Published in the Saturday Lokasatta on 13 July 2024
...त्या सेल्समनला म्हटलं, ‘आय शूड सू यू फॉर नॉट मेकिंग द डिझाइन सुटेबल फॉर ऑल’. तोही तेवढाच मिश्किल, म्हणाला ‘दीज आर फॉर नॉर्मल पीपल’. सुनिला म्हणाली, ‘इना तुझे कान लहान आहेत...
‘येणार आहेस का वॉकला?‘ ‘नाही रे मला लिहायचंय आत्ता, अकरा वाजताची डेडलाइन आहे?‘ ‘ओके मी जातो, आज कशावर लिहितेयस?‘ ‘मॉर्निंग वॉक‘ मी बोलले अणि खुर्चीतून उठले. ‘सुधीर थांब, मॉर्निंग वॉक वर लिहायचं आणि मॉर्निंग वॉकला दांडी मारायची? ये नहीं हो सकता, बोले तैसा चाले‘ माझ्यात एकदम संत भावना जागृत झाली. खुर्चीत बसून मॉर्निंग वॉक वर बोलायचं हा विरोधाभास मला नको होता. मुकाट पण मनापासून आणि उत्साहाने उठले आणि मॉर्निंग वॉक करून आले. एकदा का वॉक झाला नं की अंगात हत्तीचं बळ संचारतं, मनात उत्साहाची कारंजी थुईथुई नाचायला लागतात, नवनवीन विचार सुचायला लागतात, दिवस कसा मस्त जातो. संध्याकाळी ‘लव्ह यू जिंदगी‘ असं आनंदाने म्हणावंसं वाटतं. आता एवढे ह्या मॉर्निंग वॉक चे फायदे आहेत पण त्या मॉर्निंग वॉक ची नित्यनेमाने सवय लागायला आयुष्याशी चाळीशी यावी लागली. मॉर्निंग वॉकसाठी नेमकी चांगली वेळ कोणती... सकाळी पाच ते सहा, सहा ते सात, सात ते आठ की आठ ते नऊ? ह्यावर चर्चासत्र झडली अगदी आजतागायत. मार्निंग वॉक साठी कोणते शूज चांगले? मध्येच जॉगिंग वा रनिंग करावंसं वाटलं तर? असे कंबाइन्ड बेनिफिट्सवाले शूज असतात का? मग शूजचा कलर कोणता घ्यायचा? दोन तीन रंगांचे दोन तीन ब्रँडेड कंपन्यांचे शूज घ्यायचे का? ह्यासाठी दुकानं धुंडाळण्यात बऱ्याच दिवसांमधला देशविदेशातला वेळ खर्ची घातला. जे शूजचं तेच कपड्यांचं. कॉटन की सिंथेटिक? लूज की घटट, अँकल लेंथ की शॉर्टस्? कलरफूल की ब्लॅक ॲन्ड व्हाइट? थंडीच्या मोसमासाठी हूडीस्टाईल काहीतरी पाहिजे नाही का आणि पावसाळ्यासाठी पाँचो की विंड चिटर! बापरे बाप कपाटाचा एक मोठा भाग ह्या मॉर्निंग वॉकच्या कपड्यांनीच भरला. बरं हे सगळं प्रकरण एवढ्यावरच थांबलं नाही. नव्या जमान्यात नवनवीन टेकी ॲक्सेसरीज आल्या आणि ‘मॉर्निंग वॉकच्या वेळी चालताना आपण स्मार्ट आणि एकदम न्यू एज पर्सन नको का वाटायला?‘ ह्या विचाराने ग्रासून मग रिस्ट वॉटर बॉटल, बेल्ट बॅग फॅनी पॅक, हेड बॅन्डस्, हॅट, आर्म बॅन्डस्, इयर मफ्स, हेड फोन्स वा एअर पॉड्स, नी सपोर्ट, ह्यांनी कपाटातली आणखी जागा व्यापली. हे सगळं घालून पहिल्या दिवशी मी जेव्हा वॉकला जायला तयार झाले तेव्हा मला ॲस्ट्रॉनॉट असल्यासारखं वाटलं. पाय, कंबर, मनगट, हात, गळा, डोकं, ह्या सगळ्याचा ताबा कोणत्यातरी वस्तूने घेतला होता. म्हणजे मॉर्निंग वॉकला जाताना हलकं वाटायच्या ऐवजी मी एखादी अवजड वस्तू असल्यासारखं मला वाटायला लागलं. परिणाम व्हायचा तोच झाला. मॉर्निंग वॉक बंद झाला. आधीच सगळ्या वस्तू शोधण्यात आणि आणण्यात दमछाक झाली होती आणि त्या घातल्यावर तर जडत्व आल्यासारखं झालं. त्यात माझा आणखी एक प्रॉब्लेम. वॉक करता करता मोबाइलवर पॉडकास्ट ऐकायचे तर त्यासाठी एअरपाडस नको का? पण माझ्या कानात काही केल्या एअरपॉड्स फिट होईना. मी आणि सुनिलाने युएसए मध्ये अनेक स्टोअर्स धुंडाळली पण माझ्या कानात जाणारे एअरपॉड्स काही मिळाले नाहीत. त्या ॲपलच्या सेल्समनला म्हटलं, ‘आय शूड सू यू फॉर नॉट मेकिंग द डिझाइन सुटेबल फॉर ऑल‘. तोही तेवढाच मिश्किल, म्हणाला ‘दीज आर फॉर नॉर्मल पीपल‘. सुनिला म्हणाली, ‘इना तुझे कान लहान आहेत. तू हलक्या कानाची‘. ऐकावं लागतं काहीही. जरी अर्थ वेगळा असला तरी इथे मी तो बदलला. हलक्या कानाची असल्याने, एका कानाने ऐकायचं दुसऱ्या कानाने सोडून द्यायचं. पण ॲपलने नाही केलं म्हणून काय झालं, सुधीर गेल्यावर्षी जर्मनीला गेला होता तिथून त्याने ‘शॉक्स‘ चे हेडफोन्स आणले आणि माझा प्रश्न सुटला. माझ्या कानांवर इलाज मिळाला. आता तर ‘बोस‘ कंपनीनेही कानाच्या पाळीला अडकतील असे इयरफोन्स आणले आहेत. ते कधी घेता येतील त्याची संधी मी शोधतेय. एका गोष्टीचं खूप समाधान वाटलं की आमच्यासारख्यांच्या ह्या सो कॉल्ड सबनॉर्मल ॲबनॉर्मल कानांवर कुणीतरी काम करीत होतं, आमची दखल घेत होतं आणि तिथेच जणू जग जिंकल्याचा आनंद मिळाला. नव्याचे नऊ दिवस प्रमाणे ह्या इतर ॲक्सेसरीज्वाल्या सगळ्या गोष्टी घालून मॉर्निंग वॉक करण्याचा उत्साह नऊ दिवसही टिकला नाही. मी ह्या वस्तूंच्या मार्केटिंगला बळी पडले, त्यांचं काम झालं होतं. पैसे घालवूनच नेहमी शहाणपण येतं तसं झालं आणि ह्या सगळ्या गोष्टींचा नाद सोडून मी नेहमीप्रमाणे माझ्या साध्या सिंपल अवतारात मोबाइल व शॉक्सच्या हेडफोन्सच्या साह्याने वॉक करू लागले आणि मग मॉर्निग वॉकला कधीही दांडी माराविशी वाटली नाही.
जगात फिरताना छोट्या केबीन साइजच्या बॅगसोबत फिरण्यात माझं आयुष्य गेलं. ‘जेवढं कमी सामान तेवढा जास्त आराम‘ हे तत्व अंगिकारलं. आणि प्रवास हेच माझं आयुष्य असल्याने ते सुखात गेलं. या छोट्याशा बॅगेत सुद्धा मॉर्निंग वॉकचा ट्रॅक सूट आणि स्विमिंग कॉश्चूम असायचा आणि असतो. शूज पायातच असायचे त्यामुळे फक्त एका फॉर्मल फूटवेअरला जागा द्यावी लागायाची. पर्यटकांना मी हा मिनिमलिझमचा सल्ला देत नाहीये कारण, त्यांनी अवश्य नटावं सजावं मिरवावं, भरपूर फोटोज् काढावेत ते फेसबूक इन्स्टावर टाकावेत आणि त्या सगळ्याचा मनसोक्त आनंद घ्यावा. पण तरीही खूप अवजड बॅग घेऊ नये, मीडियम साइजची फोर व्हिल सुटकेसच असावी. प्रवासात ओझी वाहून दमायचं नाही. आता तुम्ही टूरवर असताना मॉर्निंग वॉक करायचं म्हणाल तर ते तसं बहुतेकांना अशक्यच. त्यासाठी मग तुम्हाला कस्टमाईज्ड हॉलिडेचीच मदत घ्यावी लागेल. ग्रुप टूरमध्ये आम्हाला तुम्हाला एवढं काही दाखवायचं असतं की टूर ह्या प्रकारात मॉर्निंग वॉकला वेळच नसतो, अर्थात काही हौशी मंडळी ज्यांना लवकर उठायची सवय असते ते मॉर्निंग वॉकसाठी टूरमध्येही वेळ काढतात. एक मात्र लक्षात ठेवायचं की असं मॉर्निंग वॉकला जाताना सुरक्षित ठिकाणीच वॉक करायचा. निर्मनुष्य ठिकाणी जायचं नाही. टूर मॅनेजरला सांगून जायचं. सध्या जग टेक्नॉलॉजीमुळे आपल्या सर्वांसाठी सोप्पं झालंय पण तेवढंच ते होमलेस, ड्रगिस्ट, ठिकठिकाणी चाललेल्या युध्दांमुळे दुसऱ्या देशांचा आसरा घेतलेले स्थलांतरीत ह्यामुळे युरोपीयन अमेरिकन देशांमध्ये कायदा सुव्यवस्था आणि सुरक्षेचा प्रश्न अगदी ऐरणीवर आलाय. तसंच वॉक करताना फूटपाथ, झेब्रा क्रॉसिंग, सिग्नल्स ह्यांचाच आधार घ्यायचा, अधेमध्ये कुठेही क्रॉसिंग वा हायवेवर मॉर्निंग वॉक करायचा नाही. म्हणजे माझा हा मुर्खपणा किंवा अतिशहाणपणा करून झालाय, काही झालं नाही पण आता सर्रास जे काही घडताना दिसतंय त्याने अंगावर काटा येतो. युएसएमध्ये युरोपमध्ये कुठेही जिथे मी जायची तेव्हा मॉर्निंग वॉकचं भूत एवढं डोक्यावर असायचं की सकाळी सहा साडेसहा वाजता तडक बाहेर पडून किमान दिड तास वॉक करायचे. पंचेचाळीस मिनिटं जात रहायचं आणि तिथून मग मागे फिरायचं हा कार्यक्रम. रस्ते निर्मनुष्य असायचे, फक्त सुपरफास्ट गाड्या काय त्या आवाज करीत निघून जायच्या. अतिधाडस किंवा बेपर्वाइच होती ती, किंवा त्यावेळी जग एवढं असुरक्षित नव्हतं झालं त्यामुळे निभावलं असं म्हणता येईल. म्हणजे सगळंच जग असं असुरक्षित नाहीये बरंका, उगाचच घाबरायचं नाही. सावधगिरी बाळगायची, खबरदारी घ्यायची एवढंच. जगात अनेक ठिकाणी मॉर्निंग वॉक केला. पण मॉर्निंग वॉकसाठी आवडत्या जागा म्हणजे, स्वित्झर्लंडचं कोणतंही गाव, आपलं भारतातलं मनाली खासकरून हिडिंबा टेम्पलच्या मागचं पाइनफरचं जंगल, लंडनचं केन्सिंग्टन पार्क, स्कॉटलंड आणि न्युझीलंडमधलं कोणतंही गाव, ऑस्ट्रेलियाचा सिडनी हार्बर ब्रीज आणि ऑपेरा हाऊसचा परीसर अनेक ठिकाणं आहेत, पान भरेल त्यानेच पण ह्या ठिकाणी गेल्यावर मॉर्निंग वॉक केला नाही असं होत नाही. आपसूक जाग येते, आपोआप शूज चढवले जातात आणि आम्ही बाहेर पडतो वॉक घ्यायला.
काही दिवसांपूर्वी गोरगावहून शकूमाई चुरी आमची हितचिंतक आणि सासूबाईंची मावस बहिण त्यांना भेटायला आली होती. वय वर्षे नव्वद, पण जशी तिला मी तीस चाळीस वर्षांपूर्वी बघीतली तशीच. आवाज खणखणीत, बोलण्यातला उत्साह तोच, उभं राहणं एकदम सरळ, पाठीला अजिबात बाक नाही. ‘शकूमाईला म्हटलं, ‘काय खातेस तू आणि नक्की काय करतेस तर नव्वदीत मला तू अगदी तीस वर्षांपूर्वी होतीस तशीच दिसतेयस?‘ मला वाटलं भाज्या फळं डाएट असं सगळं आमच्यासारखं मोठ्ठं टाइमटेबल ती सांगेल. कारण मला ती जपान वा जगातल्या इतर ठिकाणच्या ‘ब्लू झोन्स‘ मधून आल्यासारखी वाटली. शकूमाईची आई, नानी म्हणायचो आम्ही ती आणि माझ्या सासुबाईंची आई ह्या दोघीही बहिणी अशाच कडक होत्या शेवटपर्यंत. म्हणजे जीन्स हा एक भाग होता. दुसरं काय हे ऐकायला आम्ही उत्सुक होतो. तसं डाएट असं काही नव्हतंच, ती सर्वप्रकारच्या भाज्याही खात नव्हती. पण एक गोष्ट तिने सांगितली ती म्हणजे वॉक. ती भरपूर चालते. मॉर्निंग वॉक-इव्हिनिंग वॉक-इन बिटविन वॉक हे शक्य तेव्हा ती करितच असते. त्या ठिकाणी बसलेल्या आम्हा सगळ्यांसमोर मॉर्निंग वॉकचं महत्व शकूमाईने उदाहरणासहीत धडधडित उभं केलं होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी आमच्या घरातले सर्वजण मॉर्निंग वॉकला बाहेर. लाँजॅविटीचं एक कारण कळलं होतं नं.
मागच्या आठवड्यात काश्मीरला श्रीनगरमध्ये झेलम नदीच्या काठावर नव्याने बांधलेल्या वॉटरफ्रंटवर आम्ही वॉक केला. एकतर खूप वर्षांनी कश्मीरला गेलो होतो. मिलिटन्सी आणि टेरेरिझम बोकाळायच्या आधी म्हणजे पंचवीस एक वर्षांपूर्वी बुलेवार्ड रोडला मॉर्निंग वॉक घ्यायचो आम्ही, नंतर अधूनमधून टूर्स जायच्या तेव्हा आर्मीचा खडा पहारा आणि मनात दबा धरून बसलेली एक अदृश्य भीती ह्यामुळे मॉर्निंग वॉकचा विचारही मनात यायचा नाही. आता काश्मीरचा छान कायापलट झालाय. आम्ही वॉक घेत असताना अनेक काश्मीरी मुली, महिला, सिनियर सिटिझन्स वॉक घेताना दिसत होते. काश्मीरमध्ये झालेल्या बदलाचा तो दाखला होता. मॉर्निंग वॉक शरीरासाठी मनासाठी चांगल्या विचारांसाठी, समाजासाठी आणि देशासाठी महत्वाचा घटक आहे असं मला वाटतं. शरीर तन्दुरूस्त तर मन सकारात्मक आणि त्यामुळे समाज आणि देश ताकदवान. आणखी एक कनेक्शन मॉर्निग वॉकचं मला मिळालं ते म्हणजे ज्या गावात, ज्या शहरात, ज्या राज्यात आणि ज्या देशात आपल्यासारख्या सर्वसामान्य जनतेला मॉर्निग वॉक घेता येतो ते गाव शहर राज्य आणि देश सुरक्षित.
Post your Comment
Please let us know your thoughts on this story by leaving a comment.