ह्यावेळी मला बोअरिंग रेल्वेने जावं लागणार आहे’ ह्या ऐवजी, ’अरे तुला माहितीय मी वंदे भारतने जाणार आहे. काय मस्त ट्रेन आहे. टू गूड एकस्पीरियन्स, मला हल्ली विमानापेक्षा रेल्वेच बरी वाटते’ हा बदल घडविण्याची क्षमता आपल्याच देशाने, आपल्याच माणसांनी दाखवून दिली. ‘आय हॅव टू’ वरून ’आय वॉन्ट टू’ कडे आपल्याला वळवलं.
सेल्स पार्टनर्सच्या मिटींगने मला विचारात पाडलं. ह्या एका ट्रेनने परिस्थिती बदलली, मनस्थिती बदलवली. ओढ निर्माण केली. आपल्या घरच्या बाबतीत मी विचार करायला लागले. मला घराची ओढ वाटते का? वर्षातले सहा महिने मी महाराष्ट्राबाहेर किंवा देशाबाहेर असते. मला परदेशातच रहायला आवडतं की आपल्या घरी यायची ओढ असते? आणि जर मला जाणवलं की मला बाहेर फिरायलाच बरं वाटंत, घरी यायची ओढ वाटत नाही तर मला जागं व्हावं लागेल, शोधून काढावं लागेल काय कारण आहे की मला माझ्या घराची ओढ का वाटत नाही. घर अस्वच्छ आहे म्हणून? घर भांडणाचं आगार आहे म्हणून? घरातली माणसं माझं ऐकत नाहीत म्हणून? फक्त स्वत:लाच नाही तर माझ्या घरच्या माणसांना घरी यायची ओढ वाटतेय की नाही हे पण चेक करायला हवं. आणि मग सगळ्यांनी मिळून प्रयत्न करून रेल्वेसारखी सिच्युएशन बदलली पाहिजे. घराची ओढ असलीच पाहिजे असं मला वाटतं. आमच्या घरी असलेल्या, आम्हाला सांभाळणार्या वर्षा आणि श्रृतीला त्यांच्या इंडक्शनमध्ये सांगितलंय की, ’तुम्हाला एकच लक्षात ठेवायचंय की हे एकच घर आहे आपलं आणि ते ’घर एक मंदिर’ सारखं आपण जपलं पाहिजे, ठेवलं पाहिजे.‘
जे घराचं तेच शाळेचं. इथेही आपल्याला चेक करायचंय की शाळेत जायची ओढ आपल्या मुलांना आहे की नाही? आणि इथे शाळांनी जास्त करून ती ओढ लागण्यासाठी काम केलं पाहिजे. मुलं शाळेत जायला कंटाळा करीत असतील तर शाळेने आत्मपरिक्षण केलं पाहिजे. मुलांनी आनंदात शाळेत गेलं पाहिजे आणि शाळा संपल्यावर घरी यावंसं वाटलं पाहिजे मुलांना.
रोज सकाळी ऑफिसला जायची ओढ असणं आणि संध्याकाळी घरी यायची ओढ असं असेल तर आपण आपलं करियर, आपलं घर, आणि आपलं आयुष्य चांगल्या तर्हेने मार्गी लावलंय असं म्हणता येईल. आणि या गोष्टी अशा आपोआप नाही होत. त्यासाठी विचारपूर्वक खूप काम करावं लागतं. म्हणतात नं आयुष्य ही अडथळ्यांची शर्यत, मग ते अडथळे मस्तपैकी सोडविण्याची आपली तयारी असली पाहिजे.
आमच्या कॉर्पोरेट ऑफिसमध्ये आम्ही फॉलो करीत असलेल्या दहा कमांडमेंट्स लिहिल्या आहेत, त्यात एक आहे ’अॅम आय पॉप्युलर अॅन्ड डाऊन टू अर्थ?’ आपण स्वत:च आपल्याला चेक केलं पाहिजे सतत. ऑर्गनायझेशनमध्ये अनेक लीडर्स असतात आणि ऑर्गनायझेशन चालविताना आपलं लक्ष्य पाहिजे ह्या सर्व लीडर्सकडे. लीडर्ससोबत रहायची, लीडरशी बोलायची ओढ त्यांच्या टीम मेंबर्सना वाटते का? हे बघितलं पाहिजे. लीडरच्या सक्सेस मंत्रातील अनेक गोष्टींपैकी ही एक गोष्ट, जी त्या लीडरनेही सतत चेक केली पाहिजे. थोडक्यात स्वत:ला आत्मपरिक्षणाची सवय लावली पाहिजे.
आपल्याला घराची ओढ, मुलांना शाळेची ओढ, तरूणांना करियरची ओढ, प्रत्येकालाच कामाची ओढ... ह्या सगळ्यात टॉपला आहे ते आपल्याला आपल्या देशाची ओढ असणं. छान देश निर्माण करण्याची जबाबदारी मोठ्या प्रमाणावर राजकारण्यांची आहे पण ज्या आपल्या एकेकाने हा देश बनला आहे त्या आपण प्रत्येकाने एक चांगला/ली नागरिक बनण्याची जबाबदारी पार पाडायचीय. बराच ब्रेन ड्रेन ऑलरेडी झाला आहे. जागं होऊया. आपल्या स्वत:पासून, घरापासून सुरुवात करूया. आपलं कर्तव्य चांगल्या तर्हेने पार पाडूया आणि खर्या अर्थाने आपल्या सुजलाम सुफलाम भारताची ओढ आपल्या पुढच्या पिढीला असेल ह्यासाठी योगदान देऊया. फक्त भारतीयांनाच नव्हे तर फॉरिनर्सना देखील आपल्या भारतात यायची ओढ वाटली पाहिजे असं काम आपल्याकडून झालं पाहिजे आणि ते आपलं लक्ष्य असलं पाहिजे .
veena@veenaworld.com
Post your Comment
Please let us know your thoughts on this story by leaving a comment.