Published in the Saturday Lokasatta on 20 July 2024
...प्रत्येक शॉपमध्ये गेल्यावर जो दिसेल तो हॅप्पी बुध्दा बघत तो म्हणायचा, ‘हा चांगला आहे की’, आणि मी जणू माझ्या मुलासाठी मुलगी किंवा मुलीसाठी मुलाचा शोध करीत असल्यासारखी प्रत्येकामध्ये काहीतरी खोड काढत होते...
व्हिएतनामची आमची टूर संपत आली होती पण मला मनासारखा ‘बुदई‘ किंवा ‘हॅप्पी बुध्दा‘ किंवा ‘लाफिंग बुध्दा‘ची प्रतिमा मिळत नव्हती. व्हिएतनामध्ये ह्या हॅप्पी बुध्दाच्या इतक्या मोठमोठ्या प्रतिमा पाहिल्या की ह्याची एक छोटी प्रतिकृती आपण घेऊन जाऊया, ह्याने माझ्या मनात ठाण मांडलं. बरं आमच्या अपेक्षा नेहमीप्रमाणेच जास्त, ती प्रतिमा आडवी उभी दहा इंचच असावी, कारण व्हिएतनामवरून येणाऱ्या किमान एका सोवेनियरसाठी ती जागा राखून ठेवली होती. त्याचा रंग शक्यातोवर पांढरा व त्यावर थोडासा लाल हिरवा पिवळा चालेल कारण जिथे ठेवणार तिथे बॅकग्राऊंड ब्लू होती. तो खरोखरच हॅप्पी आणि वेलकमिंग दिसला पाहिजे. ह्या दहा दिवसांच्या टूरमध्ये आम्हाला बऱ्याच ठिकाणी हा हॅप्पी बुध्दा दिसत होता, जात होतो तिथे आम्ही सोवेनियर शॉपमध्ये ह्या बुध्दाला शोधत होतो. पण आमच्या कल्पनेतील गोरा गोमटा सुबक ठेंगणा गोड गोजिरा हसरा बुध्दा काही केल्या आम्हाला मिळत नव्हता. आम्हाला म्हणजे मला, सुधीरने माझ्या ह्या शोधकार्याला कधीच कोपऱ्यापासून नमस्कार केला होता. त्याचा उद्वेग एवढा वाढला होता की प्रत्येक शॉपमध्ये गेल्यावर जो दिसेल तो हॅप्पी बुध्दा बघत तो म्हणायचा, ‘हा चांगला आहे की‘, आणि मी जणू माझ्या मुलासाठी मुलगी किंवा मुलीसाठी मुलाचा शोध करीत असल्यासारखी प्रत्येकामध्ये काहीतरी खोड काढत होते. आणि शेवटी व्हायचं तेच झालं. माझी शोधलढाई हातघाईवर आली. व्हिएतनाममधला हो-चि-मिन्न मधला शेवटचा दिवस आला, दिवसही संपला आणि आमची व्हिएतनाममधली अगदी शेवटची संध्याकाळ आली. ‘नुविन हुवे‘ ह्या वॉकिंग स्ट्रीटवर आम्ही फिरत होतो. बुध्दा न मिळाल्याने मी मनातून थोडी नाराजच होते. दाखवू शकत नव्हते कारण सुधीरला कारण मिळालं असतं, ‘एवढा अट्टहास करण्याची काय गरज? कुठेतरी थोडं कॉम्प्रमाईज करायला कायं जातं?‘... काय काय ऐकावं लागलं असतं. त्यामुळे तोफ्लड दाबून बुक्क्यांचा मार मी सहन करीत होते. आता इथेतर एकही दुकान उघडं नाही, उद्या एअरपोर्टवर सोवेनियर शॉप मध्ये शोधूया म्हणत मी माझीच समजूत घातली आणि ‘हॅप्पी बुध्दा‘ची गोष्ट तात्पुरती मनातून काढून टाकीत स्वत:ला हॅप्पी बनवून टाकलं. ‘एन्जॉय द मोमेंट‘.
त्या वॉकिंग स्ट्रीटवर जणू जत्रा भरली होती. कुणी नाचत होतं, कुणी बागडत होतं, कुणी स्टॅचु बनून राहयलं होतं, तर बरेचसे पर्यटक एखाद्या पार्टीला आल्यासारखे छान छान ड्रेसेसमध्ये पोझेस देऊन वेगवेगळया ठिकाणी फोटोग््रााफी करीत होते. ते सगळं आम्ही कुतूहलाने बघत होतो. आमचेही थोडेफार फोटोज काढीत होतो.‘व्हेन इन व्हिएतनाम डू ॲज द व्हिएतनामीज् डू‘. एकंदरीत त्या स्ट्रीटने आमची संध्याकाळ हॅप्पी हॅप्पी बनवून टाकली. मागे वळूया का? आपण बरेच पुढेपर्यंत चालत आलोय हा विचार येऊ लागला. माहोल असा होता की पाय निघत नव्हता. तसंही उद्या विमानात आराम करू म्हणत आम्ही पुढे पुढे जात राहिलो. व्हिएतनामधला तो शेवटचा दिवस हावरटासारखा जणू आमच्या पोतडीत भरून घेत होतो. चालता चालता रस्त्याच्या उजव्या बाजुला आम्हाला एक मोठ्ठं बूकस्टोअर दिसलं जे सुरू होतं. पुस्तकांचं स्टेशनरीचं दुकान म्हणजे आमचा दोघांचा वीक पॉईंट. आम्ही आत घुसलो. आमच्याकडचे व्हिएतनामीज डाँग पण संपवायचे होते. उद्या विमानात वाचायला एक दोन पुस्तकं मिळाली तर बरं असा विचार करीत आम्ही त्या शॉपमध्ये फिरत राहिलो. वर खाली असं प्रचंड मोठ्ठं शॉप होतं. त्या त्या देशातल्या वा शहरातल्या अशा दुकानांमध्ये आपल्याला तिथल्या स्थानिकांचं जीवनमान उलगडतं. इथले लोकं त्यांच्या दैनंदिन जीवनात काय काय गोष्टी वापरतात, सणासुदिला काय सजावट करतात, इथल्या पेन्सिली पेन्स कलर बॉक्सेस वह्या कशा असतात ते बघायला मजा येते. मी दुकानाच्या अगदी आतल्या भागात आले आणि युरेका! मला तो दिसला. पांढऱ्या वस्त्रांमधला, मस्त हसणारा, आपल्या शिष्यगण परिवाराला अंगाखांद्यावर खेळवणारा, सिरॅकिमचा (प्लास्टिक वा फायबरचा नको होता), आणि उंचीला जेवढा हवा होता तेवढा! दहा इंचांच्या आत. मी अत्यानंदाने नाचायचीच बाकी होते. ‘अगर किसी चीज़ को दिल से चाहो तो पूरी कायनात उसे तुमसे मिलाने में लग जाती है‘ (बॉलिवूडशिवाय आपलं जीवन ते काय). मला पुन्हा एकदा ह्या डॉयलॉगमधल्या सत्याची प्रचिती आली. त्या बुद्धाला घेऊन आमचा परतीचा प्रवास सुरू झाला आणि मी शांत झाले. बुद्धा आमच्या घरातल्या त्या जागी बसून आम्हाला त्याच्याशी जोडलेल्या आठवणींना उजाळा देत आणि ‘हसत रहा‘चा संदेश पोहोचवत आमच्या लिव्हिंग रूममध्ये विराजमान झालाय.
पुर्वी आपल्या घरांमध्ये एक शोकेस असायचीच असायची. धूळ जाऊ नये म्हणून त्याला स्लायडिंग ग्लास असायची. आणि असंच कधी प्रवासाला गेलो की काहीतरी सोवेनियर आणलं जायचं आणि ते त्या शोकेसमध्ये विराजमान व्हायचं. कधीतरी त्यातल्या वस्तुंच्या मागे दडलेली गोष्ट आपल्याला सांगितली जायची आपल्या आजी-आजोबांकडून किंवा आई-बाबांकडून. ती शोकेस साफ करणं, वस्तुंवरची धूळ पुसणं हा कार्यक्रम असायचा. आणि ते करताना एखादी गोष्ट फुटली तुटली की जो काही जमदग्नीचा अवतार मोठी मंडळी धारण करायची की विचारू नका. आमच्या घरातल्या त्या शोकेसचा एकच प्रकार मला आवडायचा नाही आणि तो म्हणजे त्याच्या काचा इतक्या घट्ट असायच्या की त्या सरकता सरकायच्या नाहीत. कालांतराने ह्या स्लाइडिंग ग्लासेस जाऊन काचेची दारं आली. दारांवाली शोकेस जास्त सोपी झाली. मध्ये एक जमाना असा आला की घरात अशी शोकेस वैगेरे असणं म्हणजे अनेक आर्किटेक्ट्सच्या मते थोडं ‘चीप‘ असणं किंवा दिसणं. त्यामुळे घरातनं `शोकेस’ ह्या प्रकाराची गच्छंती झाली आणि वेगवेगळ्या जागा निर्माण करण्यात आल्या आर्टपिसेससाठी, ओपनमध्ये. कधी मग त्यावरचा एखादा आर्टपिस हात लागून पडण्याच्याही प्रसंगांना सामोरं जावं लागलं. घरात इंटिरीयर करताना मार्केटमधून विकत घेतलेल्या ह्या महागड्या शोपीसपाठी कोणत्याही आठवणी जोडलेल्या नसल्याने फक्त श्रीमंतीचा देखावा असायचा तो. त्यामुळे ते काही फार काळ घरात टिकलं नाही. त्याहीपुढे मॉडर्न आर्किटेक्चरमध्ये मिनिमलीझमचा शिरकाव झाला. जेवढ्या कमी गोष्टी घरात तेवढं घराचं इंटिरियर आणि त्यात राहणाऱ्यांची टेस्ट उच्च दर्जाची ही समजूत वा वास्तव डोकं वर काढू लागलं. ह्या सगळ्या वैचारिक उलथपालथीचं पचन होत असताना आमचा प्रवास वा पर्यटन वाढत होतं. प्रत्येक शहरातून किंवा देशातून येणारी किमान एक वस्तु घरातल्या वस्तु वाढवत होती.
वस्तु आणायच्याच नाहीत असं होतंच नव्हतं. आणि तसं करणंही योग्य नव्हतं. प्रत्येक ठिकाणाहून काहीतरी आणणं म्हणजे तिथल्या आठवणी आपल्या सोबत आणणं. बघानं आज हॅप्पी बुध्दावर लिहिताना गेल्या वर्षीची व्हिएतनामची टूर डोळ्यासमोर उभी राहिली. शेवटी आयुष्यात अशाच छान छान आठवणी जमवत राहणं महत्वाचं. सो, ह्या वस्तुंचं करायचं काय हा प्रश्न होताच. मिनिमलीझमचा फंडा थोडासा बाजुला ठेवला आणि घरात बूकशेल्फ-कम- शोकेस बनवून टाकली. त्यातील ओपन शेल्व्हज्मध्ये जगभरातल्या सगळ्या छोट्या मोठ्या वस्तु माववल्या. घरात एकटं असलं, कधी थोडं उदास वाटायला लागलं की ह्या बूकशेल्फसमोर बसायचं आणि कधी कुठे ही वस्तु घेतली त्याची मनातल्या मनात उजळणी करायची. औदासिन्य वा एकटेपण कुठच्याकुठे पळून जातो. ओटीटी समोर बसण्यापेक्षा हा टाइमपास कधीही जास्त रीफ्रेश करतो.
आमच्या ऑफिस टीममधल्या रोशनी बागवेला फ्रीज मॅग्नेट्स जमविण्याची प्रचंड आवड. तिच्या घरी इतकी फ्रीज मॅग्नेट्स जमली की विचारू नका. त्याचा अर्थ तिने आजपर्यंत खूप देशांना आणि शहरांना भेट दिली. एक दिवस तिने कॉर्पोरेट ऑफिसमध्ये एच आर ला गळ घातली की, ‘मला एक मॅग्नेटिक बोर्ड द्या मोठ्ठासा, मला ही मॅग्नेट्स आपल्या ऑफिसला बहाल करायची आहेत‘. आता हा मौका कोण सोडणार. एच आर ने लागलीच तिला एक भिंत दिली आणि त्या मॅग्नेटिक बोर्डवर तिची सगळी फ्रीज मॅग्नेट्स स्थानापन्न झाली. आता मलाही बाहेर कुठे गेले की फ्रीज मॅग्नेट आणण्याचं वेड लागलंय, आणायचं आणि त्या बोर्डवर चिकटवायचं. परवा आमच्या टूर मॅनेजमेंट म्हणजे टूर मॅनेजर्सना सांभाळणाऱ्या टीमच्या डीपार्टमेंटमध्ये गेले होते, तेव्हा मला तिथे एक बोर्ड दिसला ज्यावर वेगवेगळ्या देशांच्या कीचेन्स लावलेल्या होत्या. तिथल्या राजीव, श्रीकृष्ण आणि संदीपला विचारलं की कुणी एवढं हे छान क्रिएशन केलंय तर म्हणे टूर मॅनेजर्स ह्या कीचेन्स आणून देतात त्यांनी एखाद्या नवीन देशात पाय टाकला की त्याची आठवण म्हणून. अरे वाह! ह्या `माइलस्टोन कीचेन्स’ आहेत तर. थोडक्यात आपण कळत न कळत आठवणींची साठवण करीत असतो ती अशी.
आपल्या जुन्या डायऱ्या वा स्क्रॅप बुक्स किंवा आपला जूना पासपोर्ट चाळताना वेळेचं भान रहात नाही एवढ्या आठवणींमध्ये आपण गुंतून जातो. आमच्या बऱ्याचश्या ऑफिसेसमध्ये भींतीवर एक मॉडर्न सुविचार लिहिलाय, `ऑफ ऑल द बूक्स इन द वर्ल्ड, मोस्ट ब्युटिफूल स्टोरीज आर फाऊंड बिट्विन द पेजेस ऑफ द पासपोर्ट’ आपण अनेकांनी हे अनुभवलं असेल. पासपोर्ट वरचे शिक्के आपल्या पर्यटनाचे अनेक किस्से आपल्याला सांगत असतात. बघातर कधीतरी आपला पासपोर्ट उघडून, आठवणीच आठवणी आपल्या पायाशी रूंजी घालतील. आनंदी आठवणींच्या पोतडीसोबत आयुष्य घालवायचं असेल तर वर्तमानातल्या प्रत्येक क्षणावर काम केलं पाहीजे. कारण आज जे काही करतोय ते पुढच्या क्षणाला आठवण बनणार आहे. तेव्हा चला, आठवणी आनंदी बनवूया.
वीणा पाटील, सुनीला पाटील, आणि नील पाटील ह्यांचे दर आठवड्याला वृत्तपत्रात प्रकाशित होणारे लेख वीणा वर्ल्ड वेबसाईट www.veenaworld.com वर वाचनाकरिता उपलब्ध आहेत.
Post your Comment
Please let us know your thoughts on this story by leaving a comment.