Published in the Saturday Lokasatta on 30 March, 2024
'जहाँ न जाए हवाईगाडी वहाँ जाए रेलगाडी, जहाँ न जाए रेलगाडी वहाँ जाए मोटरगाडी, जहाँ न जाए मोटरगाडी वहाँ जाए बैलगाडी और जहाँ न जाए बैलगाडी वहाँ जाए मारवाडी!’ हे मी पहिल्यांदा ऐकलं मालेगावच्या संतोष मामा लोढा ह्यांच्याकडून. खूप वर्षांपूर्वी म्हणजे तीस पस्तीस वर्षांपूर्वी मी टूर मॅनेजर म्हणून हिमाचलच्या टूर्स करायला सुरुवात केली होती. मुंबईत नवीन, जगाचा अनुभव नाही, कसं वागायचं, कसं बोलायचं हेही माहीत नव्हतं तेव्हा, त्यामुळे टूर कडंक्ट करताना खूप प्रेशर यायचं. `पर्यटक आपल्याला टूर मॅनेजर म्हणून स्वीकारतील का? आपण ज्या तऱ्हेने टूर करू ते त्यांना आवडेल का?‘ अशा तऱ्हेच्या काळज्यांनी भीती वाटायची. मग मी माझ्या टूरवरच्या पर्यटकांना सांगायच्या माहितीसाठी वा सूचनांसाठी खूप अभ्यास करायचे आणि रोज सकाळी मनातल्या, `भीती काळजी चिंता’ ह्या तीन राक्षसांना देशोधडीला पाठवून मोठ्या आत्मविश्वासाने, हसऱ्या प्रसन्न चेहऱ्याने पर्यटकांसमोर उभी रहायचे. तो दिवस यशस्वी करणे हे एकमेव ध्येय असायचं. पर्यटकांना त्या दिवसाचा अपेक्षित किंवा अपेक्षेपेक्षा जास्त आनंद मिळवून देण्यासाठी मी आणि टूरवर असलेले सहकारी प्रचंड मेहनत घ्यायचो आणि तो दिवस पर्यटकांसाठी आनंदी आणि आमच्यासाठी समाधानी बनवून शांतपणे झोपी जायचो पुढच्या दिवसाच्या यशस्वीतेचं स्वप्न उराशी बाळगून. ह्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये एका टूरवर लोढांचा मारवाडी ग्रुप आला होता. मालेगावचे लोढा, पनवेलचे भाटीया, मुंबईचे लुणावत, बीजापूरचे रुणवाल, जळगावचे संघवी ह्यांच्या फॅमिलीज होत्या. त्यांची बरीचशी भाचे मंडळी त्यांना `मामासा‘ म्हणायची. आणि आम्हीही त्यांना टूरवर संतोषमामा म्हणायला सुरुवात केली ती आजतागायत. अतिशय जॉली ग्रुप. आमच्या टूर यशस्वी करण्यासाठीच्या प्रयत्नांना त्यांनी अशी काही दाद दिली की रोजचा दिवस खळखळून हसण्यातच जास्त जायचा. ह्या टूरवर माझ्या करियरच्या बाल्यावस्थेत मला हे कळलं की, `प्रत्येक टूरवर जर पर्यटक आणि त्यांच्यासोबत आपण असे मनमोकळेपणे खळखळून हसू शकत असू तर ती टूर पूर्ण यशस्वी’. हे बाळकडू मग येणाऱ्या प्रत्येक टूर मॅनेजरसाठी टूरवरच्या प्रत्येक दिवसाचा माइलस्टोन ठरला गेला. हो, माइलस्टोनच म्हणायचं टूरवरच्या दिवसाला. जेवढ्या दिवसांची टूर तेवढे माइलस्टोन्स आम्ही टूर मॅनेजर्स म्हणून आम्हाला पार पाडायचे असतात त्या टूरच्या आनंदी हसऱ्या यशस्वीतेसाठी. आता लिहिता लिहिता सुचलं, जसा आज जगातल्या देशांचा किंवा वेगवेगळ्या राज्यांचा `हॅप्पीनेस इंडेक्स’ मोजला जातो तसा आमच्या प्रत्येक टूरवरचा `लाफ्टर इंडेक्स’ मोजता आला पाहिजे. माणूस, म्हणजे इथे पर्यटक, तेव्हाच मनमोकळेपणाने हसू शकतो जेव्हा त्याच्या टूरवरच्या सर्व गरजा व्यवस्थित ठरल्याप्रमाणे पार पाडल्या जातात आणि त्याच्यासोबत त्याच्या दिमतीला असलेली टूर मॅनेजर टीम त्याला भरपूर मजा आणते. मुंबईसारख्या अनेक शहरांतून, काँक्रीट जंगलांपासून दूर, नोकरी व्यवसायाची धकाधक सोडून जेव्हा पर्यटक टूरवर येतात तेव्हा त्यांना त्या टूरच्या काही दिवसांसाठी असं खळखळून हसायला लावणं हे आम्हा टूर मॅनेजर्सचं आद्य कर्तव्य आहे असं मला वाटतं. आणि आपली मेहनत खरी असते तेव्हा पर्यटक साथ देतात हा गेल्या चाळीस वर्षातला अनुभव आहे. तर ह्या बाळकडू पाजणाऱ्या लोढा ग्रुपमधल्या संतोषमामांचा फोन आला की, `चला पुन्हा एकदा सात आठ दिवस कुठेतरी जाऊया. आमच्या पूर्वीच्या ग्रुपमधल्या सर्वांना जमवायचा प्रयत्न करतो. जेवढे येतील तेवढे आपण सर्वजण जाऊया आणि धम्माल करूया. भरपूर मज्जा करायचीय, खूप खूप हसायचंय’.
संतोषमामांच्या फोनमुळे माझ्यातल्या क्रिएटिव्हिटीने एकदम उसळी मारली. अरे खरंच की, वर्षातनं पाच सहा वेळा असं करायला काय हरकत आहे! अशी ऑफबीट डेस्टीनेशन्स शोधून काढायची की जी अनेकांची झाली नसतील, कदाचित आमचीही, म्हणजे माझी आणि सुधीरची. मग, `आम्हीही चाललोय तुम्हीही चला’ अशा संकल्पनेमार्फत ती पर्यटकांपर्यंत पोहोचवायची. हसायचं, नाचायचं, बागडायचं... दे धम्माल करायची. वयाचं बंधन नाही, अर्थात फिजिकली फिट असायला हवं. फक्त महिला किंवा फक्त ज्येष्ठ मंडळी अशी लक्ष्मणरेषा नाही. हसण्याला परिसीमा नाही, मिरवायला मर्यादा नाही, आनंदाला पारावार नाही, आणि हे सगळं करताना वीणा वर्ल्ड टूर मॅनेजर असेलच आपल्या दिमतीला. नुसत्या कल्पनेनेच मी आकाशात विहार करायला लागले. वेगवेगळ्या ऑफबीट डेस्टीनेशन्सना जाऊनही पोहोचले. मनात आलं की ते डायरीतल्या कागदावर उतरवायचं आणि कागदावरचं ॲक्चुअल प्रॅक्टीसमध्ये आणायचं, ही पद्धत. आधी माझी संकल्पना सुधीर सुनिला नील ह्यांना वाचून दाखवली. किंतु परंतु वर चर्चा झाली आणि त्यांची संमती मिळाल्यावर मी आणि सुनिला टीमबरोबर बसलो. जुलै ते डिसेंबर सहा महिन्यांचा प्लॅन ठरवून टाकला आणि आज तो तुम्हा सर्वांसोबत वीणा वर्ल्ड वेबसाइटवर जाहीरही करतोय.
हसण्यासाठी आणि आनंदासाठी आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी निर्माण कराव्या लागतात. किंवा त्या करता आल्या पाहिजेत. गेल्यावर्षी आम्ही एक जाहीरात केली होती त्याचं टायटल होतं, `आयुष्य म्हणजे अफलातून आठवणींचा आगळावेगळा आलेख! चला आठवणी आनंदी बनवूया!’ जसं हे टायटल लिहून पाठवलं, आमची टीम लागलीच म्हणाली, `समथिंग इज राँग, आठवणी म्हणजे भूतकाळ नं. घडून गेलंय ते, मग त्यानंतर `बनवूया‘ असं भविष्यकाळात कसं काय पोहोचलात तुम्ही? म्हटलं, `आता टायटल तर सुचलंय आणि ते बरोबर आहे असं मला वाटतंय, तुम्ही ऑब्जेक्शन घेतल्यावरही मी विचार केला पण ते मला बरोबरच वाटतंय’. समोरच्या चेहऱ्यांवरचा गोंधळ कमी होताना दिसत नव्हता. आणि बरोबरच होतं ते, लाइन कन्फ्युजिंग होती, नो डाऊट. आमच्या टीमने विचार केला असेल, `जाहिरातींच्या क्षेत्रात म्हटलं जातं नं, `इफ यू कांट कन्व्हिन्स देम, कन्फ्युज देम’ असं बहुतेक ह्यांच्या डोक्यात काहीतरी असणार, न्यू स्ट्रॅटेजी’. आता त्यांच्या मनातल्या गोंधळाची दिशा नको त्या मार्गाला त्यांना घेऊन जाण्याआधी उकल करणं गरजेचं होतं. त्यांना म्हटलं, `इथे काहीही मिसलीडिंग नाही, आपल्याला कुठेही पर्यटकांना कन्फ्युज करायचं नाहीये. पण तरीही हे भुतकाळ भविष्यकाळाला जोडणारं वाक्य टायटल म्हणून आपल्या पुढच्या कॅम्पेनमध्ये जाईल‘. आठवणी म्हणजे काय? तर आता आपण काय करतोय ही आठवण बनणार आहे पुढच्या क्षणी. तसंच आपण उद्या काय करणार आहोत, पुढच्या महिन्यात काय करणार आहोत ह्या सुद्धा एकदा ते झालं की आठवणी बनणार आहेत. जर आपण आज, उद्या, परवा, पुढच्या महिन्यात, पुढच्या वर्षी जे काही करू ते आठवणींच्या रूपात परिवर्तित होणार असेल तर मग मला आज विचारपूर्वक गोष्टी करणं गरजेचं आहे, नाही का? अशा अनेक बऱ्या-वाईट आठवणींची साठवण म्हणजेच आयुष्य. मग ह्या आठवणी जेवढ्या जास्तीत जास्त चांगल्या करता येतील तेवढ्या करायच्या. आपल्याला आयुष्यात कितीतरी गोष्टींची रूखरूख लागून रहाते आणि आपला बराचसा वेळ, `अरे मी असं का वागलो?’ `असं केलं असतं तर गोष्टी थोड्या वेगळ्या झाल्या असत्या’ आयुष्य जसजसं पुढे जात तसतसं पुर्वीच्या अशा अनेक गोष्टी अपराधीपणाची भावना आपल्या प्रत्येकाच्या मनात बॅक ऑफ द मार्इंड जागृत ठेवीत असतात. वेळ निघून जाते पण असे छोटे मोठे पश्चाताप कधी कधी डोकं वर काढतात आणि आपण दीर्घ श्वास घेतो किंवा उसासे टाकतो. कधी कधी ह्या गोष्टींची टोचणी आपल्या तब्येतीवर हमला करते, आपलं मनस्वास्थ्य हिरावून घेते. हे होत राहतं. आताच्या युगात आपल्या वर्तमानाताच इतकी चॅलेंजेस आहेत की भूतकाळातल्या घडून गेलेल्या, न बदलता येणाऱ्या गोष्टींचं ओझं मनावर घेऊन का बरं आपण आपलं जीणं छोट्या मोठ्या प्रमाणात असह्य करायचं? हे टाळायचं असेल तर वर्तमानात आपण काय करतो हे महत्वाचं बनतं. काही गोष्टी ऑटोमॅटिकली घडत असतात आणि काही गोष्टी आपण घडवून आणतो किंवा त्या घडवाव्या लागतात. व्यवस्थापनाच्या क्षेत्रात ह्याला `बाय डीफॉल्ट’ आणि `बाय डीझाइन’ असं म्हटलं जातं. आपण जेव्हा एखादा व्यवसाय सुरू करतो किंवा आताच्या भाषेत ज्याला स्टार्टअप म्हटलं जातं तो सुरुवातीला सर्वांच्या मेहनतीने आणि कष्टाने वाढत राहतो, ज्याला `बाय डीफॉल्ट’ म्हणतात. कालांतराने मात्र त्या व्यवसायवृद्धीला आकार द्यावा लागतो आणि मग मार्गक्रमणा होते ती ठरवून मोजून मापून व्यवस्थापन कौशल्यांची मदत घेऊन, ज्याला `बाय डीझाइन’ म्हणतात. हीच गोष्ट आपण आपल्या आनंदाच्या बाबतीतही करू शकतो. त्याबाबत जागरूक असणं महत्वाचं. आमच्या व्यवसायाचा गाभा आहे आनंद वाटणं. पर्यटनाच्या माध्यामातून सर्वांसाठी चांगले क्षण निर्माण करणं आणि आठवणी आनंदी बनवणं. आपल्या रोजच्या आयुष्यातही हे शक्य आहे जर आपण `बाय डीफॉल्ट’ ला `बाय डीझाइन’ ची जोड दिली तर. कोणतीही गोष्ट करताना एक दोन साधे प्रश्न स्वत:लाच विचारायचे. `मी हे बरोबर करतेय नं? जे काही करतेय त्यामुळे मला पुढे भविष्यात पश्चाताप तर करावा लागणार नाही नं?‘. अनेकदा मी ही स्वत:ला बजावित असते, `वेट फॉर अ मिनिट, थिंक अँड प्रोसीड’. खूप खूप फायदा होतो ह्या एका छोट्याशा गोष्टीचा. सो, चला आपल्या विचारपूर्वक वागण्याने आठवणी आनंदी बनवूया. मनमोकळेपणाने खळखळून अगदी सातमजली हास्य करता आलं पाहिजे. आपला लाफ्टर इंडेक्स आपल्याला मोजता आला पाहिजे, वाढवत नेता आला पाहिजे.
ह्या लेखाच्या सुरुवातीला लिहिलेली मारवाडी समुदायाची मानसिकता जी संतोषमामांनी माझ्या करियरच्या सुरुवातीला एकदा बसमध्ये आम्हाला सांगितली, ती मी एखाद्या इन्स्पिरेशन टॉनिकसारखी माझ्याजवळ ठेवलीय. एकदम नवीन ठिकाणी काही नव्याने करायचं असेल तर स्वाभाविकपणे भीती वाटते पण तेव्हा ह्या टॉनिकचा एक डोस घेते, स्वत:मध्ये जिद्द जागवते आणि पाऊल पुढे टाकते. तुलनात्मकदृष्ट्या आमचा व्यवसाय खूपंच छोटा आहे पण अनेक आव्हानांनी भरलेला आहे. ह्या चॅलेंजेसना सामोरं जाताना आपला दृष्टीकोन ठाकठिक करणे आणि आपली व्यवसाययात्रा वा जीवनयात्रा आनंदी बनवणं हाच तर आहे ध्यास आणि म्हणूनच प्रवासातल्या छोट्या मोठ्या अनुभवांचं हे आदानप्रदान.
Post your Comment
Please let us know your thoughts on this story by leaving a comment.