…`ही गोष्ट अशी का नाही?’ हा प्रश्न आपण आपल्याला विचारला नाही. `अरे’ ला `कारे’ करायचं नाही नं...
Published in the Saturday Lokasatta on 11 May, 2024
बांद्य्राच्या प्राइड फर्निशिंगचा मेसेज आला, `आता शोरूम एकदम मस्त केलीय. फुल्ली रीफर्बिश्ड, नवीन नवीन गोष्टी आहेत, एकदा येऊन जा’. एखाद्या शोरूमला जायची संधी कोण सोडणार, आणि तसंही मला एक कम्प्लीट बेडस्प्रेड कुशन्स पिलोज असा सगळा सेट गिफ्ट देण्यासाठी हवाच होता. नील हेता जवळच होते, त्यांना म्हटलं, `मी प्राइडला चाललेय, बेडसेटची एक गिफ्ट घ्यायचीय’. हेता म्हणाली, `मलापण अशीच बेडस्प्रेड वैगेरेची गिफ्ट घ्यायचीय, चला मी पण येते‘. अरे वाह! सासूबाई सूनबाई ग्रेट पीपल थिंक अलाइक. आमची तिघांची सवारी पोहोचली प्राइडला. हे घेऊया ते घेऊया करीत आम्ही दोन सेट्स सिलेक्ट केले. सेट मध्ये होतं बेडस्प्रेड, दोन मोठ्या पिलोज, दोन मोठ्या मऊ मऊ कुशन्स, दोन छोट्या कुशन्स आणि एक थ्रो कुशन. आता तुम्ही म्हणाल एवढ्या डिटेलिंगची काय गरज. सगळे सेट्स असेच असतात. असो, हे थोडंसं पाल्हाळच झालं. आता ह्या सेटमध्ये सगळी कव्हर्स असतात त्यात पुन्हा फिलर्स कधी आणायला जाणार म्हणून मी म्हटलं, `त्यात फिलर्स पण भरून द्या नं’. एकदाच काय तो खर्च. ज्याला गिफ्ट देणार त्याला पटकन वापरता आलं पाहिजे नाही का, अन्यथा वस्तु अशाच पडून राहतात. त्याने फिलर्स भरायला सुरुवात केली आणि आम्ही तिघांनी युरेका म्हणत एकमेकांकडे पाहिलं. त्यातलं जे पिलो कव्हर होतं रेक्टँग्युलर म्हणजे आपल्या रोजच्या उशीच्या कव्हर सारखंच, थोड मोठ्ठं, त्या कव्हरची जी चेन होती ती उशीच्या आडव्या बाजूला होती. म्हणजे उशीच्या कव्हरला ओपनिंग आपण नेहमी छोट्या उभ्या बाजूला पाहिलंय. हे आडवं असल्याने त्यात फिलर घालून पुन्हा चेन लावणं इतकं इझी होतं की त्याक्षणी असं झालं की `इट्स सो सिंपल, आधी कुणालाच कसं सुचलं नाही’. माझ्यासमोर लहानपणीचे दिवस आठवले. उशांना कव्हर्स घालणं हा एक कार्यक्रम असायचा. एवढी ती लांबलचक उशी, त्या कव्हरच्या छोट्याशा ओपनिंगमधून आत घालायची, त्याची चारही टोकं बरोबर त्या कव्हरच्या चारही साइडला परफेक्टली फिट करायची, कव्हरच्या आतला फोल्ड बरोबर बाहेर आणून कव्हरमधनं दिसणारी उशी झाकून टाकायची आणि उशीच्या मधला कापूस एका ठिकाणी एकवटला नाहीये नं ह्याची खात्री करायची. उशीला कव्हर घालणं हा आमच्या घरी तरी वर्कशॉप असायचा. परफेक्ट कव्हर न घातल्यामुळे धपाटेही खाल्लेत, त्यामुळे हा कव्हर्स घालण्याचा कार्यक्रम नको वाटायचा. त्यावेळी असा प्रश्न का बरं पडला नाही की, `ही कव्हर्स उशीपेक्षा थोडीशी मोठी का नाहीयेत?‘. म्हणजे त्याला झिप वा चेन असावी हा विचार खूपच पुढचा होता कारण झिपच्या क्षेत्रात नवनवीन गोष्टी येत होत्या. स्टीलच्या चेन्स सोबत प्लास्टिक फायबरच्या स्मूथ चेन्स यायला सुरुवात झाली होती त्यामुळे तो प्रश्न नव्हता पण उशीचं कव्हर थोडं मोठं का नसायचं? आत्ताच्या स्टार्टअप जनरेशनला ही गोष्ट समजणार नाही. कारण त्यांना आज कोणत्याही साइजची उशी आणि कोणत्याही साइजची कव्हर्स बसल्याजागी ऑर्डर करता येतात. पण तो जमाना होता एकाच साइजची उशी आणि एकाच साइजची कव्हर्स मार्केटमध्ये उपलब्ध असण्याचा. बॉलिवूड भाषेत म्हणावसं वाटतं की, `जिस पर बितती है उसेही वह पिलो कव्हर्स डालने का दर्द पता है’. म्हणजे परफेक्शनसाठी आई बाबांचे धपाटे सोडले तर मजापण असायची. एकमेकांना उशीने मारणं, उशा एक दुसऱ्यावर फेकणं वैगेर. नॉस्टॅल्जिक मोमेंट्स. प्राइड फर्निशिंगमधली ती पिलो कव्हर मोमेंट त्या दिवसातली `टेक अवे’ गोष्ट होती. दुसऱ्या दिवशी मी कोणत्यातरी एक मिटिंगमध्ये हा किस्सा सांगितला तर समोरच्यांचे डोळे चमकले, `अरे खरंच की!‘ ह्या भावनेने. आमची सिनियर एच आर मॅनेजर ॲनी अल्मेडा म्हणालीच, `अरे उस टाइमही नहीं, आज भी हम पिलो कव्हर्स डालने के लिए झगडते ही हैं। क्यूँ ऐसी चीजे ध्यान में नहीं आती? इट्स सो सिंपल, हाऊ कम नो बडी डिड इट बिफोर?’आपले सर्वांचे आवडते डिरेक्टर प्रोड्यूसर ॲक्टर स्क्रीन प्ले रायटर रवी जाधव ह्यांनी पुर्वी आमचा मार्केटिंग मास्टरक्लास घेतला होता. आणि त्यात त्यांनी म्हटलं होतं, `आयडिया कुणालाही सुचू शकते. सुचल्यावर वाटतं, अरेच्या हे किती सोप्पं होतं, आपल्याला कसं सुचलं नाही? आयडियेवर विश्वास ठेवून सर्वप्रथम ती इम्प्लिमेंट करणारा आणि त्यात सातत्य राखणारा यशस्वी होतो‘. खरंच किती खरं आहे हे. साध्या पिलो कव्हर्सच्या उदाहरणाने ते समोर आलं आणि अशी उदाहरणं हल्ली स्टार्टअपच्या जमान्यात पदोपदी दिसतात. मग पुर्वी एवढ्या मोठ्या प्रमाणावर आयडियाज का सुचायच्या नाहीत? हा प्रश्न पडतो. चर्चासत्रासाठी छान विषय आहे नाही. शाळेत निबंध लिहायला यायचा, `मी शास्त्रज्ञ झाले तर?’ आणि मला वाटायचं, `एकतर मी शास्त्रज्ञ होणं ही एवढी दुरापास्त गोष्ट आहे की त्याचा विचार तरी का करायचा आणि त्यात वेळ तरी का घालवायचा? दुसरी गोष्ट म्हणजे आत्तापर्यंत जेवढे शास्त्रज्ञ होऊन गेलेत त्यांनी आपापलं काम इतकं मस्त केलंय की, सगळे शोध तर लावून झालेयत आता मी मेले काय दिवे लावणार तिथे?‘ एवढी उच्च विचारसरणी असल्यावर त्या निंबधाची काय वाट लागली असेल ह्याची कल्पनाच केलेली बरी. पण तेव्हा आयडियाज कमी सुचायच्या त्याचं कारण मला वाटतं ते आपल्यावर सोशिकतेचा प्रचंड मोठा संस्कार झालाय. `जे आहे त्यात भागव,’ `अंथरूण पाहून पाय पसर’, त्यामुळे आपल्यातला भला मोठा वर्ग सतत सहनच करीत आला. `एखादी गोष्ट अशी आहे‘ ठिक आहे पण `ही गोष्ट अशी का नाही?’ हा प्रश्न आपण आपल्याला विचारला नाही. `अरे’ ला `कारे’ करायचं नाही नं. त्यातही ज्यांनी वेगळी वाट धरली, ज्यांनी त्यांना सुचलेल्या आयडियाजचा पाठपुरावा केला त्यांच्याकडून नवनवीन गोष्टी घडल्या आणि त्यामुळेच आज जे काही सुसह्य जीवन आपण जगतोय तो अशा अनेकांच्या जिद्दीचा आणि ध्येयपूर्तीचा रीझल्ट आहे आणि त्यासाठी आपण त्यांचे ऋणी आहोत किंवा असायला पाहिजे. गेल्या दोन तीन दशकात मात्र तरूणाईची मानसिकता चांगल्या तऱ्हेने बदलली. `पदरी पडले पवित्र झाले’ हे इतिहासजमा झालं. `व्हाय? का? कशासाठी?‘ हे प्रश्न खुलेआम पडायला लागले. ते विचारणं आता गुन्हा नाही वाटत. अन्यथा एक जमाना होता किंवा अजूनही काही घरात ते असू शकतं (ज्यांनी बदलायला हवं), `जेवढं सांगितलय नं तेवढं कर. उगाच चोमडेपणा नको’, `प्रश्न विचारायचे नाहीत’. इतकी जरब किंवा भीतीचा दरारा असायचा की नव्याने विचार करायची किंवा आजच्या पिढीला साहजिकरित्या जे प्रश्न पडतात आणि त्याची उत्तरं शोधायचा प्रयत्न ते करतात आणि त्यासाठी त्यांना खुलं आकाश मिळतं ते तेवढ्या प्रमाणात पुर्वी नव्हतं. अर्थात शिस्तही महत्वाची होती त्यामुळे `मी जर आयुष्यात काही करू शकले नसेन तर त्याचं खापर माझ्या आईवडिलांवर वा मागच्या पिढीवर फोडलं तर ती पळवाट होईल‘. पण ही थोडीशी बंदिस्त कुटुंबसंस्था थोडं नुकसान करून गेलीच. म्हणजे आत्ताच्या खुल्या कुटुंबसंस्थेत सगळंच आलबेल आहे असं नाही पण `आयडिया’ हा माझा आजचा जो विषय आहे त्यासाठी खुली कुटुंबसंस्था, नव्या विचारांना चालना देणारी घरातल्यांची मानसिकता, `आयडियाज’ उचलून धरणारं सामाजिक-राजकिय-आर्थिक पोषक वातावरण ह्या गोष्टी नवीन पिढीसाठी खूप चांगल्या तऱ्हेने लाभदायक ठरल्या आहेत. आणि त्याचा पुरेपुर फायदा ते घेत आहेत आणि त्यांच्यामुळे आपलं जग एकदम सोप्पं बनून गेलंय. अनेक गोष्टींना लागणारा आपला प्रचंड वेळ वाचलाय, अर्थात आपण ह्या वाचलेल्या वेळाचं काय करतो ह्यावर लक्ष द्यायला हवं, आत्मपरिक्षण करायला हवं. जर वाचलेला वेळ सोशल मीडियावर जात असेल तर तो अन्याय आहे ज्यांनी ही सिंपल सोल्युशन्स निर्माण केली त्यांच्यावर, कारण त्यांचा हेतू हाच आहे की एखाद्या गोष्टीवर उगाचच खर्च होणारा वेळ वाचावा आणि आपल्या वाचलेल्या वेळात आपण स्वत:साठी, कुटुंबासाठी, आपल्या करियरसाठी, समाजासाठी वा देशासाठी फूल ना फूलची पाकळी काहीतरी सकारात्मक योगदान द्यावं. सो, जस्ट बी केअरफुल.पुर्वी जगभर फिरताना वेळ असला की मी `आयकिया‘ मध्ये जायची त्या त्या देशातल्या किंवा शहरातल्या. त्यांच्या त्या सिंपल छान छान आयडियाज् आणि सोल्युशन्स बघायला मजा यायची. म्हणजे काही काही गोष्टी बघून असं व्हायचं की, `अरेच्चा, इट्स सो सिंपल आणि आपण किती झगडतो तिथे ही गोष्ट बनवून घ्यायला किंवा आपला कितीतरी वेळ वाया जातो ह्याच्याशिवाय’. बाहेरच्या देशात जनरली मला संध्याकाळी कार्यक्रम असायचा किंवा गेस्टना भेटणं असायचं. सकाळी जर कुणी असोसिएटची मीटिंग नसेल तर तिथलं आयकिया हे माझं ठरलेलं साइटसीइंग. आता ॲमेझॉनवर हे सगळं उपलब्ध आहे पण तिथे लॉगइन करायलाच भीती वाटते. नको त्या गोष्टी उगाचच घ्यायचा मोह होतो. आयकिया सारखी दुसरी आवडती जागा म्हणजे `मुजी’. काय ती छोटी छोटी सिंपल सस्टेनेबल सोल्युशन्स! कपड्याचं शॉपिंग तर नाही करीत मी पण ही नवनवीन सोल्युशन स्टोअर्स बघणं किंवा विंडोशॉपिंग करणं हा आवडता छंद. इतक्या छान जगात आहोत नं आपण! ही सोल्युशन्स नव्हती तेव्हाचं जग आपण पाहिलंय त्यामुळेच आपण जास्त कृतज्ञ आहोत ह्या सगळ्या तरूणाईविषयी, त्यांनी निर्माण केलेल्या सिंपल सोल्युशन्सविषयी आणि आपल्या आयुष्याला सुसह्य बनविल्यासाठी. भले आपल्याला अशा सोल्युशन्सची गरज असेल वा नसेल, कधीतरी शहरातल्या एखाद्या मोठ्या मॉलमध्ये जायचं, चौकस बनायचं, काय काय नवनवीन निर्माण झालंय ते बघायचं, त्या क्रीऐटिव्हिटीला सलाम करायचा, खुल्या दिलानं म्हणायचं, `ओ इट्स सो सिंपल, हाऊ कम, मला हे का सुचलं नाही!’
वीणा पाटील, सुनीला पाटील, आणि नील पाटील ह्यांचे दर आठवड्याला वृत्तपत्रात प्रकाशित होणारे लेख वीणा वर्ल्ड वेबसाईट www.veenaworld.com वर वाचनाकरीता उपलब्ध आहेत.
Post your Comment
Please let us know your thoughts on this story by leaving a comment.