Published in the Saturday Lokasatta on 28 July 2024
...त्यांना धन्यवाद देऊन बाहेर पडलो, पण मन अजूनही, ‘आतातर बोर्डपण नाहीये बाहेर’ ह्या त्यांच्या वाक्यावर रेंगाळलं होतं. ‘आपल्या सेल्स ऑफिसला बोर्ड नसेल किंवा बोर्ड नाही लावायचा’ असं आपण ठरवलं तर?...
खूप दिवसांनी पार्ल्याच्या गजालीमध्ये जायचा योग आला. हा योगच म्हणायचा, एैसे मौके बार बार नहीं आते! तरीही वर्षांतून तीन चार वेळा जाणं होतंच. आणि हा अखंड परीपाठ गेली वीस पंचवीस वर्ष सुरू आहे. गजालीला जायचं म्हणजे दुपारी लंचला जायचं, रात्री एवढं खायचं नाही किंवा खाल्लं जाणारं नाही म्हणून. सकाळी ब्रेकफास्ट करायचा नाही. आमच्यातले काही जण शक्य झालं तर आदल्या दिवशी रात्रीही खात नाहीत किंवा कमी खातात. किती ही खाण्याआधीची पुर्वतयारी. गजालीत जेवल्यावर मात्र खाऊन खाऊन इतकं दमायला होतं की ‘आता लवकर नको रे बाबा‘ असं बोलत सगळे उठतात आणि तृप्त मनाने आपापल्या घरी जातात. ‘लवकर नको रे‘ म्हणणारे पुन्हा एक दोन महिन्यातच गजालीच्या नशेचे शिकार होतात आणि नारायण चौगुले ला फोन करतात टेबल राखून ठेवण्यासाठी. ‘गजाली नारायण आणि आपण सारे‘, हे समीकरण बनून गेलंय. त्यादिवशी आम्ही थोडे उशिराच पोहोचलो होतो त्यामुळे भरपेट खाता खाता चार वाजले. निघताना गजालीचे निर्माते श्री मधुकर शेट्टी भेटले. नेहमीप्रमाणे त्यांना कॉम्प्लिमेंट्स देत आम्ही बाहेर पडत होतो. त्यांना म्हटलं, ‘तुम्हाला कल्पना नाही, पण तुमचं उदाहरण आम्ही आमच्या मॅनेजर्स मीट मध्ये वापरतो. आमचं ट्रेनिंग टूल आहे तुमच्या रेस्टारंटचा केस स्टडी. ‘क्लॉलिटी‘ आणि ‘कन्सिस्टंन्सी‘ ह्या दोनही गोष्टींमध्ये तुम्ही मैलाचा दगड केव्हाच पार केलाय. एवढी वर्ष सातत्याने तुम्ही प्रत्येक पदार्थाची चव कशी काय मेंटेन केलीय ह्याचं आम्हाला नेहमीच अप्रृप वाटत आलंय‘. तर म्हणाले,‘आम्ही रोज सकाळी सॅम्पलिंग करतो. इनग्रेडिएंट्स बघून घेतो‘. क्वालिटीचं एक रहस्य कळलं होतं. दर्जा गुणवत्ता सातत्य ह्या गोष्टी तर आहेतच पण गजालीची जाहिरात मी कधी पाहिलेली आठवत नाही आणि हा आमच्या ट्रेनिंगमधील ‘गजाली‘ विषयावरचा दुसरा मुद्दा असतो. त्यांना म्हटलं, ‘तुमची जाहिरात कधी पाहिली नाही. तरीही वर्षाचे तीनशे पासष्ट दिवस गर्दीचा ओघ सुरूच. सुट्टीच्या दिवशी तर लोकं बाहेर एक दीड तास थांबायलाही तयार. ही जादू कशी करता‘ तर हे म्हणाले, ‘जाहिरात सोडा आत्ता ह्या क्षणी बाहेर बोर्डपण नाहीये. लोक येतात, जेवतात, दुसऱ्यांना सांगतात, दुसरे तिसऱ्यांना ही साखळी सुरू राहते‘. सिंपल फंडा.
त्यांना धन्यवाद देऊन बाहेर पडलो, पण मन अजूनही, ‘आतातर बोर्डपण नाहीये बाहेर‘ ह्या त्यांच्या वाक्यावर रेंगाळलं होतं. ‘आपल्या सेल्स ऑफिसला बोर्ड नसेल किंवा बोर्ड नाही लावायचा‘ असं आपण ठरवलं तर? नुसता प्रश्न जरी टाकला टीमला तरी शंभर टक्के ‘नॉट ॲट ऑल पॉसिबल, विचार पण करू नका‘ असा दमदार विरोध होईल ह्याची मला पूर्ण खात्री आहे. त्याहीपुढे जाऊन, ‘काय एकेक नवीन खूळ डोक्यात येतं‘ म्हणत माझा पाठींबाही काढून घेतला जाईल. नाव, लोगो, बोर्ड, जाहिरात, ब्रँडिंग, सोशल मिडीया ह्या सगळ्या जंजाळात आपली कंपनी तशी नवीन. अर्ध्यांना तर नावपण माहीत नाही आणि तुम्ही नेमकं काय करता ह्याचा अतापताही नाही. त्यामुळे ‘सेल्स ऑफिसेसवर बोर्ड नसणं‘ ही गोष्ट प्रत्यक्षात उतरू शकत नाही हे तेवढंच खरं. पत्ता शोधणार कसा? त्यामुळे, आपल्या प्रत्येक सेल्स ऑफिसवर बोर्ड असेल ह्यावर मनातल्या मनात मी शिक्कामोर्तब केलं आणि ह्या प्रश्नातून माझी मीच बाहेर आले. दुसरी गोष्ट होती, ‘जाहिरात न करण्याची‘. मला आमच्या पानभर जाहिराती समोर दिसायला लागल्या. जाहिरांतीशिवाय लोकांना-पर्यटकांना कळणार कसं? एखादी नवीन टूर आपण लाँच केलीय ते पोहोचणार कसं? हा मुद्दा होता. त्यामुळे आपली जाहिरात ही अनाऊंसमेंट असते आपल्याकडे काय काय टूर्स आहेत ते कळविण्यासाठीची, ह्यावर मी सेटल झाले. आपणच आपली समजूत काढतो तसंच काहीसं. मागे आम्ही एक नियम केला की, आपल्या जाहिरातीत ‘वुई आर द बेस्ट‘ वैगेरे शब्द वापरायचे नाहीत. काही देशांमध्ये जाहिरातीत असे शब्द वापरायला बंदी आहे, हे जेव्हा कळलं तेव्हा आम्ही त्यावर चर्चा करून निर्णय घेतला, जरी आपल्याकडे तो निर्बंधाचा कायदा नसला तरी ही चांगली गोष्ट आहे ती पाळूया. आपणच कुठल्या आधारावर आपल्याला बेस्ट म्हणायचं? त्यापेक्षा वस्तुस्थिती सांगा. उगाचच टॉल क्लेम्स वा मोठे दावे नकोत. जे आहे, जसं आहे, तसं सांगा आणि पर्यटकांना निर्णय घेऊ द्या. तिथे रस्सीखेच नको. आपली सर्व्हिस आवडली तर लोक आपल्याकडे येतील आणि नाही आवडली तर नाही येणार. खरंतर हेच सत्य असतं. आम्हाला जाहिराती कराव्या लागतात हे स्वीकारलं तरी त्यात आम्ही तीन गोष्टी नमूद करण्याचं धाडस केलं ते म्हणजे, ‘नो डिस्काउंट्स‘, ‘नो ऑप्शनल्स‘, आणि ‘नो कॅश ट्रान्झॅक्शन्स‘. धाडसच म्हणायचं, म्हणजे तो निर्णय घेताना आमच्या पायाखालची वाळू सरकलीच म्हणायची. जागतिकीकरणाने ‘डिस्काउंट्स, बोनस, लॉयल्टी पॉईंट्स ह्याचा अंमल आपल्या भारतीयांवर राज्य करायला लागलाय त्यात आम्ही म्हणतोय 'नो डिस्काउंट्स‘. सहलखर्च कमी दाखवून सहलीवर ऑप्शनल्स विकायचे ही गोष्ट आम्हाला पटतच नाही. त्यामुळे जे ‘मस्ट सी' आहे ते सगळं दाखवायचंच हा आमचा अलिखित नियम, त्यामुळे तिथे फारसं डिस्कशन झालं नाही. तिसरी गोष्ट होती ती ‘कॅश न घेण्याची'. भारतासारख्या 'कॅश इकॉनॉमी' वाल्या देशात हे करणं थोडं धाडसाचं होतं. आम्हीही बरीच चर्चासत्र झाडली ह्यावर आणि सर्वसंमतीने ‘नो कॅश ट्रान्झॅक्शन्स ॲट वीणा वर्ल्ड' ह्यावर शिक्कामोर्तब केलं आणि आमच्या प्रत्येक जाहिरातीत लिहूनच टाकलं, ‘नो कॅश ट्रान्झॅक्शन्स' असं. आम्हाला कल्पना आहे ‘डिस्काउंट आणि नो कॅश' ह्या पॉलिसीमुळे आम्ही काही बूकिंग्ज घालवत असू. थोडक्यात ते नुकसान आहे पण तरीही आत्तापर्यंत गेल्या चार वर्षात ह्या निर्णयावर फेरविचार करावासा वाटला नाही. हळूहळू एक गोष्ट जास्त गळी उतरायला लागलीय ती म्हणजे, ‘लेट्स कॉन्सन्ट्रेट ऑन सर्व्हिस'. जे चुकतंय ते दुरुस्त करूया, जे सुधारायला पाहिजे ते सुधारूया, पर्यटक आपल्याकडे यायला पाहिजेत ते फक्त त्यांची आधीची टूर चांगली झाली म्हणून. म्हणजेच,'वुई आर ऑलवेज ऑन अवर टोज्'. आपल्याला सर्व्हिस देण्यामध्ये कधीही कॉम्प्लेसन्सी वा शैथिल्य नाही आलं पाहिजे. आजची टूर चांगली झाली तर आपल्याला भविष्य आहे हे वीणा वर्ल्डमधल्या प्रत्येकाच्या रोमारोमात जेवढं शिरेल तेवढी प्रत्येक लेव्हलची सार्विस चांगली होईल. आपणच आपल्याला चांगल्यासाठी सतत धारेवर धरणं हे उत्तर आहे आपल्या करियरमध्ये वा आपल्या व्यवसायात चांगल्या तऱ्हेने टिकून राहण्याचं, तसंच ग्लोबलायझेशनमध्ये स्वतःला किंवा आपल्या संस्थेला वाचविण्याचं.
हे कितीही म्हटलं तरी अजून बोर्डशिवाय ऑफिस आणि जाहिरातींशिवाय वीणा वर्ल्डचा विचार करायचं धाडस होत नाहीये. म्हणजेच, दिल्ली बहुत दूर है अभी! लॅम्बोर्गिनी वा रोल्स रॉईस सारख्या लक्झरी कारवाल्या कंपन्या जाहिरात करीत नाही. कारण त्या कार्स जे ॲफोर्ड करू शकतात ते जाहिराती बघत नाहीत किंवा टीव्ही बघत नाहीत, हे लॅम्बोर्गिनीच्या ऑफिशियल्सचं एक्सप्लेनेशन. ह्याचा दुसरा मजेशीर अर्थ मग असाही निघतो की, लॅम्बोर्गिनी वा रोल्स रॉइस घ्यायची आपली ऐपत जर निर्माण करायची असेल तर टिव्ही नाही बघितला पाहिजे. किंवा टीव्ही बघण्यासाठी वेळच मिळत नाही एवढी मेहनत आपण केली पाहिजे. असो. जगाच्या पाठीवर अनेक कंपन्या आहेत ते जाहिरातीचा मार्ग घेतच नाहीत. 'झारा' हा कपड्यांचा ब्रँड जाहिराती न करता ते बजेट मोठमोठ्या शो रूम्स मध्ये घालतं, जेणेकरून ग्राहकांना डायरेक्ट प्रॉडक्टच चेक करता येईल. इलॉन मस्क ट्विटरवर टेस्लाची थोडीफार जाहीरात करतो पण अदरवाइज त्याने मार्केटिंग डीपार्टमेंटच काढून टाकलं. आणि तरीही टेस्ला कायम ओव्हरसोल्ड. श्रीराचा नावाचा सॉस ब्रँड जाहिराती करीत नाही तरीही वर्षाला वीस मिलियन म्हणजे दोन कोटीहून अधिक एवढ्या बॉटल्स विकण्याचा व्रिक्रम करतं. टपरवेअर जाहिराती न करता 'टपरवेअर पार्टीज' आणि 'गुड वर्ड ऑफ माऊथ‘वर भर देतात. आपल्याकडचा 'नॅचरल आइस्क्रीम' हा ब्रँडही अतिशय कमी जाहिराती करतो आणि नावाप्रमाणे प्रॉडक्ट नॅचरल ठेवण्यावर त्यांचा भर आहे. ‘टिक टॉक‘ हा सुद्धा तसाच जाहिरातींशिवाय वर्ल्ड लीडर बनलेला सोशल मिडिया ॲप ब्रँड. असे अनेक जगप्रसिद्ध ब्रँड्सचे केस स्टडीज् आज इंटरनेटवर उपलब्ध आहेत जे प्रॉडक्ट आणि सर्विस किती महत्वाचं हे उदाहरणासह आपल्याला दाखवताहेत आणि इन्सपायर करताहेत. जाहिरात न करणारे आणखीही ब्रँॅड्स आहेत किंवा त्यांना जाहिरातच करता येत नाही, पण ते सेल्सच्या बाबतीत कायम ‘सबसे आगे' असतात. ते आहेत अल्कोहोल ब्रँड्स, गॅम्बलिंग ब्रँड्स, टोबॅको, इ. म्हणजे आपण त्यांच्या जाहिराती पण बघतो अप्रत्यक्षपणे किंवा सोडा वॉटर ब्रँड किंवा ‘इंज्युरियस टू हेल्थ' या कॉशनरी लाइनसह. निगेटिव्ह किंवा शरिराला हानिकारक असूनही ह्या गोष्टी जनमानसाला किती कंट्रोलमध्ये ठेवतात त्याचं हे उदाहरण. काही क्रिकेटर्स, अभिनेते अशा गोष्टीचे ब्रँड ॲम्बेसेडर्स बनत नाहीत त्यांना सलाम. ‘पैसाही सबकुछ नहीं‘ एथिक्स मॉरल्सचं महत्वच ते पटवून देतात.
लोगोशिवाय बोर्डशिवाय जाहिरातींशिवाय ब्रँड पुढे आला पाहिजे ही गोष्ट डोक्यात एकदम रुतून बसलीय. लोकांच्या मनात ब्रँड रुजला पाहिजे. ब्रँडिंग मनामनात असलं पाहिजे. त्यासाठी मग कर्मण्येवाधिकारस्ते.
Post your Comment
Please let us know your thoughts on this story by leaving a comment.