Published in the Sunday Sakal on 22 September, 2024
ठरल्याप्रमाणे आम्ही टुनिसियाला पोहोचलो. आमची पहिलीच वेळ टुनिसियाला यायची तसंच आमच्या पर्यटकांचीही आणि पर्यटकांचीच नव्हे तर आमच्या टूर मॅनेजरचीही. एखाद्या टूर मॅनेजरची जेव्हा पहिली वेळ असते एखाद्या देशात पर्यटकांना घेऊन जायची तेव्हा तो टूर मॅनेजरही तसाच सरावलेला आणि कॉन्फिडन्सवाला असावा लागतो. अशा कसलेल्या टूर मॅनेजर्सची मोठी फळी आहे आमच्याकडे आणि त्यातलाच विहार ठाकूर हा आमचा टूर मॅनेजर आहे या ‘टुनिसिया माल्टा सिसिली' टूरचा. आमची सर्वांची ही पहिली टूर आहेच पण ह्या देशांना आणि प्रदेशांना भारतातून असा मोठा ग्रुप येण्याचीही ही पहिलीच वेळ आहे. म्हणजे टुनिसिया माल्टा ह्या देशांना जायचा विचार आपले भारतीय पर्यटक करीत नाहीत. जग बऱ्यापैकी बघून झाल्यावर कुणीतरी ह्या देशांच्या वाटेला जातं. सिसिली हा इटलीतला दक्षिण भाग. इटलीमध्ये रोम पिसा व्हेनिस ह्या उत्तरेकडच्या नेहमीच्या ठिकाणांना भेट देण्यासाठी आम्ही अक्षरश: हजारो पर्यटक भारतातून घेऊन जात असतो. आतासुद्धा गणपतीनंतर सत्तर टूर्सवर पर्यटक युरोपमध्ये धम्माल करताहेत. त्यातल्या चाळीसएक टूर्सतरी इटलीतल्या ह्या नेहमीच्या ठिकाणांना असतील. पण सिसिली पालेर्मो ह्या भागाचा विचार आम्हीही तसा उशीराच केला. 'गॉडफादर' सिनेमा अनेकदा बघितल्यामुळे सिसिलीचा प्रदेश खुणावत होता पण ती वेळ यावी लागते म्हणतात त्याप्रमाणे सिसिलीला यायला आम्हाला इतकी वर्ष लागली. खूप वर्षांनी आणि कोविडनंतर पहिल्यांदाच आम्ही टूरिस्ट म्हणून वीणा वर्ल्डच्या टूरवर आलोय. आमचं दोघांचंही अर्ध आयुष्य गेलं ‘टूर मॅनेजर' म्हणून टूर्स करण्यात किंवा नंतर वुमन्स स्पेशल आणि सिनियर्स स्पेशल सोबत टूर करण्यात. आमची 'टूर मॅनेजरशिप' संपवली आमच्या 'मैं हूँ ना' म्हणणाऱ्या आणि आम्हाला ऑफिसमध्ये बसविणाऱ्या आमच्या टूर मॅनेजर्सनी. कोविडनंवर वुमन्स वा सिनियर्सबरोबर जाण्याची शक्यताही संपली कारण दररोज देशाच्या वा विदेशाच्या कुठच्यातरी कानाकोपऱ्यात ह्या टूर्स सुरू असतात. एवढ्या मोठ्या संख्येने आणि विश्वासाने महिला आणि ज्येष्ठ नागरिक पुन्हा पुन्हा येत असतील तर त्याचा अर्थ आमचे टूर मॅनेजर्स आणि त्यांच्यापाठी असलेली आमची ऑफिस टीम त्यांचं काम ठिक करताहेत. आता ऑफिसमध्ये बसून निगराणी करणं हे आमचं काम, पण आमचं भटकंती करणारं मन आणि पाय कुठे शांत बसायला तयार आहेत? आमच्या थांबलेल्या जगभ्रमंतीला सुरू करण्यासाठी काहीतरी बहाणा हवा होता, बाकीच्यांना पटेल असा. सर्वांचं अप्रुव्हल घ्यावं लागतं नं. मनापासून विचार केला तर नित्यनूतन संकल्पना सुचत राहतात आणि त्यातूनच आली ही नवे देश प्रदेश पाहण्याची आणि ‘आम्हीही चाललोय तुम्हीही चला'ची आयडिया. ह्या ऑगस्ट ते फेब्रुवारीमध्ये आम्ही दर महिन्याला एका टूरचं प्लॅनिंग केलं. असं वाटतंय की हे जरा जास्तच ॲम्बिशियस होतं. पण, हो जाएगा. मागच्या महिन्यात ग्रीनलँड होऊन गेलं. ह्या महिन्यात टुनिसिया माल्टा. पुढच्या महिन्यात थायलंडमधलं चिआंगराय चिआंगमाय फुकेत क्राबी, नोव्हेंबर ऑटम कलर्ससाठी फॉल सीझनमध्ये कोरिया तैवान, डिसेंबरमध्ये टांझानिया झांझिबार आणि फेब्रुवारीत फिलिपिन्स मनिला सेबु आयलंड. नंतर मात्र आम्ही घरी बसणार म्हणजे ऑफिसमध्ये, कारण जरी वर्षाचे तीनशे पासष्ट दिवस पर्यटकांचं पर्यटन सुरू असलं तरी जास्तीत जास्त पर्यटक पर्यटनाला निघतात मार्च ते जुलै या कालावधीत. त्यामुळे आम्ही सर्वजण ह्यावेळी मुंबई कॉर्पोरेट ऑफिसला ठिय्या मारून बसलेलो असतो. तर आमचं हे एक टूरिस्ट म्हणून वीणा वर्ल्डसोबत आणि पर्यटकांसोबत जाणं हे उर्वरित आयुष्यातलं एक ध्येय दिसतंय. त्यामुळे पुढच्या वर्षी जूनमध्ये पंधरा सोळा दिवसांची ऑल ऑफ टर्की आणि सप्टेंबरमध्ये गणपतीनंतर वीस ते बावीस दिवसांची साउथ अमेरिका ह्या मोठ्या टूर्स आधीच प्लॅन करून ठेवल्यायत.
एक टूरिस्ट म्हणून फिरायला मजा येतेय. पहिल्याच दिवशी बसमधली शेवटची सीट पटकवली. आईवडिलांनी जनरली शाळेत पहिल्या बाकावर बसण्याची सवय लावलेली असल्यामुळे शेवटच्या सीटवरची मजा काही अनुभवली नव्हती, ती इच्छा आता पूर्ण होतेय. आमच्या टूर मॅनेजरला, विहारला आधीच म्हटलं, आम्ही टूरिस्ट आहोत. आम्ही तुझ्या कामात ढवळाढवळ करणार नाही, तूही आम्हाला एक टूरिस्ट म्हणूनच बघ. म्हणजे आम्हीही टूर एन्जॉय करू आणि तूही मोकळेपणाने तुझ्या स्टाइलने टूर कंडक्ट करशील. टूरिस्ट म्हणून यायचं म्हटल्यावर देवानेही आम्हाला, एका टूरिस्टला कोणकोणत्या दिव्यातून पार पडावं लागतं त्यासाठी आमची परीक्षा घ्यायची ठरवली. आम्हाला टुनिसियाच्या टुनिस शहरात एक दिवस आधी यायचं होतं, पण आम्हाला एक दिवस आधीचा व्हिसा मिळाला नाही आणि त्यामुळे आम्ही ग्रुपच्याच दिवशी निघालो. सो आपल्या मनात कितीही असलं तरी व्हिसाच्या मनात असायला हवं, ह्याचा प्रत्यय मिळाला. टुनिसला पोहोचलो आणि बघतो तर काय, आमचं बॅगेजंच आलं नाही. याच आठवड्यात ऑलरेडी आमच्या युरोपमधल्या एका संपूर्ण ग्रुपचं बॅगेज टूरचे पहिले पाच दिवस मिळालं नव्हतं आणि ते नेमकं कुठे आहे त्यासाठीची सगळी धावाधाव एअरलाइन सोबत सुरू होती. एवढे दिवस बॅगा न मिळाल्यावर ग्रुपच्या मन:स्थितीची कल्पनाच केलेली बरी. नॅचरली ग्रुपमधल्या पर्यटकांना प्रचंड मनस्ताप होत होता आणि आमचा टुर मॅनेजर राकेश डिसले त्याही परिस्थितीत टूर जास्तीत जास्त चांगली करण्यासाठी आटोकाट प्रयत्न करीत होता. सो आमचं बॅगेज त्या दिवशी मध्यरात्री टुनिस एअरपोर्टवर पोहोचेल ही शक्यता आहे त्यामुळे रात्री एअरपोर्टला येवून चेक करा हे एअरपोर्टच्या ‘लॉस्ट ॲण्ड फाऊंड‘मधून कळलं आणि सुधीर आणि विहार टुनिस एअरपोर्टला गेले आणि सुदैवाने आमच्या बॅगा रात्रीच्या फ्लाइटने आल्या. जर बॅगा मिळाल्या नसत्या तर नवीन कपडे घेता आले असते, ह्या छोट्याशा आनंदाला मी मुकले. अर्थात एअरलाईन कोणतीही असो, बॅगा मिस्प्लेस होण्याचं प्रमाण वाढलंय त्यामुळे आपल्या हॅन्डबॅगेत कपड्यांचा एक छोटा सेट आणि अत्यावश्यक सामान ठेवणं जरूरीचं आहे हे माहित होतं, ते अधोरेखित झालं. टूरिस्ट म्हणून आलोय म्हणजे एखाद्या नवख्या टूरिस्टप्रमाणे चुका करणंही आलं.
प्रसंग 1: फ्लाइट वेगळं असल्यामुळे आमच्यासोबत टूर मॅनेजर नव्हता. टुनिस एरपोर्टवरून टॅक्सी केली पण टॅक्सी करताना एवढे टॅक्सीवाले अंगावर आले की विचारू नका. मला काश्मीर गुलमर्गच्या घोडेवाल्यांची आठवण आली. टॅक्सीजवळ येता येता एक जण इतका अजिजी करीत होता की मी माझी केबीन बॅग त्याच्या हातात देऊन टाकली. ते बघून सुधीरला माझ्यावर ओरडायचा चान्स मिळाला. ‘हाऊ कॅन यू बी सो डम्ब? अनोळखी माणसाच्या हातात बॅग देतेस?‘ मी नि:शब्द.
प्रसंग 2: ग्रुप संध्याकाळी येणार होता म्हणून आम्ही सकाळी एक मीटिंग केली आमच्या टुनिसियाच्या पार्टनरबरोबर आणि वेळ होता तर शहरात जाऊन येऊया म्हणत निघालो. छानशा वॉकिंग स्ट्रीटवर आम्ही फिरत होतो. एक मस्त बिल्डिंग दिसली आणि सुधीर त्या बिल्डिंगकडे बघत म्हणाला ‘स्पेन बार्सेलोनाचा अंॅटोनियो गाऊदी इथे आलेला दिसतोय.‘ आमच्या मागून एक माणूस आला आणि म्हणाला ‘हे इथलं ऑपेरा हाऊस आहे‘ आणि बोलायला लागला. मी त्याला विचारलं की, ‘इथे कुठे मॉल आहे का?' तर म्हणाला, ‘कम आय विल शो यू' अरे वाह! इथली माणसं फारच हेल्पिंग नेचरची दिसतायत. आणि मग तो बोलत बोलत आम्हाला घेऊन गेला मॉलमध्ये आणि मॉल जवळ आल्यावर त्याने त्याची मुलगी कशी आजारी आहे, तिच्या औषधाला कसे पैसे लागतात ह्याची उजळणी सुरू केली आणि सुधीरने माझ्याकडे रागाने बघितल्याचं जाणवलं,‘तरी मी तुला सांगत होतो, तू काय नवीन आहेस का? लोकासांगे ब्रम्हज्ञान' हे सगळं मला त्या नजरेत दिसलं. शेवटी पंधरा युरो भरून आम्ही आमची सुटका करून घेतली त्या भल्या माणसाकडून. सो. आम्ही टूरिस्ट बनल्यानंतरची ही नवखी प्रकरणं. टुनिसियातल्या पहिल्या दिवसाची आठवण. आता दोन दिवस झालेत टूर सूरु होऊन आणि ‘वुई आर लविंग इट' असं झालंय. जगाच्या नकाशावरचे हे चिंटू चिंटू देश एवढे छान आहेत! 'टुरिझम त्यांना कळलं हो‘ असंच म्हणावं लागेल. जागा समाप्तीची घोषणा, त्यामुळे आमच्या या नव्या कोऱ्या अफलातून टूरमध्ये आणखी काही सांगण्यासारखं मिळालं तर पुढच्या वेळी जरूर शेअर करीन. हॅप्पी संडे!
वीणा पाटील, सुनीला पाटील, आणि नील पाटील ह्यांचे प्रत्येक आठवड्यात प्रकाशित होणारे लेख वीणा वर्ल्डच्या वेबसाईट www.veenaworld.com वर वाचनाकरिता उपलब्ध आहेत.
अरेच्चा! हे मला माहितच नव्हतं...
भारताचं हृदयस्थान म्हणून ओळखलं जाणारं राज्य म्हणजे ‘मध्य प्रदेश’. खजुराहोच्या अप्रतिम मंदिरांपासून ते कान्हा बांधवगडच्या अरण्यातील पट्टेरी वाघांपर्यंत मध्य प्रदेशमध्ये पर्यटन आकर्षणांची नुसती रेलचेल आहे. या आकर्षणांमध्ये बुंदेलखंडातील राजवाडे आणि किल्ले अशा मानवनिर्मित गोष्टी आहेत त्याचप्रमाणे धुआंधार धबधबा, पचमढीच्या गुंफांसारख्या निसर्गनिर्मित गोष्टीही आहेत.
मध्य प्रदेशच्या नैसर्गिक खजिन्यातील एक अनमोल रत्न म्हणजे ‘भेडाघाट. नर्मदा नदीच्या वेगवान आणि विशाल प्रवाहात हे स्थान निर्माण झालं आहे. जबलपूर या ऐतिहासिक शहराजवळ हे आहे. भेडाघाट हा नावाप्रमाणे नर्मदा नदीच्या प्रवाहात तयार झालेला ‘घाट’ आहे. नर्मदा नदीच्या काठावर दोन्ही बाजुला जे डोंगर वा खडक आहेत ते ‘सॉफ्ट मार्बल’ म्हणजे ‘मृदू संगमरवराचे’ आहेत. त्यामुळे अतिशय वेगाने वाहणाऱ्या नर्मदेच्या प्रवाहाने या संगमरवरावर आघात करून, त्याची झीज करून जणू नैसर्गिकपणे अप्रतिम शिल्पंच घडवलेली पहायला मिळतात. भेडाघाटला येणारा नर्मदा नदीचा प्रवाह ‘धुआंधार’ या मोठ्या धबधब्यातून येतो. हा धबधबा पहाण्यासारखा आहे.
भेडाघाट हे नाव पडण्याचं कारण इथे स्थानिक लोकं त्यांच्या भेड बकऱ्या म्हणजे शेळ्या बकऱ्या चरायला घेऊन यायचे. इथे पर्यटकांसाठी नौका विहाराची उत्तम सुविधा आहे. नर्मदेच्या खळाळत्या प्रवाहात जेव्हा आपण नौकाविहार सुरू करतो तेव्हा नदीच्या ओघवत्या प्रवाहाशी स्पर्धा करत नावाड्याची अस्सल हिंदीमधली जी ‘कॉमेंटरी’ सुरू होते ती पुन्हा पुन्हा ऐकण्यासारखी रंगतदार असते. मग नदीच्या काठावरच्या खडकात बाळाला घेतलेल्या आईपासून ते बंद पडलेल्या कारपर्यंत अनेक आकार तो नावाडी दाखवतो आणि आपण आश्चर्यचकित होऊन पहात बसतो. भेडाघाटच्या प्रवाहातील वळणे आणि त्याला आपल्या संगमरवरी सौंदर्याची महिरप बहाल करणारे खडक म्हणजे जणू निसर्गाच्या आर्ट गॅलरीतील एक अप्रतिम कलाकृतीच आहेत. या सगळ्या परिसराचा मोह आपल्या बॉलिवूडवाल्यांना पडणार नाही असं कसं होईल? अगदी राज कपूरच्या ‘जिस देश में गंगा बहती है’ पासून ते शाहरुख खानच्या ‘डंकी पर्यंत अनेक हिंदी सिनेमांची शूटींग या परिसरात झाली आहेत. नौकाविहार करताना नावाडी खास त्याच्या शैलीत कोणत्या सिनेमाचं कुठलं गाणं किंवा दृश्य कुठे शूट केलंय ते सांगतो त्यामुळे भेडाघाटमधला नौकाविहार ‘बॉलिवूड टूर’होऊन जाते. दररोज संध्याकाळी इथल्या घाटावर नर्मदा मैय्याची आरती अगदी साग्रसंगीतपणे केली जाते.
वीणा वर्ल्डकडे मध्य प्रदेशच्या अनेक टूर्स आहेत त्यातील ‘वंडर्स ऑफ मध्य प्रदेश’सहलीत सहभागी होऊन भेडाघाटची जादू नक्की अनुभवा.
वीणा वर्ल्ड ट्रॅव्हल मिशन
100 Country Club
क्वालिटी टाइम
मला जगाच्या पाठीवरचे वेगवेगळे देश बघायला, तिथल्या लोकांची संस्कृती व जीवनपध्दती जाणून घ्यायला आवडतं पण त्याहीपेक्षा पर्यटन म्हणेज कुटुंबासाठी क्वालिटी टाइम अशी माझी धारणा आहे. त्यासाठी मी पर्यटनाचा बेत ठरवताना आई, पत्नी आणि मुलीला वेळ आहे ना याची खात्री करून मगच कार्यक्रम ठरवतो. मी 1982 पासून म्हणजे गेली बेचाळीस वर्षे पर्यटन करतो आहे. या काळात मी भारतातील 28 राज्यांना भेट दिली आहे तर जगभरातले 31 देश पाहिले आहेत. माझ्या या भटकंतीत 2022 मध्ये मला वीणा वर्ल्डच्या रुपानं एक अत्यंत विश्वासू आणि आपुलकीची सेवा देणारा सहल सोबती सापडला. त्यामुळे आता मी पर्यटनासाठी वीणा वर्ल्डला प्राधान्य देतो. मी कोलकाताचा आहे आणि वीणा वर्ल्डचे इथे ऑफिस असल्याने मला बुकिंग करायला सोप्पं जातं. आत्ता इंटरनेटमुळे सगळं फारच सोईचं झालं आहे. त्यामुळे आता मी डेस्टीनेशन ठरवताना इंटनेट आणि ट्रॅव्हल मॅगझिन्सची मदत घेतो. युरोपमधील लंडन आणि पॅरिस ही दोन माझी सर्वात आवडती शहरं आहेत. लंडन आणि कोलकत्यामधील सारखेपणामुळे मला लंडन आवडलं तर पॅरिसची झळाळती संस्कृती आणि लज्जतदार पदार्थ यांनी माझं मन जिंकलं. तसंही मी ज्या नवीन देश-प्रदेशांना भेट देतो, तिथले स्थानिक पदार्थ खाऊन बघायला मला आवडतात. मी आजपर्यंत पाहिलेल्या देशांमधील ‘न्यूझीलंड’ हा माझ्यासाठी सर्वात संस्मरणीय देश आहे. तिथलं अलौकिक निसर्गसौंदर्य पाहून माझी खात्री झाली की न्यूझीलंड म्हणजे या धरतीवरील नंदनवन आहे.
मला जगभरातल्या सातही खंडांमधील देश बघायचे आहेत. आर्क्टिक सर्कल आणि अलास्का हे भाग माझ्या बकेट लिस्टमध्ये आहेत. मी वर्षांतून 3-4 सहली करतो, त्यात दोन डोमेस्टिक तर दोन इंटरनॅशनल असतात. डिसेंबर 2024 मध्ये मी वीणा वर्ल्डसोबत अंटार्क्टिका सहल करणार आहे. तर भारतातील चंदिगड अमृतसर आणि नॉर्थ ईस्ट या ठिकाणांनाही मी नजिकच्या काळात भेट देणार आहे.
काय बाई खाऊ कसं गं खाऊ!
जेव्हा युरोपसारख्या खंडात देश एकमेकांना चिकटून असतात तेव्हा खाद्यपदार्थांची देवाणघेवाण जरा जास्तच होताना दिसते आणि मग एकाच पदार्थाच्या वेगवेगळ्या आवृत्त्या पहायला मिळतात. या प्रकारातला पदार्थ म्हणजे ‘डोल्मादेस’. ग्रीसमधील लोकप्रिय ॲपिटायझर म्हणून ओळखला जाणारा हा पदार्थ मूळचा टर्कीमधल्या ऑटोमन राजवटीत निर्माण झाल्याचं मानलं जातं. याच्या नावातील ‘डोल्मा’ हा शब्दच टर्कीश भाषेतला आहे आणि त्याचा अर्थ होतो `स्टफिंग’ म्हणजे ‘सारण’. त्यामुळे डोल्मादेस मूळ टर्की मानायला हरकत नाही. ग्रीक डोल्मादेस हे द्राक्षाच्या वेलीच्या पानांपासून (वाइन लिव्ह्ज्) तयार करतात. भातात कांदा, हर्ब्ज म्हणजे पार्सली, पुदीना, वाळवलेलं डिल(शेपू) हे सगळं मिक्स करतात. कांदा थोडा परतून घेतला जातो, चवीसाठी यात लिंबाचा रस, मीठ आणि मिरपुड घातली जाते. या सगळ्या गोष्टी भातात व्यवस्थित मिसळल्या की मग हे सारण पानांच्या गुंडाळीत भरायचं. या गुंड्याळ्या उकडत ठेवताना त्यावर थोडं ऑलिव्ह ऑइल, मिठ, मिरपुड आणि लिंबाचा रस शिंपडायचा. उकडायला ठेवताना हे रोल्स बुडतील इतकंच पाणी भांड्यात भरायचं. उकडल्यानंतर रोल गार करायचे आणि मग हम्मस किंवा झात्झिकी (ग्रीक डिप) बरोबर खायचे. काही वेळा डोल्मादेस बनविण्यासाठी कॅबेज म्हणजे कोबीच्या पानांचा वापरही करतात. कॅबेज डोल्मादेसमध्ये स्टफिंगसाठी वेगवेगळे जिन्नस जसे बीन्स, टोमॅटो पेस्ट, कांदा इ. वापरले जातात. अर्मेनिया देशात प्रामुख्याने असे रोल्स बनवले जातात. याची नॉनव्हेज आवृत्ती करताना स्टफिंग म्हणून बीफ किंवा पोर्कचा खिमा भरतात. युरोपबरोबरच मिडल इस्टमध्येही हा पदार्थ आवडीने खाल्ला जातो. देश विदेशातील अशाच विविध खाद्यपरंपरा आणि ट्रॅव्हलचे भन्नाट अनुभव ऐकण्यासाठी वीणा वर्ल्डचा ‘ट्रॅव्हल एक्सप्लोअर सेलिब्रेट लाईफ ’ हा पॉडकास्ट नक्की ऐका.
प्रायव्हेट ग्रुप हॉलिडे
वीणा वर्ल्ड कस्टमाईज्ड हॉलिडेज्सोबत
कोणत्याही डेस्टिनेशनची खरी मजा तेव्हाच अधिक अनुभवता येते जेव्हा सोबत तुमची आवडती माणसं असतात. ग्रुप मॅटर्स! कंपनी इम्पॉर्टंट! तुम्हाला हवा तसा, तुमच्या पसंतीच्या ठिकाणी हॉलिडे घेताना, तुम्हाला पाहिजे त्या हॉटेलमध्ये निवास करून आवडत्या ठिकाणाची मजा लुटताना जवळची लोकं सोबत हवीच ना? समजा 10 दिवसांचा स्विस हॉलिडे असेल तर हॉटेलच्या चॉइसपासून ते तिकडे करायच्या ॲक्टिव्हिटिज् पर्यंत सगळं अगदी तुमच्या मनासारखं करता येईल. जर तुमच्या कुटुंबातले सगळेच फूडी असतील तर मग अमृतसरचा फूडी हॉलिडे किंवा सोबत लहान मुलं असतील तर सिंगापूर किंवा थायलंडच्या थीम पार्कची निवड करू शकता. ऑप्शन्स अनलिमिटेड आहेत. तुमच्या कुटुंबातल्या सदस्यांबरोबर किंवा मित्रमैत्रिणींच्या ग्रुपबरोबर हॉलिडे एन्जॉय करताना तुम्ही वीणा वर्ल्डच्या टूर मॅनेजरची प्रोफेशनल सर्व्हिसही घेऊ शकता. प्रवासातील व्यवस्था, साइटसीईंग याची काळजी ते घेतील आणि तुम्ही फक्त हॉलिडे एन्जॉय करायचा तुमच्या जिवलगांसह.
मध्यंतरी मैत्रिणींच्या एका गँगने त्यांच्यातल्या एका मैत्रिणीबरोबर हॉलिडे रीट्रीट म्हणून बालीची टूर याच पध्दतीने आमच्याकडून अरेंज करून घेतली. या मैत्रिणींच्या ग्रुपबरोबर आमचा एक्सपीरियन्सड टूर मॅनेजर होता, त्यामुळे त्यांना बाकी काहीच बघावं लागलं नाही. तुम्हीसुध्दा ह्या पध्दतीने बर्थडे नाहीतर स्पेशल वेडिंग ॲनिव्हर्सरी दुबई, थायलंड किंवा जगात कुठेही एन्जॉय करू शकता. एका ज्येष्ठ जोडप्याला सिंगापूर पहायची इच्छा होती पण त्यांच्यासोबत येण्यासाठी त्यांच्या घरातलं कुणी उपलब्ध नव्हतं, मग त्यांनी आमच्या टूर मॅनेजर सोबत आपली प्रायव्हेट सिंगापूर टूर करुन घेतली. या टूरमध्ये रोड ट्रान्सपोर्ट आणि बाकीच्या सर्व व्यवस्था वीणा वर्ल्डच्या टूर मॅनेजरने बघितल्या, त्यामुळे या जेष्ठ पर्यटक जोडप्याला निर्धास्तपणे सिंगापूर बघता आलं. अगदी अलिकडे 17 अमेरिकन नागरिकांनी वीणा वर्ल्डकडे याच प्रकारची ‘इजिप्त नाइल क्रुझ टूर’ बूक केली होती. क्रुझवर तीन रात्रींचा निवास असलेल्या या टूरमध्ये त्यांच्याबरोबर आमचा टूर मॅनेजर असल्याने त्यांनी प्रायव्हेट ग्रुप हॉलिडेची मजा अनुभवली. फ्रेंडशीप डे साजरा करताना काही मित्रांनी याच पध्दतीने आमच्या मदतीने आपल्या मित्रांबरोबर पॉन्डिचेरी येथे त्यांचं रीयुनियन साजरं केलं.
तुम्ही फक्त दोघं जण असा किंवा अगदी तुमचा 25-30 जणांचा ग्रुप असो, तुमच्या टूरची सगळी व्यवस्था आमच्यावर सोपवा आणि फक्त तुमच्या मनपसंद मंडळींसोबत टूरचा आनंद मिळवा.
कुटुंबातल्या लाडक्या व्यक्तीचा वाढदिवस, स्पेशल वेडिंग ॲनिव्हर्सरी, रीटायरमेंट पार्टी, अशी अनेक कारणं असतात जेव्हा सेलिब्रेशन एकदम हटके व्हायला हवं असतं. मग तेच तेच नेहमीचे वेन्यू नको वाटतात. अशावेळी तुम्ही हा प्रायव्हेट ग्रुप हॉलिडेचा पर्याय नक्कीच स्विकारू शकता ज्यामुळे तुमचं सेलिब्रेशन एकदम झक्कास होईल आणि कायम स्मरणात राहिल. दुबईमधील ओपन एअर बस राइड, हाँगकाँग किंवा थायलंडमधली प्रायव्हेट यॉट सफर असे कितीतरी अनुभव तुम्ही या प्रकारात घेऊ शकता.
तुम्ही फक्त डेस्टिनेशन ठरवा बाकी सगळ्यासाठी वीणा वर्ल्डची कस्टमाइज्ड हॉलिडे टीम सज्ज आहेच.
काय बघावं? कसं बघावं?
ऑटम कलर्सवालं रंगबिरंगी जपान!
एका बाजुला शांत, हळूवार, नम्रतेच्या सर्व कसोट्या पार करणारा तर दुसऱ्या बाजुला एवढासा चिमुकला असूनही बलाढ्य अमेरिकेशी दोन हात करणारा, क्वालिटी आणि प्रिसिजनच्या बाबतीत जगात अग्रेसर राहणारा, अत्याधुनिकतेची आस असणारा पण संस्कृती आणि परंपरांचा आदर करणारा जपान सर्वांसाठीच आदर्श आहे. जे मिळालंय त्यात समाधान पण जे स्वत:ला निर्माण करायचंय त्यात कायम असमाधानी. कर्तृत्वात आणि कर्तव्यात तडजोड नाही. वयाची शंभरी गाठली तरी जपानी माणसाची कार्यमग्नता लीन पावत नाही, किंवा कार्यमग्न असल्यामुळेच जास्तीत जास्त जपानी माणसं आयुष्याची शंभरी गाठतात. दीर्घायुषी बनण्याचा फॉर्म्युलासुद्धा त्यांनी खूप सोप्या पद्धतीने जगाला दिलाय. आयुष्याचं प्रत्येक दिवसाचं एक उद्दीष्ट असलं पाहिजे सांगणारं `इकिगाई’, हा क्षण पुन्हा येणार नाही म्हणून तो पूर्ण जगूया सांगणारं `इचिगो इचि’, चेंज ही गोष्ट आयुष्यात एक अपरिहार्य हिस्सा बनवा आणि न थकता न दमता सातत्याने सुधारणा करीत रहा सांगणारं `कायझेन’, कितीही संकटं आली तरी धीराने आणि धैर्याने त्याचा सामना करा सांगणारं `गामन’, अपूर्णतेचं सौंदर्य जाणून त्यात आनंद मिळवायला सांगणारं `वाबीसाबी‘, चला उठा सोडून देऊ नका आणि मिळालेल्या आयुष्याचं काहीतरी छानसं करा सांगणारं `गनबात्ते वा गम्बारे’, फुटलेल्या वस्तुला चांदी किंवा सोन्याचा वर्ख लावून ती अधिक सुंदर करता येते सांगणारं `किन्स्तुगी’, निसर्गाचं महत्व सांगणारं `शिनरिन योको’...ही लिस्ट मोठी आहे पण खूपच प्रेरणादायी आहे हे सर्वकाही. हिरोशिमा नागासाकीच्या अणूसंहारावर मात करीत जपान आणखी ताकदीने उभं राहिलं. `कितीही संकटं येऊ दे, आम्ही अधिक जोमाने काम करीत सतत त्यावर मात करू!’ हा संदेश जपान सदैव जगाला देत राहिल. आणि म्हणूनच मनापासून म्हणावसं वाटतं, ‘लव्ह यू जपान!‘
तुम्ही जाऊन आलात की नाही जपानला? अजून गेला नसाल तर आत्ताच वेळ आहे फॉल सीझन मधल्या ऑटम कलर्सवाल्या लाल पिवळ्या नारिंगी रंगात न्हाऊन निघालेल्या रंगबिरंगी जपान कोरिया किंवा तैवानला भेट देण्याची. सो, चलो बॅग भरो, निकल पडो, वीणा वर्ल्डसोबत!
Post your Comment
Please let us know your thoughts on this story by leaving a comment.