Published in the Saturday Lokasatta on 03 February, 2024
...एकंदरीतच आपल्या घरातला उत्साहच इतका निरुत्साही असतो की त्या डायनिंग टेबलवरच आपण नाऊमेद होतो आणि डोक्यातला विचार सोडून देतो, ज्यामुळे घर आणि जग भविष्यातल्या एका ठाम, निर्धारी आणि निश्चयी व्यक्तिमत्वाला मुकतं...
गेले पंधरा दिवस वातावरण अयोध्यामय होऊन गेलं होतं. राम जन्मभूमी प्राणप्रतिष्ठा सोहळा देशाच्या अपेक्षेला साजेसा झाला. मंदिरही छान झालंय, मुख्य म्हणजे ते भव्य आहे. सभोवताली प्रचंड मोकळी जागा आहे. जेवढं मंदिर बांधून झालंय ते बघून आनंद झाला. आमच्या टूर मॅनेजर्स मंडळींनी राम मंदिराची एक उत्कृष्ट प्रतिमा अयोध्येहून आणली होती जी त्यांनी त्याच दिवशी आणून ऑफिसमध्ये विराजमान केली.
आपल्या देशाला अशा भव्य गोष्टींची गरज आहे असं मला प्रामाणिकपणे वाटतं. म्हणजे देशाच्या गरजा अनेक आहेत आणि त्या वाढतच राहणार आहेत, त्यावेळी एवढे पैसे खर्च करून ही मंदिरं बांधायची गरज आहे का?’ हा प्रश्नही सार्थ आहे पण ज्यावेळी आम्ही वेगवेगळ्या देशात फिरतो, मोठमोठी चर्चेस, कथिड्रल्स, मॉस्क्स बघतो तेव्हा असं वाटतं की आपल्याकडेही आपली संस्कृती आणि परंपरेचं प्रतिक म्हणून तसंच पुढच्या पिढीला अभिमान वाटेल अशा गोष्टी निर्माण झाल्या पाहिजेत. परदेशातून येणार्या टूरिस्टना आम्ही किती काळ गेट वे ऑफ इंडिया, ताजमहाल किंवा कुतूबमिनार दाखविणार? आपलं प्रत्येक राज्य वेगळं आहे, त्या प्रत्येक राज्यात त्या राज्याची ओळख बनेल असं भव्यदिव्य काहीतरी निर्माण झालं पाहिजे. समुद्रात बनणार्या शिवाजी महाराज्यांच्या अतिभव्य पुतळ्याची वाट आम्ही त्यासाठीच बघतोय. किती मोठं प्रेरणास्थान असेल ते आपल्या महाराष्ट्रातल्या प्रत्येकासाठी नाही का. एखाद्या भव्य मंदिराइतकंच त्याचं महात्म्य असेल. आणि त्याच्या सभोवती स्टॅच्यु ऑफ युनिटीसारखा परिसर जर निर्माण झाला तर काय बहार येईल! आपल्या देशातले पर्यटक आपल्याच देशात काश्मीर हिमाचल लेह लडाख राजस्थान केरळ अंदमान गुजरात ह्या राज्यांमध्ये जास्त फिरतात त्यांना महाराष्ट्राचीही ओढ लागेल. आपल्या देशात तसेच परदेशात अनेक ठिकाणी प्रमुखस्वामी महाराजांनी बनविलेली अक्षर धाम मंदिरं खूपच सुंदर आहेत. दक्षिणेकडची मंदिरंही आपल्याला आकर्षित करतात. कन्याकुमारीचं स्वामी विवेकानंद स्मारक सुद्धा प्रत्येक भारतीयाच्या तसेच परदेशी पर्यटकांच्या टॉप लिस्टमध्ये असतं. तर अशा भव्य वास्तू वा मंदिरं आपल्या भारतात निर्माण व्हायला हवीत.
राममंदिर प्राणप्रतिष्ठेनंतरची भाषणं ऐकत होतो. त्यातील आपल्या माननीय पंतप्रधानांचं एक वाक्य लक्षात राहिलं ते म्हणजे ’देव से देश, राम से राष्ट्र’. फारच छान. आणि दुसरी गोष्ट ऐकून डोळे विस्फारले ते म्हणजे गोविंद देव गिरीजी महाराजांनी सांगितलं की आपल्या पंतप्रधानांनी श्रीराम प्राणप्रतिष्ठेसाठी अनुष्ठान घेतलं होतं, ’अकरा दिवसांचा कडकडीत उपवास, फक्त नारळ पाणी प्यायचं आणि अकरा दिवस जमिनीवर झोपायचं’. बापरे बाप! एवढं करून एखादी व्यक्ती एवढी फ्रेश आणि उत्साही कशी राहू शकते. आमच्या घरात रोज सकाळी सहाच्या बातम्या ऐकायची माझी आणि सुधीरची सवय आहे. ’धिस इज आकाशवाणी’ ऐकल्यावर दिवस चांगल्या तर्हेने सुरू झाल्यासारखं वाटतं. त्यामुळे दररोज आपले परराष्ट्रमंत्री, राष्ट्रपती, पंतप्रधान ह्यांचा दिवसभराचा कार्यक्रम काय आहे ते कळतं. ह्या प्राणप्रतिष्ठेच्या आधी अकरा दिवसांचा कार्यक्रम बघितला तर पंतप्रधानांचा प्रत्येक दिवस वेगवेगळ्या कार्यक्रमांनी खचाखच भरलेला होता. ह्याचा अर्थ कमी खाऊन माणूस जास्त अॅक्टिव्ह राहू शकतो. तसंही आपले पंतप्रधान सात्विक भोजनच करतात असं ऐकलंय. फळं भाज्या डाळी मिलेट्स असं सगळं होलसम न्युट्रिशस फूड घेतात म्हणे. वयाच्या त्र्याहत्तराव्या वर्षी कसं अॅक्टिव्ह रहावं ह्याचं एक उत्कृष्ट उदाहरण आपल्या पंतप्रधानांनी आपणा सर्व भारतीयांसमोर ठेवलंय. पक्ष राजकारण निवडणूका बाजूला ठेवून नि:पक्षपणे विचार केला तर आपल्या पंतप्रधानांचं व्यक्तिमत्व, त्यांचा उत्साह, कामाचा उरक, शिस्तप्रियता ह्या गोष्टी ते आपल्याला उदाहरणासह सिद्ध करून दाखवितात.
आमच्या घरात दोन गोष्टींचा आम्ही बर्याचदा उल्लेख करतो. नील आणि राज तर मला चिडवतात ’कुठे खरचटलं लागलं आणि ममकडे आलो तर औषध लावता लावता ऐकायला लागायचं, रडतोस काय असा? आपल्या सोल्जर्सचा विचार कर. ते कशी छातीवर गोळी घेत असतील, कुणाचा पाय मोडतो, हात मोडतो, जखमा होतात, तरी ते कसं सगळं सहन करतात. आम्हाला यार ममने रडायला पण दिलं नाही’. सध्या आमच्या घरातली नवीन टूम आहे ती म्हणजे, कुणी दमलं थकलं गळून गेलं की म्हणायचं, ’चला उठा, आपल्या पंतप्रधानांकडे बघा, वयाच्या त्र्याहत्तराव्या वर्षी ते जर एवढी कामं करीत असतील तर एवढ्याशा परिश्रमांनी दमण्याचा थकण्याचा आपल्याला अधिकार नाही. चलो, लगे रहो!’ प्रेरणादायी व्यक्तींमुळे फरक पडतो तो असा. ह्यासाठीच आपल्या पंतप्रधानांना मला मनापासून थँक्यू म्हणावसं वाटतं.
आपण आपल्या घरी जर असं काही व्रत घेतलं असतं तर? ’येणारा आठवडा मी फक्त नारळ पाणी घेणार आणि जमिनीवर झोपणार’. जस्ट अनाऊन्स करून बघा. पहिल्यांदा आजी येईल आणि कपाळाला हात लावेल आणि म्हणेल तब्येत बरी आहे नं बाळा तुझी?’ आई कडाडेल, ’हे बघ जी काही थेरं करायचीयत ती तुझी तू कर. आजारी वैगेर पडलीस तर मला वेळ नाहीये ही विकतची दुखणी काढायला.’ आजोबा, ’छान निर्णय घेतलायस, थोडं वजन कमी झालच पाहिजे तुझं’. बाबा, ’काय करणार आहेस हे सगळं करून? बॉलिवूडमधनं कुणी प्रपोज बिपोज केलंय की काय?’ बहीण गालातल्या गालात हसत, ’लेट मी सी किती दिवस नव्हे किती तास हे फॅड डोक्यात राहतं ते’. एकंदरीतच आपल्या घरातला उत्साहच इतका निरुत्साही असतो की त्या डायनिंग टेबलवरच आपण नाऊमेद होतो आणि डोक्यातला विचार सोडून देतो, त्यामुळे घर आणि जग भविष्यातल्या एका ठाम, निर्धारी आणि निश्चयी व्यक्तिमत्वाला मुकतं. दोष आपला नसतो, घरातल्यांच्या प्रेमामुळे असं होतं.
’नो रूल रूल्स’ हे नेटफ्लिक्सचा को-फाऊंडर रीड हेस्टिंग्जचं पुस्तक सध्या वाचतेय. त्यात त्याने फार छान म्हटलंय, ’एक निगेटिव्ह किंवा अंडर परफॉर्मर माणूस जर ग्रुपमध्ये असेल तर तो सगळ्या ग्रुपला खाली खेचू शकतो’, आणि हे खरंच आहे. निगेटिव्ह वा अंडरपरफॉर्मर माणसंच नव्हे पण आपल्यावर जीवापाड प्रेम करणारी माणसंही फक्त त्या प्रेमापोटी किंवा काळजीपोटी असे आपल्या घरातल्या कुणीतरी जर असे काही निश्चय केले तर त्याने काळजीत पडणार आणि त्यांना त्यापासून परावृत्त करण्याचा प्रेमळ प्रयत्न करणार.
वय वाढतंय मग वजन आटोक्यात ठेवण्यासाठी रात्रीचं जेवण मी बंद केलं आणि आश्यर्च म्हणजे तब्येतीच्या अनेक तक्रारी गायब. कमी खाल्ल्याने जास्त अॅक्टीव्ह झाले. सात वर्ष मी हे केल्यावर आणि तरीही जीवंत आहे हे बघत सुधीरनेही थोडी प्रेरणा घेतली आणि गेले वर्षभर त्यानेही हे सुरू केलं आणि त्यालाही फरक जाणवला. पण जर कुठे गेलो तर खूपच पंचाईत होते. दोनच पर्याय असतात, एक मुकाट जेवायचं नाहीतर समोरच्याला समजावून सांगायचं. पण आपला देशच इतका आतिथ्यशील आहे की आग्रहाला आपण बळी पडतोच. आग्रह अगदी पराकोटीचा असतो. नाही म्हणवत नाही आणि मग आपण आपलं व्रत मोडतो. आमची हेता जर कधी सोबत असेल तर ती मात्र आमची बाजू घेऊन समोरच्याला सांगते ’नो नो दे डोन्ट टेक डिनर’. कुणीतरी त्यावेळी सुटका करायला आल्यासारखं वाटतं.
हल्लीच्या आपल्याकडच्या प्रदुषित वातारणात आणि सेडेन्टरी लाइफस्टाइलमध्ये हेल्थ फार महत्वाची झालीय आणि त्यामुळेच ज्याला जे झेपेल ते करून शक्य होईल तिथपर्यंत औषधांशिवाय आयुष्य कसं जगता येईल त्याचा विचार केला पाहिजे. फास्ट फूड, जंक फूड, पॅकेज्ड फूड, पॅक्ड ज्युसेस, सॉफ्ट ड्रिंक्स, साखर अशा अनेक गोष्टी वर्ज्य केलेली अनेक मंडळी आपल्याला दिसतात आणि खूपच चांगलं पाऊल असतं ते पण आपण त्यांना आग्रहाने भरीस पाडतो त्यांचं ते व्रत मोडण्यासाठी. ’अरे, एक दिन चलता है यार!’ ’चल आज चीट डे आहे असं समज’ ’त्योहार है, मिठा खाना ही पडेगा’ ’देख गए साठ सालों से मैं जो चाहिए वो खा-पी रहा हूँ, जिंदा हूँ ना, तेरा ये नाटक बंद कर और खा, ऐश कर’ ’भाव खाऊ नकोस, आईस्क्रीम खा’ अशा एक ना अनेक प्रेमळ बोलण्याला व्रतस्थ बळी पडतात आणि त्यांच्या शिस्तीची ऐशी की तैशी होऊन जाते. इथे मला वाटतं की जर कुणी अशा व्रतस्थ व्यक्ती भेटल्या तर त्यांचा मान राखून आपण आपल्या आग्रहाला आवर घालावा. लेट देम बी द वे दे वाँट टू बी! अगदी छानसा पुणेरी लहजा आठवला, ’सोडा की त्यांना!’
Post your Comment
Please let us know your thoughts on this story by leaving a comment.