...‘टू बी ऑर नॉट टू बी’ च्या अवस्थेत असताना बाबा सरळ ढकलून द्यायचे विहीरीत. मग जगण्या मरण्याची लढाई सुरू व्हायची...
Published in the Saturday Lokasatta on 09 March, 2024
आमच्या टेक्नॉलॉजी टीम कडून मेसेज आला, ’आपण पुढच्या महिन्याच्या एक तारखेला प्लॅटफॉर्म बदलतोय, ’वर्क चॅट’ वरून ’टीम्स’ वर शिफ्ट होतोय. आम्ही सगळ्या टेस्ट्स पार पाडल्या आहेत, टेस्टिंग झालं आहे. आता हा नवा प्लॅटफॉर्म तुम्हाला जास्त फायद्याचा राहिल, तुमची कार्यक्षमता वाढवेल, निर्णय लवकर घेतले जातील आणि एकूणच ऑर्गनायझेशनला त्याचा लाभ होईल’. गेल्या वर्षीची ही गोष्ट. वीणा वर्ल्ड तशी तरुण, एकदम यंग ऑर्गनायझेशन म्हणता येईल. आम्ही म्हणजे मी आणि सुधीर दोघंच काय ते ओल्ड स्कूलवाले सिनियर सिटीझन्स. त्यात माझं टेकनॉलॉजीचं प्रेम यथातथाच, म्हणजे नाहीच जवळजवळ. माझे हे नातेसंबंध बघून ऑर्गनायझेशनने मला ’कॉस्ट कंट्रोल’ च्या नावाखाली लॅपटॉपही दिला नाहीये. टीम मला चिडवते, ’हल्लीच्या जगातला एकमेव सीईओ जो लॅपटॉप वापरत नाही’. असो, काही काही वीक पॉइन्ट्स असतात. माझं काम पेपर, पेन, आयपॅड, फोनवर चालत असेल तर कशाला ते ओझं मी बाळगू. गॅजेट्सचं जंजाळ उगाच वाढवू नये ह्या मताची मी. ’काम थांबत नाहीत नं?’ हा माझा प्रश्न. आमची जनरल मॅनेजर शिल्पा मोरे म्हणते, ’ये फोन ही काफी है।’ गेल्या दहा वर्षात अशी एक दोन वेळा टेक्नॉलॉजी बदलण्याची गोष्ट घडलीच होती आणि सिस्टिम्स किंवा प्रोसेसेस बदलणं हे कायम सुरू असतंच, त्याला आता आम्ही सर्वजण सरावलो आहोत. ’चेंज इज द ओन्ली कॉस्टंट थिंग’ हे कधी नव्हे इतकं तत्परतेने आत्मसात करायची वेळ आहे ही. त्यामुळे एव्हरीबडी इज यूज्ड टू इट. तरीही, ’अरे देवा, आत्ता आत्ता कुठे ’वर्क चॅट’ वर हात आणि डोकं बसलं होतं तेवढ्यात हा नवा चेंज? आता पुन्हा सगळं अथ पासून इति पर्यंत शिकावं लागणार.’ वरवर दाखवत नसले तरी कोणत्याही चेंजला मनातून थोडासा विरोध किंवा त्याबाबतीत उदासिनता ही असतेच. ’चाललंय न सगळं व्यवस्थित, इतर कामं कमी आहेत का?’ कार्यालयातल्या वातारणात हा वास दबक्या स्वरूपात दरवळत असतो. पण एक एक करीत टीम मेंबर्स येणार्या नवीन बदलाला जवळ करतात, त्यात प्राविण्य मिळवतात आणि पुढच्या येणार्या बदलापर्यंत सर्व काही सुरळीत सुरू राहतं. मी मात्र टेक्नॉलॉजीमधल्या बदलांनी बावचळते. खड्डाच पडतो पोटात. गेल्या वर्षीही ’वर्क चॅट’ वरून ’टीम्स’वर शिफ्ट होताना तसंच झालं पण ह्यावेळी मी ’बर्न द बोट्स’ ही मेथड वापरली. वयाप्रमाणे थोडं शहाणपण आलं होतं असं वाटतं. ज्या दिवशी हा प्लॅप्टफॉर्म चेंज होणार होता त्या दिवशी सकाळी मी माझ्या आयॅपडवरून ’वर्क चॅट’ ला धन्यवाद म्हणाले, मनातल्या मनात नमस्कार केला छान साथ दिल्याबद्दल-आमची कामं सुकर केल्याबद्दल, ’सॉरी’ ही म्हटलं हा प्रवास इथेच थांबवावा लागतोय ह्यासाठी आणि एक आवंढा गिळून ’वर्क चॅट’ डीलिट केलं. त्यानंतर माझा लढा सुरू झाला ’टीम्स’ शिकण्यासाठीचा. आणि काय आश्चर्य, दोन दिवसात मी ’टीम्स’ शिकले, म्हणजे जेवढं जुजबी मला लागत होतं तेवढं. जेव्हा ’वर्क चाट’ ची कुशन ठेवली नाही, ’टीम्स’ शिकण्यावाचून पर्याय ठेवला नाही तेव्हा समोर आलेल्या त्या संकटाचा सामना मी चांगल्या तर्हेने करू शकले आणि विजय मिळवला. ’टीम्स’ विषयी मनात जी भीती होती ती नाहीशी झाली आणि मी पूर्णपणे तणावमुक्त झाले.
’बर्न द बोट्स’ हे टेक्निक किंवा हे एक व्यवस्थापन शास्त्र दोन हजार वर्षांपूर्वी पहिल्यांदा रोमन डिक्टेटर, रीफॉर्मर आणि वॉर स्ट्रटेजिस्ट ज्युलियस सीझर ने वापरलं होतं असं म्हणतात. ज्युलियस सीझर ज्यावेळी इंग्लंडवर स्वारी करायला गेला होता त्यावेळी त्याचं सर्व सैन्य एवढ्या लांबच्या पल्ल्याने दमलं होतं, सर्वत्र थोडी उदासिनता पसरली होती, इंग्लडंच्या बलाढ्य सैन्याशी सामना करणं अशक्य आहे ह्या भीतीने सर्वांना ग्रासलं होतं आणि परत जाऊया रोमला हा विचार सर्वांच्या मनात डोकावत होता. जोपर्यंत बोटी समोर दिसत होत्या तोपर्यंत परत जाण्याचे वा रीट्रीटचे विचार येत राहतील पण जर बोटीच नष्ट केल्या तर पर्याय उरणार नाही आणि सैन्य मोठ्या जिकिरीने जिंकू किंवा मरू‘ म्हणत जी जानसे लढाई करून विजय प्राप्त करेल हा विचार करून त्याने बोटींना आग लावली. आत्ता ह्या स्ट्रॅटेजीने फारसं यश त्याच्या पदरी पडलं नाही. काही इतिहासकारांच्या मते तर ही दंतकथा आहे, त्याने बोटींना आग लावलीच नाही.
’बर्न द शीप्स’ आणखी एक पंधराव्या सोळाव्या शतकातली घटना आहे. हेर्नान कोर्तेस हा स्पॅनिश साम्राज्यातला एक सोल्जर, एक्स्प्लोरर आणि अॅडव्हेंचरर, ज्याने मेक्सिको देशातील अॅझटेक साम्राज्यावर विजय मिळवला आणि मेक्सिकोला स्पेनच्या अंमलाखाली आणलं. पण हा विजय त्याला सहजासहजी नाही मिळाला. दोन वर्ष लढा द्यावा लागला त्यासाठी. पहिल्यांदा १५१९ मध्ये जेव्हा तो अॅझटेक साम्राज्य असलेल्या मेक्सिकोच्या भूमीवर उतरला तेव्हा त्याच्याकडे फक्त सहाशे सैनिक होते. स्पेनपासून मेक्सिकोपर्यंत ते आले होते बोटीने. हा जवळजवळ दहा हजार किलोमीटर्सचा प्रवास करून ते अक्षरश: दमले होते. अशा अवस्थेत काय ते मेक्सिकोशी लढाई करणार आणि मग त्यांच्या मनात परत जायचे विचार डोकावणार तेव्हा शीप्सच जर जाळून टाकल्या तर परत जायचा मार्ग बंद होईल, आणि लढण्याशिवाय पर्यायच राहणार नाही हा विचार करून हेर्नान कोर्तेस ने खरोखरच शीप्स जाळल्या. त्याची स्ट्रॅटेजी कामी आली त्यांनी दोन वर्षात अॅझटेक साम्राज्याला शरण यायला भाग पाडलं. १५२१ मध्ये स्पेन चा झेंडा फडकवला मेक्सिकोवर. तेव्हापासून आजतागायत ही बर्न द शीप्स‘ वॉर स्ट्रॅटेजी सर्वत्र वापरली जाते. पर्यायच ठेवायचा नाही. मग बदल घडतो.
लहानपणी गावी असताना बाबा विहिरीवर स्विमिंग शिकवायला घेऊन जायचे. पाण्यात उडी मारायची कशी ह्या ’टू बी ऑर नॉट टू बी’ च्या अवस्थेत असताना बाबा सरळ ढकलून द्यायचे विहीरीत. मग जगण्या मरण्याची लढाई सुरू व्हायची, हातपाय हलविल्याशिवाय पर्यायच उरायचा नाही आणि पोहायला सुरुवात व्हायची. आपले आई-बाबा किंवा शिक्षक असेच हेर्नान कोर्तेस सारखे आपल्याला ढकलून देतात अनेक ठिकाणी. त्याक्षणी त्यांचा राग येतो पण त्यातली दूरदृष्टी समजायला आपल्याला खूप वर्ष लागतात. ‘तुला लढता आलं पाहिजे’ हा एकच अजेंडा असतो त्यांचा. ‘पर्याय नसणं’ ही अतिशय उपयुक्त अशी गोष्ट मला वाटते.
कोविडच्या काळात आमच्या बाबतीत असंच झालं, थोड्या वेगळ्या प्रकाराने. कोविड सिच्युएशन आमच्या टूरिझमसाठी भयंकर यातनादायी ठरली. पहिला फटका आम्हाला बसला आणि त्यातून बाहेर येणारे आम्ही म्हणजे टूरिझम इंडस्ट्री सर्वात शेवटची. अडीच वर्ष सर्वांनी आम्हाला त्यांच्या आयुष्यातून बाद केलं होतं. काहीच नव्हतं करायला आणि पुढे काही आपलं होऊ शकेल ही आशाही संपली होती. त्या अडीच वर्षात अनेकांनी ह्या इंडस्ट्रीला राम राम ठोकला, वेगवेगळे बिझनेस सुरू केले. आम्ही मात्र काहीही केलं नाही म्हणजे एक जबर विश्वास होता की आमची टूरिझम इंडस्ट्री पुन्हा सुरू होईल पण आम्ही दुसरं काही सुरू केलं नाही कारण दुसरं काही आम्हाला येतंच नव्हतं. म्हणजे आता आमच्या वर्तमानात किंवा भविष्यात आम्ही टूरिझममध्ये असण्याला दुसरा पर्याय नाहीये हे सिध्द झालंय किंवा आम्हाला कळलंय कोविडमुळे. त्यामुळे आता जे काय करायचं ते टूरिझम मध्ये करा, चांगलच करा, फोकस्ड रहा हा आम्हाला कोविड काळाने दिलेला संदेश आहे, आम्ही तो आचरणात आणतोय. पॅन्डेमिकनंतर ऑफिसेस सुरू झाली, जवळजवळ दोन वर्षांनी कॉर्पोरेट ऑफिस उघडलं, हळू हळू मार्गी लागत होतो, त्यावेळी घेतलेल्या पहिल्या ‘मॅनेजर्स मीट’ आणि ’टूर मॅनेजर्स मीट’ मला आजही आठवताहेत. तेव्हा आम्ही हेच बोललो होतो, ‘देवाने आपल्याला जिवंत ठेवलंय तेव्हा ह्या आयुष्याचं काहीतरी चांगलं करूया, कोविडच्या काळात घरी बसण्याने आपल्याला पूर्णपणे कळलंय की आपण टूरिझमसाठीच जन्माला आलोय, ह्याव्यतिरिक्त आपल्याला दुसरं काहीच येत नाही तर मग का नाही ह्या टूरिझममधल्या आपल्या आस्तित्वाचं सोनं करायचं? आणि आपल्याला टूरिझमशिवाय दुसरा पर्याय नाही, कोणताच नाही, त्यामुळे आपण प्रत्येकाने प्रत्येक क्षणाचं चीज करूया. तुम्ही कोणत्याही डीपार्टमेंटनध्ये असा, टूर मॅनेजर असा किंवा मॅनेजमेंट, लेट्स डू अवर बेस्टेस्ट बेस्ट.
आपण सर्व्हिस इंडस्ट्रीत आहोत, पर्यटकांना मनोभावे सेवा देणं हे आपलं काम आहे. त्यांच्याप्रती कन्सर्न असणं महत्वाचं आहे. परिस्थितीचे हादरे आपण एकजूटीने थोपवूया पण आपल्याकडून चूक होणार नाही ह्याची काळजी घेऊया. कोविडने करून दिलेली जाणीव मला वाटतं आमच्या पथ्यावर पडलीय. कारण प्रत्येक टीम मेंबर दररोज चांगलं काही करण्याचा प्रयत्न करतोय. अजून परफेक्ट सर्विसच्या बाबतीत बराच पल्ला गाठायचा असला तरी सुधारणा होतेय. परफेक्शन ही जर्नी आहे, त्याला डेस्टिनेशन नाही. त्यामुळे चूक झाली तर लगलीच सुधारायची, पुढे तीच चूक होऊ न देण्यासाठी बॉर्डर्स सील करायच्या हे काम अव्याहतपणे सुरू आहे. वुई आर ऑन द राइट ट्रॅक ह्यात समाधान आहे. बाकी प्रयत्नांची पराकाष्ठा तर प्रत्येकालाच करावी लागते. एकंदरीत ‘पर्याय नसंण‘ हाच ‘वीणा वर्ल्ड’ च्या यशस्वितेचा (म्हणजे जे काही छोटं मोठं यश आजपर्यंत मिळवलंय त्याचा) मंत्र आहे असं मी अगदी आत्मविश्वासाने म्हणू शकते. नो ऑप्शन इज द बेस्ट ऑप्शन!
Post your Comment
Please let us know your thoughts on this story by leaving a comment.