Published in the Saturday Lokasatta on 06 July, 2024
प्रत्येक गोष्ट कशी असायला हवी किंवा ती तशीच असायला हवी यासाठी तो आग्रही असायचा किंवा त्याचा अट्टाहास इतक्या पराकोटीचा असायचा की त्याच्या स्टोरीज आजही चघळल्या जातात...
अकरा वर्षांपुर्वी जेव्हा वीणा वर्ल्ड सुरू झालं तेव्हा आम्ही प्रथम भारताचा दौरा केला. आमची भारत जोडो यात्रा होती ती जणू. त्यानंतर जगाच्या सफरीवर आम्ही कूच केलं. वीणा वर्ल्डच्या नव्या कोऱ्या दृष्टीकोनातून जग बघायचं होतं. माझी पहिली सफर होती युएसए ची पंधरा दिवसांची इस्ट टू वेस्ट टूर. शिल्पा मोरे जी आता वीणा वर्ल्डची जनरल मॅनेजर आहे ती पण होती सोबत आणि आमचा टूर मॅनेजर होता दिनेश बांदिवडेकर. टूर मॅनेजर म्हणून टूर करण्याचे आमचे दिवस संपले होते आणि गरजही नव्हती कारण आमच्यापेक्षा जास्त चांगल्या टूर्स करणाऱ्या टूर मॅनेजर्सची मोठी फौज जी निर्माण होत होती. गेल्या अकरा वर्षात आम्ही स्वत: भरपूर प्रवास केला वेगवेगळ्या नवनव्या टूर्स सेट करण्यासाठी तसंच वीणा वर्ल्डच्या टूर्सबरोबरही प्रवास केला, कारण टूर्स कितीही चांगल्या तऱ्हेने आखल्या तरी त्याची अंमलबजावणी व्यवस्थित आपल्याला आणि पर्यटकांना हवी तशी होतेय की नाही हे पर्यटक म्हणून त्यांच्या दृष्टीकोनातून बघणं महत्वाचं आहे. यावर्षीही आम्ही वीणा वर्ल्डच्या काही टूर्सबरोबर जातोय. आतातर आम्ही सिनियर सिटीझन्स बनल्यामुळे आमचा टूर्सकडे बघण्याचा दृष्टीकोन बदललाय त्यामुळे वीणा वर्ल्ड जास्त `अंडर ऑव्झर्वेशन’ आहे. असो, तर आम्ही त्या युएसए टूरला न्यूयॉर्कपासून सुरुवात केली. पहिलं साइटसीईंग होतं स्टॅच्यु ऑफ लिबर्टी. तिथे गेलं की कुणाच्याही `डोळ्यांचं पारणं फिटलं’ अशी गत होते. आम्ही सर्व सहप्रवासी एकमेकांचे फोटो काढण्यात मग्न होतो. मी एका ताईंना असंच जस्ट विचारलं, `काय कसं वाटतंय?’ तर त्यांना एकदम रडूच आलं. मला कळेचना काय झालं. ताईंजवळ बसले आणि विचारलं तर म्हणाल्या,`आयुष्यातली सर्वात मोठी इच्छा आज पूर्ण झाली. पैसे साठवले होते ह्यासाठी. आज विश्वास बसत नाहीये की मी खरंच स्टॅच्यु ऑफ लिबर्टीच्या समोर उभी आहे. याजसाठी केला होता अट्टाहास’. आनंदाचे अश्रू होते आणि पूर्णतेचा अट्टाहास. माझ्या पर्यटन आयुष्यात पंधरा वर्ष मी टूर मॅनेजरशीप केली. टूरिस्ट म्हणून विदेशातल्या टूरिस्ट कंपन्यांबरोबर टूर्सही केल्या आणि ह्या सततच्या जगभ्रमंतीत, `याजसाठी केला होता अट्टाहास’ हे वाक्य मी अनेकदा कानांनी ऐकलंय आणि डोळ्यांनी बघितलंय. बऱ्याचदा मी तर `ऑब्झर्वेशन मोड’ मध्ये जाते. पर्यटक त्यांच्या त्या स्वप्नपूर्तीतल्या एखाद्या वर्ल्ड वंडरकडे बघत असतात आणि मी त्यांच्या नकळत त्यांच्या त्या आनंदाकडे बघत असते. नायगारा फॉल्स, आयफेल टॉवर, ताजमहाल बघताना लोकांच्या डोळ्यांतून असे आनंदाश्रू आपसूक ओघळताना मी पाहिलेत. जेव्हा अशा अनेक ठिकाणी मी पहिल्यांदा गेले तेव्हा माझीही अवस्था तशीच होऊन जायची किंवा जाते. जगाच्या एखाद्या टोकावर गेल्यावर जो सुकून मिळतो तो केवळ अतुलनीय. आपलं केप कॅमोरिन, आफ्रिकेतलं केप ऑप गूड होप, ऑस्ट्रेलियातलं केप लेउविन, साऊथ अमेरिकेतलं चिली मधलं केप हॉर्न, पार्तुगालचं केप साग्रेस, नॉर्थ पोल कडे बघणारं नॉर्थ केप... अशी शहरं किंवा ते अनेक राहिलेले पाईंट्स बघण्याची इच्छा आता मनात प्रबळ होतेय. माझा यापुढचा अट्टाहास हा कदाचित त्यासाठी असेल.`अट्टाहास’ चांगला की वाईट? अट्टाहास करावा की करू नये? संत तुकाराम महाराजांनी रचलेला आणि पंडीत भीमसेन जोशींच्या आवाजातील `याजसाठी केला होता अट्टाहास। शेवटचा दिस गोड व्हावा।।‘ हा अभंग तर स्वर्गसुखाचा आनंद देतो. पण तरीही घरात कार्यालयात मित्रमैत्रिणींमध्ये `आपण ह्या बाबतीत तुझा इतका अट्टाहास का?’ असं म्हणतो. बऱ्याचदा हटवादीपणाकडे घेऊन जाणारा हा शब्द वाटतो किंवा त्याचा वापर आपण ॲडॅमन्सी, स्टबर्ननेस दाखविणाऱ्यांसाठी करतो. आता बघानं घरात आईवडिलांनी मुलामुलींना त्यांना काय करायचंय ते विचारात न घेता स्वत:च्या इच्छा त्यांच्या माथी मारल्या आणि त्याप्रमाणे मुलांना वागायला लावलं तर तो हटवाद झाला किंवा अट्टाहास, मला किंवा आम्हाला जसं हवंय तसं दुसऱ्यांनी करायला किंवा वागायला पाहिजे असा. म्हणजे जर मुलांना जे करायचंय, ज्यात त्यांना गती आहे, जे ते उत्कृष्टरित्या करू शकतात ते जाणून घेऊन त्यांच्या उत्कर्षासाठी घरातलं वातावरण पोषक केलं आणि मुलांनी जर अंतिमता ती गोष्ट अचिव्ह केली तर त्या स्वप्नपूर्तीच्या दिवशी आपण सर्वजण मिळून म्हणू, `याचसाठी केला होता अट्टाहास.’ शब्द तोच पण भावनेमध्ये जमीन अस्मानाचा फरक. अर्थात मुलांना जर दिशा कळत नसेल किंवा मिळत नसेल तर मग तिथे योग्य मार्ग दाखविण्यासाठी आईवडिलांनी अट्टाहास केला तर तो हवाहवासा अट्टाहास. व्यवसायात कार्यालयात हीच गोष्ट वेगळ्या अर्थाने पण दिसते. जो लीडर असतो, म्हणजे चांगला दूरदर्शी लीडर, तर कधीकधी त्याला व्हेटो वापरावा लागतो. कारण अंतिम रीझल्ट त्याला दिसत असतो वा माहित असतो. मला स्टीव्ह जॉब्ज्ची आठवण झाली. प्रत्येक गोष्ट कशी असायला हवी किंवा ती तशीच असायला हवी यासाठी तो आग्रही असायचा किंवा त्याचा अट्टाहास इतक्या पराकोटीचा असायचा की त्याच्या स्टोरीज आजही चघळल्या जातात. पण त्याचा तोच अट्टाहास अशी काही निर्मिती करून गेला की आजही कुणाला त्या क्रिएशनला शह देता येत नाहीये. डीटेलिंग, प्रिसिशन, डिझाइन, डीसेन्सी, एलिगन्स ह्याचं मोजमाप जणू ॲपलने घालून दिलंय. स्टीव्ह जॉब्जच्या अतिरेकी अट्टाहासाला मी कन्स्ट्रक्टिव्ह अट्टाहास म्हणेन, जो जरूरीचा असतो अनेक ठिकाणी. माणसं आणि ऑर्गनायझेझनप्रमाणे समाजही ॲडॅमंट किंवा अट्टाहासी असतो. पुर्वी नाही का लग्न झाल्यावर मुलींचं नाव बदलायची प्रथा होती. ती का होती हे मला अजूनही कळलं नाही. मला तर आडनाव पण बदलायचं नव्हतं, पण त्यावेळी सामजिक चौकट तेवढी मोकळी ढाकळी झाली नव्हती. मग मी मनात प्रार्थना करायचे मला पाटील आडनावाचाच पतीदेव मिळू दे. देव मनोमन केलेली प्रार्थना ऐकतो त्याप्रमाणे माझी इच्छा पूर्ण झाली आणि सुधीर पाटील मुळे मी सासर माहेरची पाटीलच राहिले. आता बरं झालंय, मुली मुलींचं नाव पुढे नेतात. लग्नानंतरही ते बदलत नाहीत. म्हणजे तो मुलींचा पुर्णपणे स्वत:चा प्रश्न आहे नाव बदलायचं की नाही ते. पूर्णपणे त्यांच्या मतावर, त्यावर कुणाची सक्ती नको. आतातर मुलांची नावं सुद्धा आई-वडील दोघांच्या आडनावाची झालीयत. आमच्या नातीच्या नावाचा प्रस्ताव आला तेव्हा मला तीस पस्तीस वर्षांपुर्वीची मी आठवले. मला सुद्धा हेच हवं होतं की. आता त्याला इक्वालिटी वा समानता ही कोफ्लदणं लागलीयत. पण प्रत्येक मुलीची मनीची इच्छाही `माझं नाव आडनाव पुढे जावं‘ ही असतेच, भले अजूनही ती खुलेआम ते बोलू शकत नसेल किंवा तिच्या मनी ती सुप्त इच्छा तशीच राहून जात असेल. बाबाचं नाव नाही आईचं नाव नाही आणि दोघांचीही आडनावं घेऊन आमची नात, `राया जांगला पाटील’ झाली. सेम सेम पॉवर डिस्ट्रिब्युशन. कायदेशीररित्या हे अलाऊड आहे की नाही ह्यासाठी मात्र मी आमचे सर्वेसर्वा ॲडव्होकेट संजय खेर ना फोन करून विचारलं की कायद्याने ह्यात काही आडकाठी नाही नं? त्यांनी ग्रीन सिग्नल दिल्यावर नील आणि हेताच्या मनासारखं झालं, आम्हीही खुश झालो, आपल्या मुलांनी सामाजिक वहिवाटीला `असं का?’ हा प्रश्न केला आणि स्वत:साठी तो प्रश्न सोडवला. आणि जर का हा अट्टाहास असेल नील हेताचा तर तो मला सकारात्मक वाटला. मुलगा मुलगी, सासर माहेर मधला भेदभाव मिटवून टाकणारा दिसला आणि अशा गोष्टींमध्ये आपण पुढच्या पिढीला मनापासून पाठिंबा दिला पाहिजे. आणि स्पेनमध्ये ती पद्धत ऑलरेडी आहे.माणसं, संस्था समाजानंतर येतो तो देश. देशसुद्धा कधी कधी अट्टाहासाची परिसीमा ओलांडतात आणि मग देशादेशांमधले ताणतणाव वाढायला लागतात. आत्ता जगात म्हणे छोटीमोठी पस्तीस युद्ध सुरू आहेत. कुणाच्यातरी डिस्ट्रक्टीव्ह अट्टाहासाचाच तो परिणाम. लिहिता लिहिता मला देशांचा एक मजेशीर अट्टाहास निदर्शनास आला. म्हणजे तुम्ही म्हणाल ह्या लेखनाला एक दिशा नाहीये, कुठूनही कुठेही उडी मारते मी. पण मी लेखिका नसल्याने लेखनाचे नियम पाळण्याचं बंधन मला नाही. परवा माझ्या लेखनाला ठाणे वैभवचे मिलिंद बल्लाळ ह्यांनी `मुक्तचिंतन’ म्हटलं. तो शब्द मला आवडला. त्यामुळे त्याचा आधार घेऊन मी घरातल्या वा मित्रमंडळीमधल्या गप्पांसारख्या लिखाणाची दिशा हवी तिथे वळवते. अर्थात माझं हे मजेशीर ऑव्झर्वेशन अट्टाहासाला धरूनच आहे. आणि आपल्या भारतीय मंडळीची ती एक डोकेदुखी आहे. अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, इग्लंड सर्वत्र टॉयलेटमध्ये जेट स्प्रे का नसतो? हायजिनच्या-क्लीनलिनेसच्या गप्पा मारणारी ही लोकं ह्या बाबतीत एवढी मागसलेली का? एकीकडे ग्लोबल वॉर्मिंग वा निसर्गाचं संवर्धन ह्यावर मोठमोठी भाष्य करायची पण टॉयलेट पेपरपाठी खर्च होणारी निसर्गसंपदा दुलर्क्षित करायची. माझ्या सर्वसामान्य मनाला हा विरोधाभास नाही स्विकार करता येत. बरं तुम्ही जगात सर्वात पुढारलेले म्हणवून घेता मग जपानसारखे ऑटोमॅटिक बिडे वापरा. अरेबियन, मुस्लिम आणि भारत देशांमध्ये जेट स्प्रे सर्रास वापरला जातो. आणि तो सर्वात चांगला सोपा स्वच्छ प्रकार आहे. जेट स्प्रे जन्माला यायच्या आधी लोकांनी अनेक मजेशीर उपाय शोधले होते पण आता ह्या जेट स्प्रे ने सर्वच प्रश्न सोडवले. गेली तीस पस्तीस वर्ष हे जेट स्प्रे प्रकरण आपल्या देशामध्ये प्रचलित आहे पण पाश्चिमात्य देशांना त्याचं अनुकरण करावसं वाटलं नाही. इथे मला ॲडॅमन्सी किंवा त्यांचा टोकाचा अट्टाहास वाटतो. असंही वाटतं की, स्वत:ला सर्वज्ञ मानणारे हे देश पूर्वेकडच्या देशाकडून चांगल्या गोष्टी घ्यायला कमीपणा मानत असावे. आजही तिथे निर्माण होणाऱ्या नविन घरामध्ये जेट स्प्रे प्रोव्हिजन नाहीय. त्यांचा टॉयलेट पेपर आणि त्याचा अट्टाहास त्यांनाच लखलाभ. एक मात्र खरं की सकारात्मक किंवा नकारात्मक, कन्स्ट्रक्टिव्ह किंवा डिस्ट्रक्टिव्ह ह्यापैकी आपण कोणत्या अट्टाहासाकडे झुकतो हे आपण सतत चेक केलं पाहिजे.
वीणा पाटील, सुनीला पाटील, आणि नील पाटील ह्यांचे दर आठवड्याला वृत्तपत्रात प्रकाशित होणारे लेख वीणा वर्ल्ड वेबसाईट www.veenaworld.com वर वाचनाकरीता उपलब्ध आहेत.
Post your Comment
Please let us know your thoughts on this story by leaving a comment.