Published in the Saturday Lokasatta on 10 August 2024
...एक ना अनेक फॅशनेबल नावांनी नव्हे आजारांनी आपल्या दैनंदिन जीवनात भर टाकली आहे. कोणत्याही लग्नानंतर घरातली मंडळी ‘थकवा‘ ह्या एकाच समाधानी आजाराचे सावज होतात...
चार पाच महिने चाललेला लग्नसोहळा संपला आणि आपण तमाम भारतीयांनी सुटकेचा निश्वास टाकला. हुश्य झालं अगदी. हळद मेहंदी संगीतला कपडे काय घालायचे, दागिन्यांचं काय करायचं, मेकअप आर्टिस्ट हेअर ड्रेसरला बोलवायचं का? ह्यातलं खरंतर काहीच मला करावं लागलं नाही. कारण मी लग्नाला गेलेच नाही. म्हणजे मला आमंत्रण होतं पण मी गेले नाही असं नाही तर मला आमंत्रण नव्हतंच. आणि तरीही लग्नाला न जाता मी इतकी दमून गेले की काही विचारू नका. ‘अरे ते लग्नाचे व्हिडिओ बघून तुझं पोट भरणार आहे का?‘, ‘किती वेळ त्या मोबाईलमध्ये डोकं खुपसून बसणार आहेस?‘ अशा डायलॉग्ज्नी घराघरात गर्दी केली असणार. जर एखादा सर्वे घेतला की माणसं जास्तीत जास्त किती वेळ हातात मोबाईल धरतात, कोणत्या वेळी, कोणत्या दिवशी, कोणत्या आठवड्यात तर भारतात ह्या शादीच्या कालावधीत त्याचा आलेख अगदी टॉपला गेलेला दिसेल. अनेकांना मानेचे, पाठीचे, हाताचे वेगवेगळे आजार जडले असणार ह्या काळात हे निश्चित. आपल्याला फक्त ‘टेनिस एल्बो‘ नावाचा प्रकार माहित होता, आता त्यात ‘सेल फोन एल्बो‘, ‘टेक्स्टिंग थंब‘, ‘टेक्स्ट नेक‘, ‘स्मार्टफोन पिंकी‘, ‘टेक्स्ट क्लॉ’, ‘कार्पल टनेल सिन्ड्रोम‘ एक ना अनेक फॅशनेबल नावांनी नव्हे आजारांनी आपल्या दैनंदिन जीवनात भर टाकली आहे. कोणत्याही लग्नानंतर घरातली मंडळी ‘थकवा‘ ह्या एकाच समाधानी आजाराचे सावज होतात. पण ह्या लग्नाने मोबाईलचे वेगवेगळे परिणाम आपल्याला दाखवून दिले. लोकं सोशल मिडीयावरचे रील्स, मीम्स, चर्चासत्र बघूनही थकली. गल्ल्यागल्यांमध्ये, कट्ट्यावर अगदी फाइव्ह स्टार हॉटेल्सच्या कॉफी हाऊसमध्ये वा बारमध्ये ग्लास हातात घेऊन हेच सुरू होतं. राइट ऑर राँग? डाव्या-उजव्या विचारांनी आसमंत दणाणून गेला होता. घराघरात शाब्दिक द्वद्वांना उधाण आलं होतं, कुठे कुठे हमरीतुमरीपर्यंत पोहोचलं तर कुठे रागरूसवे. पण एकंदरीत झालं ते चांगलच झालं. युद्धाच्या बातम्या, महागाई, नोकऱ्यांची वानवा, महापूर, लॅन्डस्लाइड्स, इन्फास्ट्रक्चर इत्यादींमध्ये नाकीनऊ आलेल्या आपल्या सर्वांना इतक्या दिवसांची फ्री ऑफ कॉस्ट (मोबाईल रीचार्ज वगळता) एन्टरटेनमेंट तर मिळाली. इंग्लंडच्या राजेशाही लग्नसोहळ्याकडे सगळं जग जसं आदराने बघतं तसं ते आता आपल्याही देशाकडे बघेल ह्या सोहळ्यामुळे. भारत म्हणजे हत्ती आणि साप सरड्यांचा देश असं वाटणाऱ्या जगातल्या अनेक लोकांना भारतातल्या ह्या आधुनिक महाराजीय विवाहसोहळ्याने ‘हम भी कुछ कम नहीं‘ म्हणजेच भारत तुमच्यापेक्षा पुढे आहे ह्याची जाणीव करून दिली. आम्ही टूरिझमवाल्यांनी तर आभारच मानायला पाहिजेत ह्या सोहळ्याचे. बघानं जगभरातले एवढे सेलिब्रिटीज् आणि उद्योजक ह्या सोहळ्याला हजर राहिले आणि त्यांनी किंवा त्यांच्याकडून एवढं काही भरभरून त्याचं सोशल मिडियावर प्रमोशन करून घेतलं की जिथे बिलगेट्स वा मार्क झुकरबर्ग लग्नाला हजर राहतात त्या भारतातील लग्नाला किंवा भारताला भेट द्यायलाच पाहिजे हे जगातल्या अनेकांनी आपल्या बकेटलिस्टमध्ये लिहून टाकलं असेल. भारतातील वेडिंग इंडस्ट्री किती फळाळेल ह्यामुळे. जगात ग्रीस इटली मध्ये जाऊन लग्न करायची फॅशन आहे, पण आपल्या भारताकडे जगातल्या लोकांनी एक वेडिंग डेस्टिनेशन म्हणून पाहिलं तर आपल्या देशात येणाऱ्या फॉरिनर्सची संख्या किती वाढेल बघा नं. आपल्या देशाच्या टूरिझम पोटेन्शियलच्या मानाने येणाऱ्या पर्यटकांची संख्या अगदी नगण्य आहे. फ्रान्स क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारताच्या सोळा टक्के आहे म्हणजे तो इतका लहान देश पण त्यांच्याकडे वर्षाला दहा कोटी पर्यटक येतात. आणि फ्रान्सपेक्षा सोळा सतरा पट मोठ्या, प्रचंड टूरिझम पोटेन्शियल असलेल्या आपल्या भारतात फक्त पंच्याण्णव लाख परदेशी पर्यटक येतात. इन्फ्रास्ट्रक्चरचा अभाव, थोडीशी असुरक्षिततेची भावना, कुठेतरी फसवले जाण्याची भीती, टूरिझमच्या बाबतीत मार्केटिंगची उणीव ह्या गोष्टी त्याच्या मुळाशी आहेत. आपले माननीय पंतप्रधान भारताची प्रतिमा बाहेरच्या देशात उंच करण्यासाठी पराकोटीचे प्रयत्न करीत आहेत. त्याच्या जोडीला हे असे भव्यदिव्य इव्हेंट्स निश्चितच भारताविषयीचं कुतूहल परदेशस्थ भारतीय आणि परदेशी लोकांमध्ये निर्माण करतील. भारतातली फॅशन इंडस्ट्री ह्यामुळे नव्याने जगापुढे आणखी प्रकर्षाने आली. भारतातील जेम्स ज्वेलरीचं सर्वांना आकर्षण आहेच पण ह्या लग्नप्रसंगीचे व्हिडीयोज् त्याविषयीचं अधिक मार्केटिंग करण्यात कारणीभूत ठरलेत. म्हणतात नं, ज्या ब्रिटीशांनी जगावर राज्य केलं त्या ब्रिटीशांकडे कपड्यांच्या रंगाच्या बाबतीत खूपच उदासिनता होती. पांढरा, काळा, बेज, ग्रे हेच काय ते कलर्स. विविधरंगी भारतातल्या रंगीबेरंगी पोशाखांवरून त्यांना रंगांची महती कळली आणि त्यांनी इतर रंगांना आपलंसं केलं. आता ह्या महाउद्योगपतींच्या घरची लग्नं संपली त्यामुळे इतर कुणीतरी अशाच बड्या उद्योगपतींनी पुढे येऊन ही धुरा सांभाळली पाहिजे. ‘एवढं करण्याची काही गरज होती का?‘ हा वादाचा मुद्दा राहतोच पण अनेकांकडून त्याचं स्पष्टीकरण मिळालं की जनरली आपण सर्वसामान्य माणसं उत्पन्नाच्या दहा ते पंधरा टक्के पैसे लग्नावर खर्च करतो. ह्या उद्योगपतींनी त्यांच्या उत्पन्नाच्या दृष्टीने खूपच म्हणजे खूपच कमी खर्च केला म्हणजेच उत्पन्नाच्या मानाने लग्न खूपच साधेपणाने झालं. सो ह्या शाही लग्नाचा उत्सव आता संपलाय आणि चर्चाही हळूहळू थांबतील. अनेकांना काम मिळालं, रोजगार उत्पन्न झाला आणि भारतातील लग्न जगाच्या चर्चेचा विषय बनलं ह्यावर समाधान मानून वधुवराला पुढच्या आयुष्यासाठी शुभेच्छा देऊया. ‘हाऊ मच?‘ ‘सो मच?‘ हे सगळे रीलेटिव्ह प्रश्न आहेत. त्यावर काथ्याकुट करण्यात व्यर्थ वेळ घालवण्यापेक्षा आपल्या प्रगतीपथावर आणि लक्ष्यावर लक्ष देऊया.
पंधरा दिवसांपूर्वी माझ्या भाचीचा युएसए वरून फोन आला होता. तिथल्या एका कंपनीत तिचं काम सुरू होतं पण आता भारतात परत यायचीही वेळ आली होती. गप्पा मारता मारता म्हणाली, ‘सो मच टू डू, अँड सो लेस टाइम‘. तिने फोन ठेवला पण तिचं वाक्य मनात घर करून राहिलं. आपल्याला प्रत्येकाला ही परिस्थिती निर्माण करता येईल का? ‘केवढं काय काय करायचंय पण किती कमी वेळ आहे‘ आयुष्यातली सगळ्यात चांगली वेळ कोणती असेल तर ती हीच. ‘सो मच टू डू, अँड सो लेस टाइम‘.
माझ्या वयाची साठी जवळ आली आणि अचानक आयुष्यात करायच्या राहून गेलेल्या गोष्टी कराव्याशा वाटायला लागल्या. ज्यावेळी स्लो डाऊन व्हायची वेळ आली तेव्हा माझ्यात जास्त शक्ती आल्यासारखं वाटायला लागलं. काय करू आणि काय नको असं होऊन गेलं. मग माझी मीच स्वत:साठी वेगवेगळ्या गोष्टी ज्या आवडतात पण करता आल्या नाहीत त्या शोधायला सुरुवात केली. कुठूनही असं काही उगाचच नको होतं ज्यामध्ये मला इंटरेस्ट नाही. कारण ते फार काळ टिकलं नसतं. एक होतं इंटिरियर डिझायनिंग, त्याचं अगदी शास्त्रशुद्ध शिक्षण घेतलेलं नसलं तरी खूप आवड होती किंवा आहे त्यामुळे तिथे थोडा हात चालवून घेतला किंवा अजूनही ते चालूच आहे. आमची ऑफिसेस किंवा घर डिझाइन करणारे आमचे हितचिंतक एसएसए आर्किटेक्ट्सच्या अल्पा शिक्रे आणि टीमला त्याचा त्रास होत असावा, पण ‘क्या करें, आदत से मजबूर‘. मला आणि सुनिलाला ह्या विषयातलं खूप काही कळायला लागलंय असं वाटल्याने त्यांना थोडा डिस्टर्बन्स आहे पण ते सांभाळून घेताहेत आम्हाला. दुसरी गोष्ट होती पेंटिंग ड्रॉइंग क्लास लावण्याची. दोन वर्षांपूर्वी न्यूयॉर्कच्या ‘मोमा‘ मध्ये भटकत होतो. मी सुनिलाला म्हटलं. ‘पुढच्या जन्मीतरी मला आर्टिस्ट व्हायचंय‘. त्यावर तिचं म्हणणं, ‘पुढच्या जन्मी का इना, ह्या जन्मीही आपण सुरुवात करू शकतो.‘ एखादं अंजन घातल्यासारखं लागू पडलं. तिथूनच सुनिलाने व्हाया व्हाया तिच्या मैत्रिणीच्या सरांना फोन केला आणि आमचा ड्राईंग क्लास आमच्या वेगवेगळ्या घरी सुरू झाला. सुनिलाची प्रगती त्या बाबतीत फर्स्टक्लासने पास ह्या लेव्हलमधली झालीय तर मी गेली दोन वर्ष जेमतेम काठावर पास होतेय. नेव्हर माईंड, दोन वर्ष सातत्याने हा क्लास सुरू आहे हेही नसे थोडके. त्यानंतर लक्षात आलं आपल्याला वाचनाची आवड आहे पण आपण वाचतो किती तर, अगदीच नगण्य. त्यात बिल गेट्ससारखी मंडळी खास वाचनासाठी हॉलिडेवर वैगेरे जातात. ‘वाचाल तर वाचाल‘ हे ते उदाहरणासह दर्शवतात आणि आपण मात्र, पुस्तकं वाचली पाहिजेत, वाचन वाढवलं पाहिजे, आठवड्याला नाही तर महिन्याला एखादं पुस्तकं तरी पूर्ण केलं पाहिजे एवढी पोपटपंची करीत असतो. पण आता ‘साठी आणि बुद्धी नाठी‘ नाही तर साठी म्हणजे आयुष्याच्या अनुभवांनी समृद्ध झालेली बुद्धी जीला वाचनामुळे नव्या विचारांची साथ मिळाली तर अनेक चांगल्या गोष्टीं होवू शकतात. हा विचार करून वाचनालाही सुरुवात केली आणि खरोखरच गेल्या दीड वर्षात खूप पुस्तकं वाचली आणि पूर्ण केली. पूर्ण करणं महत्वाचं. म्हणजे पुस्तक आवडलं, त्याच्यात बरंच काही शिकण्यासारखं मिळालं तर पुस्तक पूर्ण करावं. एखाद्या पुस्तकाच्या बाबतीत आपण सुरुवात करतो, एक दोन चॅप्टर्स वाचले तरी आतपर्यंत काही पोहोचतच नाही असं जर होत असेल तर पुस्तक पूर्ण करायच्या पाठी पडून उगाच वेळ वाया घालवू नये. सोडून द्यावं ते पुस्तक आणि दुसरं नवीन घ्यावं. त्यानंतर आणखी एक गोष्ट मला जगभर फिरूनही जमली नव्हती ती म्हणजे नवीन भाषा शिकणं. खरंतर किती सोप्पं होतं ते माझ्यासाठी, पण आळस किंवा उगाचच आपणच निर्माण केलेला कामाचा बाऊ. लकीली माझी मैत्रिण प्रियदर्शनी राऊत जापनीज्ची टीचर आहे आणि बऱ्याच जणांना ती जापनीज् शिकवते, क्लासेस घेते, तिला म्हटलं, ‘चल मला जापनीज शिकविण्याचं चॅलेंज घे‘. आणि माझा जापनीज्चा क्लास सुरू झाला. बाकी ऑफिसची कामं आणि हे दोन वृत्तपत्रातलं लेखन सुरू आहेच. थोडक्यात, आता पहाटे चार वाजता दिवस सुरू होतो पण तो कसा संपतो कळत नाही. अक्षरश: `सो मच टू डू अँड सो लेस टाइम’ असं झालंय. ‘रात्र थोडी सोफ्लगं फार’ पण त्यात आनंद आहे. ह्याच्या उलट `सो मच टाइम इन हँड बट नथिंग टू डू’ असं झालेलं ना मला आवडणार ना कुणालाही. त्यामुळे वयाची चाळीशी असो वा साठी वा पंचाहत्तरी स्वत:ला सतत कोणत्यातरी चांगल्या आवडत्या सकारात्मक कामात गुंतवून ठेवणं हे आपल्याला जमलं तर आपण आयुष्याची बाजी जिंकली.
Post your Comment
Please let us know your thoughts on this story by leaving a comment.