सुखसुविधांनी आपल्या पायाशी लोळण घेतलीय. चुटकीसरशी नाही तर चुटकीपूर्वी जगातल्या कोणत्याही गोष्टीविषयींची माहिती आपल्याला मिळू लागलीय...
मोरोक्को तसं बघायला गेलं तर एक दुर्लक्षित देश आपल्या भारतासाठी, खासकरून भारतीय पर्यटकांसाठी. त्यामुळे आमचंही मोरोक्कोला जाणं झालं नव्हतं. आणि ‘खाईन तर तुपाशी नाहीतर राहीन उपाशी’ असंच काहीसं मोरोक्कोच्या बाबतीत झालं. अखेर आमच्या शेजारी मित्रमैत्रिणींसोबत आम्ही मोरोक्कोची एक-दोन नव्हे तर चक्क पंधरा दिवसांची रोड ट्रिप ठरवली आणि आमचा ‘एक्सप्लोअर मोरोक्को’ प्रवास सुरू झाला. आम्ही दोन-दोन कपल्स एकेका प्राडो जीपमध्ये होतो. आलटून पालटून ड्रायव्हिंग सुरू होतं आणि मजल दरमजल करीत आम्ही मोरोक्कन सहारा डेझर्टमध्ये मेरझुगा कॅम्पला पोहोचलो. आमच्या टूरचा तो सर्वात लांबचा पॉईंट होता. आम्हाला सूर्यास्ताच्या आधी पोहोचायचं होतं, पण रस्ते विरहित त्या डेझर्टमध्ये अपेक्षित उशीर झालाच आणि आम्ही तीन तास उशीराने पोहोचलो. दुसऱ्या दिवशी सकाळी डेझर्ट ड्यून बॅशिंग, सॅन्ड सर्फिंग वगैरे प्रकार करणार असल्याने त्याची स्वप्नं बघत आम्ही त्या कॅम्प सेटिंगमध्ये झोपून गेलो. पहाटे चार वाजता फोन खणखणला आणि नीलने माझ्या बाबांच्या म्हणजे त्याच्या आजोबांच्या निधनाची बातमी दिली. कोणत्याही परिस्थितीत आम्ही पस्तीस ते चाळीस तासांपूर्वी पोहोचू शकत नव्हतो. त्यामुळे त्याला आणि आईला म्हटलं, आम्ही लगेच निघतोय पण आमच्यासाठी थांबू नका. सगळ्यांचा खोळंबा नको. अदरवाईज तुझ्या हाकेला पंधरा मिनिटांत पोहोचणारे आम्ही आज एवढ्या लांब आल्यावर हे घडावं ह्यात नक्की काहीतरी ईश्वरी संकेत दिसतोय. लेट्स मुव्ह अहेड! ‘कल्पवृक्ष कन्येसाठी लावूनिया बाबा गेला...’ माझ्यासाठी ते गेलेले नाहीतच, एखाद्या दीपस्तंभासारखे मार्गदर्शक म्हणून आहेत सदैव. आता दोन महिन्यांनी हे लिहीताना थोडं हलकं वाटतंय, पण तेव्हा ते नव्हतं हे ही तेवढंच खरं. काय योगायोग, आज त्यांच्या नव्वदाव्या वाढदिवशी हा लेख मी लिहायला घेतला. अर्थात लेख भाऊंवर नाही, कारण त्या माझ्या आमच्या स्वतःच्या अनमोल आठवणी आहेत. एकदम प्रायव्हेट. त्या अधूनमधून आठवत राहणं आणि त्यांनी घालून दिलेल्या नीती-नियमांनुसार चालणं.आता प्रश्न होता या डेझर्टमधून बाहेर कसं पडायचं. कॉनव्हॉय असूनसुद्धा काल आम्हाला रस्ते शोधावे लागत होते. जवळपास एअरपोर्ट नव्हता. एक होता छोटुसा अडीच-तीन तासांवर, पण पोहोचणार कसं, आमच्याकडे सेपरेट गाडी नव्हती आणि ड्रायव्हरचाही प्रश्न होता. आणि गाडी असती तरी आम्ही म्हणजे सुधीर चालवण्याच्या मनस्थितीत असणार नव्हता. हेलिकॉप्टर एअरलिफ्टींग सुध्दा शक्य नव्हतं. सगळ्यात सोप्पा मार्ग होता ‘जमिनीवर असणं.’ रोड ट्रॅव्हल. सकाळी सात वाजेपर्यंत आम्ही गाडी आणि ड्रायव्हर लोकेट करू शकलो. त्यालाही डेझर्टला पोहोचायला दोन तास लागणार होते. पाण्याबाहेर काढलेल्या माशासारखी अवस्था झाली होती. वाळवंटातली तडफड जणू. दहा वाजता ड्रायव्हर आला आणि आम्ही आमच्या मित्रमंडळींना निरोप देऊन निघालो कासाब्लांका एअरपोर्टकडे. अकरा तासांचा प्रवास दिसत होता. फ्लाईटही मध्यरात्री नंतरचं होतं, त्यामुळे रस्त्यात कुठे काही अडचण आली नाही तर आम्ही आरामात पोहोचणार होते. आमचा परतीचा प्रवास सुरू झाला आणि हुश्शss झालो. मेरझुगापर्यंत पोहोचायला आम्हाला अडीच दिवस लागले होते, जो प्रवास आम्ही आता काही तासांमध्ये करणार होतो. ड्रायव्हर हसन भला माणूस दिसत होता, त्यामुळे मानसिक निश्चिंती मिळाली. चहूबाजूला पसरलेलं अफाट वाळवंट, रस्ते कुठेच दिसत नव्हते, तरीही ड्रायव्हर हसन शिताफीने गाडी चालवत होता. आम्ही बघितलं तर त्याने GPS (ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम) ऑन केला नव्हता. सुधीरने प्रश्न केला की, ‘आम्हाला कुठेही पुढे रस्ता दिसत नाहीये, तू GPS पण लावलेला नाहीयेस, तुला कळतं कसं कोणत्या डिरेक्शनने जायचं ते.’ तो म्हणाला, ‘मी पक्का मोरोक्कन आहे. मला माझा देश पूर्ण माहितीय, मी अनेकदा तो पिंजून काढलाय आणि देवाने जो GPS माझ्या डोक्यात बसवलाय, तो ह्या टेक्निकल GPS पेक्षा खूप स्ट्रॉग आहे’ ‘वाव!’ हे काही आम्हाला म्हणजे त्याच्या सवारीला इम्प्रेस करण्यासाठी दिलेलं उत्तर नव्हतं, तर आम्ही प्रॅक्टिकली ते बघत होतो. अकरा तासांच्या त्या पूर्ण प्रवासात त्याने GPS ऑन केलं नाही. म्हणजे ए आय, जनरेटिव्ह ए आय च्या वापराला चटावलेल्या आम्हाला त्याचं हे GPS न वापरणं थोडं रिस्कीही वाटत होतं. मनात येत होतं, एखादा टर्न चुकला तर? म्हणतात नं की, ‘एव्हरी राइट टर्न इज नॉट अ राइट टर्न.’ आमचं चिंतीत मन एका बाजूला ‘फ्लाईट मिस तर होणार नाही ना याच्या ह्या GPS न वापरण्यामुळे’ याचा विचार करीत होतं, त्याचवेळी त्याच्या देवाने त्याच्या डोक्यात बसविलेल्या GPS वर विश्वासही ठेवत होतं. नंतर आम्ही जास्त विचार न करता त्याच्या दैवी GPT वर पूर्ण भरवसा ठेवला आणि त्या गोष्टीची चिंता करणं सोडून दिलं, किंबहुना त्या चिंतेचा वा भीतीचा लवलेषही मनात ठेवला नाही. मजल दरमजल करीत आम्ही अकरा तासांनी कासाब्लांका एअरपोर्टला पोहोचलो. हसनचे मनापासून आभार मानले. तो निघून गेला, पण त्याच्या डोक्यातला GPS मात्र माझ्याडोक्यात घट्ट बसला.हसन ड्रायव्हरची गाडी प्राडो होती. एकदम अल्ट्रामॉडर्न तेवढाच स्ट्राँग GPS सपोर्ट त्यामध्ये असलेली. पण समोर GPS ही आयती गोष्ट असूनही, तो त्याच्या डोक्याला जागृत ठेवीत होता. बुद्धीचा वापर करीत होता. माणसाच्या आंतरशक्तीला निस्तेज करणाऱ्या अत्याधुनिक उपकरणांपासून स्वतःला वाचवित होता. त्याचसोबत देशाबद्दलचा जाज्वल्य अभिमान त्याच्यापाशी होता. माझा देश मला माहीत असला पाहिजे आणि मी जर टुरिझम वा ट्रान्सपोर्टमध्ये असेन तर माझ्या देशाचे रस्ते आणि त्यांची खडान्खडा माहिती मला असली पाहिजे ही त्याची मॉरल व्हॅल्यू किंवा त्याने स्वतःने त्यासाठी निर्माण केलेली ही नीतीमूल्यं. इमर्जन्सीमध्ये केलेला मेरझुगा ते कासाब्लांका प्रवास बरंच काही शिकवून गेला.टेक्नॉलॉजीकली आपण एका अतिशय सुंदर अशा जगात राहतोय. सुखसुविधांनी आपल्या पायाशी लोळण घेतलीय. चुटकी पण जास्त वेळ घेईल, म्हणून चुटकीसरशी नाही तर चुटकीपूर्वी जगातल्या कोणत्याही गोष्टीविषयींची माहिती आपल्याला मिळू लागलीय. या फास्ट पेस्ड जगात तग धरून रहायचं असेल, जगाबरोबर पळायचं असेल आणि विजयी व्हायचं असेल तर आपल्याला या सुखसुविधांचा वापर केलाच पाहिजे. आपण, म्हणजे ज्यांना भविष्य घडवायचंय किंवा नामशेष व्हायचं नाहीये त्या सगळ्यांनी या सर्व गोष्टींचा वापर दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग म्हणून अंगवळणी पाडायलाच पाहिजे. मला हे पूर्ण पटतंय. कारण मी सुद्धा एक व्यावसायिक आहे. पण.. पण इथे धोक्याची सूचना आहे.आपल्या मराठीमध्ये एक म्हण आहे. ‘आडातच नसेल तर पोहऱ्यात येणार कुठून?’ जीपीएस, चॅट जीपीटी, क्लॉड, परप्लेक्सिटी, मेटा एआय, चॅटसोनिक, गुगल जेमिनी, मायक्रोसॉफ्ट कॉपिलॉट, जस्पर एआय, ग्रोक, बिंग .. अशी अक्षरशः असंख्य टूल्स आता उपलब्ध आहेत आणि असणार आहेत. पण आपल्याला त्यातलं काय हवंय, त्याद्वारे आपण काय करू शकतो आणि आपल्याला नेमकी कसली गरज आहे हेच जर आपल्याला माहीत नसेल तर या टूल्सचा काहीच उपयोग नाहीये. मी टेक्नोसॅव्ही नसल्याने आधी मी सुद्धा हे वापरत नव्हते. पण ए आय आणि जनरेटिव्ह ए आय ची क्षमता आणि त्याचा आपल्याला होणारा उपयोग बघून मी स्वतःला बदललं. काय करायचंय? का करायचंय? आणि कसं करायचंय? हे बेसिक किंवा हा स्ट्रॅटेजीचा भाग आपल्याला माहीत असला पाहिजे. एकदा का त्या संबंधी आपण क्लिअर असलो की मग जगभरातले उत्तमोत्तम कन्सल्टंट्स आणि गुरूंनी केलेल्या रिसर्चसह चॅट जीपीटी सारखे अनेकजण हात जोडून आपल्यासमोर नम्रपणे उभे आहेत. त्यांची मदत घेणं म्हणजे जगाच्या वेगासोबत चालणं पण हे सगळं असलं तरी आमच्या काही डिपार्टमेंट्समध्ये जिथे गरज आहे तिथे बरेचसे टीम मेंबर्स अजूनही या आयुधांचा म्हणावा तसा वापर करीत नाहीत. हे जेव्हा निदर्शनास आलं तेव्हा मी जरा जास्त खोलात जाऊन जाणण्याचा प्रयत्न केला. ‘आपण जे काही करतोय ते आणखी चांगलं करण्यासाठी या सगळ्या नवतंत्रज्ञानाचा उपयोग का बरं करीत नाहीत?’ हा प्रश्न केल्यावर वेगवेगळ्या गोष्टी दिसल्या, ज्या व्यक्ती तितुक्या प्रकृती किंवा प्रवृत्तीचं प्रतीक आहेत. ‘स्टेटस क्वो’ ही पहिली प्रवृत्ती, आहे तसं बरं चाललंय नं, इथे श्वास घ्यायला वेळ नाही, रिसर्च वगैरे बहुत दूर की बात है। हा एक प्रकार दुसरा प्रकार ‘आय नो एव्हरीथिंग, मशीन मला काय शिकवणार’ आणि तिसरा प्रकार ‘असा काही मार्गदर्शक उपलब्ध आहे जो आपलं काम लवकर संपवेल किंवा आणखी काही नवीन आयडियाज् आपल्याला देईल याची पुसटशीही कल्पना नसलेली जगावेगळी माणसं.’ पुढचा प्रकारं म्हणजे काहींना नव तंत्रज्ञानाची भीती, कदाचित ते तंत्रज्ञान आपल्याला रिप्लेेस करेल म्हणून असते. सध्या मी ए आय एजंट बनले आहे काही टीम्ससाठी आणि ‘व्हॉट्स फॉर मी इन इट’चं महत्त्व उदाहरणांसहित टीमला पटवून द्यायचा प्रयत्न सुरू आहे. पूर्वी आपली आयडिया तावून सुलाखून घ्यायला आपल्याला अनेक पुस्तकं चाळायला लागायची. अनुभवसंपन्न व्यक्तींशी बोलून त्यांचा सल्ला घ्यावा लागायचा. किंतु परंतु मध्ये भरपूर वेळ जायचा. हे सगळं करायला दिवस आणि महिने लागायचे, हे आता काही तासांच्यामेहनतीने आपल्याला मिळतंय. कोणत्याही ए आय ला ‘क्लियर, इन डिटेल, स्पेसिफिक प्रॉम्प्ट’ देणं गरजेचं असतं. त्यासाठीच आपल्याला हा वेळ लागतो, बाकी उत्तर देण्याचं काम मशीन काही मिनिटांमध्ये किंवा तासांमध्ये करतं जर प्रोजेक्ट मोठा असेल तर.माझ्याकडे पेशन्स आहे आणि बदल घडायला वेळ लागतो ह्याची जाणीवही आहे. पण येणाऱ्या भविष्याला सामोरं जायचं असेल तर प्रत्येकाने स्वतःला अपग्रेड केलंच पाहिजे आणि त्यासाठी सगळी आयुधं विनासायास उपलब्ध आहेत ज्याचा सकारात्मक आणि योग्य वापर केला पाहिजे. मात्र हे करीत असताना आपल्या डोक्यातला GPS आणि मनातला GPT सतत जागृत ठेवणं, अंतर्ज्ञान आणि सर्जनशीलतेला निरंतर तेवत ठेवणं ही आपली जबाबदारी आहे. विज्ञानतंत्रज्ञान हा सपोर्ट आहे. त्याच्या आधाराने आपल्या विचारांना बळकटी देऊया, नवनवीन कल्पना याच्या सहाय्याने जोखून घेऊया,आपली उपजत कौशल्ये विकसित करूया.मी त्या मोरक्कन ड्रायव्हरचं, हसनचं बोलणं ‘अलर्ट’ म्हणून संग्रही ठेवलंय माझ्यातल्या क्रिएटिव्हिटीला, इनोव्हेशनला सदैव जागृत ठेवायला. त्याला थोडंसं एन्ाहान्स केलंय, ‘माझ्या देवाने माझ्या डोक्यात GPS आणि हृदयात GPT बसवलाय तोच माझा मार्गदर्शक.’
Post your Comment
Please let us know your thoughts on this story by leaving a comment.