Published in the Sunday Sakal on 12 May, 2024
आईला विश केलंस का?’ कितीतरी घरांमध्ये, मित्र मैत्रिणींमध्ये आज हा प्रश्न विचारला जाईल.`अरे यार कामाच्या गडबडीत विसरूनच गेलो! आता आईला काय वाटेल?‘ हा स्वसंवादही उद्या होईल. कधी कधी वाटतं कसली ही मेली फॅडं, एक दिवस आईची आठवण करायची आणि बाकी दिवस? किंवा आमचा रोजचा दिवसच `मदर्स डे’ असतो, हा एकच दिवस कशाला? पण मग वाटतं, नको, असुदे हा एक दिवस. `आई’ ह्या संकल्पनेचा संपूर्ण जगात जयजयकार होतो एकाच दिवशी ही किती चांगली गोष्ट आहे. जिथे प्रेम आहे आईविषयी ते अधिक वृद्धिंगत होईल आणि जिथे नाहीये तिथे कदाचित आत्मपरिक्षण होईल. एखादा प्रेमाचा अंकूर नव्याने उगवू शकेल. चुकलं माकलं माफ केलं जाईल. सेलिब्रेशन आहे, नाही म्हणायचं नाही. सो, अगदी मनापासून म्हणते, आनंदाने म्हणते, सेलिब्रेशनच्या मूडमध्ये म्हणते, `हॅप्पी मदर्स डे!’करायचं काय नेमकं ह्या दिवशी? म्हणजे हे लिहित असताना मलाही प्रश्न पडलाय. सुधीर दुबईला गेलाय. मुलं आपापल्या व्यापात आपापल्या घरी. आमच्या घरात मी आणि सासूबाई आणि आम्हाला सांभाळणाऱ्या वर्षा आणि श्रृती. माझ्या आईचा काय कार्यक्रम आहे माहीत नाही पण ती जॉइन झाली तर आम्ही पंचकन्या काहीतरी करू शकतो. लेट्स सेलिब्रेट लाइफ! आमच्या घराला जाग तशी सकाळी चार वाजताच येते. लवकर उठूया. दाराबाहेर रांगोळी काढूया. घरात एखादा मंगलध्वनी सुरू ठेवूया. सासूबाईंच्या कंत्राटात असलेली देवपूजा लवकरच होते, त्यामुळे सगळ्या वातारणाला एक प्रसन्नता आलेली असेल. दिवाळी पहाटसारखे कार्यक्रम मदर्स डे च्या दिवशी नसतात, अन्यथा सकाळी तिकडे गेलो असतो. नेव्हर माईंड, एखाद्या मॅटिनी शो ला तर जाऊ शकतो. मग तो शो बघितला की थोडं मॉलमध्ये हँगआऊट आणि त्यानंतर बाहेरचं एखाद्या रेस्टाँरंटमध्ये सेलिब्रेशन लंच. आज किचनला सुट्टी. आल्यावर मस्त ताणून द्यायची किमान तास दीड तास, हो दुपारी झोपायला मिळणं म्हणजे सर्वात मोठी चैन, का नाही करून घ्यायची? मदर्स डे है यार! जी लो अपनी जिंदगी! संध्याकाळ शांततेत, जुने फोटो बघण्यात, त्या आनंदी आठवणींमध्ये रमण्यात घालवायची आणि `थँक्यू गॉड फॉर एव्हरिथिंग’ म्हणत आनंदात झोपी जायचं.आज अनेक ठिकाणी वुमन्स स्पेशल टूर्स सुरू आहेत आणि कितीतरी मदर्स आजचा दिवस सेलिब्रेट करताहेत देशविदेशात. कुणी स्वत:लाच ही टूर गिफ्ट केलेली आहे तर कुणाला ती गिफ्ट मिळालीय आपल्या मुलामुलींकडून. काहीही असू दे, पण सेलिब्रेशन महत्वाचं. आपल्या हॅप्पीनेसची कारणं आपणच शोधली पाहिजेत नं. जेव्हा ही वुमन्स स्पेशलची संकल्पना मी जन्माला घातली तेव्हा मदर्स डे अजिबात डोक्यात नव्हता. टूर मॅनेजर म्हणून अनेक टूर्स करताना जेव्हा मी टूरवर फॅमिलीसोबत आलेल्या महिलांना बघत होते तेव्हा जाणवायचं की, या महिला चेंज म्हणून टूरवर आल्यायत खऱ्या पण किचन सोडलं तर इथेही त्या फॅमिलीलाच सांभाळताहेत. त्या स्वत: कुठे स्वच्छंदपणे तो आनंद मिळवताहेत? थोडं फ्री होण्याची गरज आहे आणि म्हणून,`चंद कुछ दिनोफ्ल के लिए उसे अकेले घर से बाहर निकालना जरूरी है’ ह्या विचारातून पहिल्या जाहिरातीची लाइन सुचली आणि मग लाईनी सुचतच गेल्या. `मला फक्त आठ दिवस द्या तुमच्या एका वर्षातले’ दुसरी लाईन होती `लेट देम मिस यू?’ आणि मग त्यापुढे, 'मीच माझी राणी', 'लेट्स मेक लाईफ मोअर इंटरेस्टिंग', 'द पॉवर टू ट्रॅव्हल द वर्ल्ड', 'लेट्स रॉक द वर्ल्ड', 'माय लाईफ. माय जॉय'... वीणा वर्ल्ड झाल्यावर तर वुमन्स स्पेशल आणखी धुमधडाक्यात सुरू झाली. आज मागे वळून पाहताना वाटतं की वुमन्स स्पेशल सुरू करताना जरी `मदर्स डे’ विचारात घेतला नव्हता तरी आज अनेक मदर्ससाठी वुमन्स स्पशेल एक माहेर बनून गेलंय, मदर्स डे ची मोठ्ठी गिफ्ट बनलंय. मदर्स डे असो किंवा वुमन्स डे, हे सुंदर जग पालथं घालण्याचं एक लक्ष्य तर समोर ठेवलंय, आणि वीणा वर्ल्ड आहे नं, आम्ही नेहमीच म्हणतो `मिळून साऱ्याजणी देश विदेश पालथे घालूया, आत्मविश्वास वाढवूया, दृष्टीकोन व्यापक बनवूया, धम्माल करूया, भविष्यासाठी अनमोल आठवणींची साठवण करूया आणि आयुष्य हसत-खेळत झेलूया... कधी ग्रीसच्या निळ्याशार समुद्रावर तर कधी लेह लडाखच्या हिमालयी उत्तुंगतेसोबत, कधी अमेरिकेच्या फ्रीडम लँडमध्ये तर कधी इंग्लंडच्या राणीच्या दिमाखात, कधी युरोपच्या अद्वितीय सौंदर्यासोबत तर कधी थायलंडच्या फेसाळत्या समुद्रावर.. चला बिनधास्त! लेट्स ब्रेक बॅरिअर्स ॲन्ड रॉक द वर्ल्ड!’टूर्स वा वुमन्स स्पेशल हा तसं बघायला गेलं तर आमच्या बिझनेसचा एक भाग. पूर्ण कमर्शियल, पण बिझनेस करताना आपल्याला काहीतरी चांगलं केल्यांचं जे समाधान हवं असतं ते ह्या वुमन्स स्पेशलमुळे मिळतं. कितीतरी महिलांची सोय झालीय आज ह्या वुमन्स स्पेशलमुळे. कधी लाइफ पार्टनरला वेळ नसतो तर कधी त्याला नसते फिरण्याची आवड. कधी एकटीने कुठे आणि कसं फिरायची ही चिंता. पण मग आम्ही कशाला आहोत! महिलांची ही आनंदाची गरज एक महिला म्हणून मी जाणली आणि निर्माण झाली वुमन्स स्पेशल. मदर्स डे, वुमन्स डे हे तर झाले बहाणे, ज्याचा आम्ही आणि महिला दोघंही मिळून पूर्ण फायदा उठवतो. पण फक्त ह्या दोन दिवशीच नाही तर वर्षभर महिलांचं हे देशविदेशभ्रमण सुरू असतं. वुमन्स स्पेशल म्हणजे महिलांचं आनंदाचं उत्साहाचं टॉनिक आहे. आनंदी उत्साही मन माणसाला आजारपणापासून दूर ठेवते हे सर्वश्रृत आहे. सर सलामत तो पगडी पचास. शक्यतोवर औषधाविना आयुष्य जगायचा प्रयत्न करायचा. हेल्दी रहायचं शरीराने आणि मनाने, हाच पाया आहे वीणा वर्ल्ड वुमन्स स्पेशल टूर्सचाही. हसूया, नाचूया, गाऊया, बागडूया, नटूया, सजूया, घराची गावाची शहराची राज्याची देशाची सीमा ओलांडूया, आत्मविश्वासाने एक एक पाऊल पुढे टाकूया, आयुष्याला आनंदी बनवूया. घरातही उत्साहाचं कारंजं लावूया. पुर्वी बऱ्याचदा वुमन्स स्पेशल टूर्सवर महिलांना भेटायला मी जात असे. प्रचंड प्रवास केलाय पण कधी दमले थकले नाही कारण ह्या प्रत्येक टूरवर महिला ज्या तऱ्हेने एन्जॉय करायच्या, सहलीवर जो काही सळसळता उत्साह दिसायचा तो बघून मला शक्ती मिळायची. नऊवारीतून पाचवारी, पाचवारीतून पलाझो, चुडिदार मधून जीन्स, जीन्समधून स्कर्ट आणि चक्क स्विमिंग कॉश्च्युम घालून पूलमध्ये मनसोक्त डुंबणाऱ्या महिलांची ट्रान्सफॉर्मेशन्स बघून मिळणाऱ्या आनंदाला परिसीमा नव्हती.प्रत्येक टूरवर माझ्या आणि महिलांच्या संवादात एकच सांगणं असायचं, ’मुलगी शिकली प्रगती झाली’ हे आपल्याला माहित आहे पण ’मुलगी आनंदी झाली तर घर आनंदी होतं सर्वार्थाने’. तेव्हा ह्या मुलीला पर्यटनाच्या माध्यमातनं आनंद देण्याचा हा प्रयत्न आहे. स्वत:ला गिल्टमध्ये टाकू नका. तुम्ही घराबाहेर येताय, धम्माल करताय ही तुमची गरज आहे. पर्यटन हा आपला चार्जर आहे. जमेल तसं तीन महिन्यांनी, सहा महिन्यांनी किंवा वर्षातून किमान एकदातरी असं स्वत:ला चार्ज करायचं आणि मग हसतहसत आयुष्याला सामोरं जायचं.एकदा अशीच आम्ही मदर्स डे ची जाहिरात बनवित होतो हेडलाइन सुचत नव्हती. माझ्यासमोर अनेक लाईन्स आल्या. तशा आमच्या जाहिराती टू द पॉईंट. ताकाला जाऊन भांडं लपवायचं नाही. `तिला उडू दे... फुलू दे... मुक्त करूया तिला बंधनातून’, `शी हॅज अराईव्हड‘, `शी हॅज ऑलरेडी रीचड्’, `सेलिब्रेट हर‘... अशा लाईन्स अजिबात नको होत्या. जर शुभेच्छा द्यायच्यात, कृतज्ञता व्यक्त करायचीय तर त्यात किंचितही उपकाराची भावना नको. माझं आणि तुझं महत्त्व दोन्ही अबाधित राहिलं पाहिजे. आपण सर्व मिळून हे जग चालवतोय. तेव्हा `एकमेकांप्रती नम्र राहत सन्मान करता आला पाहिजे’ ही भावना कशी आणता येईल हा प्रश्न होता. लाईन लिहीली आणि खात्रीने सांगते, समोरच्यांनी वाचल्यावर त्याक्षणी आई, मावशी, बहिण, आत्या ज्यांनी ज्यांनी आपल्या जडणघडणीत हातभार लावलाय त्या सगळ्या त्यांना आठवल्या. तोच तर हेतू आहे ह्या शुभेच्छांचा. आपल्या कळत नकळत आपल्या आयुष्याला आकार देणाऱ्या सर्वांना आठवून त्यांना कृतज्ञतापूर्वक मनोमन सलाम करायचा आणि त्या सुचलेल्या लाईनप्रमाणे म्हणायचं, `आय ॲम बिकॉज शी इज!’ ती आहे म्हणून मी आहे.
अरेच्चा! हे मला माहितच नव्हतं...
आशिया खंडाच्या मध्यवर्ती भागातला आकारानं अगदी लहान पण अतिशय महान ऐतिहासिक परंपरा लाभलेला देश म्हणजे ‘उझबेकिस्तान’. जुन्या सोव्हिएत रशियाचा हिस्सा असलेला हा देश जगातल्या मोजक्या डबल लँडलॉक्ड देशांपैकी एक आहे. म्हणजे या देशाभोवती कझाकस्तान, किर्गिझस्तान, ताजिकिस्तान, अफगाणिस्तान, तुर्कमेनिस्तान या देशांचा गराडा आहे आणि या सगळ्या देशांभोवती अन्य देशांचा गराडा आहे. सुमारे दोनेशे वर्ष रशियाच्या सत्तेखाली राहिल्याने रशियन भाषा या देशातल्या सगळ्यांना येते. या देशातील समरकंद हे शहर सुमारे पावणे तीन हजार वर्षांपूर्वी वसवलेलं आहे आणि तेव्हापासून इथे मनुष्यवस्ती आहे. या शहरावर जेव्हा सिकंदरची राजवट होती तेव्हाच इथला ‘पलोव्ह’ हा पदार्थ (भारतीय पुलावाचा पूर्वज !) प्रचारात आला असं मानलं जातं. तैमूरच्या राजवटीत हे शहर त्याच्या साम्राज्याची राजधानी होतं. याच शहरात ‘तिमुरीद रेनेसान्स’ घडला होता. या शहराने उझबेकिस्तानची पारंपरिक कलाकुसर आजही जपलेली आहे. 2001 मध्ये समरकंदचा समावेश युनेस्कोच्या विश्व वारसा यादीत करण्यात आला. समरकंदमध्ये अनेक वैभवशाली आणि भव्य वास्तू पाहायला मिळतात त्यातलीच एक म्हणजे ‘गुर इ अमिर’. ही इमारत म्हणजे ‘तिमूर’ अर्थात ‘तैमूरलंग’ या पराक्रमी सम्राटाची कबर आहे. 15 व्या शतकात आपल्या धडाकेबाज आक्रमणानं या तैमूरनं इराण, अफगाणिस्तान, भारतातील दिल्ली या ठिकाणी आपली सत्ता प्रस्थापित केली होती. त्याच्या मृत्यूनंतर शाही इतमामात त्याला समरकंद मध्ये दफन करण्यात आलं, तिथं बांधलेली इमारत म्हणजे ‘गुर इ अमीर’. या नावाचा अर्थ होतो राजाचा मकबरा. या भव्य आणि शाही वास्तूचा प्रभाव तैमूरच्या वंशजांच्या-मुघलांच्या वास्तूंवरही पाहायला मिळतो. तैमूरनं आपल्या राजवटीत इस्लामी आर्किटेक्चरचा पुनरुध्दार केला होता. त्याच पध्दतीनं त्याचा मकबराही बांधण्यात आला. ‘गुर इ अमिर‘च्या प्रवेशद्वारावर अरेबिक भाषेतील कॅलिग्राफी पाहायला मिळते. चकाकत्या, चमकदार टाइल्सनी मढवलेली ही वास्तू पाहाताक्षणी नजरेत भरते. निळ्या टाइल्सचा भव्य घुमट आणि समोरचे दोन नक्षिदार मिनार यामुळे ही वास्तू लक्ष वेधून घेते. इथल्या भिंतींवर टाइल्स अशा प्रकारे लावण्यात आल्या आहेत की त्यामध्ये निर्माण झालेल्या आकारातून ‘अल्लाह’ असे शब्द वाचता येतात. या वास्तूत मदरसा आणि खनाकाह (सुफींच्या सभेची जागा) आहे. ही वास्तू तैमूरलंगच्या हयातीत बांधायला सुरुवात केली होती, मात्र ती पूर्ण होण्याआधीच तैमूरचं निधन झालं. याच वास्तूत तैमूरचे मुलगे, नातू आणि अध्यात्मिक मार्गदर्शक यांच्याही कबरी आहेत. या मकबऱ्याबद्दलचा उल्लेखनिय प्रसंग म्हणजे रशियन राजवटीत 1941 मध्ये सरकारी आदेशावरून इथल्या कबरी उघडण्यात आल्या होत्या, त्यानंतर संशोधकांनी त्यातील अवशेषांची पाहाणी करून तैमूरलंगच्या पायाला खरंच इजा झाली होती याची खात्री करून घेतली. तर मग प्राचीन इतिहास जपणाऱ्या समकरकंदला भेट द्यायची असेल तर वीणा वर्ल्डच्या उझबेकिस्तान कझाकस्तान किर्गिझस्तान सहलीत अवश्य सहभागी व्हा.
जगाच्या पाठीवर मुक्त पर्यटन
पर्यटनाची आवड असल्याने मी जयश्री सोनकुल आणि जयंत शेण्डे, आम्ही मिळून काही वर्षांपुर्वी 'मस्ट विझिट' जागांची एक लिस्ट बनवली आणि आमच्या नजरेस पडेल अश्या जागी चिकटवली. त्यामुळे कुठलीही टूर प्लॅन करताना त्यातील जागांचा समावेश असावा असा आमचा आग्रह असतो. मासिक बचत करून आधी आम्ही महाराष्ट्र आणि आपला सुजलाम सुफलाम भारत देश हिंडून पालथा घातला. मग ध्यास लागला तो विश्वदर्शनाचा! माणसाला समृद्ध करणारा सर्वोत्तम अनुभव म्हणजे प्रवास. आम्ही मुळचे नागपूरचे, मध्यंतरी काही वर्षे मुंबई व भोपाळमध्ये काढून सध्या फिजीमध्ये राहत आहोत.आम्ही आजपर्यंत 14 देशांची मुशाफिरी केली आहे आणि मुख्य म्हणजे जवळजवळ सगळ्या टूर्स आम्ही वीणा वर्ल्ड बरोबर केल्यात. त्यामुळे आमच्यासाठीतरी आंतरराष्ट्रीय ट्रिप म्हणजे वीणा वर्ल्ड हे समीकरण तयार झालयं! त्यांची वेगवेगळी पॅकेजेस, सेवेचा दर्जा, टूर मॅनेजर्ससह संस्थेतील इतर माणसं सगळंच आम्हाला भावतं.प्रत्येक टूरच्या आमच्याकडे खरंच खूप धमाल आठवणी आहेत पण अविस्मरणीय प्रसंग म्हटला तर अलबत आठवते एक क्रेझी स्टोरी- ती म्हणजे आयफेल टॉवर या लोखंडी इमारतीवर 'चुंबकत्वाचा' साक्षात्कार! परदेशात, विशेषतः युरोपमध्ये फिरताना 'खुल्लमखुल्ला प्यार करेंगे हम दोनों' म्हणणारे सगळ्याच वयोगटातील युगुल सर्रास दिसतात. मग आम्ही मोस्ट रोमँटिक सिटी पॅरिस मध्ये आहोत त्यामुळे 'होऊन जाऊ दे, इथे कोण आपल्याला ओळखतयं, अभी नहीं तो कभी नहीं!' असा टूरच्या सगळ्याच कपल्सनी ठराव संमत केला आणि किसिंग पोझ मधला ग्रुप फोटो काढून घेतला! तिथून परत निघतांना पुरुष पार खुशीत आणि आम्ही बाया लाजत मुरडत पण काम फत्ते झाल्याच्या ऐटीत निघालो. फोटोसाठी मार्गदर्शन करताना आणि फोटो काढताना टूर मॅनेजर मेहूल घोसाळकरची हसूनहसून पुरेवाट लागली. आम्ही भाग्यवान ठरलो की आतापर्यंत प्रत्येक टूरला झकास टूर मॅनेजर्स मिळालेत. आश्चर्य म्हणजे काही महिन्यांपूर्वी केलेल्या व्हिएतनाम कंबोडियामध्ये प्रथमच लेडी टूर मॅनेजर बरोबर टूर केली. दीपिका दांडेकर या तरुणीची बोलण्याची शैली, आत्मविश्वास, निर्णयक्षमता, धडाडी असं सगळंच वाखाणण्याजोगं होतं. सगळं सांभाळून घ्यायचं, सगळ्या जबाबदाऱ्या लीलया पेलायच्या हा एक स्त्री म्हणून असलेला इन्स्टिंक्ट तिला तिच्या पुढच्या वाटचालीत नक्कीच मदत करेल. येणाऱ्या वर्षांमध्ये अमेरिका, भूमध्यसमुद्रातील देश आणि ऑस्ट्रेलिया सेक्टरसाठी आम्ही उत्सुक आहोत. त्यात वीणा वर्ल्ड सोबत आहेच याचा आनंद आहे. 'हे विश्वची माझे घर' ही म्हण आम्हाला जगायची आहे.
जयश्री सोनकुल आणि जयंत शेण्डे, फिजी
वीणा वर्ल्ड कस्टमाईज्ड हॉलिडेज्
भारतातील युनिक हॉटेल्स
रुटीनपासून ब्रेक म्हणून घेतलेल्या आपल्या प्रायव्हेट हॉलिडेवरचा स्टे सुध्दा एकदम हटकेच हवा ना? आपल्या भारतात असा युनिक अनुभव देणारी अनेक हॉटेल्स आहेत. आपल्या देशात हॉलिडेची मजा लुटताना तुम्ही झाडावर बांधलेल्या, सर्व सुखसोयींनी युक्त अशा ट्री हाउसपासून ते विशाल बॅकवॉटर्समध्ये तरंगणाऱ्या आलिशान बोटीपर्यंत, तुम्हाला हवा तसा स्टे घेऊ शकता. अशा युनिक हॉटेल्समुळेच तुमचा प्रायव्हेट हॉलिडे अधिक रंगतदार होतो हे विसरू नका. राजा-महाराजांचा देश अशीच ओळख असलेल्या भारतात तुम्ही सुध्दा राजेशाही थाटात पॅलेसमध्ये हॉलिडे घेऊ शकता. भारतातलं ‘रॉयल स्टेट’ म्हणजे राजस्थान. 'पधारो म्हारे देस' म्हणणाऱ्या राजस्थानमध्ये अनेक पॅलेसेस आहेत, ज्यातले काही आता हॉटेलमध्ये रुपांतरीत केले गेले आहेत. राजस्थानातील लेक सिटी म्हणून प्रसिध्द असलेल्या उदयपूरमध्ये लेक पॅलेस हॉटेल आहे. मुळात हा राजवाडा लेक पिचोला या सरोवरात महाराणा जगत सिंग (दुसरे) यांनी सन 1746 मध्ये बांधला होता, ज्याचे आता आरामादायी हॉटेल झाले आहे. जेम्स बॉन्डच्या ‘ऑक्टोपसी’ चित्रपटाचे शुटींग याच हॉटेलमध्ये झाले होते. लहानशा बोटीतून या लेक पॅलेस हॉटेलमध्ये जावं लागतं. संगमरवरात बांधलेल्या, शाही कलाकुसरीने सजवलेल्या या लेक पॅलेसमध्ये रहाताना जी सर्व्हिस मिळते, त्यामुळे आपणही शाही खानदानातलेच आहोत असं वाटतं. राजस्थानमधला रहाण्यासाठी खुला झालेला आणखी एक राजवाडा म्हणजे जोधपूरमधला 'उमेद भवन पॅलेस'. सलग तीन वर्ष दुष्काळाचा तडाखा सोसणाऱ्या प्रजेला रोजगार मिळावा म्हणून महाराज उमेदसिंग यांनी हा राजवाडा बांधायला सुरुवात केली. आता या राजवाड्याचा काही भाग हॉटेलमध्ये रुपांतरीत केला आहे. तुम्ही इथल्या शाही तबेल्यातल्या घोड्यांवरून रपेटही करू शकता. हॉटेलचे गेस्ट म्हणून तुम्ही इथल्या राजघराण्याने जमवलेल्या विंटेज कार्समधून शहरात फेरफटकाही मारू शकता. प्रायव्हेट हॉलिडेसाठी एक खास जागा म्हणजे वाराणसीमधील ‘ब्रिज राम पॅलेस हेरिटेज हॉटेल’. गंगेच्या काठावरच्या या 200 वर्ष पुरातन राजवाड्यात राहून ‘शाम ए बनारस’ ची मजा तुम्ही घेऊ शकता. हॉलिडेसाठी केरळची निवड केली तर तरंगत्या पारंपरिक निवासस्थानाची अर्थात ‘केट्टुवल्लम’ची मजा तुम्ही लुटू शकता. केरळच्या बॅकवॉटर्समध्ये तिथल्या पारंपरिक जीवनशैलीचा आणि खाद्यपरंपरेचा अनुभव घ्यायचा असेल तर हाउसबोटमधला स्टे घ्यायलाच हवा. केरळमधल्या वायनाड येथिल ‘वैथरी’ रिसॉर्टमध्ये तर तुम्ही चक्क झाडवरचा स्टे अनुभवू शकता. इको फ्रेंडली पध्दतीने उंच झाडावर बांधलेल्या या रूम्समधून तुम्ही अवतीभवतीच्या वनराजीचे हिरवेगार दृश्य पाहू शकता. असाच ट्री हाऊस स्टे तुम्हाला लोणावळ्याच्या मचाणमध्ये ही करता येतो. उत्तराखंडमधील ऋषिकेश येथील आनंदा या स्पा रीट्रीटमध्ये तुम्ही मेडिटेशन, योगा याचा अनुभव घेऊ शकता. तुम्हाला रात्री बेडवर पडल्या पडल्या चांदण्यांनी भरलेलं आकाश बघायचं असेल आणि दिवसाची सुरुवात हिमशिखरांचे दर्शन घेऊन करायची असेल तर मनालीमधल्या ट्री ऑफ लाइफ या रिसॉर्टची नक्की निवड करा. दार्जिलिंगमधल्या टी इस्टेटसमध्ये किंवा कूर्गच्या कॉफी प्लांटेशनमध्ये राहण्याचा एकदम वेगळा अनुभवही तुम्ही घेऊ शकता.मग भारतातला तुमचा प्रायव्हेट हॉलिडे कशा प्रकारचं हॉटेल निवडून अधिक इंटरेस्टिंग करायचा ते तुम्ही ठरवा आणि बाकी सगळं वीणा वर्ल्डच्या कस्टमाईज्ड हॉलिडेज टीमवर सोपवा.
Post your Comment
Please let us know your thoughts on this story by leaving a comment.