Veena World is hiring! Click to apply now

IndiaIndia
WorldWorld
Foreign Nationals/NRIs travelling to

India+91 915 200 4511

World+91 887 997 2221

Business hours

10am - 6pm

वन डे... वन स्टेप...

17 mins. read

Published in the Sunday Sakal on 28 July, 2024

गेल्या रविवारी भरपूर पाऊस पडत होता. `स्लो डाऊन‌’, `टेक इट इझी' सांगत होता. सकाळी आकाशवाणी, एफ एम रेडिओवरही `शक्यतो घरातच रहा' हा सल्ला मच्छिमार बांधवांना देण्यात आला होता तो आम्हीही पाळला आणि घरातच राहिलो. ‌‘तळलेलं काही खायचं नाही‌’ ह्या नियमाला बगल देत कांदा भजीचा यथेच्छ आस्वाद घेतला आणि घरी असतानाच्या ‌‘साफ सफाई‌’ या कार्यक्रमाला वाहून घेतलं. आजचं मिशन ठरवलं, कागदपत्र डायऱ्या पुस्तकं ह्यातलं हवं नको बघायचं. हव्या असलेल्या गोष्टी नीट रचून ठेवायच्या आणि नको असलेल्यांची काय वासलात लावायची ती लावायची. गेल्या दहा वर्षातल्या बऱ्याच डायऱ्या-वह्या मिळाल्या, त्या चाळता चाळता अनेक आठवणींना उजाळा मिळाला. प्रत्येक डायरीत अनेक प्लॅन्स होते. त्यातले काही बिझनेस संबंधित होते तर काही पर्सनल. प्रत्येक डायरीचा पंचवीस टक्के भाग ह्या प्लॅनिंगने व्यापला होता. आता कालांतराने त्या प्लॅॅनिंगकडे बघायला मजा येत होती. काही प्लॅन्स प्रत्यक्षात उतरले होते तर काही त्या कागदावरून पुढे गेलेच नव्हते. ज्या प्लॅन्सचा बऱ्यापैकी बोजवारा उडला होता ते होते पर्सनल. नेमकं किती वाजता उठायचं? उठल्यावर वाचन करायचं की मनन चिंतन की योग? मॉर्निंग वॉकला कधी जायचं, किती वाजता आणि किती वेळ चालायचं? स्विमिंग आठवड्यातनं दोनदा की तीनदा आणि कोणकोणत्या वेळी? मसल स्ट्रेंग्थ वाढवणं हे तर मस्ट त्यामुळे जीम दोन दिवस हवंच, पण त्यासाठी वेळ सकाळची की संध्याकाळची? आठवड्यातनं एक दिवस मसाज स्पा ची गरज असतेच तो दिवस कोणता? सकाळी ज्युस प्यावा की काढा की गरम पाणी लिंबू? कार्बोहायड्रेट्स प्रोटिन्स आणि फॅट्स मध्ये रेंगाळलेली अनेक पानं त्या डायऱ्यांमध्ये होती. ह्या डायऱ्या किंवा वह्या गेल्या दहा अकरा वर्षातल्या, त्या सांगत होत्या काय बरोबर आणि काय चूक. आज सगळं जग सस्टेनेबिलीटीचा उहापोह करतेय किंवा अनेक ठिकाणी त्याचा 'शो ऑफ‌’ दिसतोय. त्या सस्टेनेबिलिटीसाठी लागणारी कन्सिस्टन्सी आणि कंटिन्युइटी माझ्या ह्या प्लॅनिंगमध्ये दिसली तरी वास्तवात त्या प्लॅनिंगबरहुकुम गोष्टी घडल्या नाहीत. मला सातत्य नाही राखता आलं हे मान्य करायला पाहिजे. आपलं अपयश स्विकारायला पाहिजे नाही का, त्याशिवाय यश काय किंवा यशासाठी कोणता मार्ग चोखाळायचा ते कसं कळणार. म्हणजे आज ह्या डायऱ्यांची पान उलटताना जरी हा सगळा मामला समोर आला असला तरी गोष्टी आपण ठरवतो तशा होत नाहीत हे बऱ्यापैकी आधी लक्षात आलं होतं. त्यात कोविडने जगाला ग्रासलं आणि आयुष्याच्या क्षणभंगूरतेची जाणीव झाली. खूप दूरचं खूप मोठ प्लॅनिंग करू नका असा सल्लाच जणू तो कोविड आपल्याला देऊन गेला. तंत्रज्ञानात होणारे बदल तर अनेक गोष्टींच्या अस्तित्वालाच शह देताहेत. अमेझानच्या जेफ बेसोजला एका मुलाखतीत विचारलं, पुढच्या दहा वर्षाचं काय प्लॅनिंग आहे तुमचं? तर म्हणाला, ‌‘टेक्नॉलॉजी एवढी बदलतेय की मी एवढं लाँगटर्म प्लॅनिंग नाही करू शकत. जस्ट पुढच्या तीन वर्षांचा विचार करतोय तोही सावधपणे.‌’ ह्या अवाढव्य कंपन्यासुद्धा जर पुढचं प्लॅनिंग करायला डळमळत असतील तर मग आपल्याबाबतीत अनेक गोष्टी प्लॅनिंगप्रमाणे घडल्या नसतील तर इट्‌‍स ओके म्हणत मी स्वतःची समजून काढली, जरी मनातून मला ते ओके वाटत नसलं तरी. कारण माझ्या सातत्य न राखण्याच्या धरसोड वृत्तीमुळे माझी अनेक प्लॅनिंग्ज फेल गेली होती.

मागे कधीतरी एकदा स्वामी नारायण संप्रदायाच्या प्रमुखस्वामींच्या शिष्यगणातील ग्यानवत्सल स्वामींचं पॉडकास्ट ऐकताना त्यांनी सांगितलेला एक विचार भावला तो म्हणजे, ‌‘जादा काही करायची गरज नाही फक्त आज रात्री उद्या काय करायचं ते ठरवा. अगदी एका चतकोर कागदावर लिहा, पण फक्त तेवढ्या एका दिवसाचं-उद्याचं प्लॅनिंग करा. आणि त्यानुसार प्रथम किमान एकवीस दिवस आणि कमाल नव्वद दिवस, तीन महिने सातत्याने ती गोष्ट करा. आयुष्य बदलून जाईल.‌‘ वर्षाच्या सुरुवातीला केलेलं, एक जानेवारीवालं वर्षाचं प्लॅनिंग एक महिनाही टिकलं नाही कधी. नकोच त्या मोठमोठ्या बाता. त्यापेक्षा हे बरं आहे. फक्त उद्या काय करायचं ते मला ठरवायचंय आणि ते मात्र मनोभावे पूर्णत्वाला पोहोचवायचं आहे. हे सोप्पं आहे आणि करण्यासारखंही. एक दूरचं ध्येय किंवा लाँगटर्म गोल आपण ठरवलेलाच असतो. त्याच्या दिशेने मार्गक्रमणा चालू असते, पण अधेमध्ये आपला खूप वेळ वाया जातो त्या ध्येयाकडे नेणाऱ्या प्रत्येक दिवसाचं योग्य नियोजन न केल्यामुळे. त्याला आळा घालता आला पाहिजे.

काही वर्षांपूर्वी मेक्सिकोतल्या युकातान पेनिन्सुला मधल्या मायन साम्राज्याची महती सांगणाऱ्या चिचेन इत्झा ला गेलो होतो. भरपूर पायऱ्या चढून वर जायचं होतं. धापा टाकीत घाम गाळत मी पायऱ्या चढत होते आणि मधूनच 'अरे बापरे अजून एवढं चढायचंय, केवढा दूर दिसतोय तो माथा?‌’ ही बडबड चालूच होती. बाजुने चालणाऱ्या सुधीरने म्हटलं, 'वीणा एक गोष्ट कर, तुला माहितीय कुठं पोचायचंय ते. रस्ताही तुझ्यासमोर आहे. आता वर बघू नकोस, त्यानं प्रेशर येतं. प्रत्येक पायरीकडे बघ एक एक पायरी चढत रहा. दमायला होणार नाही. वन स्टेप ॲट अ टाइम‌’. आणि खरंच मी माथ्याकडे बघणं सोडून दिलं, कदम कदम बढाए जा करीत एक एक पायरी चढत राहिले आणि पोहोचले की चिचेन इत्झाच्या माथ्यावर. सुधीरच्या एका सल्ल्याने माझा थकवा कमी झाला होता. नवरेबुवांनाही बरंच काही कळतं ते असं, आमची वचवचच जास्त.

आयुष्यात आपण शिकत राहतो ते असं छोट्या छोट्या प्रसंगांतून, कधी कधी ऐकायला मिळणाऱ्या विचारांतून, इतरांच्या अनुभवातून. आता बघानं ग्यानवत्सल स्वामींचा सल्ला काय किंवा हा चिचेन इत्झाचा अनुभव काय, एकच गोष्ट सांगताहेत, खूप पुढचा विचार करून त्याने दमून जाऊ नका, नामोहरम होऊ नका.‌’

ज्या व्यक्तीने भारतात बिग बझार पॅन्टालून्स सारख्या रीव्हॉल्युशनरी गोष्टी सर्वप्रथम यशस्वी करून दाखविल्या त्या किशोर बियानी नावाच्या एका ग्रेट मार्केटिंग पर्सनॅॅलिटीच्या बऱ्याच मुलाखती पॉडकास्टवर उपलब्ध आहेत. वेळ मिळेल तेव्हा असे अनेक पॉडकास्ट ऐकायचा माझा प्रयत्न असतो, मग ते घरात साफसफाई करताना असो वा प्रवासात. त्यातून मिळणाऱ्या अनेक विचारातल्या एका विचाराचा जरी आपल्याला उपयोग झाला तरी इट्स वर्थ. बियानींच्या एका मुलाखतीत पॉडकास्टर राज शमानीने त्यांना प्रश्न केला,`आप क्या सलाह देना चाहोगे यंग जनरेशन को?‌’ ह्यांचं उत्तर, ‌‘बहुत बड़ा सोचने की जरूरत नहीं।' पॉडकास्टर विचारतो, 'आप ये बोल रहे हो?' ते म्हणाले, `खुदके अनुभव से बोल रहा हूँ', अंगावर शहारा आला त्यांचं ते प्रामाणिकपणे केलेलं, अनुभवाने आलेलं विधान ऐकून. यशाच्या शिखरावर पोहोचलेल्या एका रीव्हॉल्युशनरी आणि मोठ्या अपयशातही न खचता पुन्हा आयुष्याची गणितं सोडविणाऱ्या ह्या सेल्फ मेड व्यक्तीची अनेक संभाषणं यू ट्यूबवर उपलब्ध आहेत. जरूर ऐकावी. फ्रॉम झिरो टू हिरो टू झिरो टू हिरो... अनुभवांचा आणि त्यातून शिकण्याचा तो खजिनाच जणू.

दोन वर्षांपुर्वी अबु धाबीला गेले होते. तेथील त्या अतिविशाल  गॅलरीया मॉलमध्ये आम्ही टाइमपास करीत होतो. मासिमो दुतीच्या विंडो डिस्प्लेमध्ये एका मॅनेकनला पांढरा टी शर्ट घातला होता. सुधीरला म्हटलं, `काहीही झालं तरी हा टी शर्ट मला घ्यायचाच आहे. थोडासा महाग असेल पण माझे लाड मीच का करू नये‌’. `एवढं काय आहे त्यात?‌’ नवरेबुवांचा स्वाभाविक प्रश्न. 'अरे त्यावर काय लिहलंय बघ. माझी सध्याची जीवनशैली आहे ती. आय ॲम फॉलोइंग इट सक्सेसफुली‌’. 'अग मुंबईला जाऊन एक साधा टी शर्ट घे आणि त्यावर पेंट करून टाक हा मेसेज. वन टेंथमध्ये काम होऊन जाईल‌‘. ‌‘नो नो, हे मी पहिल्यांदा इथे पाहिलंय आणि मला ते ओरिजिनल स्वरूपातच पाहिजे. सम थिंग्ज आर प्राइसलेस'. `जर एवढे तुझे विचार पक्के असतील तर विचारतेसच कशाला? पैसे तुझे, इच्छा तुझी, विचार तुझे, कर जे काही करायचं तेे'. एकंदरीतच कोणत्याही संभाषणाला (खास करून नवरेबुवांच्या) आपल्याला हव्या त्या दिशेला वळवविण्याची आम्हा महिलांची अभिजात हातोटी असल्यामुळे मी त्या शोरूममध्ये घुसले आणि तो टी शर्ट घेऊनच बाहेर पडले. आता तो टी शर्ट म्हणजे एखाद्या सोन्याच्या दागिन्यासारखा माझ्या कपाटात विराजमान झालाय. तो घरी धुवायचा नाही ही सक्त ताकिद आमच्या वर्षा-श्रुतीला. काही दिवसांनी मी त्याला फ्रेममध्ये लटकावून समोर दिसेल अशा ठिकाणी कुठेतरी टांगणार आहे. आणि का करू नये. माझं आयुष्य सुसह्य केलंय त्याने. `इतना तो ग्रटिट्युड बनता ही है।‌’ साधा वाटणाराच मेसेज आहे पण प्रचंड शक्ती आहे त्यात.

प्रत्येक क्षणाला सुवर्णमय करण्याची ताकद देणाऱ्या, त्या टी शर्टवरचा विचार आहे, `वन डे ॲट अ टाइम!‌’


अरेच्चा! हे मला माहितच नव्हतं...

Know the Unknown

आफ्रिका खंडाच्या दक्षिण टोकावरचा ‌‘साउथ आफ्रिका‌’ हा देश बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट म्हणून ओळखला जातो. या देशातल्या ‌‘वेस्टर्न केप‌’ या अगदी दक्षिणेकडच्या प्रांतात ‌‘टेबल माउंटन‌’ हे नैसर्गिक आश्चर्य जसं पाहायला मिळतं, त्याचप्रमाणे या भागातल्या ‌‘आउट्‌‍शुर्न‌’ शहराजवळ ‌‘कँगो केव्हज‌’ हे आणखी एक निसर्गशिल्प पाहायला मिळतं. जमिनीखाली शेकडो फूटांच्या खोलीवर असलेल्या या गुंफा आफ्रिका खंडाचं सांस्कृतिक आणि नैसर्गिक संचित आहे. सुमारे वीस दशलक्ष वर्षांपूर्वी हे जमिनीखालचं गुहांचं जाळं निर्माण झालं. या गुहांमधले स्टॅलॅगमाइट्‌‍स आणि स्टॅलॅगटाइट्‌‍स पाहताना निसर्गाच्या अद्भुत किमयेपुढे आपण नतमस्तक होतो.  लाखो वर्षांपूर्वी भूगर्भात तयार झालेल्या या गुहांचा शोध आधुनिक काळात 1780 साली जेकब्स वान झायल या स्थानिक शेतकऱ्याला लागला. तो पहिल्यांदा जमिनीखालच्या ज्या दालनात उतरला ते एखाद्या फुटबॉलच्या मैदाना इतकं मोठं होतं, त्या दालनाला त्याचंच नाव देण्यात आलं आहे. या गुहांमधलं दुसरं दालन 1792 साली सापडलं. त्यानंतर 1972 मध्ये झालेल्या पाहणीत या गुहांचा दुसरा हिस्सा जगासमोर आला. 1975 मध्ये या गुहांमधील पाण्याने भरलेला भाग कोरडा करून त्याची पाहाणी केली गेली आणि गुहांचा तिसरा हिस्सा समोर आला. साउथ आफ्रिकेतील पर्यटन आकर्षणांमध्ये विशेष लोकप्रिय असलेल्या या गुहांमध्ये पर्यटकांसाठी हेरिटेज टूर आणि ॲडव्हेंचर टूर अशा दोन प्रकारच्या टूर्स आयोजित केल्या जातात. या गुहांमध्ये नैसर्गिकरित्या तयार झालेल्या रचनांमधील ‌‘क्लिओपॅट्राज निडल‌’ ही रचना थक्क करणारी आहे. सुमारे दीड लाख वर्षांपूर्वी हा दहा मीटर उंचीचा निमुळता स्तंभ तयार झाला आहे. त्याचप्रमाणे इथल्या ऑर्गन पाईप, बॅलेरिना, फ्रोझन वॉटरफॉल या रचनाही लक्ष वेधून घेतात. साउथ आफ्रिकेतील सात आश्चर्यांपैकी एक म्हणून कँगो केव्हज्‌‍ प्रसिध्द आहेत. साउथ आफ्रिकेतील सर्वात पुरातन पर्यटन आकर्षण म्हणून या गुहा ओळखल्या जातात. 1891 साली या गुहांमधील स्थलदर्शनाला सुरुवात झाली. त्याचप्रमाणे खास कायदा करून संरक्षित करण्यात आलेला पहिला नैसर्गिक परिसर म्हणूनही या गुहांचे महत्व आहे. सुरुवातीच्या काळात पर्यटकांकडून या गुहांना हानी पोहोचू लागली, मग 1820 साली पहिला केव्ह रेग्युलेशन ॲक्ट संमत करण्यात आला आणि या गुहांना कायदेशीर संरक्षण लाभले. या गुहांसाठी अधिकृत गाइड म्हणून काम करणाऱ्या जॉनी वास्सेनियर याने 1989 मध्ये गुहेत सतत एकोणतीस तास चालून जमिनीखाली नऊशे फुटांवर पंचवीस किलोमीटरर्स अंतर कापलं. साउथ आफ्रिकेतील हे निसर्गनवल बघण्यासाठी वीणा वर्ल्ड बरोबर साउथ आफ्रिकेची टूर अवश्य करावी.


वीणा वर्ल्ड ट्रॅव्हल मिशन

Veena World Travel Mission

पर्यटनातून संस्कृती संगम

पर्यटन हा आमच्यासाठी आनंदाचा भाग तर आहेच पण आपण जेव्हा आपल्या देशाच्या सीमा ओलांडून नवीन देशात जातो तेव्हा त्या देशातली परंपरा, इतिहास, जनजीवन, खाद्यपरंपरा, यांची माहिती आपल्याला होते. तसंच  त्या देशातल्या लोकांनाही त्यांच्या देशात येणाऱ्या पर्यटकांबद्दल हेच कुतूहल असतं. म्हणूनच आम्ही दोघं पर्यटनाला संस्कृती संगम करण्याचं उत्तम साधन मानतो. जेव्हा जेव्हा आम्ही परदेशात जातो तेव्हा सौ. शारदा खास मराठमोळा पेहराव-नऊवारी साडी, नथ असा करते आणि परदेशातल्या लोकांना महाराष्ट्राच्या संस्कृतीची झलक दाखवते. त्याचवेळी मी म्हणजे मारुती बेलदरे मात्र त्या देशातल्या स्थानिकांचा पेहराव करतो. आमच्या दुबई सहलीमध्ये मी तिथला पारंपरिक ‌‘कंदुरा‌’ घालूनच सगळीकडे फिरलो होतो. आम्ही पुण्याजवळच्या खेडमध्ये राहतो. जगप्रवासाची आम्हाला अतिशय आवड आहे, त्यामुळेच आम्ही आत्तापर्यंत एकूण 76 देशांना भेट दिली आहे. देशांचं शतक लवकरात लवकर पूर्ण करायचं हे आम्हा दोघांचं स्वप्न आहे. त्यासाठी आम्ही गेली काही वर्ष वीणा वर्ल्डच्या पुणे कार्यालयाची मदत घेत आहोत. तिथे आम्हाला प्रत्यक्ष जायची वेळच आलेली नाही. कार्यालयातल्या रेश्मा बुटालाशी संपर्क करून आम्ही नेहमी आमचं बुकिंग करतो. आमचं 100 देशांचं लक्ष्य तिलाही माहित आहे, त्यामुळे नवीन देशाची टूर लागली की ती लगेच आम्हाला कळवते. आमच्या या वर्षीच्या म्हणजे 2024 च्या सहली (नोव्हेंबर मध्ये कतार, डिसेंबरमध्ये टांझानिया-झांजिबार) तर बूक झाल्या आहेतच पण आता आम्ही जानेवारीतल्या फिलिपाइन्स टूरच बुकिंग करून 2025 मधल्या पर्यटनाचे प्लॅनिंगही सुरू केलं आहे. आम्हाला मराठी शिवाय दुसरी भाषा येत नाही आणि म्हणूनच आम्हाला वीणा वर्ल्डसोबत जायला आवडतं, कारण त्यांचे टूर मॅनेजर्स सगळ्या सूचना, माहिती मराठीतही देतात. अकाली काळाच्या पडद्याआड गेलेल्या विवेक कोचरेकरची आम्हाला नेहमी उणीव भासते, कारण ओळख झाल्यानंतर तो आमचा जणू ट्रॅव्हल कन्सल्टंट बनला होता. आजपर्यंत पाहिलेल्या देशांमधील ‌‘न्यूझिलंड‌’ आम्हाला सर्वात जास्त आवडला. स्वित्झर्लंडमधला निसर्गही असाच डोळ्यात न मावणारा आहे. सहलीला गेल्यानंतर त्या देशाची आठवण म्हणून आम्ही त्या देशातल्या चलनामधली एक नोट न विसरता घेऊन येतो.

श्री.मारुती बेलदरे आणि सौ.शारदा बेलदरे, पुणे


काय बाई खाऊ कसं गं खाऊ!

इतिहासकाळात जगभरात युरोपमधील अनेक देशांच्या कॉलनीज्‌‍ होत्या, ज्या कालांतराने स्वतंत्र झाल्या. आणि त्यांचा परिणाम असा झाला की युरोपमधले पदार्थ परपंरा, रितीरिवाज जगात वेगवेगळ्या ठिकाणी स्थिरावले. त्यामुळेच इंडोनेशिया आणि ब्राझिल या जगाच्या दोन टोकांना असलेल्या देशांमध्ये पोर्तुगालमध्ये जन्माला आलेला ‌‘पास्तेल दे नाता‌’ हा पदार्थ पहायला आणि खायला मिळतो. पोर्तुगालमधील जेरोनिमोस मॉनेस्ट्री ही या ‌‘एग कस्टर्ड टार्ट पेस्ट्री‌’चं उगमस्थान मानली जाते. त्यामागे एक मजेदार कारण आहे. जुन्या काळात मॉनेस्ट्रीज, कॉन्व्हेंटमधले फादर, नन्स हे आपल्या कपड्यांना स्टार्च करण्यासाठी अंड्यातील पांढरा भाग मोठ्या प्रमाणावर वापरत असत. मग उरलेल्या अंड्याचे नवनवे पदार्थ बनवले जात, त्यामध्ये या पेस्ट्रीचा जन्म झाला. पुढे ही मॉनेस्ट्री बंद झाल्यानंतर या पेस्ट्रीची सिक्रेट रेसिपी ज्याच्याकडे आली, त्याने ‌‘फॅब्रिका दे पेस्ट्रीज‌’ नावाचं दुकान सुरू केलं आणि `पास्तेल दे नाता‌’ची चव सगळीकडे पसरली. हे दुकान आजही आहे आणि इथे दिवसाला वीस हजार पेस्ट्रीज विकल्या जातात. पोर्तुगाल देशातील सर्वात लोकप्रिय नॅशनल डिशेसमध्ये या पेस्ट्रीचा समावेश केला जातो. आजही पोर्तुगालमधल्या याच बेकरीत मूळ, ऑथेन्टिक पास्तेल दे नाता मिळतो, बाकी जगभरात मिळतात त्या या पेस्ट्रीच्या विविध आवृत्या मानल्या जातात. हा कस्टर्ड टार्टचा प्रकार असल्याने यात एग कस्टर्ड भरलेले असते. अतिशय मऊसूत क्रीमने भरलेली ही क्रिस्पी गोल्डन पेस्ट्री तिच्यावर शिंपडलेल्या दालचिनी पावडरमुळे एकदम स्वादिष्ट लागते. पोर्तुगिज पध्दतीप्रमाणे या पेस्ट्रीबरोबर बिका म्हणजे स्ट्रॉन्ग एस्प्रेसो कॉफी घेतली जाते. हाँगकाँग, तैवान, मकाऊ, थायलंडप्रमाणेच भारतातल्या गोव्यातही ही पेस्ट्री मिळते. देश-विदेशातील अशाच विविध खाद्यपरंपरा आणि ट्रॅव्हलचे भन्नाट अनुभव ऐकण्यासाठी वीणा वर्ल्डचा ‌‘ट्रॅव्हल एक्सप्लोअर सेलिब्रेट लाईफ ‌’हा पॉडकास्ट नक्की ऐका.


स्कॉटलंड कॅसल स्टे

वीणा वर्ल्ड कस्टमाईज्ड हॉलिडेज्‌‍सोबत

युनायटेड किंगडम ऑफ ग्रेट ब्रिटन मधील आकाराने दुसऱ्या क्रमांकाचा देश म्हणजे ‌‘स्कॉटलंड‌. या देशाचं नाव घेतल्यावर पारंपरिक पोशाखात ‌‘बॅगपायपर‌’ वाजवणारा स्कॉट्‌‍समन डोळ्यांसमोर उभा राहतो. रोमन काळापासूनचा इतिहास लाभलेल्या स्कॉटलंडमधील ऐतिहासिक कॅसल्स जगप्रसिध्द आहेत.  इतिहासकाळातील राजेशाही आरामदायी जीवनशैलीची झलक अनुभवण्यासाठी स्कॉटलंडच्या हॉलिडेत अशा एखाद्या कॅसलमध्ये निवास करायलाच हवा. स्कॉटलंडमधील काही ऐतिहासिक कॅसल्सचे रुपांतर आता फाईव्ह स्टार लक्झरी हॉटेल्समध्ये करण्यात आलं आहे, काही कॅसल्समध्ये बेड अँड ब्रेकफास्ट पध्दतीने रूम्स मिळू शकतात, तर काही कॅसल्सजवळ कॅम्पसाइट उभारल्या आहेत. जुन्या काळातली जीवनशैली अनुभवण्यासाठी तुम्ही घोडसवारी, आर्चरी, फाल्कनरी डिस्प्ले याचा आनंद कॅसल स्टे मध्ये घेऊ शकता. त्याचप्रमाणे व्हिस्की टेस्टिंग, केली डान्सिंग, बॅग पाइप म्युझिक अशा इनडोअर ॲक्टिव्हिटिज्‌‍ची मजाही घेता येते. कॅसल स्टे मधील इंटरेस्टिंग भाग म्हणजे हॅगीज, नीप्स, टॅटिज अशा अस्सल स्कॉटिश पदार्थांचा आस्वाद, जो तुमच्या हॉलिडेची चव नक्की वाढवतो.

स्कॉटलंडच्या हॉलिडेत निवास केलाच पाहिजे अशी जागा म्हणजे 19 व्या शतकातली ‌‘इन्व्हलॉकी कॅसल’. स्कॉटलंडच्या हायलँड्‌‍स भागातील फोर्ट विल्यम जवळच्या या कॅसलमध्ये रहायचे म्हणजे जणू इथे घडलेला गौरवशाली इतिहास पुन्हा अनुभवायचा. 1873 मध्ये महाराणी व्हिक्टोरियाने जेव्हा इन्व्हलॉकी कॅसलला भेट दिली तेव्हा ती या जागेच्या प्रेमातच पडली होती. नंतरच्या काळात लिआम निसॉन, चार्ली चॅप्लिन, शॉन कॉनेरी, जे. के. रोलिंग असे मान्यवर या सतरा रूम्सच्या भव्य कॅसलमध्ये राहून गेले.

स्कॉटलंडमधल्या सर्वात जुन्या घरात रहायची संधीही तुम्हाला मिळते. 1491 पासून ज्या घरात स्टुअर्ट फॅमिली राहते आहे त्या ‌‘ट्रकवेअर हाउस‌’ मध्ये राहण्याचा एक्सायटिंग अनुभव तुमच्या हॉलिडेला संस्मरणीय करतो. इतिहासातील प्रसिध्द `मेरी क्विन ऑफ स्कॉट‌’ पासून सत्तावीस राजे आणि राण्यांनी या घरात वेळोवेळी वास्तव्य केलं आहे. त्यामुळे खऱ्याखुऱ्या राज निवासात राहिल्याचं समाधान हवं असेल तर ट्रकवेअर हाउसमध्ये अवश्य रहा. रंजक इतिहासाप्रमाणेच स्कॉटलंडला सुंदर निसर्गही लाभलेला आहे. समुद्राकाठच्या ‌‘मिनगरी कॅसल‌’मध्ये राहून साउंड ऑफ म्युलच्या वन्यजीवांचे-पक्षी, ऑटर्स, रेड  डिअर्सचे दर्शन तुम्ही घेऊ शकता.

स्कॉटिश कॅसल्स मधील भुतांच्या कथा प्रसिध्दच आहेत. असा हॉन्टेड अनुभव घेण्यासाठी एडिनबर्गमधील ‌‘डलहौसी कॅसल‌’ मध्ये रहायला हवं. तिथल्या रेस्टॉरंट, स्पा, आणि फाल्कनरी सेंटरमुळे इथला निवास खरोखरच अनुभवण्या सारखा असतो. ब्रिटीश रॉयल फॅमिलीचे स्कॉटीश होम म्हणूनच ओळखल्या जाणाऱ्या ‌‘बालमोरल कॅसल‌’ चा मुख्य भाग जरी लोकांना रहाण्यासाठी खुला नसला तरी या इस्टेटमधली अनेक कॉटेजेस भाड्याने घेऊन तुम्ही राहू शकता. तिथे रहाताना कॅसलची गाइडेड टूर करून रॉयल परिवारातील सदस्यांची जीवनशैली, कॅसलचा इतिहास याची रोचक माहिती घेता येते. मग कॅसलमध्ये निवास करून स्कॉटलंडच्या रॉयल परंपरेचा अनुभव घेण्यासाठी वीणा वर्ल्डच्या कस्टमाईज्ड हॉलिडे टीमशी नक्की संपर्क साधा आणि रॉयल हॉलिडेची मजा लुटा.


काय बघावं? कसं बघावं?

आपला भारत काय किंवा आपलं जग काय... दोघांमध्ये प्रचंड साम्य. पर्यटनाचा विचार करता आपला भारत एकदम संतुलित चित्र आपल्यापुढे ठेवतो. सीझन कोणताही असो, भारताचं कोणतं नं कोणतं राज्य आपल्याला वेलकम करीतच असतं. बघानं, इथे धुवाँधार पाऊस पडतोय, पण त्याचवेळी आपलं लेह लडाख खुल्या दिलाने पर्यटकांना वेलकम करतंय. ह्याचवेळी जगात युरोप, युएसए, आइसलँड, ग्रीनलँड, स्कॅन्डिनेव्हियामध्ये पर्यटक धम्माल करताहेत. थोड्याच दिवसात सुरू होईल दक्षिण गोलार्धाचा पीक सीझन. ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, मेक्सिको, साउथ अमेरिका, सेंट्रल अमेरिका, लॅटिन अमेरिका, कॅरेबीयन आयलंड्स आणि अंटार्क्टिकाचाही. ऑस्ट्रेलिया न्यूझीलंड सोडलं तर ह्या साउथ अमेरिकेसोबत नॉर्थ अमेरिका म्हणजे युएसए, कॅनडा, अलास्का, हवाई, मेक्सिको या सगळ्या भागाला ‌‘द अमेरिकाज्‌‍' अस म्हटलं जातं. आपण इतिहास भूगोलात वाचलेले हे देश. त्यातल्या नॉर्थ अमेरिकेत जाण्याकडे आपल्या भारतीयांची ओढ. साउथ अमेरिका तसा दूरचा खंड, शेकडो भाषांकित लोकं, वेगवेगळ्या कारणास्तव महागडा खंड त्यामुळे आपलं पर्यटन खूपच सीमित राहिलं ह्या दक्षिण गोलार्धातल्या अमेरिकेकडे. पण गेल्या दोन तीन वर्षात ह्या देशांची मागणी वाढायला लागलीय आणि आम्हीही ह्या टूर्स रीज्युविनेट केल्या आहेत. इतकं काही आहे ह्या देशांमध्ये की आपण खेचले जातो एक पर्यटक म्हणून. पॅसिफिक ओशन, अटलांटिक ओशन आणि कॅरेबीयन आयलंडस्‌‍नी वेढलेले हे देश, पश्चिमेला लाँगेस्ट माऊंटन रेंज ॲन्डीज तर पूर्वला लाँगेस्ट रिव्हर, लार्जेस्ट रेनफॉरेस्ट ॲमेझॉन. इथेच आहे ड्रायेस्ट आटाकामा डेझर्ट, वेटेस्ट प्लेस लोपेझ दे मिके. इथेच आपण बघतो हायेस्ट लेक टिटिकाका आणि हायेस्ट कॅपिटल ला पाझ. जगाच्या दक्षिण टोकावरचं फक्त पन्नास एक लोकवस्तीचं शेवटचं गाव पुएर्तो तोरो सुद्धा चिले ह्या साऊथ अमेरिकन देशातच आहे. पर्यटकांच्या टॉप लिस्टवर असलेलं माचू पिचु, इग्वासु फॉल्स, ख्राइस्ट द रीडिमर, पेरितो मोरेनो ग्लेशियर, पातागोनिया, एल कालाफाते, पनामा कनाल.. सारख्या अनेक गोष्टी ह्या अवाढव्य खंडात सामावलेल्या आहेत. खाली टूर्स दिलेल्या आहेतच आणि ऑगस्टमध्ये यात आणखी टूर्सची आम्ही भर घालतोय. सो चलो बॅग भरो निकल पड़ो, यावेळी साऊथ अमेरिकेला.

July 27, 2024

Author

Veena Patil
Veena Patil

‘Exchange a coin and you make no difference but exchange a thought and you can change the world.’ Hi! I’m Veena Patil... Fortunate enough to have answered my calling some 40+ years ago and content enough to be in this business of delivering happiness almost all my life. Tourism indeed moulds you into a minimalist... Memories are probably our only possession. And memories are all about sharing experiences, ideas and thoughts. Life is simple, but it becomes easy when we share. Places and people are two things that interest me the most. While places have taken care of themselves, here are my articles through which I can share some interesting stories I live and love on a daily basis with all you wonderful people out there. I hope you enjoy the journey... Let’s go, celebrate life!

More Blogs by Veena Patil

Post your Comment

Please let us know your thoughts on this story by leaving a comment.

Looking for something?

Embark on an incredible journey with Veena World as we discover and share our extraordinary experiences.

Balloon
Arrow
Arrow

Request Call Back

Tell us a little about yourself and we will get back to you

+91

Our Offices

Coming Soon

Located across the country, ready to assist in planning & booking your perfect vacation.

Locate nearest Veena World

Listen to our Travel Stories

Veena World tour reviews

What are you waiting for? Chalo Bag Bharo Nikal Pado!

Scroll to Top