Published in the Saturday Lokasatta on 31 August 2024
...ह्या देशात रस्ते नाहीत. म्हणजे छोटुकल्या गावांमध्ये रस्ते केलेत पण अदरवाइज आपल्याला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जायला विमान, बोट, हेलिकॉप्टर, स्नोमोबाईल किंवा डॉगस्लेडचा सहारा घ्यावा लागतो...
`ओ!हॅलो कॅप्टन! तुम्ही दस्तूरखुद्द आमच्या स्वागतासाठी?’ डिनर करून डायनिंग रूममधून बाहेर आलो तर कॅप्टन सर्वांना गुडनाइट करीत दारात उभे. बरं त्यांची उभं राहण्याची जागा थोडी साइडला होती, म्हणजे पटकन आम्हाला बाहेर येताना ते दिसत नव्हते. आजूबाजूला कुणी नाही पाहिल्यावर त्यांना मी हा प्रश्न केला. तर म्हणे `मला डायनिंग हॉलमधून बाहेर येणाऱ्यांच्या चेहऱ्यावरचे भाव बघायचे आहेत. कसं काय चाललंय ते विचारण्यापेक्षा असं चेहऱ्यावरून जाणायला सोपं जातं, एकदम कॅन्डिड फीडबॅक असतो तो.’ पावला पावलावर शिकायला मिळतं ते असं. कॅप्टनने विचारलं, `काल मध्यरात्री अनाऊंसमेंट नंतर नॉर्दर्न लाइट्स बघायला गेला होतात की नाही टॉप डेकवर?‘ आम्ही त्या कडाक्याच्या थंडीत वर जाऊन नॉर्दर्न लाइट्स पाहिले ह्याचा आनंद आमच्यापेक्षा त्याला जास्त झाला. `किलर व्हेल्स आणि हम्पबॅक व्हेल्सपण पाहिले नं?’ इच्छा असली की गोष्टी घडतात तसंच काहीसं कॅप्टनचं झालं असावं. आपल्या क्रुझवर असणाऱ्या सगळ्या एक्स्पिडीशनर्सना नॉर्दर्न लाइट्स दिसावे, व्हेल्स दिसावे ही त्याची तळमळ किंवा त्याच्या देवाला त्याचं साकडं. दुसऱ्याच दिवशी त्यामुळे आम्हाला ह्या सगळ्या गोष्टींचा आनंद घेता आला. इच्छाशक्ती बलियसी.
वाह! अशी फीस्ट आता येणारे दहा दिवस आम्हाला मिळत राहिली तर क्या कहने... आमच्या अपेक्षा वाढल्या आणि त्यामुळेच असावं पुढचे तीन दिवस आम्हाला एकही व्हेल किंवा नॉर्दर्न लाइट्स दिसले नाहीत. निसर्ग कदाचित म्हणत असावा, `तुमच्या अपेक्षांप्रमाणे मी नाचणार नाही. मला हवं तेव्हाच मी तुमच्यासमोर ह्या आनंदाला प्रकट करणार’. आम्हाला ही जाणीव झाली आणि आम्ही ह्या अपेक्षांना पूर्णपणे टोन डाऊन करून टाकलं. कारण आम्ही उगाचच जे हातात नाही त्याची वाट बघत बसलो, त्यापेक्षा आमच्या डोळ्यांना कानांना अगदी सर्वांगाला रीज्युविनेट करणारा निसर्ग आमच्यासमोर होता त्याकडे दुर्लक्ष करीत होतो. आणि जेव्हा हे लक्षात आलं तेव्हा आमच्या टूरचा आनंद दिवसागणिक वाढू लागला. कधी हिरवा, कधी निळा तर कधी काळा असा अथांग समुद्र आमच्यासमोर होता. त्याच समुद्रातून वर आलेले सुळक्यांसारखे महाकाय पहाड आणि त्यावर पसरलेल्या बर्फाचा नजारा केवळ अप्रतिम होता. आणि अप्रतिम निसर्गसौफ्लदर्य कमी होतं की काय तर त्या समुद्रात अतिप्रचंड आइसबर्गज् म्हणजेच तरंगणारे बर्फाचे डोफ्लगर वास्तव्य करून होते. त्यांच्यापासून मोकळे होणारे छोटे छोटे आइसबर्गज् समुद्रात कापूस पसरल्यासारखे विहार करीत होते. म्हणजे आत्ता माझ्या डोळ्यासमोर आहे समुद्र, त्यात छोटे छोटे पोहणारे आइसबर्गज्, त्यापाठी मोठ्ठा डोफ्लगराएवढा आइसबर्ग, त्याच्यापाठी ताबूंस रंगाच्या रांगड्या डोंगरांची एक लंबच लांब रांग आणि त्याच्यापाठी आकाशाच्या बँकग्राऊंडला ह्या तांबूस रंगाच्या डोंगरापेक्षाही उंच अशा बर्फाने आच्छादलेल्या पहाडांची रांग. अहाहा, काय तो नजारा! डोळ्यात मनात किती आणि कुठे साठवू असं झालंय. गेले दोन तास मी इथे बसलेय पण एक मिनिटही कंटाळा आला नाही. हे निसर्गचित्र येणाऱ्या अनेक महिन्यांसाठी उत्साह देईल.
इथले पहाड मला आपल्या लेह लडाखच्या पहाडांसारखे वाटले. लेह आपल्या भारताच्या उत्तर टोकावर तर हे जगाच्या उत्तर टोकावर, ग्रीनलँड मधले. लेह लडाख कसं सहा महिने चालू सहा महिने बंद तसंच इथेही सहा महिने दिवस आणि सहा महिन्यांची रात्र. केंद्रशासित लेह लडाखचे मायबाप दिल्लीकर तसंच नॉर्थ पोल जवळच्या ह्या सर्वात मोठ्या आयलंड कंट्री ग्रीनलँडचा मायबाप आहे `डेन्मार्क’. इथलं हवामान तेवढंसं अनुकूल नसल्याने ह्या सर्वात मोठ्या आयलंडवर वस्ती अगदीच नगण्य. ह्या देशात रस्ते नाहीत. म्हणजे छोटुकल्या गावांमध्ये रस्ते केलेत पण अदरवाइज आपल्याला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जायला विमान, बोट, हेलिकॉप्टर, स्नोमोबाईल किंवा डॉगस्लेडचा सहारा घ्यावा लागतो. आपण टूंड्रा प्रदेशातले एस्किमो म्हणून जे शाळेत भूगोलात शिकलो त्यातलेच हे उत्तर ध्रुवाजवळचे लोक. पण त्यांना एस्किमो म्हटलेलं आवडत नाही. त्यांना इनुइट्स, कलालित किंवा ग्रीनलँडर म्हटलेलं आवडतं. आता अर्थातच मिडनाइट सन, नॉर्दर्न लाइट्स, क्रुझेस, फिशरीज, मरीन... यामुळे टूरिझम खूपच वाढलंय इथे आणि इथले स्थानिकही एकदम अपटूडेट आहेत बरं का. म्हणजे एस्किमोचं चित्र मनात घेऊन इथे आलो तर फसगत झाल्यासारखं होईल. गावं जेमतेम शेकडो किंवा हजार लोकवस्तीची असली तरी ‘दे आर अपटूडेट विथ द वर्ल्ड. डोन्ट अंडरएस्टिमेट' असा प्रकार.
तर अशा ह्या ग्रीनलँडला आम्ही पहिल्यांदाच पाऊल ठेवलं, आणि आज आर्क्टिक सर्कलही क्रॉस केलं. ग्रीनलँडला येण्यासाठी आपला नेहमीचा विमान व बसचा ऑप्शन न घेता आम्ही क्रुझने येणं पसंत केले. आमच्यासोबत लवकरच शंभर देश पूर्ण करणारे आमचे पर्यटक स्नेही श्री. शिवाप्रकासम कलाथी आणि सतीश सिन्हाही आले. `आम्ही चाललोय तुम्हीही चला’ ह्या `हंड्रेड कंट्री क्लब’चे आम्ही सारे सध्यातरी अनरजिस्टर्ड सदस्य. क्रुझवर असल्यामुळे फायदा असा की एकदा का बोर्ड केलं आपण की डायरेक्ट तेरा दिवसांनी बाहेर, सामानाची ने आण नाही. अगदी घरासारखं सर्व वस्तु लावून ठेवायच्या आणि शेवटच्या दिवशी काढायच्या. क्रुझंच काय ती आपल्याला जिथे जिथे जायचंय तिथे घेऊन जाते. आतापर्यंत अंटार्क्टिका, अलास्का, आर्क्टिक अनेक क्रुझेसनी एक्स्पीडिशन्स वा प्रवास झाला पण कधी कंटाळा आला नाही. प्रत्येक क्रुझचा अनुभव वेगळा. अर्थात माझी आवड म्हणाल तर मला आर्क्टिक, अंटार्क्टिक,पनामा कनाल सारख्या एक्स्पीडिशन क्रुझेस जास्त आवडतात. इथे आगळंवेगळं बघायला अनुभवायाला आणि शिकायला मिळतं. ह्या क्रुझेसवरची एक्स्पीडिशनर्सची संख्या सुद्धा कमी असते. दिडशे दोनशे प्रवासी आणि तेवढाच क्रु त्यामुळे एकमेकांना ओळखणं सोप्पं जातं. म्हणूनच ह्या क्रुझच्या सर्व टीमशी जेव्हा संधी मिळेल तेव्हा बोलता आलं, अगदी कॅप्टन पासून सर्वांशी. हेड शेफ अमित राव चक्कं गाववाला निघाला. बांद्रा मुंबईचा. त्यामुळे आमच्यातल्या श्री. कलाथींची सोय झाली कारण समोर कितीही चमचमीत पदार्थ असेल तरी ते फक्त डाळ भातच खातात. मग त्याने रोज भात तोच असला तरी भारतातल्या सर्व प्रकारच्या डाळींची चव त्यांना दिली.
एफअँडबी मधला दिल्लीचा पुनीत तर पहिल्या दिवसापासून आम्हा दीडशे जणांना नावाने हाक मारतो. त्याचा सिक्स्थ सेन्स स्ट्राँग असावा. कॅप्टनने ज्या दिवशी त्याच्या सतरा देशातून आलेल्या क्रु मेंबर्सची ओळख सर्वांना करून दिली ते बघून आम्हाला कॅप्टनचं खरं व्यक्तिमत्व कळलं. सो हम्बल. बरं, दाखविण्यासाठी तो तसा नव्हता. आम्ही त्या दिवशी डिनरनंतर त्याच्याशी बोलत असताना एक बाई हातात दोन भरलेले ग्लास घेऊन बाहेर आली, कॅप्टन तिला प्रेमाने म्हणाला, 'पहिल्या दिवशी तुम्हाला काय शिकवलंय, क्रुझवर असताना तुमचा एक हात नेहमी मोकळा असावा नं. क्रुझ हेलकावे घेते तेव्हा तुम्हाला कशालातरी पटकन पकडता आलं पाहिजे. चला मी एक ग्लास पकडतो, आणि तुम्हाला रूमवर पोहोचवतो. त्या अलिशान क्रुझवर सर्वेसर्वा असलेल्या कॅप्टनचा रुबाब त्याच्या युनिफॉर्ममधून दिसत होताच पण वागण्यातून त्याची शालिनता, सभ्यता, नम्रपणा आणि मनापासून मदत करण्याची वृत्ती आम्हाला त्या तेरा दिवसात उलगडत होती. 'कॅप्टन ऑफ द शिप‘चा गर्व, ‘आय ॲम द वन' ची मिजास हे कुठेही नजरेस पडलं नाही. ह्या एक्स्पीडिशन मध्ये रोज आम्ही झोडियाक म्हटल्या जाणाऱ्या छोट्या बोटीतून प्रवास करून साइटसीईंग करायचो. त्या झोडियाकचा चालक त्या वेळेसाठी आमचा कॅप्टन असायचा आणि आम्ही त्याच्या सुचनांबरहुकूम चालायचो. साइटसीईंग करताना जो गाइड असायचा तो त्यावेळचा कॅप्टन, मग आम्ही त्याच्या मार्गदर्शनाप्रमाणे फिरायचो.
आम्ही किंवा आमचे टूर मॅनेजरर्स जेव्हा टूर करतो तेव्हा आम्ही त्या टूरचे कॅप्टन असतो, पर्यटक मोठ्या विश्वासाने आम्हाला फॉलो करतात. आणि अर्थातच आमची जबाबदारी असते त्या विश्वासाला जागण्याची, तेवढ्याच नम्रपणे सेवा देण्याची. आम्ही त्यावेळी ‘कॅप्टन ऑफ द टूर' असल्याने आम्हाला त्या ठिकाणाची व्यवस्थित माहिती असली पाहिजे. ते आमचं काम आणि कर्तव्य असलं पाहिजे. आमच्या टूर मॅनेजर्सनी बऱ्यापैकी त्यात प्राविण्य मिळवलंय म्हणायला हरकत नाही. अर्थात दिल्ली अभी दूर है परफेक्शनच्या बाबतीत.
‘फॉलो द कॅप्टन अँड एव्हरीथिंग विल बी ऑल राइट', ही थिअरी. पण ह्यामध्ये कॅप्टनला त्याच्यावर असलेल्या जबाबदारींची आणि कर्तव्यांची जाणीव असली पाहिजे. कॅप्टनशिप हा मिरविण्याचा आणि बॉसिंगचा प्रकार नसतो तर कॅप्टनशिप म्हणजे तुमच्या टीमला हम्बली सर्व्ह करणं आहे हे कळलं पाहिजे. आणि टीमलाही माहीत असलं पाहिजे नेमका कॅप्टन कोण आहे. घरात, कार्यालयात, देशात एकावेळी एकच कॅप्टन असावा. कोणत्या वेळी कोण कॅप्टन आहे हे सर्वांना माहीत असावं. कधी मतभेद असतील वा होतील पण ‘अग्री टू डिसॅग्री‘ प्रमाणे मतभेदांसह सर्वांच्या भल्यासाठी पुढे जायचं असतं, हे सर्वांना जमलं पाहिजे. नाहीतर निर्णय लांबणीवर पडतात. घराला किंवा संस्थेला ‘डीसिजन पॅरालिसिस' चा आजार जडू शकतो. मी आणि सुधीर जेव्हा पर्यटनाला बाहेर पडतो तेव्हा आमच्या दोघांमध्ये सुधीर कॅप्टन असतो आणि मी फॉलोअर. हे न ठरवता ठरलं गेलं, पण ते बरंच झालं नाहीतर आम्ही दोघंही टूर मॅनेजर होतो, दोघंही ऑर्गनायझेशनमध्ये आपापल्या प्रोफाइलचे लीडर, प्रवासात जर दोघांनीही कॅप्टन व्हायचं ठरवलं तर मोठा बाका प्रसंग उभा रहायचा. सुधीर साउथ पोलला पोहोचायचा तर मी नॉर्थ पोलला. नकोरे बाबा. ‘बाहेर प्रवासात तू कॅप्टन आणि मी टोटली अनपढ़‘, प्रवास सुखाचा होण्यासाठी आमच्यात घडलेला हा अलिखित करार वा नियम खूप उपयोगी पडतो. घरात वा संस्थेत कधी कधी एकच कॅप्टन असूू शकत नाही कारण प्रत्येकाची वा प्रत्येक गोष्टीसाठी लागणारी स्किल्स वेगवेगळी असू शकतात. त्यामुळे एखाद्या मिटिंगचा चेअरपर्सन जसा ठरवला जातो तसा त्या गोष्टीसाठी वा डीपार्टमेंटसाठी कॅप्टन ठरवायचा असतो आणि त्या व्यक्तीची जर त्यात मास्टरी असेल तर मग त्याचा शब्द प्रमाण. त्यावेळी अगदी सीईओ वा मॅनेजिंग डीरेक्टरनी वा घराघरातल्या युधिष्ठिर महाराजांनीही त्याचं ऐकायचं असतं. कोणत्या गोष्टीसाठी कोण कॅप्टन हे जर ठरवता आलं किंवा ती जर सवय लागली तर आयुष्यातली अनेक गणितं सुटायला मदत होईल.
आमच्या क्रुझवरचा कॅप्टन ‘लुबो‘ पोलाइट तर होताच पण तेवढाच फ्लेक्स्झिबलही. ग्रीनलँडमध्ये ज्या भागात आम्ही जाणार होते तिथे मोठ्ठं वादळ येणार होतं दुसऱ्या दिवशी, त्याचा अंदाज घेऊन कॅप्टनने आमच्या कार्यक्रमाची दिशाच बदलून टाकली. त्यावेळी मला आठवलं की आपल्या ह्या कॅप्टनसारख्या माणसांवरून हे सुभाषित आलं असावं 'द कॅप्टन ऑफ द शिप मस्ट रीमेंबर, ही इज द कॅप्टन ऑफ द शिप ॲंड नॉट द रुलर ऑफ द सी'.
वीणा पाटील, सुनीला पाटील, आणि नील पाटील ह्यांचे दर आठवड्याला वृत्तपत्रात प्रकाशित होणारे लेख वीणा वर्ल्ड वेबसाईट www.veenaworld.com वर वाचनाकरिता उपलब्ध आहेत.
Post your Comment
Please let us know your thoughts on this story by leaving a comment.