का कुणास ठावूक किंवा माझ्या डोक्यात मगासच्या चर्चेतले मुद्दे एवढे परीणाम करून गेले की मी ते पुस्तक हातात घेतलं नाही.एवढ्या झपाट्याने वाचीत असलेलं ते पुस्तक अर्धवटच राहिलं...
Published in the Saturday Lokasatta on 06 April, 2024
सततचा प्रवास आणि कामांचं प्रेशर ह्यामुळे अक्चुअल पुस्तकं वाचणं थोडं मागे पडलं होतं. त्यात मध्येच इ-बूक्स, आय बूक्स, पॉडकास्ट, व्होडकास्ट ह्या सगळ्याचा भडिमार झाला. काम करता करता एखादं पुस्तक कुणीतरी वाचून दाखवित असेल तर सो कॉल्ड मल्टिटास्कींग असण्याच्या अभिमानाला पुष्टी मिळाली आणि खास वेळ काढून एका जागी बसून हातात पुस्तक घेऊन वाचणं वेळेचा अपव्यय वाटायला लागण्याची मानसिकता तयार झाली. पण पॅन्डेमिकने घरी बसवलं आणि दृकश्राव्य माध्यमांचा अतिरेक झाला, टीव्ही स्क्रीन नकोसा वाटायला लागला आणि बूक शेल्फमधली पुस्तकं ‘डोन्ट वरी, वुई आर विथ यू‘ म्हणत आनंदाने साथीला आली. सकाळी वाचायचं एक पुस्तक आणि रात्री वाचायचं एक पुस्तक अशी वेगवेगळ्या विषयाची दोन पुस्तकं अवतीभोवती असण्याची आणि त्यातला किमान एक चॅप्टर रोज वाचण्याची जूनी सवय पुन्हा एकदा दिनचर्येमध्ये यायला लागली. कष्ट पडत होते पण नेटाने स्वत:ला दामटवत होते. काही दिवसांच्या परिश्रमांनंतर जुनी सवय नव्याने अंगिकारली गेली. त्यावेळी इंद्रा नूयी चं ‘माय लाइफ इन फुल्ल‘ हे आत्मचरीत्र बेस्ट सेलर्स लिस्टमध्ये सर्वत्र दिसत होतं. जग पूर्वपदावर येत होतं, पुस्तकांची दुकानं खुणावित होती. ऑनलाइन ऑर्डर करण्यापेक्षा मला किताब खाना वा क्रॉसवर्डमध्ये जाऊन पुस्तकं घ्यायला खूप आवडतं. म्हणजे एका पुस्तकासाठी जायचं आणि पुस्तकांची भली मोठी थप्पी घेऊन बाहेर पडायचं. सुधीरच्या चेहऱ्यावर ‘कधी तू वाचणार एवढं?‘ असा भाव दुर्लक्षित करणं हे आता माझं रूटीन झालंय आणि त्याच्याही अंगवळणी पडलंय, म्हणजे असावं. तर मी एकदाचं हे इंद्रा नुईचं पुस्तक आणलं आणि वाचायला सुरुवात केली. एका असामान्य कर्तृत्ववान महिलेने सोप्या भाषेत लिहिलेल्या ह्या प्रेरणादायी पुस्तकाचा जमेल तसा फडशा मी पाडत होते. एक दिवस बिल्डिंगमध्ये असंच एकत्र जमलो होतो. गप्पांमध्ये वाचनाचा आणि पुस्तकांचा विषय निघाला. कोण काय वाचतंय चर्चा सुरू झाली. ‘अरे मैं इंद्रा नुई का `माय लाइफ इन फुल्ल’ पढ़ रही हूँ, टू गूड यार, कभी खत्म करू एैसा हुआ है।‘ मी बोलताच क्षणी, ‘अरे यार इट्स अ बिग मार्केटिंग‘ एक आवाज. ‘व्हॉटेएव्हर शी सेज, आफ्टरऑल व्हॉट शी सोल्ड वॉज ऑल नॉट ॲट ऑल हायजिनिक‘ दुसरा आवाज. ‘अरे वो प्रॉडक्टसने लोगों की जिंदगीयाँ बरबाद की‘ तिसऱ्याचं अनुमोदन. गप्पा संपवून मी घरी आले. का कुणास ठावूक किंवा माझ्या डोक्यात मगासच्या चर्चेतले मुद्दे एवढे परीणाम करून गेले की मी ते पुस्तक हातात घेतलं नाही. काहीतरी कारण काढीत मी त्या दिवशी पुस्तकापासून दूर गेले. आणि मग रोज तेच घडायला लागलं, एवढ्या झपाट्याने वाचीत असलेलं ते अतिशय चांगलं पुस्तक अर्धवटच राहिलं.जनरली ऐकावे जनाचे आणि करावे मनाचे ह्या मानसिकतेची मी. एकदा एका चर्चासत्राला गेले होते. मुलाखतकाराचे प्रश्न आणि आमची दिलखुलास उत्तरं असा कार्यक्रम बऱ्यापैकी रंगला. कार्यक्रम संपल्यावर एका श्रोत्यांनी येऊन म्हटलं, `तुम्ही दिलेली सर्व उदाहरणं छान होती पण अमूक एका जोडीचं उदाहरण खटकलं, अहो त्यांना मी जवळून ओळखतो. चकाकतं ते सर्व सोनं नसतं. अहो, अर्ध्या गोष्टी मार्केटिंगसाठी केलेल्या असतात’. आता ही खरंतर एका श्रोत्याची प्रतिक्रिया, त्याचं मत. त्याचा आपल्यावर कशाला परीणाम व्हायला हवा? पण पुढे कधीही भाषणात किंवा चर्चासत्रात हे नाव घ्यायची वेळ आली की मी मागे हटायचे. एक साधी कमेंट असा परिणाम करून गेली. शाळेत असतानापासून अनेक भारतीयांप्रमाणे मी अमिताभ बच्चनची फॅन. रद्दीच्या दुकानात जाऊन फिल्मी मॅगझिन्स आणायची, त्यातनं फोटो कापून त्याचा अल्बम बनवायचा असे उद्योगही करून झाले. दोस्ताना चित्रपटाच्या शूटिंगच्या वेळी अमिताभ बच्चनला भेटायची संधी मिळाली. त्याला तो अल्बम दाखवला, त्यानेही तो अतिशय सहृदयतेने पंधरा मिनिटं चाळला आणि त्याची रूबाबदार सही त्यावर केली. पुढे कितीतरी वर्ष तो अलब्म अगदी मी जपून ठेवला होता. नंतर तो कुठे हरवला माहीत नाही, कदाचित आयुष्यात जोडीदार म्हणून सुधीरची एन्ट्री झाल्यावर हे फॅन प्रकरण मागे पडलं असावं. असो, सांगायचा मुद्दा असा की अमिताभ बच्चन स्ट्रगलर असण्यापासून गेली साठेक वर्ष चित्रपट सृष्टीचा महानायक बनून राहिल्याचं उदाहरण आम्ही आमच्या कॉर्पोरेट ट्रेनिंगमध्ये अनेकदा वापरतो. बॉलीवूड टॉलिवूड हॉलिवूड वा क्रिकेट विश्वातली उदाहरणं एवढ्याचसाठी वापरतो कारण ती पटकन समोरच्यांच्या गळी उतरतात. एखादा मुद्दा पटवून द्यायला बरी पडतात ही उदाहरणं आणि त्यासाठी मग रणवीर सिंग, अक्षय कुमार, कंगना रनौत ह्या सारख्या स्वकर्तृत्वावर स्वत:चं स्थान उच्चपदावर घेऊन गेलेल्या अनेकांची लाइफस्टोरी खूप कामी येते. पण मग कधीतरी एखादा सूर ऐकायला येतोच `अरे तुम्ही एवढं अमिताभचं उदाहरण देताय पण तुम्हाला माहितीय का, कॅमेरासमोरचा अमिताभ आणि कॅमेरा हटल्यानंतरचा अमिताभ ह्यामध्ये जमिन अस्मानाचा फरक आहे. अनेक सिने कलाकारांच्या बाबतीत तर, तुला माहितीय का, त्याचं किती जणींशी ‘लफडं‘ आहे ते, अशा लोकांची काय उदाहरणं घ्यायची?’आत्ताच्या आमच्या युएसए च्या वास्तव्यात सुनिलाचा पूर्वीचा शेजारी रोमी विश्वनाथन भेटला, हीच चर्चा आम्ही करीत होतो. कुणाला आदर्श मानायचं हल्ली कळत नाही. एव्हरीवन हॅज स्केलेटन्स इन द बॅकयार्ड. मी म्हटलं कुठेतरी एकदा वाचलं होतं ‘जे जिवित आहेत त्यांना आदर्श मानू नका, जे ह्या जगातून चांगलं काम करून निघून गेलेत त्यांना आदर्श माना. किमान त्यांच्यातरी काही अशा वेड्यावाकड्या गोष्टी समोर येणार नाहीत‘ त्यावर रोमी म्हणतो, ‘अरे आजकल गुजरे हुअे लोगों की भी बहौत सारी कॉन्ट्रोव्हर्शियल बाते सामने आती हैं। सिर्फ भगवान को या मायथॉलॉजिकल कॅरॅक्टर्सको आदर्श मानो।आदर्श कोण असावं, विचार कुणाचे ऐकावेत हे प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे. त्यावर अनेक चर्चासत्र वा वादविवाद होऊ शकतात पण आता मी एक शिकलेय की, ‘अरे तुझे पता है क्या...’ `तू उसकी असलियत नहीं जानती?‘ ‘अरे हे सगळे दाखवायचे दात आहेत, वस्तुस्थिती काहीतरी वेगळीच आहे...‘ असे किंवा अशासारखे `गॉसिपी’ विषय आले की त्यापासून जरा दूरच रहायचं. महत्वाचं म्हणजे कधी कधी दूर नाही राहता आलं तरी ह्या असल्या कमेंट्सचा असर आपल्यावर पडू द्यायचा नाही. आपली सारासार बुद्धी सतत जागृत ठेवायची आणि पुढे जायचं. कारण ह्या अशा थोड्याशा जेलसीमुळे म्हणा कुणीतरी केलेल्या कमेंट्सचा परिणाम होतो आपल्यावर कळत नकळत. बॅक ऑफ द माईड कुठेतरी ती कमेंट चिकटून राहते. बघानं इंद्रा नुईचं चांगलं पुस्तक त्यावेळी मी अर्धवट सोडलं एका चर्चेतल्या त्या दोन तीन कमेंट्समुळे. खरंतर माझी सद्सद् विवेकबुद्धी मी जागृत ठेवायला हवी होती की, तामिळनाडू मधल्या एका साध्या सर्वसामान्य घरामधल्या मुलीने हे असामान्य यश संपादन केलं होतं. अनेक अॅस्पायरिंग मुलामुलींना भविष्याकडे उमेदीने बघण्यासाठी आणि ‘एव्हरिथिंग इज पॉसिबल इफ यू वर्क टूवर्डस इट होल हार्टेडली-ऑनेस्टली‘ हा एक अतिशय चांगला संदेश देणारं तिचं आयुष्य तिने सर्वांसमोर खुलं केलं आहे. खरंतर अशी पुस्तकं वाचणं आणि त्यावर चर्चा करणं हे शाळा कॉलेजेसमध्ये नित्यनेमाने झालं पाहिजे. लहान वयात मनाची जडणघडण होत असतानाच ह्या चरीत्रांचा चांगला परिणाम होऊ शकतो. अमेरिकेत एका बलाढ्य कंपनीत एका महिलेने ग्लास सीलिंग तोडत, जिद्दीने आणि धैर्याने कॉर्पोरेट लॅडर चढत उच्चपदाला पोहोचणं ह्या अतुलनीय कर्तृत्वाकडे आपण बघितलं पाहिजे. आता ही बलाढ्य कंपनी जे काही बनवते ते अनहेल्दी आहे हे अमेरिकाच नव्हे तर जग कुठे मानायला तयार आहे. त्यामुळे तिथे आपण लक्ष द्यायचं नाही. कारण ते बघायला गेलं तर जगातल्या अर्ध्याअधिक कंपन्या रद्दबातल ठरतील. हिच गोष्ट अनेक प्रसिद्ध व्यक्तीमत्वांची किंवा सिने कलाकारांची, क्रिकेटर्सची. वयाची ऐंशी वर्ष पार केल्यानंतरही तरुणांना लाजवील अशी कारकिर्द गाजविणाऱ्या अमिताभकडून आपण जिद्ध उत्साह आत्मविश्वास घ्यावा. खूप खोलात जाऊ नये. तुम्ही आम्ही आणि ते कुणीही परफेक्ट नाहीत आणि नसणार आहोत कारण `परफेक्ट’ असं काही नसतंच. परिपूर्णतेच्या मार्गावरचे आपण सा प्रवासी आहोत असं फारतर म्हणता येईल.एखाद्याने मारलेला रीमार्क कसा परीणाम करतो ह्यासाठी मार्केटिंग मॅनेजमेंटमध्ये चांगलं उदाहरण दिल जातं. माणसं किंवा ग्राहक वस्तु कशी खदी करतात आणि सभोवतालचे लोकल इन्फ्लूएन्सर्स म्हणजे शेजारी, मित्रमंडळी वा डॉक्टर्स टीचर्स कसे इन्फ्लूएन्स करतात हे बघूया. एखादा फोन घ्यायचा असतो, आपण नेटवर जाऊन त्याची सगळी कुंडली काढतो, रीव्ह्यूज बघतो, प्राइस कम्पेअर करतो आणि भल्यामोठ्या गोफ्लधळात टाकणाऱ्या त्या अनेक फोन्सच्या ऑप्शन्समधून सॅमसंग आणि व्हिवो ही दोन मॉडेल्स आठवडाभराच्या अथक मेहनतीनंतर झिरो डाऊन करतो. आता काम सोप्पं असतं. दुसऱ्या दिवशी शोरूममध्ये जाऊन दोघांपैकी एकाची निवड करायची. आणि आपण फोन हातात आल्याची स्वप्न रंगवू लागतो. खदीच्या आदल्या दिवशी आपला एक मित्र बऱ्याच दिवसांनी भेटायला येतो. हवापाण्याच्या गप्पा झाल्यावर आपसूकच फोनचा विषय निघतो. आपण उद्या सॅमसंग वा व्हिवो मधला एक फोन खदी करणार म्हटल्यावर तो म्हणतो, `अ वेडा आहेस का, आजच्या जमान्यातल्या सर्वात उत्कृष्ट फोन आहे तो म्हणजे हा वन प्लस नॉर्ड 5G. झाSSSलं! एवढ्या दिवसांची मेहनत वाया गेली म्हणजे. दुसऱ्या दिवशी आपण सॅमसंग आणि व्हिवो बाजूला ठेवतो. मित्राने सांगितलेला वन फ्लस फोन घेऊन घरी येतो.दुसऱ्याच्या सांगण्यावरून आपण अनेकदा आपल्या आयुष्यातले महत्वाचे निर्णय घेत असतो. एका परीटाच्या सांगण्यावरून किंवा कमेंटमुळे नाही का सीतेला अग्नीपरीक्षा द्यावी लागली. सो, सध्याचे क्रीएटर इकॉनोमीवाले, पिअर प्रेशर्स, मित्र मैत्रिणी, चित्रपट, पॉडकास्टस ह्या सगळ्याचा सुळसुळाट आहे. त्याचा कितीही इन्फ्लुएन्स झाला तरी शेवटी योग्य निर्णय घेणं हे आपल्या हातात आहे. काय चांगलं काय वाईट ह्याचा निर्णय आपल्यालाच घ्यायचा असतो. वुई मस्ट हॅव अ स्ट्रॉंग कंट्रोल ओव्हर अवर माईड!
Post your Comment
Please let us know your thoughts on this story by leaving a comment.