Published in the Saturday Lokasatta on 10 February, 2024
...त्याच वेळी काम न केल्याने ती दहा वर्षं‘घरात देवघर नाही’ ह्या कधीतरी डोकावणार्या विचारात आणि त्याने स्वत:ला कोसण्यात गेली...
जानेवारी महिना म्हणजे वीणा वर्ल्डमध्ये सॅलरी रिव्हिजनचा महिना. एच-आर फुल्ल ऑन असतं सगळ्यांची कुंडली मांडण्यात, मॅनजर्स गॅसवर असतात. खरंतर हा सगळा व्याप कमी झाला पाहिजे हे दरवर्षी वाटतं. अमेरिकन पद्धतीप्रमाणे इन्फ्लेशन प्लस वन पर्संट असंच असायला हवं हे आम्ही दरवर्षी ठरवतो पण येरे माझ्या मागल्या. वर्षभरात कुणीतरी अपेक्षेपेक्षा चांगलं काम केलेलं असतं. एखादा उभरता हुआ तारा कुठेतरी दिसत असतो तर एखाद्याचा परफॉर्मन्स उतरंडीवर आलेला असतो. त्यामुळे कितीही केलं तरी सर्वांना एकच मोजमाप नाही लावता येत. अमेरिकेत हायर अँन्ड फायर अशी बेभरवशाची संस्कृती तर जपान अगदी आत्ता आत्तापर्यंत एकदा एखाद्या संस्थेशी नातं जुळलं की आयुष्यभर माणसं तिथेच चिकटलेली असा. भौगोलिकदृष्ट्या आपला भारत ह्या पश्चिम आणि पूर्व संस्कृतींच्या मध्यावर असल्याने आपल्यात दोन्हीचा सार उतरलेला. त्यामुळे आपण सॅलरी इन्क्रिमेंट ह्या तसं बघायला गेलं तर टेक्निकल गोष्टीकडे भावनिक दृष्टीने बघतो, प्रत्येक व्यक्तीचा टीम मेंबरचा विचार करतो, वेळ लागतो हे सगळं करायला. पण शेवटी प्रत्येक व्यक्ती महत्वाची. एक एक टीम मेंबर मिळून तर संस्था बनते. हा सगळा एक्झरसाइज सुरू असताना मॅनेजर्स, सिनियर मॅनेजर्स, जनरल मॅनेजर अशी सर्व मंडळी सखोल विचार करीत असतात. शेवटी शेवटी आम्हीही आखाड्यात उतरतो आणि जिथे ’टू बी ऑर नॉट टू बी’ सारखी परिस्थिती असते तिथे इनपुट देतो. त्या चेंबरमध्ये काही माणसांवर किंवा टीम मेंबर्सवर खूप चर्चा होते. वेगवेगळे मतप्रवाह असतात. कुणी त्या टीम मेंबरविषयी स्पष्टीकरण देत असतं तर कुणी डोकं धरून बसलेलं असतं. ह्या सगळ्या प्रकारात एक जाणवलं किंवा त्या निष्कर्षाप्रती मी पोहोचले ते म्हणजे कोणत्याही माणसावर किंवा टीम मेंबरवर खूप चर्चा व्हायला लागली की ती अलार्मिंग सिच्युएशन समजावी. ती व्यक्ती ऑर्गनायझेशनमध्ये हवी की नको? जस्ट जॉब म्हणून ती व्यक्ती इथे आहे की आपलं डिपार्टमेंट अलॉकेशन चुकलंय? की त्या टीम मेंबरची करियर लाइनच चुकलीय? म्हणजे रीक्रृट-रीव्हयू-रीलोकेट-रीलिज’ ही पद्धत प्रत्येकाच्या बाबतीत वापरली जाते तरीही जर एखाद्या मेंबरविषयी एवढं डिस्कस करावं लागत असेल तर वुई हॅव टू डू समथिंग अबाऊट इट. खितपत पडायचं नाही माणसांनी ऑर्गनायझेशनमध्ये आणि ऑर्यनायझेशनने माणसांमध्ये. एकदुसर्यांपासून मोकळे होऊया आणि काहीतरी आणखी छान करूया आपल्या आयुष्याचं. थोडा टोकाचा विचार वाटेल पण लाँग टर्ममध्ये तो दोन्ही पार्ट्यांच्या हिताचा असतो.
साध्या साध्या गोष्टी असतात. परवाच एक किस्सा घडला. ऑफिसमध्ये एका टोकाला मी बसते तर दुसर्या टोकाला सुधीर सुनिला नील. कधीतरी आम्ही मध्ये भेटतो आणि वॉटरकूलर टॉक्स म्हणजेच नळावरच्या गप्पा सुरू होतात. बाजूलाच एक वॉशरूम आहे. सुनिला म्हणाली, "अरे ह्या वॉशरूममध्ये एक छोटं कपाट पाहिजे. कपडे ठेवायला, युनिफॉर्म टी शर्ट टांगायला काहीच नाहीये. काहीतरी असायला हवं नाही का? आणि मग आमच्या लक्षात आलं की दरवर्षी त्या बाथरूमच्या बाबतीत आम्ही ही चर्चा करतो. म्हणजे आत गेल्यावर ’अरे किती हा पसारा इथे? कपाट का नाही?’ ह्या विचाराने त्रासतो, बाहेर आल्यावर कामाच्या दबडग्यात विसरून जातो ते वॉशरूम थॉट्स. आठ नऊ वर्ष गेली ह्या वैचारिक त्रासात. खरं तर एक इन्स्ट्रक्शन अॅडमिनिस्ट्रेशनला दिली असती तर आठ दहा दिवसांत ते काम फत्तेह झालं असतं, पण ते काम त्यांना न सोपवल्यामुळे आठ दहा वर्षांचा हा त्रास आम्ही सोसला.
’देव मनात असतो’ हा विचार मनात एवढा चपखल बसलाय की त्याचा अतिरकेच झालाय म्हणायचा. अनेक घरं आम्ही बदलली. प्रत्येक वेळी घरात छोटं मोठं इंटिरियर व्हायचं. घरात आल्यावर डोक्यात प्रकाश पडायचा अरे आपण देवघरच केलं नाही, देव मनात असतो नं. कुठच्यातरी अशाच एका घराच्या इंटिरियर नंतर ’देवाशी प्रतारणा नाही, घरात देवघर पाहिजेच’ ह्या विचाराने मला ग्रासलं आणि मी तडक प्रभादेवीच्या आकार आर्ट गॅलरीत जाऊन पोहोचले. अनेक वर्षं त्यांच्या शोरूममधली मोठ मोठी देवघरं जाता येता दिसत होती. आत गेल्यावर एक देवघर सिलेक्ट केलं. आता पैसे द्यायचे आणि घेऊन जायचं एवढाच मामला होता. पण त्या सेल्स पर्सनने म्हटलं, "हा आमचा डिस्प्ले पीस आहे, तुम्ही अॅडव्हान्स भरा, दोन महिन्यांत डिलिव्हरी मिळेल."अरे बापरे! ’आज अभी इसी वक्त’ वाल्या माझ्या मनाला दोन महिने हा प्रचंड कालावधी वाटला आणि मी ऑर्डर न करता शो रूम मधून बाहरे आले आता सांताक्रूझला जाऊन मार्बलचं देवघर घेऊन जाऊया हा विचार करीत. वाटेत काहीतरी काम निघालं आणि सांताक्रूझला जाणं राहिलं आणि मार्बलचं देवघरही. म्हणता म्हणता दहा वर्षं निघून गेली पण देवघर काही आलं नाही. शेवटी दहा वर्षांनी पुन्हा मी त्याच शोरूममध्ये गेले, मुकाट पैसे भरले आणि दोन महिन्यांनी ते देवघर आमच्या घरात आलं. त्याच वेळी काम न केल्याने ती दहा वर्षं ’घरात देवघर नाही’ ह्या कधीतरी डोकावणार्या विचारात आणि त्याने स्वत:ला कोसण्यात गेली.
घरात कार्यालयात अशा खूप गोष्टी असतात ज्या आपल्याला खटकत असतात. आपण कम्प्लेंट करीत असतो त्याबाबतीत आणि दिवसातली आपली बरीचशी शक्ती त्यात खर्च होत राहते. हे खटकणं, तक्रार करणं, हळूहळू काळजीचं रूप धारण करतं आणि त्याला आपण सध्याचा फॅशनेबल शब्द वापरतो ’स्ट्रेस’. मागे एक जण म्हणाले, "तुमच्या ऑर्गनायझेशनमधला स्ट्रेस घालवायला आम्ही मदत करू." त्यांना म्हटलं, "थँक्यू, पण आम्ही आता अनेक वर्ष खर्ची घातल्यानंतर ह्या विचाराप्रती पोहोचलोय की, ’जस्ट डू द राइट थिंग्ज अॅट फर्स्ट प्लेस. हा सो कॉल्ड स्ट्रेस म्हणून जो काही आहे तो ऑर्गनायझेशनमध्ये घुसणारच नाही ह्यावर आम्ही काम करतोय.’ म्हणजे नेमकं काय करतोय तर ऑर्गनायझेशनमध्ये संपूर्णपणे ट्रान्स्पेरन्सी आणतोय. निर्णय बर्यापैकी वेळेत घेतले जाताहेत. निर्णय घेताना पास्ट प्रेझेंट फ्युचर मधील अनुभवांसोबत सर्व फॅक्ट्स समोर ठेवून सर्वांगाने विचार करून योग्य निर्णय घ्यायचा प्रयत्न करतो. कधी अनबन-मतांतरं-बौधिक वैचारिक विवादही होतील पण त्याची अपरिहार्यता लक्षात घेऊन एकत्र येऊन गोष्टी सोडवीत असतो. ’बी ऑन द सेम पेज’ हे आमच्या नीलचं कायम सांगणं असतं सर्वांना. त्यात आता हेताने ’अग्री टू डीसॅग्री’ ह्या थिअरीची माहिती करून दिलीय. प्रत्येक वेळी सर्वांचंच एकमत होईल असं नाही पण निर्णय खोळंबला नाही पाहिजे आणि उगाचच आर्ग्युमेंट्समध्ये वेळ जायला नको म्हणून गोष्टी पुढे जाण्यासाठी काही मंडळी ’अग्री टू डीसॅग्री’ असा पावित्रा घेतात. आणि ते आता कॉर्पोरेट जगतात चांगलंच रुजलंय. घरात म्हणाल तर ’नेहमी मीच का पडतं घ्यायचं?’ ही सिच्युएशन, हा हा हा! आम्ही ऑफिसमध्ये ओपन हाऊस सुरू केलंय, कोणीही या आणि भेटा. ह्यामध्ये अगदी नवीन मंडळीही आम्हाला भेटतात आणि उगाचच मनात असलेली भीती कमी होते. महिन्यातला एक दिवस सातत्याने भारतभरची सर्व वीणा वर्ल्ड टीम झूमवर एकत्र भेटते आणि पुढील एका महिन्याचा परामर्श घेते. थोडक्यात ’ऑन द सेम पेज’ येते. अशा अनेक गोष्टी सातत्याने केल्यावर कशाला स्ट्रेस महाशयांची एन्ट्री होईल ऑर्गनायझेशनमध्ये. प्रिकॉशन इज् ऑलवेज बेटर दॅन क्युअर.
खटकणारी गोष्ट, वस्तू, माणसं, संबंध ह्याचं खरंच काहीतरी केलं पाहिजे. त्याचा विचार करण्यात, त्यावर शक्ती खर्च करण्यात, त्याच्या सतत तक्रारी करीत बसण्यात काहीच अर्थ नाही. एकतर त्याचं काहीतरी करावं नाहीतर सरळ खुल्या मनाने स्विकारावं, त्यात आनंद शोधावा आणि नंतर कधीही त्याची तक्रार करू नये. आणखी एक गोष्ट आम्ही वीणा वर्ल्डमध्ये पाळतो ती म्हणजे आपला देश आणि त्याविषयीच्या तक्रारींचा पाढा बोंबलत बसायचं नाही. आपण आपल्या देशाप्रतीच्या कर्तव्याची जाणीव ठेवायची आणि पुढे चालत रहायचं. शांतपणे, आत्मविश्वासाने आणि आनंदाने.
Post your Comment
Please let us know your thoughts on this story by leaving a comment.