Published in the Saturday Lokasatta on 17 February, 2024
तुम्ही कधी शिमला मॉल रोडवर फेरफटका मारलाय? अहाहा काय तो मस्त अनुभव. मी जेव्हा टूर मॅनेजर म्हणून शिमला मनालीच्या टूर्स करीत होते तेव्हा प्रत्येक टूरमध्ये शिमला मॉल रोडला पर्यटकांना घेऊन जाणं मला खूप आनंद द्यायचं. मी वाट बघायचे शिमला मॉल रोडला जायची. असं मस्त वाटायचं तेथून फेरफटका मारताना, आणि आजही हा मॉल रोड तेवढाच चार्मिंग आहे बरं का. असाच शिमला मॉल रोडचा आनंद मिळायचा किंवा मिळतो नैनिताल, दार्जिलिंग, उटी, मसूरी, पंचमढी, शिलाँग, डलहौसी, कोडाईकनाल, माथेरान आदि हिलस्टेशन्सच्या मॉल रोडवर किंवा मेन मार्केटमध्ये फिरताना. बहुतेक ठिकाणी ह्या मॉलरोडवर कार्स रिक्षा वैगेरे वाहनांना बंदी असते त्यामुळे आपलंच राज्य त्या रस्त्यांवर. अगदी निर्धास्तपणे फिरायला मिळतं. ब्रिटिशांनी शंभर दिडशे वर्ष आपल्यावर राज्य केलं, अक्षरश: लुटलं आपल्याला. पण काही चांगल्या गोष्टी ते सोडून गेले त्यातलीच ही काही हिलस्टेशन्स. कोलोनियल स्टाइलने बांधलेली, एका आगळ्या वेगळ्याच विश्वात घेऊन जाणारी ही हिलस्टेशन्स ब्रिटिशांनी बांधली त्यांना उन्हाळा सहन व्हायचा नाही म्हणून. आज आपल्यालाही उन्हाळ्यात अंगाची लाही होत असताना हीच हिलस्टेशन्स शांत निवांत आणि थंड करतात.
मागच्या आठवड्यात राष्ट्रपती भवनातील उद्यान उत्सवाचं मेल आलं. २ फेब्रवारी ते ३१ मार्च च्या दरम्यान सकाळी १० ते संध्याकाली ५ पर्यंत आपल्या भारतीयांना गेट नंबर ३५ मधून एन्ट्री आहे. फ्री एन्ट्री, पण रजिस्ट्रेशन मस्ट आहे. राष्ट्रपती भवन बघण्याची इच्छा आपल्या प्रत्येकालाच असते. हे भवनसुद्धा बांधलं गेलं ब्रिटीशांच्या काळात व्हॉइसरॉय हाऊस म्हणून. तीनशे वीस एकर्समध्ये पसरलेलं, तीनशे चाळीस रूम्स आणि अनेक मोठी दालनं असलेलं हे आपल्या राष्ट्रपतींचं निवास्थान जगातलं दुसर्या नंबरचं मोठं निवासस्थान आहे कोणत्याही हेड ऑफ स्टेटसाठीचं. पहिलं इटलीत आहे. अशीच एक अप्रतीम देखणी भव्य वास्तु ते देऊन गेले ते म्हणजे कोलकाताचं व्हिक्टोरिया मेमोरियल. दिल्लीचं संसद भवन वा मुंबईचं गेट वे ऑफ इंडिया ह्या भव्यदिव्य लँडमार्क्स सोबत मुंबई कोलकाता चेन्नई बंगळुरूसारख्या शहरांची रचनासुद्धा ब्रिटिश काळात केली गेली. युएसए रशिया चायना नंतर जगात चौथ्या नंबरवर असलेलं आपल्या भारतीय रेल्वेचं अवाढव्य जाळं ही सुद्धा ब्रिटिशांनी केलेली सुरुवात. नव्या जगासाठी आवश्यक असणारी अॅडमिनिस्ट्रेशन सिस्टिम, रोड्स, शाळा, मॉडर्न एज्युकेशन सिस्टिम, हॉस्पिटल्स, जगासोबतचं ट्रेड नेटवर्क, पार्लमेंटरी गव्हर्नमेंट सिस्टिम, इंडस्ट्रिलायझेशन, अशा अनेक गोष्टी सुरू करून ते गेले. म्हणजे हे करताना त्यांनी स्वतः प्रचंड फायदा घेतला ही गोष्ट वेगळी. त्यावर अगदी प्रखर मतांतरं असतील, पण इतिहास आपण बदलू शकत नाही, त्यावरून शिकू मात्र शकतो. त्यामुळे आपल्या फायद्यांकडे आपण बघूया. आपल्या शत्रुलाही कधी धन्यवाद देण्याइतकं मोठं मन आहे आपल्या भारतीयांचं त्याप्रमाणे त्यांना थँक्यू म्हणूया.
शहाजहानने बांधलेला दिल्लीचा लाल किल्ला आणि आग्राचा ताजमहाल, रजपूतांची देन म्हणजे जोधपूरचा मेहरानगढ फोर्ट, जैसलमेरचा गोल्डन फोर्ट, जयपूरचा आमेर फोर्ट, चित्तोडचा चित्तोडगढ, कुंभलगढ फोर्ट, हैद्राबादच्या निझामचा फलकनुमा पॅलेस, हंपीच्या वर्ल्ड हेरिटेज साईट्स, ग्वालियर फोर्ट, खजुराओ टेम्पल्स, कोनार्क सन टेम्पल, सांची स्टूपा, औरंगाबादचे अजिंठा एलोरा केव्हज, लेहची थिकसे मॉनेस्ट्री, मदुराइचं मिनाक्षी अम्मन टेम्पल, नालंदा युनिव्हर्सिटीचे अवशेष, व्हिक्टोरिया टर्मिनस मुंबई.... हे पान अपुरं पडेल आपल्याला आपल्या पुर्वजांनी आपल्यासाठी तयार करून ठेवलेल्या ह्या संपत्तीचा नुस्ता नामोल्लेख करायला. कधी सम्राट अशोक असेल तर कधी एखादा मोगल बादशहा, कधी छत्रपती शिवाजी महाराज असतील तर कधी चंडेला डायनॅस्टी, कधी महाराजा वड्डीयार असतील तर कधी पांडियन राज्यकर्ते. प्रत्येकाने असं काही तरी येणार्या पिढ्यांसाठी तयार करून ठेवलंय की आपण त्यांचे शतश: ऋणी असलं पाहिजे.
गेल्या आठवड्यात मुंबईत मोठ्ठं ट्रॅव्हल एक्झिबिशन भरलं होतं. भारतातूनच नव्हे तर जगभरातून अनेक ट्रॅव्हल एजंट्स मुंबईत दाखल झाले होते. आमच्या ऑफिसमध्येही दररोज भरपूर गर्दी असायची. आम्हाला एमकेकांना भेटण्यासाठी खासकरून वीणा वर्ल्ड टीमला आपल्या भारतातल्या आणि जगातल्या सर्व असोसिएट्सना भेटण्यासाठी ही एक सुवर्णसंधी असते. काश्मीरला आम्ही भरपूर संख्येने पर्यटक घेऊन जात असल्याने एक दिवस तर आमचं ऑफिस सर्व काश्मीरी हॉटेलियर्स, ट्रान्सपोर्टर्स, रेस्टॉरंटीयर्सनी भरून गेलं होतं. सगळेच म्हणतात काश्मीर आता मस्त झालंय, एकदम कायापालट. अर्थात आम्ही ह्याचा अनुभव गेली पाच सहा वर्ष घेतो आहोतच पण आमच्या काश्मीरी पार्टनर्सना याबद्द्ल काय वाटतंय ते आजमावूया म्हणून त्यांना आलटून पालटून मी एकच प्रश्न विचारत होते की, ‘कैसा है कश्मीर? सच मे कुछ बदलाव आपको लग रहा है? कुछ अच्छा हो रहा है या जैसे थे?’ मला लिहितानाही आनंद होतोय तो म्हणजे आमच्या काश्मीरी पार्टनर्सच्या प्रत्येकाच्या प्रतिक्रिया आनंददायी होत्या. ’सच बताऊँ यहाँ गव्हर्मेंट नहीं होगा तो भी चलेगा, सेंटर से ही कंट्रोल करने दो’, ’बहुत बढ़िया चल रहा है , अभी कोई दिक्कत ही नहीं है’, ’काम बढ़ गया है, यूथ काम में जूट गया है, अभी वह स्टोन पेल्टिंगवाले मामले ख़त्म’ ‘मोदी को मानना पडेगा‘, ‘दल लेक आप पहचान नहीं पाओगे ऐसा बदल गया है’..... ह्या काही प्रतिक्रिया जशाच्या तशा. काश्मीरमधल्या प्रगतीचा हा आलेख असाच उंचावत राहिला तर भविष्यातल्या अनेक पिढ्या दुवा देतील ह्या सरकारला आणि काश्मीर जगातलं एक अव्वल नंबरचं टूरिस्ट डेस्टिनेशन बनेल. सरकारचे प्रयत्न सुरू आहेतच, आपण सदिच्छा तर नक्कीच देऊ शकतो.
कोविडमध्ये आपण न भूतो: अशा परिस्थितीला सामोरे गेलो. पैशाची आवक थांबली होती आणि घरांचे हप्ते डोक्यावर होते, थोडी सवलत मिळाली बँकांकडून पण त्यावेळी ज्यांची स्वत:ची घरं होती मग ती स्वकमाईने घेतलेली किंवा आईवडिलांकडून वा वडिलोपार्जित चालून आलेली असतील ती मंडळी इतरांपेक्षा बर्यापैकी चिंतामुक्त होती. मला खात्री आहे की त्यांनी त्यासाठी आपल्या आईवडिलांना धन्यवाद दिले असतील. आणि नसतील तर आत्ताही द्यायला हरकत नाही. थँक्यू म्हणायला इट्स नेव्हर टू लेट. अर्थात ज्यांच्याकडे ही मालमत्ता नव्हती त्यांनी आईवडिलांना वा बापजाद्यांना दुषणं द्यायची गरज नाही बरं का. प्रत्येकजण आपल्यापरीने पुढच्या पिढीच्या भवितव्यासाठी खस्ता काढत असतो. ज्याला जमेल झेपेल तसं प्रत्येकजण काहीतरी चांगलं करण्याचा प्रयत्न करीत असतो. आपल्यालाही ते करायचंय.
सध्या नवनवीन विचार कानावर येऊन आदळत असतात. काय म्हणे, ‘आम्ही ठरवलंय मुलं होऊ द्यायची नाहीत‘. काहींचा त्या पाठचा विचार स्तुत्य असेलही किंवा त्याची काही जबर कारणंही असतील, मला मात्र जनरली हा खूपच स्वार्थी विचार वाटतो. आपण जन्मला आलो आणि आयुष्याची मजा चाखतोय नं. मग आपला धर्म बनतोय नवा जीव ह्या जगात आणण्याचा आणि त्यालाही ह्या आयुष्याचा आनंद मिळवून द्यायचा. आणि एकच नव्हे तर किमान दोन. आहे की नाही अशी काही पॉलिसी माहीत नाही. पण सरकारने दुसर्या मुलासाठी काही सवलती ठेवायला पाहिजेत. आपला भारत देश सतत तरुण असला पाहिजे. सध्याचं भारतीयांचं सरासरी वय आहे २८ वर्ष. तेच युरोपमध्ये ४५ ते ५० वर्ष आहे तर इंग्लंडमध्ये ४० वर्ष, जपानमध्ये ५० वर्ष, ऑस्ट्रेलियामध्ये ३८, कॅनडात ४१ वर्ष, चायना ४०, युएसए ३५ वर्ष, पाकिस्तानात ते २२ वर्ष तर अफगानिस्तानात १९ वर्ष, आफ्रिकेत २० ते २५. म्हणजेच युके युरोप युएसए म्हातारे झालेयत. आपण तसे बरे आहोत पण आपले शेजारी देश आपल्यापेक्षा तरुण आहेत. देशाची शक्ती ही तरुणांवर अवलंबून आहे आणि ह्या तारुण्यात भर टाकण्याचं काम आपल्याला करायचंय जेणेकरून पुढच्या पिढ्या आपल्याला दुवा देतील.
परवा मलेशियन एअरलाइन्स चे साऊथ ईस्ट एशिया मिडल ईस्ट आणि आफ्रिका सांभाळणारे रीजनल मॅनेजर श्री अमित मेहता आणि वेस्टर्न इंडियाचे सेल्स मॅनेजर एम कृष्णासोबत दुपारचं जेवण घेत होतो. बर्याच गप्पा झाल्या. मुंबईचा ट्रॅफिक, त्यात जाणारा वेळ, लोकांना होणार त्रास ह्यावर संभाषण आलं. त्रासांचे पाढे वाचून झाल्यावर श्री अमित म्हणाले, ’मी रोज सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही हात जोडून देवाला थँक्यू म्हणतो आजचा दिवस दिल्याबद्दल’. खरंच आहे ते. वुई ऑल शूड बी ग्रेटफुल फॉर इव्हरी मोमेंट. मुंबईचा ट्रॅफिक खरंच अगदी अनप्रेडिक्टेबल झालाय. आम्ही ऑफिसमधून कधी पंधरा मिनिटात घरी पोहोचतो तर कधी एक ते दीड तासही लागतो सगळीकडे सुरू असलेल्या खोदकामामुळे. कंटाळा येतो त्या ट्रॅफिकमध्ये पण मग रस्त्यावर ठिकठिकाणी लागलेली एक पाटी दिसते आणि मी स्वत:ला शांत करते. ’मुंबई के उज्ज्वल भविष्य के लिए’.
Post your Comment
Please let us know your thoughts on this story by leaving a comment.