Published in the Saturday Lokasatta on 08 March, 2025
...एकाने म्हटलं, ‘अरे कल मेरी इंपॉर्टन्ट मीटिंग है और मैं यहाँ हूँ।’ त्यावर दुसरा ‘अरे आय जस्ट डोन्ट बिलिव्ह, बजेट मंथ है, फायनान्शिअल इयर ख़त्म हो रहा है और मैं यहाँ क्या कर रहा हूँ?’...
गल्या वर्षीच्या फेब्रुवारीमध्ये आमच्या बिल्डिंगमधली दोन कपल्स आईसलँडची जीप सफारी करून आली. त्यांच्या त्या ॲडव्हेंचरचे फोटो बघत असताना ठरलं, चला आता ग्रुप थोडा मोठा करूया आणि असंच जीप सफारीला जाऊया दुसऱ्या कोणत्या तरी देशात आपण सर्वांनी न पाहिलेल्या. बोलण्याबोलण्यात मोरोक्कोची निवड झाली आणि पुढच्या फेब्रुवारीत जाऊया हे जवळपास निश्चित झालं. फेब्रुवारीला अजून दहा महिने होते त्यामुळे व्हॉट्सॲपद्वारे एकीकडे सुधीर आणि मित्रमंडळींचं टूरचं प्लॅॅनिंग शांतपणे सुरु होतं आणि दुसरीकडे आम्ही मोरोक्कोची स्वप्नं बघत होतो. आम्ही चक्क पाच कपल्स म्हणजे दहाजण तयार झालो. प्रवास धरून बारा चौदा दिवसांची टूर. या वर्षीचा जानेवारी सुरु झाला आणि टेन्शन यायला लागलं, बापरे! फेब्रुवारी सारख्या अति महत्त्वाच्या, सर्वात जास्त कामाच्या महिन्यात आपण पंधरा दिवस बाहेर जातोय ते पण कामासाठी नाही तर मजेसाठी. बहुतही गलत बात है। माझ्याशी निगडीत जेवढी कामं होती तेवढी जानेवारीतच पूर्ण करण्याचा धडाका लावला. बरं ही इतर वेळेसारखी टूर नव्हती की व्हॅनमध्ये टेबल असायचं आणि माझं ऑफिस सुरु रहायचं. इथे मित्रमंडळींसोबत जीप सफारी होती त्यामुळे कामाचा विचारच मी करू शकत नव्हते, नाहीतर मित्रमंडळींसोबत यायचंच कशाला? एक बरं असणार होतं, मोरोक्को आपल्या भारतापेक्षा साडेचार तास मागे होतं. त्यामुळे तिथे सकाळी लवकर उठून थोडंफार काम करता येणार होतं, काही डिसीजन्स जर माझ्यामुळे रखडले असतील तर देता येणार होते. आलिया भोगासी असावे सादर ... अशा मनःस्थितीत मी कामांचा फडशा पाडत होते. ‘इथे सगळे कामात असतील आणि मी मजा करतेय तिथे’, या विचाराने मला फेब्रुवारीत फिरायला जायला एवढं गिल्टी वाटायला लागलं की मी सारखी ‘अरे यार हमने ये क्या कर दिया, फेब्रुवारी कैसे चुना!’ अशी दूषणं स्वतःला द्यायला लागले. माझी ही कुरबुर ऐकून सुनिलाने दम भरला, ‘आता जातेयस तर जा आनंदात, तसा तर आपला प्रत्येक महिना अतिबिझीच असणार आहे. वुमन्स स्पेशलच्या टूरच्या वेळी कसं सांगतेस नेहमी, तसंच तू ही एन्जॉय कर’. रिझर्वेशन झालं होतं, पैसे भरले होते, आमचा सर्व ग्रुप एक्साइटमेंटमध्ये होता, त्यामुळे आता नो लूकिंग बॅक... लेट्स एन्जॉय! या मनःस्थितीत आम्ही पोहोचलो कासाब्लँकाला. आमची जीप सफारी तीन दिवसांनी सुरु होणार होती. त्यामुळे आम्ही कासाब्लँका बलून राईड, फेज अशा सर्व साईटसीईंग टूर्स करीत होतो. फेजचा प्रवास होता तीन तासांचा, त्यात गप्पागोष्टी सुरु होत्या. आम्ही ट्रॅव्हलवाले वगळता आमचा हा सगळा ग्रुप हार्डकोअर फायनान्सवाला. एकाने म्हटलं, ‘अरे कल मेरी इंपॉर्टन्ट मीटिंग है और मैैं यहाँ हूँ।’ त्यावर दुसरा ‘अरे आय जस्ट डोन्ट बिलिव्ह, बजेट मंथ है, फायनान्शिअल इयर ख़त्म हो रहा है और मैं यहाँ क्या कर रहा हूँ?’ तिसरा ‘हाँ यार इस टाईम टूर का महिना थोडा गलत हुआ। टू मेनी कॉल्स आय विल हॅव टू अटेंड व्हाइल ऑन टूर’ आमचा तमिलियन महाराष्ट्रीयन ग्रुप, त्यामुळे बोलणं हिंदी इंग्लिशमध्येच. त्या कॉन्व्हर्सेशनमध्ये एक लक्षात आलं की फेब्रुवारी महिना हा सर्वांसाठीच चुकीचा महिना होता. ‘परफेक्ट राँग टाइम’. पण मला मात्र अतीव आनंद झाला, मी एकटीच स्ट्रेसमध्ये नाहीये तर आमची सर्व मित्रमंडळी तेवढ्याच किंवा त्यापेक्षा जास्त स्ट्रेसमध्ये आहेत हे बघून. ह्युमन सायकॉलॉजी. ग्रेट एक्झॅम्पल होतं आम्हा सर्वांसाठीच. मोठमोठ्या ऑर्गनायझेशन्स चालविणारी ही मंडळी आणि आम्ही सुद्धा एक मिडसाईज ट्रॅव्हल कंपनी चालविणारे, टीमला शिकविणारे, परफेक्शनची कास धरणारे, पण इथे आमचं ‘लोका सांगे ब्रह्मज्ञान...’ झालं होतं. इतकं सगळं बोलणं चालू होतं, प्लॅनिंग करीत होतो आपण, पण एकदाही आपण एकमेकांना प्रश्न विचारला नाही की, ‘फेब्रुवारी - इज इट द राईट टाईम फॉर एव्हरीवन?’ आता ऑलरेडी आम्ही टूर सुरु केली होती, त्यामुळे ती आनंदात एन्जॉय करणं हेच आमचं काम होतं आणि त्यातच शहाणपण होतं. मात्र त्याचवेळी आम्ही एकमेकांना विचारलं की पुढे जर असं कधी जायचं असेल तर सर्वांना सुटेबल महिना कोणता? बऱ्याच चर्चेनंतर जून महिन्यावर आम्ही शिक्कामोर्तब केलं आणि हुश्श झालो. आता पुढच्या वर्षी म्हणजे 2026 मध्ये जर आम्ही गेलो अशाच अफलातून टूरवर तर ते जूनमध्ये. कारण फेब्रुवारीत येणं ही चूक होती आमची सर्वांची मिळून आणि यापुढे आम्ही जर सर्वांसाठी कोणता महिना चांगला हे ठरवलं नाही तर तीच चूक परत घडू शकते. चुकांमधून शिकत राहणे, ती चूक पुन्हा न करणे आणि दुसऱ्यांनाही तो केस स्टडी देऊन कोणीही ती चूक न करणे हाच तर महामंत्र आहे ‘स्ट्रेस फ्री वर्क कल्चर’चा.
आमचे एक लंडनचे असोसिएट आहेत. वर्षातून एकदा दोनदा त्यांची फेरी असते. त्यांना म्हटलं, ‘अरे तुमचा बिझनेस फिक्स्ड आहे. तुम्ही अजून बिझनेस वाढवत नाही आहात, मग दरवर्षी या फेऱ्या का मारता? दर दोन-तीन महिन्यांनी तसेही झूम वा टीम्सवर एक्सटेन्सिव्ह कॉल्स करतोच की आपण’. ऑनलाईन कॉल्सची सवय वा व्यसन लागलेल्या माझ्या बिझनेस माईंडचा हा टाईम सेव्हिंग प्रश्न. त्यांचं म्हणणं, ‘आता कामं थांबत नाहीत पण आम्हाला तुमच्याशी फेस टू फेस बोलायचं असतं, सगळ्यांना भेटलो, त्यांच्याशी बोललो की बरं वाटतं. बिझनेस व्यतिरिक्त गप्पा होतात, आपण एकमेकांना आणखी जाणून घेतो आणि त्यामुळे आपले हितसंबंध आणखी दृढ होतात.’ हे तर बरोबरच आहे. बोलण्याने खूप काही साध्य होतं आणि त्यातही फेस टू फेस असेल तर सोन्याहून पिवळं. हल्ली सगळंच ऑनलाईन होतंय पण तेव्हाच असं ‘फेस टू फेस’, ‘पर्सन टू पर्सन’ भेटण्याची आणि बोलण्याची ओढ वाढत चाललीय. आणि आत्ता ती गरजही आहे कधी नव्हे एवढी.
आमचा एक छोटा ब्रँड आहे ‘ग्रँडपॅरेंट ग्रँडचिल्ड्रेन’. आजी आजोबांसोबत नातवंडांची सफर. वीणा वर्डची सुरुवात झाल्यावर नव्याने हा ब्रँड आम्ही लाँच केला होता. मी स्वतः या टूर्ससोबत जात होते. आता आम्ही तो पुनरुज्जीवित करतोय. त्याची संकल्पना हीच होती की आजी आजोबा आणि नातवंडांमधला संवाद वाढवायचा. आजीआजोबा आणि नातवंडांनी टूरवर एकत्र यायचं. (इथे आईबाबांना नो एन्ट्री). टूरवर भरपूर बोलायचं, हसायचं, नाचायचं, अगदी धम्माल करायची. आजकाल पुढची पिढी ही युरोप, अमेरिका, ऑस्ट्रेलियावासी झाली आहे. ग्लोबल सिटिझन्स. गावांच्या, शहरांच्या, राज्यांच्या आणि देशांच्या सीमारेषा धूसर झाल्या आहेत. एका अर्थी खूपच स्वागतार्ह आहे हे, पण यामध्ये अंतर वाढलंय माणसामाणसांमधलं, फिजिकली भेटणं दुरापास्त होत चाललंय. खासकरून आजीआजोबा आणि नातवंडं हा बॉन्ड थोडा अशक्त झालाय. जो सशक्तच नव्हे तर सुदृढ झाला पाहिजे. पर्यटनाच्या माध्यमातून आम्ही जेव्हा कुटुंबांकडे बघत असतो तेव्हा ‘व्हॉट्स फॉर मी’ किंवा ‘व्हॉट्स फॉर वीणा वर्ल्ड’ हा विचार करीतच असतो. आमचं ब्रीदवाक्यच आहे नं, ‘प्रत्येक कुटुंबासाठी आणि कुटुंबातल्या प्रत्येकासाठी’. त्याच निरीक्षणात दिसली ही दुरी, आजी आजोबा आणि नातवंडांमधली आणि त्यातूनच निर्माण झाल्या या टूर्स. आजी आजोबा भारतात आणि नातवंडं दूरदेशी असतील तर त्यांनी मध्ये कुठेतरी एखाद्या देशात भेटायचं. म्हणजे बघा नं, लंडन, न्यूयॉर्क मध्ये नातवंड आणि मुंबईमध्ये आजी आजोबा असतील तर त्यांनी दुबईच्या टूरवर भेटायचं. कॅलिफोर्निया वासियांनी जपान किंवा सिंगापूरच्या टूरवर आजीआजोबांचं हे मिलन घडवायचं. महत्त्वाचं म्हणजे पुढच्या पिढीला आपल्या अतुल्य भारताची ओळख करून देणं इज अ मस्ट. त्यांच्या ख्रिसमस व्हेकेशनमध्ये एक एक करीत आपल्या भारतातली एकसे एक अफलातून राज्यं दाखवायची. जगात जे काही तुकड्यातुकड्यांमध्ये इतर देशांना मिळालंय, ते आपल्या भारताला निसर्गाने भरभरून दिलंय. मग ती हिमालयातली बर्फाच्छादित राज्यं असोत वा राजस्थानचं वाळवंट, अखंड वाहणाऱ्या नद्या असो वा दीव दमण ते दिघा पर्यंत पसरलेला अफाट समुद्र, कॉफी असो वा चहा, मसाल्याचे जिन्नस असो वा वाईन निर्माण करणारी द्राक्षं, निकोबार मधल्या वसाहती असोत वा बंगलोरमधली अद्ययावत आयटी हब्ज... कला लोककला परंपरा या सगळ्याच बाबतीत भारत सुजलाम सुफलाम आहे. त्यामुळे पुढच्या पिढीने तो बघितलाच पाहिजे. तुम्ही कुटुंबीय म्हणून आणि आम्ही पर्यटन व्यावसायिक म्हणून हे आपलं कर्तव्यच आहे. असो.. हा विषय नात्यांमधल्या संवादाचा असला तरी माझ्या लिखाणात तो थोडासा कमर्शियल झालाच. आदतसे मजबूर. पण कुटुंबातील, मित्र मंडळींमधील संबंधाची वीण आणखी घट्ट करण्यासाठी पर्यटन अप्रत्यक्षरित्या काम करतंय.
मोरोक्कोच्या किश्श्यावरून अगदी अधोरेखित झालं की बोललं पाहिजे, मात्र आवश्यक तिथेच. हो, अन्यथा बोलण्यामुळे बरीच हानी होते हे ही आपण प्रत्येकाने आयुष्यात कधीतरी अनुभवलेलं आहेच. आम्ही बोललो असतो तर मोरोक्कोची ट्रीप फेब्रुवारीत करून स्ट्रेसमध्ये जाण्याऐवजी सर्वांची सोय झाली असती. हॉलिडे आणखी आनंदी बनवता आला असता. एकच प्रश्न विचारायचा होता, ‘इज फेब्रुवारी राईट टाइम?’
थोड्या मोठ्या गोष्टीचा विचार केला तर वाटतं, युरोपियन देशांनी एकमेकांशी एकमेकांच्या इंटेन्शन्स विषयी प्रत्यक्ष बोलणी केली असती तर पहिलं महायुद्ध कदाचित घडलंही नसतं. सध्या अमेरिका युक्रेन वरिष्ठांमधली चर्चा हा आक्रमक अतिरेकी अपवाद. पहिलं महायुद्ध झालंच नसतं तर जगाचा इतिहास भूगोल वेगळा दिसला असता. खुल्या दिलाने केलेली सकारात्मक चर्चा खूप काही चांगलं घडवू शकते. श्री. संदीप वासलेकरांनी त्यांच्या ‘स्ट्रॅटेजिक फोरसाईट ग्रुप’ द्वारे तर हे अनेकदा सिद्ध केलंय. देशांप्रमाणे उद्योगांचंही. नोकिया कोडॅक ब्लॅकबेरी यांनी जगाचे वा तंत्रज्ञानाचे वारे कुठे वाहताहेत त्यासंबंधीची चर्चा आणि व्हॉट्स नेक्स्ट साठीचं इंटर्नल कम्युनिकेशन केलं असेल का? कदाचित त्यामुळे जगाचे मार्केट लीडर असलेले ते आज नामशेष झालेले दिसले नसते. त्यांच्याकडे तर बेस्ट ऑफ द बेस्ट सायंटिफिक ब्रेन्स होते त्यावेळी. एकत्र बसून बोलणं, येणाऱ्या परिस्थितीला सामोरं जाणं आणि त्यावर मात करणं शक्य होतं. अर्थात याला अनेक कारणं असतील पण ‘लॅक ऑफ कम्युनिकेशन’ हे एक महत्त्वाचं कारण आहे. 1912 मध्ये टायटॅनिक शिप बुडाली ती सुद्धा आईसबर्गची वॉर्निंग कॅप्टनपर्यंत वेळीच न कम्युनिकेट केल्यामुळे. चेर्नोबिल न्यूक्लिअर डिझास्टर ंवा 9/11 टेररिस्ट अटॅक ही आत्ताची उदाहरणं लॅक ऑफ कम्युनिकेशनची, वॉर्निंग दुर्लक्षित केल्याची.
कोणत्याही गोष्टीचा अलर्ट मिळणं हे भाग्याचं लक्षण. त्यानंतर सुरु होतं त्या अलर्टचं योग्य ठिकाणी लागलीच कम्युनिकेट होणं. हे जर झालं नाही तर रेड फ्लॅॅग वा रेड अलर्ट येतो. पण तेव्हा वेळ निघून गेलेली असते. खूप हानी होते. युद्धांमध्ये, उद्योगांमध्ये, मित्रमैत्रिणींमध्ये आणि कुटुंबीयांमध्ये ‘लॅक ऑफ कम्युनिकेशन’ न होण्यासाठी आपण नेहमी सतर्क आणि सकारात्मक राहिलं पाहिजे, एकमेकांशी बोललं पाहिजे.
Post your Comment
Please let us know your thoughts on this story by leaving a comment.