Published in the Saturday Lokasatta on 28 September, 2024
...पण भविष्यात तो मौका कधीतरी मिळेलच. आम्ही ही दोन दिवसांची टूर मॅनेजरशीप करीत असताना कान मात्र विहारच्या फोनची वाट बघत होते...
एखादा आठवडा असा येतो नं की तो कशासाठीतरी लक्षात राहतो. आमच्यासाठी मागचा आठवडा `बॅगा हरविण्याचा’ आठवडा होता जणू. ऑस्ट्रिया स्वित्झर्लंड पॅरिस टूर सुरू झाली होती आणि पहिल्या डेस्टिनेशनला पॅरिसला संपूर्ण ग्रुपच्या बॅगाच पोहोचल्या नाहीत. जनरली बॅगा जर पोहोचल्या नाहीत तर आपल्या फ्लाइटच्या मागून येणाऱ्या फ्लाइटमध्ये एअरलाइन त्या लोड करते आणि आपल्याला दुसऱ्या दिवशी त्या बॅगा आपल्या घरी किंवा बाहेर असलो तर हॉटेलला डिलिव्हर केल्या जातात. दुसऱ्या दिवशी नाही आल्या तर तिसऱ्या दिवशी त्या येतातच येतात. आपल्यातले जे फ्रिक्वेंट ट्रॅव्हलर्स आहेत त्यांना कधी ना कधी हा अनुभव आलाच असेल. पण इथे मात्र ह्या आमच्या ग्रुपच्या बॅगा दुसऱ्या नाही, तिसऱ्या नाही, आठव्या दिवशी स्वित्झर्लंडच्या हॉटेलला डिलिव्हर झाल्या. हा उच्चांक होता बॅगेज डीलेचा. पर्यटकांच्या मनस्थितीची आणि मनस्तापाची कल्पनाच केलेली बरी. आणि टूर मॅनेजरची अवस्था त्याहुनही बिकट. एका साईडला बॅगांचं टेंशन आणि दुसऱ्या साईडला त्याही परिस्थितीत हसत हसत ठरलेल्या कार्यक्रमानुसार टूर पार पाडणं. आमचा राकेश दिसले हा टूर मॅनेजर प्रयत्नांची पराकाष्ठा करीत होता. आश्चर्य म्हणजे ह्या बॅगा आधी ट्रेसच होत नव्हत्या. नॉर्मली बॅगांचं लोकेशन कळतं पण इथे नेमकं काय झालं ते एअरलाइनही सांगू शकत नव्हती. आमची ऑफिस टीम आणि एअरलाइनची मंडळी एक भलं मोठं प्रश्नचिन्ह घेऊन वावरत होती. पर्यटकांसाठी आम्ही जबाबदार होतो जरी आमची चूक नसली तरी, त्यामुळे ह्या त्यांना झालेल्या मनस्तापाबद्दल त्यांची क्षमा मागते. अर्थात त्यांनी त्याही परिस्थितीत केलेल्या सहकार्याबद्दल त्यांचे आभार. हे चालू असतानाच स्पेन पोर्तुगाल मोरोक्को ला गेलेल्या ग्रुपमधल्या काही मंडळींच्या बॅगा कासाब्लांका ह्या पहिल्या डेस्टिनेशनला पोहोचल्या नाहीत. पॅरिस स्वित्झर्लंड कमी होतं की काय तर आता त्यात कासाब्लांकाची भर पडली. तिथला टूर मॅनेजर हितेश सोनावणे त्याच्याही हरवलेल्या बॅगसह ह्या सरप्राइजला सामोरं गेलाय. वेस्टर्न युरोप आणि मेडिटरेनियन युरोप बॅगा हरवण्याच्या शर्यतीत उतरल्यावर नॉर्दन युरोप कसा मागे राहणार. स्कॅन्डिनेव्हिया आइसलँड टूरवर बर्गेनहून स्टॉकहोमला येताना प्रचंड दाट धुक्यामुळे आधी फ्लाइट कॅन्सल झालं. नंतर कसेबसे प्रयत्नांनी ग्रुपला व्हाया हेलिसिंकी स्टॉकहोमला तर पोहोचवलं पण ग्रुपमधल्या पंधरा बॅगा स्टॉकहोमला आल्याच नाहीत. आता पर्यटक आणि आमचा टूर मॅनेजर राज गवस ह्यांना `बेस्ट ऑफ लक’ म्हणत आमची एअर टीम बॅगांचा अतापता शोधत बसलीय. रनिंग टूर मध्ये असं काही घडलं की त्रास होतोच, पर्यटकांना, टूर मॅनेजरला आणि त्याच्या पाठीशी असलेल्या ऑफिस टीमला. गोष्टी हाताबाहेरच्या असतात, प्रयत्न करीत राहणे हे आमचं काम.
सो बॅगा हरवण्याचा हा आठवडा तेवढ्यावरच थांबला नाही. आमच्या दर महिन्याच्या प्रवासात गणपतीनंतर आमचा दौरा होता टुनिसिया माल्टा सिसिली (इटली) ह्या देशांमध्ये. एवढं सगळं बॅगाप्रकरण सुरू होतं त्यामुळे निघतानाच सुधीरला म्हटलं हॅन्डबॅगेत कपड्यांचा एक जोड आणि आवश्यक गोष्टी ठेवूया, न जाणो आपलीही बॅग पहिल्या डेस्टिनेशनला आलीच नाही तर. `शुभ बोल रे नाऱ्या’ सारखं आमचं झालं. टुनिसियातल्या टुनिस ह्या राजधानीच्या शहरात आम्ही उतरलो आणि फोन सुरू केल्या केल्या एअरलाइनचा मेसेज दिसला, `तुमच्या बॅगा तुमच्या फ्लाइटला लोड झाल्या नाहीत, त्या पुढच्या फ्लाइटला येतील, मध्यरात्री. टुनिसमध्ये बॅगा हॉटेलला डिलिव्हर होत नाहीत त्यामुळे तुम्ही येऊन घेऊन जा’. हूशऽऽऽ म्हणजे मध्यरात्री एअरपोर्टला हेलपाटा घालणं आलं. आलिया भोगासी. सुधीर आणि आमचा ह्या टूरचा टूर मॅनेजर विहार ठाकूरने मध्यरात्री जाऊन बॅगा आणल्या. सो त्या आठवड्यात बॅगा हरवलेल्या पर्यटकांच्या मनस्थितीतून आम्हीही गेलो. टुनिसियाला आम्ही आणि आमचे पर्यटक सर्वच नवीन होतो पण हा देश किंवा टुनिस शहराने आम्हाला एकसेएक छान छान डेस्टिनेशन्स दाखवून खूश करून टाकलं. मस्त देश आहे हा. सर्वांचं मत पडलं की अजून एक दोन दिवस ह्या देशात रहायला हवं होतं. टुनिस शहरातून आम्ही चाळीस पर्यटक इटलीतल्या सिसिली शहरात पोहोचलो. छोटा तासाभराचा विमानप्रवास आणि विमानही छोटंसच. सिसिली प्रदेशाच्या राजधानीत पालेरमो मध्ये आम्ही पोहोचलो आणि बघतो तर काय, आमच्या ग्रुपमधल्या काही पर्यटकांच्या बॅगाच आल्या नाहीत. आता ‘एवढंच बाकी होतं‘ म्हणण्याची वेळ आली. पालेरमोचं स्थलदर्शन आम्ही केलं. पण न आलेल्या बॅगांचं काय? पालेरमोमध्ये एकाच रात्रीचं वास्तव्य होतं. पुढचे दोन दिवस आम्ही माऊंट एतना कातानिया मध्ये वास्तव्य करणार होतो. बरं, जसं पॅरिसच्या बॅगा स्वित्झर्लंड हॉटेलला आल्या तसाही प्रकार इथे होणार नव्हता. कारण टुनिसिया ह्या छोट्याशा देशाची ही छोटी एअरलाइन हरवलेल्या बॅगा डिलिव्हर करीत नाही. आपल्याला जाऊन त्या घ्यावा लागतात एअरपोर्टवर. बरं ते फ्लाइटही रोज नाही म्हणजे बॅगा तिसऱ्या दिवशी आल्या तर येतील असा प्रकार. आणि तिसऱ्या दिवशी त्या आल्या नाहीत तर ‘ओम स्वाहा:’ कारण आम्ही म्हणजे ग्रुप इटली सोडून माल्टाला जाणार. ह्या टूरला आम्ही इतर पर्यटकांसारखेच वीणा वर्ल्डसोबत टूरिस्ट म्हणून आलो होतो. आम्ही टूर मॅनेजरशीप केल्याचे दिवस कधीच संपले होते. म्हणजे पंधरा वीस वर्ष झाली होती टूर मॅनेजर म्हणून निवृत्त झाल्याला. आता एकच पर्याय होता तो म्हणजे विहारला पालेरमोमध्येच ठेवायचं, त्याचीही बॅग आली नव्हतीच आणि पुढचे दोन दिवस सुधीरने टूर मॅनेजर म्हणून ग्रुप हातात घ्यायचा आणि मी त्याची मदतनीस, असिस्टंट टूर मॅनेजर. आम्ही दोघं ह्या टूरला असल्याचा हा एक फायदा जर घेता आला आणि पर्यटकांना त्यांच्या बॅगा जर मिळवून देत आल्या तर व्हाय नॉट? ‘टूरिस्ट म्हणून गेलो पण टूर मॅनेजर्स बनावं लागलं’ हे आमच्यासाठी मोठ्ठं सरप्राइज होतं. कधी कधी म्हणतात नं की तुमचा भूतकाळ तुमच्या मानगुटीवर येऊन बसतो तसंच काहीसं इथे झालं. पण मजा आली पुन्हा टूर मॅनेजर बनताना आणि वीणा वर्ल्डचा झेंडा हातात धरताना. सुधीर वीस वर्षांपुर्वीच्याच उत्साहाने टूर मॅनेजरशीपच्या सगळ्या गोष्टी करताना बघून आम्ही सर्व पर्यटक आश्चर्यचकित झालो होतो. छान पार पडले हे दोन दिवस. `विहार कशा मस्त टूर्स करतो’ हे मात्र आम्हाला पूर्ण अनुभवायला मिळालं नाही, त्यालाही त्याचं वाईट वाटलं पण भविष्यात तो मौका कधीतरी मिळेलच. आम्ही ही दोन दिवसांची टूर मॅनेजरशीप करीत असताना कान मात्र विहारच्या फोनची वाट बघत होते. बॅगा मिळाल्या नाहीत तर बॅगांना शेवटचा टाटा करून पुढे जावं लागणार हे दिसत होतं. पण मनापासून काही इच्छिलं आणि त्याप्रमाणे प्रयत्न केले तर यश मिळतंच तसं झालं. विहारचा फोन आला, बॅगा मिळाल्या, त्या घेऊन तो कातानियाला पोहोचला आणि हुश्य झालं. आता ग्रुप इटली देश सोडायला मोकळा. विहार आल्यावर त्याच्या हाती आमच्या ग्रुपला सोपवून आम्ही मुंबईकडे निघालो. माल्टा हा सुंदर देश ह्यावेळी आम्ही दोघं करू शकलो नाही ह्याची रूखरूख मात्र राहिली.
एकूणच बॅगा प्रकरणाचा हा आठवडा लक्षात राहील. ह्यामुळे अनेक गोष्टी पुढे आल्या. पॅरिस स्वित्झर्लंड ग्रुपच्या अनेक मंडळींची औषधं कार्गो बॅगेत होती. जेव्हा बॅगांचा मागमूस लागत नाही हे आमच्या टीमच्या लक्षात आलं तेव्हा कुरियरने त्यांनी पर्यटकांची औषधं पाठवली. पण आमच्या ह्यापुढील सूचनांमध्ये ‘औषधं हॅन्डबॅगेतच ठेवा‘ ही गोष्ट अधोरेखित झाली. ‘आवश्यक औषधं आणि डॉक्टर्सचं प्रिस्क्रिप्शन ह्या गोष्टी हॅन्डबॅगेतच असल्या पाहिजेत‘ ही गोष्ट प्रत्येक पर्यटकानेच नव्हे तर प्रवाशानेही लक्षात ठेवली पाहिजे. दुसरी गोष्ट पहिल्या दोन दिवसात आपलं काही अडणार नाही हा विचार करून हॅन्डबॅगेत आपल्या महत्वाच्या वस्तु घेतल्या पाहिजेत, म्हणजे चेकइन किंवा कार्गो बॅग डीले झाली तेरी बेहत्तर, वेळ निभावता येईल. तिसरी गोष्ट आमच्यासोबत असलेल्या पुण्याच्या श्री व सौ प्रभाकर आणि सुमन मस्केंनी शिकवली. त्यांच्याही दोन मोठ्या बॅगांमधली एक बॅग आली नव्हती. त्यांना विचारलं, ‘तुमच्यातल्या कुणाची बॅग आली नाही?‘ तर म्हणाले, 'प्रत्येक बॅगेत आम्ही अर्ध्या अर्ध्या वस्तु ठेवतो. मोठ्या बॅगेत एक भाग हिचा दुसरा माझा, छोटया केबीन बॅगेतही तसंच, त्यामुळे आमची एक बॅग आली नाही तरी तुर्तास काही अडणार नाहीये‘. ॲच्युअली पुर्वी मला आठवतं मिस्टर ॲन्ड मिसेसची एकच मोठी बॅग असायची एखाद्या एकत्र कुटुंबासारखी. त्यात सगळ्या वस्तु आणि कपडे एकत्र नांदायचे. आता जग बदललं. एकत्र कुटुंबपद्धती मागे पडली, प्रत्येक जण स्वतंत्र झाला. ‘तुझा तू आणि माझी मी‘ अशी स्वतंत्र विचारपध्दती आणि जीवनशैली खोलवर रुतली. घरं वेगळी झाली तशाच बॅगाही वेगळ्या झाल्या. ‘माझ्या बॅगेत तुझी एकही वस्तु नको तसंच तुझ्या बॅगेत माझं काहीही नको‘ हा ताठा आला. माझी आणि सुधीरची तर किती तू तू मैं मैं चालते ह्यावरून. पण आता घ्या बॅगा हरवण्याच्या संकटाचा सामना करताना हा ताठा सोडून द्यावा लागेल. स्वतंत्रतेचा ॲटिट्युड थोडा टोन डाऊन करावा लागेल असं दिसतंय. म्हणजे प्रत्येकाची एक मिड साइज चेक इन फोर व्हील बॅग, एक एकदम छोटी स्ट्रोलर केबिन बॅग आणि क्रॉस शोल्डर लाइट पर्स ह्या गोष्टींचा मस्त स्वतंत्र सेट प्रत्येकाने करायचा पण वस्तु फॅमिलीनुसार प्रत्येक बॅगेत सर्वांच्या मिळून एकत्र ठेवायच्या. बॅगांची एकत्र कुटुंबपध्दती. दोन बॅगा किंवा चार जणांच्या चार बॅगा असतील तर पहिल्या दोन दिवसांची एक बॅग, पुढच्या तीन दिवसांची एक बॅग अशीही विभागणी करता येईल. शेवटी काय, कोणत्याही एअरलाइमध्ये बॅगा डीले होऊ शकतात. अशी वेळ आपल्यावर आलीच तर कम्फर्टेबली स्मार्टली प्रवास करता आला पाहिजे आणि प्रवासातल्या ह्या बॅगा हरविण्याच्या सरप्राइजला हसत हसत सामोरं जाता आलं पाहिजे. एखाद्यावेळी बॅग पूर्णपणे हरवेलही, त्यामुळे तीही मानसिकता करूया. जर असं कोणतंही सरप्राइज मिळालं नाही तर आणखी आनंदी होऊया. आणि घाबरू नका बरं, आमच्या चाळीस वर्षांच्या प्रवासात कधीतरी बॅग डीले झालीय पण हरवली नाही.
सो डोन्ट वरी, बी हॅप्पी! हकुना मटाटा!
Post your Comment
Please let us know your thoughts on this story by leaving a comment.