कुठल्याही देशाची संस्कृती जाणून घेता येते ती तिथल्या जेवणाच्या चवीतून. मग आपण हॉलिडेवर एखाद्या देशाची ओळख करून घेताना तिथल्या मॉन्युमेंट्सना भेट देऊन त्या देशाचा इतिहास जाणून घेण्यातच समाधान का मानतो, हा प्रश्न मला नेहमी पडतो. खरंतर तिथली खाद्यसंस्कृती,खाद्यपदार्थ स्वतः बनवून विकणारे फार्मर्स व ते विकत घ्यायला आलेले लोकल्स ह्यांना प्रत्यक्ष भेटून ती ओळख अधिक जवळून करता येईल असं मला कायम वाटत राहतं.
‘चल, आपण आज मार्केटमध्ये जाऊन भाज्या आणूया’, एकदा अचानक माझी इटालियन मैत्रिण लिडिया मला म्हणाली. तिच्या या वाक्याचा अर्थ मला काही केल्या कळेना. १९९९ साली मी लंडनमध्ये स्टुडंट म्हणून राहत असताना लिडिया मला लंडनची ओळख करून देत होती. मी नुकतीच लंडनला पोहोचले होते आणि शहराची पुरेशी ओळख झालेली नव्हती. म्हणून तिच्या ह्या बोलण्यावर मी लगेच प्रत्युत्तर केलं, आज म्हणजे? आम्हीतर रोजच भाजी मार्केटमधून आणतो. वीस वर्षांपूर्वी फळ-भाज्यांचे सुपर मार्केट भारतात फारसे दिसत नव्हते आणि भाजी ही नेहमी भाजीवाल्या विक्रेत्यांबरोबर भावाचे तोलमोल करूनच आणली जात असे. त्यात लहानपणी घरातली कामे करताना बाजारातून भाजी आणणे तसे कंटाळवाणेच काम वाटायचे, त्यामुळे या गोष्टींकडे कधी फारसे लक्ष गेले नव्हते.
असो, आम्ही दोघी निघालो ते लंडनच्या बरो मार्केटकडे. थेम्स नदीवरच्या लंडन ब्रिजजवळ सदर्क या भागात एक हजार वर्षांपासून बरो मार्केट स्थित आहे. हे लंडनचे सर्वात जुने फूड मार्केट असले तरी आजसुद्धा अतिशय आकर्षक वाटते. हो खरंच! भाजी मार्केट हे सुद्धा आकर्षक वाटू शकते आणि तिथे जमलेल्या गर्दीला बघून हे लोकल्ससारखेच टूरिस्टमध्येसुद्धा तितकेच लोकप्रिय आहे याचा प्रत्यय येणं म्हणजे कमालच. यंदाच्या लंडन ट्रिपवर मी परत बरो मार्केटला भेट दिली ती तब्बल वीस वर्षांनंतर. इतक्या वषार्ंनंतरही मला ते तितकेच आवडले. आपली परंपरा आणि इतिहास जपत काळाबरोबर बरो मार्केट हे बदलत गेले असले तरी त्याच्याशी संबंधित अनेक गोष्टी तशाच आहेत जशा त्या पूर्वी होत्या. तर हजार वर्षांपूर्वीच्या या मार्केटनं आजच्या पिढीच्या पसंतीस उतरायचं कामही अगदी चोख केलंय हे पाहूनही नवल वाटलं. याचं कारण होतं, तुम्हाला या मार्केटमध्ये कोणत्या विक्रेत्याकडून भाजी घ्यायचीय हे तुम्ही ठरवायचं त्याच्या डिटेल्स पाहून, तर दुसरीकडे त्या विक्रेत्याच्या स्टॉल्सकडे नेण्यासाठी मदत करणारा मॅपही रेडीच... हे सारं घरबसल्या ऑनलाईन फायनल करायचं आणि मग थेट मार्केटमध्ये आपल्याला हवी ती फळं, भाज्या आपल्या हव्या त्या विक्रेत्याकडून घेण्यासाठी कोणतीही शोधाशोध नं करता त्याच्या स्टॉलकडे पोहोचायचं, आहे की नाही आधुनिकीकरणाचं जादुई तंत्र इथे दिमतीला. ह्या मार्केटमध्ये भाज्या, फळं, मीट, मासे अशी सर्व खाद्यपदार्थ आपण विकत घेऊ शकतो. सर्व पदार्थ उत्तम दर्जाची व ती विकणारी बहुतेक मंडळी ही स्वतः शेती करणारी असल्याने, ज्यानं ते पिकवलंय त्याच्याकडूनच आपण विकत घेतोय हे इथले मुख्य आकर्षण. अतिशय सुंदररित्या रचून मांडलेल्या फळ-भाज्यांना बघून ते विकत घेण्यासाठी माझे हात शिवशिवत होते. पण आपण हे घेऊन हॉटेल रूममध्ये ह्याचे करायचे काय? हा प्रश्न माझ्यासमोर उभा राहिला. पण बरो मार्केट हे केवळ फळ-भाज्यांचे मार्केट नसून इथे अनेक स्टॉल्सवर आपण स्ट्रीट फूड, कॉफी,आईसक्रीम, चॉकलेट्स ह्या सर्व गोष्टींचा स्वाद घेऊ शकतो.
हा भाज्यांचा विभाग मागे टाकून आम्ही इथल्या फूड स्टॉल्स्कडे निघालो. जगभरातल्या सर्व क्युसिन्सचे स्टॉल इथे लागले होते. माझी नजर गेली ते इथल्या डक मीटने बनविलेल्या सँडविच विकणार्या फ्रेंच कॅफेकडे. भरपूर मोठी रांग होती खरी, पण याचाच अर्थ जेवण स्वादिष्ट असणार ह्याची मनातल्या मनात खात्री करून घेत मी त्या रांगेत उभी राहिले. ते सँडविच खरंच इतके सुंदर होते की दोघांमध्ये एक अर्धे-अर्धे खाण्यापेक्षा आपण दोन घेतली असती तर बरे झाले असते असे वाटले. पण पुढे आफ्रिकन, स्पॅनिश, इटालियन, ब्रिटिश आणि शुद्ध शाकाहरी असे भारतीय स्टॉल्स देखील दिसले. बरो मार्केटमधल्या खाद्यपदार्थांची ही विविधता बघितल्यावर लंडन हे खरंच जगाचे केंद्रबिंदू ठरते या गोष्टीवर आणखी विश्वास बसतो. हातात कॉफीचा कप घेऊन पुढच्या होममेड चॉकलेट स्टॉलकडे वळलो तेवढ्यात लाऊडस्पीकरवर पास्ता बनविण्याची कृती ऐकू आली. त्या आवाजाच्या दिशेने आम्ही निघालो आणि सर्वांसाठी मोफत अशा तिथे सुरू असलेल्या कुकिंग डेमॉन्स्ट्रेशनमध्ये पुढचा अर्धा तास रंगून गेलो. इतक्या सहज-सोप्या आणि खेळकर पद्धतीत ते सुरू होते की तिथून आमचा पाय निघत नव्हता. मार्केटच्या बाहेर अनेक भांड्यांची दुकाने होती व ट्रेडिशनल आणि अतिशय मॉडर्न अशा दोन्ही प्रकारची जेवण बनविण्याची भांडी इथे डिस्प्लेवर होती. एरव्ही स्वयंपाक करण्याची जवळपास अॅलर्जी असलेल्या मला आणि माझ्या मैत्रिणीलाही इथून काही अत्याधुनिक बेकिंगची भांडी घेतल्याशिवाय रहावलं नाही. बघता बघता अर्धा दिवस या मार्केटमध्येच कुठे गेला ते कळले नाही. आता आपण निघालो नाही तर बहुधा रात्रीचे जेवणसुद्धा इथेच होईल असे वाटले.
कुठल्याही देशाची संस्कृती जाणून घेता येते ती तिथल्या जेवणाच्या चवीतून. मग आपण हॉलिडेवर त्या देशाची ओळख करून घेताना तिथल्या स्तब्ध मॉन्युमेंट्स आणि इमारतींना भेट देऊन त्या देशाचा इतिहास जाणून घेण्यातच समाधान का मानतो, हा प्रश्न मला नेहमी पडतो. खरंतर तिथली खाद्यसंस्कृती, खाद्यपदार्थ बनविण्याच्या पद्धती, खाद्यपदार्थ स्वतः बनवून विकणारे फार्मर्स व ते विकत घ्यायला आलेले लोकल्स ह्यांना प्रत्यक्ष भेटून ती ओळख अधिक जवळून करता येईल असं मला कायम वाटत राहतं. बरो मार्केटमध्ये फिरताना समुद्रातले फ्रेश ऑयस्टर्स मी विकत घेतले तेव्हा लंच ब्रेकमध्ये काही पौष्टिक लंच घ्यावे या उद्देशाने आलेला लंडन सिटीमधला बँकर भेटला, पुढे कुकिंग डेमॉन्स्ट्रेशन ऐकताना आपल्या मुलांना घेऊन आलेली गृहिणी दिसली आणि आमच्यासारखेच जगभरातून आलेले अनेक टूरिस्ट भेटले. काही वर्षांपूर्वी रोमवरून लंडनला येऊन स्थायिक झालेला विटोरिया हा तर स्वतःतच एक अवलिया होता. त्याचे जेवण तर उत्कृष्ट होतेच पण प्रत्येक माणसाशी संवाद साधून, गाणी गात त्यांचे मनोरंजन करीत जेवण बनवून वाढण्याची त्याची स्टाईलच निराळी होती. एकंदरीतच काय, मार्केटमधल्या ह्या हव्याहव्याशा गजबजाटात आमची ज्ञानेंद्रियं सुपर अॅक्टिव्ह झाली हे मात्र नक्की. तिथल्या आवाजानं, पोटाची भूक भागवणार्या तिथल्या चविष्ट वासानं, विक्रेत्यांच्या हसर्या चेहर्यानं ‘गूड फूड, गूड मूड’ यावर माझा पक्का विश्वास बसला.
वीसएक वर्षांपूर्वी अशा फूड मार्केटशी माझी ओळख झाली आणि तेव्हापासून जिथे-जिथे शक्य होईल तिथे मी फूड मार्केटना भेट दिली आहे. यातले माझे एक आवडते मार्केट म्हणजे स्पेनच्या राजधानी माद्रिद इथले ‘मरकादोे दे सॅन मिगेल’. स्पेनच्या बार्सेलोना शहरात ‘ला रामब्लास’ या मुख्य रस्त्यावरील ‘ला बुकेरिया’ हे स्पेनचे सर्वात मोठे फूड मार्केट हे त्याच्या रंगबिरंगी भाज्या, फळं व फुलांनी आपले डोळे दीपवून टाकते. पण ‘मरकादो दे सॅन मिगेल’ हे जुन्या व नवीन परंपरेचे मोहक मिश्रण असलेले अतिशय स्टायलिश व ट्रेंडी मार्केट होते. इथल्या एका फूड स्टॉल काऊंटरच्या बार स्टूलवर बसून इथले अतिशय ताज्या ऑलिव्हस्चे दहा-पंधरा प्रकार, चीजचे अनेक प्रकार व त्याबरोबर गरम गरम नुकत्याच बनविलेल्या ब्रेडचे अनेक प्रकार टेस्ट करता करता संध्याकाळची रात्र कधी होईल हे कळणारही नाही. इथल्या अनेक काऊंटर्सवर स्पॅनिश ऑलिव्हस् व चीजबरोबर स्पॅनिश वाईन्स व ‘तापास’ म्हणजेच स्पॅनिश स्नॅक्सचा आस्वाद घेत लोकं बसलेली असतात. आणि युरोपमधील इतर देशांपेक्षा स्पेनमध्ये रात्री उशिरापर्यंत रेस्टॉरंट्स सुरू असल्याने अगदी मध्यरात्रीसुद्धा लेट नाईट डायनिंगची मजाघेता येते.
फ्रान्सच्या लीयाँ या शहरातले ‘ले हॉल’, कोपनहेगनमधले नोरेब्रो भागातले टॉर्वेहेर्लन मार्केट, रोमचे ‘मरकादोे डी टेस्टाचियो’, सॅन फ्रान्सिस्कोचे ‘फेरी प्लाझा फार्मर्स मार्केट’, बँकॉकचे ‘ऑर टोर कोर मार्केट’, टोकियोचे ‘त्सुकिजि फिश मार्केट’, इथे आवर्जुन सांगावसं वाटतं ते टोकियोतल्या त्सुकिजि फिश मार्केटमध्ये सकाळी पाच वाजल्यापासून सुरू होणार्या माशांच्या लिलावाविषयी. एरव्ही शांतताप्रिय जापनीज लोकांचा तिथे सुरू असलेला गजबजाट, लिलाव करताना होणारा घंटेचा नाद आणि लोकांचा उत्साही मूड हे सारं पाहण्यासारखं. अशा आणि यासारख्याच अनेक शहरातल्या छोट्या मोठ्या फूड मार्केटला नक्कीच भेट द्या. आपले इंडियन फूड तर आपण भारतात नेहमीच चाखत असतो मग आपल्या पुढच्या हॉलिडेवर तिथल्या लोकल मार्केटमध्ये लोकल्सबरोबरच एखादे फ्रेश बनविलेले जेवण घ्यायला काय हरकत आहे? आज भारतातसुद्दा फळं, भाज्या विकणारी अनेक सुपरमार्केट दिसतात. मागच्या आठवड्यात तर सिनेमा पाहिल्यानंतर तिथल्या मॉलमध्येच आम्ही भाजीचे शॉपिंग केले. पण त्या दुकानात भाजीवाल्याबरोबर दहा-पंधरा रुपयांचे नेगोसिएशन करता येत नाही किंवा कडीपत्ता फुकट मागता येत नाही. फ्रेश फूड व ताज्या भाज्या विकत घेणं ही भारताची परंपरा आहे आणि ती जपायला थोडासा इन्फ्रास्ट्रक्चरचा आधार मिळाला तर किती बरे होईल. काहीही झाले तरी आपले भाजी मार्केट आपण घालवू नये. काय माहीत उद्या हे आपल्या देशातच एक टूरिस्ट अॅट्रॅक्शन बनेल.
Post your Comment
Please let us know your thoughts on this story by leaving a comment.