Published in the Saturday Lokasatta on 16 March, 2024
कुठेही प्रवासाला गेलो की पहिल्या दोन गोष्टींची खात्री करून घ्यायची सवय लागलीय आणि ती म्हणजे व्हॅन मध्ये टेबल आणि हॉटेलच्या रूममध्ये वर्क डेस्क. आमचे बहुतेक प्रवास हे पंधरा पंधरा दिवसांचे. एकदा गेलं की तो पट्टा पूर्ण बघून घ्यायचा. म्हणजे बघानं पोलंडच्या वॉर्सापासून क्रोएशियातल्या डुब्रॉन्विकपर्यंत, न्यूझीलंडमधल्या नॉर्थ आयलंडपासून साऊथ आयलंडमधल्या इनवरकारगीलपर्यंत, पोर्तुगाल स्पेनच्या पोर्तो डुरो व्हॅली पासून साऊथच्या आलगार्व्ह सेविया मलागा बर्सिलोना माँटसेराटपर्यंत, ग्रीसच्या सिरोस मिकॉनॉस सेन्टोरिनी, र्होड्स, क्रीट ह्या आयलंडसपासून सोलोनिकी अथेन्सपर्यंत, व्हिएतनामच्या नॉर्थमधील हनोई हॅलाँग बे पासून साऊथ मधल्या सायगाव हो चि मिन्न पर्यंत... इतका प्रवास सतत सुरू असतो की तो असा शंभर टक्के हॉलिडे कधी होतच नाही. ऑफिसची कामं करावीच लागतात, यू जस्ट कान्ट एस्केप. त्यामुळेच प्रत्येक वेळी व्हॅनमध्ये एक छोटं इनबिल्ट फोल्डिंग टेबल ज्याचा वर्क डेस्कसारखा वापर करता येईल ते असायला हवं ही गरज होऊन गेली आहे. तसंच व्हॅनमधली सीट रीव्हर्सिबल असणंही मी महत्वाचं मानते. सुधीरचं आणि माझं जेव्हा बरं चाललं असेल तेव्हा सीट्स समोरासमोर करून त्या व्हॅनची जणू ऑफिसमधली केबीन बनवायची आणि ज्या दिवशी दोघांना एकमेकांचा कंटाळा येतो तेव्हा सीट्स सरळ करून तुझा तू माझी मी अशी प्रायव्हसी जपायची. हो, कितीही जिवश्च कंठश्च असलो तरी आपण सदासर्वकाळ एकमेकांना चिकटून नाही नं राहू शकत. इट्स नॅचरल. असो. तर व्हॅन अशीच गोरी गोमटी सुबक ठेंगणी असायला हवी ह्यावर आमचा भर. दुसरी गोष्ट म्हणजे जिथे कुठे राहू त्या रूम मध्ये एक्झिक्युटिव्ह डेस्क असायला हवं, शक्यतोवर खिडकीच्या समोर असेल तर सोन्याहून पिवळं. रूममध्ये एन्ट्री केल्यावर पहिली गोष्ट जर कोणती मी करीत असेन तर आधी माझं वर्क डेस्क नीट लावून घेणे. चार्जर्स, आयपॅड, फोन एखाद वाचीत असेललं पुस्तक, आर्टिकल लिहायचे फूलस्केप्स, पेन स्टँड हे सगळं जागच्या जागी लावलं की जो काही सुकून मिळतो नं. इन डेप्थ डेस्टिनेशन एक्स्प्लोरेशन आणि ऑफिस वर्क ही दोन्ही कामं म्हणजे डबल ड्युटी करीत असल्याने वीणा वर्ल्डचं अकाऊंट्स डिपार्टमेंटही आमच्या ह्या नखर्यांवर कधी ऑब्जेक्शन घेत नाही.
मागच्या आठवड्यात आम्ही होतो सॅनफ्रांन्सिस्कोला आमच्या धाकट्या मुलाला राजला भेटायला. दहा दिवसांसाठी गेलो होतो, मी सुनिला आणि सुधीर. निघायच्या दोन दिवस आधी सुनिला म्हणाली, मॅडम यावेळी आपली व्हॅन विसरून जा बरं, राज आपल्याला त्याच्या गाडीतून फिरवणार आहे. डेस्क वैगेरे मिळणार नाही सो बी रेडी.’ तसंही हे दहा दिवस ऑफिसचं काम मध्ये आणायचं नाही, फक्त आठवड्याची आर्टिकल्स काय ती लिहावी लागतील ती हॉटेलरूममध्ये सकाळी सकाळी लिहूया हा विचार मी केलाच होता. हो नाहीतर राज म्हणायचा तुम्ही इथे येऊन कामच करणार होतात तर आलातच कशाला’ ही धोक्याची सूचना ध्यानी घेऊन मी जरा व्यवस्थित आई सारखं वागायचं ठरवलं होतं. ते आठ दहा दिवस आम्ही राजच्या गाडीतून फिरलो. फोक्स वागनची छोटी एकदम बेसिक म्यॅन्युअली ऑपरेटेड कार. ह्या छोट्या गाडीतून एवढा प्रवास केला पण जाणवलं नाही. शेवटच्या दिवशी निघताना हॉटेल लॉबीत आम्ही एअरपोर्ट उबर कारची वाट बघत गप्पा मारत बसलो होतो तेव्हा सुनिला म्हणाली, ‘बघनं इतर वेळी आपण किती पर्टिक्यूलर असतो कार वा व्हॅनच्या बाबतीत पण ह्यावेळी आपण तसा बर्यापैकी प्रवास केला तरीही गाडी छोटी आहे किंवा गाडीत हे नाही ते नाही ह्याचा विचारही मनात डोकावला नाही.’ ‘सुनिला, ह्यावेळी आपला हेतूच वेगळा होता आणि त्यामुळे अॅक्च्युअली नथिंग मॅटर्स.’ मी बोलून गेले आणि डोळे चमकले. ‘अगं हा माझ्या आर्टिकलला टॉपिक मिळला.’
राजची गाडी त्याने गेल्यावर्षी जॉबला लागल्या लागल्या स्वकमाईतून घेतली होती. ‘राज तुझ्या वाढदिवसाला आम्हाला तुला गाडी भेट द्यायचीच, तुझं मास्टर ग्रॅज्यूएशन झालं, जॉब लागला, त्याची भेट म्हणून आम्हाला तुला काहीतरी घ्यायचंच’, पण ही मागणी त्याने धुडकावून लावली. आपण मागून कुणी काही दिलं नाही तर वाईट वाटतं, पण आपण देऊ करून कुणी काही घेतलं नाही तर त्याचं दु:ख होतं, त्याप्रमाणे आमचं झालं. अर्थात एका बाजूला तो इथून गेलेल्या इतर भारतीय मुलांसारखा स्वतःच्या पायावर उभं रहायचा प्रयत्न करतोय ह्याचं समाधानही होतं. त्यामुळे त्याने स्वाभिमानाने स्वकमाईने घेतलेली ही गाडी आमच्या अभिमानाचा विषय होती. आमची भाची मुग्धा ठाकूर तिकडेच जवळ राहते तीच्या हबीला आशिशला घेऊन राज शो रुम मध्ये गेला होता. एवढी साधी गाडी त्याने घेतलेली बघून मुग्धा मला विचारते, ‘अरे वीणा माऊ तू राजला काय पैसे बैसे पाठवतेस की नाही? तो एकदमच शू स्ट्रींग बजेटवर आहे? मुग्धाला म्हटलं, ‘अगं तो आधीच मिनिमलिस्ट, त्याचं म्हणणं, हाऊ डझ इट मॅटर? मला सिटी कम्यूट साठी गाडी हवीय, कुणाला शो ऑफ करायला नाही.’ आता सांग आपल्यालाच तो शिकवतोय. त्यामुळे आम्हीही त्याला काही इन्सिस्ट करीत नाही. लेट हिम बी!’
हाऊ डझ इट मॅटर्स? किंवा, नथिंग मॅटर्स! ह्या एकदम महत्वाच्या गोष्टी मला वाटायला लागल्या आणि मी आयुष्याकडे मागे वळून पाह्यलं. वयाच्या विसाव्या वर्षी वडिलांबरोबर पर्यटनव्यवसायात मी आले. बाविसाव्या वर्षी मी पहिली सहल हिमाचलप्रदेशात केली. त्यानंतर सतत दहा वर्ष मी हिमाचलच्या टूर्स करीत होते टुर मॅनेजर म्हणून. नवीन व्यवसाय, पैशांची चणचण, मुंबईत नव्याने दाखल झालेलो, रहायला स्वतःचं घर नाही अशावेळी पैसे वाचवणं फार महत्वाचं होतं. त्यातलाच एक भाग म्हणून आम्ही टूरवर जी बस असायची त्यात पस्तिस सीटस असायच्या त्या पर्यटकांनी भरायचो. मी आणि माझ्यासोबत आई असायची. आम्ही ड्रायव्हरच्या केबीनमध्ये बसून प्रवास करायचो. असं कंटिन्युअसली दहा वर्ष आम्ही केलं. आज अंगावर शहारा येतो तो प्रवास आठवून कारण ड्रायव्हरच्या केबीनमध्ये सीट वा खूर्ची नसायची, तो एक बेंच असायचा, तेव्हा रात्रीचा बस प्रवासही आम्ही करायचो आणि रात्रभर कधी तू थोडावेळ आडवी हो कधी मी असं करीत प्रवास व्हायचा. महाकष्टदायी होतं ते. कधी जर पूर्ण बस पर्यटकांनी भरली नसेल तर मात्र आमची लक्झरी असायची. आम्हाला बसायला पुढची किंवा पाठची सीट मिळायची. आता ते कितीही यातनादायी किंवा कष्टाचं वाटलं तरी तेव्हा ते अजिबात वाटायचं नाही. उलट त्यात आनंद वाटायचा. रात्रीचा प्रवास करूनही आम्ही दुसर्या दिवशी सकाळी उत्साहाने हसत हसत पर्यटकांना सामोरे जायचो. ह्या मुंबईत स्वतःचं घर घ्यायचं, जी काही छोटी ट्रॅव्हल कंपनी वडिलांनी सुरू केलीय ती नावारूपाला आणण्यात आपलं योगदान द्यायचं हे लक्ष्य इतकं भक्कम होतं की त्यापुढे तो ड्रायव्हर केबीन मधला तासनतास वा रात्रीचा प्रवास नगण्य बनून जायचा. आमच्या लक्ष्य वा आमच्या ध्येयाकडे पोहोचण्यासाठीची ती एक एक पायरी होती. लक्ष लक्ष्याकडे असलं की नथिंग मॅटर्स ते असं.
ह्यावरून आठवण झाली आपल्या स्वातंत्र्यलढ्याची. आपण कृतज्ञ आहोत आणि असायलाच पाहीजे आपल्या पुर्वजांप्रति, खास करून सगळ्या स्वातंत्र्यसैनिकांप्रति, ज्यांच्या बलिदानामुळे आज आपण आपल्या स्वतंत्र्य भारतात मानाने राहू शकतोय. नुस्ता ड्रायव्हर केबीन मधला बसप्रवास तोही स्वत:च्या व्यवसायासाठी केलेला आज मला अरे बापरे किती कष्ट असं म्हणायला लावतो किंवा त्यात थोडा अभिमानी अॅटिट्यूड आल्याचा भास माझा मलाच जाणवतोय. पण ह्या सार्या स्वातंत्र्यसैनिकांची मानसिकता काय असेल? ज्या स्वातंत्र्यासाठी आपण झगडतोय, प्राणांची बाजी लावतोय, ते स्वातंत्र्य मिळाल्यावर त्याचा उपभोग घेण्यासाठी कदाचित आपण जिवंत नसू, हे त्या प्रत्येकाला माहीत होतं तरीही ते कसे काय लढत होते! स्वातंत्र्य मिळवणं, भारताला स्वतंत्र करणं हे एकमेव ध्येय आणि त्याची शक्तीच इतकी अफाट होती की, त्याच्यांसाठी त्यावेळी नथिंग मॅटर्स. अशीच मनस्थिती असणार. तेविसाव्या वर्षी हसतहसत फासावर चढणारे आणि तरूणांमध्ये देशभक्तीची भावना जागवणारे भगतसिंग, इस्ट इंडिया कंपनीच्या विरोधात बंड पुकारणारे नानासाहेब पेशवे, भारतीयांच्या मनात स्वातंत्र्याची तीव्र भावना जागृत करणारे व दिवसाढवळ्या ब्रिटिशांवर गोळ्या झाडून फाशीला सामोरे गेलेले मंगल पांडे, ब्रिटिश कोलोनायझेशनला विरोध करणारे आणि त्यासाठी फाशीवर लटकणारे रामप्रसाद बिस्मिल, क्रांतिकारकांची स्फूर्तिदेवता भारतीय स्वातंत्र्यचळवळीची नायिका आणि स्त्रियांच्या मनात धाडसाची उर्जा निर्माण करणार्या व बलाढ्य ब्रिटिशांशी लढता लढता वीरगती प्राप्त झालेल्या राणी लक्ष्मीबाई, काय असतील ही वा ह्यासारखी अनेक व्यक्तिमत्वं. एका ध्येयाने पछाडलेल्या, ‘एनिथिंग एल्स डझन्ट मॅटर‘ म्हणत त्या ध्येयाचा पिछ्छा पुरविणार्या ह्या व्यक्तिरेखा आपल्या मनाच्या एका कोपर्यात सतत वास करीत असल्या पाहीजेत. एकतर त्यामुळे आपण इतिहासाला विसरणार नाही कारण इतिहासाकडून आपल्याला सतत शिकत राहायला पाहीजे. दुसरं म्हणजे जेव्हा आपल्या आयुष्याची लढाई आपल्याला पेलेनाशी होते तेव्हा ही व्यक्तिमत्व आपल्याला प्रेरणा देऊ शकतात, मनाला उभारी आणू शकतात. स्वातंत्र्यवीर सावरकरांची आठवण अशावेळी तीव्रतेने होते. जेव्हा जेव्हा अंदमानच्या त्या छोट्याशा खोलीला आपण भेट देतो तेव्हा तेव्हा प्रत्येक वेळी ब्रिटिशांचा जाच, त्यांनी केलेला छळ समोर येतो आणि डोळ्यातून अश्रू पाझरायला लागतात. आपण एक दिवसही राहू शकलो नसतो अशा ठिकाणी त्यांनी जन्मठेपेची शिक्षा भोगली पण त्यांच्यातला स्वातंत्र्यसैनिक, समाजकारणी, हिंदुत्व, लेखन, कवित्व, भाषा ह्या सगळ्याला त्यांनी जिवंत ठेवलं. एका ध्येयाचा प्रवास त्या काळ्या पाण्यावरच्या बाकीच्या सर्व प्रकारच्या जाचाला एवढे नगण्य ठरवू शकतो?
आपलं आयुष्य आज बर्यापैकी सुकर झालंय. सुखसुविधांनी आणि तंत्रज्ञानाने आपल्या पायाशी लोळण घेतलीय तरीही आपण कशातच समाधानी नाही. काहीही असलं आणि कितीही असलं तरी त्यात खुस्पटं काढण्यात आपली शक्ती व्यर्थ वाया जातेय. त्याचं कारण मला वाटतं आपल्यासमोरची ध्येय तेवढी भरभक्कम नाहीत. प्रत्येक ध्येय हे मैलाच्या दगडासारखं असावं. एकाची पूर्ती झाली की त्यापेक्षा थोडं कठीण ध्येय पुढे असलं पाहीजे. त्याला साध्य केलं की आणखी कठीण तीसरं... एकदा का ही मार्गक्रमणा सुरू झाली की बाकीच्या आजूबाजूच्या गोष्टी खटकणार नाहीत. आपण शांत होऊ पण अधिक शक्तीशाली बनल्याचं आपल्याला जाणवेल आणि मग खरोखरच इतर गोष्टींच्या बाबतीत आपण म्हणू, नथिंग मॅटर्स!
Post your Comment
Please let us know your thoughts on this story by leaving a comment.