मी म्हटलं, अरे इथे कुठे चाललायस’, तर म्हणाला, लेफ्टला गाडी थांबवली तर सिग्नल तोडणारे हॉर्न वाजवत बसतात, त्यांना जागा करून दिली.
Published in the Saturday Lokasatta on 24 February, 2024
दहा वर्षांपुर्वीचा प्रसंग. वीणा वर्ल्ड नुकतंच सुरू झालं होतं. आम्ही मिळून सारे झटत होतो. ऑर्गनायझेशन आकार घेत होती. आम्ही एवढे नशीबवान होतो की सर्वांचा सहानुभूतीपूर्वक पाठींबा आम्हाला मिळत होता आणि काम करायला आणखी बळ मिळत होतं. आमची मैत्रिण नीलू सिंग एक दिवस भेटायला आली. सगळ्या गप्पा झाल्यावर म्हणाली, "अरे तुम्ही पूर्ण बुडून गेला आहात हे सगळं निर्माण करण्यात. थोडी विश्रांती घ्या. चला माझ्यासोबत ह्या विकेंडला चेंबूरच्या टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस ऑडिटोरियममध्ये. चांगला कार्यक्रम आहे, आवडेल तुम्हाला. थोडं वेगळं काहीतरी कराल. आणि आम्ही पोहोचलो त्या ठिकाणी. त्यावेळी यू ट्यूब पॉडकास्ट व्हिडीयोकास्ट वा वॉडकास्टचा सुळसुळात नव्हता त्यामुळे मोठमोठ्या व्यक्तिमत्वांकडून विचार ऐकण्यासाठी आपण कुठे कुठे जात असू. मी तर दिल्ली लंडनपर्यंत पोहोचले होते. सो, नीलूने सांगितल्याप्रमाणे कार्यक्रम उत्कृष्टच होता. ती संध्याकाळ आमच्यासाठी धन्य झाली होती. कालांतराने अर्थातच आपल्याला विस्मरण होतं कार्यक्रमाचं किंवा त्यातल्या विचारांचं पण ह्या कार्यक्रमात लक्षात राहिलं ते टाटा इंडस्ट्रीज लिमिटेडचे पुर्वीचे मॅनेजिंग डायरेक्टर श्री. किशोर चौकर ह्यांचं भाषण किंवा त्यांनी श्रोत्यांसोबत साधलेला संवाद. त्यातल्या दोन गोष्टी डोक्यात पार तळापर्यंत पोहोचल्या. त्या आम्ही अमलात आणल्या आणि आतातर त्या वीणा वर्ल्ड व्हॅल्युज आणि प्रिन्सिपल्सचा घटक झाल्या आहेत आणि आमच्या इयरली डायरीच्या अविभाज्य भाग बनल्या आहेत.
पहिली गोष्ट त्यांनी सांगिलतली ती म्हणजे आज आपण सस्टेनेबिलिटी, ग्लोबल वॉर्मिंग, पाणी, रीसोर्सेस ह्या सगळ्यांवर खूप चर्चा करतोय पण जोपर्यंत ’मी सकाळी ब्रश करताना पाण्याचा नळ उगाचच वाहता न ठेवता तो हवा तेव्हा बंद करीत नाही, पाणी वाचवायची सवय मी मला स्वत:ला आणि माझ्या मुलांना वा माझ्या घराला लावत नाही तोपर्यंत या चर्चांना काही अर्थ नाही’. डोळ्यात अंजन घातल्यासारखं वाटलं. आपल्याकडून पाणी वाया जात नाही नं या बाबतीत आत्मपरिक्षण करू लागले. आणि फरक पडला, इतका की सर्व वॉशबेसिन्समध्ये पाणी जे मोठ्या फोर्सने यायचं, बरंच यायचं, ते खालून कमी करून टाकलं. आणि मग सवयच लागली उगाचच वाया जाणारं पाणी, वस्तू, गोष्टी, वेळ ह्यावर मनन चिंतन करायची आणि त्याने एकूणच जीवनशैलीमध्ये फरक पडला.
दुसरी गोष्ट म्हणजे जणू जॅकपॉटच लागला त्या दिवशी. त्यांनी एक प्रसंग सांगितला. एकदा एका कोणत्यातरी केस संदर्भात ते श्री. रतन टाटांचं मत विचारायला गेले. त्यांनी केस समजावून सांगितली आणि त्यावर काय पाऊल उचलायचं ठरवलंय हेही सांगितलं. आणि श्री. टाटांचा कौल मिळविण्यासाठी ते त्यांच्याकडे बघत होते. टाटांनी त्यांना विचारलं, ’आर यु लीगली राइट?’ यस सर! टाटांचा दुसरा प्रश्न होता, ’आर यू एथिकली राइट?’ यस सर! टाटांनी तिसरा प्रश्न केला, ’आर यू मॉरली राइट?’ श्री. चौकर म्हणाले, इथे माझा थोडासा गोंधळ झाला. पण तरीही मी यस सर! म्हणालो आणि टाटांनी मला सांगितलं ’देन गो अहेड!’ श्री. चौकर खाली आले आणि त्यांनी डिक्शनरीमध्ये ’एथिक्स’ आणि ’मॉरल्स’ ह्यातला नेमका फरक काय आहे हे जाणून घेतलं. थँक्यू चौकर सर! अगदी मनापासून, हा प्रसंग शेअर केल्याबद्दल. आयुष्यातलं किती मोठं कोडं किंवा अनेक कोडी अशी चुटकीसरशी सोडवली गेली ह्या भाषणातून.
लीगली किंवा लीगल म्हणजे काय हे तसं सर्वांना माहित असतं. देशाने राज्याने समाजाने बनविलेले जे नियम वा कायदेकानून असतात त्याच्या अखत्यारित राहून काम करणे, नियम न मोडणे, नियमाला बगल देऊन जुगाड करून काहीही न करणे म्हणजे ’लीगली राइट’. एथिक्स आणि मॉरल्स ह्या बाबतीत खरंच गोंधळ असतो आपल्या अनेकांचा. ते जाणण्यासाठी मी एकदा आमच्या लीडरशीप मीट मध्ये साठ सत्तर मॅनेजर्स आणि इंचार्जेसना हा प्रश्न केला आणि बर्यापैकी गोंधळ निदर्शनास आला. तेव्हा मग आम्ही सगळ्यांनी मिळून त्यादिवशीच ह्या बाबतीतला नेमका फरक जाणून घेतला. सोप्या भाषेत सांगायचं तर एथिक्स म्हणजे आपल्या ऑर्गनायझेशनने आपल्यासाठी बनविलेली नियमावली किंवा कोड ऑफ कंडक्ट किंवा प्रिन्सिपल्स. जोपर्यंत आपण त्या ऑर्गनायझेशनमध्ये असतो तोपर्यंत ते नियम पाळणं किंवा एथिक्स फॉलो करणं बंधनकारक असतं. जेव्हा आपण ह्या सगळ्या बंधनांचं पालन करून गोष्टी करतो तेव्हा आपण म्हणू शकतो ’एथिकली राइट’. तिसरा भाग येतो तो म्हणजे मॉरल्स. मी, म्हणजे एका व्यक्तीने स्वत:साठी बनविलेले नियम, बंधन, शिस्त, लक्ष्मणरेषा इत्यादि गोष्टी म्हणजे माझी मॉरल्स. माझी मॉरल्स मी ठरवायची असतात. ती कुणी आपल्यावर लादलेली नसतात. त्याची नियमावली नसते. आणि म्हणूनच ती फार महत्वाची असतात. इथे स्वत:चाच कस लागतो. आपणच नियम बनवायचे. आपणच आपल्या नियमांची सातत्याने पाठराखण करायची. कुठे आपल्याकडून ह्या नियमांची पायमल्ली झाली तर आपण आपल्याला आपल्याच कोर्टात उभं करून त्याचं प्रायश्चित्त घ्यायचं आणि स्वत:ला ’मॉरली राइट’ बनवायचं. सो देशाने-राज्याने-घटनेने जे नियम केलेत ते लीगल, ऑर्गनायझेशनने केलेले नियम म्हणजे एथिक्स आणि स्वत:ने स्वत:साठी केलेल नियम म्हणजे मॉरल्स. हे आम्ही आमच्यासाठी सोप्पं करून टाकलं आणि मग टाटांच्या त्या तीन प्रश्नातली व्याप्ती लक्षात आली. लीगली गोष्टी करणं किंवा एथिकली गोष्टी करणं सोप्पं असतं. कारण समोर एक कुणीतरी घालून दिलेली चौकट असते. त्या चौकटीच्या बाहेर गेलो तर तिथे शिक्षा असते. त्यामुळे ह्या चौकटीत राहून काम करणं सोप्पं आहे. पण ’मॉरल्स’ हा मामला तसा अवघडच. कारण इथे आपल्याला बघणारे आपणच असतो. त्याच लीडरशीप मीटमध्ये मी प्रश्न केला, सिग्नल रेड दिसला की तुमच्यापैकी किती जण गाडी थांबवता आणि सिग्नल ग्रीन व्हायची वाट बघता?‘ सगळे हात वर. मी चक्रावले. काय म्हणजे ही सिच्युएशन असेल तर भाग्यवान म्हणायची वीणा वर्ल्ड. एवढी आदर्श टीम. वाह! वाह! पण तरीही डाऊट होताच. नॉट पॉसिबल. मी म्हटलं, माझा अजिबात विश्वास बसत नाहीये. सगळे थांबतात सिग्नल रेड झाल्यावर?’ पटकन दोन तीन आवाज आले, ’अहो फोटो काढला जातो नं!’ माझी ट्युबलाईट पेटायला जरा उशीरच लागला. ओ हो, म्हणजे लीगली ते पुर्वीही अलाऊड नव्हतंच, ऑरेंज झाला रे झाला की गाडीचा स्पीड वाढवायचा आणि समोर पोलिस नाहीये नं ह्याची खात्री करून मग भले रेड सीग्नल झाला तरी सीग्नल तोडणारी मंडळी आता थांबत होती, कारण कॅमेरा फोटो घेत होता आणि नंतर त्याचा दंड भरावा लागत होता. सो मॉरली जे काम होत नव्हतं ते लीगली व्हायला लागलं होतं. साम दाम दंड भेद मधलं दंड इथे कामी आलं होतं. ह्याबाबतीत प्रकाश अय्यर ह्यांच्या पुस्तकात एक छान छोटासा लेख आहे. त्यांचं म्हणणं, ’स्टॉप अॅट दॅट रेड सिग्नल’. कुणी बघत नाही म्हणून, पोलिस नाही म्हणून, रस्ता मोकळा आहे म्हणून, रात्री कुणीही रस्त्यावर नाही म्हणून, आपण घाईत आहोत म्हणून.... कारण काहीही असो, पण सिग्नल रेड दिसला की थांबा. ही सवय तुम्ही जोपासा. तुमच्या मुलांना लावा. शाळांनी ह्यावर भर द्या. मुलांच्या अपब्रिगिंगमध्ये हा महत्वाचा मुद्दा असू द्या. कारण आज कुणी बघत नाही म्हणून मी सिग्नल तोडला तर उद्या कुणी बघत नाही म्हणून एखाद्या खणातले माझे नसलेले पैसे घ्यायलाही मला काही वाटणार नाही, आणि मग ही सवय वाढत जाईल नकळत. हेच तर कारण आहे आज मोठ मोठ्या स्कॅम्सचे बळी आपण सामान्य नागरिक आहोत आणि आपला देश आहे. आमच्याकडे ड्राइव्हर्सना इंडक्शनमध्ये हे सांगितले जातं, ’काहीही झालं तरी सिग्नल तोडायचा नाही’. परवा तर नवलच पाह्यलं. आमच्या ऑफिसकडे येत असताना बिल्डिंगपाशी एक सिग्नल आहे तिथे लेफ्ट घ्यायचा असतो. सिग्नल रेड होता. प्रथमेश थांबला पण राइट साईडला थांबला. मी म्हटलं, अरे इथे कुठे चाललायस‘, तर म्हणाला, लेफ्टला गाडी थांबवली तर सिग्नल तोडणारे हॉर्न वाजवत बसतात, त्यांना जागा करून दिली.’ ये लो कर लो बात. नियम तोडणार्यांप्रती किती हे औदार्य.‘
ऑफिसमध्ये भरपूर काम केल्यावर आणि डोकं कामातून गेल्यावर घरी जाताना गाडीत काहीतरी हलकं फुलकं कॉमेडी ऐकूया म्हणत असताना यु ट्युबवर समोर आलं हास्य कवी संमेलन. सुरेंद्र शर्मा समोर आले. कधी ऐकलं नव्हतं पण ऐकल्यानंतर एकापाठी एक तीन व्हिडियोज मी पाहिले आणि लक्षात आलं की त्यांना पद्मश्री सन्मानाने का गौरवलं गेलंय. त्यांच्या एका व्हिडियोत एक किस्सा त्यांनी सांगितलाय. एकदा एक ऑफिसर त्यांच्याकडे आल्या आणि म्हणाल्या, ’शर्माजी कुछ तो रास्ता बताइये, कितनी अशांतता है दुनिया में, सर फटा जा रहा है।’ शर्माजीनी तिला शांतपणे सागितलं, ’बस तू शांत रह!’ ऑफिसर पुढे सुरूच, ’भ्रष्टाचार चारो तरफ फैला है, पुरी दलदल बन गयी है’ शर्माजींनी पुन्हा तेवढ्याच शांतपणे तिला म्हटलं, ’बस तू मत कर!’ मॉरल व्हॅल्यूज् जपणं म्हणजे काय हे आत्ताच आलेल्या ट्वेल्थ फेल’ ह्या चित्रपटाने अतिशय सुंदर तर्हेने दाखवून दिलंय. शाळांनी हा चित्रपट मुलांना दाखविला पाहिजे.
Post your Comment
Please let us know your thoughts on this story by leaving a comment.