Published in the Saturday Lokasatta on 05 October, 2024
...हे चार दिवस आम्ही तिला अहिल्याबाई होळकरांच्या गोष्टी ऐकवतोय. ‘गरीब बिच्चारी पोर आणि तिचे अतिज्ञान ग्रहण केलेले नातेवाईक‘ अशी अवस्था आहे, बट् शी विल सेल थ्रू....
मागच्या आठवड्यात इंदौरला होतो. फॅमिली हॉलिडे. सध्या आमच्या घरात आमच्या नातीची ‘राया‘ची ॲडिशन झाल्यामुळे आमच्या पर्यटनाला कलाटणी मिळालीय. ‘देखो अपना देश‘, ‘वसुधैव कुटुंबकम‘ आणि ‘चलो बॅग भरो निकल पडो‘ ह्या तीनही गोष्टी बहुतेक ती पोटात असताना ऐकत असावी. जन्मल्यापासून पाच महिन्यात ती लोणावळा, पुणे, नाथद्वारा, गोवा, इंदौर आणि ह्या महिन्यात आता जॉर्जिया अशा टूर्स करतेय. जन्मजात जिप्सी. त्यामुळे तिच्यासोबत एक भारतात आणि एक भारताबाहेर असे दोन छोटे फॅमिली हॉलिडेज् दरवर्षीच्या कॅलेंडरमध्ये ॲड होताना दिसताहेत. त्यातलाच हा इंदौरचा हॉलिडे. हे चार दिवस आम्ही तिला अहिल्याबाई होळकरांच्या गोष्टी ऐकवतोय. ‘गरीब बिच्चारी पोर आणि तिचे अतिज्ञान ग्रहण केलेले नातेवाईक‘ अशी अवस्था आहे, बट् शी विल सेल थ्रू. जाताना ह्या विमान प्रवासात माझ्या आणि सुधीरसोबत सुनिलाची आई होती, जिला आम्हीपण मम्मी म्हणतो. सुनिला नील हेता राया दुसऱ्या फ्लाइटने येत होते तर सारा तिसऱ्या फ्लाइटने. आपला कितीही छोटा मोठा बिझनेस असो सर्वांनी एकाच विमानाने ट्रेनने बसने वा कारने जायचं नाही हा नियम. सर्वजरी विधिलिखित असलं तरी सावधानी महत्वाची. प्रीकॉशन इज बेटर दॅन क्युअर. सो सकाळचं सहाचं फ्लाइट होतं, मम्मींना म्हटलं, ‘तुम्ही एअरपोर्टला वेळेआधी पोहोचाल ही खात्री आहे. आम्ही कदाचित लेट पोहोचू. जमलं तर तुम्ही चेक इन करा आणि बोर्डिंग गेटवर आपण भेटूया. नाहीतर आम्ही तुम्हाला एअर इंडियाच्या काऊंटरवर भेटू‘. आदल्या रात्री घरी यायलाच बारा वाजल्यामुळे आम्ही थोडे लेटच झालो एअरपोर्टला पोहोचायला. मम्मी ‘सुषमा शिर्के‘, वय वर्ष सत्याहत्तर, काऊंटरजवळ नव्हती. म्हणजे आता बोर्डिंग गेटवर भेटू म्हणत आम्ही सर्व एअरपोर्ट फॉर्मलीटिज् करून बोर्डिंग गेटवर मम्मीला भेटलो. ‘काही त्रास नाहीनं झाला मम्मी‘ तर म्हणाली, ‘नाही गं, पहिल्यांदाच डिजीयात्रा ॲप डाऊनलोड केलं होतं, माहीत नव्हतं नेमकं काय करायचं, पण त्या मुलीला विचारलं, किती सोप्पं झालंय सगळं.‘ एकंदरीत मम्मी कम्फर्टेबली आणि कॉन्फिडन्टली एकटी प्रवास करीत होती. विमानात बसल्यावर मम्मीने पर्स उघडून त्यातून एक छोटी ट्रान्स्परेंट डबी काढली आणि त्यातली लवंग तोफ्लडात टाकली. आम्हालाही ऑफर केली. ‘विमानात आता तासभर बसणार, घसा सुकतो आणि तोफ्लडालाही वास येऊ शकतो म्हणून ही लवंग उपयोगी पडते‘. मी मम्मीला ऑब्झर्व करीत होते. थोड्या वेळाने तिने एअर इंडियाचं फ्लाइट मॅगझिन अथपासून इतिपर्यंत वाचून काढलं. मग तिच्या छानशा पोतडीतून एक पुस्तक बाहेर काढलं. सुडोकूचं. विमान लेट झालं तर किंवा विमानप्रवासात कुठेही कंटाळा येणार नाही ह्याचं मम्मीने प्री-प्लॅनिंग केलं होतं. तिला फोटोग्राफीची आवड. पुर्वी प्रवासात तिच्या गळ्यात एसएलआर कॅमेरा लटकवलेला दिसायचा. आता त्याची जागा आयफोनने पटकवली होती. ‘शॉट ऑन आयफोन‘ ने तिला काबिज केलं होतं. मम्मी टेक ऑफ आणि लॅंडिंगचे फोटो काढीत होती. त्यानंतर तिने मला तिचं नवीन क्राफ्ट दाखवलं, म्हणजे फोटो. दोन बाटल्यांना तिने काय छान कलात्मक रूप दिलं होतं आणि हे सगळं ‘टाकाऊतून टिकाऊ‘ ह्या पद्धतीने केलं होतं. म्हटलं तुम्हाला ह्या आयडियाज् सुचतात तरी कुठून. तर म्हणाली ‘यु ट्यूब, पीन्ट्रेस्ट, काय मस्त जग आहे आत्ताचं, त्याचा भाग मला होता आलं ह्यासाठी मी कृतज्ञ आहे. मग मी शिकत बसते असं सर्वकाही. अगं आमच्याकडच्या पूजा आणि पलक ह्या दोघी घरातला कचरा फेकण्याआधी माझ्याकडे येऊन विचारतात, ‘मम्मी बघा तुम्हाला काही हवंय का यातलं‘, माझ्या डेस्कखाली एक भला मोठा बॉक्स आहे ह्या अशा कचऱ्यातून काढून ठेवलेल्या वस्तूंचा. कधीतरी असा उपयोग होतो त्याचा‘. मम्मीची आणखी एक खासियत आहे ती म्हणजे ‘व्हेरी क्रिएटिव्ह इनोव्हेटिव्ह बर्थडे कार्डस्‘. प्रत्येकाच्या बर्थडेला मम्मीचं तिने स्वत: तयार केललं कार्ड आलंच पाहिजे. रायाचा जन्म झाला तेव्हा तिने दिलेलं ‘नेव्हर एन्डिंग कार्ड‘तर ‘टॉक ऑफ द फॅमिली‘ होतं. सतत कार्यमग्न राहणं, आवडत्या गोष्टींना वेळ देऊन आनंदी राहणं, कमी पण वेळेवर खाऊन तब्येत चांगली राखणं ह्या गोष्टी मम्मीने आत्मसात केल्या आहेत आणि आयुष्याच्या गोल्डन पीरियड ती सुनिला आणि सारासोबत मजेत घालवतेय.
माझ्या सासुबाई ‘इंदू पाटील‘ ज्यांना मी माताजी म्हणते, वय वर्ष सत्याऐंशी. स्वाभिमानी आणि कडक सासुबाई म्हणून प्रसिद्ध. आत्ताही तेवढ्याच कडक आणि ताठ. सात आठ वर्षांपुर्वी कमरेत थोडंसं वाकणं झालंय पण वॉकरच्या सहाय्याने सगळं काही सुरळीत चालू आहे. त्यांना वॉकरशिवाय चालायची प्रॅक्टिस करायचीय कारण रामजन्मभूमी स्वत:च्या पायावर बघायची त्यांची इच्छा आहे. त्यासाठी त्या प्रयत्न करताहेत. आणि त्यांचे प्रयत्न बघता ते त्या अचिव्ह करतील याची खात्री आहे. येत्या काही महिन्यात त्यांच्यासोबत आयोध्येची यात्रा होताना आम्हाला दिसतेय. सकाळी चारच्या आधी उठणं, तयारी करून तासभर मन:पूर्वक देवाची पूजा करणं, त्यानंतर पठण, वाचन, वर्तमानपत्र, बातम्या, मराठी एफ एम, यूट्यूब वरील चर्चा संवाद वादविवाद, फोनद्वारे त्यांचं मूळ गाव वसई विरारची खडानखडा माहिती मिळवणं, हे सगळं साग्रसंगित सुरू आहे. मी उठण्यासाठी घड्याळाचा अलार्म लावत नाही. नॅचरली जाग आली पाहिजे ह्या मताची मी. पण कधीतरी स्वत: उठायची खात्री वाटली नाही की त्यांना विनंती असते, ‘पाच वाजताही मी उठलेले नसेन तर मला उठवा‘. माताजी म्हणजे माझा ह्युमन अलार्म. सुधीरचे वडील अनंत पाटील, पप्पा अनेक शाळांमध्ये म्हणजे आर एम भट, गोखले हायस्कूल बोरिवली, जव्हार, कोसबाड, नाशिक अनेक शाळांमध्ये प्रिन्सिपलपद भूषविलेले. त्यांच्यासोबत ह्या संपूर्ण परिवाराच्या बदल्या. जव्हारच्या घरात म्हणजे भग्नावस्थेतील राजवाड्यात घरात साप घुसायचे. अशीही परिस्थिती अनुभवलेल्या माताजी घराला हातभार म्हणून शिवणकाम करायच्या. थोडक्यात आलेली बदली त्या स्विकारत होत्या. खेड्यापाड्यात त्यांचा संसार पुन्हा पुन्हा नव्याने वसवत होत्या. तीन मुलांच्या शिक्षणासाठी धडपडत होत्या आणि स्वकमाईही करीत होत्या. प्रचंड कष्टकरी आईचं-पत्नीचं जीवन त्या जगल्या आणि म्हणूनच वयाच्या सत्याऐंशीव्या वर्षीही बुद्धी तल्लख आहे. त्या स्वयंपूर्ण आहेत, आत्मनिर्भर आहेत ह्याचा आम्हालाही आनंद आहे.
वीणा वर्ल्डचा पाचवा डिरेक्टर अभिजीत गोरे ची आई ‘सरोजताई‘ आता नव्वदीला पोहचलीय. पण त्यांना मी जेव्हा जेव्हा भेटते तेव्हा तेव्हा अतिशय नीटनेटक्या स्वरूपातच पाह्यलंय. अतिशय छान सोबर साडी, त्यावर साजेशी ज्वेलरी, चेहरा प्रसन्न. स्वतःला असं छान ठेवण्याकडे त्यांचा कटाक्ष. म्हणजे मी गेली चाळीस वर्ष त्यांना बघतेय आणि त्यांच्या त्या स्मार्टनेसचं मला कायम आकर्षण वाटत आलंय. वयाप्रमाणे माणसात शैथिल्य येतं, ‘चलता है' ॲटिट्युड जोर धरायला लागतो, 'ह्या वयात आता कशाला?‘ असं स्वतःलाही वाटायला लागतं आणि आजुबाजूची आपण सर्वजणंपण त्याच पध्दतीने त्यांच्याकडे बघतो. सरोजताई मात्र दाखवून देतात 'आय लव्ह मायसेल्फ ॲन्ड यू टू लव्ह युवरसेल्फ'. आपल्या सभोवतालात नुसती नजर टाकली तरी वेगवेगळं इन्स्पिरेशन्स मिळतात ती अशी.
सगळ्यांची जीजी म्हणजे माझी आई, वय वर्षे ऐंशी. म्हणजे तिच्या पासपोर्टवरील बर्थडेट प्रमाणे ऐंशी पण तिचं म्हणणं, ‘गावी माझी बर्थडेट चुकीची टाकलीय, एक वर्ष पुढची टाकलीय. मी ऐंशी नाही, माझं वय एकोणऐंशी आहे‘. तिच्या प्रत्येक वाढदिवसाला आम्ही तिला चिडवत असतो, ‘आई तू साठ की एकोणसाठ? सत्तर की एकोणसत्तर?‘ आत्ता गेल्या महिन्यातही हा वादविवाद रंगला आणि प्रत्येक वर्षी ती तेवढ्याच उत्साहाने ही गोष्ट आम्हाला पटविण्याचा प्रयत्न करते. 'ए आई सोडून दे नं‘, पण कोणतीही गोष्ट सोडून न देणं हा तिचा स्थायीभाव. 'डीटरमिनेशन' ही गोष्ट तिच्याकडूनच आली असावी. मला आजही तो दिवस आठवतो, पाचवीत होते, गावातल्या हायस्कूलमध्ये प्रथमच एन्ट्री झाली होती. आमच्या सरांनी पहिल्या चाचणीचे पेपर्स व मार्क्स घरी दाखवून आई वा बाबांची सही आणायला सांगितलं होतं. आईला मी पेपर दाखवला. तिने सही करताना पाठीत धपाटा घातला आणि म्हणाली, 'एवढं घाणेरडं अक्षर तुझं, चल बस माझ्यासमोर, आजच्या रात्रीत तुझं अक्षर चांगलं झालं पाहिजे. 'मी मुसमुसू रडत असताना अक्षर नीट काढण्याचा प्रयत्न करीत होते. जरा वेडंवाकडं गेलं की तिचा धपाटा पाठीत बसत होता. मध्येच कानही पिळला जात होता. एवढ्या थर्ड डिग्री टॉर्चरनंतर माझी बिशादच नव्हती अक्षर वेडंवाकडं काढायची. ते बिच्चारं एकदम व्यवस्थित झालं. माझं अक्षर छान आहे असं कुणीही म्हटलं, की ती रात्र आठवते आणि आईचं जमदग्नी रूप. अक्षर चांगलं झाल्याचं श्रेय तिचं. प्रयत्ने वाळूचे कण... हे बाळकडू ह्या प्रसंगातून मिळालं असं वाटतं. पुर्वी आई वडील शिक्षक धपाटा वा छडीचा सर्रास वापर करायचे, त्याचा उपयोग व्हायचा असं कधीकधी वाटतं. आज ऐंशी किंवा एकोणऐंशीव्या वर्षी तिच्यात तोच तिशीतला उत्साह आहे. तीच कष्ट करण्याची ताकद आहे. हाती घेतलेली एखादी गोष्ट पूर्णत्वाला न्यायचा ध्यास आहे. नवनवीन प्रयोग करायची तिची तयारी असते. तशी ती व्हाट्सॲप युनिव्हर्सिटीची मेंबरही आहे. कधी कधी 'प्रपोगँडा'ची ती शिकारही होते. मुलांची नातवंडांची नको इतकी काळजी करण्यातही ती बराच वेळ देते. सांगावं लागतं, ‘अगं, नको इतकी विचारात गढून जाऊस, तुझा पार्ट तू व्यवस्थित पार पाडलायस, आता आम्ही आमचं बघू?‘ पण शेवटी आई आहे नं, आदत से मजबूर. प्रकृती अस्वास्थामुळे बाबांच्या चलनवलनाला मर्यादा आल्या. पण तेही तिने स्विकारलं आणि गेली दहा वर्ष बाबांची सेवा ती अगदी मन:पुर्वक करतेय. आयुष्याला हसत खेळत सामोरी जातेय आणि हे सगळं होत असताना तब्येतही सांभाळतेय.
मम्मी, माताजी, ताई वा आई, चौघींनाही मेजर कोणताही आजार नाही वा औषधांची गरज. देवाचे आभार. सतत कार्यमग्न राहून, आयुष्यातील आव्हनांना स्विकारून, त्यावर मात करून त्यांनी वयाच्या सत्याहत्तर, सत्याऐंशी, नव्वद वा ऐंशीमध्ये स्वत:ला मनाने तरूण ठेवलंय आणि शरीराने तंदुरूस्त. आज ह्या चौघीही आजुबाजुला दिसत असताना मला माझ्या वयाच्या साठीला लहान असल्यासारखं वाटतं. माझ्यात तिशीतला उत्साह संचारतो. माझ्यातली कार्यमग्नता वाढते. घरात मोठी माणसं असल्याचा फायदा तो असा.
जापनीज फिलॉसॉफी, इकिगाई, ओकिनावा वे, हारा हाचि बू, जगातील ब्लू झोन्स...हेच सांगताहेत. त्याचं प्रात्याक्षिक खरतंर आपल्याला आपल्या घरांमध्येच बघायला मिळतं. आता ह्या दुर्गादेवीच्या उत्सवी वातावरणात घराघरातील ह्या दुर्गांना साष्टांग दंडवत घालूया आणि त्यांचे आशीर्वाद घेऊया.
Post your Comment
Please let us know your thoughts on this story by leaving a comment.