Published in the Saturday Lokasatta on 18 January 2025
...पांढऱ्या शुभ्र बर्फाने आच्छादलेल्या सर्वात उंच डोंगरमाथ्यावर तुम्ही उभे आहात, सभोवताली तुमच्या आय लेव्हलला तशाच डोंगरांची गर्दी आहे आणि पूर्ण 360 डिग्री व्ह्यू तुम्हाला दिसतोय...
इंटरलाकन म्हणजे निसर्गसौंदर्याचा सरताज. प्रत्येक भारतीयालाच नव्हे तर जगातल्या प्रत्येक पर्यटकाला युरोपला जायचं असतं, युरोपमधलं स्वित्झर्लंड डोळे भरून पाहायचं असतं आणि स्वित्झर्लंडमधल्या इंटरलाकनला भेट द्यायची असते. अशा ह्या इंटरलाकनमध्ये आम्ही गेल्या वर्षी ख्रिसमसला होतो. चोवीस डिसेंबरचा आमचा कार्यक्रम होता ‘ग्रिंडेलवाल्ड फर्स्ट’ ह्या ‘टॉप ऑफ ॲडव्हेंचर’च्या ठिकाणी भेट द्यायचा. बर्नीज ओबरलँडमधल्या युंगफ़्राउयॉक रिजनमधल्या ‘विंटर स्कीइंग पॅराडाइज’ आणि ‘समर हायकिंग पॅराडाइज’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या ‘फर्स्ट’ला आम्हीही ‘फर्स्ट टाइम’ जाणार होतो. आम्हाला ही भेट घडवून आणणार होता युंगफ़्राउयॉकच्या प्रचंड एम्पायरचा सीईओ उर्स केसलर. त्यामुळे आम्ही या दिवसाकडे डोळे लावून बसलो होतो. सगळं जग ख्रिसमस हॉलिडेचा आनंद घेत असताना उर्स आणि त्याची पत्नी रिटा आमच्यासोबत संध्याकाळपर्यंत असणार होते, त्यामुळे आम्ही आल्प्सच्या क्लाउड नाइन वरच होतो जणू. मोठ्या गाडीतून एखादा युनिफॉर्मवाला स्वीस शोफर आम्हाला उर्सकडे घेऊन जाईल असं चित्र मनात रेखाटत असताना उर्स आणि रिटा आमच्यासमोर हसत उभे राहिले. उर्स आम्हाला गाडीकडे घेऊन गेला. एक छोटी फोक्सवागेन सीडॅन कार उभी होती. मागच्या सीटवरील स्कीइंग इक्विपमेंट्स ठेवण्यासाठी त्यांनी डिकी उघडली तर त्यात स्की बूट्स, पोल्स, स्नो बोर्डस, हेल्मेट अशा सगळ्या गोष्टी भरलेल्या. ‘आर यू गोईंग फॉर स्कीइंग?’ सुधीरने उर्सला विचारलं. त्यावर तो म्हणाला, ‘आता चार महिने विकेंड्सना आम्ही असेच स्कीइंगला जाणार, त्यामुळे गाडी स्कीमय झालेली असते. ‘ग्रिंडलवाल्ड फर्स्ट’ तुम्हाला दाखवल्यावर आम्ही स्कीइंग करीत प्रत्येक स्की पॉईंट वा स्टेशनवर जाणार आणि तिथल्या युंगफ़्राउयॉकच्या टीम मेंबर्सना ख्रिसमसच्या शुभेच्छा देणार. येत्या चार पाच दिवसांत सर्व टीमला आम्ही भेटणार आहोत’. वंडरफूल! माणसं मोठी होतात त्यामागे असते अखंड मेहनत, तसंच एकदुसऱ्याप्रति, खासकरून आपल्यापेक्षा हुद्द्याने छोटे आहेत त्यांच्याप्रति आदर आणि अनुकंपा. उर्सची गाडी एवढी छोटी का? हा विचार करत असतानाच माझ्या लर्निंगला सुरुवात झाली होती. तसं म्हटलं तर उर्सची ही प्रथम भेट नव्हती. गेली अनेक वर्ष जवळजवळ दर वर्षी उर्स भारतात येतोय. आल्यावर भेटतोच भेटतो. त्याला छोट्या मिटिंग्ज आवडतात जिथे खऱ्या अर्थाने बिझिनेस टॉक्स होतात, आयडियाज शेअर होतात. प्रत्येक वेळी उर्स त्याची वही उघडणार आणि संभाषणातले पॉईंट्स लिहिणार, ओल्ड स्कूलमधल्या अभ्यासू विद्यार्थ्याप्रमाणे. ‘उर्स मीन्स बिझनेस’. ‘नो शो ऑफ’ हा त्याच्या यशस्वितेच्या मंत्रांमधला एक मंत्र. म्हणूनच त्याची गाडीसुद्धा छोटी, गरजेपुरती होती. गाडीत बसल्यावर आजूबाजूच्यांना आपली गाडी आणि आपण कसे दिसलो पाहिजे, आपला रूबाब कसा कळला पाहिजे ह्यामध्ये आयुष्य बऱ्यापैकी खर्च करणाऱ्या माझ्या मनाला लाज वाटली. प्रवास आणि प्रवासात भेटणारी माणसं सतत काहीतरी शिकवतात, ते असं.
वीस पंचवीस मिनिटांमध्ये आम्ही ग्रिंडलवाल्ड फर्स्टच्या बेस स्टेशनला पोहोचलो. येता येता उर्सने त्याचं बालपण ज्या छोट्याशा गावात गेलं ते गाव दाखवलं. त्या आणि त्याच्या आजूबाजूच्या अनेक गावांसाठी युंगफ्राउयॉक ने जी सुविधा निर्माण केलीय, जे रेल्वेचं जाळं उभं केलंय ते सगळंच इन्स्पायरिंग आहे. त्याने जगभरातल्या टुरिस्ट्सचा प्रचंड ओढा या रिजनकडे खेचून घेतलाय! याच प्रवासात उर्सने अनेक ठिकाणी बनवलेले हायड्रो पॉवर प्रोजेक्ट्सही दाखवले. त्यांची रेल्वे त्याच वीजेवर चालते. ट्रोटीबाइक्सचं बोर्ट स्टेशन, फर्स्ट फ्लायर, माउंटन कार्ट, फर्स्ट ग्लायडरचं श्रेकफेल्ड स्टेशन क्रॉस करीत सभोवतालचे पांढऱ्या शुभ्र बर्फाची शाल पांघरलेले आल्प्सचे पहाड बघत आम्ही शेवटच्या स्टेशनवर पोहोचलो. ‘टॉप ऑफ द वर्ल्ड’ चा फील काय असतो हे आम्ही अनुभवत होतो. नेचर इन इट्स प्युअरेस्ट फॉर्म! जस्ट इमॅजिन, पांढऱ्या शुभ्र बर्फाने आच्छादलेल्या सर्वात उंच डोंगरमाथ्यावर तुम्ही उभे आहात, सभोवताली तुमच्या आय लेव्हलला तशाच डोंगरांची गर्दी आहे आणि पूर्ण 360 डिग्री व्ह्यू तुम्हाला दिसतोय... तुमच्या आनंदाला पारावार उरणार नाही नं. तेच आमचं झालं. उर्सने आम्हाला व्ह्यू पॉईंटवरून हा नजारा दाखवला आणि नंतर तो घेऊन गेला अलिकडेच त्याने बनविलेल्या अफलातून फर्स्ट क्लिफ वॉक वर. असा क्लिफवॉक म्हटलं की बऱ्याच ठिकाणी काचेचा बॉटम करतात, जेणेकरून तो अनुभव आणखी रोमांचक होऊन जातो. सुधीरने विचारलंही, ‘ग्लास बॉटम केलाय का?’ त्यावर उर्सचं उत्तर त्याचं व्यक्तिमत्व दर्शवून गेलं. ‘ग्लास बॉटमची अनेकांनी भीती वाटते त्यामुळे मी ते केलं नाही. जे काही आम्ही निर्माण करतोय त्याचा आनंद सर्वांना घेता आला पाहिजे.’ वाह क्या बात है! थोड्याफार प्रमाणात आमचं शॅडोइंग सुरू होतं एका सीइओचं. तो क्लिफ वॉक घेऊन आम्ही रेस्टॉरंटला पोहोचलो. उर्सने त्या माऊंटन टॉपवर स्पेशल लंच अरेंज केलं होतं, कारण त्या दिवशी सुधीरचा वाढदिवस होता. स्वीस आल्प्समध्ये माऊंटन टॉपवर बर्थ डे सेलिब्रेशन करण्याचा आमचा तो पहिलाच अनुभव. आल्प्सचं मोहमयी वातावरण, युंगफ़्राउयॉक ग्रिंडलवाल्ड फर्स्ट टीमचं वॉर्म वेलकम, खुद्द उर्सची सपत्नीक उपस्थिती त्यामुळे सुधीरचा वाढदिवस हा आमच्यासाठी एक चिरंतन आनंदी आठवण बनला. केक कटिंग आणि लंच झाल्यावर मी उर्ससारखी वही उघडली आणि त्याला प्रश्न विचारायला सुरूवात केली. कारण उद्या आम्ही त्याचं खरं एम्पायर टॉफ ऑफ युरोप-युंगफ्राऊ बघायला जाणार होतो.
1893 मध्ये स्वीस इंडस्ट्रियालिस्ट ॲडाल्फ गुयर झेल्लर युंगफ्राऊ रीजनमध्ये हायकिंग करीत असताना त्याला कल्पना सुचली की या स्वीस आल्प्समधल्या टॉप ऑफ युरोपवर सर्वांना पोहोचता आलं पाहिजे, त्याद्वारे टूरिस्ट आले पाहिजेत, पहाडांमध्ये टनेल्स करून हे शक्य करता येईल. त्याने स्वत: प्लॅन बनवला, त्याचं महत्व ऑथोरिटीजना पटवून तो पास करून घेतला. पुढच्या तीन वर्षांत म्हणजे 1896 ला कामाला सुरुवात झाली आणि सोळा वर्षांत त्यांनी ही कॉगव्हिल ट्रेनवाली रेल्वे पूर्ण केली. ह्यामध्ये अनेक अडचणी आल्या. त्यातली सर्वात दुख:द गोष्ट म्हणजे काम सुरू केल्यानंतर तीन वर्षात झेल्लरचं निधन झालं. त्याचं स्वप्न पूर्ण झालेलं त्याने पाहिलंच नाही. अर्थात त्याच्या पुढच्या पिढीने हे काम पुढे नेलं. ज्यामुळे वर्षानुवर्षं स्वीस लोकं आणि पर्यटक त्याचा आनंद घेताहेत. आता युंगफ्राऊ ही लिस्टेड कंपनी आहे, बोर्ड-शेअर होर्ल्डर्स-सीइओ हे स्ट्रक्चर आणि त्याचा आताचा सीइओ उर्स केसलर. त्याच मातीत वाढलेला, आपलं सर्व आयुष्य युंगफ्राऊला दिलेला, टप्प्याटप्प्याने प्रगती करीत सीइओ पदावर पोहोचलेला उर्स. खरंतर चांगलं चाललं होतं की, भरभरून टूरिस्ट येत होते युंगफ्राऊला. पण कॉगव्हिल ट्रेन जास्त वेळ घेेत होती आणि उर्सला युंगफ्राऊला पोहोचण्याचा वेळ कमी करायचा होता. मग त्याने एअरपोर्टच्या धर्तीवर ग्रिन्डलवाल्ड टर्मिनल स्टेशन, तिथून आयगर एक्सप्रेस ही अल्ट्रामॉडर्न केबल कार आयगर ग्लेशियर स्टेशनपर्यंत आणि तिथून युंगफ्राऊ टॉप ऑफ युरोप पर्यंत शंभर वर्षांहून अधिक काळ सेवा देणाऱ्या कॉगव्हिल ट्रेनचा छोटा प्रवास हे प्रपोजल तयार केलं. 2012 मध्ये सर्वांसमोर आणलं आणि 2018 ला टर्मिनल, लोकल्स आणि पर्यटकांसाठी खुलं झालं. या प्रोजेक्टसाठी आठ वर्षं लागली पण त्यातली फक्त अडीच वर्षंच ॲक्चुअल कामाला लागली. बाकीची वर्षं ग्रिन्डलवाल्ड आणि आजूबाजूच्या गावांना मनविण्यात गेली, पण उर्सने हार मानली नाही. गावकरी आणि शेअरहोल्डर्स दोघांनाही त्याने या फ्यूचरिस्टिक प्रोजेक्टचं महत्व पटवून दिलं. प्रोजेक्ट अतिशय कमी वेळात पूर्ण केला आणि प्रॉफिटमध्येही आणला. सर्वांचीच सोय झाली. लोकल व्यवसाय वाढले. टूरिस्टना सोयीचं झालं.
दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही ट्रेन पकडून युंगफ्राऊकडे निघालो तेव्हा अगदी पाच सात वर्षांच्या मुलांपासून साठच्या पलीकडच्या स्कीअर्सनी इंटरलाकन स्टेशन तुडूंब भरलेलं. त्या सकाळच्या चार पाच तासात अशा गाड्याच्या गाड्या भरून लोकं स्वीस आल्प्समध्ये धाव घेत होते. प्रत्येक ठिकाणी एवढ्या टॉप नॉच फॅसिलिटीज होत्या की प्रचंड संख्येने लोक तिथे जात होते तरीही कोणत्याही स्पॉटला गर्दी जाणवली नाही. क्राऊड मॅनेजमेंट किवा गर्दीचं व्यवस्थापन इतक्या मस्त तऱ्हेने प्लॅन केलं आहे की हॅट्स ऑफ टू युंगफ्राऊ मॅनेजमेंट आणि त्याचा सीइओ उर्स केसलर आणि त्याच्या टीमला..
हे सगळं शांतपणे हसत हसत सांभाळणाऱ्या उर्सला विचारलं, ‘हाऊ कॅन यू बी सो ग्रेट ॲन्ड स्टिल डाऊन टू अर्थ? तो म्हणाला, ‘मी हो किंवा नाही हा डिसिजन फास्ट घेतो. मी भविष्याकडे बघून निर्णय घेतो, भूतकाळात रमत नाही. मी जे काही करतो त्यावर विश्वास ठेवतो आणि ज्यावर माझा विश्वास आहे ते मी करतो. प्रत्येक गोष्ट करताना ज्यांच्यासाठी ते करतोय त्यांचा आणि त्यांच्या सोयींचा विचार करतो. क्वालिटीशी मी कॉम्प्रोमाईज करत नाही. जगातून येणाऱ्या कोणत्याही पर्यटकाची गैरसोय होऊ नये म्हणून आम्ही वर्षभर युंगफ्राऊ सुरू ठेवतो. आता टूरिस्ट खूप वाढलेत, हॉटेल्स कमी पडताहेत म्हणून आम्ही स्वित्झर्लंडमध्ये तुम्ही कुठेही रहा, एका दिवसात तुम्हाला युंगफ्राऊ बघता येईल असं ट्रेनचं मोठं जाळं एक्स्पांड करतोय. अबब! ऐकूनच आम्हाला दमायला होत होतं. तेवढ्यात उर्सची पत्नी म्हणाली ‘जवळजवळ सर्व टीम मेंबर्सना उर्स त्यांच्या पहिल्या नावाने ओळखतो.’ आता हद्द झाली होती. उर्सच्या भन्नाट कर्तृत्त्वाचं सिक्रेट त्याच्या शांत स्वभावात, प्रचंड महत्वाकांक्षेत, सर्वांविषयीच्या आदर आणि अनुकंपेत होतं. आजचा दिवस आमच्यासाठी फीस्ट होता सर्वार्थाने.
युंगफ्राऊला ॲक्च्युअली टॉप ऑफ युरोपला काय आहे हे मी इथे दिलंच नाहीये. त्याचं वर्णन करून मी तुमचा आनंद स्पॉइल करणार नाही, तर त्या जादुई दुनियेत तुम्हाला घेऊन जाणार आहे. तुम्ही जाल तेव्हा एअरपोर्टपेक्षाही सुंदर असं हे ‘टर्मिनल’ तुम्हाला नक्की आवडेल. टर्मिनलहून आयगर ग्लेशिअर स्टेशनला नेणारी जगातली मोस्ट मॉडर्न ट्रायकेबल गंडोला तुम्हाला आश्चर्यचकित करेल आणि त्यातून दिसणारा माऊंटन्सचा नजारा बघून तुम्ही एकदम खुश होऊन जाल. युरोपचं सर्वात उंचावरचं पोस्ट ऑफिस, चॉकलेट शॉप, स्वीस वॉच शॉप, टॉप ऑफ युरोपवरचं स्वत:चं फायर ब्रिगेड, संपूर्ण रीजनमधल्या गावांना वरदान ठरलेलं रेल्वेचं जाळं चालविण्यासाठी स्वत:चं हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर स्टेशन, वेल मेंटेन्ड कॉगव्हिल ट्रेन ड्राइव्ह, अवाढव्य टर्मिनल स्टेशन, तेथील हायजिनिक क्लिन ऑटोमेटेड किचन हे सगळं पाहून तुम्ही अचंबित व्हाल. युंगफ्राऊ किंवा ज्याला टॉप ऑफ युरोप म्हटलं जातं किंवा जिथे युरोपमधलं सर्वात उंचावरचं रेल्वे स्टेशन आहे त्या युंगफ्राऊचा समावेश आमच्या स्वित्झर्लंडला जाणाऱ्या आणि तिथे तीन रात्री राहणाऱ्या बहुतेक सर्व टूर्समध्ये आहे. कारण युंगफ्राऊ हे फक्त एक छान छान स्थलदर्शन नाहीये तर ते आहे एम्प्लॉॅयमेंट जनरेट करणारं, जगभरातील पर्यटकांना स्वित्झर्लंडमध्ये खेचणारं, आसपासच्या गावांमध्ये रेल्वेची सुविधा निर्माण करणारं आणि हे सर्व करीत असताना प्रॉफिटमध्ये असणारं व्हेंचर. हे आहे एका माणसाने पाहिलेलं एक स्वप्नं.. त्या स्वप्नाला पुढे घेऊन जाणारी पुढची पॅशनेट जनरेशन.. आणि जगासाठी एक इन्स्पिरेशन...
Post your Comment
Please let us know your thoughts on this story by leaving a comment.