Published in the Saturday Lokasatta on 6 January, 2024
मागच्या रविवारी नील आणि हेताकडे गेलो होतो. आमचा मोठा मुलगा आणि सुनबाई. आमच्या घराचा मुलांनी आणि आम्ही केलेला एक नियम आहे. लग्न झालं की मुलांनी वेगळं रहायचं. तुम्ही तुमचं आयुष्य एन्जॉय करा आणि आम्ही आमचं. बाकी आपण आहोत एकमेकांचे एकमेकांसाठी. भारतीय आईवडील असल्याने बर्यापैकी गिल्ट वाटत होती नील वेगळा राहायला गेला तेव्हा. त्या गिल्टमध्येच आमच्या धाकट्याला, राज ला विचारलं, ’तुला काय वाटतं एकत्र की वेगवेगळं?’ त्याचं स्पष्ट शब्दात एका वाक्यात उत्तर, ’मम एकत्र राहायचं नाही.’ आता दोन वर्ष झाली आणि हा निर्णय खूपच चांगला घेतला गेला हे आम्हा सर्वांनाच पटलं. एका निर्णयाने आयुष्य सुकर झालं. वेळ कुठे आहे ’तू का असं बोललीस’ आणि ’त्याने का असं केलं’ ह्यावर काथ्याकूट करायला? जे काही आयुष्य आहे ते आनदांत जगूया. जेवढ्या गोष्टी सुलभ करता येतील तेवढ्या करूया. ह्यामुळे व्यर्थ खिटपीट करण्यात खर्च होणारा वेळ आणि शक्ती पूर्ण वाचली होती, जी आम्हा सर्वांना चांगल्या कामासाठी वापरता येणार होती. असो. तर आम्ही नील हेताकडे गेलो होतो. बर्याच गप्पा झाल्यानंतर हेता म्हणाली, ’मॉम यू मस्ट सी धिस, वुई ऑर्गनाइज्ड रीमोट्स. बेडरूमध्ये टीव्हीचा रीमोट, साऊंड सिस्टिमचा रीमोट, अॅप्पल रीमोट माझ्या साईडला ठेवायचे की नीलच्या साईडला हा नेहमी प्रश्न असायचा. कधी मनात आलं म्युझिक लावावं तर रीमोट नेमका त्या दुसर्या साईडला. ह्यावर सोल्युशन काढायचं ठरवलं आणि आम्ही सगळे रीमोट असे बेडच्या मध्यावर लावले. अॅमेझॉनवर हे सोल्युशन आम्हाला मिळालं.’ वाह! क्या बात है! त्यांना दाखवलं नाही पण मनातून मी खूप खुश झाले. एकमेकांच्या सहाय्याने आणि संमतीने आयुष्यातल्या छोट्या छोट्या गोष्टींवर सोल्युशन्स काढण्याची सवय खूप चांगली होती. ही छोटी छोटी सोल्युशन्स मोठा आनंद मिळवून देतात.
अनावश्यक गोष्टींमध्ये उगाचच खर्च होणारा वेळ वाचविण्यासाठी आणि तोच वेळ चांगल्या कामात घालविण्यासाठी लोकांनी काय काय केलंय. अल्बर्ट आईनस्टाईन नेहमी एकाच रंगाचे, एकाच प्रकारचे कपडे घालायचा. त्याचा प्रश्न,व्हाय मेक इट कॉम्लिकेटेड?‘ ग्रे कलरचा सूट, लेदर जॅकेट, सॉक्स न घालता पायात शूज ह्या पोशाखाला त्याने आयुष्यभर आपलंसं केलं आणि काय कपडे घालायचे ह्या स्ट्रेसपासून तो मुक्त राहिला. अर्थात त्याच्याकडे एकाच प्रकारच्या कपड्यांचे अनेक सेट्स होते. स्टीव्ह जॉब्ज ने अॅप्पलचा लोगो असलेला काळा टर्टल नेक टी शर्ट आणि ब्लू जीन्स ही स्टाईल इसे मियाके ह्या जपानी फॅशन डिझायनरकडून बनवून घेतली होती. त्याचं म्हणणं, ’आज काय कपडे घालायचे? ह्या डिसीजन मध्ये जाणारा वेळ मी वाचवला, तो इतर गोष्टींसाठी वापरला आणि डिसिजन फटिगमधनं स्वतःची सुटका केली. आपल्याला माहितीये स्टीव्ह जॉब्जचा हा ड्रेस जगात पॉप्युलर झाला, आयकॉनिक बनला. फेसबूक किंवा आताच्या मेटा चा फाउंडर मार्क झकरबर्ग ने स्टीव्ह जॉब्जच्या पावलावर पाऊल ठेवलं. त्यानेही ग्रे टी शर्ट जीन्स आणि स्निकर्स या तीन गोष्टींना जवळ केलं. त्याचा हा ड्रेस इटालियन डिझायनर ब्रुनेल्लो कुचिनेली ने बनवलेला आहे. मार्क झकरबर्गच्या म्हण्यानुसार एकच ड्रेस घालण्याचं कारण आपली शक्ती इतर महत्वाच्या कामांवर केंद्रित करता येते. ह्या मंडळींनी हे ड्रेसेस डिझाईनर कडून बनवून घेतले कारण त्यांना कोणी त्याची कॉपी केलेली नको असते. अॅप्पलचा सध्याचा सीईओ टिम कूक म्हणे दररोज चिकन राइस सॅलड खातो. त्याचंही तेच म्हणणं, सिलेक्शन करण्यात एवढा वेळ का वाया घालवायचा? ही जगज्जेती माणसं किती सखोल विचार करतात. वेळ वाचवतात. स्ट्रेस कमी करण्याचा प्रयत्न करतात. आपणही अशा वाया जाणार्या वेळावर आत्मपरिक्षण केलं पाहिजे.
गेल्या वर्षी युएसए आणि जपानच्या टूरमध्ये मी भरपूर शॉपिंग केलं कपड्यांचं, म्हणजे इफ गिव्हन अ चान्स आय अॅम अ कम्प्लीट शॉपोहोलिक. जपानहून घरी आले आणि गिल्टमध्ये बुडाले, का आपण एवढं शॉपिंग केलं? गरज तर नव्हती, मग कुठे स्वस्त आहे म्हणून, कुठे स्टाईल म्हणून तर कुठे जस्ट आवडलं म्हणून गरज नसताना एवढं शॉपिंग? आता झालं ते झालं, युएसए आणि जपानला जाऊन कपडे तर परत करता येणार नव्हते. मग प्रायश्चित्त काय घ्यायचं आपण ह्या अविचारी कृतीचं, अनावश्यक शॉपिंगचं? ठरवून टाकलं पुढची अडीच वर्ष कपड्याचं शॉपिंग करायचं नाही. सप्टेंबर २०२५ पर्यंत. सुधीरच्या मते हे असे अतिरेकी निर्णय घेण्यापेक्षा प्रत्येक वेळी विचारपूर्वक निर्णय घेण्याची सवय कर. असो, त्याला कधीतरी मला सुनवायला चान्स मिळाला. हा निर्णय घेतल्यानंतर मी शंभर दिवस जगाची भ्रमंती केली पण एकदाही कपडयांची खरेदी केली नाही. मॉलमध्ये दिशाहीन भटकण्याचा स्ट्रेसच संपला. शॉपिंगची अँगझाईटी खतम. त्यामुळे प्रवास अर्थपूर्ण बनला. शॉपिंगच्या बाबतीत तसं म्हटलं तर हा टोकाचा निर्णय घ्यायला आमचा राज पण कारण ठरला. मी आणि सुनिला युएसएत शॉपिंग करताना राजला म्हणायचो, ’अरे तू घे नं तुझ्यासाठी काहीतरी’ तर म्हणायचा, ’मला काहीही नको. आय डोन्ट नीड इट!’ ’अरे चांगली गाडी घे तुझ्यासाठी’. पण जॉबला लागेपर्यंत त्याने गाडी काही घेतली नाही. जॉब सुरू झाल्यावर एक साधी गाडी घेतली ज्याचं लोन त्याला त्याच्या पगारातून भरता येईल. ’राज तुला पैसे हवेत का?’ ’नको मम मी आता जॉब करतोय.’ सध्या आम्हाला नवीनच स्ट्रेस आहे, मुलं पैसे मागतात ह्याचा नाही तर मुलं पैसे मागत नाही ह्याचा. राजचं म्हणणं ’आय डोन्ट वॉन्ट थिंग्ज अननेसेसरीली’. शेअर्ड अपार्टमेंटमध्ये त्याच्या रूममध्ये झोपायला बेड, काम करायचला डेस्क आणि समोर टीव्ही एवढंच. काहीही एक्स्ट्रॉ आणायचं नाही. हल्ली मुलं आपल्याला शिकवतात तसं झालंय. आणि चांगलं आहे ते. त्या शिकण्यातूनच बहुदा असेल किंवा आईन्स्टाईन इन्स्पिरेशन असेल आमची गाडी घ्यायचा प्रसंग आठवला.
आधीची गाडी दहा वर्ष जूनी झाली म्हणून आता नवीन गाडी घेऊया, ह्या गाडीच्या मेंटेनन्समध्येच जास्त पैसा खर्च होतोय म्हणत शो रूमला गेलो आणि अर्ध्या तासात तशीच गाडी त्याच रंगाची फक्त नेक्स्ट व्हर्जन बूक करून बाहेर पडलो. दहा शो रूम्स धुंडाळा, ऑनलाइनवर गाड्यांचे रीव्ह्यूज आणि पॉडकास्ट बघण्यात तासनतास घालवा, ह्यातून आमची सुटका झाली होती.
अनावश्यक गोष्टींनी भरलेली घरं साफ करण्यात, अमेरिकन माणसांना ’सेल’ च्या नावाखाली लागलेलं वेड काढण्यात तसंच ’प्राब्लेम ऑफ प्लेंटी’ सोडविण्यात मारी कोंडो आणि तिच्यासारख्या अनेक जणांनी स्वत:ला कोट्याधिश बनवलं. अमेरिकन्स ह्या मॅडनेसमधनं बाहेर पडतील कदाचित पण आपण भारतीय मात्र ऑनलाइनच्या नव्या समुद्रात गटांगळ्या खायला लागलोय. रोज आपल्या बहुतेकांच्या घरात ह्या ऑनलाइन शॉपिंगची किती बॉक्सेस येतात ह्याचं परिक्षण करायला हवं. खरंच एवढ्या गोष्टी आपल्याला लागतात? पुर्वी कुठे आपण एवढ्या वस्तु बाजारातून घेऊन यायचो? कोविडमध्ये आपल्या सर्वांनाच ही ऑनलाइन शॉपिंगची भुरळ पडली. आमच्या घरात येणार्या वस्तु बघून एक दिवस आम्हालाच नॉशिया आला. हे कुठेतरी थांबायलाच हवं. मग आम्ही ठरवलं, ज्याला वस्तु मागवायच्यायत त्याने त्या ऑनलाइन शॉपिंगच्या कार्टमध्ये टाकायच्या, दुसर्याने त्या चेक करायच्या आणि तिसर्याने पैसे भरताना री-चेक करायच्या. डू वुई रियली नीड धिस? ह्याशिवाय चालवू शकतो का आपण? हे प्रश्न विचारायचे आणि सर्वांचं एकमत झालं तरंच वस्तु घ्यायची. हळूहळू बॉक्सेस कमी झाली. स्ट्रेस कमी झाला. त्या बॉक्सेसचा कचरा वातावरणाला जेवढी हानी पोहोचवतो तो कमी करण्यात आम्ही खारीचा वाटा उचलला, आमच्या घरातून बाहेर जाणार्या कचर्याचं प्रमाण कमी केलं.
माझी आत्या कमल सावे बोर्डीला रहायची, तिच्याकडे मी आठवी नववीची दोन वर्ष शिकले. त्यावेळी तिथल्या जवळपासच्या आदीवासींच्या गावात जायला मिळायचं. त्यांची घरं आजही जशीच्या तशी नजरेसमोर आहेत. छोटी सारवलेली घरं. फळ्यांवर रचलेली मोजकी भांडी, एका साइडला पातळ बिछाने आणि सतंरज्या किंवा चटई, सारवलेल्या भिंतींवर किंवा कुडावर छानशी वारली पेंटीग्ज. ही आनंदी घरं दाखवून द्यायची की सुखी समाधानी कुटुंबाला गरज खूप कमी गोष्टींची आहे. आपण सारखं सामान वाढवत राहतो घरातलं आणि मग स्ट्रेसमध्ये येतो.
सध्या मला घरात स्ट्रेस आहे तो अनेक रीमोट्सचा. तरी बरं आम्ही फार काही ऑटोमेशन नाही केलं नाहीतर लाइटचा रीमोट, पंख्यांचा रीमोट, टीव्हीचा रीमोट, स्पीकर्सचा रीमोट ह्या जंजाळात पडद्यांचे, काचांचे, खिडक्यांचे रीमोट वाढले असते. पुर्वीची घरं बरी असायची. बटण दाबलं की फॅन सुरू, घरात आल्यावर एक ट्युबलाईट लावली की अख्खं घर प्रकाशात न्हाऊन निघायचं. आता इतके दिवे आपण लावतो की नेमका हवा तसा उजेड काही मिळत नाही. वस्तुंमुळे स्ट्रेस वाढतो तो असा. कधी कधी असंही वाटतं अरे हे असे सगळे नो स्ट्रेसवाले निर्णय घ्यायचे पण मग आयुष्य एकदम निरस होऊन जाईल की. ओव्हरसिम्प्लिफिकेशन सुद्धा त्रासदायकच. सो ही टू बी ऑर नॉट टू बी ची लढाई सुरू राहीलंच पण अॅटलिस्ट काय चागलं आणि काय वाईट ह्याची जाणीव होतेय ही महत्वाची गोष्ट आहे. नवीन वर्ष सुरू झालंय, शक्य तेवढे विचारपूर्वक निर्णय घेऊया. गोष्टी थोड्या सोप्या करूया. मनावरचा अनावश्यक ताण कमी करूया. नवीन गोष्टी शिकूया, हॉबीज लावून घेऊया. आयुष्य रसरसून जगूया. लेट्स सिम्प्लिफाय थिंग्ज अँड अॅम्प्लिफाय द हॅप्पीनेस इन लाईफ!
Post your Comment
Please let us know your thoughts on this story by leaving a comment.