IndiaIndia
WorldWorld
Foreign Nationals/NRIs travelling to

India+91 915 200 4511

World+91 887 997 2221

Business hours

10am - 6pm

इट्स नॉट इझी!

18 mins. read

Published in the Sunday Sakal on 31 March, 2024

हे पोस्टर कशासाठी चिकटवलंय दाराला?‘ माझा प्रश्‍न. ‘अरे मॉम तो एक गेम आहे, लेट्स प्ले.‘ हेताने मला उत्तर देत आय मास्क आणला. साराला समोर उभं केलं, तिच्या हातात स्टिकर दिला. डोळ्यावर आय मास्क बांधला. तिला गोल गोल फिरवलं आणि सांगितलं, ‘जा आता समोरच्या पोस्टरवर बरोबर ठिकाणी स्टिकर चिकटव. ‘गोल गोल फिरवल्यामुळे सारा भरकटली, नेमकं कोणत्या दिशेला जायचं ह्याचा गोंधळ उडाला. पण आमच्या आवाजांच्या दिशेने ती अंदाज बांधत गेली आणि हळूहळू मजल दरमजल करीत पोहोचली त्या पोस्टरपर्यंत आणि बऱ्यापैकी जवळ तिने स्टिकर चिकटवला. घरात असलेल्या प्रत्येकाच्या डोळ्यांवर ही पट्टी बांधली गेली आणि त्यातनं जी काही दे धम्माल उडाली आणि हास्याची कारंजी निर्माण झाली की विचारूच नका. जेव्हा माझ्या डोळ्यांवर पट्टी बांधली तेव्हा तर हद्द झाली. म्हणजे माझ्या आधी एक दोन प्लेअर्स खेळले होते. मला अंदाज आला होता. जिथे डोळ्यांवर पट्टी बांधली जात होती तिथपासून पोस्टरचं अंतर, पोस्टरच्या कडेपासून जिथे नाकावर स्टिकर चिकटवायचाय तीथपर्यंतचं अंतर, ह्याचं माझ्या उंचीशी मनातल्या मनात कॅल्क्युलेशन मी करून ठेवलं होतं. सोप्पं होतं ते, आधीचे दोन प्लेअर्स एवढे का गोंधळले असा विचार करीत मी खेळात उतरले. एका मिनिटात स्टिकरची आणि नाकाची भेट घडवून विजयी होऊन पहिल्या नंबरचं चषक जणू हातात घेऊनच आपण मैदानातून बाहेर यायचं ह्या मानसिकतेत मोठ्या आत्मविश्‍वासाने मी उभी राहिले. माझ्या डोळ्यांवर पट्टीरूपी मास्क लावण्यात आला. आधीच्या प्लेअर्सप्रमाणे मलाही गरगर फिरवण्यात आलं. त्यातही मी कॅल्क्युलेशन करून ठेवलं होतं. एकंदरीत तीन राऊंड्स मला फिरवलं गेलं त्यामुळे आता जी दिशा आलीय ती पोस्टरचीच असणार हे माझ्या कॅल्क्युलेशनने मला सांगितलं. मी सावधपणे चालायला सुरुवात केली आणि फिदी फिदी हसण्याचा आवाज आला. ‘ह्यू म्हणजे माझी दिशा चुकलीय तर. असं कसं बरं झालं?‘ मन हार मानायला तयार नव्हतं. मी प्रयत्न जारी ठेवले. आता बाकीच्यांचं हसणं गडगडाटी स्वरूप धारण करायला लागलं. ‘नील, चला गाद्या घालूया, सकाळपर्यंत ही पोहोचेल पोस्टरपाशी‘ एक आवाज. ‘अरे वीणा, तुला काही आमच्या आवाजाची दिशा वैगेरे कळतेय की नाही?‘, ‘अरेरे तू एवढी सेन्सलेस असशील असं वाटलं नव्हतं‘,‘अरे ही तर टोटल मंद आहे‘, ‘वीणा आज तुझी इमेज धूळीला मिळवलीस तू‘, ‘अरे यार इसके बारे में क्या सोचा था और ये निकली क्या‘, एकंदरित माझ्या कॅल्क्युलेशनचे बारा वाजले होते आणि आत्मविश्वासाच्या तर चिंधड्या उडाल्या. अभिमानाची जागा असहायतेने घेतली आणि मी म्हटलं, ‘मान्य आहे मी मंद आहे, गिव्ह मी अ क्लू‘. मी पराभव पत्करल्यावर आणि मदत मागितल्यावर मात्र कुत्सितपणे हसणारी तोंडं आणि शाब्दिक चपराकी बंद झाल्या. ‘वीणा डाव्या हाताला वळ, दोन पावलं पुढे जा, लेफ्ट लेफ्ट, थोडसं राइट, आता समोर, यू आर ऑलमोस्ट देअर, आगे बढो हम तुम्हारे साथ हैं‘ म्हणत मला एकदाचं त्यांनी पोस्टरपर्यंत पोहोचवलं, आत्तापर्यंत माझ्या हुशारीची एैशीतैशी झाल्याने तिथेही मी दिवे लावले. कानाच्या जागी नाक लावून निधड्या छातीने मैदानात उतरलेली मी नामोहरम होऊन माझ्या जागी येऊन बसले. डोळे उघडे असतानाचं जग आणि डोळ्यांवर पट्टी बांधल्यानंतरचं जग ह्यातलं अंतर एखाद्या सत्यासारखं समोर उभं राहिलं ह्या छोट्याशा खेळामुळे.

ह्या खेळात आणखी मजेची गोष्ट अशी होती की थोड्याफार फरकाने प्रत्येकाची अवस्था माझ्यासारखीच होती. ‘काय मुर्खपणा चाललाय हा, आता मी बघा कसा मस्त स्टीकर लावतो ते‘ असं म्हणत एक एक जण मैदानात उतरत होता आणि,‘हुशऽऽऽ वाटलं होतं तेवढं पटकन नाही जमलं, इट्स नॉट दॅट इझी‘ असं मनातल्या मनात म्हणत किंवा चेहऱ्यावर तरी तसं दिसत होतं जेव्हा डोळ्यांवरची पट्टी काढली जात होती तेव्हा. ‘मला ते पटकन जमणार होतं पण तुम्हाला हसविण्यासाठी मी वेळ काढला‘ अशा प्रकारची अपयशावर लावलेली एक मिष्किल झालरही बघायला मिळाली. पण एकंदरीतच ते तेवढं सोप्पं नव्हतं हे प्रत्येकाला उमजलं होतं. हा गेम आम्ही ‘पिन द नोज‘ म्हणून खेळलो. सगळेच इंग्रजाळलोय, त्याला इलाज नाही. घरात वा शक्य तिथे आपली मातृभाषा बोलायची आणि पुढे न्यायची. असो, तर ह्या खेळाला आपण शाळेत, ‘गाढवाला शेपूट लावणे‘ असं म्हणायचो. आत्ताही डोळ्यासमोर गावच्या शाळेतला तो वर्ग आठवला. समोर मोठा काळा फळा, त्यावर खडूने सरांनी वा बार्इंनी वा वर्गातल्याच एका उभरत्या चित्रकाराने काढलेलं गाढवाचं भलमोठं चित्र. आणि एकेक करून आपण डोळ्यांवर पट्टी बांधून त्या गाढवाला शेपूट लावायला सरसावायचो. वर्गातला तो एक तास लाफ्टर क्लब बनायचा, ओढून ताणून आणलेल्या गडगडाटी हास्याचा नव्हे तर बेंबीच्या देठापासून डोळ्यात पाणी आणणाऱ्या खऱ्याखुऱ्या हास्याचा. आपण असाच आणखी एक खेळ खेळायचो, आंधळी कोशिंबीर. त्यातही अशीच मजा यायची, ज्याच्यावर राज्य असायचं त्याला आणि खेळताहेत त्यांनाही.

‘उघडा डोळे बघा नीट‘ ही एका टीव्ही चॅनलची टॅगलाइन. सर्वप्रथम ती आली तेव्हा ‘अरे अशी काय ही लाइन‘ असं वाटलं पण हळूहळू त्यातला अर्थ कळायला लागला आणि मग ती लाइन बोल्ड आणि ब्युटिफूल बनून गेली. हीच लाइन मला ह्या ‘पिन द नोज‘ गेमनंतर ‘डोळे बंद करा आणि जाणीव जागी करा‘ अशी कराविशी वाटली. म्हणजे माझ्यासाठी ती मी बदलून पण टाकली. तसंही आपण हे नकळत करीतच असतो. अचानक उदभवलेल्या एखाद्या अडचणीला सामोरं जाताना बऱ्याचदा आपण घरातं किंवा कार्यालयात एखाद्या शांत निवांत जागी एकटे बसतो, डोळे बंद करून घेतो, शांत होतो, विचार करतो. अडचण वा संकट आपल्यामुळे आलेलं असेल किंवा आपाल्यावर ओढवलेलं असेल तर ते बदलता तर येत नाही त्यामुळे ‘व्हॉटस नेक्स्ट?‘ ह्या प्रश्‍नावर मनातल्या मनात

‘हे की ते?‘ ‘किंतू परंतु‘ चा उहापोह करतो आणि निश्‍चितपणे कुठेतरी निर्णयाप्रती पोहोचतो. डोळे बंद केल्यावरच खरंतर महत्वाच्या गोष्टी दिसायला लागतात. दिवसातला थोडासा  चिंटूसा वेळ आपण ह्या डोळे बंद करण्याला दिला पाहिजे. बऱ्याचशा प्रश्‍नांची उकल होऊ शकेल. उघडे डोळे, बंद डोळे, डोळ्यांवर झापड, डोळ्यांवर झापडं, ढापणं बांधलेले डोळे, सतत समोर बघणारे डोळे, समोर तसंच सभोवताली बघणारे डोळे, मागे वळून पाहणारे डोळे, भूतकाळाच्या चलतचित्रपटात रमणारे डोळे, भविष्याच्या काल्पनिक चित्राला कुतूहूलाने बघत त्यात देहभान विसरायला लावणारे डोळे बापरे बाप केवढ्या प्रकारचे हे डोळे. आपले डोळे कोणत्या प्रकारचे आहेत ते आपणंच तपासायला हवं. ह्या डोळ्यांमध्ये आता भर पडलीय ती म्हणजे कॅमेऱ्याचे डोळे. टूर्सवर आम्हाला ह्याचा प्रत्यय येतो. कधी कधी कुणी कुणी पर्यटक आपल्या स्वतःच्या उघड्या डोळ्यांनी एखाद्या पर्यटनस्थळाच्या सौदर्यांचा मनसोक्त आस्वाद घेतच नाहीत. सतत आपल्या डोळ्याला कॅमेरा. फोटो महत्वाचे आहेतच, त्या आनंदी आठवणी आहेत नो डाऊट. पण फोटोतच आणि कॅमेऱ्यातच जर ते पर्यटनस्थळ बघायचं असेल तर मग इतके पैसे खर्च करून यायचंच कशाला एवढ्या दूर. पर्यटनस्थळांच्या छान छान फोटोज व्हिडियोज नी तर सोशल मिडीया आणि चित्रपट भरलेले आहेत. मला इथे चित्रकार शाम जोशींची आठवण झाली. ते एकदा टूरवर होते. त्यानां मी विचारलं, ‘शामकाका तुमच्याजवळ कॅमेरा नाही?‘ ते म्हणाले, ‘वीणा, मी ही ठिकाणं उघड्या डोळ्यांनी बघतो. त्याचा आनंद घेतो, मनात त्याचं चित्र रेखाटतो आणि घरी गेल्यावर कॅनव्हॉसवर ते चितारतो.‘ त्यांचे शब्द आजही जसेच्या तसे आठवताहेत. मी ही टूरवर कधी कधी फोनच्या आहारी जाते, दे दणादण फोटोज काढायला सुरुवात करते, शामकाकांचे शब्द आठवतात आणि भानावर येत, कॅमेरा बंद करून चिडिचूप उघड्या डोळ्यांनी पर्यटनस्थळाचा आनंद मिळवायचा प्रयत्न करते. प्रयत्नच म्हणायला हवा कारण हात नकळत त्या मोबाइलकडे खेचला जात असतो.

गाढवाला शेपूट लावणं काय किंवा आंधळी कोशिंबीर काय मला हे आपल्यातली जाणीव जागी करणारे खेळ वाटतात, ‘इट्स नॉट इझी ॲालवेज‘ ह्या वास्तवाची जाणीव करून देतात. उघडे डोळे आणि डोळ्यांवर पट्टी ह्या दोन गोष्टींमध्ये असलेल्या जमीन आस्मानी फरकाची ते आपल्याला जाणीव करून देतात. डोळ्यांचं महत्व काय आहे हे पटवून देतात आणि ही एकच गोष्ट आपल्याला त्या जगनियंत्यापुढे नतमस्तक व्हायला भाग पाडते. गाढवाला शेपूट लावणं किंवा मग तो ‘पिन द नोज‘ वा ‘पिन द टेल‘ कोणत्याही भाषेतला खेळ असो तो कधीतरी अधूनमधून खेळला पाहिजे. आपल्याला इझीली मिळालेल्या डोळ्यांची महती आपल्याला कळली पाहिजे. त्याप्रती आपल्या मनात कृतज्ञता असली पाहिजे. जेव्हा जेव्हा हे होर्इल तेव्हा मग आपाल्यानंतर आपले डोळे कुणाचेतरी डोळे बनू शकतील. मग आय डोनेशनसाठी वा ॲार्गन डोनेशनसाठी सरकारला कॅम्पेन करण्याची गरज भासणार नाही.


अरेच्या! हे मला माहितच नव्हतं...

Know the Unknown

साउथ ईस्ट एशियामधील ‘सिटी-स्टेट’ हे बिरुद मिरवणारा आणि आकाराने चिमुकला असूनही पर्यटनात मोठ्ठा ठरलेला देश म्हणजे सिंगापूर. ब्रिटिशांच्या राजवटीत व्यापारी केंद्र म्हणून आकाराला आलेल्या सिंगापूरनं स्वातंत्र्यानंतर गरुड भरारी घेतली आणि जी.डी.पी. च्या बाबतीत जगातलं 5 व्या क्रमांकाचं राष्ट्र म्हणून स्थान मिळवलं. आज सिंगापूर जगभरातल्या पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिदू ठरलं आहे. ज्या सिंगापूरमध्ये एकही नैसर्गिक तलाव वा सरोवर नाही, ज्याला मलेशियाहून पिण्याचे पाणी विकत घ्यावे लागते, त्या सिंगापूरमध्ये आता हिरवेगार बगिचे आणि पाण्याची कारंजी, धबधबे यांची जणू रेलचेल आहे. चांगी एअरपोर्टवरचा जगातला सर्वात उंच इनडोअर धबधबा आगमनालाच स्वागत करतो. जगातलं सर्वात मोठं फाउंटन म्हणून गिनिज बूकमध्ये नोफ्लदवण्यात आलेलं ‘फाउंटन ऑफ वेल्थ’ सिंगापूरमध्येच आहे. संपूर्ण नॉर्थ अमेरिकेत आढळणाऱ्या वृक्षांच्या प्रजातीपेक्षा सिंगापूरमधल्या ‘बुकित तिमाह नेचर रिझर्व्ह’ मध्ये वृक्षांच्या जास्त प्रजाती पाहायला मिळतात. अशा सिंगापूरमधलं सर्वात मोठं पर्यटक आकर्षण म्हणजे ‘गार्डन्स बाय द बे’. सिंगापूरच्या मरिना रिझव्हॉयर शेजारी हे गार्डन आहे. ‘गार्डन सिटी’ अशी ओळख असलेल्या सिंगापूरला ‘सिटी इन गार्डन’ अशी नवी ओळख देण्याऱ्या ह्या प्रकल्पाची घोषणा 2005 साली नॅशनल डे रॅलीमध्ये सिंगापूरच्या पंतप्रधानांनी केली आणि 2012 मध्ये हे गार्डन लोकांसाठी खुलं करण्यात आलं. हा सगळा नेचर पार्क 250 एकरांवर पसरलेला आहे. त्याचे बे साउथ, बे ईस्ट आणि बे सेंट्रल असे तीन भाग आहेत. त्यातला 130 एकरांचा बे साउथ हा भाग सर्वात मोठा आहे. गार्डन्स बाय द बे मधील ‘फ्लॉवर डोम’ म्हणजे अशी जागा जिथं वर्षभर जणू वसंतोत्सव सुरू असतो. तीन एकरांचा परिसर व्यापणाऱ्या या फ्लॉवर डोमची नोफ्लद 2015 साली गिनिज बूकमध्ये जगातील सर्वात मोठं ग्रीन हाऊस अशी झाली आहे. वेगवेगळ्या जातीच्या फुलांचा डिस्प्ले असलेलं फ्लॉवर फिल्ड, बाओआब हा आफ्रिकेतील विशाल वृक्षांचा विभाग, ऑलिव्ह ग्रूव्ह, ऑस्ट्रेलियन गार्डन, साउथ आफ्रिकन गार्डन, साउथ अमेरिकन गार्डन, कॅलिफोर्निया गार्डन आणि मेडिटेरेनियन गार्डन असे विभाग या फ्लॉवर डोममध्ये आहेत.

गार्डन्स बाय द बे मधील आवर्जून पाहाण्यासारखा विभाग म्हणजे ‘क्लाउड फॉरेस्ट’. हा विभाग फक्त 2 एकरांचा असला तरी इथं कृत्रिमरित्या तयार केलेला 138 फूटांचा क्लाउड माउंटन आहे. या विभागात समुद्रसपाटीपासून 3000 ते 9000 फूटांपर्यंत वाढणारी झाडं पाहायला मिळतात. इथल्या क्लाउड माउंटनवर पर्यटक एलीव्हेटरनं वर जातात आणि एका वळणदार रस्त्याने वेगवेगळ्या वनस्पती बघत खाली उतरतात. या रस्त्यावर 115 फुटांवरुन कोसळणारा कृत्रिम धबधबा आहे. या विभागात क्रिस्टल माउंटन, क्लाउड फॉरेस्ट थिएटर, सीक्रेट गार्डन, द कॅव्हर्न, द लॉस्ट वर्ल्ड असे भागही आहेत.

फ्लॉवर डोम, क्लाउड फॉरेस्ट आणि गार्डन्स बाय द बे म्हणजे ‘मस्ट सी‘ ठिकाणं. मग वीणा वर्ल्डच्या सिंगापूर सहलीत सहभागी व्हा आणि या मानवनिर्मित आश्‍चर्याला अवश्‍य भेट द्या.


वीणा वर्ल्ड ट्रॅव्हल मिशन

Veena World Travel Mission

भूगोलातले देश बघतोय...

लहानपणी शाळेत असताना भूगोलाच्या पुस्तकात वाचलेली काही देशांची नावं कशी मनात जणू कोरलेली असतात. पुढे भटकंतीचा छंद जोपासताना ह्या भूगोलाच्या पुस्तकातील देशांचीही सहल करता येईल असं वाटलं नव्हतं, मात्र वीणा वर्ल्डमुळे आमची ही इच्छा आता पूर्ण होणार आहे कारण वीणा वर्ल्डबरोबर आम्ही आता ‘उझबेकिस्तान कझाकस्तान आणि किरगिझस्तान’ या देशांना भेट देणार आहोत. वीणा वर्ल्डबरोबर आमची गट्टी जमली ती औरंगाबादचे वीणा वर्ल्डचे प्रीफर्ड सेल्स पार्टनर गोपालकृष्ण टूर्स यांच्यामुळे. 2016 मध्ये आम्ही वीणा वर्ल्डबरोबर लडाख टूर बूक केली. त्यानंतर आजपर्यंत म्हणजे गेली 9 वर्षे आम्ही वीणा वर्ल्डबरोबरच आमची भटकंती करत आलो आहोत. आम्ही 18 सहली वीणा वर्ल्डसोबत केल्या आहेत आणि आजपर्यंत जगभरातले 36 देश बघितले आहेत.

मी उमेश भालेराव आणि माझी पत्नी वर्षा, आम्हाला दोघांनाही पर्यटनाची भरपूर आवड आहे. मला स्वतःला निसर्गरम्य परिसर अधिक आवडतात तर वर्षाला सागर किनाऱ्यांची ओढ जास्त आहे. त्यामुळेच बहुदा आम्हाला युरोपमधला स्लोव्हेनिया हा लहानसा देश सर्वात आवडला. या देशात आल्प्सची एक पर्वतरांग आहे आणि दुसरीकडे एड्रिॲटिक सागराचा किनाराही आहे. निसर्गरम्य स्लोव्हेनियातील ब्लेड सिटी तर आमच्या अगदी मनात भरली आहे. तिथला तो रमणीय लेक ब्लेड आणि ऐतिहासिक कॅसल आम्ही कधीच विसरू शकणार नाही. त्याचप्रमाणे नायगरा फॉल्सची हेलिकॉप्टर राइड आणि इजिप्तमधली नाइल क्रुझही आमच्यासाठी संस्मरणीय ठरली आहे.

वीणा वर्ल्डसोबत प्रवास करताना प्रत्येकवेळी आम्हाला वेगळा टूर मॅनेजर मिळाला, त्या सगळ्यांशीच आमचे कायमचे स्नेहबंध जुळले आहेत. मात्र त्यातही दिनेश बांदिवडेकरचा मी आवर्जून उल्लेख करेन. त्याच्याबरोबर 2019 मध्ये आम्ही यु.एस.ए.सहल केली होती. तेव्हापासून तो जणू आमचा पर्सनल ट्रॅव्हल गाइड बनला आहे. आता आम्ही 1000 दिवसात 100 देश पूर्ण करायचा संकल्प सोडला आहे आणि वीणा वर्ल्डसारख्या उत्तम सेवा देणाऱ्या विश्वासार्ह ट्रॅव्हल कंपनीबरोबर आमचा हा संकल्प नक्कीच पूर्ण होईल अशी खात्री आम्हाला वाटते.’’


कायबाई खाऊ कसं गं खाऊ!

जगाच्या दक्षिण गोलार्धातील ऑस्ट्रेलिया हा देश म्हणजे नवल विशेषांचा खजिनाच आहे. हा जगातला एकमेव देश आहे जो खंडही आहे. ऑस्ट्रेलिया हा जगातला सर्वात कोरडा असा खंड आहे जिथे मनुष्यवस्ती आहे. ऑस्ट्रेलियाची लोकसंख्या जितकी आहे (24 दशलक्ष) त्यापेक्षा या देशात तिप्पट मेंढ्या व दुप्पट कांगारू आहेत. आज जगभरात प्रसिद्ध झालेला ‘सेल्फी’  हा शब्द नेथन होप या ऑस्ट्रेलियन माणसानं जगाला दिला आहे. महासागरात महाप्रचंड बेटावर वसलेल्या या देशात सुमारे दहा हजार बीचेस आहेत. ऑस्ट्रेलिया हा देश ब्रिटनमधून आलेल्या लोकांनी आधुनिक काळात वसवला असल्याने इथल्या खाद्य संस्कृतीवर ब्रिटिश क्विझिनचा प्रभाव स्वाभाविकपणे दिसतो. ब्रिटिश खानपानातील ‘चहा’ तर या देशाने आपलासा केला आहेच पण चहा म्हटल्यावर बिस्किट हवंच नाही का? तर ऑस्ट्रेलियातलं सर्वात लोकप्रिय बिस्किट म्हणजे ‘टिम टॅम ’.

1964 पासून अर्नोट्स ही कंपनी टिम टॅम बनवते. दोन माल्टेड बिस्किट्सच्या मध्ये हार्ड चॉकलेट क्रीमचे फिलिंग आणि या सगळ्यावरून चॉकलेटचा हलकासा थर असे टिम टॅम बिस्किट इयान नॉरिस यानं तयार केलं. त्यानं जेव्हा नवीन प्रॉडक्ट शोधण्यासाठी जगप्रवास केला, तेव्हा ब्रिटनमधल्या पेंग्विन बिस्किट्सवरून त्याला टिम टॅमची कल्पना सूचली. आता टिम टॅम हे नाव कुठून आलं? तर अर्नोट्स कंपनीच्या रॉस अर्नोटनं ‘केंटकी डर्बी रेस ’ जिंकणाऱ्या घोड्याचं नाव आपल्या या नव्या बिस्किटांसाठी निवडलं. 2008 पासून टिम टॅम यु.एस.ला एक्सपोर्ट होऊ लागलं, आजही अमेरिकेत मिळणाऱ्या पॅकवर ‘ऑस्ट्रेलियाज्‌‍ फेव्हरिट कुकीज’ असंच टिम टॅमचं वर्णन असतं. डार्क चॉकलेट, व्हाइट चॉकलेट, कॅरामल, चोको ऑरेंज अशा विविध स्वादांमध्ये टिम टॅम उपलब्ध आहे. मग नीघा वीणा वर्ल्डबरोबर ऑस्ट्रेलियाला आणि घेऊन या टिमटॅमचा स्टॉक. देश विदेशातील अशाच विविध खाद्य परंपरा आणि ट्रॅव्हलचे भन्नाट अनुभव ऐकण्यासाठी वीणा वर्ल्डचा ‘ट्रॅव्हल एक्सप्लोअर सेलिब्रेट लाईफ ’ हा पॉडकास्ट नक्की ऐका.

www.veenaworld.com/podcast


वीणा वर्ल्ड कस्टमाईज्ड हॉलिडेज्

पर्यटनाच्या खजिन्याची बेटं

लहानपणी तुम्ही ‘ट्रेझर आयलंड‘ किंवा अशाच प्रकारच्या गोष्टींची पुस्तकं नक्की वाचली असतील, त्यामुळे एखाद्या अज्ञात बेटावरचा खजिना मिळाल्याची स्वप्नंही रंगवली असतील. हे तुमचं स्वप्नं जरा वेगळ्य़ा पध्दतीने पूर्ण करण्याची संधी तुम्हाला युरोपच्या हॉलिडेत नक्की मिळू शकते, कारण युरोपमध्ये अशी अनेक बेटं आहेत जिथे पर्यटकांसाठी अविस्मरणीय आनंदी  अनुभवांचा खजिनाच साठवलेला आहे. ॲटलांटिक ओशनपासून ते मेडिटरेनीयन सी पर्यंत वेगवेगळ्या समुद्रांमध्ये ही बेटं आहेत. रिलॅक्सिंग आणि तरीही थ्रिलिंग असा हॉलिडे एन्जॉय करायचा असेल तर आयलंड हॉलिडेला पर्याय नाही.

युरोपमधील ग्रीस हा देश हजारो बेटांनी मिळून बनलेला आहे. या बेटांच्या माळेतील सान्तोरिनी, मिकोनोस, क्रीट, ऱ्होड्स, हायड्रा ही बेटं म्हणजे जणू या माळेतील माणिकच. ह्यातल्या हायड्रा बेटावर कायद्याने कार, मोटरसायकल, बायसिकल्स अशा वाहनांना बंदी आहे, त्यामुळे इथं प्रवासासाठी खेचरं वापरली जातात. मग खेचरांवरची सवारी करायची तर हायड्राला नक्की भेट द्या.  क्रीट बेटावर मिनोअन संस्कृतीचा उदय झाल्याचं मानलं जातं, इथलं वीणकाम जगप्रसिध्द आहे. सान्तोरिनी आयलंड तिथल्या ट्रेडिशनल पध्दतीच्या घरांसाठी ओळखलं जातं. सान्तोरिनी, मिकोनोस ह्या बेटांवर बॉलिवूडच्या अनेक सिनेमातल्या गाण्यांचं शूटिंग झालं आहे, त्यामुळे ही बेटं तुम्हाला ओळखीची वाटतील. इटलीमधील सिसीली आणि सार्डिनिया ही मेडिटरेनीयन समुद्रातली बेटं पर्यटकांमध्ये लोकप्रिय आहेत. अनोख्या ‘ब्लु ग्रेट्टो’मुळे कॅप्री आयलंडही पर्यटकांच्या यादीत वरच्या नंबरवर असतं. ग्रीन आयलंड म्हणून ओळखलं जाणारं इश्‍चिया आयलंड हे तिथल्या थर्मल गार्डन्समुळे पर्यटकांमध्ये लोकप्रिय आहे.

स्पेनच्या किनाऱ्यावरील, पश्चिम मेडिटरेनीयन समुद्रातील बॅलिॲरिक आयलंड्स मधील मायोर्का, इबिझा, मेनोर्का, फॉर्मेंतेरा या बेटांवर दिवसा तुम्ही सूर्यप्रकाशात न्हाऊन निघणाऱ्या बीचेसचा आनंद घेऊ शकता तर रात्री इथले व्हायब्रंट नाइट लाईफ तुमच्या हॉलिडेची रंगत वाढवेल. या बेटांवर तुम्ही स्नॉर्केलिंग, डायव्हिंग, सेलिंग याची मजाही लुटू शकता. फ्रान्समधलं कॉर्सिका आयलंडचं वैशिष्ट्‌‍य म्हणजे इथली मोठी पर्वतरांग, या पर्वतामुळेच इथे युरोपमधला सर्वात लोकप्रिय ट्रेकिंग ट्रेल आहे. त्यामुळे माउंटन्स आणि बीच असं डब्बल पॅकेज हवं असेल तर कॉर्सिका एकदम परफेक्ट डेस्टिनेशन आहे. जरा हटके आयलंड हवं असेल तर सदर्न युरोपमधील ‘माल्टा’ किंवा नॉर्थ अटलांटिक ओशनमधील ‘मादिएरा’ याचा विचार करू शकता. माल्टावर हजारो वर्षांपूर्वीच्या प्राचीन वास्तू आहेत, इथले ब्लू लगून्स फार अप्रतिम आहेत आणि तेथील  स्थानिक पदार्थ अगदी चविष्ट आहेत. मदिरा आयलंड हे ‘पर्ल ऑफ अटलांटिक’ म्हणून प्रसिध्द आहे. इथल्या निसर्गरम्य परिसरात इतिहासकाळात उभारलेल्या ‘लेवाडाज्‌‍’ म्हणजे पाणी पुरवठ्याच्या कालव्यांच्या वरून हायकिंग करण्याचा आनंद घेता येईल, पोर्टो मोनिझच्या नैसर्गिक स्विमिंगपूलमध्ये डुंबता येईल किंवा इथल्या अप्रतिम वाईन्सचा आस्वाद घेत सूर्यास्ताचा नजारा बघता येईल. युरोपमधील नेहमीच्या सिटीज्‌‍पेक्षा वेगळ्या डेस्टिनेशन्सचा आनंद घ्यायचा असेल तर युरोपियन आयलंड्‌‍सचा अवश्‍य विचार करावा. बीच डेस्टिनेशन आणि हिस्टॉरिकल मॉन्युमेंट्स सोबत निसर्गरम्य परिसर असा तिहेरी योग साधता येईल. तर मग वीणा वर्ल्डच्या कस्टमार्इज्ड हॉलिडेज्‌‍ विभागाची मदत घ्या आणि आयलंड हॉलिडेचा खजिना लुटा.


वीणा वर्ल्ड गिफ्ट कार्डस्‌‍

आम्ही जाहितींद्वारे नेहमी म्हणत असतो की आनंदी आयुष्यासाठी अनिवार्य आहे, पर्यटन! आणि पर्यटनासाठी आवश्‍यक आहेत बहाणे! आनंदी आहात, चला पर्यटनाला! उदास वाटतंय, चला पर्यटनाला! परीक्षा संपलीय, चला पर्यटनाला! यशस्वीरित्या उत्तीर्ण झालाय, चला पर्यटनाला! आर्इ-बाबांना वेळ द्यायचाय, चला पर्यटनाला! मदर्स डे ला आर्इला गिफ्ट द्यायचंय, फादर्स डे ला बाबांना थँक्यू म्हणायचंय, चला पर्यटनाला! फॅमिलीला वेळ द्यायचाय, चला पर्यटनाला! स्वतःला वेळ द्यायचाय, चला पर्यटनाला! वाढदिवस साजरा करायचाय, चला पर्यटनाला! ॲनिव्हर्सरी येतेय, चला पर्यटनाला! आपला अतुल्य भारत बघायचाय, चला पर्यटनाला! अफलातून जग बघायचंय, चला पर्यटनाला!

पर्यटन हा सर्वांच्याच आवडीचा विषय आणि कोविडनंतर तर पर्यटनाचा महापूर आलाय. भारतात वा जगात कोणत्याही पर्यटनस्थळी तुम्ही बघाल तर पर्यटक बिनधास्तपणे पर्यटन करताना तुम्हाला दिसतील.`लेट्स सेलिब्रेट लार्इफ’ ही संकल्पना ह्यापाठी आहे असं खात्रीने वाटतंय. आणि म्हणूनच वीणा वर्ल्डच्या वेबसाइट वरून पर्यटक अगदी आवडीने खरेदी करताहेत वीणा वर्ल्डची गिफ्ट कार्डस. मला इथे पर्यटकांचे किंवा गिफ्ट देणाऱ्या व्यक्तींचे जाहीर आभार मानावेसे वाटतात कारण त्यांनी त्यांच्या निअर अँड डीयर जीवलगांसाठीच्या गिफ्टस्‌‍मध्ये वीणा वर्ल्डच्या टूर्सना समाविष्ट केलं. आमच्या संपूर्ण  वीणा वर्ल्ड टीमच्या प्रयत्नांना दिलेली ही पावती आहे. डॉटर्स डे, मेन्स डे, ब्रदर्स सिस्टर्स डे, मदर्स डे, फादर्स डे, व्हॅलेंटाइन्स डे, सिनियर सिटीझन्स डे, वुमेन्स डे अशा वेळी ही गिफ्ट कार्डस्‌‍ जास्त खरेदी केली जातात. घरच्यांना वेळ देता न येणं ही आजच्या अल्ट्रामॉडर्न जगाची एक वेगळी समस्या आहे आणि त्यावर सोल्युशन आम्ही काढलंय ते वेगवेगळ्या प्रकारच्या टूर्स आणून. वीणा वर्ल्ड आहेच प्रत्येक घरासाठी आणि घरातल्या प्रत्येकासाठी. तुम्ही कधीही कुठेही केव्हाही हे गिफ्ट कार्ड खरेदी करू शकता. सो, ‘अरेच्या गिफ्ट आणायला विसरलो‘ हे सांगायला तुम्हाला आता वाव नाही बरं का! चेक इट आऊट युवरसेल्फ. गिफ्ट कार्ड खरेेदी करणं खुप सोप्पं आहे. वीणा वर्ल्ड वेबसार्इट veenaworld.com ला भेट तर द्या

March 30, 2024

Author

Veena Patil
Veena Patil

‘Exchange a coin and you make no difference but exchange a thought and you can change the world.’ Hi! I’m Veena Patil... Fortunate enough to have answered my calling some 40+ years ago and content enough to be in this business of delivering happiness almost all my life. Tourism indeed moulds you into a minimalist... Memories are probably our only possession. And memories are all about sharing experiences, ideas and thoughts. Life is simple, but it becomes easy when we share. Places and people are two things that interest me the most. While places have taken care of themselves, here are my articles through which I can share some interesting stories I live and love on a daily basis with all you wonderful people out there. I hope you enjoy the journey... Let’s go, celebrate life!

More Blogs by Veena Patil

Post your Comment

Please let us know your thoughts on this story by leaving a comment.

Looking for something?

Embark on an incredible journey with Veena World as we discover and share our extraordinary experiences.

Balloon
Arrow
Arrow

Request Call Back

Tell us a little about yourself and we will get back to you

+91

Our Offices

Coming Soon

Located across the country, ready to assist in planning & booking your perfect vacation.

Locate nearest Veena World

Listen to our Travel Stories

Veena World tour reviews

What are you waiting for? Chalo Bag Bharo Nikal Pado!

Scroll to Top