IndiaIndia
WorldWorld
Foreign Nationals/NRIs travelling to

India+91 915 200 4511

World+91 887 997 2221

Business hours

10am - 6pm

सॅन मारिनोचा फ्रांचेस्को

15 mins. read

Published in the Sunday Sakal on 29 September, 2024

गेल्या नोव्हेंबरमध्ये इटलीतल्या छोट्या छोट्या गावांना भेट दिली. काय चांगलं, काय आपल्या पर्यटकांना आवडेल ह्याचा आढावा घेणं चालू होतं. एखादी गोष्ट सोशल मिडियावर-इंस्टाग्रामवर खूप चांगली दिसते पण प्रत्यक्षात ती आपल्या भारतीय पर्यटकांना आवडेल का ह्यावर प्रश्नचिन्ह उभं केलं ते `चिंक्वेतेरे‌’ ह्या पाच गावांच्या स्थलदर्शनाने. कधीपासून जायचं होतं ह्या चिंक्वेतेरेला पण वेळ येत नव्हती. ह्यावेळी मात्र इथे जायचंच ह्या इराद्याने आम्ही पोहोचलो आणि लक्षात आलं, हे स्थलदर्शन आपल्या पर्यटकांसाठी नाही. अमेरिकन किंवा ज्या देशांना आपल्यासारखा समृद्ध इतिहास नाही त्यांना ठीक आहे. ह्यापेक्षा कितीतरी उत्तम जागा आणि आकर्षक स्थळं इटलीत आहेत. चिंक्वेतेरेला जायचं एक इमोशनल कारणही होतं. 2013 मध्ये जेव्हा वीणा वर्ल्ड सुरू झालं तेव्हा आमची पहिली जाहिरात आली दोन पेपरांमध्ये, एकात चित्र होतं अर्जेन्टिनाच्या पेरितो मोरेनो ग्लेशियरचं आणि दुसऱ्यात ह्या इटलीतील चिंक्वेतेरेचं. अर्जेन्टिनाला जाणं झालंय पण चिंक्वेतेरेला नव्हते गेले, ती इच्छा पूर्ण झाली गेल्या वर्षी. आमच्या एकदोन टूर्समध्ये ह्याचा समावेश होता पण त्यात आम्ही बदल केला.

आमच्या ह्या टूरमधलं दुसंर ठिकाण होतं ते म्हणजे एक छोटंसं गाव, नव्हे देशच म्हणायचा, तो होता सॅन मारिनो. `रीपब्लिक ऑफ सॅन मारिनो‌‘ चारही बाजुने इटलीने वेढलेला, एकसष्ट स्क्वेअर किलोमीटर्सच्या माऊंट टिटानोवर वसलेला, फक्त 33,600 लोकांचा छोटा श्रीमंत देश आहे तो हा सॅन मारिनो. श्रीमंत म्हणण्याचं कारण छोटा, कमी माणसांचा देश असला तरी तिथलं दरडोई उत्पन्न आहे 53000 डॉलर्स इतकं. मर्चंट बँकिंग आणि टूरिझम हे महत्वाचे उद्योग. फक्त एकसष्ट स्क्वेअर किलोमीटर्सवाला हा देश वर्षाला तीस लाख पर्यटक खेचतो जगभरातून. आपल्या खंडप्राय सुजलाम सुफलाम भारतात किती परदेशी पर्यटक यायला पाहिजेत ह्यावर सिरियसली विचार करण्याची गरज आहे. असो, तो वेगळा विषय आहे. तर हा सॅन मारिनो देश गेली अनेक वर्षे आमच्या युरोपच्या एक दोन आयटिनरीज्‌‍चा भाग आहे. जे जातात त्यांना आवडतो, तसा फीडबॅकही येतो, मग हा देश इतका चांगला आहे तर वेस्टर्न युरोपच्या सर्वच सहलींच्या आयटिनरीज्‌‍मध्ये तो का नाही हा विचार करून आम्हीबऱ्याच आयटिनरीज्‌‍मध्ये त्याचा समावेश केला. आणि हा समावेश केल्यामुळेच ‌’जाऊन बघून तर येऊया काय सगळे एवढे महती गातात सॅन मारिनोची‌’ म्हणत इटलीत पोहोचलो, डायरेक्ट धडकलो सॅन मारिनोत आणि ह्या देशाच्या प्रेमातच पडलो की. ऐतिहासिकदृष्ट्या जगातलं सर्वात जुनं प्रजासत्ताक असलेल्या ह्या देशात एकच स्थलदर्शन आहे ते म्हणजे माऊंट टिटानोवर अकराव्या शतकात बांधलेला तीन टॉवर्सचा, कॉबलस्टोन स्ट्रीट्सनी सजलेला किल्ला. छोट्या देशातला हा कॅसल तसा चांगलाच मोठा आहे बरं का. आम्हाला चालायला भरपूर मजा आली. रस्त्याच्या कडेला असलेली छोटी छोटी सुंदर दुकानं मोहवून टाकत होती. एकूण सॅन मारिनो वेस्टर्न युरोपच्या बऱ्याच टूर्समध्ये आम्ही समाविष्ट केलंय ह्याचा आनंद झाला. कॅसल बघून झाल्यावर आम्ही भेटलो आमच्या रेस्टॉरंटवाल्याला. कॅसलमध्येच त्याचं रेस्टॉरंट आहे. सॅन मारिनोचं लोकल फूड तो अगदी आग्रहाने आमच्या पर्यटकांना देत असतो आणि त्याची स्तुती पर्यटकांकडून ऐकूनच आम्ही ‌’बघूया तर त्याचा रागरंग‌’ म्हणत त्याच्याकडे गेलो. हसरा आणि त्याच्या पत्नीसोबत भारतात पर्यटन करून आलेला हा `आल्दो‌’ पटकन आपलंसं करून गेला. त्याच्याशी थोडावेळ गप्पागोष्टी करून तो कायकाय मेन्यु देतो ह्याची खात्री करून घेतली. रोज सकाळ संध्याकाळ भारतीय भोजनाने पर्यटक कंटाळतात म्हणून आम्ही अधूनमधून असा लोकल जेवणाचा तडका देत असतो आणि पर्यटकांनाही तो आवडतो.

स्थलदर्शन झालं होतं, रेस्टॉरंटलाही भेट दिली, आता आम्हाला जायचं होतं ते जिथे काही ग्रुप्स सॅन मारिनोमध्ये एक रात्रीचं वास्तव्य करतात त्या दोन तीन हॉटेल्सच्या टीम्सना भेटायला. गेल्या गेल्या पहिल्याच हॉटेलच्या मालकाने, `फ्रांचेस्को ब्रिगांते‌’ ने आमचं एकदम मस्त स्वागत केलं. छोट्या देशातलं छोटंसं बुटीक हॉटेल. रीसेप्शनवरच लक्षात आलं की फ्रांचेस्को आर्ट कलेक्टर किंवा प्रचंड आर्ट प्रेमी असणार. आगळ्या वेगळ्या वस्तुंनी आणि पेंटिग्जनी हॉटेलच्या भिंती तसेच मोकळ्या जागा पटकावल्या होत्या. असं आर्टी काही दिसलं की माझा मोबाईल कॅमेरा शिवशिवायला लागतो. फोटो काढून काढून दमले. हॉटेल इन्स्पेक्शन हा भाग पार पाडीत असताना वेगवेगळ्या गोष्टी दिसत होत्या. लिफ्टचं फ्लोअरिंग आणि भिंतींच्या आत छान सुंदिग असे बदलत राहणारे लाइट्स होते. लिफ्टच्या आतल्या समोरच्या भिंतीवर लंडनसारखा मोठा टेलिफोन बूथ रेखाटला होता. जगभर आपण अनेक लिफ्टस्‌‍ बघतो आणि बहुतेक वेळा त्या बोअरिंगच असतात, इथे मात्र तो मिनिटभराचा प्रवास फ्रांचेस्को ने इंटरेस्टिंग बनवला होता. हॉटेलला चारच मजले होते पण प्रत्येक मजल्यावर दोन दोन पेंटिंग्ज होती. एकदम हटके. माझं क्लिक क्लिक सुरूच होतं. रीसेप्शन लॉबीमध्ये इतक्या आर्टी गोष्टी होत्या की काही विचारू नका. मला आता फोटो काढायची लाज वाटायला लागली. सुधीर आणि आमचे इटलीतले असोसिएट्स हॉटेलच्या नेक्स्ट जनरेशनशी बोलत होते. फ्रांचेस्को म्हणाला `चला, मी तुम्हाला आणखी काहीतरी दाखवतो‌’. त्याच्याबरोबर आम्ही हॉटेलच्या बेसमेंटला गेलो. तिथे तीन विंटेज कार्स आणि दोन मोटरबाईक्स बघून आमचे डोळे विस्फारले. रीले स्पोर्ट 1936, MGT 1953, फियाट मिलिटरी कॅम्पानोला ह्या गाड्यांचा मेटेंनन्स तो स्वत:च करतो. गॅरेजवाली सगळी साधन सामग्री तिथे होती. तो म्हणतो,`कधी कधी मी संध्याकाळी हे रीपेअर्स मेंटनन्सचं काम सुरू करतो, रात्र उलटून जाते, सकाळी सूर्याचा प्रकाश खिडकीतून आत आला की मी भानावर येतो‌’. पॅशन असली की काम मेडिटेशन बनतं ते असं. लांब्रेटा पियाजियो 1953, हार्ले डेव्हिडसन स्पोर्टस्टर, हाँडा कस्टम 500 ह्या मोटरसायकल्सही दिमाखात त्या विंटेज म्युझियममध्ये उभ्या होत्या. आणखी आतल्या साइडला सायकल सेक्शन होता. टूर दे फ्रान्स, जिरो डीटालिया सारख्या सायकल रेसेसमध्ये भाग घेणाऱ्यांचा स्टॉपिंग पाईंट बनण्याचं काम   फ्रांचेस्को आणि त्याचं हॉटेल उत्साहाने करतं.

हा फ्रांचेस्को काय काय करतो ह्याने आश्चर्यात पडलेलो आम्ही त्याच्या कॉफी शॉप मध्ये गेलो आणि गप्पांना उत आला. तो म्हणाला, `मला भारतात यायचंय तीन महिन्यांसाठी, कधीपासूनची इच्छा आहे पण अजून शक्य होत नाहीये. हॉटेलमधनं खरं तर मी रीटायर झालोय, आता माझा पुतण्या शिकतोय माझ्याकडून, एकदा त्याला जमलं की मी येणार तुमच्या देशात‌‘. सुधीरने त्याला विचारलं की, ‌’तू राहतोस कुठे? तुझ्या घरातपण अशा बऱ्याच गोष्टी असतील तू जमवलेल्या.‌‘ तर म्हणतो कसा,`मी इथे जवळच राहतो. पण सध्या मी एक कॅसल बांधतोय माझ्यासाठी, स्वत:साठी, माझ्या मित्रांसाठी. पंधरा रूम्स आहेत. मस्त आरामात आयुष्य जगणार आहे मी‌’, त्याने आम्हाला त्या बनत असलेल्या कॅसलचे फोटो दाखवले. असं कॅसल किंवा किल्ले बांधण्याचा जमाना कधीच मागे गेला होता आमच्यासाठी पण हा जवळजवळ रीटायरमेंट डीक्लेअर केलेला फ्रांचेस्को स्वत:साठी किल्ला बांधत होता. त्याच्या ख्रिसमससाठी सजवलेल्या विंटेज कारमध्ये ख्रिसमसचा पेहेराव घालून सगळ्या गावात फिरणार होता. आणखी गप्पांमध्ये कळलं की तो एक छोटं बुटिक सेव्हन स्टार हॉटेल बांधण्याचा सिरियसली विचार करतोय आणि त्याने कामही सुरू केलंय. क्या बात है! म्हणजे त्याच्या त्या कॅफेटेरिया किंवा बारमध्ये तो स्वत:च आम्हाला कॉफी बनवून देत होता आणि त्याचवेळी आम्हा सर्वसामान्यांना अशक्य वाटणारी स्वप्न बघत होता, ती प्रत्यक्षात आणत होता. असा उत्साह असला पाहिजे आयुष्याच्या कोणत्याही वळणावर, वयाच्या कोणत्याही आकड्यावर.

फ्रांचेस्को स्वत: मोठा आर्ट कलेक्टर आहेच पण जर आपल्याला आर्टमध्ये इंटरेस्ट असेल तर तो सॅन मारिनोच्या मोठमोठ्या आर्टीस्ट्सबरोबर आपली भेट घालून देण्यासाठीही धडपडतो. रीसेप्शन लॉबीमधले बरेच आर्ट पिसेस हे त्याच्या प्रायव्हेट कलेक्शनमधले होते पण आर्टिस्टस्‌‍ना त्याने हॉटेल एखाद्या सतत चालू असणाऱ्या एक्झिबिशनसारखं खुलं केलंय. त्यांची पेंटिग्ज, आर्ट पिसेस ते तिथे प्रदर्शनासारखं मांडू शकतात आणि हॉटेलमधल्या गेस्टना जर का ती विकत घ्यायची असतील तर तेही काम हॉटेल करतं. नवनव्या आर्टमुळे हॉटेल नेहमीच इंटरेस्टिंग बनून राहतं. नवोदित आर्टिस्टना त्यांचं आर्ट इंटरनॅशनल टूरिस्टस्‌‍समोर मांडता येतं आणि टूरिस्टस्‌‍मधल्या आर्टलव्हर्सना हॉटेलमध्येच एखादा चांगला पीस मिळून जातो. वंडरफुल! आयुष्यात किती नवनवीन गोष्टी करता येतात वेगवेगळ्या तऱ्हेने तसंच आयुष्य कसं रसरसून जगता येतं ह्याचं एक अतिशय उत्कृष्ट उदाहरण फ्रांचेस्कोने आमच्यासमोर उभं केलं.

सॅन मारिनो मस्तच आहे आणि तिथली माणसंसुध्दा. फ्रांचेस्कोचा निरोप घेऊन आम्ही गाडीत बसलो. आयुष्याकडे अधिक उत्साहाने आणि कुतूहलाने बघण्याचा नवा दृष्टिकोन फ्रांचेस्कोने आम्हाला दिला होता.


अरेच्चा! हे मला माहितच नव्हतं...

Know the Unknown

जगाच्या दक्षिण गोलार्धातील आकाराने दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा देश म्हणजे ‌‘ऑस्ट्रेलिया‌’. या देशातील ‌‘ग्रेट बॅरिअर रीफ‌’ आणि ‌‘उलुरु‌’(आयर्स रॉक) अशा निसर्गचमत्कारांसाठी जसा ऑस्ट्रेलिया प्रसिध्द आहे, त्याचप्रमाणे मॅनमेड वंडर्सच्या बाबतीतही तो मागे नाही. नावंच घ्यायचं तर सिडनी मधलं ‌‘ऑपेरा हाऊस‌’ जगप्रसिध्दच आहे. ऑस्ट्रेलियातील सर्वात जास्त लोकसंख्येचं शहर म्हणून सिडनी ओळखलं जातं. या भूभागावर ऑस्ट्रेलियातले मूळचे स्थानिक सुमारे तीस हजार वर्षांपुर्वी रहात होते. आज जगातल्या सर्वात महागड्या शहरांच्या यादीत सिडनीचा समावेश होतो. जगातल्या पर्यटनाच्या बाबतीत मोस्ट विझिटेड पंधरा शहरांमध्ये सिडनीचा आहे. या शहरातील लक्षवेधी भाग म्हणजे ‌‘सिडनी हार्बर‌’. याच भागात ऑस्ट्रेलियामधील दोन सर्वात प्रसिध्द मानवनिर्मित आकर्षणे आहेत. एक म्हणजे ‌‘सिडनी हार्बर ब्रिज‌’ आणि दुसरं म्हणजे ‌‘सिडनी ऑपेरा हाऊस‌’. ऑपेरा हाऊसची उलट दिशेने उमललेल्या फुलासारखी दिसणारी वास्तू ऑस्ट्रेलियाची ओळख ठरली आहे.

सिडनी हार्बरच्या किनाऱ्याला लागून असलेलं सिडनी ऑपेरा हाऊस हे 20 व्या शतकातील वास्तूकलेचा उत्तम नमुना मानलं जातं. 20 ऑक्टोबर 1973 रोजी महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या हस्ते या वास्तूचं उद्धाटन झालं. या ऑपेरा हाऊसच्या डिझाइनला त्याआधी तब्बल 16 वर्षांपुर्वी सर्वोत्कृष्ट डिझाइन म्हणून निवडण्यात आलं होतं. 1959 ते 1973 अशी चौदा वर्ष ह्या ऑपेरा हाऊसची उभारणी सुरू होती. या इमारतीची रचना अशी आहे की एकाच वेळी वेगवेगळ्य़ा सभागृहांमध्ये विविध कार्यक्रम सादर होऊ शकतात आणि त्यामुळे इथे वर्षभरात सुमारे 1500 कार्यक्रम सादर होतात. या सगळ्या कार्यक्रमांचा आस्वाद एकूण बारा लाख प्रेक्षक घेतात. ऑस्ट्रेलियातील सर्वात मोठ्ठं पर्यटन आकर्षण असल्याने ह्या ऑपेरा हाऊसला वर्षभरात सुमारे 80 लाख पर्यटक भेट देतात. 28 जून 1998 रोजी सिडनी ऑपेरा हाऊसचा समावेश `युनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेड साइट‌’ मध्ये करण्यात आला.

या वास्तूच्या रचनेत अर्धवट उमललेल्या पाकळ्या किंवा समुद्रातील शिंपल्यांसारखा भव्य आकार लक्ष वेधून घेतो. या पाकळ्या किंवा शिंपले लांबून बघताना एकसमान पृष्ठभागाचे  वाटतात पण प्रत्यक्षात ते व्हाईट आणि क्रिम अशा दोन रंगांच्या टाइल्सच्या झिगझॅग पॅटर्नने बनले आहेत. त्यासाठी 10,56,006 टाइल्स वापरल्या आहेत. सुमारे चार एकरांवर ही वास्तू पसरलेली आहे. या वास्तूमध्ये ‌‘कॉन्सर्ट हॉल‌’,‌‘ जॉन सदरलँड थिएटर‌’, ‌‘ड्रामा थिएटर‌’, ‌‘प्ले हाउस‌’, ‌‘स्टुडिओ‌’ अशा वेगवेगळ्या विभागांमध्ये कार्यक्रम सादर करता येतात. वीणा वर्ल्डच्या ऑस्ट्रेलिया टूरमध्ये सहभागी होऊन सिडनी ऑपेरा हाऊसला भेट द्यायची संधी चुकवू नका.


वीणा वर्ल्ड ट्रॅव्हल मिशन

Veena World Travel Mission

100 Country Club

पर्यटन, रंजन, प्रबोधन

मला स्वतःला प्रवास भरपूर आवडतो. पर्यटनामुळे आपण नेहमीपेक्षा वेगळ्या जगात जातो, नवीन प्रदेश बघतो, तिथल्या अनोख्या लोकजीवनाचं दर्शन घेतो, त्यामुळे आपल्या अनुभवाच्या कक्षा रुंदावतात. पर्यटन म्हणजे मनोरंजन आणि प्रबोधन याचं झकास मिश्रण असं मला आणि माझ्या पत्नीलाही वाटतं, म्हणून तर आम्ही दोघं कधी भारतातल्या तर कधी परदेशातल्या ठिकाणांना भेट द्यायला उत्सुक असतो. वीणा वर्ल्डच्या रुपाने आम्हाला त्यासाठी एकदम परफेक्ट सहल सोबती व मार्गदर्शक मिळाला आहे. आम्ही आजपर्यंत भारतातल्या 7 राज्यांमधील पर्यटनस्थळे पाहिली आहेत आणि 18 देशांना भेट दिली आहे. पर्यटनाच्या क्षेत्रात मुरलेल्या वीणा वर्ल्डच्या सगळ्याच कामात एक शिस्त असते. त्यांच्या परिपूर्ण नियोजनाचा अनुभव अगदी बुकिंगपासून येतो. टूरवरही वीणा वर्ल्डचे टूर मॅनेजर्स अगदी आपुलकीने सगळ्यांची काळजी घेतात, संपूर्ण माहिती व्यवस्थित सांगतात आणि टूरचा अनुभव संस्मरणीय करतात.

आम्ही पुण्यात राहतो आणि तिथल्याच वीणा वर्ल्डच्या कार्यालयातून आमचं बुकिंग करतो. जगभरातले कुठले देश पहायचे ह्याची आम्ही एक यादीच केलेली आहे, मात्र त्या आधी आम्हाला आपला भारत संपूर्ण बघायचा आहे. विशेषतः काश्मीर, मेघालय, आसाम, अंदमान यांना आम्ही आधी भेट देणं पसंत करू. त्याचप्रमाणे ऑस्ट्रेलियाही आमच्या यादीत अग्रक्रमावर आहे. इतर अनेकांप्रमाणेच आम्हीही आमच्या इंटरनॅशनल टूर्स साऊथ ईस्ट एशियापासून सुरू केल्या आणि मग युरोपकडे मोर्चा वळवला. आजवरच्या पर्यटनातील ‌‘स्वित्झर्लंड‌’ मधला प्रवास आम्ही कधीच विसरू शकत नाही. एखाद्या स्वप्नभूमीतला असावा असा तो प्रवास आणि त्यात पाहिलेला तिकडचा अलौकिक निसर्ग याची जादू आजही आमच्या मनात कायम आहे. ऑस्ट्रियातील वॅटन्समधील स्वारोवस्की क्रिस्टल म्युझियम बघताना डोळ्यांचं पारणंच फिटलं. मला स्वतःला इतिहासात विशेष रुची आहे, त्यामुळे मेवाडमधला चित्तोडगडावरचा विजयस्तंभ बघताना अंगावर जे रोमांच आले ते आजही विसरू शकत नाही. भारतातल्या सगळ्या राज्यांमध्ये ‌‘राजस्थान‌’ हे राज्य तिथला इतिहास, वास्तुकला आणि परंपरा यासाठी सगळ्यांनी बघायलाच हवं असं वाटतं. आम्ही ज्या ज्या ठिकाणांना भेट देतो, त्याबद्दलचा आमचा अनुभव तपशिलवार नोंदवून ठेवतो. नंतर ह्या प्रवासी डायऱ्या वाचताना त्या ठिकाणाची सहल पुन्हा केल्याचा आनंद मिळतो.

गिरिधर आणि दमयंती केदारी, पुणे


काय बाई खाऊ कसं गं खाऊ!

युरोपमधील देशांनी जगभरात आपल्या वसाहती स्थापन केल्या आणि त्याचा एक परिणाम म्हणजे जगाच्या एका टोकावरील वनस्पती वा पदार्थ दुसऱ्या टोकावरच्या देशांमध्ये पोहोचले. याचं उत्तम उदाहरण म्हणजे दक्षिण अमेरिकेतील ब्राझील, पॅराग्वे या देशांमधील कसावा किंवा युका ही वनस्पती आशिया खंडात पोहोचली. हवामान अनुकूल असल्याने इथे कसावाची लागवड सुरू झाली. त्याचे पदार्थही बनवले जाऊ लागले. त्यामुळेच ब्राझिल मधल्या कसावाचा वापर करून बनवला जाणारा ‌‘कसावा केक‌’ हा फिलिपिन्समधला लोकप्रिय पदार्थ आहे. कसावा हे आपल्या रताळ्यासारखं असतं. याच कसावामधील स्टार्च काढून टॅपिओका तयार करतात आणि टॅपिओकापासूनच आपला साबुदाणा तयार केला जातो. कसावा केक हा गोड पदार्थ (डीझर्ट) म्हणून फिलिपिन्समध्ये ख्रिसमस किंवा अन्य सणांना हमखास बनवला जातो. या पदार्थाला फिलिपिन्समध्ये ‌‘कामोतेंग काहोय‌’ किंवा ‌‘बेलिंगहॉय‌’ म्हणूनही ओळखलं जातं. हा पदार्थ बनवण्यासाठी कसावाचा जमिनीतला कंद खोदून बाहेर काढून, साफ करून तो सोलावा लागतो. कसावा कंदामध्ये गोड आणि कडू असे दोन प्रकार येतात, त्यामुळे कोणता कंद मिळाला आहे हे ओळखता येणं महत्वाचं असतं. कसावाचा किस, नारळाचं दूध, कंडेन्स्ड मिल्क आणि अंड्याचा पांढरा बलक यापासून कसावा केक तयार केला जातो. त्याच्या वरचा थर हा कस्टर्डचा असतो. काही वेळा त्यात बटर, व्हॅनिला आणि इव्हॅपोरेटेड मिल्कही वापरलं जातं. टॉपिंग्ज म्हणून चेडर चीझ, कोकोनट स्पोर्ट वा नारळाचा किस ही वापरला जातो. कसावा केकचे आणखी काही प्रकार फिलिपिन्समध्ये बनवतात. ‌‘कसावा बुको बिबिंग्का‌’ मध्ये शहाळ्यातील मलई वापरली जाते तर ‌‘पायनॅपल कसावा बिबिंग्का‌’ मध्ये पायनॅपल म्हणजे अननसाचे बारीक तुकडे कुस्करून वापरले जातात.

देश-विदेशातील अशाच विविध खाद्यपरंपरा आणि ट्रॅव्हलचे भन्नाट अनुभव ऐकण्यासाठी वीणा वर्ल्डचा ‌‘ट्रॅव्हल एक्सप्लोअर सेलिब्रेट लाईफ‌’ हा पॉडकास्ट नक्की ऐका.


युरोपियन ख्रिसमस मार्केट

वीणा वर्ल्ड कस्टमाईज्ड हॉलिडेज्‌‍सोबत

युरोपमध्ये डिसेंबर अखेरीस सगळीकडे बर्फाचं राज्य पसरू लागलेलं असतं. सूर्यप्रकाश गायब असल्याने वातावरण जरा शांत निवांत असतं, मग हा माहौल हॅपनिंग करण्यासाठी सुरू झाली ख्रिसमस मार्केट्‌‍स जी आज जगभरातल्या पर्यटकांना आकर्षित करतात. युरोपमधल्या आखिव रेखिव शहरांमध्ये मोठ्या चौकात, उघड्यावर ही तात्पुरते लाकडी स्टॉल्स उभारून ख्रिसमस मार्केट्‌‍स थाटली जातात. आउटडोअर आइस रिंगपासून ते ऑर्नामेंट मेकिंग वर्कशॉप्सपर्यंत विविध कारणांसाठी ख्रिसमस मार्केट सगळ्यांना आवडतात. स्वित्झर्लंडच्या अल्पाइन टाउन्सपासून ते पॅरिसच्या ‌‘शाँज्‌‍ एलिझे‌’ पर्यंत सगळा युरोप ह्या काळात जणू एक मोठ्ठं ख्रिसमस मार्केट बनून गेलेला असतो.

यजर्मनीमधल्या न्युरेंबर्ग शहरातलं ख्रिसमस मार्केट हे युरोपमधल्या सर्वात जुन्या मार्केट्‌‍सपैकी एक आहे. ‌‘लिट्‌‍ल सिटी ऑफ वूड ॲन्ड क्लॉथ‌’ म्हणून प्रसिध्द असलेल्या या मार्केटमध्ये जिंजर ब्रेड आणि स्पेक्युलास पासून ते ब्लूबेरी वाइन पर्यंत तुमच्या आवडीनुसार अनेक लोकल डेलिकसीज्‌‍चा आस्वाद तुम्ही घेऊ शकता. 1628 सालापासून न्यूरेंबर्गचं हे मार्केट भरवलं जातं. तेव्हापासूनच न्यूरेंबर्गमध्ये जगभरातले लोक येऊन स्थायिक झाले आहेत, त्यामुळेच इथे ‌‘सिस्टर सिटीज्‌‍ मार्केट‌’ हा विभाग असतो, जिथे जगभरातल्या वेगवेगळ्या प्रांतातल्या वस्तु मिळतात. जर्मनीमधील ड्रेस्डेन शहरातील मार्केटकडे लोक आकर्षित होतात ते तिथे मिळणाऱ्या ‌‘स्त्रिझेल‌’ या फ्रुट केकमुळे तर रोटेनबर्ग मार्केटमधल्या शाही ‌‘बग्गी‌’ ची सवारी पर्यटकांना भुरळ घालते.

चेक रिपब्लिकची राजधानी असलेलं ‌‘प्राग‌’ या अल्फा ग्लोबल सिटीमधील ख्रिसमस मार्केट तर अजिबात चुकवू नये असंच असतं. प्रागच्या ओल्ड टाउन स्क्वेअर या ऐतिहासिक चौकाला ख्रिसमस मार्केटमुळे वेगळीच झळाळी प्राप्त होते. सी.एन.एन. ट्रॅव्हलने या मार्केटला जगातील सर्वोत्तम ख्रिसमस मार्केट म्हणून गौरवलं आहे. रंगीबेरंगी रोषणाई, माळा यांनी सजवलेले आणि खाद्यपदार्थांनी तुडुंब भरलेले स्टॉल्स पाहूनच डोळे सुखावतात. पेस्ट्रीपासून ते रोस्टेड मीट पर्यंत आणि हॉट चॉकलेटपासून ते पंच पर्यंत तुमच्या आवडीचे पदार्थ चाखायला दिवस कमी पडतो. ऑस्ट्रियातील व्हिएन्ना मधील ख्रिसमस मार्केट हे युरोपमधील सर्वात मोठ्या मार्केट्‌‍स पैकी एक आहे. तिथल्या पुरातन सिटी हॉलच्या समोर भरणारं हे मार्केट इंटरनॅशनल कॉयर्सच्या सुरांनी भरून जातं तेव्हा खऱ्या अर्थाने ख्रिसमस सुरू झाल्याची खात्री पटते. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांसाठी या मार्केटमध्ये काही ना काही असल्याने अबालवृद्ध या मार्केटचा आनंद लुटतात.

तुम्ही जरी आधी एकदा युरोपला जाऊन आला असलात तरी ह्यावेळी मात्र युरोपमधल्या ख्रिसमस मार्केटची मजा अनुभवण्यासाठी प्लॅन करा. एजॉय ख्रिसमस इन युरोप. वीणा वर्ल्डची कस्टमाईज्ड हॉलिडे टीम मार्गदर्शनासाठी सज्ज आहेच. ख्रिसमस मार्केट्‌‍सची रेडीमेड पॅकेजेस निवडा किंवा तुम्हाला हवा तसा तुमच्या मनाप्रमाणे प्रायव्हेट हॉलिडे डिझाईन करून घ्या.

September 28, 2024

Author

Veena Patil
Veena Patil

‘Exchange a coin and you make no difference but exchange a thought and you can change the world.’ Hi! I’m Veena Patil... Fortunate enough to have answered my calling some 40+ years ago and content enough to be in this business of delivering happiness almost all my life. Tourism indeed moulds you into a minimalist... Memories are probably our only possession. And memories are all about sharing experiences, ideas and thoughts. Life is simple, but it becomes easy when we share. Places and people are two things that interest me the most. While places have taken care of themselves, here are my articles through which I can share some interesting stories I live and love on a daily basis with all you wonderful people out there. I hope you enjoy the journey... Let’s go, celebrate life!

More Blogs by Veena Patil

Post your Comment

Please let us know your thoughts on this story by leaving a comment.

Looking for something?

Embark on an incredible journey with Veena World as we discover and share our extraordinary experiences.

Balloon
Arrow
Arrow

Request Call Back

Tell us a little about yourself and we will get back to you

+91

Our Offices

Coming Soon

Located across the country, ready to assist in planning & booking your perfect vacation.

Locate nearest Veena World

Listen to our Travel Stories

Veena World tour reviews

What are you waiting for? Chalo Bag Bharo Nikal Pado!

Scroll to Top