Published in the Sunday Sakal on 4 February, 2024
एकही पैसा न खर्च करता जगभर भ्रमंती करायची असेल तर त्यासाठी आहेत दोन मार्ग. एकतर तुम्ही एअर होस्टेस वा फ्लाइट अटेंडन्ट वा पायलट बना नाहीतर दुसरा मार्ग म्हणजे टूर मॅनेजर बना. आमच्याकडे असलेल्या तीनशेहून अधिक टूर मॅनेजर्सध्ये काहींनी आजपर्यंत पंचाहत्तरहून अधिक देशांना भेट दिली आहे तर बरेच टूर मॅनेजर्स देशांची पन्नाशी पूर्ण करून आता पंचाहत्तरीकडे वाटचाल करीत आहेत. पंचवीस देश पूर्ण केलेले तर अनेक जण आहेत. म्हणजे आमच्या काही टूर मॅनेजर्सनी आमच्यापेक्षा अधिक देश बघितले आहेत. आहे की नाही मस्त प्रोफेशन! आज हा टूर मॅनेजर्सचा विषय मी लिखाणासाठी घेतला त्याला कारण आहे टूर मॅनेजर्स आणि असिस्टंट टूर मॅनेजर्सचे इंटरव्ह्यूज आहेत वीणा वर्ल्ड कॉर्पोरेट ऑफिस विद्याविहार मुंबई येथे १८ फेब्रुवारीला. टूर मॅनेजर्ससाठी फक्त दहा जागा आहेत पण असिस्टंट टूर मॅनेजर्ससाठी एकूण नव्वद जागा भरायच्या आहेत.
‘टूर मॅनेजर्स किंवा असिस्टंट टूर मॅनेजर्स हे प्रोफेशन कसं आहे? ह्याला भविष्य आहे का? कोविडसारखी परिस्थिती आली तर काय करायचं? ह्याला शिक्षण किती लागतं? आणखी कोणत्या गोष्टी आवश्यक असतात टूर मॅनेजर बनायचं असेल तर?‘ अशा अनेक प्रश्नांची सरबत्ती इच्छुक उमेदवारांकडून किंवा त्यांच्या घरच्यांकडून आमच्यावर होऊ शकते. आणि त्यात वावगं काहीही नाही म्हणूनच ह्या प्रश्नांची उकल मी इथे करतेय.
माझं स्वत:चं करियर टूर मॅनेजर ह्या प्रोफेशननेच सुरू झालं. बावीस वर्षांची होते तेव्हा हिमाचलची पहिली टूर मी टूर मॅनेजर म्हणून कंडक्ट केली आणि त्यानंतर दहा वर्षं मी हिमालचलमध्ये टूर्स केल्या आणि मग देशविदेशात अनेक ठिकाणी. सुधीर, सुनिला, नील, ही आम्ही मंडळी आज वीणा वर्ल्ड चालवीत असलो तरी आमच्यातल्या प्रत्येकाने करियरची सुरुवात ही टूर मॅनेजर ह्या पदानेच केली. आम्ही टूर मॅनेजर्स होतो ह्याचा आम्हाला रास्त अभिमान आहे. कारण तिथेच आम्हाला खूप शिकायला मिळालं, पर्यटकांचा सहवास लाभला. पर्यटकांच्या गरजा कळल्या. त्यांच्या अपेक्षा काय असतात ह्याचं फर्स्ट हॅन्ड आकलन झालं. सर्व्हिस इंडस्ट्री म्हणजे काय आणि ह्या प्रोफेशनच्या किंवा एकूणच ह्या क्षेत्राच्या संपूर्ण आवाक्याची कल्पना आली. आम्हाला ह्या प्रोफेशनने घडवलं, आत्मविश्वास दिला, कणखर बनवलं आणि म्हणूनच आमच्यासह आमचे टूर मॅनेजर्स मनापासून प्रेम करतो आमच्या टूर मॅनेजर ह्या प्रोफेशनवर आणि म्हणूनच आम्ही आमच्या पर्यटकांना सहलीचा अपेक्षित किंवा त्याहून अधिक आनंद देऊ शकतो.
कालच एक इमेल मी वाचला. श्री प्रविण शहा व सौ नीला शहा ह्यांनी पाठविलेला. आत्ताच १९ जानेवारीला ते वायझॅग दिंडी अराकू व्हॅली आणि बोरा केव्हज् ची टूर करून आले. ही त्यांची वीणा वर्ल्डसोबतच तीसावी टूर होती. त्यांनी वीणा वर्ल्डबरोबर जाणं सुरू केलं २०१८मध्ये. म्हणजे कोविडची वर्ष वगळता उण्यापुर्या पाच वर्षांत त्यांनी देशविदेशातल्या छोट्या मोठ्या ३० टूर्स केल्या आणि रेकॉर्डच केला म्हणयचा. प्रविणजी आणि नीलाताईंचा उल्लेख इथे करायचं कारण पाच वर्षांत त्यांनी ज्या ह्या टूर्स केल्या त्यात त्यांनी तीस टूर मॅनेजर्सची आणि असिस्टंट टूर मॅनेजर्सची सर्व्हिस अनुभवली असणार. आणि आमचे टूर मॅनेजर्स जेव्हा टूर्स मस्त करतात, पर्यटक खुश होतात, आनंदी आठवणींचं डबोलं घेऊन टूरवरून येतात तेव्हाच ते दुसर्या टूरचा विचार करतात, आणि पुढची टूर बूक करतात. आम्ही कितीही जाहिराती केल्या तरी पर्यटक येतात वीणा वर्ल्डकडे ते त्यांची आधीची टूर चांगली झाली असेल तरच किंवा त्यांच्या मित्रपरिवाराने आणि नातेवाईकांनी अनुभव घेऊन शिफारस केली असेल तरच. ह्याची आम्हाला जाणीव आहे आणि आमच्या टूर मॅनेजर्सनाही. शहा फॅमिलीची प्रत्येक टूर चांगली झाली असणार म्हणून त्यांनी प्रत्येकवेळी पुढची टूर बूक केली असणार. आणि ते तसंच असावं. वर्षभरात आम्ही एक लाख पर्यटकांना देशाविदेशाची वारी घडवतो. त्यांना सर्व्हिस देतात आमचे हे एकसे एक हरहुन्नरी टूर मॅनेजर्स आणि त्यांच्या सपोर्टला असते वीणा वर्ल्डची संपूर्ण ऑफिस टीम चोवीस तास. सो टूर मॅनेजर्स आणि असिस्टंट टूर मॅनेजर्स हे वीणा वर्ल्डच्या वाटचालीत महत्वाची भूमिका बजावत आहेत. पर्यटकांना खुश करीत आहेत, त्यांची जबाबदारी व्यवस्थित पार पाडत आहेत.
जनरली भारतातल्या सहलींवर असिस्टंट टूर मॅनेजर म्हणून करियरची सुरुवात होते. एक वर्षाची कडी मेहनत केल्यावर आम्हाला कळतं, राईट नंबर लागलाय की राँग, किंवा त्याआधीही कळतं की अमुक एकाला हे प्रोफेशन झेपतंय की नाही? तसा फीडबॅक दिला जातो. काही असिस्टंट टूर मॅनेजर्स एवढ्या सुंदर तर्हेने करियरची सुरुवात करतात की एका वर्षातच ते टूर मॅनेजर्स बनतात भारतातल्या सहलींवर. तिथे उत्कृष्टपणे परफॉर्मन्स दिला की साधारणपणे दोन तीन वर्षातच परदेशप्रवासाची दारं खुली होतात आणि साऊथ ईस्ट एशिया, मिडल ईस्ट एशिया, फार ईस्ट एशिया, ऑस्ट्रेलिया न्यूझिलंड, युरोप, अमेरिका ह्या चढत्या क्रमाने ते आपलं करियर खुलवत नेतात. अर्थात ही करियरची लॅडर जेवढी फास्ट चढता येते तेवढंच जर चूक झाली तर मात्र सापशिडीच्या खेळासारखं धपकन तळाशी पोहोचायला होतं. अडथळे येतील, कधी विमान कॅन्सल होईल, कधी एखादी नैसर्गिक आपत्ती कोसळेल, त्याला सगळे मिळून सामोरे जाऊ आणि तोडगा काढू पण, ‘आपल्याकडून चूक झाली नाही पाहिजे’ हा आमचा दंडक आहे. आळस, खोटेपणा, उडवाउडवी, व्यसन, पर्यटकांशी अरेरावी, उद्धट बोलणं ह्याला वीणा वर्ल्डमध्ये थारा नाही. आणि हे आता आमच्या अस्टिस्टंट टूर मॅनेजर्सना आणि टूर मॅनेजर्सना व्यवस्थित माहित आहे. आणि सर्व्हिस इंडस्ट्रीची ती बेसिक अपेक्षा आहे. सो! हे क्षेत्र ग्लॅमरस आहेच, जग बघायला मिळतं ह्यात, पण प्रचंड मेहनत आहे. तब्येत चांगली ठेवावीच लागते. थंडी वारा पाऊस झेलण्याची आपली क्षमता आणि मनःस्तिथी असली पाहिजे.
हा स्ट्रीट स्मार्ट मुलामुलींचा करियर ऑप्शन आहे. ओव्हरस्मार्ट नव्हे बरं का. सर्व्हिस इंडस्ट्री आहे ही. थोडं झुकूनच असावं लागतं. आम्ही नेहमी म्हणतो, ‘नम्र आहोत अर्थातच लाचार नाही’. स्वाभिमानाचा खोटा अभिमान नको. कुठंतरी मी वाचलं होतं, ‘मोडेन पण वाकणार नाही ह्या मराठी बाण्यामुळे बरीचशी मराठी माणसं मोडूनच गेली’. तसं नाही होऊ द्यायचंय आपलं. प्रामाणिकपणा, निर्व्यसनी व्यक्तिमत्व, इतरांना आनंद द्यायची वृत्ती, मनापासून खरं बोलणं, ह्या अपेक्षांसोबत किमान बारावीपर्यंतचं शिक्षण, इंग्लिश, हिंदी, मराठी सोबत गुजराती भाषा अवगत असल्यास उत्तम. देशभरातील सर्व पर्यटकांना कळावं म्हणून टूरवरचं सर्व बोलणं हे हिंदीत असतं त्यामुळे हिंदी भाषा सन्मानपूर्वक बोलता यायला पाहिजे. वेळ असेल तर अनेक भाषा शिकून घ्याव्या. त्यामुळे माणसं जवळ येतात. परदेशात टूर्स कंडक्ट करीत असू तर ह्याचा फायदा होतो. आता आमच्या टूर मॅनेजर्सना आम्ही मराठी हिंदी इंग्रजी व्यतिरिक्त तुम्हाला दोन भारतीय भाषा आणि दोन परदेशी भाषा जुजबी बोलता आल्याच पाहिजेत हा आग्रह धरतोय. प्रत्येक भाषा जपली पाहिजे आणि आपणही आपल्याला अपग्रेड केलंच पाहिजे नाही का. सो अशी तीस वर्षांपर्यंतच्या वयोगटातली स्ट्रीट स्मार्ट चांगली मुलंमुली तुम्हाला माहीत असतील आणि त्यांना पर्यटन करण्याची आणि पर्यटकांना पर्यटन घडवून आणण्याची आवड असेल तर जरूर पाठवा त्यांना १८ फेब्रुवारीला इंटरव्ह्यूला.
कोविडसारखी वेळ येते, आपली परिक्षा घेते, कधी कधी अगदी आपला अंतही बघते, पण निघून जाते. आपण खंबीर असलं पाहिजे. अनेक वर्षं ह्या व्यवसायात आहोत. खूप उन्हाळे पावसाळे बघितले. अगदी उन्मळूनही पडलो पण खचलो नाही. म्हणूनच कोविडच्या मोठ्या उलथापालथीनंतर पुन्हा तेवढ्याच जोशात उभे राहिलो, आम्हीच नाही तर संपूर्ण वीणा वर्ल्ड टीम. आमच्या डायरीच्या कव्हरवर लिहिलंय, ‘हम उडना चाहते हैं... दौडना चाहते हैं ... गिरना भी चाहते हैं... बस रूकना नहीं चाहते!’
अरेच्या! हे मला माहितच नव्हतं...
युरोप म्हटल्यावर नेहमी फ्रान्स, जर्मनी, स्वित्सर्लंड, इटली, स्पेन, पोर्तुगाल असे ठराविक देशच आठवतात. मात्र युरोप खंडाचा अपरिचित चेहरा देखिल तितकाच किंवा त्याहून अधिक आकर्षक आहे. आता युरोपच्या दक्षिण कोपर्यात अॅड्रिअॅटिक समुद्राच्या काठावर वसलेला क्रोएशिया हा देशच बघा नं, आपल्या हिमाचल प्रदेशपेक्षा फक्त एक हजार स्क्वेअर किलोमीटर्सने मोठा असलेला हा देश जसा निसर्गसौंदर्यासाठी ओळखला जातो तसाच ‘नेकटाय’ आणि ‘पेन’चा जनक म्हणूनही ओळखला जातो. सागर किनार्यांपासून ते हिमाच्छादित भूभागापर्यंत निसर्गाची अनेक रुपे या देशात पाहायला मिळतात.या देशात क्रिडा संस्कृती इतकी उत्तम रुजलेली आहे की ऑलिम्पिक पासून ते वर्ल्ड चॅम्पियनशिपपर्यंत अनेक स्पर्धांमध्ये या देशाच्या खेळाडूंनी सुवर्ण पदकांची लयलूट केली आहे. आज हा देश पर्यटकांच्या यादीत आघाडीवर आहे तो ‘प्लिटविस लेक्स नॅशनल पार्क’मुळेच.
क्रोएशियामध्ये एकूण ४४४ विभागांना रिझर्व्ह फॉरेस्टचा दर्जा आहे. यात आठ नॅशनल पार्क्स येतात. यातला सर्वात जुना आणि सर्वात प्रसिध्द म्हणजे ‘प्लिटविस लेक्स नॅशनल पार्क‘ क्रोएशियाची सीमा जिथे बोस्निया आणि हर्झेगोविना या देशांना मिळते तिथे हा पार्क आहे. या पार्कला क्रोएशियन भाषेतील ‘प्लिटविसे’ या शब्दावरुन नाव मिळाले आहे. या शब्दाचा अर्थ होतो उथळ भाग. या भूभागात नैसर्गिकरित्या उथळ खड्डे तयार झाले, ज्यांचे रुपांतर जलाशयांमध्ये झाले. हा पार्क लोअर आणि अपर अशा विभागांमध्ये विभागलेला आहे. या दोन्ही विभागात मिळून सोळा नैसर्गिक तलाव आहेत आणि ते एकमेकांना जोडलेले आहेत. या प्रत्येक तलावाला स्वतंत्र नाव आहे आणि प्रत्येक तलावाची एक लोककथाही आहे. एका तलावाला ‘प्रोश्कॅन्स्को’ असे नाव आहे, क्रोएशियन भाषेत लाकडी काठ्यांना ‘प्रॉश्के’ म्हणत, या काठ्यांचे कुंपण या तलावाभोवती स्थानिकांनी उभारल्यामुळे हे नाव या तलावाला मिळाले आहे. एका तलावातले पाणी दुसर्यात पडते तिथे लहान मोठे धबधबे तयार झाले आहेत. त्यातील सगळ्यात मोठा धबधबा ‘वेलिकी स्लॅप’ म्हणजे ‘मोठा धबधबा’ म्हणून ओळखला जातो. लोअर लेकमधील हा धबधबा ७८ मीटर उंचीवरुन कोसळतो. या सगळ्या तलावांनी मिळून सुमारे २ चौरस किलोमीटर्सचा परिसर व्यापलेला आहे. या प्रत्येक तलावातील पाण्याचा रंग वेगवेगळा आहे. आकाशी, हिरवा, करडा, गडद निळा अशा रंगछटांचे हे तलाव डोळ्यांचे पारणे फेडतात. सगळ्यात शेवटच्या तलावातून जे पाणी बाहेर पडते त्याची नदी होते. कोराना नदी या नावाने ती ओळखली जाते. या नॅशनल पार्कमधील दाट अरण्यात मुख्यत्वे बीच, फर, स्प्रुस हे वृक्ष आढळतात. या सूचिपर्णी अरण्यात युरोपियन ब्राउनबेअर, लांडगे, गरुड, घुबडांचे प्रकार, लायनेक्स, वाइल्ड कॅट्स असे पशु-पक्षी आढळतात. १९७९ मध्ये या पार्कचा समावेश युनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेज यादीत करण्यात आला. दरवर्षी जगभरातून सुमारे दहा लाख पर्यटक प्लिटविस नॅशनल पार्कला भेट देतात. तुम्ही कधी जाताय? चला वीणा वर्ल्डसोबत इस्टर्न युरोपच्या अफलातून सहलींना आणि भेट द्या प्लिटविस लेक्स नॅशनल पार्कला.
वीणा वर्ल्ड ट्रॅव्हल मिशन
हाँगकाँग मकाव तैवान सारखी छोटी छोटी रीपब्लिक्स, फ्रेंच पॉलिनेशिया किंवा ब्रिटिश व्हर्जिन आयलंडसारखी ओव्हरसीज टेरिटरीज धरून आपण साधारणपणे २२७ देशांना भेट देऊ शकतो. काही देशांना व्हिसा लागतो. काहींना ऑन अरायव्हल व्हिसा असतो. काहींना व्हिसा फ्री असतो. ह्यातल्या जास्तीत जास्त देशांना कोण भेट देऊ शकतो ह्या बाबतीत जगाचा विचार केला तर फ्रान्स जर्मनी इटली जपान सिंगापूर स्पेन ह्या देशांचा पहिला नंबर येतो. ह्या देशांचे लोक १९४ देशांना व्हिसा न करता किंवा व्हिसा ऑन अरायव्हल करून भेट देऊ शकतात. म्हणजेच त्यांचा पासपोर्ट सर्वात स्ट्राँग समजला जातो. युनायटेड किंगडमचे लोक १९१ देशांना भेट देऊ शकतात जे चौथ्या नंबरवर तर USA चा नंबर सातवा लागतो. युएस पासपोर्ट होल्डर्स १८८ देशांना भेट देऊ शकतात. ह्यामध्ये आपला नंबर ऐंशीवा लागतो, आपण ६२ देशांना भेट देऊ शकतो फ्री व्हिसा किंवा व्हिसा ऑन अरायव्हलद्वारे. देशादेशांमध्ये ह्या बाबतीत स्पर्धा आहे. आणि आपलं सरकार आपला नंबर पुढे नेण्यासाठी प्रयत्न करतेय ते आपल्याला दिसतंच आहे. हे झालं पासपोर्टच्या बाबतीत म्हणजे कोणत्या पासपोर्टचं वजन किती आहे ते. पण सगळ्यात जास्त पर्यटक कोणत्या देशाला भेट देतात हे जर बघितलं तर त्यात गेली अनेक वर्ष फ्रान्स पहिल्या नंबरवर आहे. वर्षाला अंदाजे आठ कोटी टूरिस्ट फ्रान्समध्ये येतात. स्पेन सात कोटी, टर्की साडेचार कोटी, युके पावणेचार कोटी, ग्रीस पावणे तीन कोटी, इटली अडीच कोटी, जपान जर्मनी दोन कोटी तर ऑस्ट्रिया पावणेदोन कोटी. हे दहा देश आहेत जगातल्या पर्यटकांच्या दृष्टीने सर्वात आवडते देश. तुलनात्मक दृष्टीने बघितलं तर भारतात साधारणपणे ७५ लाख विदेशी पर्यटक येतात एका वर्षात आणि युएसएमध्ये सव्वासहा कोटी. मोस्ट अॅस्पायरिंग कंट्रीज्मध्ये युएसए अव्वल नंबर राखून आहे कारण जगातल्या प्रत्येकाला युएसए मध्ये एकदातरी जायचंच असतं. सो मंडळी, तुमच्या ट्रॅव्हल मिशनमध्ये कोणते देश राहिलेत बघायचे ते तपासा आणि प्लॅनिंगला सुरुवात करा.
#VeenaWorldTravelMission
काय बाई खाऊ... कसं गं खाऊ!
आपल्या भारतीय जेवणामध्ये डाळ-भाजी यांना जितके महत्व आहे तितकेच डावीकडे वाढल्या जाणार्या कोशिबिंर, लोणचं, चटणीलाही आहे. याचेच एक रूप ईस्ट एशियन पध्दतीच्या पारंपारिक जेवणात दिसतं आणि ते म्हणजे कोरियन जेवणातील ‘किमची’ हा पदार्थ. तसंही कोरीयन जेवणामध्ये भारतीय जेवणाप्रमाणेच भात आणि भाज्या, भात आणि मासे हाच मुख्याहार असतो. या जेवणात ‘भन छन’ (Banchan) म्हणजे साइड डिश महत्वाच्या असतात. त्यातलीच एक म्हणजे किमची. कोरियाच्या इतिहासील बौध्द काळात मांसाहार निषिध्द मानला गेला होता आणि फक्त शाकाहारी पदार्थच खाल्ले जात होते. पुढे राजवट बदलली आणि मांसाहार पुन्हा प्रचारात आला, मात्र सहा शतकांच्या शाकाहारी भोजनाचा ठसा या साइड डिशेश मधून उरला असं मानलं जातं. सर्वसाधारणपणे किमचीमध्ये नापा कॅबेज (चायनिज कोबी), कोरियन मूळा हे मुख्य घटक असतात. या भाज्यांना चटकदार बनवण्यासाठी किमचीमध्ये गोचुगारु (कोरियन लवंगी मिरची), पातीचा कांदा, लसूण, जोत्गल (खारवलेले मासे) घातले जातात. किमचीत वापरलेल्या भाज्या आंबवलेल्या असतात आणि मासे खारवलेले, त्यामुळे किमचीला एक वेगळाच स्वाद येतो.
कोरियन जेवणात प्रत्येकवेळी किमची खाल्ला जात असल्याने त्याच्या वेगवेगळ्या आवृत्या प्रचलित आहेत. कोरियाच्या उत्तर आणि दक्षिण भागातल्या तपमानात फरक असल्याने दोन्ही भागात बनवल्या जाणार्या किमचीतले घटक वेगवेगळे असतात. सध्या कोरियात किमचीचे किमान १८० प्रकार चाखायला मिळतात. किमची इतका लोकप्रिय पदार्थ आहे की दक्षिण कोरियात दरवर्षी प्रतिव्यक्ती किमान १८ किलो किमची खाल्ला जातो. साउथ कोरियात आणि जगातल्या अन्य काही देशांमध्ये २२ नोव्हेंबर हा दिवस ‘किमची डे’ म्हणून साजरा केला जातो. युनेस्कोच्या ‘इन्टँजिबल कल्चरल हेरिटेज’च्या यादीत किमचीचा समावेश करण्यात आला आहे. वीणा वर्ल्डच्या कोरिया टूरमध्ये किमचीचा स्वाद घ्यायला विसरू नका. देश विदेशातील अशाच विविध खाद्य परंपरा आणि ट्रॅव्हलचे भन्नाट अनुभव ऐकण्यासाठी वीणा वर्ल्डचा ‘ट्रॅव्हल एक्सप्लोअर सेलिब्रेट लाईफ ’ हा पॉडकास्ट नक्की ऐका.
www.veenaworld.com/podcast
हॉलिडे जस्ट द वे यू लाइक इट!
परदेश प्रवास म्हटला की आपल्या डोळ्यांसमोर येतो तो विमानप्रवास. पण ‘दिलवाले दुल्हनिया ले जाऐंगे’मध्ये राज आणि सिमरनने केलेला युरेलचा प्रवास आजही आपल्या डोळ्यांसमोर आहे. जगात अनेक ठिकाणी अशा एकसाईटिंग ट्रेन जर्नीज करणं सहज शक्य आहे. आणि त्यासाठी आहे ‘वीणा वर्ल्ड कस्टमाईज्ड हॉलिडेज’ डिव्हीजन. तुमचा प्रायव्हेट हॉलिडे तुमच्या मनाप्रमाणे डिझाईन करून देण्यासाठी. युरोपमध्ये सर्वात पॉप्युलर आहेत स्वित्झर्लंडच्या ट्रेन्स. त्यातली एक ट्रेन म्हणजे ‘ग्लेशिअर एक्सप्रेस’. झरमॅट ते सेंट मॉरिट्झ प्रवास करणार्या ह्या ट्रेनमधून तुम्ही चक्कं आपल्या कुटुंबाला किंवा मित्रमैत्रिणींना पत्र पाठवू शकता. ह्या ट्रेनमध्ये मेलबॉक्सची व्यवस्था आहे. ह्या ट्रेनने प्रवास करण्याचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे झरमॅट ते सेंट मॉरिट्झ ही ट्रेन तब्बल २९१ ब्रिज व ९१ बोगद्यांमधनं प्रवास करते. स्वित्झर्लंडमधलीच आणखी एक प्रसिद्ध ट्रेन आहे ‘बर्निनी एक्सप्रेस’. इटलीमधल्या तिरानोहून स्वित्झर्लंडच्या चूर दरम्यान धावणारी ही ट्रेन लाईन युनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेज साईट्स मध्ये लिस्टेड आहे. ह्या ट्रेनला अगदी छतापर्यंत असलेल्या भल्यामोठ्या काचेच्या खिडक्यांमुळे आपण बाहेरचं अद्वितीय सौंदर्य डोळ्यांत मनसोक्त सामावून घेऊ शकतो. युकेमध्ये आहे आपण हॅरी पॉटर चित्रपटात पाहिलेली ‘हॉग्वार्ट्स एक्सप्रेस’. खरंतर ह्या ट्रेनचं नाव आहे ‘जॅकोबाईट स्टीम ट्रेन’. हॅरी पॉटरमध्ये दाखवलेला प्रसिद्ध २१- आर्च्ड ब्रिज इथेच आहे. आपल्या टेक्नॉलॉजीने संपूर्ण जगाला अचंबित करणार्या जपानमध्ये आहे ताशी तब्बल ३२० किलोमीटर वेगाने धावणारी ‘शिंकानसेन’ अर्थात ‘बुलेट ट्रेन’. आयुष्यात एकदा तरी जपानमधल्या बुलेट ट्रेनमधनं प्रवास करण्याचं आपल्या सगळ्यांचंच स्वप्न असतं. आपल्या पंक्च्युऍलिटी आणि प्रिसिशनसाठी जगभरात ओळखल्या जाणार्या बुलेट ट्रेनने आपण टोकियो ते ओसाका प्रवास करताना ट्रेनमध्ये उजव्या बाजुला बसल्यास आपल्याला माऊंट फुजीचं विहंगम दृश्य पाहता येतं. ग्लास डोम असलेली आणखी एक पॉप्युलर ट्रेन आहे कॅनडातील ‘रॉकी माउंटेनियर’. ह्या ट्रेनला आउटडोअर व्ह्यूव्हिंग प्लॅटफॉर्म असून आपल्याला इथून वाटेत दिसणारे धबधबे, लेक्स, ग्लेशिअर्स आणि वाइल्ड लाईफ पाहता येते. युएसएमध्ये प्रसिद्ध आहे ती अलास्कातील ‘देनाली एक्सप्रेस’ आणि कॅलिफोर्नियातील ‘नापा व्हॅली वाईन ट्रेन’. अमेरिकेत ट्रेन्सचा अनुभव नक्की घ्या. जगात अशा काही ट्रेन्सदेखील आहेत जिथे आपण खास जेवणाकरिता आणि राहण्याकरिता देखील जाऊ शकतो. ऑस्ट्रेलियातील अशीच एक ट्रेन म्हणजे ’द क्यू ट्रेन’. ह्यात बसून आपण जगप्रसिद्ध ग्रेट ओशन रोडच्या परिसरात ड्रायसडेल ते क्वीन्सक्लीफ दरम्यान प्रवास करीत तीन तास आरामात डायनिंगचा अनुभव घेऊ शकतो. साऊथ आफ्रिकेत साबी नदीवर असलेल्या ब्रिजवर क्रुगर शलाटी ह्या ट्रेनमध्ये ३१ रूम्स, २४ ट्रेन कॅरेज स्वीट्स आणि ७ ब्रिज हाऊस स्वीट्स आहेत. थोडक्यात हे ट्रेन हॉटेल आहे. इथे आपल्याला ओव्हरहँगिंग पूल आणि ब्रिजवर व्ह्यूव्हिंग डेक पण पाहायला मिळतो. जगभरातल्या अशा एक पेक्षा एक ट्रेन्सचा एक्सपीरिअन्स आपल्या हॉलीडेमध्ये समाविष्ट करण्यासाठी आजच वीणा वर्ल्ड कस्टमाईज्ड टीमशी संपर्क साधा. customizedholidays@veenaworld.com
Post your Comment
Please let us know your thoughts on this story by leaving a comment.