Published in the Saturday Lokasatta on 01 February, 2025
...जागा मिळाली असती, बिझनेस वाढला असता, पण आपण आपली कमिटमेंट तोडली, स्वतःला दिलेलं प्रॉमिस पाळलं नाही, याचं ओझं आयुष्यभर सहन करावं लागलं असतं...
चारपाच दिवसांच्या सुट्टीनंतर ऑफिसला आले होते. नॅचरली डोक्यात कामांची गर्दी होती. कितीही ऑनलाइनचा जमाना आला, झूम-टीम्स-मीट सारख्यांनी आपलं जीवन व्यापलं असलं, जगाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात आपण असलो तरीही काम थांबत नसलं, तरी... तरीही ऑफिसमध्ये जाऊन, समोरासमोर बसून एखाद्या प्रॉब्लेमवर चर्चा करणं, एखादी स्ट्रॅटेजी डेव्हलप करणं, एखाद्या जोकवर खळखळून हसणं, सर्वांसोबत लंच टेबलवर बॉलिवूड गॉसिप्सवर आपलं अमूल्य मत देणं... अशा अनंत गोष्टी फेस-टू-फेस करण्यातली मजाच काही और आहे आणि ही मजा आपल्याला जिवंत ठेवते, आपल्यातलं माणूसपण जागं ठेवते, सभोवताली आपली माणसं असल्याचं बळ देते. आणि तशीही ती मनुष्यप्राण्याची मूलभूत गरज आहे असं मला वाटतं. घरी स्क्रीनसमोर बसून बंद खोलीत आयसोलेशनमध्ये असल्यासारखी दोन वर्षं आपल्याला कोविडने बहाल केल्यावर तर ही फेस-टू-फेस येण्याची गरज खूपच वाढलीय. घरातून काम करणं, सतत ऑनलाइन असणं हे नवीन होतं तेव्हा खूपच छान वाटत होतं. मी तर अनाऊन्सच करून टाकलं होतं की घरून कामं जास्त चांगली होतात, तेव्हा पोस्ट कोविड आठवड्यातले किमान तीन दिवस मी घरून काम करणार, लेट्स बी मोअर प्रॉडक्टिव्ह. जेवढ्या उत्साहाने ही घोषणा मी केली होती, तेवढ्याच उत्साहाने मी ती मागे घेतली आणि रीट्रीट घेऊन ऑफिसमध्ये दाखल झाले. तोपर्यंत बहुतेकांना घरी बसण्याचा, सतत ऑनलाइन असण्याचा आणि त्या व्हर्चुअल एकलकोंडेपणाचा कंटाळा आला होता. आम्ही ठरवून टाकलं, ‘नो वर्क फ्रॉम होम’. कॉर्पोरेट ऑफिस माणसांनी भरून गेलं, मोठमोठी कामं हसत खेळत व्हायला लागली हे बघून बरं वाटलं. कोविडमध्ये एक वेळ अशीही आली होती की ‘कॉर्पोरेट ऑफिसचं करायचं काय आता जर सगळेच घरून काम करणार असतील तर’ असा प्रश्न पडला होता. कोविडमध्ये बिझनेस ठप्प झालाच होता. आमच्या बिझनेसला आणि आम्हालाही भविष्य आहे का या संबंधी प्रश्नचिन्ह उभं राहिलं होतं. त्यात रिअल इस्टेट अंगावर येत होती. मात्र यावेळी फिनटेक आणि फार्माची चलती होती. एक फिनटेक कंपनी त्यांच्या तीनशे जणांच्या टीमसाठी जागा शोधत होती आणि त्यांनी आमचा एक मजला भाड्याने घेतला तेव्हा कुठे आमच्या जीवात जीव आला. मदतही झाली आणि आता जेव्हा आम्हाला पुन्हा त्या मजल्याची गरज भासली, तेव्हा त्यांनी जागा परत दिली. देव म्हणा किंवा सुपरपॉवर, अगदी गर्तेत फेकले गेलेलो असतो तेव्हाही मदतीला येते, ती अशी. बरंच काही शिकवून गेलेला तो कोविडचा काळ आता भूतकाळात जमा झालाय आणि जेवढ्या वाईट तऱ्हेने टुरिझम इंडस्ट्री ‘आऊट ऑफ माईंड’ झाली होती, त्याच्या दुप्पट वेगाने ती आता ‘ऑलवेज ऑन द माईंड’ या सुस्थितीपर्यंत आली आहे. सगळं काही छान तऱ्हेने सुरू झालं आणि टुरिझम इंडस्ट्रीशी सलंग्न असलेल्या लाखो लोकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न सुटला. हे सगळं होत असताना एक मात्र लक्षात आलं की ऑनलाइन बुकिंग - शॉपिंग वगैरे सगळं काही मोठ्या प्रमाणावर असलं तरीही आमचे ग्रुप टूर्सवाले पर्यटक अजूनही ऑफिसला प्रत्यक्ष येऊन वा नेहमीच्या सेल्स एक्झिक्यूटिव्हला फोन करून बुकिंग करणं पसंत करतात. टूरच्या एक्स्पिरियन्ससोबत बुकिंगचा एक्स्पिरियन्स ही एक महत्वाची गोष्ट बनली आहे आणि त्यामुळेच आमच्या सेल्स ऑफिसेसची आणि सेल्स पार्टनर्सची संख्या वाढत चाललीय. दोन हजार तेरामध्ये वीणा वर्ल्ड अस्तिवात आली, कोविड आणि दोन दोन एअरलाईन्सच्या बॅन्क्रप्टसीमध्ये झालेलं करोडोफ्लचं नुकसान या सर्वांचा सामना करीत असताना टीमचे एकगठ्ठा प्रयत्न आणि पर्यटकांचा सततचा पाठिंबा यामुळे आमची वाटचाल सुरू राहिली. आता भारतभर ऑफिसेसचं चांगलं जाळं पसरतंय आणि आम्ही पर्यटकांच्या जास्तीत जास्त जवळ जायचा प्रयत्न करतोय.
‘नमनाला घडाभर तेल’ सारखं झालं माझं. लिहायला सुरूवात केली आणि गेल्या दहा-बारा वर्षांच्या काळात सफर करून आले. तर... मी सुट्टी संपवून ऑफिसला दाखल झाले आणि समोर प्राची हजर. आजचा दिवस आणि हा आठवडा कसा आहे याची उजळणी झाल्यावर ती म्हणाली, दोन तीन फोन कॉल्स लावून द्यायचेत. एक बाई खूप मागे लागल्यायत. त्यांना तुमच्याशी जागेसंबंधी बोलायचंय, आणि त्या पुढे काही बोलायलाच तयार नाहीत. तेव्हा आज किंवा या आठवड्यात कधीतरी हा फोन लावून देते. प्राचीला म्हटलं, हे बघ तू आणि मी दोघेही या फोनचं ओझं नको घेऊया. मी टेबल सेट करतेय, तेव्हा दे बरं आत्ताच फोन लावून. ‘बोला ताई, तुम्हाला माझ्याशी बोलायचं होतं असं प्राची म्हणाली.’ समोरून ताईंचं प्रेमळ बोलणं, ‘मी एक जागा घेतलीय आणि ती जागा घेताना मी तुम्हालाच नजरेसमोर ठेवलंय, तुमच्यासाठीच मी ती जागा घेतलीय म्हणा नं.’ मी सावरून बसले, कुणीतरी आपली एवढी काळजी करतंय म्हटल्यावर बरं वाटलं. आम्हाला जागा नको होती, तरीही ताईंचं प्रेम बघून मी विचारलं, ‘कुठे आहे तुमची जागा?’ तर म्हणाल्या, ‘अहो माहीमच्या एल जे रोडवर, किंग्ज कॉर्नर सोसायटीत. तुमचं ऑफिस मला या भागात कुठे दिसलं नाही आणि म्हणूनच मला तुम्हाला ही जागा द्यायचीय. यासारखा स्पॉट तुम्हाला शोधूनही सापडणार नाही’. आता ‘किंग्ज कॉर्नर’ बिल्डिंग म्हणजे वीणा वर्ल्ड होण्याआधीची आमची कर्मभूमी. मला आता काय बोलावं कळेना. मी म्हटलं,‘पण तुम्हाला असं का वाटलं की आम्ही तिथे येऊ म्हणून?’ तर म्हणाल्या, ‘अहो हल्ली कॉम्पिटिशनमध्ये असचं शेजारीशेजारी वा समोरासमोर ऑफिस उघडतात नं. तुम्हाला डायरेक्ट कॉम्पिटिशन करता येईल’. वॉव, व्हॉट अ स्ट्रॅटेजी! ताईंना म्हटलं, ‘धन्यवाद ताई, तुम्ही आमच्याविषयी प्रेमाने आणि आपुलकीने जो विचार केलात, त्याने मला खूप बरं वाटलं. हल्ली अशाच तऱ्हेने कॉम्पिटिशन आपल्याला चहूबाजूंनी घेरत असते. पण ज्यावेळी वीणा वर्ल्ड झालं, त्यावेळी आम्ही ठरवलं होतं की आपण लीगल, एथिकल, मॉरल व्हॅल्यूज सांभाळूनच बिझनेस करायचा. दुसऱ्यांशी स्पर्धा करण्याऐवजी आमची स्पर्धा ही आमच्याशीच आहे. कालच्यापेक्षा आजचा दिवस अधिक यशस्वी बनवायचा. त्यामुळे स्पर्धा होत राहते पण आपण प्रयत्नपूर्वक ती करायची नाही, त्यात वेळही घालवायचा नाही ह्या तत्त्वाने वाटचाल सुरू आहे. तुम्ही आमच्यासाठी अतिशय चांगला विचार केलात, पण तुमचा प्रस्ताव मंजूर करता येणार नाही, तेव्हा तुम्ही प्लीज दुसरं कुणीतरी भाडेकरू म्हणून शोधा’.
ताई म्हणाल्या ते खरं होतं. माहीम माटुंगा दादर शिवाजी पार्क या आम्ाच्या कर्मभूमीच्या एरियात गेली अकरा वर्षं आम्हाला ऑफिससाठी जागाच मिळाली नाही. कारण आम्ही ठरवून बसलो होतो की माहीम कॉजवे ते सिटीलाइट सिनेमा यामध्येे ऑफिस घ्यायचं नाही. जागा शोधायची ती सिटीलाइट सिनेमा पासून दादरपर्यंत. आमची ही ‘गोरीगोमटी सुबक ठेंगणी’ वाली अपेक्षा काही केल्या पूर्ण होईना. ‘सब्र करो, मिल जाएगा’ असं म्हणत आम्ही एकमेकांना धीर देत होतो. सगळीकडची ऑफिसेस होत होती, पण या एरियात ऑफिस मिळण्याचं लक्षण काही दिसेना. आम्ही प्रथम रानडे रोडला छोटुसं ऑफिस उघडलं, नंतर प्रभादेवीला, बांद्य्राला, माटुंग्याला. पर्यटकांनी तिथेही येऊन बुकिंग करून सपोर्ट केला. पण दहामधल्या एका तरी पर्यटकाचा प्रश्न असायचाच,‘अहो तुम्ही शिवाजी पार्क एरियात ऑफिस का घेत नाही?’ आता त्या बाबतीतलं आमचं दु:ख आम्हालाच माहीत. आम्ही शपथ घेऊन बसलो होतो माहीम ते सिटीलाइट नाही घ्यायचं ऑफिस आणि बऱ्याच नवीन बिल्डिंग्ज तिथेच होत होत्या. एकदा तर आमच्या प्रोजेक्ट टीमने एका नवीन बिल्डिंगच्या ग्राऊंड फ्लोअरचा प्लॅन आणला. वाइड फ्रंटेज, चौकोनातली जागा, सगळं काही छान होतं, फक्त छान नव्हती ती लक्ष्मणरेषा. त्या आमच्या अटीत ती जागा बसत नव्हती. जिथे जायचंच नाही असं ठरवलं होतं, तिथे शोभा हॉटेलजवळ ती जागा होती. आमच्या प्रोजेक्ट टीमने आम्हाला बऱ्यापैकी कन्व्हिन्स केलं. माझ्यातही थ्री इडियटस मधला व्हायरस संचारला. ‘एव्हरिथिंग इज फेअर इन लव्ह ॲन्ड वॉर, ॲन्ड धिस इज वॉर’ म्हणत मी आणि सुधीर दुसऱ्या दिवशी सिद्धिविनायकाला जाताना त्या जागेपाशी गेलो. थांबलो थोडा वेळ. ‘धिस इज द वन’ अशी जागा होती. ‘लव्ह ॲट फर्स्ट साइट’ अशी अवस्था झाली. मिळाली जागा अशा आनंदात गाडीत बसलो आणि प्रोजेक्ट मॅनेजर भावनाला ‘जागा ओके’चा मेसेज टाइप करायला लागले. समहाऊ माझी बोटं पुढे जाईनात. मी सुधीरला म्हटलं, ‘दोन हजार तेरा मध्ये जेव्हा आपली कंपनीही आस्तित्वात आली नव्हती तेव्हा आपण ही लक्ष्मणरेषा आखली होती. आता तर बऱ्यापैकी लोकांना वीणा वर्ल्ड माहितीय, ब्रँड बनतोय. दहा वर्षांनंतर एवढं काय अडलंय की आपण आपल्या स्वतःला दिलेलं वचन तोडायचं आणि आपल्याच नजरेत आपण अपराधी ठरायचं.’ सुधीरही तेच म्हणाला, ‘जागा चांगली आहे, पण लेट्स नॉट ब्रेक द कमिटमेंट वुई मेड टू अवरसेल्व्हज्’ आणि सुधीरचंच वाक्य घेऊन भावनाला ‘नॉट ओके’चा मेसेज पाठवला. आमची सेल्स टीम, प्रोजेक्ट टीम यांच्या जागा मिळतेय म्हणून उजळलेल्या चेहऱ्यावरचा उतरलेला रंग मला दिसला. पण कान्ट हेल्प. जागा मिळाली असती, बिझनेस वाढला असता, पण आपण आपली कमिटमेंट तोडली, स्वतःला दिलेलं प्रॉमिस पाळलं नाही, याचं ओझं आयुष्यभर सहन करावं लागलं असतं. त्या जागेचा विषय संपला आणि पुन्हा जागा शोधण्यासाठी प्रोजेक्ट टीमची पायपीट सुरु झाली.
‘सब्र का फल मिठा होता है’ असं म्हणतात. संपूर्ण एक तप लागलं आम्हाला. बारा वर्षं... आणि आम्हाला शिवाजी पार्कमध्ये राजा बढे चौकात जागा मिळाली. माझा पर्यटन प्रवास या राजा बढे चौकापासूनच सुरू झाला होता. दहावीच्या परीक्षेनंतर माझे बाबा आणि काका ह्यांना मदत करायला मी राजा ट्रॅव्हल्सच्या याच चौकातल्या ऑफिसमध्ये रूजू झाले होते. आज पंचेचाळीस वर्षांनंतर पुन्हा तिथेच, त्याच चौकात, वीणा वर्ल्डचं आम्हाला हवं होतं तसं मोस्ट वाँटेड सेल्स ऑफिस मिळालं. तुम्ही हा लेख वाचत असाल तेव्हा हे ऑफिस कार्यान्वित झालेलं असेल. म्हणजे तीस जानेवारीला माननीय श्री. राज ठाकरेंच्या हस्ते या ऑफिसचं उद्घाटन झालेलं असेल. आता खऱ्या अर्थाने आम्ही आमच्या शिवाजी पार्कमध्ये आलो. हे सेल्स ऑफिस वीणा वर्ल्डच्या ह्या एरियातील सर्व पर्यटकांना मनःपूर्वक सेवा देण्यासाठी बांधील आहे. ‘कदम कदम बढाये जा’, अशी प्रगतीच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. त्यासाठी आणि आमच्या या नव्याकोऱ्या शिवाजी पार्कच्या ‘वीणा वर्ल्ड सेल्स ऑफिस’ साठी तुम्हा सर्वांचे आशीर्वाद नम्रपणे मागून घेतेय. त्याचसोबत आम्ही आमचं पर्यटन क्षेत्रातलं काम योग्य मार्गाने सुरू ठेवू ह्याची ग्वाही ही देते.
Post your Comment
Please let us know your thoughts on this story by leaving a comment.