Published in the Saturday Lokasatta on 25 January, 2025
...मस्तीभरी मुशाफिरी करणाऱ्या माझ्या मनाला ‘लेह लडाखची’ सहल रिॲलिटीची जाणीव करुन देते. आकाशात विहार करणाऱ्या मला एकदम वास्तवात घेऊन येते...
ज्यावेळी आम्ही वीणा वर्ल्डची सुरूवात केली तेव्हा भारताच्या उत्तर टोकाच्या लेह लडाखपासून सुरूवात करूया असा विचार करून मी आणि सुधीर 2014 च्या एप्रिल महिन्यात पहिल्यांदा थेट लेहला पोहोचलो. ना तिथला कुणी ट्रॅव्हल एजंट माहीत होता, ना हॉटेलवाले. लेहला पोहोचल्यावर नियमानुसार रेस्ट घेतली, झोपून राहिलो. भरपूर पाणी पीत राहिलो. त्या हवेशी ॲक्लमटाइज झालो. चार पाच दिवस आम्ही तिथे सकाळपासून संध्याकाळपर्यंत भटकत होतो. लेह लडाखचं लँडस्केप बघून आम्ही स्तिमित झालो होतो. लेह लडाखचे अजस्त्र पहाड, अव्वाच्या सव्वा पसरलेला पँगाँग लेक, मैलोनमैल पसरलेलं वाळवंट आणि क्षितिजापर्यंत दिसणारा रखरखीत रुक्ष प्रदेश. कधी बोचरी थंडी, अचानक गडगडणारा पाऊस तर कधी थोड्याशा तडाख्याने आपल्याला गोऱ्याचं काळं करणारं रणरणतं ऊन... निसर्गाची ही किमया पाहिली तेव्हाच आमचं ठरलं की आता इथे भरपूर टूर्स आणायच्या. लेह लडाख पर्यटकांनी, नव्हे प्रत्येक भारतीयाने पाहिलंच पाहिजे. या टूर्ससाठी आम्हाला लोकल पार्टनर हवा होता. लेह लडाखचा एक ट्रॅव्हल एजंट ITB बर्लिन या जगातल्या सर्वात मोठ्या ट्रॅव्हल शो मध्ये सुधीरला भेटला होता. त्याचा माग काढत आम्ही त्याच्या ऑफिसला पोहोचलो. त्याच्यासोबत त्याची मुलगी होती. तोवर ते वर्षाला साधारणपणे पाचशे टूरिस्ट करायचे जुलै ऑगस्टमध्ये. त्यापैकी बहुतेक फॉरेनर्स असायचे, जे हायकिंग किंवा ट्रेकिंगसाठी यायचे. आम्हाला जाणवलं की आम्ही करीत असलेल्या टूर्स आणि ते तिथे करीत असलेलं काम टोटली वेगळं आहे. जर यांच्यासोबत काम करायचं असेल तर अथपासून इतिपर्यंत सगळं शिकवावं लागेल. पण माणसं चांगली वाटली. मेहनती दिसली आणि मुख्य म्हणजे प्रामाणिकपणे बोलत होती. त्यांची आमची वेव्हलेंग्थ जुळत होती. त्यांना म्हटलं आम्ही जून जुलैपासून टुरिस्ट आणायला सुरूवात करतो, ह्या वर्षी साधारण एक हजार टुरिस्टना इथे सर्व्हिस द्यायचं लक्ष्य ठेवूया. पण आमचे हे पर्यटक, हायकर्स किंवा ट्रेकर्स नाहीत. त्यांच्या गरजा थोड्या वेगळया आहेत. जमेल का तुम्हाला ते? ITB बर्लिनच्या थोड्याशा ओळखीचा धागा घेऊन आम्ही त्यांना भेटलो होतो. वीणा वर्ल्ड फक्त काही महिन्यांची होती आणि एक हजार टुरिस्टची गोष्ट करीत होती हे त्यांच्यासाठी अविश्वसनीय होतं. आम्हीही त्यांना सांगितलं की, ‘एक हजार हे आमच्यासाठीही मोठं लक्ष्य आहे. कारण आमची ट्रॅव्हल कंपनी नवीन आहे आणि लेह लडाख डेस्टिनेशनही नवीन आहे. पण आम्ही मनापासून प्रयत्न करू. तुम्ही साथ द्या. इंटरनेटमुळे बुकिंग करणं सोप्प झालं असलं आणि आम्ही डायरेक्टली सगळं काही मुंबईत बसून करू शकत असलो, तरी आम्हाला ते करायचं नाहीये. इथला लोकल पार्टनर आम्हाला हवाय आणि आपलं जमेल असं वाटतंय. ‘लेट्स वर्क टुगेदर, मेक पीपल हॅप्पी ॲन्ड ग्रो टुगेदर!’ असं म्हणत आम्ही आमच्या नव्या पार्टनरशिपवर शिक्कामोर्तब केलं. एकमेकांना थँक्यू आणि बेस्ट ऑफ लक देत मुंबईला पोहोचलो.
आल्यावर आम्ही लेह लडाख वुमन्स स्पेशल जाहीर केली आणि अवघ्या पंधरा दिवसांत दोनशे महिलांनी बुकिंग केलं. आम्हाला तेवढ्याच कपॅसिटीची दुसरी टूर लावावी लागली. तेव्हापासून वीणा वर्ल्डसोबतच्या महिलांनी आणि आमच्या सर्वच पर्यटकांनी लेह लडाख दणाणून सोडलं. आज लेह लडाखला एप्रिलपासून ऑक्टोबरपर्यंत वीणा वर्ल्डच्या टूर्स मोठ्या प्रमाणावर सुरू असतात ह्याचा मला सार्थ अभिमान आहे. पर्यटकांनी, त्यातही खासकरून महिलांनी लेह लडाखची भीती अशी पळवून लावल्यावर कुटुंबं कशी मागे राहतील? सर्वांनी लेह लडाख उचलून धरलं आणि आम्ही पहिल्याच वर्षी पंधराशे पर्यटक लेह लडाखला नेऊन आणले. तेव्हापासून दरवर्षी पाच हजार पर्यटक वीणा वर्ल्डसोबत लेह लडाखला भेट देतात. आमचे हे लेहचे पार्टनर्स त्या पहिल्या दिवसापासून आमच्याशी जोडले गेले ते आजतागायत. वांगचूक शाली, रिगझीन डोल्मा, गॅल शाली आणि डोलकर ह्या आईवडील मुलगा मुलगी अशा चौकडीने अगदी पहिल्या दोनशे जणींच्या वुमन्स स्पेशलपासून इतकी चांगली सर्व्हिस दिली की आम्हाला मागे वळून पहावंच लागलं नाही. ‘एक्सप्लोअर हिमालया’ हे त्यांच्या ट्रॅव्हल कंपनीचं नाव आता वीणा वर्ल्डचं लेह लडाखमधलं ऑफिस बनलंय. आता त्यांच्याकडे कार्स, ड्रायव्हर्स, हॉटेल्स, टेन्ट्स ह्या सगळ्याचं चांगलं नेटवर्क आहे. मुख्य म्हणजे त्यांच्या लोकल पार्टनर्सशी त्यांचे चांगले संबंध आहेत. ज्याचा आम्हाला आणि पर्यटकांना फायदा होतो.
लडाखच्या भेटीत सगळ्यांनाच वेध लागलेले असतात ते पँगाँग लेक पाहायचे. ‘पँगाँग त्सो’ या तिबेटी भाषेतल्या नावाचा अर्थ ‘लांब, चिंचोळा, जादुई तलाव’ असा आहे. या तलावाची जादू त्याच्या काठावर उभं राहिल्यावर प्रत्येकाच्या मनावर अंमल करते. चौदा हजार फूटांवरच्या पँगाँग लेकच्या क्षणाक्षणाला बदलणाऱ्या निळाईच्या छटा, एकीकडे माथ्यावर बर्फाचे मुकूट मिरवणारे आणि पायथ्याशी वाळूचे डोंगर असणारे उंच पहाड, कधी मध्येच दिसणाऱ्या भव्य बुध्द मूर्ती आणि ‘ओम मणि पद्म हुम’ चा जागर करणाऱ्या प्राचीन मॉनेस्ट्रीज हे सगळंच स्वप्नवत वाटतं. लडाखच्या सहलीत या भूप्रदेशाचं आणखी एक पूर्णपणे वेगळं रुप पाहायला मिळतं ते नुब्रा व्हॅलीमध्ये. या परिसरात चक्क वाळूच्या टेकड्या आहेत. ॲडव्हेंचरवाल्यांसाठी लडाखमधल्या या सँड ड्यून्समध्ये सवारी करायला डबल हम्प्ड कॅमल्स असतात. नुब्राच्या वाळवंटात रात्रीच्या वेळी चमचमणाऱ्या अगणित चांदण्यांनी भरलेलं आकाश न्याहाळणं हा खरोखरच स्वर्गीय अनुभव असतो. आपण लकी असलो तर हिमालयातल्या कोल्ड डेझर्टचा कायम लक्षात राहील असा हा अनुभव आपल्याला घेता येतो.
लेहमध्ये जेव्हा कुणीही व्यक्ती भेटतात, तेव्हा एकमेकांना ‘जुलेऽऽऽ’ म्हणून ग्रीट करतात. जुलेऽऽऽ म्हणजे लडाखी लोकांचा ‘नम्र नमस्कार’. प्रथेप्रमाणे जो वयाने लहान असतो त्याने आधी जुलेऽऽऽ म्हणायचं. लडाखी माणूस जपानी माणसासारखा सतत नम्रपणे थोडासा झुकून बोलणारा, शांत आणि सोबर असतो. तिथल्या अतिखडतर आयुष्याशी झगडताना तो पेशन्स आपोआप त्यांच्यात भिनत असावा.
आता लेहची इंटरनेट कनेक्टिविटी बऱ्यापैकी सुधारलीय. दोन वर्षांपूर्वी गेले तेव्हा आठ दिवस इंटरनेट कनेक्शन ठप्पं होतं. मेल डाऊनलोड व्हायला काही सेकंदाचा वेळ लागला तरी पॅनिक होणाऱ्या आमच्या मनाला असा संपर्क तुटणं म्हणजे आकाश कोसळल्यासारखी अवस्था. तर इथली लोकं ‘इंटरनेट चालू झालं तर शिमगा, नाहीतर जे आहे त्यात आनंद’ मानतात. इथे लेहला इंटरनेटच नाही तर आयुष्यच सहा महिने बंद होतं. ही माणसं सहा महिने त्यांचं लडाखी आयुष्य जगतात आणि थंडीचे सहा महिने स्वतःला घरात बंदिस्त करुन घेतात किंवा चक्क दुसरीकडे बस्तान हलवतात. जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठाही मधेमधे बंद होऊन जातो. कधी दरड कोसळली तर रस्तेही बंद होतात. पण आकांडतांडव नाही की नाराजी नाही, कोणत्याही परिस्थितीत जमवून घ्यायची मानसिकता. ही सहल मला कायम जमिनीवर आणते. मस्तीभरी मुशाफिरी करणाऱ्या माझ्या मनाला लेह लडाखची सहल रिॲलिटीची जाणीव करुन देते. आलिशान हॉटेल्स, गुळगुळीत रस्ते, या सगळ्यांच्या संपूर्ण विरुद्ध असं लेह आकाशात विहार करणाऱ्या मला एकदम वास्तवात घेऊन येतं.
अशा लडाखच्या लँडस्केपचा आणखी एक अविभाज्य भाग म्हणजे वर्षाच्या कोणत्याही काळात, कोणत्याही ऋतूत, कशाही हवामानात जराही विचलीत न होता भक्कमपणे उभे ठाकलेले आपले भारतीय जवान. लेह लडाखची सीमा आपले दोन्ही सख्खे शेजारी चायना आणि पाकिस्तान ह्यांना भिडलेली आहे. त्यामुळे संरक्षणाच्या दृष्टीने हा सगळा प्रदेश अतिसंवेदनशील आहे. साहजिकच इथे एकवेळ स्थानिक दिसणार नाहीत पण आपले जवान कर्तव्यदक्षतेनं पोस्ट सांभाळताना दिसतात. लेह शहरातील 'हॉल ऑफ फेम' तर प्रत्येक पर्यटकासाठी मस्ट आहे. भारतीय जवानांच्या शौर्याचं चित्रमय प्रदर्शन घडवणारं हे सभागृह आणि तिथे दाखवली जाणारी कारगिल युध्दावरची डॉक्युमेंट्री बघितल्यावर प्रत्येकाचा उर अभिमानानं भरुन येतो. देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या आपल्या जवानांना कोणती प्रेरणा देशाच्या सीमेचं आणि देशवासियांचं रक्षण करण्यासाठी प्रवृत्त करते कोण जाणे, पण सियाचिनच्या रस्त्यावर, खार्दुंगलाच्या छावण्यांमध्ये सजग असणाऱ्या जवानांना बघून, त्यांच्या त्या खडतर आयुष्याची कल्पना करुनही आपल्याला थिजून जायला होतं आणि त्याचबरोबर आपण किती खुजे आहोत याचीही जाणीव होते.
लेह लडाखच्या सहलींमध्ये जसे भारतीय जवानांचे, मिलिटरी कॅम्पचे, लष्करी कॉनव्हॉयचे दर्शन ठिकठिकाणी घडत असते, त्याचप्रमाणे मॉनेस्ट्रीज, स्तूप आणि भव्य बुध्द मूर्तीही पहायला मिळतात. 11व्या शतकातील वॉल पेंटिंग्जनी सजलेला आल्ची गोम्पा, डिस्कीट इथली 106 फूट उंचीची मैत्रेय बुध्दाची मूर्ती, लडाखमधील सर्वात मोठा हेमिस गोम्पा या सगळ्यातून इथल्या लोकजीवनाचे रंग अनुभवता येतात. लडाखचं पारंपरिक लोकनृत्य पाहताना त्यांच्या संथ लयीतल्या हालचाली मोहवून टाकतात. लडाख इज् अ मस्ट व्हिजिट डेस्टिनेशन फॉर एव्हरी इंडियन.
आम्ही विडा उचललाय जास्तीत जास्त पर्यटकांना लडाखला घेऊन जायचा. प्रत्येकाने आपल्या ट्रॅव्हल मिशनमध्ये लडाखचं नाव घातलंच पाहिजे. सरकारने लेह लडाख केंद्रशासित प्रदेश घोषित केल्यानंतर खूपच सुधारणा झाल्या आहेत. रस्ते मस्त झाले आहेत. त्यामुळे पूर्वी जो रस्त्यांचा त्रास व्हायचा तो प्रकार आता नाही. आता फक्त गरज आहे ती पर्यटकांनी लडाखला जायची. टुरिझमवर पूर्णपणे अवलंबून असलेल्या आणि तेही फक्त पाच सहा महिनेच चालणाऱ्या लडाखच्या टुरिझम अर्थव्यवस्थेला, लडाखी छोट्या मोठ्या व्यावसायिकांना काम मिळवून दिलं पाहिजे. त्यांच्या मनाला उभारी आणली पाहिजे. एकटे जा, ग्रुपने जा, ट्रॅव्हल कंपनीबरोबर जा पण लडाख तुमच्या ट्रॅव्हल लिस्टमध्ये टॉपवर असू द्या. आणि हो, आपण काही उपकार करीत नाही बरं का लडाखवर. लडाखी लोक नम्र आहेत पण लाचार नाहीत. लडाखला आपण जेव्हा जातो तेव्हा आपण खर्च केलेल्या पैशांच्या बदल्यात आपल्याला जो काही आनंद मिळतो, जे निसर्गसौंदर्य आपण डोळे भरून बघतो, ज्या आठवणी आपण सोबत आणतो ते सगळं अनमोल आहे. सो, चलो बॅग भरो, निकल पडो! लडाख इज कॉलिंग...
Post your Comment
Please let us know your thoughts on this story by leaving a comment.