Published in the Sunday Sakal on 28 January, 2024
कॉमन वॉलवर एच आरचा मेसेज वाचला. नवीन जॉईन झालेले टीम मेंबर्स आणि सोडून गेलेले टीम मेंबर्स. कधी क्वार्टरली तर कधी मधूनच येणारा हा मेसेज ‘एक आँख में आँसू तर एक आँख में खुशी‘ अशी काहीशी मनस्थिती करून टाकतो. फोटोंसह येणारा हा व्हर्च्युअल मेसेज बघताना एक वाटलं की, अरेरे ह्या सोडून गेलेल्या मुलांपैकी काही जणांना आपण भेटलोही नाही किंवा कधी बोललोही नाही. त्यांना थँक्यू तरी म्हणायला पाहीजे होतं. त्यांच्या आयुष्यातले जे काही दिवस त्यांनी वीणा वर्ल्डला दिले त्याप्रति कृतज्ञता तर व्यक्त करता आली असती. म्हणजे एच आर हे काम करीतच असतं. पण तरीही. आपली ऑर्गनायझेशन कुठे एवढी मोठी झालीय अजून की आपल्याला आपलीच माणसं माहीत नाहीत किंवा आपणाला कधी त्यांना भेटायची संधीच मिळत नाही.
ह्या बाबतीत एक किस्सा आठवला. आमची चीफ प्रॉडक्ट ऑफिसर सुनिला आणि तीची मुलगी सारा काही वर्षांपूर्वी स्वित्झर्लंडमध्ये लुसर्न लेकजवळ भटकंती करीत होत्या. तिथे तुम्ही कधी गेला असाल तर सीझनमध्ये भारतीय पर्यटकांनी हा संपूर्ण एरिया जणू कॅप्चर केलेला असतो. अर्थातच वीणा वर्ल्डचेही बरेचसे ग्रुप्स तिथे होते. आमच्या टूर मॅनेजर्सना लागलीच ओळखता येतं कारण येलो टी शर्ट. म्हणजे पर्यटकांना टूर मॅनेजर गर्दीत कुठेही दिसायला हवा म्हणूनच आमचा टी शर्ट एवढ्या ब्राइट कलरचा आहे. तर सुनिला साराला टूर मॅनेजर्स दिसले आणि भेटले त्या ठिकाणी. परदेशात आपल्याला आपलं कुणी जवळचं वा ओळखीचं भेटलं तर किती आनंद होतो नाही का. तसंच सुनिलाचं झालं. आनंदात ह्या चार टूर मॅनेजर्ससोबत तिचं संभाषण सुरू होतं. त्या चार टूर मॅनेजर्सपैकी एकाचं नाव सुनिलाला माहीत नव्हतं म्हणून तिने त्याचं नाव विचारलं. बराच वेळ गप्पा मारल्यावर टूर मॅनेजर्सनी सुनिलाचा निरोप घेतला आणि ते आपापल्या टूर्सवरील पर्यटकांच्या दिमतीला निघून गेले. काही वेळ त्यांचं संभाषण ऐकत असलेली त्यावेळी सहावी-सातवीत असलेली सारा म्हणाली, ‘मम, आपली कंपनी खूप मोठी आहे का?‘ सुनिला म्हणाली, ‘नाही, का गं?‘ साराने प्रश्न केला, ‘मग तुला आपल्या टूर मॅनेजरचं नाव कसं माहीत नाही?‘ सुनिला काही काळ स्तब्ध झाली. साराचा प्रश्न डोळ्यात अंजन घालणारा होता. विचार करायला लावणारा होता.
चेहर्यासह नाव लक्षात ठेवणं ही एक कला आहे. अनेकांना ती जमते. काही काही लीडर्स ह्या बाबतीत एकदम ग्रेट असतात. आम्ही मात्र अजूनही चाचपडतोय. कधीतरी एअरपोर्टवर, काउंटरवर किंवा बोर्डिंग गेटवर मुलं भेटतात. हसत हसत पुढे येतात आणि म्हणतात,‘आम्ही होतो नं वीणा वर्ल्डमध्ये‘. आनंद होतो ते भेटल्याचा पण मनात चलबिचल होतेच की, अरे त्यांनी सांगितलं म्हणून कळलं, आपण त्यांना ओळखलंच नाही. प्रॅक्टिकली हे शक्य नसतं हे पण माहित आहे. पॅन्डेमिकपूर्वी आम्ही ऑफिस टीम आणि टूर मॅनेजर्स मिळून नऊशे जण होतो आता ही संख्या सातशे आहे आणि त्यात वाढ होतेय दर महिन्याला कारण परिस्थिती बर्यापैकी पूर्वपदावर आलीय. पर्यटकांचा संचार देशविदेशात चांगल्या तर्हेने सुरू आहे. टूरिझममध्ये असलेल्या कंपन्या आणि माणसं कोविडच्या धक्क्यातून सावरलेत. माणसांची कमतरता भासतेय म्हणजे काम वाढतंय. पण प्रश्न राहतोच की, आपल्या माणसांना ओळखायचं कसं? झूम वा टीम्समुळे हल्ली सर्व मिटिंग्जही व्हर्च्युअल झाल्यात. त्याचे फायदे आहेतच पण माणसं माणसांना माणसासारखं, पूर्वीसारखं भेटत नाहीत ही खंत आहे. बॅक ऑफ द माईंड हा विचार सारखा डोकं वर काढत होता आणि त्यातूनच सुरू झालं ‘ओपन हाऊस.‘ आठवड्यातल्या एका दिवशी संध्याकाळी किमान दोन तास कुणीही या आणि कामाचं सोडून इतर गप्पा मारूया, एकमेकांना जाणून घेऊया. कुणाला काही प्रश्न असतील तर त्याचं शंका निरसन करूया. अर्थात एच आर ने थोड्या प्रश्नार्थक चेहर्यानेच अनुमती दिली. त्यांच्या मनात काय असणार त्याचा मला अंदाज आला. ‘एकतर तुम्ही महिन्यातले पंधरा दिवस बाहेर भटकता. उरलेल्या पंधरा दिवसातही शनिवारी तुम्ही अधेमधेच असता तेही व्हर्च्युअली. कामं संपणार कशी?‘ त्यांना म्हटलं, ‘काढते मी हे दोन तास. लेटस् सी. हो जायेगा. स्टार्ट तर करूया. आणि जेव्हा आपल्याकडे वेळ कमी असतो नं तेव्हा आपण जास्त ऑर्गनाइज्ड बनतो. एफिशियंट होतो.‘ आणि मग गेल्या तीन महिन्यांपासून ओपन हाऊस सुरू झालं. नवीन जुनी सर्व मंडळी येऊन भेटायला लागली. हे दोन तास खरंच कारणी लागायला लागले. कधी कधी हे दोन तास एक्स्टेंडही होतात. चार चार तास लागतात पण नो प्रॉब्लेम. आपली माणसं तर जाणता येतात, एक दुसर्यांमधली दरी कमी होते. कुणाचा काय प्रश्न असेल तर तोही सोडविण्याचा प्रयत्न होतो. काही वेळा मला जाबही विचारला जातो, ‘व्हाय धिस? व्हाय नॉट लाइक धिस?‘ परफेक्ट. शाळेत आपल्या टीचरला जाब विचारता यायचा आपल्याला. आपल्या शाळांमध्ये ओपन हाऊसच्या दिवशी असा जर मोकळेपणा टिचर निर्माण करू शकत असेल तर तोच विजय आहे शाळेचा, टिचरचा आणि त्यांनी निर्माण केलेल्या वातावरणाचा. माझीही भूमिका टिचरपेक्षा वेगळी नाही आणि आता ‘ओपन हाऊस‘ ही गोष्ट ऑर्गनायझेशनमध्ये कायम झाली आहे. एच आर च्या चेहर्यावरचे, ‘काय आता हे नवीन फॅड‘ हे भाव लोपले जाऊन त्यांनी जे टीम मेंबर्स कॉर्पोरेट ऑफिसमध्ये नाहीत त्यांच्यासाठी ह्या ओपन हाऊसमध्ये झूमद्वारे पण हे करता येईल हे आर्गनायझेशनला कळवलं. आमच्या टूर मॅनेजर्स आणि सेल्स पार्टनर्ससाठी मात्र हे ‘ओपन हाऊस‘ सदा सर्वकाळ ओपन असतं. डू नॉट डिस्टर्बचा ‘इफ इट कॅन वेट कॅन वी मीट अ लिटल लेटर‘ हा बोर्ड जर दारावर नसेल किंवा कुणा व्हिजिटर्ससोबत वा असोसिएटसोबत मिटिंग सुरू नसेल तर बिनधास्त भेटा अशी मोकळीक दिली. कारण ते अमूक एका दिवशीच मुंबईत असतील असं नसतं. ह्याद्वारे एकमेकांमधला संवाद वाढीस लागला. कुठे काही खटकत असेल तर ते मोकळेपणाने मांडता यायला लागलं. मनावरचं ओझं कमी व्हायला मदत झाली. ‘जगात खूप अशांतता आहे ऑलरेडी, आपल्या मनातली तर कमी करूया.‘ त्यासाठीच हा अट्टाहास. थोडी स्लो प्रोसेस आहे पण त्यात सातत्य राखू शकलो आणि ते राखायचंच तर ह्याचा लाँग टर्म फायदा खूप होईल. ओपन हाऊसप्रमाणे आमचं कॉर्पोरेट ऑफिसही एकदम ओपन आहे. कुठे कड्या कुलूपं नाहीत. बंद केबिन्स नाहीत. आमच्या टूर्समध्ये जशी हिडन कॉस्ट नसते तसंच इथेही नथिंग हिडन. सगळा खुला मामला. आणि गेली दहा वर्ष आम्हाला कधीच ह्या खुलेपणाचा त्रास झाला नाही किंवा त्याने काही नुकसान झालं नाही. मी तर म्हणेन ओपननेसमुळे एकमेकांमधला विश्वास वाढतोय आणि वीणा वर्ल्डच्या प्रगतीत मदतच होतेय.
ओपन हाऊस वा ओपन ऑफिस प्रमाणेच ओपन माईंड, ओपन इयर्स, ओपन आइज, इव्हन ओपन नोज... नाक कान डोळे मन हे स्वच्छ असलं, मोकळं असलं तर घरातले, ऑर्गनायझेशनमधले, समाजातले आणि पर्यायाने देशातले बरेचसे प्रॉब्लेम सुटतील. हे खूप मोठं विधान झालं पण किमान आपण आपल्या घरापासून तर सुरुवात करू शकतो. मोकळेपणाने एकमेकातला संवाद वाढवू शकतो. आणि मग आपोआपच विश्वास वाढायला लागतो. स्कॅडिनेव्हियन कंट्रीजचा हॅप्पीनेस इंडेक्स जगात सर्वोच्च आहे वर्षानुवर्ष, आणि त्याच्या अनेक कारणांपैकी एक कारण आहे, एकमेकांवरचा विश्वास. एखाद्याचं पैशाचं पाकीट जर कुठे विसरलं गेलं तर त्याला ते पाकीट कुणीतरी आणून देईल ह्याची खात्री असते, तसा विश्वास असतो. आपल्याकडेही शनिशिंगणापूरला घराला कुलूपं नसतात त्याला कारण देवाची भीती आणि एकमेकांवरचा विश्वास. ह्या गावावरूनच आम्ही प्रेरणा घेतली की किमान आपल्या घरी तरी कपाटांना कुलूपं नसतील आणि तशी ती नाहीत. एकमेकांवरचा विश्वास महत्त्वाचा. पूर्वी सहावीच्या पुस्तकात संत तुकडोजी महाराजांची कविता होती, ‘राजास जी महाली, सौख्ये कधी मिळाली ती सर्व प्राप्त झाली, या झोपडीत माझ्या॥१॥ भूमीवरी पडावे, तार्यांकडे पहावे। प्रभुनाम नित्य गावे, या झोपडीत माझ्या॥२॥ पहारे आणि तिजोर्या, त्यातूनी होती चोर्या। दारास नाही दोर्या, या झोपडीत माझ्या॥३॥ जाता तया महाला, ‘मज्जाव’ शब्द आला। भीतीनं यावयाला, या झोपडीत माझ्या॥४॥ महाली माऊ बिछाने, कंदील शामदाने। आम्हा जमीन माने, या झोपडीत माझ्या॥५॥ येता तरी सुखे या, जाता तरी सुखे जा। कोणावरी न बोजा, या झोपडीत माझ्या ॥६॥ पाहून सौख्यं माझे, देवेंद्र तोही लाजे। शांती सदा विराजे, या झोपडीत माझ्या ॥७॥‘
प्रत्येक घरात आणि प्रत्येक कार्यालयात आपल्याला अशी स्वत:ची झोपडी निर्माण करता आली पाहीजे.
अरेच्या! हे मला माहितच नव्हतं...
काही गोष्टी तशा आपल्या जवळ असतात पण तरिही त्या आपल्या नजरेतून सुटतात आणि त्यामुळे त्यांचे वैशिष्ट्य, त्यांचं महत्व आपल्याला चटकन कळत नाही. भारतातील अनेक पर्यटकांचं नॉर्थ ईस्ट अर्थात ईशान्य भारतातील अनेक आकर्षणांबद्दल असं होताना दिसतं. नॉर्थ ईस्टच्या सातही राज्यातील ‘मेघालय’ हे राज्य म्हणजे जणू अनोख्या आकर्षणांची खाणच आहे. मुळात भारताला स्वातंत्र्य मिळालं तेंव्हा ‘मेघालय’ हे स्वतंत्र राज्य म्हणून अस्तित्वातच नव्हतं. ब्रिटिशांना या प्रदेशात आल्यानंतर इथल्या टेकड्या आणि त्यावरील वनराजी पाहून मायदेशातील भूभाग आठवला आणि त्यांनी मेघालयमधील शिलाँगला ‘स्कॉटलंड ऑफ ईस्ट ’ हे नाव देऊन टाकलं. त्यांच्या राजवटीत ‘शिलाँग’ हीच आसाम राज्याची राजधानी होती. पुढे १९७२ मध्ये मेघालय हे स्वतंत्र राज्य निर्माण करण्यात आलं. इथल्या नैसर्गिक वातावरणामुळे ‘मेघांचे आलय’ अर्थात मेघांचे घर हे नाव अगदी शोभून दिसतं. मेघालय हे भारतातलं सर्वात ओलं राज्य म्हणून ओळखलं जातं कारण येथे वर्षभरात १२०० से.मी. पाऊस पडतो. भूगोलाच्या पुस्तकातलं सर्वात जास्त पावसाचं ठिकाण ‘चेरापुंजी’याच राज्यात येतं. हिरव्यागार जंगलाने आच्छादलेल्या टेकड्या, त्यावरुन कोसळणारे धबधबे, त्यातून वाहाणार्या नद्या, डोंगरांमधील गुहांमधली नैसर्गिक शिल्पे यामुळे मेघालयची भेट म्हणजे जणू वंडरलँडची भेट ठरते. एका नदीचा फोटो तुम्ही अनेकदा पाहिला असेल, ज्यात नितळ हिरव्यागार प्रवाहावर तरंगणार्या नौका दिसतात आणि वाटतं की जणू त्या काचेवरच उभ्या आहेत. ही आहे मेघालयातली ‘उमन्गोत’ नदी. जैंतिय हिल्सच्या पायथ्याशी ‘डावकी’ गावातून भारत आणि बांगलादेश या देशांना जोडणारी ही नदी बघताना खरोखरंच डोळ्यांचं पारणं फिटतं. मेघालयचं सर्वात मोठ्ठ वैशिष्ट्य म्हणजे ‘लिव्हिंग रूट ब्रिज’. वडाची झाडे आपल्या पारंब्या जमिनीत रुजवून आपला विस्तार वाढवतात. या नैसर्गिक तत्वाचा उपयोग करुन मेघालयच्या खासी आणि जैंतिया टेकड्यांच्या दुर्गम भागात राहणार्या स्थानिकांनी या पारंब्यांचाच पूल तयार करण्याचं तंत्र विकसीत केलं. एका झाडाच्या पारंब्या एकत्र करुन त्या एखाद्या प्रवाहावरुन पलिकडच्या काठावर न्यायच्या आणि जिवंत पारंब्यांचा पूल रहदारीसाठी वापरायचा. असा एक पूल तयार करायला किमान पंधरा वर्ष लागतात, मात्र एकदा बनला की पुढे अगदी तीनशे-चारशे वर्षे तो वापरता येतो. ५० ते १०० फूट लांबीचे असे बरेच पूल मेघालयात अनेक ठिकाणी आहेत. इको फ्रेंडली जीवनपध्दतीचं हे एक आदर्श उदाहरण मानलं जातं, कारण इथे कोणताही कृत्रिम घटक न वापरता रहदारीचा रस्ता तयार केला जातो. हे पारंपरिक ‘लिव्हिंग रूट ब्रिज’ आता पर्यटकाचं मोठ्ठं आकर्षण ठरले आहेत. वीणा वर्ल्डकडे नॉर्थ ईस्टसाठी सहलींचे विविध पर्याय उपलब्ध आहेत. नॉर्थ ईस्टच्या सात राज्यांतील अशी अनेक अनोखी आकर्षणे पाहायला आहे आठ दिवसांची आसाम मेघालय टूर, फक्त मेघालयाची आठ दिवसांची टूर, आसाम अरुणाचल मेघालयची बारा दिवसांची टूर आणि सर्व सात राज्यांची एकविस दिवसांची टूर. सो चलो, बॅग भरो निकल पडो! ह्यावेळी नार्थ ईस्ट!
वीणा वर्ल्ड ट्रॅव्हल मिशन
देखो अपना देश! हे आवाहन आपले माननीय पंतप्रधान सतत करीत आहेत आणि देशातील पर्यटनस्थळं आणखी सुंदर व सुव्यवस्थित करण्याचं कामही सोबत चालू आहे. वाराणसी आमुलाग्र बदललं, अयोध्या नगरी तर भारताच्या पर्यटन नकाशावर चांगल्या तर्हेने चमत्कार घडवून आणणार आहे हे सांगण्यासाठी कुणा ज्योतिषाची गरज नाही. स्टॅच्यु ऑफ युनिटीमुळे आणि त्या सभोवताली तयार केलेल्या संपूर्ण इकोसिस्टिममुळे गुजरात प्रत्येक भारतीयाच्या आणि अनिवासी भारतीयाच्या मनावर कोरलं गेलंय आणि प्रत्येकाने ठरवलंय की मला गुजरातला जायचंच आहे. राजस्थानचे वा लेह लडाखचे रस्ते खूप सुधारले आहेत. पर्यटकांचा त्रास कमी झालाय. एकूण काय तर टूरिझममध्ये मागे पडलेला आपला भारत भविष्यात आपल्याला अभिमान वाटेल अशा तर्हेने पुढे चाललेला दिसतोय. अर्थात प्रत्येक राज्याने ह्यात पुढाकार घ्यायला पाहीजे. नाहीतर भारत पुढे जाईल पण आपला महाराष्ट्र मात्र जिथल्या तिथे राहील. भारत बदलतोय. आणि आपण पर्यटकसुद्धा. आपल्या पर्यटनाच्या मिशनमध्ये येणार्या तीन वर्षात भारतातील किमान पंधरा राज्य बघण्याचं उद्दीष्ट आपण ठेवलं पाहीजे. आपल्या भारताविषयीचं प्रेम पुढच्या पिढीत रूजवलं पाहीजे. आणि ह्यासाठी प्लॅनिंग फार महत्वाचं आहे. प्लॅनिंगमुळे पैसा वेळ ह्या गोष्टी तर वाचतातच पण ऐनवेळची धावपळ आणि मनस्ताप ह्यातून आपली सुटका होते. ज्या मंडळींकडे वेळ आहे त्यांनी सुट्टयांचा मोसम सोडून पर्यटन करावं, जेणेकरून शांत निवांतपणे पर्यटनस्थळाचा आस्वाद घेता येतो. बर्याचदा टूर्सच्या किमतीही कमी असतात, त्याचा फायदा का नाही घ्यायचा? आणि आपण आपल्या डेव्हलपिंग स्टेजला असलेल्या पर्यटनस्थळांचाही विचार करायला पाहीजे नाही का. सर्वांनी एकाच वेळी सुट्टीत जायचं ठरवलं तर प्रत्येक ठिकाणी गर्दीचा महापुर येईल जो कोणत्याच पर्यटनस्थळाला झेपणार नाही. आपल्या पर्यटन मिशनसोबत आपण पर्यावरणाचाही विचार केला पाहीजे आणि आपलं अंशत: का होईना पण योगदान दिलंच पाहीजे. आम्ही ३६५ दिवस पर्यटन सुरू ठेवून पर्यटनस्थळांची सुट्टयांमधली गर्दी कमी व्हायला निश्चितच हातभार लावला आहे.
#VeenaWorldTravelMission
काय बाई खाऊ... कसं गं खाऊ!
तुम्ही टूरवर असा किंवा आपल्या घरी, दिवसाची सुरूवात चांगली झाली तर आपोआप पुढचा सगळा दिवस मस्त जातो हा अनुभव सगळ्यांचा आहे आणि ही सुरूवात चांगली होण्यात मोठा वाटा असतो तो अर्थातच ‘ब्रेकफास्ट’चा नाही का? जेंव्हा आपण एखाद्या हॉटेलचा पाहुणचार घेत असतो तेंव्हा इन्क्लुजन्समध्ये अनेकदा ब्रेकफास्ट समाविष्ट असतो आणि वर ‘अमेरिकन ब्रेकफास्ट’ असंही ठळकपणे म्हटलेलं असतं. आता ‘अमेरिकन’ लेबल लागलेल्या गोष्टींचं आकर्षण अनेकांना असतं, त्यामुळे ‘अमेरिकन ब्रेकफास्ट’ म्हटल्यावर अमेरिकन पदार्थ खायला मिळणार म्हणून खूश झालेल्यांना प्रत्यक्षात मात्र ब्रेकफास्टला गेल्यावर काहीवेळा भ्रमनिरास झाल्यासारखं वाटू शकतं कारण समोर तर ब्रेड टोस्ट, अंडी, फळं असा ज्याला आपण ‘इंग्लिश पध्दतीचा’ ब्रेकफास्ट म्हणतो तोच दिसतो. हे कशामुळे होतं तर मुळात अमेरिकन ब्रेकफास्ट हा ‘ब्रिटिश ब्रेकफास्ट’मधूनच उत्पन्न झाला आहे. ब्रिटन सोडून नव्या भूमीवर नशीब अजमावण्यार्या मंडळींना आपल्या पारंपरिक नाश्त्यातील पदार्थच प्रिय असणं स्वाभाविक होतं नाही का? त्यामुळे बेकन किंवा सॉसेज आणि अंडी हा अमेरिकन नाश्त्याचाही मुख्य भाग बनला. जोडीला ‘हॅश ब्राउन्स’ किंवा ‘होम फ्राइज’सारखा बटाट्याचा खास अमेरिकन पदार्थ आला. मात्र इंग्लिश व अमेरिकन ब्रेकफास्टमधला मुख्य फरक म्हणजे अमेरिकन ब्रेकफास्ट्मध्ये ‘सिरिअल्स’, प्रामुख्याने ओटमिल्स हा महत्वाचा घटक असतो. असं म्हणतात की १९७० ते १९९८ या काळात अमेरिकेत ब्रेकफास्ट साठी बनविल्या जाणार्या सिरिअल्सचे प्रकार वाढत्या मागणीमुळे १६० वरुन ३४० असे दुप्पट झाले. एका पाहाणीनुसार २०१२ मध्ये अमेरिकेत सिरिअल्सचे चार हजार पेक्षा अधिक प्रकार उपलब्ध होते. हे सिरिअल्स तुम्ही थंड किंवा गरम दुधात घालून जसे खाऊ शकता तसेच योगर्टसोबतही खाल्ले जातात. काही वेळा अमेरिकन ब्रेकफास्टमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या सँडविचेसचा समावेश असतो. देशविदेशातील अशाच विविध खाद्य परंपरा आणि ट्रॅव्हलचे भन्नाट अनुभव ऐकण्यासाठी वीणा वर्ल्डचा ‘ट्रॅव्हल एक्सप्लोअर सेलिब्रेट लाईफ ’ हा पॉडकास्ट नक्की ऐका .
MICE कॉपोरेट टूर्स - मिटिंग्ज, इन्सेन्टीव्ह, कॉन्फरन्सेस, इव्हेंट्स
आम्हाला रोज येणार्या मेल्समध्ये प्रशंसा, सुचना, कधीतरी तक्रार, मार्गदर्शन अशा सर्व प्रकारच्या गोष्टी असतात. प्रशंसेची पत्र बाजूला जातात कारण त्याचसाठी तर पर्यटक येतात. त्यांची अपेक्षा पूर्ण करणं, टूरचा अपेक्षित आनंद देणं हे वीणा वर्ल्ड टीमचं कर्तव्य आहे आणि कामं त्याप्रमाणे होताहेत. सुचना वा तक्रार मात्र जास्त लक्ष वेधते कारण त्यावर लागलीच काम करून गोष्टी सुस्थितित आणायच्या असतात. आजकाल ह्या मेल्समध्ये वाढ झालीय ती कॉर्पोरेट्स कडून येणार्या प्रशंसापत्रांची. कॉर्पोरेट टूर्स ही वीणा वर्ल्डची सेपरेट डिव्हिजन आहे. जिथे कॉर्पोरेट जगताला म्हणजेच वेगवेगळ्या इंडस्ट्रीजना टूर्सची गरज असते त्यावर काम केले जातं. ह्या टूर्स असतात कॉर्पोरेट्सच्या अवॉर्ड डिस्ट्रीब्यूशनसाठी, टीम बिल्डिंगसाठी, स्ट्रॅटेजी मिटिंग्जसाठी, अॅन्युअल टीममीटसाठी वैगेरे वैगेरेे. प्रत्येक इंडस्ट्रीचं वा कॉर्पोरेट हाऊसचं सेल्स नेटवर्क असतं, ह्यात येतात डीलर्स, सेल्स पार्टनर्स, एजंट्स, रीप्रेझेेंटेटिव्हज इत्यादि. सेल्सचं अमूक एक टार्गेट अचिव्ह झालं की त्यांना इन्सेन्टिव्ह टूर्स दिल्या जातात. त्या इन्सेंटिव्ह टूर्स वीणा वर्ल्ड करतं अनेक कंपन्यांसाठी, कॉर्पोरेट हाऊसेससाठी, इन्स्टिट्युशन्ससाठी आणि विद्यार्थ्यांसाठी म्हणजेच वेगवेगळ्या शाळांसाठी. आणि हे काम खूप छान चाललंय हे ह्या येणार्या प्रशंसापत्रांवरून कळतं. कॉर्पोरेट टूर्स बहुतेकवेळा कमी कालावधीच्या असतात. दोन दिवस ते जास्तीत जास्त सहा सात दिवस. ह्या टूर्ससाठी भारतात उदयपूर, जयपूर, महाबलीपुरम, गोवा, केरळ, हिमाचल, हैदराबाद रामोजी सिटी, काश्मीर ह्या डेस्टिनेशन्सना तसेच कॉर्डेलिया क्रुझसारख्या एक्सपीरिअन्सेस्ना जास्त डिमांड आहे तर भारताबाहेर थायलंड, व्हिएतनाम, दुबई, अबुधाबी, सिंगापूर, ऑस्ट्रेलिया, स्वित्झर्लंड, फ्रान्स, स्पेन, ग्रीस, बाकू, कझाकस्तान, जॉर्जिया, ताश्कंद, श्रीलंका, साऊथ आफ्रिका, प्राग, बुडापेस्ट, ऑस्ट्रिया, जर्मनी, स्कॅन्डिनेव्हिया ही डेस्टीनेशन्स जास्त पॉप्युलर आहेत. २०, २००, ५००, अगदी १००० चा कॉर्पोरेट ग्रुप असला तरी ह्या माईस टूर्स वीणा वर्ल्डतर्फे उत्कृष्टरित्या आयोजित केल्या जातात. ग्रुप साईझप्रमाणे हॉटेल्स, बॉलरूम्स, गाला डिनर्स, इव्हेंट्सची सोय केली जाते. वीणा वर्ल्डचे संदीप जोशी जे वीणा वर्ल्ड पुणे ऑफिस बघताहेत ते माईस टीम सह ही MICE कॉर्पोरेट टूर्स डिव्हिजन सांभाळत आहेत आणि कॉर्पोरेटस खुश आहेत त्यांच्या कामावर तसेच वीणा वर्ल्ड टूर मॅनेजर्स ज्या तर्हेने टूर उत्कृष्टपणे पार पाडीत आहेत त्यावर. कॉर्पोरेट्स पुन्हा पुन्हा येताहेत याचा अर्थ आमची माईस डिव्हिजन चांगलं काम करतेय. आपणापैकी कुणाच्याही ऑर्गनायझेशनसाठी आपणाला अशा टूर्स करायच्या असतील तर ‘वीणा वर्ल्ड माईस टीम‘सोबत जरूर संपर्क साधा.
Veena World MICE- Email: mice@veenaworld.com Pune: 704 599 3391 Mumbai: 887 997 2239/45
पैसावधान
भारतात किंवा परदेशात कुठेही पर्यटनाला निघालो तरी एक प्रश्न आपल्या प्रत्येकाला पडतो तो म्हणजे किती पैसे सोबत न्यायला हवेत. हल्ली एक बरं आहे की टूर असेल तर आपल्याला सर्व पैसे आधीच भरावे लागतात त्यामुळे टूरवर तसा टूरसाठी म्हणून खर्च कमीच असतो किंवा तो नसतोच. कधी वाटलं तर चहा कॉफी किंवा कुठे टॉयलेट वापरासाठी चिल्लर लागली तर तेवढाच. शॉपिंग किती करायचं हे ज्याने त्याने ठरवायचं, अर्थात परदेशी टूरवर असाल तर भारतीय कस्टम्सच्या नियमांप्रमाणे किती शॉपिंग किंवा किती वस्तु आणू शकतो हे माहीत असायला हवं. वीणा वर्ल्ड टूर मॅनेजर्स ही सर्व माहिती आपल्याला टूरच्या आधी आणि टूरवर देतच असतात. टूर्सवर पैसे सोबत लागतात ते एखादी अडचण जर आली तर त्यासाठी. कधी फ्लाइट्स कॅन्सल होतात, कधी कुठे अडकून पडावं लागतं, अशावेळी दोष कुणाचाच नसतो पण आपण परिस्थितीचे बळी असतो. अर्थात आनंदासाठी पर्यटनाला निघताना हा विचार नकोच. पण सेव्ह फॉर द रेनी डेज’ सारखं हे आहे. टूरवर पैसे अजून एका कारणासाठी लागतात ते म्हणजे ऑप्शनल साइटसिइंगसाठी. वीणा वर्ल्ड टूर्समध्ये आम्ही जास्तीत जास्त स्थलदर्शन दाखवतो. तिथे जाऊन तुम्हाला पैसे भरावे लागणं ह्याला आमचा विरोध आहे. पण कधी अॅडव्हेंचर टूरिझम सारखं काही साहसी मंडळींना करावंसं वाटलं आणि ते सर्वांसाठी टूरमध्ये समाविष्ट करता येत नसेल किंवा त्याची किंमत खूपच जास्त असेल तर. उदा. अंडर सी वॉक, हॉट एअर बलुनिंग, पॅरा ग्लायडिंग, इ. तरंच फक्त तुम्हाला त्यासाठी पैसे सोबत घ्यावे लागतात. कस्टमाइज्ड हॉलिडेवर तुम्ही असाल आणि व्हर्च्युअली आम्ही 24x7 तुमच्या दिमतीला असलो तरी एखाद्या ठिकाणी कुठे काय आवडलं, काही एक्स्ट्रॉ साइटसिइंग करावसं वाटलं तर जनरली असा खर्च वैयक्तिकरित्या पर्यटन करणार्या पर्यटकांना करायला आवडतो. त्यासाठी त्यांनी जास्त पैसे सोबत ठेवावे. सर्वसाधारणपणे सोबत असावेत म्हणून टूरला परदेशी जात असाल तर प्रत्येकी प्रति दिनी पन्नास से शंभर डॉलर किंवा युरो ह्या कॅल्क्युलेशनप्रमाणे पैसे घ्यावेत डेस्टिनेशननुसार. भारतात पर्यटन करीत असाल तर किमान एक हजार रूपये प्रतिदिनी ह्या अंदाजाने पैसे घ्यावेत. काही खास शॉपिंग करायचं असेल तर ते पैसे वेगळे घ्यावेत. टूर वा कस्टमाइज्ड हॉलिडेसाठी पैसे नेताना ते थोडी कॅश व बाकी क्रेडिट वा डेबिट कार्डच्या स्वरूपात घ्यावेत. फॅमिलीसह ट्रॅव्हल करीत असाल तर पैसे सर्वांकडे विभागून ठेवावेत. क्रेडिट कार्ड वा डेबिट कार्डचा स्कॅन्ड फोटो वा कॉपी आपल्या मोबाइलवर व आपल्या कम्पॅनियनकडे वा घरी असावी. जगात अनेक ठिकाणी चोरांनी त्यांच्या उद्यागात पीएचडी मिळविलीय. खिशातली पाकीटं सराइतपणे लंपास केली जातात. आपण काळजी घेतोच. आमचे टूर मॅनेजर्स त्यासंबधी सतत सांगत असतातच पण तरीही कधीतरी हे घडतंच. आणखी एक गोष्ट, क्रेडिट वा डेबिट कार्ड शक्यतोवर पीन नंबरवाली घ्या. कॉन्टॅक्टलेस कार्डस् प्रवासात टाळावीत म्हणजे डीसेबल करावीत. कार्ड वा पाकीट हरवलं तर किमान आपण कार्ड ब्लॉक करेपर्यंत तरी कुणाला पटकन त्यातले पैसे काढता येऊ नयेत. लेट्स टेक केअर अॅन्ड ट्रॅव्हल सेफ!
Post your Comment
Please let us know your thoughts on this story by leaving a comment.