Published in the Saturday Lokasatta on 11 January, 2025
...जगाच्या प्रवासात अशा अनेक गोष्टी अनुभवत असताना त्यातून आपल्या भारतीय पर्यटकांसाठी नेमकं काय घ्यायचं याबद्दलची आमची कल्पना स्पष्ट होत गेली. जग ही आमची कार्यशाळा बनली...
खूप वर्षांपूर्वी स्कॅन्डिनेव्हियाला गेले होते, पहिल्यांदाच. मी आणि सुधीर लंडनच्या एका ट्रॅव्हल कंपनीमार्फत या ग्रुप टूरला गेलो होतो. टूर्स कशा असतात, इंटरनॅशनली काय केलं जातं टूर्सवर, त्यांच्याकडून आपण काय चांगल्या गोष्टी घेऊ शकतो, हा उद्देश. त्यावेळी आमच्या इंटरनॅशनल टूर्सही सुरू झाल्या नव्हत्या. त्यामुळे आमचा जग प्रवासाचा अनुभव खूपच मर्यादित स्वरूपाचा. ग्लोब ट्रॉटर ही उपाधी नंतर अनेक वर्षांनी मिळाली. ह्या टूरला मात्र आम्ही बऱ्यापैकी नवखे होतो. शूज कसे असावेत, कपडे काय घालावेत, जगभरातून कुठूनही जॉइन होणाऱ्या पर्यटकांशी कसं जमवून घ्यायचं ह्या सगळ्याचाच श्रीगणेशा होता. त्या सगळ्यातून नंतर माझं लेखन सुरू झालं ते आजतागायत. ज्या अनुभवातून शिकायला मिळालं ते शेअर करण्याचा, वाचकांशी, पर्यटकांशी हितगूज करण्याचा हा वृत्तपत्रातल्या लेखांचा प्रवास आनंददायी बनत गेला. या स्कॅन्डिनेव्हियाच्या टूरवर असताना मी पूर्णपणे व्हेजिटेरियन बनले होते. नॉनव्हेज न खाण्याचा पण केला होता. युरोपमध्ये फिरताना, खासकरून स्कॅन्डिनेव्हियामध्ये व्हेजिटेरियन असणं म्हणजे एक दिव्य होतं. मीट, पोल्ट्री, फिश शिवाय कोणतीही डिश बनत नव्हती. व्हेजिटेरियन क्या होता है? हे प्रत्येक ठिकाणी समजावून सांगायला लागायचं. आमची टूर मॅनेजर अमँडा नावाची ब्रिटिश मुलगी होती. ज्यावेळी तिला आम्ही सांगितलं की मी व्हेजिटेरियन आहे, तिचा चेहरा बघण्यासारखा झाला होता. आता हा प्रोब्लेम कसा सोडवायचा या काळजीने तिला ग्रासलं. मीट म्हणजे बकऱ्याचं, मेंढीचं, गायीचं, बैलाचं, डुकराचं मांस, त्या व्यतिरिक्त चिकन, अंडी, फिश हे सगळं व्हेजिटेरियनमध्ये गणलं जातं ही तिचीच नाही तर स्कॅन्डिनेव्हियाच्या चारही देशांमधली विचारधारा. रोज अमँडा रेस्टॉरंटशी बोलून व्हेजिटेरियनचा काहीतरी इनोव्हेटिव्ह प्रकार करून द्यायचा प्रयत्न करायची, पण कधी माझ्या डिशमध्ये डेकोरेशनचा पार्ट म्हणून अंड्याचा पोळा यायचा किंवा साइड डिश म्हणून चिकन. मी व्हेजिटेरियन का झाले नेमकं ह्याच वेळी? ह्या प्रश्नाने मी कपाळावर हात मारून घेतला. पण, पण केला होता नं, तो मोडायचा नसतो. त्यामुळे मी जे काही समोर यायचं त्यातून त्यांच्या दृष्टीने ज्या व्हेजिटेरियन गोष्टी होत्या त्या बाजूला करून उरलेल्या गोष्टी आणि सॅलड खाऊन उदरनिर्वाह केला त्या टूरवर. डबल टॉर्चर होतं ॲक्च्युअली! एकतर ह्या टूर्सवर लंच हा प्रकारच नसायचा. ब्रेकफास्ट आणि डायरेक्ट डिनर. सपाटून भूक लागायची. बरं वरण-भात, भाजी, चटण्या, लोणची, पापड असं साग्रसंगीत जेवण नसायचं. एकच काहीतरी डिश असायची. मग तो भात, बटाटे, वाफवलेल्या भाज्या असतील किंवा एकच फ्लॉवर उकडलेला आणि त्यासोबत सॉस आणि चिप्स. म्हणजे ती डिश दिसायला इतकी सुंदर असायची की बघतच रहावं. तेव्हा मोबाईल फोन नव्हते, नाहीतर मस्त फोटो काढून ठेवले असते. सुधीरच्या डिशमध्ये फिश अंॅड चिप्स किंवा चिकन अंॅड चिप्स हे सुद्धा इतकं मस्त दिसायचं आणि असायचं, की जरी मी कन्व्हर्टेड व्हेजिटेरियन असले तरी तोंडाला पाणी सुटायचं. एकंदरीत भुकेल्यापोटी ती टूर पार पडली आणि जेव्हा कधी इंटरनॅशनल टूर सुरू करू तेव्हा आपल्या पर्यटकांना ‘दुपारचं जेवण द्यायचंच‘ हे ठरवलं. आपल्या भारतीय मनाला सकाळचा नाश्ता, दुपारचं आणि रात्रीचं भोजन याची इतकी सवय आहे की लंचशिवाय कसं बरं रहायचं हा प्रश्नच आहे. त्यावेळी मलाही ते जाणवलं. दुपारी जेवणाच्या वेळी भुकेनं जीव कासावीस व्हायचा. साइट सीइंगमध्ये चित्त लागायचं नाही. कधीकधी शरीराला नाही पण मनाला भूक लागायची. चिप्स खाऊन किंवा एखाद्या ज्यूसने भागायचं नाही. साइट सीइंगपेक्षा आणि त्या त्या स्थळांचा आनंद उपभोगण्यापेक्षा दुपारचं जेवण नाही या चिंतेनेच मनात घर केलेलं असायचं.
अमँडाने खूप चांगल्या तऱ्हेने टूर कंडक्ट केली. जसं टूरच्या कार्यक्रमात लिहिलं होतं, जे बघून आम्ही पैसे भरले होते ते सर्व त्याबरहुकूम पार पडलं. नाव ठेवायला जागा नव्हती. ‘आयडियल वे ऑफ कंडक्टिंग द टूर' याचं चांगलं उदाहरण तिने आमच्यासमोर ठेवलं. ‘दुपारचं जेवण नाही' ही गोष्ट आपल्या भारतीय पर्यटकांना चालणार नाही त्यामुळे त्यात आम्ही बदल करण्याचं ठरवलं. दुसरी गोष्ट होती जी मला खूपच खटकली ती म्हणजे दररोज फक्त अर्धा दिवसच स्थलदर्शन किंवा दोन दिवस असे होते की त्या दिवशी काहीच नाही. पूर्ण फ्री दिवस. म्हणजे ते बघूनच आम्ही बुकिंग केलं होतं पण आम्ही विचार केला होता की त्या वेळात आपण स्वतः फिरू शहरात. पायी चालल्याशिवाय शहर कळत नाही नं. पण व्हायचं उलटंच. दररोज अमँडा आम्हाला दुसऱ्या दिवशीच्या फ्री टाईममध्ये तुम्ही काय काय ऑप्शनल करू शकता त्याची लिस्ट द्यायची त्याच्या चार्जेससह, आणि मग बसमध्ये सुसंवाद वा थोडासा विसंवाद सुरु व्हायचा. ज्यांच्याजवळ 'पैसे' हा प्रॉब्लेम नव्हता ते लागलीच बुक करायचे. पण आमच्यासारख्या अनेकांना टूरचे पैसे भरल्यावर दररोज अशा ऑप्शनलसाठी कुठे शंभर दोनशे तर कुठे चारशे डॉलर्स भरणं जीवावर यायचं. नाही गेलो तर आपण काहीतरी महत्वाचं मिस करु असं वाटायचं आणि जायचं म्हटलं तर एवढे पैसे का? हयाने जीव कासावीस व्हायचा. कितीही म्हटलं तरी आपलं मध्यमवर्गीय मन हिशोब करतंच. एकंदरीत त्या टूरमधली ही ‘ऑप्शनल साइट सीइंग‘वाली गोष्ट मनाला खटकलीच. लोकांनी मोकळ्या मनाने टूर एन्जॉय करायला पाहिजे ही गोष्ट या ऑप्शनल मुळे डिस्टर्ब झाली. एकदा का अमँडाने ऑप्शनलची लिस्ट जाहीर केली की बसमधला माहोलच बदलायचा. ‘तू जाणार? तुम्ही काय करताय? खूपच महाग आहे नाही! आम्ही जातोय...‘ अशा संवादाला उत यायचा आणि काही चेहरे प्रफुल्लित, काही आनंदित तर काही हिरमुसलेले असा सीन व्हायचा. आम्ही काही ऑप्शनल साइट सीइंग घेतलं. एक-दोन चांगले होते, तर दोन ठिकाणी एवढे पैसे वाया गेले असं वाटून, पैसे देऊन मूड खराब करून घेतला असं झालं. बरं झालं या टूरला आम्ही गेलो आणि ते सुध्दा अगदी सुरुवातीला, इंटरनॅशनल टूर्स सुरू करण्याआधी. कारण त्या टूरवरच ‘काळ्या दगडावरची रेघ‘ म्हणतात नं तसं ठरवून टाकलं, आपल्या टूर्समध्ये कधीही ऑप्शनल साइट सीइंग हा प्रकार असणार नाही. जे बघण्यासारखं आहे ते आपल्या टूरमध्ये असलंच पाहिजे. पर्यटकांनी एकदाच काय ते पैसे भरायचे. टूरवर पैशाचा विषय नाही, त्यामुळे नाराजी नाही आणि एखादी गोष्ट बघायची राहिली पैशाअभावी, असं कधीही होता कामा नये. हे जे त्या स्कॅन्डिनेव्हियाच्या टूरवर ठरवलं, ते आजतागायत पाळलं आम्ही आणि मला वाटतं आमच्या पर्यटकांनाही ते आवडतं.
जगाच्या प्रवासात अशा अनेक गोष्टी अनुभवत असताना त्यातून आपल्या भारतीय पर्यटकांसाठी नेमकं काय घ्यायचं याबद्दलची आमची कल्पना स्पष्ट होत गेली. जग ही आमची कार्यशाळा बनली. कोणतीही गोष्ट जशीच्या तशी नाही उचलता येत. ग्लोबलमधलं लोकल, लोकल ग्लोबल मिळूनचं ग्लोकल अशी बऱ्यापैकी मस्त खिचडी बनलीय. जग जवळ आलंय, पण तरीही मुंबईला चालणारी एखादी गोष्ट किंवा आमची जाहिरात कधी कधी पुण्याला चालत नाही किंवा आमचं दिल्लीकरांशी करायचं कम्युनिकेशन हे बंगळुरू वा हैद्राबादला बदलावं लागतं किंवा कलकत्याशी संपूर्णपणे वेगळ्या पद्धतीने बोलावं लागतं. ग्लोबल जगात वावरताना लोकलला विसरून चालत नाही हे आपल्या भारताने जगाला शिकवलं.
सध्या आम्ही दीक्षितांचं डाएट किंवा इंटरमिटन्ट डाएट करतोय, दोनदाच खायचं. ब्रेकफास्ट लंच हा आम्ही निवडलेला पर्याय. हे जर मी पस्तीस वर्षापूर्वी केलं असतं तर त्या स्कॅन्डिनेव्हियाच्या टूरवर झालेली उपासमार वर्मी लागली नसती. युरोपमधलं भोजन, तिथली माणसं किंवा भाषा किंवा तेथील अनेक देशांचा इंग्लिश न बोलण्याचा आग्रह यामुळे युरोप जास्त करून ग्रुप टूर्ससाठी प्रसिद्ध झालं. लोकल्सशी सुसंवाद साधणारा टूर मॅनेजर मिडिएटर बनला भारत आणि युरोपमधला, त्यामुळे भारतीयांना युरोप फिरणं सुसहय झालं. आता जेवण ही चिंतेची बाब राहिली नाही युरोपमध्ये. आता उलट असं झालंय की फक्त भारतीय भोजन नको, मधूनमधून लोकल फूडही द्या. त्यातही आम्ही अनेक प्रयोग करून बघितले. रोज एक लोकल मील देऊया आणि एक भारतीय भोजन असाही प्रयत्न केला, पण बाय ॲन्ड लार्ज पर्यटकांनी रोज लोकल नको यावर शिक्कामोर्तब केलं. एकापाठोपाठ एक भारतीय भोजनाचा कंटाळा आला की काहीतरी लोकल ग्लोबल असलं पाहिजे हा विचार पर्यटकांना आणि आम्हालाही पटला. सध्या त्याप्रमाणे सप्तखंडात ग्लोबल लोकल ग्लोकल भोजनाचा स्वाद पर्यटकांना देतोय. मागच्या महिन्यात तैपेई तैवानला त्या वेगळ्या जगात तिथल्या रेस्टॉरंटने आम्हाला इतकं सुंदर व्हेजिटेरियन जेवण दिलं की त्या तैवानी भोजनानंतर आम्ही सर्व पर्यटकांनी खऱ्या अर्थाने तृप्तीचा ढेकर दिला. आत्ताच मागच्या पंधरवड्यात अंटार्क्टिकाच्या टूरवर असताना क्रूझवर एक्झिक्युटिव्ह शेफ अमित राव होता जो आम्हाला ग्रीनलँड आइसलँड क्रूझवर भेटला होता आणि आमची चांगलीच मैत्री जमली त्याच्याशी. त्याने अंटार्क्टिका एक्स्पिडिशन क्रूझवर अक्षरशः लाड केले आमच्या ग्रुपमधल्या पर्यटकांचे. त्या सातव्या खंडावर अमितमुळे पर्यटकांना उत्कृष्ट ग्लोबल फूडसोबत अगदी आपलं भारतीय लोकल जेवणही मिळत होतं. आत्ता या क्षणी आपण खरोखरच एका छानशा जगात आहोत. ग्लोबल लोकल ग्लोकलचा सकारात्मक ताळमेळ आपल्याला जमला की आपण जिंकलो.
Post your Comment
Please let us know your thoughts on this story by leaving a comment.