Published in the Sunday Sakal on 25 August, 2024
सकाळी उठले आणि खिडकीचे पडदे बाजूला सारले. बाहेर बाल्कनीत जावंसं वाटत होतं तरी जाऊ शकले नाही. थंडी मी म्हणत होती. पण खिडकीतून दिसणारा आजचा समुद्र कालच्यापेक्षा वेगळा होता. इथलं आकाशही वेगळं होतं. एकाच रंगाचं. फक्त क्षितिजावर दिसत होती ती सिल्व्हर लायनिंग, सूर्य उगवल्याची जाणीव करून देणारी. सध्या सनराइज सनसेट ह्याला फारसं महत्व नाही इथे, कारण आपल्यासारखी रात्रच होत नाहीये. रात्रीचे काही तास अंधार होतो पण आपण म्हणतो तशी गडद रात्र नाहीच. पडदे बंद केल्याशिवाय झोप येणारच नाही. वर्षाचे पाच सहा महिने हा प्रकार, पण एवढा प्रकाश दिल्यावर पुढचे काही महिने सूर्यदेव ओव्हरटाइमचं उट्ट काढतो आणि रुसून बसतो. मग वर्षाचा अर्धा वेळ इथे सूर्यच दिसत नाही. दिवस उजाडतच नाही. सहा महिन्यांचा दिवस आणि सहा महिन्यांची रात्र. जस्ट कल्पना करा आपल्याकडे असं झालं तर काय काय बदल होतील आपल्या आयुष्यात. असो, तर आत्ता आम्ही आलोय ते ग्रीनलँडला. काल रात्री आम्ही आर्क्टिक सर्कलमध्ये प्रवेश केला, म्हणजे आमच्या क्रुझने. तेरा दिवसांच्या ह्या क्रुझवर आम्ही ग्रीनलँड आइसलँडची सफर करतोय. आमच्या सोबत आमचे दोन पर्यटक मित्रही आहेत ज्यांनी आत्तापर्यंत प्रत्येकी नव्वद आणि पंच्याण्णव देश पूर्ण केले आहेत. `ग्रीनलँडला कधी गेलात तर आम्हालाही जायचंय’ ही त्यांची इच्छा होती. आम्ही चाललोय म्हटल्यावर तेही आले आणि आम्ही चौघं पोहोचलोय ग्रीनलँडला. ॲक्चुअली `वीणा वर्ल्ड हन्ड्रेड कंट्री क्लब’ चा हा नवीन उपक्रम. आमच्यासारखंच ज्यांना देशांची शंभरी पूर्ण करण्याची किंवा शंभर देशांना भेट देण्याची इच्छा आहे त्यांच्यासाठी दरवर्षी आम्ही नवनवीन देशांच्या टूर्स जाहीर करतोय. त्यात काही टूर्सवर आम्हीही दोघं जातो कारण त्या देशांना आम्हीही भेट दिलेली नसते. ’आम्ही चाललोय तुम्हीही चला’, ह्या सिरिजमधली ही पहिली सहल. ह्यावेळी जास्त पर्यटकांना आम्ही घेऊन येऊ शकलो नाही कारण एकतर हे ठरवलं उशिरा आणि ह्या आर्क्टिक वा अंटार्क्टिकाच्या क्रुझेस खूप लवकर म्हणजे कधी कधी वर्षभर आधी बूक होतात. सो, ह्या सहा महिने सूर्य न मावळणाऱ्या देशाची ही सफर. हा देश डेन्मार्कच्या अखत्यारितला. तरीही तुम्हाला व्हिझिटर म्हणून ग्रीनलँडचा व्हिसा घ्यावा लागतो. त्यांनी परवानगी दिली तरच तुम्ही ग्रीनलँडला येऊ शकता. पुढच्या वर्षी आम्ही क्रुझने आणि लँडने अशा दोन्ही प्रकारच्या टूर्सद्वारे आणखी जास्त पर्यटकांना ग्रीनलँडला घेऊन येऊ शकू.
जगातली कोणतीही अशी एक्स्पीडिशन क्रुझ असो, पहिल्या दिवशी आपल्याला मॉक ड्रील ला सामोरं जावं लागतं, ती सर्व प्रेझेंन्टेशन्स बघावी लागतात. आणि ते बरंही असतं. एका झटक्यात आपल्याला क्रुझची संपूर्ण माहिती मिळते. `काय करावं, काय करू नये, काय सावधानी बाळगावी‘ हे सर्व आपण समजून घेतो आणि पुढचा प्रवास सुखाचा होतो. ह्या क्रुझवर आमची एक्स्पीडिशन लीडर आहे निकी. ती आहे जर्मनीची, राहते आपल्या भारतात गोव्याला, आणि काम करतेय ह्या अशा क्रुझेसवर जिथे आर्क्टिक अंटार्क्टिक नॉर्थ पोल साऊथ पोलशी तिचं नातं जुडलंय. आम्हा दिडशे पर्यटकांची काळजी घ्यायला इथे सव्वाशे क्रू टीम आहे आणि महत्वाचं म्हणजे ही सगळी क्रू मंडळी जगातल्या सतरा देशांमधून इथे आलीयेत आणि गुण्यागोविंदाने नांदताहेत. त्यांचा तो एकोपा बघून वाटतं की प्रत्येक घर, प्रत्येक समाज, प्रत्येक देश आणि आपलं जग असं छानपैकी असायला पाहिजे. वसुधैव कुटुंबकम म्हणजे काय हे इथे मायक्रो स्वरूपात बघायला मिळतंय. तर ही निकी प्रेझेंटेशन देत असताना म्हणाली, `इथे क्रुझवर कधीही कुठेही फिरताना आपला एक हात सतत मोकळा असला पाहिजे. क्रुझ कधीही हेलकावे खाऊ शकते तेव्हा तुम्हाला पटकन कुठेतरी हात पकडावा लागतो आणि त्यासाठी तो मोकळा असावा’. तोल सांभाळण्यासाठी पाय घट्ट रोवून उभं रहावं लागतं ही आपणा जमिनीवर राहणाऱ्यांची शिकवण, पण जेव्हा तुम्ही समुद्रात असता तेव्हा पायांसोबत हातही महत्वाचे असतात ते असे.
गेली पंचवीस तीस वर्ष लिखाणातून मी `हॅन्ड्स फ्री ट्रॅव्हल’ चा घोषा लावतेय. प्रवासात तुमचे हात मोकळे असू द्या. एका हातात पर्स, दुसऱ्या हातात पंजाबी ड्रेसवरची ओढणी किंवा मोबाइल हे चित्र कोणत्याही ट्रॅव्हलरसाठी चुकीचं आहे. क्रॉसशोल्डर पर्स, हॅवरसॅक, जीन्स टी-शर्ट स्टोल, फोर व्हिल छोटी केबीन बॅग हे त्यावरचं उत्तर आहे. अन्न वस्त्र निवारा शिक्षण आरोग्य ह्या नंतर पर्यटन हा महत्वाचा घटक आहे आपल्या आयुष्यातला. प्रत्येकजण आज ट्रॅव्हलर आहे. त्यामुळे ट्रॅव्हल ॲक्सेसरीज्चा एक चांगला सेट बनवून ठेवणे. कम्फर्टेबल शूज, फ्लिपफ्लॉप, मिडियम साइज कार्गो बॅग, एक छोटीशी फोर व्हील केबीन बॅग, एक क्रॉस शोल्डर पर्स, कॅप वा हॅट हा सेट बनवूनच ठेवायचा. स्मार्ट ट्रॅव्हलर म्हणूनच फिरायचं ह्यापुढे. उगाचच ओझी वहायची नाहीत. फिरताना हात मोकळे पाहिजेत.
क्रुझ हेलकावे खात असताना कशालातरी पकडण्यासाठी एक हात मोकळा असला पाहिजे हे ह्या प्रवासात मनावर कोरलं गेलं. आयुष्यात विसरलं जाणार नाही ते. एक हात मोकळा असावा वरून आठवलं, की जसं हाताचं तसंच डोळ्यांचं की. आयुष्यात तेच यशस्वी होऊ शकतात जे भूतकाळात अडकून न राहता त्यापासून शिकतात. वर्तमानकाळात वेळेचा अपव्यय न करता जे काही करतोय त्यावरची पकड अगदी घट्ट ठेवतात, आणि हे करीत असताना त्यांची नजर भविष्यकाळात येणाऱ्या चॅलेंजेसकडे असते. म्हणजेच आपल्या दोन डोळ्यांपैकी एक डोळा सतत वर्तमानात रोवलेला असावा आणि एक डोळा हा सतत भविष्यकाळाकडे फोकस्ड असावा.
ह्या क्रुझवर असलेल्या देशविदेशातील क्रू मेबंर्समध्ये काही भारतीयही आहेत. त्यात कॅप्टन खालोखाल सर्वांत महत्वाची व्यक्ती म्हणजे फूड अँड कीचनची काळजी घेणारा हेड शेफ अमित राव, चक्क मुंबईकर. आमच्यातले कलाथी सर फक्त दाल-राईस खातात, त्यांची अतिशय चांगली सोय अमितमुळे झाली. जगाच्या टोकावर आपली माणसं भेटली तर बरं वाटतं.
भारताशी नातं जुळलेल्या एक्स्पीडिशन लीडर निकीचं काम चांगलं सुरू आहे. काल रात्री दोन वाजता तिने पब्लिक अनाऊंसमेंटद्वारे गाढ झोपेतून जागं केलं आणि अपर डेकवर टेरेसवर बोलावलं, नॉर्दर्न लाइट्स बघायला. आता ह्या जगाच्या उत्तर टोकावर, उत्तर ध्रुवाच्या जास्तीत जास्त जवळ असल्यावर ओपन डेकवर थंडी काय असेल त्याची कल्पनाच केलेली बरी पण आम्ही जणू निकीचे फॉलोअर्स असल्याप्रमाणे चिडीचूप एकावर एक वूलन कपडे चढवले आणि धावलो अपर डेकवर. झोपेचा कितीही अंमल असला तरी अशी सुवर्णसंधी चुकवायची नसते. आम्हाला क्रुझवरच्या त्या दुसऱ्याच रात्री नॉर्दर्न लाइट्सचं दर्शन घडलं. अपर आइसलँड ग्रीनलँडची हीच मजा आहे की इथे ऑगस्ट पासून नॉर्दर्न लाइट्स दिसायला सुरुवात होते. आणि ह्या वर्षीतर नॉर्दर्न लाइट्स जगाच्या अनेक भागातून खूपच छान दिसणार आहेत असं प्रेडिक्शन आहे. आता आमची हाव वाढलीय. जर दुसऱ्याच दिवशी नॉर्दर्न लाइट्सचं दर्शन घडलंय तर येणाऱ्या दहा दिवसांमध्ये किती वेळा ते दिसतील? कमर्शियल जगतातलं स्टॅटिस्टिक्स माझ्या मनाने मांडलं जरी निसर्ग त्याच्या लयीप्रमाणे चालत असतो हे माहीत असलं तरी. मी हा लेख लिहित असताना पुन्हा एकदा निकीची अनाऊन्समेंट झाली, `खिडकीतून बाहेर बघा, बाल्कनीत या, बाहेर मस्त हम्प बॅक व्हेल्स दिसताहेत’. क्रुझ कॅप्टनही एवढा मस्त की जिथे हे व्हेल्स त्यांचं सिंक्रोनाइज्ड स्विमिंग करीत होते त्यासाइडला क्रुझ वळवून ठेवली आणि आम्हाला मनसोक्त आनंद दिला व्हेल्स बघण्याचा. थोड्या वेळाने आम्हाला किलर व्हेल्सही बघायला मिळाले. आता आमच्या अपेक्षा वाढल्यात आणखी काय बघायला मिळणार त्याच्या. कीपिंग अवर फिंगर्स क्रॉस्ड. इट्स अ गेम ऑफ चान्स. पण ये दिल मांगे मोअर!
हात आणि डोळ्यांनंतर मला पायांविषयी एक गोष्ट आठवली. शिवाजीराव भोसलेंच्या छत्रपती शिवाजी महाराजांवरच्या भाषणातली. लीडर किंवा लीडरशिपवर बोलताना ते म्हणतात, `लीडर कसा असावा तर लीडरचा एक पाय आत असावा आणि दुसरा पाय बाहेर. कारण दोन्ही पाय जर आत म्हणजे संस्थेतच असले तर बाहेरच्या जगात काय चाललंय ते कळत नाही, आणि दोन्ही पाय संस्थेच्या बाहेर असले तर आतली म्हणजे संस्थेतली जनता सोबतीला येत नाही. सो लीडरला हा आतला बाहेरचा बॅलन्स नेहमी साधता आला पाहिजे’.
कान नाक डोळे उघडे ठेवले, सतर्क असले तर आपल्या रोजच्या आयुष्यात किती काही शिकायला मिळतं. अगदी आपल्या शरीराचे अवयवही मोठी फिलॉसॉफी शिकवून जातात. कसं आणि काय घ्यायचं हे आपल्या हातात आहे.
वीणा पाटील, सुनीला पाटील, आणि नील पाटील ह्यांचे प्रत्येक आठवड्यात प्रकाशित होणारे लेख वीणा वर्ल्डच्या वेबसाईट www.veenaworld.com वर वाचनाकरिता उपलब्ध आहेत.
अरेच्चा! हे मला माहितच नव्हतं..
.मिडल ईस्टमधला आकाराने सर्वात मोठा देश म्हणजे सौदी अरेबिया. रेड सी आणि पर्शियन गल्फ या दोन्हींची किनारपट्टी लाभलेला हा देश कोरड्या हवामानाचा, वैराण-रेताड जमिनीचा देश आहे. सौदी अरेबियाने अरेबियन पेनिन्सुलाचा 80% भाग व्यापलेला आहे. प्रामुख्याने अरेबियन डेझर्टने या देशाची भूमी व्यापलेली आहे, त्यामुळे साहजिकच ‘ओॲसिस’ ना या प्रदेशात फार महत्व आहे. अथांग पसरलेल्या वाळवंटामध्ये हिरवाईचा ठिपका जपणारं ओॲसिस म्हणजे जणू मरुभूमीतील नंदनवनच. सौदी अरेबियाच्या पूर्व भागातील ‘अल अहसा ओॲसिस’ हे मरु उद्यान जगातलं सर्वात मोठं ओॲसिस आहे. अरेबियन वाळवंटातील ‘रब अल खाली’ म्हणजे ‘एम्प्टी क्वार्टर’ या सगळ्यात वैराण भागात या ओॲसिसचा बराच भाग पसरलेला आहे. 85.4 स्क्वेअर किलोमीटरर्स इतक्या परिसरात पसरलेल्या या ओॲसिसमध्ये चार मोठी शहरं आणि 22 गावं येतात.या मरुउद्यानात सुमारे पंचवीस लाख पाम आणि खजुराची झाडे आहेत. जमिनीखालच्या पाण्यावर ही सगळी हिरवाई पोसलेली आहे. जमिनीतून निसर्गतः उफाळून येणारे सुमारे 280 झरे या ओॲसिसमध्ये आहेत. त्यामुळेच वर्षभर हा परिसर हिरवागार राहतो. साधारण सातव्या शतकापासून इस्लामी खलिफांच्या ताब्यात हा प्रदेश आहे. इसवी सन 1000 मध्ये अल अहसा हे एक लाख लोकसंख्येचं जगातलं नवव्या क्रमांकाचं सर्वात मोठ्ठं शहर होतं. या भूभागाचं वैशिष्ट्यं म्हणजे अरेबियन पेनिन्सुलावर ज्या मोजक्या भागात तांदुळ पिकवला जातो, त्या भागांमध्ये अल अहसाचा समावेश होतो. इथे खजुराची झाडं विपुल प्रमाणात असल्याने वर्षाला सुमारे एक लाख टन खजुराचं उत्पादन होतं.2018 मध्ये अल अहसाचा समावेश युनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेज यादीत करण्यात आला आहे. या परिसरात असलेल्या पर्यटन आकर्षणांमध्ये ‘अल अस्फर लेक’ हा नैसर्गिक तलाव येतो. यालाच येलो लेक असंही नाव आहे. स्थलांतरित पक्ष्यांसाठी हा लेक प्रसिध्द आहे. या परिसरातला ‘इब्राहिम पॅलेस’ किंवा ‘कस्र इब्राहिम’ हा सुमारे पाचशे वर्षांपुर्वीचा किल्ला त्याच्या रचनेमुळे लक्ष वेधून घेतो. ओटोमन राजवटीतील वास्तुशैलीचा ठसा या किल्ल्यावर आहे. या किल्ल्यातील अल कूबा मशिद तिच्या भव्य घुमटामुळे नजरेत भरते. या परिसरातील `अल मुराह’ नावाच्या गावाजवळ ‘ऐन कुनास’ ही आर्किओलॉजिकल साइट आहे. या ठिकाणी इसवी सनपूर्व सहाव्या पाचव्या शतकातले अवशेष आढळले आहेत. त्या काळातील बहुमजली घरांचे भाग इथे पहायला मिळतात. या शिवाय अल अहसामध्ये जवाथा मॉस्क, खुझम पॅलेस, अल कैसरिया सूक, अल अहसा आर्किओलॉजिकल अँड हेरिटेज म्युझियम अशी अनेक पर्यटन आकर्षणे आहेत. वीणा वर्ल्डच्या सौदी अरेबिया सहलीत सहभागी होऊन अल अहसाचं ओॲसिस नक्की अनुभवा.
वीणा वर्ल्ड ट्रॅव्हल मिशन
100 Country Club
फिटनेस फर्स्ट!
एज इज ॲन इश्शु ऑफ माइंड ओव्हर मॅटर, इफ यु डोन्ट माइंड, इट डझन्ट मॅटर’. हे सुभाषित माझं ब्रिदवाक्य आहे. त्यामुळेच मी आज वयाच्या सत्तरीमध्येही जगभ्रमंती करते, सहलींचा आनंद घेते. मला मुळात पर्यटनाची खूप आवड आहे. मी जेव्हा हॉस्पिटलमध्ये नर्स म्हणून काम करत होते तेव्हा संधी मिळाली की माझ्या परिवाराबरोबर सहलीला जात असे. मात्र तेव्हा अशी संधी क्वचित मिळत असे. आता मात्र मी निवृत्तीनंतरचं माझं आयुष्य जणू पर्यटनालाच वाहिलं आहे. 2021मध्ये कोव्हिडची साथ ओसरली आणि भारतातील पर्यटनस्थळं लोकांसाठी खुली झाली तेव्हा मी वीणा वर्ल्डकडे एकदम 7 टूर्सचं बुकिंग करून जणू बॅकलॉगच भरून काढला. मी वीणा वर्ल्डसोबत आजपर्यंत 15 सहली केल्या आहेत. वीणा वर्ल्डची `वुमन्स स्पेशल’ ही संकल्पना माझी आवडती. या सहलींनी महिलांना स्वतंत्रपणे पर्यटन करण्याचा आत्मविश्वास दिला आहे, माझ्यासारख्या एकट्या फिरणाऱ्या महिलांना या सहलीत रूम शेअरिंगची गॅरंटी मिळत असल्याने सहलीची किंमत रीझनेबल राहते. आजपर्यंतच्या भटकंतीमध्ये मी 90% भारत बघितला आहे तर जगातल्या 32 देशांना भेट दिली आहे. वेगवेगळ्या लोकांना भेटायला, त्यांच्याशी गप्पा मारायला मला आवडतं, त्यामुळे मी नेहमी गु्रप टूरला प्राधान्य देते. सहलीवर भरपूर फोटो काढणं आणि ते माझ्या फेसबुक वॉलवर शेअर करणं मला आवडतं. आजवरच्या जगभ्रमंतीमध्ये मी बघितलेल्या देशांपैकी ग्रीस मला विशेष आवडला. सर्वात आवडली ती तिथली निळ्या-पांढऱ्या रंगातली घरं. स्थानिकांनी तो परिसर इतका स्वच्छ ठेवला आहे की, एखाद्या सिनेमाचा सेट बघतोय असं वाटतं. शॉपिंगची फार आवड नाही पण परदेशातून येताना मी घरच्यांसाठी एखादं सुव्हेनियर वा चॉकलेट्स सारखी गिफ्ट आणते. घरी एकटं बसून राहण्याऐवजी वेगवेगळे देश-प्रदेश बघावे, तिथली माणसं, कला परंपरा, निसर्ग जाणावा, ह्या मताची मी. त्यामुळे वेळ कारणी लागतो आणि मनही ताजंतवानं राहतं. आता जग फिरायचं म्हणजे प्रकृती ठणठणीत पाहिजे, त्यामुळे मी माझ्या फिटनेसची भरपूर काळजी घेते. जर मी माझा फिटनेस असाच उत्तम राखला तर अगदी ऐंशीव्या वर्षीही मी जग फिरू शकेन. मला अजून अंटार्क्टिका बघायचं आहे. न्यूझीलंड, स्पेन, पोर्तुगाल, मोरोक्को पहायचे आहेत, त्यामुळे जगभ्रमंतीसाठी फिटनेस हेच माझं ध्येय आहे.
काय बाई खाऊ कसं गं खाऊ!
प्रत्येक देशाची खाद्यसंस्कृती ही जशी आणि जितकी युनिक असते, त्याचप्रमाणे शेजारच्या देशांचाही त्या खाद्यपरंपरेवर प्रभाव नक्कीच पडतो. भारत आणि श्रीलंकासारखे अगदी एकमेकांच्या शेजारी शेजारी असलेले, इतिहासकाळापासून एकमेकांशी संबंध राखून असलेले देश असतात तेव्हा तर अशी पदार्थांची देवाण घेवाण सहजच घडते. त्यामुळेच दक्षिण भारतातील कोथु पराठा आणि श्रीलंकेतील कोट्टू रोटी सारखे एकमेकांचे भाऊ भाऊ शोभणारे पदार्थ जन्माला येतात, लोकप्रिय होतात. तसं पाहिलं तर श्रीलंकेतील कोट्टू रोटी ही आपल्या मराठमोळ्या फोडणीच्या पोळीचा जरा चटपटीत, अधिक चवदार आविष्कार म्हणता येईल. आपण जशी शिळी पोळी कुस्करून त्यात कांदा, शेंगदाणे घालून मस्त फोडणीची पोळी करतो. त्याचप्रमाणे कोट्टू रोटीमध्ये शिळा पराठा वापरला जातो आणि त्याच्या कुस्कऱ्यात चिकन, मटण, मासे, अंडी यातील काहीतरी मिक्स करून कोट्टू रोटी तयार केली जाते. या पदार्थाच्या नावातील ‘कोट्टू’ या शब्दाचा उगम तमिळ भाषेतील ‘कोथ्थू’ या शब्दात आहे. या तमिळ शब्दाचा अर्थ होतो ‘टू चॉप’ म्हणजे ‘बारीक कापणे’. श्रीलंकेच्या पूर्व भागात हा पदार्थ 1960-70च्या दशकात बनवायला सुरुवात झाली, तेही रस्त्यावरचं झटपट स्वस्त खाणं म्हणून. समाजातील कष्टकरी वर्गासाठी कमी किमतीत पोटभर खाणं म्हणून हा पदार्थ लोकप्रिय झाला. कोलंबोच्या रस्त्यांवर जर तुम्ही संध्याकाळी उशिरा फेरफटका मारलात तर हमखास तव्यावर कोट्टू रोटी बनवल्याचा आवाज आणि सुगंध तुमचं स्वागत करेल आणि मग कोट्टू रोटीचा आस्वाद घेतल्याशिवाय तुम्ही परत फिरणारच नाही.
देश-विदेशातील अशाच विविध खाद्यपरंपरा आणि ट्रॅव्हलचे भन्नाट अनुभव ऐकण्यासाठी वीणा वर्ल्डचा ‘ट्रॅव्हल एक्सप्लोअर सेलिब्रेट लाईफ’हा पॉडकास्ट नक्की ऐका.
फेस्टिव्ह हॉलिडे
वीणा वर्ल्ड कस्टमाईज्ड हॉलिडेज्सोबत
आपण हॉलिडेवर जातो हेच एक सेलिब्रेशन असतं, नेहमीपेक्षा वेगळे कपडे, आगळं जेवण, रोजच्यापेक्षा भरपूर आनंद त्यामुळे हॉलिडे हाच एक फेस्टिव्हल बनून जातो. अशा हॉलिडेला जर खऱ्या खुऱ्या फेस्टिव्हलची जोड मिळाली तर काय भन्नाट कॉम्बो होईल ना? वेगवेगळ्या देशांमध्ये त्या त्या ठिकाणच्या परंपरेनुसार वेगवेगळे फेस्टिव्हल साजरे केले जात असतात, त्या फेस्टिव्हलच्या वेळेलाच त्या देशात हॉलिडे घेतला तर तुमचा पर्यटनाचा आनंद नक्कीच द्विगुणित होईल.
हॉलिडेसाठी अनेकांचा प्रेफरन्स असलेल्या सिंगापूर आणि हाँगकाँगमध्ये चायनीज कॅलेंडरनुसार येणारे फेस्टिव्हल्स मोठ्या जोशात साजरे होतात. त्यातला मुख्य सण म्हणजे हिवाळा संपून वसंत ऋतुला सुरुवात होताना साजरं केलं जाणारं `चायनीज न्यू इयर’. या दिवशी चायनीज परंपरेनुसार पुर्वजांचे स्मरण करून दैवतांचं पूजन केलं जातं. सिंगापूरच्या चायना टाऊनमध्ये नऊ दिवस न्यू इयर फेस्टिव्हल साजरा केला जातो. न्यू इयर साजरा करताना ‘ड्रॅगन अँड लायन डान्स’ केला जातो. सिंगापूरची ‘चिंगाय परेड’ही शोभायात्रा तर जगप्रसिध्द आहे. हाँगकाँगमध्येही अशीच भव्य परेड काढून चायनीज न्यू इयर सेलिब्रेट केला जातो. लँटर्न डिस्प्ले, फायरवर्क्स, हॉर्स रेस, फ्लॉवर मार्केट फेअर, लायन डान्स अशा विविध प्रकारे इथे चायनीज न्यू इयर सेलिब्रेशन अगदी दणक्यात केलं जातं. साउथ ईस्ट एशियातील तैवानमधला ‘लँटर्न फेस्टिव्हल’ पाहण्यासाठी जगभरातले पर्यटक येतात. इथे चायनीज न्यू इयर सेलिब्रेशनची सांगता आकाशात शेकडो कंदिल सोडून केली जाते. हे दृश्य डोळ्यात न मावणारं असतं. जर तुम्हाला यावेळी तैवानला भेट देता आली नाही तर व्हिएतनाममधील ‘होइ ॲन लँटर्न फेस्टिव्हल’ला जरूर भेट द्या. तिथे हा लँटर्न फेस्टिव्हल दर महिन्याच्या पौर्णिमेला साजरा करतात.
जानेवारी-फेब्रुवारीमध्ये साजरा होणारा ‘दुबई शॉपिंग फेस्टिव्हल’जगभरातल्या खरेदीबाजांसाठी एक सुवर्णसंधी असते. सोन्यापासून इलेक्ट्रॉनिक वस्तुंपर्यंत आणि कपड्यांपासून होम अप्लायन्सेस पर्यंत सगळ्या ब्रँडेड वस्तु सवलतीच्या दरात खरेदी करण्यासाठी पर्यटक गर्दी करतात. मौजमजेसाठीच प्रसिध्द असलेल्या थायलंडमध्ये दरवर्षी एप्रिल महिन्यात ‘सोंगक्रान’ हा उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. नाव ऐकल्यावर आपल्या मराठी संक्रांतीची आठवण होत असली तरी ‘सोंगक्रान’ हा न्यू इयर फेस्टिव्हल आहे. थायलंडमध्ये सोंगक्रान साजरा करताना एकमेकांच्या अंगावर पाणी उडवण्याची पध्दत आहे. त्यामुळे भारतीय होळी-रंगपंचमीचा थाई अवतार म्हणूनही या सणाचा आनंद घेता येतो.
आपल्या भारतात तर सण-उत्सवांची अजिबात कमी नाही. आता ऑक्टोबरमध्ये सगळीकडे नवरात्र साजरी होईल. त्यातही पश्चिम बंगालमधील दुर्गापुजेचा थाट काय सांगावा? भव्य सभामंडप, रोषणाई, मोठे देखावे याचा आनंद घेण्यासाठी कोलकत्याची दुर्गापुजा अनुभवायलाच हवी. तर दसऱ्याचा सण साजरा करायला कर्नाटकातील म्हैसूर गाठायला हवं, तिथली दसऱ्याची शाही मिरवणूक आणि जोरदार सेलिब्रेशन बघायला देशविदेशातले पर्यटक हजेरी लावतात. जानेवारीत संक्रांत साजरी करताना गुजरातमधील अहमदाबाद शहराचे आकाश पतंगांनी भरून जातं. हा इंटरनॅशनल काइट फेस्टिव्हल सक्रांतीच्या सणाचा गोडवा वाढवतो.
जगभरातल्या अशा फेस्टिव्हल्सना हजेरी लावायची तर ॲडव्हान्स प्लॅनिंग आणि बुकिंग करायला हवं. मग ठरवा तुमचा फेस्टिव्हल आणि चला सेलिब्रेशनला. वीणा वर्ल्ड कस्टमाईज्ड हॉलिडे टीम आहेच तुमच्यासाठी.
काय बघावं? कसं बघावं?
आफ्रिका - द फिफ्थ कॉन्टिनेंट!
चलो, बॅग भरो, निकल पडो! वीणा वर्ल्डसोबत.
सप्तखंडापार, साता समुद्रापार असं म्हणण्याची पुर्वी पद्धत होती. कोणीही देशाबाहेर गेलं खासकरून इंग्लड अमेरिकेला की त्या व्यक्तींचा उदो उदो व्हायचा. परदेश गमन हा सर्वांच्या कुतुहलाचा आणि अभिमानाचा विषय असायचा. हळूहळू जग जवळ आलं, जगाच्या कोणत्याही टोकाला पोहोचण्याची सोय उपलब्ध झाली आणि माणसाची मुळातच असलेली भटकी मानसिकता आणखी जोशात उंचबळून आली. सात समुद्र पार करणं सहज शक्य झालं आणि अनेकांनी सातही खंडांवर आपली मोहोर उमटवली. प्रथम आशिया खंड नंतर युरोप त्यानंतर ऑस्ट्रेलिया मग नॉर्थ अमेरिका त्यानंतर साऊथ अमेरिका आणि मग अंटार्क्टिका असा क्रम लावताना विसरला जातो तो खंड म्हणजे आफ्रिका. आम्हाला आठवण करून द्यावी लागते आमच्या पर्यटकांना, `अहो साऊथ अमेरिका आणि अंटार्क्टिका ह्या सहाव्या आणि सातव्या कॉन्टिनेंटला जायच्या आधी आफ्रिका हा पाचवा खंड तर बघून घ्या’. ह्या सल्ल्यानंतर उलटा प्रश्न येतो, `आफ्रिकेत खरंच काही बघण्यासारखं आहे का?‘ आणि आमच्या मनात येतं, `ये लो करलो बात!’ मात्र जे आफ्रिकेला जाऊन आलेत ते इतके खुश होऊन येतात की काही विचारूच नका. आफ्रिका म्हणजे फक्त वाईल्ड लाइफ नव्हे. आफ्रिकेत एक एक अशी हटके ठिकाणं आहेत की माफक अपेक्षा घेऊन गेलेला पर्यटक अगदी आश्चर्यात पडतो. केनिया, टांझानिया, झांझिबार, सन सिटी, केप टाऊन, गार्डन रुट, गोरिलाज्चं रवांडा अशा एकसे एक ठिकाणांना भेट द्यायला, पाचवा खंड पार करायला आणि आश्चर्यांनी थक्क व्हायला चला
Post your Comment
Please let us know your thoughts on this story by leaving a comment.