Published in the Saturday Lokasatta on 04 May, 2024
क्रिकेटर्स, स्टार्स, इन्स्टाग्रामर्स, यु ट्यूबर्स, पॉडकास्टर्स, इन्फ्लूएन्सर्स सगळे मिळून सध्या एकच गोष्ट प्रमोट करताहेत आणि ती म्हणजे टूरिझम. कुणीतरी कुठेतरी गेलंय आणि तिथल्या मस्त मस्त फोटोज आणि व्हिडियोजनी सोशल मिडीया भरून गेलाय. या महिन्यात आम्हाला एक ट्रॅव्हल कंपनी म्हणून ज्या रेग्यूलर जाहिराती कराव्या लागतात त्या करण्याची गरज भासत नाही कारण सभोवताल टूरिझमच्या जयघोषात न्हाऊन निघालेलं असतं. आयुष्यात `समथिंग टू लूक फॉरवर्ड टू’ असं काहीतरी आपल्याला सतत हवं असतं आणि त्या `लूक फॉरवर्ड टू’ च्या गोष्टींमध्ये टूरिझम किंवा कुठेतरी पर्यटनाला जाणं ह्याने अग्रस्थान पटकवलंय आणि म्हणूनच आम्ही म्हणतो की आम्ही आनंदाच्या बिझनेसमध्ये आहोत. ह्यातला कमर्शिअल भाग सोडून देऊया पण चाळीस वर्ष ह्या टूरिझममध्ये घातल्यावर असं वाटतं की कुणीतरी कधीतरी कुठेतरी पर्यटन करावंच. घराचा उंबरठा ओलांडावा, गावाची वेस मागे टाकावी, राज्याच्या बाहेर काय आहे ते बघावं, देशाची सीमा पार करावी, साता समुद्रापार जाण्याची मनिषा बाळगावी. `केल्याने देशाटन... मनुजा चातुर्य येतसे फार’ हे सुभाषित तर आपल्याला ज्ञात आहेच. जेव्हा टूरिझमला सुरुवातही झाली नव्हती त्यावेळी हे वर्तविले आहे. आयुष्यात जे काही थोडंफार यश मिळविण्याची माझी मानसिकता तयार झाली ती टूरिझममुळे, आपला भारत आणि जग पिंजून काढल्यामुळे. त्यामुळे प्रत्येकाने टूरिझम हे आपल्या महत्वाच्या गरजांमध्ये समाविष्ट करावं. आमच्यासोबतच या असं मी म्हणणार नाही, कुणाबरोबरही जा, इंडिव्हिज्युअली जा, सोलो ट्रॅव्हलर बना पण रूटीनमधून बाहेर पडा, निसर्गाकडे जा, मॅनमेड वंडर्स बघून थक्क व्हा, इतिहासात रमून जा, भूगोलाचे चमत्कार अनुभवा, वेगवेगळ्या राज्यांच्या, देशांच्या लोककला-संस्कृती-परंपरांना जाणून घ्या, आत्मविश्वास वाढवा. दृष्टीकोन व्यापक बनवा आणि आनंदी आठवणींचा लाइव्ह अल्बम तयार करा. आपणापैकी अनेक जण आता ह्या मे महिन्याच्या पीक सीझनमध्ये प्रवासाला निघतील. सध्या आमचेही हजारो पर्यटक देशविदेशात पर्यटन करताहेत. असं म्हणता येईल की `आत्ताच हाती आलेल्या बातमीनुसार...’. हे हे करावं जर तुम्ही पर्यटनाला बाहेर पडणार असाल तर. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या एनर्जी लेव्हल्स हाय ठेवण्याचा प्रयत्न करूया. एनर्जी लेव्हल्स हाय ठेवण्यासाठी गरज असते ती शारिरीक आणि मानसिक स्वास्थ्याची. शारिरीक स्वास्थ्य जे काही आपण कमावलेलं असेल ते, त्यात पटकन असा फारसा बदल करता येणार नाही. फार फार तर काही इन्स्टंट एनर्जी टॅब्लेट्स आपल्या फिजिशियनला विचारून सोबत ठेवल्या तर, ज्याला माझा विरोध आहे, पण इनकेस. माझ्या दृष्टीने पर्यटनात शारिरीक स्वास्थ्य उत्तम ठेवायचं असेल तर सगळ्यात महत्वाचं टॉनिक आहे, बीन पैशाचं, बीना साइड इफेक्टचं आणि ते आहे, `मन करा रे प्रसन्न’. मन प्रसन्न तर शरीर सुदृढ आणि शरीर ठणठणीत तर पर्यटनाचा आनंद दुगना, पैसा वसूल. शेवटी आपण भरलेल्या पैशाचा पूर्ण मोबदला मिळालाच पाहिजे नं. दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे आपण जर पर्यटनाला निघालोच आहोत तर जरा मिरवून घेउया, नाही का. स्वत:वर प्रेम करूया. छान छान दिसूया. अगदी खूप खर्च करायला पाहिजे असं काही नाही पण असलेल्या कपड्यांमध्येच छान छान कॉम्बिनेशन्स बनवूया. अजून खरेदी केली नसेल तर चांगल्या ब्रँडची मिड्साइज फोर व्हीलर सुटकेस किंवा त्याचीच छोटी स्ट्रोलर जी विमानात कॅबीनमध्ये घेता येईल अशी आणि एक क्रॉस शोल्डर पर्स किंवा छोटी हॅवरसक ह्याचा सेट करूनच ठेवायचा. मी माझा अर्धा जगप्रवास फक्त कॅबीन बॅग, त्यावर टोट बॅग आणि क्रॉस शोल्डर पर्स ह्यावर केलाय आणि तरीही स्मार्ट ट्रॅव्हलरचा लूक अबाधित ठेवला बरं का. एकदा पर्यटनाची सवय लागली की आपण घरात शांत बसू शकत नाही, म्हणूनच चांगल्या बॅगांच्या सेटबरोबर दुसऱ्या गोष्टींचे सेट्स आपल्याला सोबत ठेवायचेत ते म्हणजे एकदम कम्फर्टेबल स्पोर्टस् शूज, स्टाइलिश सनग्लासेस, घडी करता येईल अशी स्मार्ट हॅट. बॉलिवूड स्टार्स सारखे फोटो जे काढायचे असतात. तुम्ही दूरदेशी जाणार असाल आणि विमानप्रवास मोठा असेल तर खास विमानप्रवासासाठी थोडेसे लूज कपडे घाला. हल्ली ते कॉडसेट्स निघालेयत ते चांगले. विमानप्रवासात पायात सॉक्स आणि अंगावर एक जॅकेट किंवा चांगला स्वेटर घालूनच घ्यावा. कधी कधी टेंपरेचर खूपच थंड असतं विमानातलं. ओढणीवाले पंजाबी ड्रेस-साडी ह्याला प्रवासात अगदी सोडचिठ्ठी द्या. सडंसुटं मोकळं फिरा. ओढणी वा पदर सांभाळायला वेळ कोणाला आहे, आपला हात कॅमेऱ्यात आणि डोळे सभोवतालात असले पाहिजेत. चांगला स्मार्ट फोन आणि इंटरनॅशनल रोमिंग कार्ड हे अगदी मस्ट आहे. आणि महत्वाचं म्हणजे फोन हरवू नये म्हणून सरळ फोन लटकविण्यासाठी जी क्रॉस शोल्डर स्िंग मिळते ती घ्यावी. ओव्हर एक्साइटमेंटमध्ये फोन हरवायचे प्रकार होतात म्हणून ही खबरदारी. तुमच्या क्रॉस शोल्डर पर्समध्ये जाईल अशी छोटीशी वॉटरबॉटल सुद्धा सोबत ठेवायची. परदेश प्रवास असेल तर पासपोर्ट ही महत्वाची आणि जोखमीची गोष्ट. त्याची काळजी घेणं अतिमहत्वाचं. पासपोर्ट पाऊचमध्ये पासपोर्ट घालून ती कपड्याच्या आत ठेवणं बरेच जण पसंत करतात. एकदम सेफेस्ट. पण आम्हाला आमचा कपड्यांचा लूक खराब करायचा नसतो नं, तेव्हा मग क्रॉस शोल्डर पर्स वा छोट्या हॅवरसक मध्ये अगदी आतल्या खणात पासपोर्ट व करन्सी ठेवणं चागलं. पर्स कधीही आपल्यापासून दूर करायची नाही हे ही ध्यानात ठेवायचं. डोळ्याचं पातं लवतं न लवतं तोच तुमची पर्स तुमच्यापासून लांबवण्याचे अनेक प्रकार आता देशात-जगात कुठेही कधीही घडताहेत. खबरदारीघेणं आपलं काम. कपडे काय घ्यावे ह्या बाबतीत आता खूपच अवेअरनेस आलाय. छोटी घडी होणारे, बॅगेतली कमी जागा व्यापणारे, मिक्स ॲन्ड मॅच करून फ्रेश स्मार्ट लूक देणारे कपडे असावेत. पर्यटक आता थंड हवेच्या प्रदेशासाठी आणि ॉपिकल वा थोडया वॉर्म डेस्टिनेशनवाल्या प्रदेशासाठी दोन सेट्स तयारच करून ठेवायला लागले आहेत. जिथे जायचं तिथलं हवामान बघून तो सेट सोबत घेऊन निघायचं एवढं ते आता पर्यटकांच्या अंगवळणी पडलंय. काय आहे नं पर्यटनाला निघताना टेंशन नाही आलं पाहिजे म्हणून ही सगळी पुर्वतयारी.ॲक्चुअल पर्यटन सुरू असताना काही गोष्टी लक्षात घ्यायच्या त्या म्हणजे फोटोज काढणं, फोटो रुपात आठवणी जमवणं हा आपल्या पर्यटनाचा गाभा असला तरी आपण पर्यटनस्थळी गेल्यावर आपल्या डोळयांनी ती गोष्ट बघणं ह्याला अग्रक्रम देऊया. एक दोन फोटो काढल्यावर मोबाइल आत ठेवूया. डोळ्यांनी ते सौंदर्य निखारूया, कान नाक डोळे टच फील ह्या सगळ्यांनी मिळून त्या पर्यटनस्थळाची मजा लुटूया. त्यासाठीच तर एवढे पैसे आणि वेळ खर्च करून आपण तिथे गेलोय. फोटोज आणि व्हिडिओज तर सोशल मिडीयावर पायलीला पन्नास आहेत. 'खाऊ की नको, जाऊ की नको, घेऊ की नको' ही मी निर्माण केलेली एक थिअरी आहे जी पर्यटनात प्रचंड उपयोगी येते. प्रवासात शरीर हलकं असणं गरजेचं आहे त्यामुळे `खाऊ की नको’ असा प्रश्न आला की खाणं थांबवायचं. बस जेव्हा टॉयलेट हॉल्ट साठी थांबते तेव्हा आपण `जाऊ की नको’ असा `टू बी ऑर नॉट टू बी' चा गहन विचार करायला लागतो त्यावेळी ह्या साध्या गोष्टीसाठी एवढा विचार करायची गरज नाही हे लक्षात घेऊन जाऊन यायचं, नाहीतर होतं काय की आपण गरज नाही म्हणून बसमध्ये बसतो, सर्वजण जाऊन परत आले की आपलं मन कच खातं आणि आपण पटकन आलोच हं म्हणत जातो आणि सर्वांचाच खोळंबा करतो. तिसरी गोष्ट खरेदीची. `घेऊ की नको’ असं वाटलं की किंमत क्वालिटी बघून घेऊन टाकावी सरळ ती वस्तु. पुढे मिळेल ह्याची काय गॅरंटी. त्या प्रवासात रुखरुख नाही लावून घ्यायचीय आपल्याला. ह्याविषयी अगदी मला आलेला अनुभवांसह मी मागे लिहलं होतं पण आता विषय आलाच आहे तेव्हा थोडक्यात हे कथन. ज्यावेळी आपण पर्यटन करतो त्यावेळी आपण आपल्या भारताचं प्रतिनिधित्व करीत असतो. आपण एक पर्यटक म्हणून कसे वागतो ह्यावर संपूर्ण भारताविषयीचं मत आपण परदेशात निर्माण करीत असतो तिथल्या लोकांमध्ये. त्यामुळे तिथले नीतीनियम आणि इंटरनॅशनल नॉर्म्सना पाळणं हे आपले कर्तव्य बनून जातं. म्हणजे बघा नं, एकदा मी अगदी सुरुवातीला विमानात `सीट बेल्ट्स ऑन'ची साइन सुरू असताना वरच्या कॅबीन बॅगेतून काहीतरी घेण्यासाठी उभी राहिले आणि तो सुपरवायजर माझ्यावर एवढ्या मोठ्याने अक्षरशः खेकसला की मला सर्वांसमोर अगदी मेल्याहून मेल्यासारखं झालं. अर्थात पुन्हा आयुष्यात कधीही ती चूक मी केली नाही. एकदा अलास्काच्या केटचिकन आयलंडवर आम्ही एक शो बघत होतो. छोटी छोटी मुलं काय मस्त परफॉर्मन्स देत होती. मी फोटो काढत होते. शो संपल्यावर त्यातल्या सुपर परफॉर्मन्सवाल्या मुलीला मी हॅन्डशेक करीत काँग्रज्युलेट केलं आणि तिची आई जी काय कडाडली माझ्यावर, ‘डोन्ट टच माय चाइल्ड’ की मी उभ्या उभ्या हादरले. तेव्हापासून शपथ घेतली असं कुणाला हॅन्डशेक करणं, गाल ओढणं वैगेरे आपलं भारतीय ममत्व आपल्याजवळच ठेवायचं. एकदा अमेरिकेत ऑरलँडो डिझ्नी पार्कमध्ये लाइनमध्ये उभं असताना आमच्यातल्या एका कपलमध्ये तू तू मैं मैं झाली. तिथल्या पोलिसांनी नेलं की उचलून दोघांनाही. त्यांचा गुन्हा काय तर `सोशल डेकोरम’ बिघडविण्याचा. एकदा न्यूझीलंडमध्ये अशीच तू तू मैं मैं. तिथे पतीला एका तुरूंगात तर पत्नीला दुसऱ्या तुरूंगात ठेवलं त्यांनी आठ दिवस. टूर तर टूर गेली आणि त्यांच्यासह आम्हा सर्वांना मनस्ताप. पोलिसांचं म्हणणं, ते दोघं एकमेकांबरोबर एकत्र रहायला योग्य नाहीत आणि ते एकमेकांसाठी धोकादायक. आपलं मोठ्या आवाजातलं बोलणं वा तू तू मैं मैं अडचणीत आणते ती अशी. हल्ली अशी हमरीतुमरी एअरपोर्टवर केली तर कायदेशीर कार्यवाही केली जाईल असे बोर्ड तुम्ही पाहिले असतील. मागच्याच आठवड्यात एका टूरवरून एका हॉटेलचा मेसेज आला `तुमच्या ग्रुपमधल्या दोन रुम्स अतिशय डर्टी स्वरूपात पर्यटक सोडून गेलेयत. आम्ही आता इंडियन ग्रुप्सना हॉटेल द्यायचं की नाही हा विचार करतोय’. एक दोघांचं बिहेवियर संपूर्ण देशाला दावणीला बांधतं ते असं. अगदी रेअरली असं घडतं, पण आपण प्रत्येकाने आपली रूम स्वच्छ स्वरूपात सोडली तर आपण आपल्या देशाचं नाव अव्वल ठेवण्यात निश्चितच मदत करू. म्हणजे कुणाला उपदेश करण्यासारखी मी मोठी नाही पण जे अनुभव येतात त्यावरून थोडीशी पर्यटकजागृती एवढंच. सध्या जमाना एकदम अनप्रेडिक्टेबल झालाय. थोडी अनिश्चितता आसमंतात रूंजी घातलेय. फ्लाइट कॅन्सल होणं, डीले होणं, मिस् होणं, एखादं साइटसीइंग व्हिआयपी मुव्हमेंटमुळे वा अपरिहार्य कारणास्तव बंद होणं, ओव्हर टूरिझममुळे गर्दी उसळणं, थंडी वारा पावसाने आपल्या दिवसाची दैना उडवणं, एखाद्या एअरपोर्टवर अडकून पडणं (मागच्या पंधरवड्यात जे दुबईला घडलं), एअरलाइनमध्ये बॅगा हरवणं, एखाद्या ठिकाणाचे नियम बदलणं, ह्या आपल्या कोंलच्या बाहेरच्या गोष्टी घडताहेत. अशावेळी पेशन्स आणि पॉझिटिव्ह अप्रोच फार महत्वाचा असणार आहे. तुम्ही आमच्याबरोबर असाल किंवा कुणाबरोबरही, आम्ही त्या अनपेक्षित अडचणींतून तात्काळ मार्ग काढण्याचा प्रयत्न करीत असतो. पण तुम्ही काय आम्ही काय, कुणाबरोबरही असू वा इंडिव्हिज्युअली गेलेलो असू, आपल्या सगळ्या ग्रंथ पुराणात शिकविल्याप्रमाणे एक ॲटिटयूड अंगी बाळगूया, `स्वीकार लो’ आणि मग मार्गक्रमणा करूया. कितीही मोठी अडचण असली तर मार्ग निघतोच. चाळीस वर्षांचा माझा अनुभव आहे. सो.. हॅप्पी जर्नी, डोन्ट वरी बी हॅप्पी! हकुना मटाटा!
वीणा पाटील, सुनीला पाटील, आणि नील पाटील ह्यांचे दर आठवड्याला वृत्तपत्रात प्रकाशित होणारे लेख वीणा वर्ल्ड वेबसाईट www.veenaworld.com वर वाचनाकरीता उपलब्ध आहेत.
Post your Comment
Please let us know your thoughts on this story by leaving a comment.